साऱ्या सख्या जनीच्या

अरुणा ढेरे

स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्याच्या चर्चा आपण आज करतो आहोत. मध्ययुगात भारतभर फोफावलेल्या भक्तीचळवळीनं स्त्रियांना खर्याु अर्थानं मुक्तीचा, व्यक्त होण्याचा अनुभव दिला होता. त्यामुळं समाजातील सर्व स्तरांतून महिला संत उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या प्रगल्भ लेखणीतून स्त्रीमुक्तीची ध्वजा फडकावली. त्या महिला संतांची संत जनाबाईंच्या निमित्तानं ही ओळख.

तेराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत उत्तर भारतात आणि पूर्व भारतात अनेक संत स्त्रिया होऊन गेल्या. मध्ययुगात सर्व भारतभर अनेक भक्तिपंथांचा उदय झाला. शैव, शाक्त, वैष्णव, दत्त, नाथ अशा अनेक पंथांच्या उपासकांनी मध्ययुगीन भक्ती गाजवली. अनेक साधू-संतांनी आपापले लहान-लहान उपासना संप्रदाय निर्माण केले. कबीर, नानक, नरसी, चैतन्य, दादू, चरणदास हे उत्तर भारतातले गाजते संत. त्यांच्या काही शिष्या आपल्या स्वतंत्र रचनांमधून आपली स्मृतिचिन्हं ठेवून गेल्या आहेत.

कबिराची कन्या कमाली आणि शिष्या गंगा आणि दादू दयालच्या दोन मुली नानी आणि माता या चौघींच्या जोडीनंच चरणदासाच्या दोन शिष्या सहजो आणि दया यांचाही उल्लेख इथं करायला हवा. ‘सहजप्रकाश’ आणि ‘सोलहतत्वनिर्णय’ यांसारखे ग्रंथ रचणारी सहजो ही मूळची धूसर जातीची, अविवाहित संत स्त्री. दयाबाई ही तिचीच गुरूभगिनी. तिनंही ‘दयाबोध’ आणि ‘विनयमालिका’ इत्यादी ग्रंथांची रचना केली आहे.

पूर्व भारतात चंद्रावती-गंगावतीसारख्या विद्वान स्त्रियांची नावं अग्रमानानं घ्यावी लागतील. ‘मनसामंगल’ रचणार्‍या वंशीदास चक्रवर्तीची मुलगी चंद्रावती. तिनं रामचरित्र रचलं आहे. गोपिनाथ चक्रवर्ती या कीर्तनकार कवीची मुलगी गंगावती ही स्वतःदेखील उत्तम कीर्तनकार आणि भक्तकवयित्री म्हणून प्रसिद्ध होती. बरद्वानजवळच्या लहानशा गावात जन्मलेली हठी विद्यालंकार ही अठराव्या शतकातली पंडिता साध्वी. व्रज भाषेतली तिची भक्तिकविता आजही व्रज साहित्याचा अलंकार समजली जाते.

गुजरात-सौराष्ट्र भागात मीरेखेरीज इतर संत स्त्रियांची नावं आपल्याला फारशी परिचित नाहीत. पण आपल्या भक्तिधुंद संगीतमय पदांखेरीज इतर कोणतीही खूण मागे न ठेवणारी चंद्रसखी, गुजराथी, मराठी आणि हिंदी अशा तीन भाषांमधून भक्तिपर पदांची रचना करणारी राधाबाई, मिथुमहाराजांची शिष्या आणि ‘नवनायिकादर्शन’, ‘नाथजी प्राकट्य’ अशा प्रकारची ग्रंथरचना करणारी शाक्तपंथी जनीबाई यांची नावं घेतल्यावाचून या भागातील भक्तिपंथाचा इतिहास पुरा होणार नाही.

