विठू माझा लेकुरवाळा

डॉ. मंगला सासवड

संत नामदेवांनी केलेला ‘सोशल इंजीनिअरिंग’चा यशस्वी प्रयोग संत जनाबाईंनी सर्वत्र पोहचविला. म्हणजेच सर्व जातीजमातींमधून उभ्या राहिलेल्या संतांची चरित्रं पहिल्यांदा नामदेवांसह जनाबाईंनी लिहून ठेवली. अभंगांमधून केलेलं ते केवळ रूक्ष ‘डॉक्युमेंटेशन’ नाही, तर संतांचं योग्य मूल्यमापन करून त्यांच्या महतीचं भावपूर्ण गाणं जनाबाईंनी गायलं आहे.

नाचू कीर्तनाचे रंगी| ज्ञानदीप लावू जगी॥ ही आपली प्रतिज्ञा साकारण्यासाठी संत शिरोमणी नामदेवरायांनी आजीवन अथक साधना केली. ‘ज्ञानमय प्रज्वलितो प्रदीप:’ ही महर्षी व्यासांपासून चालत आलेली परंपरा सर्व संतांनी पुढं अखंड चालवलेली दिसते. त्यामध्येच संत ज्ञानदेवांनी सांगितल्याप्रमाणे ‘जैसी दीपकलिका धाकुटी| बहु तेजाते प्रकटी॥’

अशी ज्ञानदीपकलिका म्हणजे, संत जनाबाई होय. साडेसातशे वर्षांपूर्वी या महाराष्ट्रात संतांनी भक्तीज्ञानाची जी विलक्षण चळवळ सुरू केली, त्यामध्ये संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सोयराबाई, संत निर्मळा आणि नामदेव परिवारातील राजाई, गोणाई, आऊबाई, निंबाई, लाडाई इत्यादी संत स्त्रियांनी निर्भयपणे जे योगदान दिलं, ते अभूतपूर्व आहे. यामध्ये विशेषत: संत जनाबाईंचं कार्य म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी भारताच्या स्त्रीजीवनात जी अभूतपूर्व क्रांती केली, त्याचं प्रथम रणशिंग होय!

भागवत धर्म मंदिराच्या पायाभरणीत संत जनाबाईंचा हातभार महत्त्वपूर्ण आहे. संत नामदेवांबरोबर युगायुगांचं नातं सांगणार्‍या जनाबाई कर्मयोगिनी श्रमदेवताच होत्या. विश्‍वातील आजपर्यंतच्या सर्व कष्टकरी स्त्रियांच्या त्या प्रथम प्रतिनिधी आहेत. उपेक्षितांचं अंतरंग उघडून दाखवताना, भक्तीच्या बळावर ‘पंधरावी ती दासी जनी’ असं स्वतःचं महत्त्वपूर्ण स्थान त्या अधोरेखित करतात. संत जनाबाईंच्या ४५० अभंगांत नामहिमा, गुरुमहिमा, संतमहिमा, बालक्रीडा, हरिश्‍चंद्राख्यान, थालिपाक, स्वानुभव, पंढरीमहिमा इत्यादी अनेक विषय आहेत. भक्तीज्ञानाचा मधुर अनुभव, अद्वैतानुभूती, प्रेमजिव्हाळा, संत सहवासातील आनंद त्या नेमक्या शब्दांत रेखाटतात.

जीवनाचं सुंदर जातं फिरवताना, अद्वैताचा खुंटा बळकट करतात. अशा तेजस्वी, स्वाभिमानी, जनाबाईंनी समकालीन संताची चरित्रंही, संक्षेपानं सांगितली आहेत. ‘संत हे कोण तरी, हे देवाचे डोळे’, अशी संतांची नेमकी ओळख त्या करून देतात. नामदेवांच्या घरी नेहमीच संतांचा राबता असे. त्यामध्ये संत ज्ञानदेव आणि त्यांची भावंडे चोखामेळा आणि त्यांचा परिवार, गोरोबा कुंभार, सावता माळी इत्यादी संतमंडळी असत. त्यांच्या सहवासाचे, महत्त्वपूर्ण कार्याचे, त्यांच्या अनुभव, प्रसंगांचं जनाबाईंनी उत्कट, भावमधुर क्षण रेखाटले आहेत. जनाबाईंनी संत ज्ञानदेव, संत सोपाननाथ इत्यादींचे भक्तीच्या अंगणातील सहवासाचे फुललेले अनुभव सांगितले आहेत. त्याचबरोबर इतर महत्त्वपूर्ण संतांचंही चरित्र त्या गातात. त्यांचं कार्य, महत्त्व सांगतात.

