यार

रंगनाथ तिवारी

पांडुरंग आणि जनाबाई. विठू आणि जनी. देव आणि भक्त की सखा आणि सखी? स्वामी आणि दासी की प्रियकर आणि प्रेयसी? हे सगळं आणि सगळ्याच्या पलीकडलं असं हे नातं. माहीत नाही. कळत नाही. शोधलं तरी सापडत नाही. त्यामुळे आपण फक्त गावीत गाणी या प्रीतीची आणि भक्तीचीसुद्धा. सापडलं तर या नात्याचं गुपित फक्त तिथंच सापडेल.

जी कुणालाच जुमानीत नाही तिचं नाव जनी. कुणाला म्हणजे कुणालाच जुमानणार नाही. म्हणणार नामयाची दासी. पण नामा ओळखून आहे, हिनं त्याच्या बारशाच्या घुगर्‍या खाल्ल्यात आणि त्याला पाठीवर घेऊन वाळवंटी चंद्रभागेच्या काठी वैष्णवांनी मांडियेल्या डावात खेळायला ती सोबत घेऊन गेलेली आहे. नैवेद्य घेत नाही म्हणून मुळुमुळु रडणार्‍या नामाला विठूसमोर डोकं आपटू म्हणून सांगणारी पण जनीच. बिचारा विठू मुकाट जेवू लागला. न जेवून करतो काय? जनीचा धाकच असा. तिला त्याचं रहस्य समजलंय. आपण आहोत म्हणून हा आहे. आपणच नसलो तर हा रागावणार तरी कुणावर? अन् याच्या रागावण्याला भ्यायचं तरी कशाला? राग येऊनि काय करिसी?

तुझं बळ आम्हापाशी| नाही सामर्थ्य तुज हरी॥

प्रेमाची ही लीला अतर्क्य आहे. त्यात संपूर्ण समर्पणपण आहे आणि संपूर्ण सत्ता गाजवणं पण आहे. ‘ना मैं देखूँ औरको ना तुज देखन देऊ’. प्रेम एकपक्षी असतं, उभयपक्षी असतं, कसंही असतं, म्हणून तर ते अतर्क्य. काय काय करील आणि काय काय करून घेईल याची मोजदादच नाही. सतत सोबत पाहिजे. पाहिजे म्हणजे मिळते दळिता कांडिता.

झाड लोट करी जनी| केर भरी चक्रपाणी|
पाटी घेऊनी डोईवरी| नेऊनिया टाकी दुरी|
भक्तिसी भुलला| नीच कामे करू लागला|
जना म्हणे बा विठ्ठला| काय उतराई होऊ तुला|

मै ना मैं रहूँ तू न तू रहे, अशी स्थिती झाल्यावर कुणी कुणाचं उतराई व्हावं? एकमेकांसाठी सतत काही ना काही करत राहावं आणि उतराईला उतरंडीच्या पायथ्याशी गाडून टाकावं. जनी न्हायला बसली आणि विसणाला पाणी नाही. मग तिनं न्हावं कसं? बोलवावं कुणाला? बोलवायची गरजच काय? ‘घागर घेऊनी हातात| पाणी आणी दीनानाथ’. कितीतरी दिवसांनी जना न्हायला बसली. न्हायला तरी वेळ कुठंय? सतत जनी हे कर, जनी ते कर. मग जनीच्या डोक्यात उवा नाही का पडणार? पडू दे उवा. काढायला आहे ना चक्रपाणी. उवा काढील. न्हाऊ घालील आणि वेणीपण घालील. हे सगळं? हो हे सगळं आणि खूप काही करावंच लागणार. न करून सांगतो कुणाला? आपुल्या हाते वेणी घाली| जनी म्हणे माय आली|

