नामयाची दासी

संजय सोनवणी

दस्यु, दास, गुलाम, मोलकरीण, घरगडी ते आज घरेलू कामगार. मोलकरीण या व्यवसायाचाही एक इतिहास आहे. माणूस टोळ्यांमध्ये राहत होता तेव्हापासून त्याचा माग घेता येतो. वेदांपासून संतसाहित्यापर्यंत सर्वत्र त्याचे उल्लेख सापडतात. स्वतःला ‘दासी’ म्हणवणार्या आणि दळिता कांडिता भक्ती करणार्याू संत जनाबाई या इतिहासातलाच एक महत्त्वाचा टप्पा.

मोलाने काम करणार्‍या म्हणजे जिचे श्रम विकत घेतले जातात त्या स्त्रीला मोलकरीण असं म्हटलं जातं. आजकाल मोलकरणी शक्यतो घरकामासाठी असतात आणि एक मोलकरीण अनेक घरांचं घरकाम सांभाळते. अशी स्थिती पूर्वी नव्हती. स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांनाही घरकाम ते शेतकाम करण्यासाठी ठेवलं जाई. त्यांना घरगडी असं म्हणण्यात येई. शेतात कामासाठी सालावरही माणसं घ्यायची प्रथा होती. आज ती अत्यंत तुरळक झाली आहे. त्या गड्याला सालगडी म्हटलं जाई. अर्थात पुरुष आणि स्त्रियांच्या कामाची विभागणी वेगळी असे. मोलाने काम करणार्‍या स्त्रिया विणकाम, शिवणकाम इत्यादी कामांबरोबरच घरकामंही करत असत. मुळात पैशांच्या मोबदल्यात कामासाठी स्त्री अथवा पुरुष नोकरीला ठेवण्याची प्रथा कशी सुरू झाली, याचा इतिहास अत्यंत रंजक असला तरी वेदनादायक आहे. संत जनाबाई ज्या काळात म्हणजे तेराव्या शतकात जन्माला आल्या. त्या काळातील या संस्थेची पाळंमुळं शोधण्यासाठी अजून दूरच्या इतिहासात जावं लागतं.

गडी ते मोलकरीण या व्यवस्थेची मुळं गुलामीच्या प्रथेत आहेत. ४०-५० हजार वर्षांपूर्वी माणूस जेव्हा पृथ्वीवर अन्न आणि शिकारीच्या शोधात टोळ्या करून भटकत असे, तेव्हा टोळ्यांचा परस्परांशी संघर्ष होणं स्वाभाविक होतं. टोळ्यांमध्ये युद्धंही होत. युद्धात हरलेल्या टोळीतील पुरुषांना मारून टाकत. स्त्रियांना मात्र गुलाम केलं जाई. याचं कारण पुरुष गुलामांना सर्वकाळ बंधनात ठेवणं अशक्य असे. स्त्रिया मात्र टोळीची जनसंख्या वाढवण्यात हातभार लावू शकत. अशा गुलाम स्त्रियांची संतती ही टोळीचाच भाग आणि मालमत्ता असल्यानं त्यात प्रत्यवाय नसे. माणूस प्रगती करत नंतर पशुपालक बनला. आता त्याचा अन्य टोळ्यांशी संघर्ष हा चराऊ कुरणांसाठी होऊ लागला. याही काळात गुलामीची प्रथा चालूच होती.

शेतीचा शोध माणसाला इसवी सनापूर्वी १२ हजार वर्षांपूर्वी लागला, असं पुरातत्त्वीय पुराव्यांवरून दिसतं. इराणमधील झार्गोस पर्वतराजीतील याचा पुरावा मानलं जाणारं ठिकाण किमान एवढं जुनं आहे. प्रत्यक्षात याहीपूर्वी दोनेक हजार वर्ष शेतीचा शोध लागला असावा. शेतीनं मानवी जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवला. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आजवर भूमीवरील व्यक्तिगत मालकीहक्काचा विषयच नव्हता, तो जन्मला. प्रत्येकानं आपल्याला सोयीची आणि सुपीक जमीन आपल्या मालकीखाली आणण्याचा प्रयत्न केला. यातूनच सामुदायिक मालकीहक्काची संकल्पना हटत व्यक्तिगत मालकीहक्काची संकल्पना आली. स्त्रीवरीलही व्यक्तिगत अधिकार एका व्यक्तीच्याच वारसाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी निर्माण झाला. त्या अधिकाराला वैधता देणारी संस्था म्हणजे विवाह संस्था.