‘सीताजीनी काचोळी’ नावाचं रामचरित्रपर काव्य आणि इतर काही कृष्णचरित्रपर स्फुटकाव्यं रचणारी कृष्णाबाई, ‘सीतामंगल’ काव्याची कर्ती पुरीबाई, सहाशेपेक्षा अधिक ज्ञानभक्तिपर पदांची रचना करणारी शबरीबाई किंवा रामभक्तीनं वेडावलेली बडोद्याची दीवालीबाई आदी अनेक संत स्त्रिया अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या प्रदेशात होऊन गेल्या.

दक्षिणेच्या सांस्कृतिक इतिहासात आणि दक्षिण भाषांमधील वाङ्मयाच्या इतिहासात ज्यांना महत्त्वाचं स्थान मिळालं, अशा पंडिता आणि कवयित्री म्हणून गाजलेल्या संत स्त्रिया पुष्कळ आहेत. नवव्या-दहाव्या शतकात प्रसिद्धीला आलेल्या अवंतीसुंदरी, प्रभुदेवी, सुभद्रा यांची जीवनचरित्रं आपल्याला ठाऊक नाहीत. कर्नाटकची सरस्वती म्हणून जिचा गौरव केला जातो, त्या विज्जेकाच्या साहित्याशी आपला परिचय आहे, पण जीवनासंबंधी फारशी माहिती नाही.

इतरही अशा स्त्रिया आहेत, ज्यांच्याविषयी फार त्रोटक माहिती उपलब्ध आहे. उदाहरणार्थ गोपवरम गावच्या कुंभाराची मुलगी मोल्ला. तिचं ‘रामायण’ काव्य आज तेलगू भाषेत मानाचं स्थान मिळवून आहे. कर्नाटकात दोड्ड कृष्णराजाची राणी चेलुवांबा हिनं ‘तुलाकावेरीमाहात्म्या’ सारखा टीकाग्रंथ रचला आहे. शिवाय तिरुपती व्यंकटेश आणि त्याची पत्नी पद्मावती म्हणजे अलमेलुमंगदेवी यांच्यासाठी अंगाईगीतं रचली आहेत. ‘वरनंदीकल्याणा’सारखी मधुर काव्यरचना तिचीच असावी, असं विद्वानांचं मत आहे. हेळवनकट्टे गिरिमय्याची सीतास्वयंवरादी पौराणिक आख्यानं प्रसिद्ध आहेत. तेलगू भाषेत भागवत रचणारी तरिमोंड वेणूगमांबा हिचे ‘राजयोगसार’ आणि ‘वेंकटाचलमाहात्म्य’ असे आणखी दोन ग्रंथ उपलब्ध आहेत.

तेराव्या शतकात ज्ञानदेवांचा उदय झाला आणि त्यापूर्वी चक्रधरांनी महानुभाव पंथाचं प्रवर्तन केलं. तेव्हापासून महाराष्ट्रात संत स्त्रियांची एक मोठी, प्रबळ अशी परंपरा थेट अठराव्या शतकापर्यंत दिसते. महदंबा, बाईसा, आउसा या महानुभाव संत आणि मुक्ता, जनी, बहिणा, कान्होपात्रा यांसारख्या भागवत संप्रदायी संत स्त्रिया तसेच रामदासशिष्या वेणा अशा प्रसिद्ध संत स्त्रियांच्या जोडीनं आणखीही अनेक स्त्रियांनी मुक्तीच्या मार्गावर पाऊल ठेवलं.

महाराष्ट्रातल्या नाथपंथी परंपरेत गुप्तनाथ या नावानं प्रसिद्ध आहेत त्या गंगाबाई राशीनकर. या एकनाथांच्या समकालीन होत. सत्यामलनाथांचे शिष्य गैबीनाथ यांनी राशीन येथे राहणार्‍या गंगाबाईचा आध्यात्मिक अधिकार आणि भक्तीची तळमळ पाहून त्यांना गुरुबोध घडवला आणि त्यांचं नाव गुप्तनाथ असं ठेवलं. या बाई परमार्थातल्या मोठ्या अधिकारी ठरल्या आणि त्यांचा शिष्य उद्धव नाईक ठिपसे हा उद्बोधनाथ म्हणून प्रसिद्धीला आला. गंगाबाईंची पदं नाथपरंपरेत प्रसिद्ध आहेत. ‘चाले देवासी भिऊन| गुप्त म्हणे तोचि धन्य॥’ अशी साधी सरळ रचना त्यांनी केली आहे.