संत चोखामेळा

नामदेवांच्या घरी, विठ्ठलमंदिर, चंद्रभागा, वाळवंट, कीर्तन, भजन प्रसंगी संत चोखामेळा जनाबाईंना जसे दिसले, सहवासातून जसे जाणवले, तसे त्यांनी अभंगातून मांडले.

वैष्णव तो एक चोखामेळा महार॥
जनी म्हणे निर्धार केला संती॥

असे महावैष्णव चोखामेळाच होय, असं सर्व संतांनी निर्धारपूर्वक सांगितल्याची त्या ग्वाहीच देतात. भक्तीच्या साम्राज्यातील खरा श्रेष्ठ मुकुटमणी चोखामेळाच होय, असंही त्या म्हणतात.

संत चोखामेळा यांचं सुंदर व्यक्तिचित्र जनाबाई रेखाटतात.

यातिहीन चोखामेळा| त्यासी भक्तांचा कळवळा॥
त्याचा झाला म्हणीयारा| राहे घरी धरी थारा|
देव बाटविला त्याने| हासे जनी गाय गाणे॥

चोखामेळ्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन ‘देव बाटवणारा’ असा असताना, त्यातील फोलपणा जनाबाई हसत-हसत सांगतात. हे चित्र जेवढं भावमधुर, तेवढंच जनाबाईंच्या क्रांतिकारक विचारांची प्रगल्भता व्यक्त करणारं आहे.

चोखामळा संत भला| तेणे देव भुलविला॥
भक्ती आहे ज्याची मोठी| त्याला पावतो संकटी॥
चोखामेळ्याची करणी| तेणे देव केला म्हणी॥
लागा विठ्ठल चरणी| म्हणे नामयाची जनी॥

विठ्ठल भेदभाव करीत नाही, जातिभेद मानीत नाही, तो तर सर्वांच्या पलीकडचा असून, चोख्याच्या चोख भक्तीनं भुलून जातो. सुखावतो. तो चोखामेळ्यासाठी| ढोरे ओढी जगजेठी॥ असा प्रत्यय पाहणार्‍या जनाबाई विठ्ठलाचं भक्तप्रेम सांगताना, चोखामेळ्याचं मोठेपणही सांगून गात राहतात. चोखामेळा आणि त्यांचा परिवार, त्यांच्या जीवनात आलेली संकटं, अपमान-उपेक्षा, दुःख हे सारं-सारं जनाबाईनं जवळून पाहिलं होतं. भक्तीबळावर चोखामेळ्याचं श्रेष्ठत्व त्या अनेक वेळा अनुभवत होत्या. जनाबाईंनी तत्कालीन संतांच्या अभंगांचा लेखक कोण होता याची ऐतिहासिक नोंद केली आहे, ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

ज्ञानेश्‍वरांचे अभंग सच्चिदानंदबाबांनी लिहिले. तसंच निवृत्तीचे सोपानांनी, मुक्ताबाईचे ज्ञानदेवांनी, चांगदेवाचे शामा कासारांनी, परमानंदांचे विसोबा खेचरांनी, सावता माळ्याचे काशिबा गुरव यांनी, कूर्मदासाचे वासुदेव काईत यांनी अभंग लिहीले. चोखामेळा यांचा अनंतभट्ट अभ्यंग हा लेखक होता. ही महत्त्वपूर्ण नोंद ऐतिहासिक ठरते. एकीकडे महार म्हणून समाजाला उपेक्षित दृष्टीकोन दाखवणार्‍या जनाबाई चोखामेळा यांचे अभंग अनंत भट्ट हा एक ब्राह्मण लिहितो, असं सांगण्यास विसरत नाही.

संत गोरा कुंभार

जनाबाईंनी समकालीन संत गोरोबाकाकांचेही चरित्र प्रसंग लिहिले आहेत. गोरा कुंभारांचा आणि नामदेव परिवाराचाही जिव्हाळ्याचा सहानुभव जनाबाईंनी स्वतः पाहिला होता. ते सारे प्रेम, भक्तीचे सुंदर संबंध त्या अनुभवत होत्या.

गोरा कुंभाराच्या संगे| चिखल तुडवू लागे अंगे॥

विठ्ठल स्वतः गोरा कुंभाराबरोबर चिखल तुडवीत, त्याला कामात मदत करीत असे, अशी त्या नोंद करतात. तसंच गोरोबांचे चरित्र पुढील अभंगात सांगतात.

