स्वरूपाचा पूर आला

नंदन रहाणे

‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष महाराष्ट्रभर सर्वत्र होता. काही मोजक्या ठिकाणी ‘नामदेव-जनाबाई’ हा गजर केला जातो. तो सर्वत्र टिपेच्या स्वरात म्हटला गेला, तर वारकरी संप्रदायाचं खरं चित्र पुढील पिढ्यांच्या मनावर बिंबवता येईल’... संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्यातील भावबंधापेक्षाही विचारबंध महत्त्वाचा आहे.

एकेका प्रदेशाच्या, एकेका समाजाच्या आणि एकेका संस्कृतीच्या भाळी काही भाग्ययोग जुळून आलेले असतात. संकटं जशी कधीही एकेकटी येत नाहीत, असं म्हटलं जातं, त्याप्रमाणंच हे भाग्ययोगही पुष्कळदा एकत्रित किंवा एकामागून एक येत असल्याचा सुखद आणि दुर्मीळ अनुभवही प्रत्ययाला येतो. तेराव्या, सतराव्या आणि एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रानं याची सत्यता अनुभवली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी संस्कृतीचं पुनरुत्थान झालं. त्याच कालखंडात जोतिबा फुलेंपासून लोकमान्य टिळकांपर्यंत आणि महादेव गोविंद रानडेंपासून सयाजी महाराज गायकवाडांपर्यंत एकापेक्षा एकेक थोर पुरुष आपापलं कर्तव्य गाजवून गेले. सतराव्या शतकातही शिवछत्रपती आणि त्यांची प्रभावळ तसंच तुकाराम महाराज, समर्थ रामदास यांसारखे महान धुरेचे पुरुषोत्तम प्रचंड कीर्ती संपादून गेले.

तेराव्या शतकातही अशीच भाग्ययोगमालिका महाराष्ट्राच्या वाट्याला आली होती. संत नामदेवांनी पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाहीचा प्रयोग उभा केला. त्यात सहभागी होण्यासाठी अठरापगड बहुजन समाजामधली प्रतिभावंत व्यक्तिमत्त्वं एकाच वेळी आणि एकदम उदयाला आली. कसलीही सामाजिक किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमी नसताना, या सर्वांनी जे महत्कार्य केलं ते पाहिलं की आजही आपण थक्क होतो.

त्यात नामदेव शिंपी होते, सावता माळी होते, नरहरी सोनार होते, गोरा कुंभार होते, जोगा तेली होते, सेना न्हावी होते, सजन खाटीक होते, जाल्हण सुतार होते, विसोबा आणि परिसा ब्राह्मण होते. ज्ञानेश्‍वर, निवृत्ती, सोपान यांना जातच नव्हती. या सगळ्यांचं काम एकमेकांपासून प्रेरणा घेत घेत, एकमेकांना प्रोत्साहन देत देत सुरू झालं. या सर्वांना गावगाड्यात एक विशिष्ट ओळख होती आणि एक निश्‍चित स्थानही होतं. प्रत्येकाला स्वतःचा धंदा होता आणि तो चालवण्यासाठी जुजबी का होईना हिशेबाची गरज होती. म्हणजे किमान अक्षरं आणि अंक यांची ओळख असणं भागच होतं. वाचन आणि लेखन यांच्याशी या सर्वांचा कमीअधिक संबंध आला असण्याची निदान शक्यता होती. तरीही प्रज्ञा प्रकटन आणि प्रतिभाविष्कार यांच्याशी या मंडळींचा काही संबंधच नव्हता. ब्राह्मण असलेले विसोबा सराफ होते तर परिसा कथेकरी होते. म्हणजे त्यांचेही व्यवसाय चाकोरीतलेच होते. ज्ञानेश्‍वरादी भावंडांच्या जन्मासंबंधी वादविवाद नसता तर तेही कुलकर्णी म्हणून गावगाड्यातलं कामकाज रूढार्थानं करतच राहिले असते. पण असं झालं नाही. सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेतही सर्वांच्या प्रज्ञा, प्रतिभा एकाच वेळी फुलून आल्या आणि महाराष्ट्रात ब्रह्मविद्येचा सुकाळ झाला.