चोखामेळा यांची पत्नी सोयरा आणि बंका महाराची पत्नी म्हणजे चोखामेळा यांची बहीण निर्मळा या दोघींची अभंगरचना भागवत परंपरेतील वाङ्मयात समाविष्ट आहे. ‘चोख्याची महारी’ या मुद्रेनं सोयराबाईनं अभंगरचना केली आहे. स्पष्ट पण रसाळ अशी तिची वाणी आहे. चोखोबांप्रमाणेच तिच्याही रचनेत यातिहीनतेचं दुःख व्यक्त झालं आहे. निर्मळेच्या अभंगांतून तिचा भक्तिभाव उत्कटपणे प्रकट होतो.

प्रेमाबाईंचा वात्सल्यभक्तीचा उमाळा महिपतींनी आपल्या संतचरित्रांमध्ये फार रसाळपणे वर्णन केला आहे. ती भागवत संप्रदायी साध्वी असावी असं वाटतं. मात्र तिचा काळ आणि गुरुपरंपरा यांविषयी काही माहिती नाही. कदाचित ती एक सर्वसामान्य भाविक स्त्री असेल आणि कोणत्या एखाद्या पंथाची दीक्षित असेलच असं नाही.

रामदासांच्या शिष्यगणात वेणाबाईंची ख्याती जशी मोठी आहे, तशी इतर स्त्री शिष्यांची नाही. आक्काबाई आणि बयाबाई या दोघींचा उल्लेख इथं आवर्जून केला पाहिजे. बयाबाई रामदासी हिची स्वतंत्र पदरचना उपलब्ध आहे आणि ती मराठीप्रमाणंच हिंदीतही आहे. तिच्या गुरुभक्तीचं दर्शन त्यातून ठसठशीतपणे होतं. मर्ढे मठाची जबाबदारी तिनं समर्थपणे सांभाळली आणि रामदासी परंपरा पुढे चालवणारा उत्तम शिष्यवर्गही निर्माण केला. याशिवाय चिदंबर परंपरेतल्या विठाबाई आणि मुडलगी परंपरेतल्या स्त्रिया, संत सखु, भक्तिपर लावण्या रचणारी सासवड मठातील एक साध्वी अशा अनेकींचा उल्लेख इथं करायला हवा.

काश्मीरच्या लाल देदपासून तामिळनाडूच्या अवैयार-आंडाळपर्यंत आणि बंगालच्या चंद्रावतीपासून महाराष्ट्राच्या मुक्तेपर्यंत गेल्या आठ शतकांमध्ये होऊन गेलेल्या भारतीय विरागिनींच्या जेवढ्या म्हणून आयुष्यकथा उपलब्ध आहेत, त्यांची काळाच्या एका विशाल पटावर मांडणी केली तर असं दिसून येतं की, यापैकी प्रत्येकीला संघर्ष अटळच ठरला आहे. स्थूल किंवा सूक्ष्म असो, आई वडिलांशी असो, सासू सासर्‍यांशी असो, पतीशी असो, की स्वतःचाच स्वतःशी असो, प्रत्येकीला संघर्षाला सामोरं जावं लागलं आहे. या संघर्षाचं आणि चरित्रघटनांचं प्रतिबिंब प्रत्येकीच्या रचनांमध्ये पडलेलं आहे, असं मात्र नाही. अनेकींनी केवळ आपल्या आंतरप्रितीलाच उद्गार दिला आहे. परमतत्त्वाच्या प्राप्तीसाठी लागलेल्या तळमळीचा आणि त्या प्राप्तीनंतरच्या आनंदाचाच फक्त उच्चार केला आहे.

