सेवा हेच धर्ममर्म

फ्रान्सिस दिब्रिटो

मध्यंतरी मदर तेरेसांच्या सेवाधर्माविषयी शंका उपस्थित करण्यात आल्या. दुसरीकडे सेवेला धर्मापेक्षाही उंच नेण्याची क्रांती संत जनाबाईंनी साडेसातशे वर्षांपूर्वी केलेली आहे. अशा वेळी ख्रिश्च न धर्मात सेवा या विषयावर काय विचार आहेत आणि त्याचा जनाबाईंच्या सेवेशी कसा संबंध आहे? आजच्या पार्श्वाभूमीवर जनाबाईंना एका वेगळ्या अंगाने जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

धर्म कशासाठी आहे? देवासाठी की माणसासाठी? या प्रश्‍नाचं उत्तर शोधलं की अनेक प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतात. या विषयाशी निगडीत अशी ‘द गुड सॅमेरिटन’ नावाची एक कथा बायबलमध्ये आहे.

एकदा एक धर्मशास्त्री प्रभू येशू यांच्याकडे आला आणि त्यानं प्रभूंना प्रश्‍न केला. ‘शाश्‍वत जीवन मिळविण्यासाठी मी काय करावं?’ तो धर्मपंडित जुन्या कराराचा व्यासंगी अभ्यासक होता. प्रभूंनी त्याला उलट प्रश्‍न केला, ‘तू पंडित आहेस. धर्मशास्त्राची तू पारायणं केली आहेत. तुझा अभ्यास तुला काय सांगतो?’ तो पारंगत धर्मशास्त्री होता. त्यानं बायबलमधील अनुवाद आणि लेवीय या पुस्तकांचा आधार घेऊन उत्तर दिलं, ‘तू आपला देव परमेश्‍वर याच्यावर संपूर्ण मनानं, संपूर्ण जिवानं, संपूर्ण शक्तीनं आणि संपूर्ण बुद्धीनं प्रीती कर.’ प्रस्तुत महावाक्य म्हणजे जुन्या कराराचा गाभा आहे. प्रत्येक ज्यू मनुष्य दिवसातून तीनदा हे महावाक्य मनात घोळवीत असतो. त्या धर्मशास्त्र्याचं वैशिष्ट्य असं, की त्यानं या महावाक्याला ‘लेवीय’ ह्या पुस्तकातील आणखी एका महावाक्याची जोड दिली. ‘आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर.’ एरवी या दोन आज्ञा वेगवेगळ्या अशा वाचल्या जात असत. त्या पंडितानं त्यांचा सांधा जोडला आणि ईश्‍वरसेवा आणि जनसेवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं दाखवून दिलं. त्याच्या या सुज्ञपणाच्या उत्तराबद्दल प्रभूंनी त्याची तारीफ केली आणि प्रभू त्याला म्हणाले, ‘हे कर म्हणजे तुला जीवनाचा लाभ होईल.’

त्यावर तो पंडित म्हणाला, ‘पण माझा शेजारी कोण?’ कारण ज्यू लोक आपल्या समाजबांधवांनाच आपला शेजारी समजत असत आणि त्यांना प्रेमभाव दाखवत असत. इतरांना आपल्याहून तुच्छ लेखत. त्या पंडिताच्या साळसूद उत्तरात एक पेचही होता. समजा येशूंनी शेजार्‍याची व्याप्ती वाढविली आणि वैर्‍यांवरही प्रेम करावं, असं सांगितलं, तर ‘वैर्‍याचा द्वेष करावा’ या जुन्या धर्मशास्त्रातील नियमाचा भंग केल्याचा आरोप त्याला येशूंवर करता येणार होता, परंतु प्रभूंनी त्याचा डाव त्याच्यावर उलटवला. अवघड प्रश्‍नांची उत्तरं ते सोपी करून सांगत असत. त्यासाठी ते बोधकथांचा वापर करीत. प्रभूंनी त्याला एक कथा सांगितली. ‘एक मनुष्य जेरुसलेमहून जेरिकोला चालला होता. वाटेत त्याला लुटारूंनी गाठलं. त्यांनी त्याचे कपडे काढून घेतले. त्याला बेदम मार दिला आणि त्याला अर्धमेल्या अवस्थेत टाकून ते पसार झाले. एक याजक त्या वाटेनं चालला होता, परंतु कण्हत असलेल्या त्या माणसाला पाहून तो दुसर्‍या बाजूनं निघून गेला. तसाच एक लेवी (वेदीसेवक) तिथं आला आणि त्याच्याकडे नजर टाकून तोही दुसर्‍या बाजूनं निघून गेला. एक सॅमेरिटन (खालच्या मानल्या जाणार्‍या समाजातील मनुष्य) त्या वाटेनं चालला होता. तो त्या ठिकाणी येऊन पोचला. रस्त्याच्या कडेला पडलेल्या त्या माणसाची दारुण अवस्था पाहून तो गहिवरला. तो जवळ गेला. त्यानं त्याच्या जखमांना तेल आणि द्राक्षरस लावून त्या बांधल्या. त्यानं त्याला आपल्या जनावरावर बसवलं आणि धर्मशाळेत आणलं. तिथं त्यानं त्याची शुश्रूषा केली. दुसर्‍या दिवशी त्यानं दोन दिनार काढून ते धर्मशाळेच्या रक्षकाला दिले आणि सांगितलं, ‘याची काळजी घे. तुला अधिक काही खर्चावं लागलं, तर मी परत येईन, तेव्हा त्याची भरपाई करीन’. गोष्ट सांगून झाल्यावर येशूंनी त्या पंडिताला विचारलं, ‘तर आता या तिघा जणांपैकी लुटारूंच्या हाती सापडलेल्या त्या माणसाचा शेजारी कोण? तुला काय वाटतं?’ त्यानं उत्तर दिलं, ‘ज्यानं त्याला करुणा दाखवली, तो!’ येशू त्याला म्हणाले, ‘तूही जा आणि तसंच कर.’