दोहीकडे दोही जाया| मध्ये गोरोबाची शय्या॥
गोरा निद्रिस्त असता| कपट करिती त्याच्या कांता॥
गोरोबाचे दोन्ही हात| आपुल्या हृदयावरी ठेवीत|
जागा झाला गोरा भक्त| जनी म्हणे त्या निद्रिस्त॥

गोरा कुंभार चरित्रातील हा प्रसंग भावोत्कट आहे. पत्नीला स्पर्श न करण्याचा गोरोबांचा निश्‍चय त्यांच्या दोन्ही बायकांनी झोपेत त्यांना मुद्दाम स्पर्श करून भंग केला. त्या झोपल्या, मात्र गोरा कुंभार जागे झाल्याबरोबर, त्यांना आपण स्वतःच अपराधी आहोत, असं वाटून, त्यांनी स्वतःचे हात छाटून शिक्षा करून घेतली. पुढे संत नामदेवांच्या कीर्तनात टाळ्या वाजवण्यासाठी हात वर करावेत म्हणून त्यांनी प्रयत्न केला, तर त्यांना नवीन हात फुटल्याची कथा त्यांच्या चरित्रात आलेली आहे.

संत सोपानकाका

जनाबाईंनी संत सोपानकाकांचंही महत्त्व सांगितलं आहे.

ब्रह्मा सोपान तो झाला| भक्ता आनंद वर्तला॥

सोपानदेव म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचाच अवतार होय.

सोपानाची ऐसी मूर्ती| विश्‍वकर्ता ब्रह्मा म्हणती॥
ऐसे बोले पुराणात| सृष्टीकर्ता जो भगवंत॥
जनी म्हणे हा सोपान| ब्रह्मा अवतरला पूर्ण॥

सोपान म्हणजे प्रत्यक्ष, ब्रह्मदेवच याची साक्ष म्हणून पुराणांचे बोलणे हेच आहे, असे त्या सांगतात. त्याचप्रमाणे संत विसोबा खेचर हे नामदेवांचे सद्गुरू असले तरी, गुरू म्हणून त्या सोपानांचाही उल्लेख करतात.

नामयाचा गुरू| तो हा सोपान हा सद्गुरू ॥
कर्‍हेवरुनी करुनी वस्ती| ब्रह्मपुरी तिशी म्हणती॥

कर्‍हेकाठचं सासवड, संवत्सर म्हणजेच ब्रह्मावतार असणार्‍या सोपानकाकांची ब्रह्मपुरी अशी महत्त्वपूर्ण नोंद जनाबाई करतात. ब्रह्मदेव हे सर्वांचेच पिता, म्हणून स्वतःचेही ते तात, पिता असं जनाबाई म्हणतात. संत सोपानदेवांचं माहात्म्य एकाच अभंगातून त्या सांगतात.

वाचा म्हणता सोपान| प्राप्त व कुजाच जाण|
सोपानदेव करिता जप| समूळ नासे त्रिविध ताप॥
सोपानदेव धरिता ध्याने| पुर्नःजन्मा नाही येणे|
दासी जनी तल्लीन झाली| सोपानचरणी विनवली॥

संत सोपान जप सर्व दुःखांना नष्ट करतो. त्यांच्या ध्यानानं जन्ममरण संपते. तर प्रत्यक्ष वैकुंठाची प्राप्तीही त्यांच्या नामोच्चारानं होते. म्हणून स्वतः जनाबाई नम्रतेनं त्यांच्या चरणी नम्र होऊन तल्लीन झाले, असा स्वानुभव सांगतात. इथे सोपानकाकांच्या जन्मशकाची नोंदही इतर भावंडांबरोबर केलेली आहे.

शालिवाहन शके अक्राशे नव्वद| निवृत्ती आनंद प्रकटले॥
त्र्याण्णवाच्या साली ज्ञानेश्‍वर प्रकटले|
सोपान देखिले शाण्णवात॥
नव्याण्णवाच्या साली मुक्ताई देखिली|
जनी म्हणे केली मात त्यांनी॥

संत सेना न्हावी

समकालीन संतांमध्ये संत सेना न्हावी यांचंही चरित्र जनाबाईंनी एकाच १३ चरणी दीर्घ अभंगात सांगितलं आहे. त्यामध्ये सेना न्हाव्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग संक्षेपानं; सुलभ, मधुर भाषाशैलीत सांगितले आहेत.