मात्र ज्यांच्या चरित्रकथा सर्वश्रुत आहेत, शब्दबद्ध झाल्या आहेत किंवा स्वतःच्या वचनांमध्ये, पदांमध्ये, अभंगांमध्ये ज्यांनी वैयक्तिक आयुष्यातील घटनाप्रसंगांची नोंद केली आहे, त्या संदर्भात आपल्या मानस प्रतिक्रियांची नोंद केली आहे, अशा सर्व जणींच्या चरित्रांचा एकत्रित विचार करणं शक्य आहे का? त्यातून काही सूत्रं हाती येऊ शकतात का? असा विचार जेव्हा ए. के. रामानुजनसारखा आधुनिक अभ्यासक करतो, तेव्हा त्याला या स्त्रियांच्या आयुष्यक्रमातले काही समान टप्पे स्वच्छ दिसू लागतात.

एक सर्वांत केंद्रस्थानी असलेली भावना म्हणजे ‘मी देवाची आहे’ अशी या स्त्रियांच्या मनोमनीची श्रद्धा. परमेश्‍वराखेरीज अन्य कुणीही माझं नाही, मी सर्वस्वानं त्याची आहे, अशी अनन्य निष्ठा.

या निष्ठेमुळं काही स्त्रियांनी लौकिकात कोणाही पुरुषाशी विवाह केला नाही. प्रपंच स्वीकारला नाही. त्या अविवाहित राहिल्या आणि आपल्या प्रिय परमेश्‍वराशी बांधून राहिल्या. कुणी स्वतःला त्याची सेवेकरी दासी मानलं, कुणी सखी, तर कुणी प्रिया मानलं आणि कुणी त्याच्याशी विधिपूर्वक विवाहही केला. जसा महादेवीचा मल्लिकार्जुनाशी किंवा आडाळचा श्रीरंगाशी विवाह झाला. कुणा एखाद्या कान्होपात्रेनं किंवा रेकव्वेनं आपलं आयुष्य त्याला समर्पितच करून टाकलं. स्वतःला संपवून टाकलं.

काही जणींनी विवाह टाळण्यासाठी नाना उपाय केले. गोगव्वेसारख्या कुणी वेषांतर करून आलेल्या शिवमहेश्‍वरालाही नाकारलं किंवा तिलकव्वेसारख्या कुणी विवाहापासून सुटका करून घेण्यासाठी पुरुषरूपच घेतलं. अव्वैसारखी कुणी एकदम म्हातारीच झाली. महादेवीसारख्या एखादीनं सरळ पतीचा त्याग केला. काराईकल्लम्माईनं त्याला भयचकित करून सोडलं. बहिमा किंवा लल्ला या पतीजवळ राहिल्या आणि त्यांनी पुष्कळ प्रापंचिक दुःखही सोसलं, पण लल्लाला मूलबाळ झालं नाही आणि तिच्या लेखी तिचा नवरा हा तिचं पूर्वजन्मीचं मूलच होता. बहिणाबाईला मुलं झाल्याचा फार आनंद झाला नाही. आपल्या मुलाला तिनं पूर्वजन्मीचा पती म्हणून पाहिलं.

मीरा किंवा गौरी या विधवा झाल्या, पण त्यांनी वैधव्य नाकारलं. अनेकींनी लग्नाबाबत आणि ओघानं येणार्‍या आणि वैधव्याबाबत सर्व रूढ प्रथा, परंपरा दूर सारल्या. पतिव्रतेचा आणि आदर्श स्त्रीचा लौकिक साचा दूर सारला आणि जातीय उच्चनीचताही दूर सारली. उदाहरणार्थ महादेवी नग्न झाली, काराइकल्लमाई प्रेतरूप झाली. कुरुरम्मासारख्या स्त्रीनं उच्चवर्णीयांना उपदेश केला, तर बहिणाबाईसारख्या उच्चकुलीन स्त्रीनं तत्कालीन समाजव्यवस्थेत शूद्र मानला गेलेला मासारखा गुरू केला.