शेतीच्या शोधानं माणूस स्थिर झाला म्हणून त्याचा टोळीसंघर्ष संपला नाही. नद्या, जलाशय इत्यादी काठच्या सुपीक जमिनींसाठीचे संघर्ष सुरूच राहिले. शेतीसाठी आरंभकाळात मानवी श्रमांची नितांत आवश्यकता असल्यानं गुलामांचीही गरज पडे. ते मिळवण्यासाठीही दूरदूरवर आक्रमणं होत. आता युद्ध जिंकून नुसत्या स्त्रियाच नव्हेत तर पुरुषांनाही पकडून आणलं जाऊ लागलं. पुरुष आणि महिला गुलामांचं जीवन अर्थातच अत्यंत दयनीय आणि कष्टप्रद असे. ही अत्यंत अमानवी प्रथा होती. आधुनिक काळापर्यंत ती अमेरिकेसह अनेक देशांत सुरूच राहिली.

गुलामांची खरेदी विक्री जवळपास जगभर खुलेआम सुरू असे. ती वैध होती. किंबहुना अर्थव्यवस्थेचा ती एक प्रमुख आधार होती. राजे लोक त्यावर कर वसूल करत. भारतातही ही प्रथा होतीच. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात याबाबत विस्तृत वर्णन आहे. त्या काळात चार प्रकारचे गुलाम असत. घरातल्या गुलामापासून जन्मलेले, वारसाहक्कानं मिळालेले, खरेदी केलेले आणि जिंकून आणलेले, असे हे चार प्रकार. काही लोक कर्ज चुकवण्यासाठीही स्वत:हून गुलाम होत किंवा आपले गुलाम अथवा मुले गुलाम म्हणून देत. त्रैवर्णिकांना म्हणजे वैदिक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांना मात्र गुलाम करता येत नसे. युद्धात जिंकलेल्या या त्रैवर्णिकांना दंड भरला नाही तरच गुलाम करण्याची परवानगी असे. गुलामांची खरेदी विशिष्ट कालावधीसाठीही असे. अशा गुलामांना गहाण पडलेले गुलाम म्हणत. अशा गहाण गुलामांचा तो कालावधी संपला की ते मुक्त होत असत. मोबदला देऊनही गुलामीतून मुक्तता मिळविता येत असे. मोबदला देऊनही गुलामीतून मुक्त केलं नाही तर असं कृत्य करणार्‍या मालकास गुलामास जोवर मुक्त केलं जात नाही तोवर कैदेत टाकण्याची प्रथा होती. गुलामांची पुनर्विक्री अथवा गहाणवट गुलामाच्या मर्जीनुसार करू नये, असंही कौटिल्य म्हणतो. गुलामाची व्यक्तिगत संपत्ती, जी अर्थातच नगण्य असे, ती त्याच्या वारसांना किंवा नातलगांना देण्यात यावी, पण असं कोणी नसलं तरच ती मालकाला ठेवता येई.

अर्थात हे झाले कायदे. प्रत्यक्षातील जीवन कसं असेल याची आपण कल्पना करू शकतो. गुलामी प्रथेमुळं मोलावर कामाला घेणं ही प्रथा अस्तित्वात असली तरी कमी होती. नागरी जीवनामुळं सुस्थितीतील लोकांना आपल्या घरातील कामांसाठी स्त्रियांची गरज पडे. त्या मोलाने काम करत. घरगडी अथवा सालगड्याची प्रथाही जुनीच आहे. स्त्रियांची खरेदी विक्री आपल्याकडे अज्ञात काळापासून थेट पेशवेकालापर्यंत चालू असलेली दिसते. दुष्काळ, दारिद्र्य यामुळं अनेक स्त्रिया आणि मुलांना कुटुंबीयच विकत असत. जगण्याचा संघर्षच एवढा तीव्र असे.