पण खरं आश्‍चर्य इथून पुढंच आहे. या मंडळींमध्ये चोखा आणि बंका हे महार समाजातले श्रमिक आहेत. त्यांच्या सोयरा आणि निर्मळा या कष्टकरी गृहिणीदेखील आहेत. एक जनाबाईदेखील आहे नि ती चक्क राबत्या मातंग समाजातली बाई आहे, जी नामदेवांच्या घरचे पडेल ते करते! हे कुठं लिहून ठेवलेलं नाही पण वारकरी परंपरेतील अनेक लोक जनाबाई मातंग होत्या असं मानतात. गावगाड्यात हे सर्व अस्पृश्य आहेत. यांच्या वाट्याला जे काम आलेलं आहे ते केवळ हीन मानलं जाणारंच आहे. त्यांचा स्पर्श आणि संसर्गही गावात कुणाला नको असतो. अशा स्तरातली ही व्यक्तिमत्त्वं असतानादेखील, हे सर्व संतमंडळात प्रवेश झालेले आहेत. तिथं त्यांना सर्वांबरोबरचं स्थान आणि ओळखही मिळालेली आहे. नामदेवांनी जे चमत्कार केलेत, त्यात याचा समावेश केला जात नाही. पण खरंतर हाच सर्वात मोठा चमत्कार आहे आणि त्यासाठी त्यांना लोटांगणच घातलं पाहिजे.

पण लोटांगणाचे मानकरी एकटे नामदेवराय नाहीत. आद्य मानकरी आहेत त्यांचे वडील दामाशेटी रेळेकर आणि आई गोणाई. दामाशेटींच्या घराण्याचं मूळ गाव सांगली जिल्ह्यातलं रिळे. तिथून त्यांचे पूर्वज उठले आणि ते थेट मराठवाड्यातल्या नरसीला गेले. कापड विकणं आणि कपडे शिवणं हा त्यांचा धंदा म्हणजे गावोगावचे बाजारहाट करणं आलंच. त्यानुसार दामाशेटीदेखील मराठवाड्यात होईल तितके हिंडत असतील. पाल मांडून बसलेल्या हाटकर्‍याला, जो समोर येईल त्याच्याशी धंदा करावाच लागतो. तिथं जातीपातीचे प्रश्‍न माजवून चालत नाही. अशा या देण्याघेण्याच्या व्यवहारातूनच दामाशेटी आणि गंगाखेडचे दमा मातंग यांची ओळख झाली असेल. दोघंही सात्त्विक प्रवृत्तीचे असल्यानं एकमेकांच्या जवळ आले असतील. कदाचित पंढरीच्या वारीनं दोघांमध्ये मैत्रीचे अनुबंधही निर्माण झाले असतील.

हे सगळं जरी संभाव्यतेच्या कक्षेतील मानलं तरी दमा आणि त्यांची बायको करुंड यांनी आपली लेक जनाबाई हिला दामाशेटी आणि गोणाई यांच्या पदरी घालण्याचं ठरवणं आणि त्यांनीही होकार देऊन तिचा सांभाळ करणं, हे फारच विस्मयकारक आहे. तेराव्या शतकातली एकूण सामाजिक परिस्थिती पाहता, हे केवळ अशक्यप्राय होतं, पण दामाशेटी रेळेकरांनी ते शक्य करून दाखवलं आणि गोणाईनं नवर्‍याच्या इच्छेला अनुकूलता दाखवली याचं आजही आश्‍चर्य वाटावं अशीच ही घटना आहे. शिंप्याच्या घरात मातंगाची पोर, जरा कल्पना तर करून पहा. याचा बभ्रा होऊ नये आणि गावकीतून उपद्रवही पोचू नये म्हणूनही कदाचित दामाशेटी नरसीवरून आपल्या आवडत्या गावी पंढरीला हलले असतील. म्हणूनच अगदी आजही दामाशेटी आणि गोणाई हे ‘संत’ म्हणूनच लोटांगणाचे आद्य मानकरी आहेत. पुढे तर त्यांनी चक्क अभंगही लिहिलेत; पण मातंगाच्या ५-७ वर्षांच्या मुलीला जाणीवपूर्वक आश्रय देणं, हे संतत्त्वाचं लक्षण मानलंच पाहिजे.