या सर्वांच्या चरित्रकथा खरोखर थक्क करणार्‍या आहेत. भारतभर भक्तिचळवळीनं स्त्रियांना काय दिलं आणि त्यांनी ते कसं स्वीकारलं, याचा शोध स्तिमित करणारा आहे. ज्या काळी प्रतिष्ठित स्त्रीनं घराचा उंबरा ओलांडणं सभ्यतेचं लक्षण नव्हतं, त्या काळात या स्त्रीनं घरातील सर्वेसर्वा अधिकारी अशा पुरुषाला शरीरभोग नाकारले आहेत. त्यांनी मायेचे सर्व पाश दूर केले आहेत. त्यांनी सुरक्षिततेचा, स्थैर्याचा हात सहज सोडला आहे आणि त्या घरदार सोडून एकट्या भटकल्या आहेत.

सर्वमान्य रीतीनं, पतीला न अनुसरला पतीखेरीज अन्य लौकिक पुरुषाला अनुसरणं, ही मोठीच बंडखोरी संतस्त्रियांनी केली आणि त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागले. प्रपंचाचा त्याग करून त्या परमेश्‍वराच्या शोधासाठी प्रवृत्त झाल्या, तेव्हा परमार्थाच्या वाटेवर अनेकांना गुरूच्या मार्गदर्शनाची गरज भासली. समाजाच्या दृष्टीनं पतीखेरीज अन्य कुणाही पुरुषाचा कोणत्याही प्रकारे निकट संबंध येणे हे स्त्रीला निषिद्धच होतं.

असं असताही अनेक स्त्रियांनी मोठ्या धाडसानं गुरुचरणी स्वतःला समर्पित केलं. त्यामध्ये सहजोसारखी तरुण अविवाहिता चरणदासांची शिष्या झाली आणि महादाइसा चक्रधरचरणी लीन झाली. विवाहित असूनही उच्चकुलीन बहिणाबाईनं तुकारामासारखा शूद्र समजला जाणारा गुरू निवडला. बालविधवा वेणाबाई रामदासांची शिष्या बनली.

परमार्थाच्या क्षेत्रात अनेक संत स्त्रियांनी पुरुषांच्या तोडीचे अधिकार मिरविले. त्यांना सन्माननीय गुरुपद मिळाले आणि त्यांचा अधिकार मानणारा पुरुष शिष्यांचा वर्ग निर्माण झाला. गंगाबाई राशीनकर, मुक्ताबाई, बयाबाई रामदासी, वेणाबाई, शारदामळी देवी, गोदामाई कीर्तने इत्यादी अनेकींनी असं पारमार्थिक गुरुपद भूषविलं, त्या संदर्भात त्यांच्या स्त्री असण्याचा अडथळा आला नाही. भक्तीच्या क्षेत्रातली समता त्यांना न्याय देणारी ठरली. ‘येथ भक्ती गा एक सरे| जाती अप्रमाण|’ या संतवचनानुसार समाजव्यवस्थेतील उच्च-नीच जातींप्रमाणंच स्त्री-पुरुष जातही भक्तीच्या परिघात अप्रमाण असल्यानं त्यांच्या पारमार्थिक अधिकाराला उचित असा मान स्त्रियांना सहज प्राप्त झालेला दिसतो.

समाजात स्त्रीचा दर्जा अत्यंत गौण आणि केवळ पुरुष असणं म्हणजे श्रेष्ठत्व, प्रतिष्ठा गौरव अशा रूढ समजुतीचा एक परिणाम असा दिसतो की, या स्त्रियांनी स्त्री असून पुरुषसदृश उपाधी आणि पारमार्थिक नावं स्वीकारली. उदाहरणार्थ, गंगाबाई राशीनकरांचं पारमार्थिक नाव गुप्तनाथ आणि गोदामाई कीर्तने यांचं पारमार्थिक नाव तारकनाथ असं आहे. समर्थांनी वेणाबाईंना मठपती केलं, उभ्यानं कीर्तन करण्याचा अधिकार दिला आणि समर्थपरंपरेत त्यांना ‘वेणास्वामी’ म्हणून सांप्रदायिक ओळखू लागले.