संत जनाबाईंच्या काळात यादवांचं स्थिर राज्य जवळपास तीनशे वर्ष लाभल्यामुळं सांस्कृतिक जीवनाला बहर आला होता. या काळातील गुलाम पद्धतीची वर्णनं मिळत नाहीत. त्यामुळं गुलाम पद्धती असली तरी ती अल्प प्रमाणात असावी. संत साहित्यात ‘दास’ हा शब्द येतो. तसंच अनेक शिलालेखांत वा दानपट्ट्यांत दान देणार्‍यांची नमीदास, चमीदास अशी दास शब्द असलेली नावं येतात. दास म्हणजे आर्यांनी हरवलेल्या दास दस्यु जमातींचे लोक असा एक सर्वसाधारण समज आहे, त्यामुळं यावरही चर्चा करणं गरजेचं आहे.

दास हा शब्द प्रथम ऋग्वेदात येतो. ऋग्वेद हा आक्रमक अथवा स्थलांतरित वैदिक आर्य टोळ्यांनी भारतात आल्यावर येथील दास म्हणजेच दस्यु जमातींना हरवल्यानंतर लिहिला असा सार्वत्रिक समज आहे. पण ते वास्तव नाही. दास/दस्यु लोक भारतातील नव्हेत. हा समाज मूळचा इराण-अफगाणिस्तानमधील. दास हे समाजनाम अवमानकारक नव्हतं. खुद्द ऋग्वेद ज्या राजांच्या काळात रचला गेला त्यांच्याच नावात ‘सुदास’ (चांगला दास), ‘त्रसदस्यु’ (इतरांना त्रस्त करणारा दस्यु) अशी नावं येतात. दास हा समाज खूप मोठा होता. पारशी धर्माचा प्रेषित झरथुस्ट्र हा स्वत: दास समाजातील होता. त्याला अत्यंत आदरानं ‘दख्युमा’ असं म्हटलं जाई. दख्युमा म्हणजे दस्युंमधील श्रेष्ठ. संस्कृतातील स हा पर्शियन भाषेत ह अथवा ख असा उच्चारला जातो. दास समाजाला ‘दाहवे’ असं अवेस्त्यातील नाव आहे. ऋग्वेदाची रचना भारतात नव्हे तर दक्षिण अफगाणिस्तानातील हरस्वैती (संस्कृत – सरस्वती) नदीच्या खोर्‍यात झाली. दास हा शब्द सन्मानकारक असला तरी दास समाजाशी म्हणजेच पारशी धर्माशी संघर्ष असल्यानं पुढे दास हा शब्द वैदिक लोकांनी अवमानकारक बनवला. तरीही दासांचं प्रसंगी साहाय्यही ते घेत असत असं ऋग्वेदावरूनच दिसतं. आणि ते स्वाभाविकही आहे. अनेक दासांनी ऋग्वेदी मंत्ररचनाकारांना दानंही दिलेली दिसतात.

हा समाज इराण/अफगाणिस्तानातीलच असल्याचे मुख्य पुरावे म्हणजे अजूनही काही विभागांची आणि शहरांची नावं दास शब्दापासूनच बनलेली आहेत. उदाहरणार्थ दाह ई घुल्मन (दाह-दास) ही साईट सिस्टान या अफगाणिस्तानातील प्रांतात आहे. या स्थानावर पारशी अग्निमंदिरं सापडलेली आहेत. दाहरदेह (दास-देश) असणारी एक जमात अजूनही याच प्रदेशात राहत असे. अशी अनेक उदाहरणं मिळतात. गोव्यातील अभ्यासक डॉ. प्रमोद पाठक यांनी ही साम्यस्थळं दाखवून स्पष्ट शब्दांत नोंदवलं आहे, की दास हे भारताचे कधीच रहिवासी नव्हते हे आर्य आक्रमण अथवा विस्थापन सिद्धांताचे समर्थक कधीच लक्षात घेत नाहीत.

म्हणजेच दास म्हणजे गुलाम हा अर्थ नव्हता. वैदिक धर्मीयांचं त्यांच्याशी शत्रुत्व असल्यानं त्यांनी दास हा शब्द अवमानकारक बनवला. भारतात दास (अथवा दस्यु) हे समाजाचं नाव कधीच नव्हतं. पुढे पारशी धर्माच्या प्रभावामुळं वैदिक धर्माला अफगाणिस्तानात ओहोटी लागल्यानंतर या धर्माचे काही लोक विदेघ माथवाच्या नेतृत्वाखाली भारतात येऊल सदानीरा नदीच्या परिसरात येत स्थायिक झाले. तिथून त्यांनी वैदिक धर्माचा प्रचार सुरू केला. इराणमधील आणलेल्या संज्ञा त्यांनी काही अपरिचित जमातींना वापरल्या. विशेषतः अरण्यात राहणार्‍या लोकांना ते दस्यु म्हणत. हे नाव त्यांनी दिलेलं, येथील नव्हे.