नामदेव हे अशा आईवडिलांचे पुत्र म्हणून जन्माला आलेत. साहजिकच सहिष्णूता आणि उदारमतवाद त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचंच अभिन्न अंग. मायबापांना अंतरलेली ही जनाबाई त्यांच्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठी असल्याचं मानलं जातं. नामदेवांची बहीण आऊबाई कदाचित जनाबाईंच्या वयाची असू शकेल किंवा पाच-सहा वर्षांनी लहानही असेल. आज आपल्याला निश्‍चित काहीच सांगता येत नाही हे दुर्दैव. पण उघड्यावर पडू पाहणार्‍या मातंगाच्या मुलीला भगवद्भक्त, व्यापारी, वारकरी, शिंप्याच्या घरी आश्रय मिळाला हे किती भाग्य म्हणायचं. तेही अशा कालखंडात जेव्हा धर्मज्ञ आणि धर्मनिष्ठ म्हणवणारे आपल्याच एका जातिबांधवाला देहांत प्रायश्‍चित्त फर्मावत होते आणि त्यांच्या उघड्यावर पडलेल्या लेकरांचा अमानुष छळ करीत होते. जनाबाईंमधलं संतत्त्व जागृत झालं त्याची पार्श्‍वभूमी ही अशी दामाशेटी आणि गोणाईंनी रंगवलेली आहे. त्यातले रंग जिव्हाळ्याचे, माणुसकीचे आहेत, जन्मजात श्रेष्ठत्वाच्या अथवा पांडित्याच्या प्रदर्शनाचे नव्हेत.

दामाशेटी आणि गोणाबाई यांना आऊबाईनंतर मुलगा झाला तो नामदेव. त्यांचा जन्म इ. स. १२७० मधला. नामदेवांनी धर्म, अध्यात्म, संप्रदाय, लोकजीवन यांचे सगळे प्रवाहच बदलून टाकले. त्याने क्रांती, उत्क्रांती, भावक्रांती सारं काही एकाच वेळी करून टाकण्याचा चंग बांधला. या सगळ्या घडामोडीत त्यांच्या पहिल्या सहकारी, शिष्या आहेत त्या जनाबाईच. नामदेवांचा जन्म जनबाईंच्या देखत झाला आहे. त्यांनीच नामदेवांना अंगाखांद्यावर खेळवलं, नाचवलं आहे. त्यांचं रांगणं, उभं राहणं, चालणं, धावणं, पडणं, रडणं त्यांनी न्याहाळलं आहे. त्यांना जोजवणं, खाऊ घालणं, न्हाऊ घालणं, फिरवून आणणं ही कामंही त्यांनी केली आहेत. अशा या त्यांच्या आवडत्या बाळानं, वयाच्या पाचव्या वर्षी एक अभूतपूर्व, अकल्पनीय आणि आजही अविश्‍वसनीय वाटावी अशी गोष्ट केली, ती म्हणजे चक्क देवबाप्पाला नैवेद्य ग्रहण करायला भाग पाडलं. ही बाब कशी स्वीकारायची हे ज्याच्या त्याच्या मनोधारणेवर सोडूया, पण नामदेवांनी आपल्या भावक्रांतीला वयाच्या पाचव्या वर्षी अंतःप्रेरणेनं आणि अंतःस्फूर्तीनं प्रारंभ केला, इतकं स्वीकारणं कोणालाच अवघड वाटू नये.