‘स्वामी’ किंवा ‘नाथ’ उपाधींनी पुरुषभावाचा म्हणजे पर्यायानं अधिकाराचा, श्रेष्ठतेचा, उच्च स्थानाचा स्वीकार या स्त्रियांनी केलेला पाहिला की स्त्रीत्वाला चिकटून येणार्‍या गौणपणासी, नगण्यतेशी, क्षुद्रत्वाशी या स्त्रियांनी दिलेली सूक्ष्म झुंज लक्षात येते.

स्त्रीभाव ओलांडून पुरुषभावाचा काही एका पातळीवर स्वीकार हा एक मार्ग जसा, तसा स्त्री-पुरुष दोन्ही भाव ओलांडून त्याहीपलीकडं जाणं हा आणखी एक मार्ग काही स्त्रियांनी चोखाळलेला दिसतो, ही वाट मात्र सोपी नव्हे. काही जणींनी अत्यंत धाडसानं ती स्वीकारली.

उदाहरणार्थ लाल देद किंवा लल्ला हिचं वस्त्रांचं भानच सुटलं. ती म्हणून लागली, ‘लज्जा कुणाची बाळगायची? पुरुषाची. पण मला माझ्या आजूबाजूला कुणी पुरुष दिसतच नाही. सर्व जनावरं आहेत.’ तेव्हा तिनं लज्जेचाच त्याग केला आणि देहस्वितेचाही.

महादेवीनं तेच केलं. ती तिच्यावर लब्ध झालेल्या पुरुषापुढे वस्त्रं फेकून नग्नावस्थेत उभी राहिली आणि तिनं आपलं स्त्रीत्वच जणू झुगारून दिलं. लपवून ठेवण्यानं स्त्रीदेहाविषयीचं कुतूहल अधिक वाढतं. तिनं स्वतःचं सारंच खुलं केलं. लज्जा दूर केली. देहभावच दूर केला. तिनं म्हटलं की, ‘नग्नतेलाही सोलणे कुणाला शक्य आहे का? मी शुभ्र जाईच्या फुलासारखा, पहाटेचा ईश्वरी प्रकाश नेसले आहे. आता मला दुसर्‍या परिधानाची किंवा अलंकरणाची काय गरज?’

नग्नता ही आपल्या परंपरेत मुक्तीच्या वाटेवरची एक अपरिहार्य अवस्था मानली गेली आहे. कृष्णानं गोपींची वस्त्रं पळवून त्यांना उघड्या देहानं प्रार्थना करण्यासाठी भाग पाडलं आहे. जैन धर्मानं आपल्या उपासकांचा वस्त्रत्याग ही पंथीय आचारांपैकी एक साधारण गोष्ट मानली आहे. चक्रधरांनी आऊसेला भर सभेत नग्न होऊन येण्याची आज्ञा केली आहे. आणि त्यानंतर ‘आउसेसी मी स्त्री ऐसी बुद्धीच नाही|’ अशी तिची प्रशंसाही केली आहे. मुक्ताबाई नग्न होऊन स्नान करीत असता चांगदेवानं पाहिलं आणि तो शरमला, तेव्हा मुक्ताबाईनं त्याच्या मनात स्त्री पुरुषभेद उरला असल्याबद्दल त्याची कानउघाडणी केल्याची आख्यायिका आहे.

दासीमय्या नावाच्या वीरशैव संताचं वचन आहे की, ‘लांब केस वाढतात किंवा स्तन मोठे होतात, तेव्हा तुम्ही त्या देहाला स्त्री म्हणून संबोधता. दाढीमिश्या असल्या तर पुरुष म्हणून ओळखता, पण खरं तर त्यांच्यामधे जो आत्मा आहे, तो स्त्री नाही की पुरुषही नाही.’ देहभाव ओलांडताना ही आत्म्याची लिंगहीन अवस्था पुरुष संतांनी ध्यानी घेतली. अनेक स्त्री संतांनी स्त्रीदेहाची उपभोग्यता नाकारून त्याविषयीच्या गुढाला आणि आकर्षणाला छेद दिला आणि बौद्ध आणि जैन संन्यासिनींनी मानवी देहाची भंगुरता समजून घेत देहतेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला.