प्रस्तुत कथेतील याजक आणि लेवी हे उच्च वर्गाचे प्रतिनिधी होते. देवधर्म, पूजाअर्चा हे त्यांचं मुख्य काम होतं. ते पूजाअर्चा करून मंदिरातून परतत होते. वाटेत त्यांना अर्धमेल्या अवस्थेतील तो मनुष्य दिसला. अशा मृतवत व्यक्तीला स्पर्श केल्यामुळं ते अशुद्ध होणार होते. शिवाय मंदिरातील कामांना त्यांचं प्राधान्य होतं. एका अर्थानं ते चांगल्या कामासाठीच निघाले होते, परंतु तसं करून आपण जखमी झालेल्या माणसातील देवाकडे दुर्लक्ष करीत आहोत ते त्यांच्या ध्यानात आलं नाही. धर्म केवळ देवाच्या पूजेअर्चेसाठी आहे, अशी त्यांची धारणा होती.

तिसरा मनुष्य सॅमेरिटन. हे पात्र कथेमध्ये आणून प्रभूंनी फार मोठा क्रांतिकारक संदेश दिलेला आहे. ज्यू आणि सॅमेरिटन हे येशूच्या काळचे दोन समाजगट होते. ज्यू स्वत:ला श्रेष्ठ आणि इतरांना कनिष्ठ समजत असत. सॅमेरिटन हे त्यांचेच समाजबांधव. ख्रिस्तपूर्व सातव्या शतकात शत्रूनं इस्राईलवर स्वारी केली आणि तो प्रांत जिंकून घेतला. त्या काळात शत्रूच्या संपर्कातून ज्यांची निपज झाली, ते सॅमेरिटन. वर्णसंकरातून त्यांचा जन्म झाला म्हणून उच्चवर्णीय ज्यू या सॅमेरिटन लोकांना तुच्छ मानत असत. सॅमेरिटन या शब्दाचा ते उच्चारही करत नसत. येशूंनी त्या पंडिताला शेवटचा प्रश्‍न केला तेव्हा त्यानं सॅमेरिटन मनुष्य असं न म्हणता, ‘ज्यानं त्याला करुणा दाखविली तो,’ असं उत्तर दिलं. कारण सॅमेरिटन शब्दाचा उच्चार त्याला विटाळासारखा वाटत होता. माणूस माणसाचा द्वेष करतो, यापेक्षा मोठा अनर्थ तो कुठला? ‘आम्ही श्रेष्ठ कारण आम्ही शुद्ध रक्ताचे आणि इतर कनिष्ठ कारण त्यांचा जन्म वर्ण संकरातून झाला आहे,’ ही भूमिका घातक आहे. ‘शुद्ध रक्ताचा’ विषारी विचार अधूनमधून उसळी मारून कसा वर येत असतो, हे आपण आजही पाहत आहोत. गरजवंतांच्या मदतीला धार्मिक माणसं धावून आली नाहीत तर तुच्छ मानलेल्या समाजातील एक तिर्‍हाईत मनुष्य धावून आला. सॅमेरिटन मनुष्य धार्मिक होता की नाही हे कथेमध्ये नमूद केलेलं नाही. मात्र तो सेवा करण्यात तत्पर होता.