जनाबाई नामदेवांच्या या अभियानात सहभागी झालेली पहिली व्यक्ती आहे. लहान मुलांचं म्हणून एक भावविश्‍व असतं. त्यात अनेक अद्भुत गोष्टी नांदत असतात. चॉकलेटचा बंगला, दुधाचं तळं, मधाची विहीर, उडणार्‍या मासोळ्या, बोलणारा चांदोबा, नाचणारा सिंह असं अक्षरशः काहीही तेथे अस्तित्वात असू शकतं. त्यात रस घेतला तर मुलांच्या भावविश्‍वात कुणाचाही प्रवेश होऊ शकतो. पण बहुधा हे भावविश्‍व हाणून पाडण्याचं कर्तव्य त्या मुलाची ताई किंवा दादाच मोठेपणाच्या अधिकारानंच अनावश्यक उत्साहानं पार पाडतात. जनाबाई नामदेवांच्या ताईच्या भूमिकेतच होत्या, पण त्यांनी हे कर्तव्य न करता नामदेवांच्या भावसृष्टीत रममाण होणं पत्करलं. त्यांच्या संतत्वाचा उदय त्यातूनच आपसूकपणे झाला आहे.

आपण ज्या सृष्टीत वावरतो ती सर्व मानीत आहे. शब्द, अर्थ, भाव, रस, नाम, संज्ञा हे सर्व मानीत असतं. कुणीतरी त्यापैकी कशाचीतरी स्थापना करतं. त्यावर दुसर्‍यानं विश्‍वास ठेवणं भाग असतं. तरच जीवनव्यवहार पुढे चालू शकतो. सृष्टी बालपणीची अद्भुत असो की मोठेपणीची भौतिक, तिची बांधीलकी पत्करल्याशिवाय तिच्याशी सामीलकी मानल्याशिवाय काहीच चलनवलन संभवत नाही. जनाबाईंचं मोठेपण यात आहे, की त्यांनी नामदेवांच्या भावसृष्टीशी स्वतः बांधिलकी तर पत्करलीच पण मोठ्या आनंदानं आपली सामीलकीही मानली. नामदेवांनी एक बिंदू टाकला. त्याची त्रिज्या बनण्याकरता स्वतः पहिली मिती झाल्या जनाबाई मग त्यापुढे सावता, गोरा, चोखा, नरहरी, ज्ञानदेव इत्यादी इत्यादी. महाराष्ट्रात हे वर्तुळ पूर्ण झालं, ते नामदेवांच्या अक्षाभोवती भारतभर तीनशेसाठ अंशात फिरलं आणि त्याचा सधन गोलक झाला. त्यात जनाबाईंचं स्थान मोलाचं. फारच तोलामोलाचं.

खरी गोष्ट अशी आहे, की नामदेवांच्या संतत्त्वाला जनाबाईंचं सहअस्तित्व उपकारक ठरलं आहे. अगदी बालपणापासूनच नामदेवांचे व्यक्तिमत्त्व सामान्य पातळीवरून एकदा जे उचललं गेलं ते गेलंच. त्यानंतर त्यांचा प्रचारक म्हणून, संघटक म्हणून जो झपाटा सुरू झाला तो झालाच. त्याला लौकिक संदर्भाचे जे अस्तर लाभलं ते जनाबाईंमुळे. संतत्त्वाकडे वाटचाल सुरू असतानाही त्यांचं दासीपण सुटलं नव्हतं. संत झाल्यानंतरही ते सुटलं नाहीच. त्यामुळंच सामान्य माणूस नामदेव प्रणीत चळवळीशी लगेच नि थेट संबंधित होऊ शकला. एरव्ही धर्म आणि अध्यात्म म्हणजे ब्राह्मण्य, संस्कृत, भस्म, रुद्राक्ष, सोवळे, व्रतं, यज्ञ, दानं, उद्यापनं, ब्राह्मणभोजनं यांचंच अवडंबर माजलेलं होतं. देवाला फक्त संस्कृत समजते आणि तो पुरोहितांचंच ऐकतो, असाच समज पोसलेला होता. नामदेवांनी जनाबाईंना सांगाती घेऊन हा समज खोडून टाकला. देवाला अगदी मराठीदेखील समजतं आणि तो घरकाम करणार्‍या मोलकरणीचंसुद्धा ऐकतो हे जनाबाईंनी दाखवून दिलं. झाडलोट करणं, केर भरणं, शेणी गोळा करणं, भिंती सारवणं, धान्य दळणं, कांडणं, कुटणं, धुणीभांडी करणं या गोष्टी त्यांच्या आयुष्यातून कधीच वजा झाल्या नाहीत. या कष्टप्रद जिण्याला लागणारी ऊर्जा त्यांना भक्तिचळवळीतून सदोदित मिळाली. सामान्य माणसाला याचं प्रत्यंतर आलं आणि त्यातूनच नामदेवांचं काम वेगानं वाढत गेलं. उच्चासनावर बसून घटापटांच्या चर्चा करणार्‍या, विधिनिषेधांचं स्तोम उभं करणार्‍या धर्मज्ञांपलीकडे जो अफाट समाज होता, त्याला नामदेवांइतकीच जनाबाईंच्या जगण्यावागण्यातून दिशा मिळत गेली आहे. ‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष महाराष्ट्रभर सर्वत्र होता. काही मोजक्या ठिकाणी ‘नामदेव-जनाबाई’ची धून म्हटली जाते. ती सर्वत्र टिपेच्या स्वरात म्हटली गेली, तर वारकरी संप्रदायाचं खरं चित्र पुढील पिढ्यांच्या मनावर बिंबवता येईल.