लौकिकाला नाकारताना अनेक संत स्त्रियांनी आपला पती म्हणून परमेश्‍वराचाच स्वीकार केलेला पाहिला की आश्‍चर्य वाटतं. सर्वसामान्य स्त्रीसारखा प्रपंच या स्त्रियांनी नाकारला. वास्तवात कोण्या एका पुरुषाचे अधिकार मानणारी, त्याची सेवा करणारी आणि त्याला शेजसोबत करणारी स्त्री व्हायचं त्यांनी नाकारलं. मात्र तीच भूमिका परमेश्‍वराच्या संदर्भात अतिशय आनंदानं स्वीकारली.

कारण इथलं पती-पत्नींचं नातं वास्तवातल्या तशा नात्यापेक्षा वेगळं आहे. त्यामध्ये सामाजिक रूढीप्रथांचे ताण नाहीत. परंपरेच्या संकेतांचे दबाव नाहीत. व्यवस्थेनं लादलेल्या मर्यादा नाहीत. शिवाय स्त्रीचं स्थान गौण नाही आणि पुरुषाच्या अहंकाराची, अन्याय अत्याचारांची ती बळीही नाही. प्रेम या एकाच सुंदर भावनेनं भक्त स्त्री आणि तिचा देव हे पती-पत्नीच्या नात्यात बांधले गेले आहेत.

आंडाळ काय, महादेवी काय किंवा मीरा काय, यांनी लौकिक जीवनात कोणीही एक पुरुष नाकारला आणि परमेश्‍वर हाच पती म्हणून मानसिक पातळीवर स्वीकारला. त्यांचं आंतरजीवन त्या नात्याच्या नाना कळांनी बहरून आलं. एक तणावरहित, मधुर असं प्रेमजीवन त्यांना जगता आलं.

यामुळं आणखीही एक गोष्ट घडली. ती म्हणजे पती या नात्यानं पुरुष स्त्रीला जो विश्‍वास, आधार, संरक्षण आणि सामर्थ्य देऊ शकतो, तसे सर्व या स्त्रियांना ईश्वर पतीनं दिलं आणि त्या बळावर त्या अनेक लौकिक आपत्तींना तोंड देऊ शकल्या. ‘मी सर्वशक्तिमान जगन्नियंत्याची पत्नी आहे’ या भावनेनं त्यांना उन्नत केले. सशक्त केले.

शिवाय त्यांना मिळालेला पती असा, की ज्याचं सामर्थ्य आणि निर्माणक्षमता कधी उणावण्याची शक्यता नाही आणि तो मर्त्य नसल्यामुळं या स्त्रियांना कधी विधवेचं दुःख विणेही भोगावं लागणार नाही. ‘अबिनासी वर पायो,’ अशा आनंदानं मीरा नाचली ती उगाच नव्हे. आपल्या पतीच्या घराचं, तेथील ऐश्‍वर्याचं, त्याच्याशी होणार्‍या मीलनाचं वर्णन करताना या संत स्त्रियांच्या शब्दांमध्ये एक अवर्णनीय सुख दाटून आलेलं दिसतं.

संत स्त्रियांनी परमेश्‍वराशी या प्रकारचा संबंध घोषित करणं ही एक विलक्षण धाडसी घटना आहे. समाजानं स्त्रीवर लादलेले सर्व अन्यायी निर्बंध तिनं या एका घोषणेनं नाकारले आहेत. त्यानं केलेली उपेक्षा आणि अवहेलना नाकारली आहे. त्यानं दिलेलं गौणत्वही नाकारलं आहे. कारण प्रत्यक्ष परमेश्‍वराचीच जी प्रिया, ती गौण, हताश, क्षुद्र अशी असेलच कशी?