पुढे दास हा शब्द आध्यात्मिक क्षेत्रात घुसला. त्यामुळं अनेक नावं दासांत बनली. या दास भावात परमेश्‍वराचा सेवक अशी अर्थछटा घुसली. राजा किंवा धन्याचा सेवक या अर्थानं दास हा शब्द वापरला जात असे. म्हणजे दास हे समाजनाम न बनता व्यक्तिनाम बनलं. दास म्हणजे गुलाम नव्हे. दास म्हणजे सेवक. दासी हे संबोधन सेविकांनाही अर्थातच चिकटलं. पण त्यात अवमानभाव सहसा नव्हता. दासी म्हणजे सेविका, गुलाम नव्हे हा भाव सर्वमान्य होता.

या सार्‍या पार्श्‍वभूमीवर स्वतःला ‘नामयाची दासी’ म्हणवणार्‍या जनाबाई कोण होत्या हेदेखील पाहिलं पाहिजे. जनाबाई या गंगाखेड येथील दमा-कुरुंड दाम्पत्याची कन्या. आख्यायिकांनुसार दमानं देवाच्या आदेशानुसार पाच वर्षांच्या जनाबाईंना दामाशेटींच्या घरी पोचवलं आणि तिथंच त्या नामदेवांच्या संगतीत मोठ्या झाल्या. अशी आणखी एक आख्यायिका आहे, की यात्रेला आलेले असताना छोट्या जनीचे आईवडील एकाएकी मरण पावले. त्या अनाथ जनीला दामाशेटींनी दयेपोटी घरी नेलं.

या दोन्ही फक्त आख्यायिका असल्या आणि त्यातील सत्यासत्यता तपासण्याचं कोणतंही साधन आपल्या हाती नसलं तरी महत्त्वाचा भाग असा की जनाबाई दामाशेटींच्या आश्रित होत्या, दासी अथवा मोलकरीण नव्हे. नामदेवाघरी त्यांना जे काम पडे ते सर्वसामान्य कोणत्याही गृहस्थ महिलेला करावं लागे तेच. त्या काळी सर्वच स्त्रियांचं दैनंदिन आयुष्य काबाडकष्टांचंच असे. दळण दळणं, पाणी भरणं, शेण्या थापणं ते स्वयंपाक करणं अशी अनेक प्रकारची कामं करावी लागत. जनाबाईंनाही ही कामं करावी लागत असल्यास नवल नाही. पण जनाबाईंचा पिंड हा मनस्वी. विठुरायाच्या भक्तिभावानं ओथंबलेल्या त्या महान संतकवयित्री. हा भक्तिभाव त्यांच्यात स्वाभाविकपणे संत नामदेवांमुळं आला. नामदेवांनी त्यांना समकालीन ज्ञानेश्‍वर ते चोखामेळ्यांसारख्या संतांच्या मांदियाळीत आणलं. त्यांना सर्वच संतांनी सन्मान दिला. स्त्रियांना हीन लेखणार्‍या काळात जनाबाईंना व्यक्त करण्याची आणि त्यातून अढळ संतपद देण्याची कामगिरी नामदेवच करू जाणोत. भारतीय इतिहासातील ही लोकविलक्षण घटना आहे.

स्वभाव कवयित्रीचा आणि प्रत्यक्ष ऐहिक काम निरस काबाडकष्टाचं, या द्वंद्वातून जनाबाई जात होत्या. याची वेदना जनाबाईंच्या अभंगातून जाणवते. पण त्यांनी यावर विलक्षण तोडगा काढला. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’, असं म्हणत जनाबाई थांबत नाहीत तर रोजच्या कामांत प्रत्यक्ष विठुरायाच त्यांना मदतीला येतो, असा त्यांचा भाव आहे. सावता माळी महाराजांना जसा कांदा, मुळा, भाजीत पांडुरंग दिसतो, तसंच जनाबाईंना त्यांच्या कामात. हा जनाबाईंचा पांडुरंगाशी एकात्मभाव दर्शवतो.