जनाबाईंनी हा अधिकार त्यांच्या कर्तृत्वानं मिळवला आहे. बालभक्त म्हणून नामदेवांचं प्रारंभी कौतुक झालं. पण त्यांच्या अनिवार विठ्ठलवेडामुळं नंतर आईवडीलही वैतागले. बडव्यांनीही त्यांच्यावर काटा धरला. गल्लीतल्या पोराटोरांनीही त्यांची हुर्रेवडी उडवली असेल. बाजारपेठेतले उदमी वाणीदेखील त्यांना उपहासाने हसले असतील. जगाचा हा नियमच आहे, की जो जगावेगळा वागेल त्याला हसायचं, त्याची टिंगलटवाळी करायची. इथं जनाबाई एकदम वेगळ्या ठरतात. फार उंचीवरती उभ्या राहतात. त्या किशोर नामदेवाला समजून घेतात आणि त्याच्या नादछंदात स्वतःही सहभागी होतात. नामदेवांची स्नेह, समता, सहिष्णूता आणि सहजीवन यावर आधारलेली भक्तिचळवळ उभी करण्याची ही स्वयंभू धडपड जनाबाईंनी जाणली. नामदेव बारा-पंधरा वर्षांचे असतील तेव्हा जनाबाई पंचविशीतल्या असतील. सामाजिक नीति नियमांचा काच त्यांना दहापट तीव्रतेनं जाचत असेल, पण त्यातूनही मार्ग काढून, नामदेवाचं संरक्षक ‘ताईपण’ त्यांनी निभावलं आणि नंतर त्या थेट रुक्मिणीचीही ‘नणंद’ म्हणून अधिकार गाजवू लागल्या, ज्ञानदेवांना अभंग म्हणायला सांगावं अन् पांडुरंगाला पीतांबर ढळल्याची दटावणी करावी, हे फक्त त्यांनाच शोभू शकलं. कारण निरलस प्रेम आणि निरपेक्ष जिव्हाळा याच भांडवलावर त्या उभ्या होत्या. त्यांचं व्यक्तिमत्त्व समजावून घ्यायला तेच उपयोगी पडतं.

आपल्या सुदैवानं जनाबाईंचे जवळपास ३५० अभंग आजही उपलब्ध आहेत. त्यातून तिचं ‘जनाबाईपण’ ठसठशीतपणे जाणवत राहतं. त्या अजिबात नामदेवांची प्रतिकृती नाहीत. छाप्यातून काढलेली मूर्ती तर नाहीच नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व स्वतंत्र आहे. स्त्रीला निसर्गतः असणारी उपजत समज त्यांच्या शब्दांमधून अनुभवास येते.