स्त्रीनं मुक्तीच्या वाटेवर पाऊल टाकताना ही जी परपुरुषसंबंध ठेवणार्‍या स्त्रीची भूमिका स्वीकारली, किंबहुना त्यापुढंही जाऊन ‘वेसवापण’ स्वीकारलं, त्याचं महत्त्व तिच्या आत्मशोधाच्या संदर्भात फार मोठं आहे, हे आपण ध्यानात घ्यायला हवं.

पारमार्थिकांनी भक्तीच्या क्षेत्रात, सामाजिक नीतीबाबत एक प्रकारचं बंडच केलं. सामाजिक नीतीच्या रूढ कल्पनांना त्यांनी छेद दिला. त्यांच्या देवानंच तशी मागणी केली. म्हणून समाजाची लाज भीड बाळगून चालणार नाही, असं सार्‍याच भक्तांनी ठणकावून सांगितलेलं दिसतं.

विवाहबाह्य संबंधात किंवा वेश्यापण स्वीकारण्यात पहिला अडथळा या प्रकारच्या लज्जेचाच समाज काय म्हणेल, लोकांना काय वाटेल, याचा विचार प्रथम दूर ठेवला, तरच मग घराचा उंबरा ओलांडता येतो. म्हणून निर्लज्ज होणं ही पहिली गरज. संत स्त्रियांनी स्त्रीत्वाचं लक्षण समजली जाणारी लज्जा प्रथम दूर केली आणि सरळ स्वैरिणीची किंवा वेश्येची भूमिका स्वीकारली. या भूमिकेवरून सारा सामाजिक दबाव त्यांना झुगारता आला. त्यांचा परपुरुष हा समर्थ परमपुरुष असल्यामुळं त्यांनी लोकव्यवस्थेचे नियमच झुगारण्याची हिम्मत दाखवली.

हे एक भक्तिनाट्यच आहे पाहा. नाटकात काम करण्याचं धाडस ज्या काळात कोणतीही कुलीन स्त्री कल्पनेतही करू शकत नव्हती, त्या काळात भक्तीच्या प्रांगणात एक लीलानाट्य संतांनी उभं केलं. संत स्त्रियांनी स्वतःशी संवादी अशी प्रमाथी प्रेमानं उचंबळणार्‍या स्वैरिणीची भूमिका त्यात निर्भयपणे स्वीकारली. त्यांनी कल्पनेनंच त्यांचा मानस प्रियकर ईश्‍वर उभा केला आणि त्याच्याशी असलेलं लौकिकदृष्ट्या अनैतिक नातं उघडपणे मिरवलं.

आतां मी सर्वांसि ग्रासुनि| मोहातीत क्रिडते अनुदिनीं|
निःशंक वर्तते हो जनीं| पहा च्यातुरी॥

असं समर्थशिष्या अंबाबाई हिचं एक पद आहे. ‘मी सद्गुरुघरची सैरी शोभते खरी’, असं म्हणत तिनं पदाचा प्रारंभ केला आहे आणि आपलं सैरीपण म्हणजे स्वैरीपण अभिमानानं सांगितलं आहे. जनाबाईचा या संदर्भातला अभंग तर प्रसिद्धच आहे. लोकनिंदेला न जुमानणारा वेश्येचा एक कडवा निर्धार आणि आवेग त्यातून प्रकट होतो. हाच निर्धार आणि आवेग पूर्ण ईश्‍वरार्पणभावानं मीरा, महादेवी, आंडाळ इत्यादी स्त्रियांनीही दाखवला आहे.

परमपुरुषाला आपला प्रियकर परपुरुष मानण्यात संत स्त्रियांनी एकीकडे सामाजिक पातळीवरच्या असुरक्षिततेचा स्वीकार केला आणि त्याच वेळी पारमार्थिक पातळीवर त्यांच्या प्रियकरानं त्यांना जन्ममृत्यूच्या फेर्‍यापलीकडं नेलं. अधिक ‘सुस्थित’ केलं, सुरक्षित केलं. त्यांच्यासाठी प्रेमवैभव खुलं केलं. त्याची वर्णनंही या स्त्रियांनी भरभरून केली आहेत.

0 Shares
विठू माझा लेकुरवाळा भक्तीतरंगाचे उद्गार