जनाबाई आपल्या अभंगांत स्वत:ला अनेकदा दासी म्हणवून घेतात. त्यामुळं त्या खरंच ऐहिक अर्थानं दासी होत्या असा अर्थ काढला जाणं स्वाभाविक आहे. पण ते खरं नसावं. दासी ही सेविका असते आणि त्या मोबदल्यात काम करते. अनाथ जनाबाई दासी नव्हत्या तर त्या दामाशेटींच्या घरात आश्रित होत्या, असंच त्यांच्या कथा सांगतात. आश्रिताचं पालनपोषण करणं, स्वत:च्या कुटुंबापैकी मानणं हे सत्कार्य दामाशेटींनी केलं. नामदेवांठायी असलेला जनाबाईंचा भाव पाहता नामदेवांनी त्यांना दिलेली महत्ता ही एक स्नेहल ज्येष्ठ भगिनी आणि त्याचबरोबर आपल्याच पावलांवर पाऊल ठेवत चाललेली शिष्या या अर्थानंच आली आहे. ‘म्हणे नामयाची जनी’ यात आध्यात्मिक पातळीवर नामदेवांचा विराट मानवतावाद आणि जनीचा तेवढाच उत्कट प्रतिसाद साठलेला आहे. दासी हा शब्द येथे आध्यात्मिक अर्थानं येतो. पांडुरंगशरणता आणि नामदेवशरणता या दासीभावात आहे. याचा अर्थ ऐहिक अर्थानं जनाबाई दासी होत्या आणि दासी असल्यानं त्यांना कष्ट सोसावे लागले हे दामाजीपंत आणि खुद्द नामदेवांवर अन्याय करणारं आहे. त्या दामाशेटी आणि नामदेवांच्या परिवारातील अविभाज्य हिस्सा होत्या, हेच काय ते खरं आहे. नामदेव पुढे उत्तरेत गेले. त्यांनी राष्ट्रव्यापी कार्य हाती घेतलं, तेव्हा जनाबाई काय करत होत्या? त्या त्यांच्याच घरी राहत होत्या की वेगळ्या राहायला गेल्या? त्यांच्या अभंगांवरून असं दिसतं की बहुधा या काळात त्या स्वतंत्र राहत असाव्यात. पंढरपुरात त्या झोपडी बांधून राहत असाव्यात. या काळात त्या विपन्नावस्थेत असण्याची शक्यता आहे. जनाबाईंनी लग्न केलं नाही, पण त्यांच्या मनातील वात्सल्यभाव मात्र जागा होता. श्रीविठ्ठलच त्यांचा मुलगा बनला. मातेच्या महन्मंगल वात्सल्यानं विठुरायाला त्या म्हणतात, ‘माझे अचडे बचडे छकुडे गं राधे रुपडे’. दास्यभक्तीचं हे एक अद्भुत रूप होतं. ‘पक्षी जाय दिगंतरा…’ हे जनाबाईंचं अत्युत्कृष्ट भावकाव्यही त्यांच्या अंत:करणातील मातृभावनेचा ओथंबलेला आविष्कार आहे. नामदेव दिगंतात विलीन होताच ‘नामयाच्या दासी’चा आत्मपक्षीही दिगंतरात उडून गेला… कधीही परत न येण्यासाठी!

————-

वाकळ

मराठवाड्यातील ज्येष्ठ कवी दिवंगत श्री. दि. इनामदार यांनी ‘दिंडी जाय दिगंतरा’ या कवितासंग्रहात संत जनाबाईंवर काही छान कविता लिहिल्यात. त्यातली ही एक कविता, ‘वाकळ’ नावाची.

पीठ शेल्याला लागले, झाला राउळी गोंधळ
कुण्या घरचे दळण, आला दळून विठ्ठल
पीठ चाखले एकाने म्हणे आहे ही साखर
पीठ हुंगले दुज्याने म्हणे सुगंधी कापूर

खरे कुणा आकळेना – मनी उठले वादळ…
कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना
बुचकळला पाण्यात पीठ धुऊन जाईना

झाली सचिंत पंढरी – वाढे राउळी वर्दळ…
ठिगळाच्या पांघुरणा शेला म्हणती सकळ
फक्त जनीस दिसते होती तिची ती वाकळ
कशी मागावी कळेना जनी रडे घळघळ…

0 Shares
सेवा हेच धर्ममर्म जनीमय झेलम