सेना न्हावी भक्त भला| तेणे देव भुलविला॥
नित्य जपे नामावली| लावी विठ्ठलाची टाळी॥
रुप पालटोनी गेला| सेना न्हावी विठ्ठल झाला॥
काखे घेवोनी धोकटी| गेला राजियाचे भेटी॥
आपुले हाते भार घाली| राजियाची सेवा केली॥
विसर तो पडला रामा| काय करु मेघःश्यामा॥
राजा अयनियात पाहे| चतुर्भुज उभा राहे॥
दूत धाडूनिया नेला| राजियाने बोलाविला॥
राजा बोले प्रितिकर| रात्र सेवा केली फार॥
राजसदनाप्रती न्यावे| भितरीच घेऊन जावे॥
आता बरा विचार नाही| सेना म्हणे करु काई॥
सेना न्हावी गौरविला| राजियाने मान दिला॥
कितीकांचा शीण गेला| जनी म्हणे न्हावी झाला॥

केवढा मोठा प्रसंग, पण अत्यंत मोजक्या शब्दात सार्‍या गोष्टींची नोंद इथं जनाबाईंनी केली आहे. आपली भक्ती करणार्‍या सेनामहाराजांना वाचवण्यासाठी राजाची सेवा करण्यास प्रत्यक्ष विठ्ठलच स्वतः सेना न्हावी बनले. राजाला आरशातच देवानं आपलं चतुर्भुजधारी दर्शन घडवलं. सेना न्हाव्याचं भक्ती माहात्म्य स्वतः अनुभवल्यानं राजानं त्यांचा मान-सन्मानानं गौरव केला. जनाबाई इथं विठ्ठलाचं भक्तप्रेम केवढं मोठं आहे, हे सांगताना जाती नव्हे, एथ भक्ती प्रमाण॥ हे दाखवून देत देवानं अशा अनेक उपेक्षितांचा त्रासच जणू घालविला, असं सांगितलं आहे.

सावता माळी, कूर्मदास, रोहिदास चांभार

या संतांचाही जनाबाईंनी महत्त्वपूर्ण उल्लेख केला आहे. ‘गागरमें सागर’ या उक्तीप्रमाणं कमीत कमी शब्दात नेमकं मर्म सांगितलं आहे.

माळियाचा लेके झाला| सेखी कुर्म्यालागी गेला॥
चांभाराने जानव्यासी| काढोन दाविले भटांसी॥
तुरका घरी सेले विणी| म्हणे नामयाची जनी॥

संत सावता माळ्यानं पोट चिरून देवाला आत लपवलं म्हणून हा देव त्याच्या पोटी मुलगाच झाला. संत कूर्मदास हे अपंग होते, तर त्यांना भेटण्यास लऊळ या गावी स्वतः विठ्ठलच गेला. संत रोहिदास चांभारानं तर भक्तीच्या बळावर जणू मीच खरा ब्रह्म जाणणारा ब्राह्मण आहे, असंच तमाम उच्चवर्णीय म्हणवणार्‍या भटांना सांगितलं, दाखवून दिलं, असं जनाबाई सांगतात.

संत कबीर

संत कबीरांचाही जनाबाई नेमका उल्लेख करतात. तुरका घरी सेले विणी| मुसलमान असणार्‍या कबीरांच्याही घरी देवानं त्याच्या भक्तीमुळं शेले विणण्याच्या कामात मदत केली. कबीराच्या बैसोनी पाठी| शेला विणता सांगी गोष्टी॥ देव उच्च नीच, जाती भेद न करता केवळ भक्तीच जाणतो, हे संतांचं महत्त्वांचं मर्म जनाबाई यानिमित्तानं सांगतात. इतकंच नव्हे तर स्वतः उपेक्षित असूनही मीही भक्तीबळावर त्याला हृदयात कोंडलं, तसंच विदुर सात्त्विक माझिया कुळीचा| अंगीकार त्याचा केला देवे॥ असा पुरावाच त्या देतात. संत जनाबाई संत ज्ञानदेव आणि त्यांची भावंडं, संत नामदेव आणि त्यांचा परिवार यांचं चरित्र गातात. इतर समकालीन संतांचं चरित्र, महत्त्वपूर्ण घटनांची नोंद अभंगांतून करतात. स्त्रीजन्म म्हणून उदास न होता, विशुद्ध भक्तीभाव बळावर उंच भरारी घेत, जनाबाई विठ्ठलाच्या सर्वात लाडक्या भक्त झाल्याचं त्यांनी स्वतःच्याच आत्मचरित्रपर अभंगातून सांगितलं आहे. अशा या तेजस्वी शलाकेला कोटी कोटी दंडवत.

0 Shares
मनगटावर तेल घाला साऱ्या सख्या जनीच्या