संत अगस्तीननं म्हटलं आहे, ‘हे देवा, तू आम्हाला तुझ्यासाठी निर्माण केलेलं आहे आणि तुझा ठाव घेतल्यावाचून आम्हाला विश्राम ठाऊक नाही.’ मनुष्य सातत्यानं परमेश्‍वराचा (दिव्य शक्तीचा) शोध घेत आहे. परमेश्‍वराचा शोध दोन प्रकारे घ्यावा लागतो. तो आपल्या अंतरंगात वसलेला आहे. ध्यानधारणेच्या साधनानं त्याची ओळख पटू शकते. काहींना त्याचा साक्षात्कार होतो. त्यांना सिद्धी प्राप्त होते. त्या अनुभवानंतर काही व्यक्ती सूक्ष्मात जात असतात.’

माणसानं देवाचा ध्यास अवश्य घ्यावा, परंतु तिथंच थांबू नये. ध्यानासाठी मिटलेले डोळे जेव्हा उघडतात, तेव्हा त्याला वेदनेत खितपत पडलेल्या माणसाचं ‘दर्शन’ झालं पाहिजे. मात्र इतिहासाचा प्रवास करताना आपल्याला काय दिसून येतं? माणसानं देवाचा शोध घेत असताना अनेकदा वेदनाग्रस्त माणसाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कधी कधी धर्मवचनाचा आधार घेऊन पिडलेल्या माणसाला छळलं आहे, त्याला नागवलं आहे, त्याची हत्याही केलेली आहे.

प्रभू येशूच्या काळातील समाज धर्मशील होता. पूजाअर्चा, कर्मकांड, यज्ञयाग, भजन, पूजन यांचं स्तोम माजलं होतं. समाजजीवनाचे नियमन करण्यासाठी मोशेनं दहा आज्ञा दिल्या होत्या. कालांतरानं पुरोहितांनी त्यांचा विस्तार केला आणि त्याला ६१३ उपआज्ञांची जोड दिली. धर्माच्या या नियमांचं, उपनियमांचं तंतोतंत पालन हाच धर्म आहे, असं मानलं जाऊ लागलं आणि तोच धर्म झाला.

प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या जीवनात परमेश्‍वराला प्रथम स्थान दिलं. प्रभू देवाला ‘अब्बा’ म्हणजे प्रेमळ पिता या नावानं संबोधत असत. हा अब्बा सार्‍या निर्मितीचं मूळ कारण आहे. तो आपल्या सर्वांचा पिता असल्यामुळं आपण एकमेकांचे भाऊबंद आहोत, असं प्रभूनं शिकवलं. देवाचं पितृत्व मान्य करीत असताना माणसातील देवाचं विस्मरण होत असल्याचं प्रभूला दिसून आलं. प्रभूसाठी माणूस हे महान मूल्य होतं. गरजवंत माणसाची निकड भागविण्यासाठी प्रसंगी धर्माचे पारंपरिक नियम दुय्यम मानावे लागले तरी हरकत नाही. कारण धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही.

ज्यू आणि ख्रिस्ती (आणि इस्लामही) धर्मात अखेरच्या न्यायाचा सिद्धांत आहे. त्यानुसार कयामतच्या दिवशी माणसाचा अखेरचा न्याय होणार असून, त्याच्या बर्‍यावाईट कर्मांचं फळ त्याला मिळणार आहे. या न्यायाच्या दिवसाचे निकष प्रभूनं दिले आहेत. त्याच्यात कर्मकांड, पूजाअर्चा, भजन, पूजन यांना मुळीच स्थान नाही. ज्यांनी सेवा केली आहे, तेच स्वर्गाचे धनी होतील आणि ज्यांनी वेदनाग्रस्तांची सेवा करण्याचं टाळलं ते नरकाचे नागरिक होतील, असं प्रभूनं सांगितलं. प्रभूनं सेवेचं दिलेलं प्रयोजन महत्त्वाचं आहे. केवळ दयाबुद्धीनं प्रेरित होऊन नव्हे, केवळ आवड किंवा छंद म्हणून केलेलं हे सेवाकार्य नाही, तर गरजवंत, वेदनाग्रस्त, व्याधिग्रस्त ही परमेश्‍वराची (विद्रूप झालेली) रूपं आहेत. त्या विरूपामध्ये अरूपाच्या, ‘सुंदर त्या ध्यानाचं’ दर्शन घडणं हाच प्रभू येशू ख्रिस्तप्रणीत धर्माचा गाभा आहे. तपश्‍चर्या, ध्यानधारणा यांचा अवलंब करून काही भक्तांना परमेश्‍वराचं दर्शन घडत असतं, ही चांगली गोष्ट आहे. परंतु ते अध्यात्माचं एक अंग झालं. साधकाला दु:खग्रस्त, संकटग्रस्त, वेदनाग्रस्त यांचा साक्षात्कार होऊन त्यांना त्यांच्यात देव दिसला आणि सेवेचा नैवेद्य वाहून त्यानं तो देव पूजला म्हणजे त्याचं अध्यात्म पूर्ण होत असतं. संत तुकारामांनी म्हटलेलं आहे,