वाचे उच्चारिता हरी| तो हा भक्तांचे तोडरी॥
काम होऊनि निष्काम| काम झाला मनी प्रेम॥
नाम अखंडित गाय| तो हा पूर्णकाम होय॥
काम निष्काम झाला मनी| वंदी नाचे दासी जनी॥

असा त्यांचा एखादा अभंग समोर आला की जणू काही विजेचा कडाडता कल्लोळच कोसळतो. सामान्यजन सदैव शरीर पातळीवर जगतात, त्यांच्या मनीमानसी कामभावना अखंडपणे रवरवत राहते. देहक्रीडा होऊन गेल्यावरही जे काही तरलपणे राहतं ते असतं प्रेम. तिथं वासना नसते. कामना नसते. हे निष्कामत्त्व हेच ‘पूर्णकाम’ रूप होय. जनाबाई तिथं पोचल्यात म्हणूनच हरी भक्तांच्या पायातल्या तोड्याची कडी किंवा घुंगरू झाल्याचं तिनं अनुभवलं आहे. अशा ठिकाणी त्या नामदेवांच्याही पैलाडी उभ्या ठाकल्याचं जाणवतं.

येऊ ऐसे जाऊ| जनांसवे हेचि दावू॥
आपण करू हरिकीर्तन| जाणोनी भक्तीचे जीवन॥
नाम संशय छेदन| भवपाशाचे मोचन॥
जनी म्हणे व्हा देवासी| होईल त्याला करणी ऐसी॥

जनाबाई भक्तीला जीवन म्हणतात. पण ते जाणावं म्हणजे काय, तर त्याचं पाण्यासारखं प्रवाहीपण ओळखावं, हा त्यांचा आग्रह आहे. पाण्याचा थेंब जमिनीवर पडता पडता दुसर्‍या तिसर्‍यात मिळून मिसळून जातो, प्रवाह होऊन वाहू लागतो. सहज पुढे पुढे जाणं हीच त्याची भूमिका असते. आपणही या जगात यावं, भवपाशात न अडकता, दगडासारखं ठायीच खळून न पडता, येऊ तसं पुढे पुढे जाऊ, लोकांनाही हेच शिकवू, असा त्यांचा उपदेश आहे. तो ज्यांनी ऐकला ते यातिहीन असले तरी परमेश्‍वर ते म्हणतील ते निमूटपणे मानतो. चोखामेळा तसे झाले, तेव्हा ‘देव बाटविला त्याने| हासे जनी गाय गाणे॥’ असा आनंद त्या व्यक्त करतात. ‘चांभाराने जानव्यासी| काढोन दाविले भटांसी॥’ असं अजब चित्र त्या नोंदवून ठेवतात. या भक्त भागवतांनी, साधुसंतांनीच ‘स्त्रीजन्म म्हणवून न व्हावे उदास’, असं सांगून त्यांचा जीवनोत्साह वाढवला. त्यांनीही मग ‘स्वरूपाचा पूर आला’ ही भावावस्था शब्दांकित केली. हा सारा मराठीचा भाग्ययोगच आहे.

नामदेव महाराजांनी १२९२ नंतर म्हणजे एकविशी गाठल्यावर पुढे एकंदर पाच वेळा भारताचं भ्रमण केलं. वर्षानुवर्ष ते पंढरपुराबाहेर होते. त्यांच्या अनुपस्थितीत वारकरी संप्रदाय सांधून बांधून ठेवण्याचं कार्य या जनाबाईंनीच तर केलं. १३५०मध्ये पंजाबहून परतल्यानंतर नामदेवांनी पांडुरंगाच्या पायरीपाशी समाधी घेतली. त्यांच्यासवे दामाशेटी, गोणाई, आऊबाई, लिंबाई, नामदेवांचे चारी पुत्र आणि तीन सुनाही होत्या. त्यात चौदावी होती जनाबाई.

जनाबाईंशिवाय नामदेवांचं चित्र पूर्णच होत नाही. जनाबाईंची भावरेखा नामदेव हा मध्यबिंदू धरून सतत मोठं वर्तुळ आणखी मोठं मोठं करत राहिली आहे.

0 Shares
यार बा माझ्या पोटी यावे