‘जे का रंजले गांजले| त्यांसि म्हणे जो आपुले|
तोचि साधु ओळखावा| देव तेथेचि जाणावा|’

तुकोबांनी वारकर्‍यांचं लक्ष रंजल्या गांजल्याकडे वेधलेलं आहे. सेवा करणार्‍यांना त्यांनी साधू म्हणून त्यांचा फार मोठा सन्मान केला आहे. सेवा करणारी व्यक्ती देवासमान असते किंबहुना ती देव असते. बायबलचा विचार थोडासा निराळा आहे. बायबलच्या शिकवणीनुसार जे सेवा करतात ते थोर आहेत परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ज्यांची सेवा केली जाते ते केवळ आपल्या सेवेचे लाभार्थी नसतात तर ती साक्षात परमेश्‍वराची रूपं असतात. म्हणूनच ख्रिस्ती अध्यात्मानुसार सेवा हा श्रद्धेचा अतूट असा आविष्कार आहे. सेवाधर्माशिवाय ख्रिस्ती आचारधर्म पूर्ण होऊ शकत नाही.

संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. उषा देशमुख यांनी संत जनाबाईंचं भावस्पर्शी वर्णन केलं आहे. त्या म्हणतात, ‘मराठी संतांच्या परसा अंगणात जनाबाई लहानाची मोठी झाली. जनीच्या संस्कारीत मनाने आत्मसाक्षात्काराचा अनुभव घेतला. जनाबाई म्हणजे तत्कालीन कष्टकरी स्त्रीचे प्रातिनिधिक रूप ठरते. स्त्रीशूद्र म्हणून मिळालेला जीवनयोग जनाबाईंनी आपल्या भावमधुर अशा अमृतवाणीने पचविला आणि ती परमार्थाशी एकरूप झाली.’ (वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य, संपा. डॉ. शिवाजीराव मोहिते, पृ. ११५)

जनाबाई नामदेवांच्या घरच्या दासी होत्या. त्या स्वत:चं वर्णन ‘नामयाची दासी’ असं करतात. काही अभ्यासकांच्या मते हे दासीपण नवविधा भक्तीतील दास्यभक्तीचा एक भाग होता. जनाबाईंच्या अभंगांवरून जाणवतं, की त्यांना काबाडकष्टाची खूप कामं करावी लागली. त्यामुळं त्यांनी स्वत:ला, इतरांना किंवा परिस्थितीला दोष दिला नाही. त्या विठ्ठलभक्तीत इतक्या एकरूप झाल्या की त्यांच्या कष्टाचं रूपांतर सेवेत झालं. त्यांची सर्व कामं जणू विठ्ठलच करू लागला. त्या म्हणतात,

नाही केली तुझी सेवा| दु:ख वाटतसे माझ्या जीवा|
नष्ट पापीण मी हीन| नाही केले तुझे ध्यान|

दळणकांडण, झाडलोट आदी कामं जनाबाईंना करावी लागली. मात्र, ती कामं आपण नव्हे, तर आपल्यासाठी विठ्ठलच करत आहे, असं त्या मानू लागल्या. दुसर्‍या एका अभंगात जनाबाई म्हणतात,

झाडलोट करी जनी| केर भरी चक्रपाणी|
पाटी घेऊनिया शिरी| नेऊनिया टाकी दुरी|

जनाबाई विठ्ठलमय झाल्या होत्या. आपली सर्व कामं विठ्ठलच करत आहे, अशी त्यांची धारणा झाली होती. बायबलमध्ये संत पौलचं एक वचन आहे, ‘जगतो जीवन नव्हे मी माझे, ख्रिस्त जगतसे मम जीवनी.’ त्याप्रमाणं जनाबाईंचं झालं होतं. त्यांच्या माध्यमातून विठ्ठलच कार्य करीत होता. त्यांच्यासाठी सेवेचे लाभार्थी आणि विठ्ठल एकाच वस्तुस्थितीची दोन अंगं होती.

0 Shares
मी जातिपल्याडची नामयाची दासी