विठू जनीचा कोण आहे? कनु. कनु प्रियाचा कोण असतो? मायबाप, भाऊ, बहीण, सखा आणि जारसुद्धा. सगळ्या नात्यांतून तोच तर भरून असतो. जार म्हणजेच यार. त्याची एक वेगळीच गोडी असते. सगळ्यांच्या नजरा चुकवून ऊन, पाऊस, वादळ, वारं, अंधार, उजेड, काटेकुटे सगळ्यातून वाट काढत धावत आलं पाहिजे. परत कुठे गेला होता, म्हणून घरच्यांनी विचारलं तर सांगायची सोय नाही. कुठं नाही, इथंच तर होतो. इथं तर आम्ही होतो, तू कुठं होतास, खरं सांग. खर्‍यानं खोटं कसं सांगावं आणि खोट्यानं खरं कसं सांगावं? जाराच्या प्रीतीची गंमत आणि गोडी त्रैलोक्यात शोधून सापडणार नाही. त्याचा विरह होऊ नये. पतीचा विरह तो तर होतच असतो. रडून घ्यायचं असतं. पण यार मेला तर मग जगायचंच कसं? पदर फाटला तर टाके घालून शिवता येतं पण आकाशच फाटलं तर कुठं कुठं टाके घालणार?

टल्लू फटे सीलेणा| आकाश फटे कियॉ सीणा|
खसम मरे रो लेणा| यार मरे कियॉ जिणॉ|

असतात, यार पण बरेच असतात. पण जनीचा एकच यार. त्याच्यावरच सगळा भार. ज्याला यार त्यांसी भार. मजला नाही आणिक यार! विठ्ठल रखमापती असेल, लक्ष्मीपती असेल, कमलापती असेल. पण माझा यार आहे. हे माझं सुख त्यांच्या वाट्याला येऊच शकणार नाही. पतिव्रतेनं पतीची आणि स्वत:ची मर्यादा पाळून जगलं पाहिजे. पण जनीचं तसं नाही. ती आपल्या यारची वाट रात्रंदिन पाहणार आणि सगळा भार, लोकलज्जा त्याच्यावर सोडून देणार. प्रेमात कसली आली आहे लोक लाज?

लोग कहे मीरा भई रे बावरी| सास कहे कुलनासी रे|
संतन ढिग बैठ बैठ लोक लाज खोई| पग घुंगरु बांध मीरा नाची रे…

नुसतं का नाचत नाही बाई? पायात घुंगरू कशाला? घुंगरांचा आवाज झाला नाही तर लोकांना कळणार कसं? उभ्या जगाला कळू द्या मीरा लोकलज्जेचा त्याग करून दर्द दिवाणी होऊन नाचते आहे. लपून छपून काही नाही. प्यार किया तो डरना क्या? कळू दे ना हा प्रेमाचा बेहद, बेसुद आविष्कार आहे. कुणाची भीड भाड न बाळगणारा कुण्णा कुण्णाला न जुमानणारा.

जनीचा आहेर आपल्या जाराला मुक्तपणे अर्पण केलेला. देहभान पूर्ण जाय| तेव्हा विदेही सुख होय॥ भक्ती आणि प्रीती सख्ख्या बहिणी. यांची प्राप्ती सगळ्याचा त्याग केल्याशिवाय होतंच नाही. हे काम येर्‍यागबाळ्याचं नाही. आधी डोकं कापून दाराबाहेर ठेवावं लागतं. मग या प्रदेशात प्रवेश भेटतो. ‘भगति करै कोई सूरमा, जाती बरन कुल खोई’. मी अमक्या जातीचा, अमक्या वर्णाचा किंवा मोठ्या कुळातला, हे सगळं इथं चालत नाही. या सगळ्यांचा त्याग केल्यावरच नामदेवाच्या पायरीवर डोकं ठेवायची लायकी प्राप्त होत असते. जन्मोजन्मी एकच मागणं पंढरीत सेवा नामयाचे दारी,

करी पक्षी का सूकर| श्‍वान श्‍वापद मार्जर|
ऐसा हेत माझे मनी| म्हणे नामयाची जनी|

पशू, पक्षी, कुत्रं, मांजर, डुक्कर जे करायचे ते इथं पंढरीत आणि नामयाचे दारी करा. निष्ठा अनन्य असते आणि प्रीती अविचल. कृष्णभक्त कवी रसखान म्हणतो जो काही दगड धोंडा करायचाय तो करा पण इथल्या वृंदावनातला, गोकुळातलाच करा. त्या गोवर्धन पर्वताचा दगड व्हावं, पण कृष्णासोबत सतत वृंदावनात राहावं. प्रेमात जगण्या मरण्याला अर्थ नसतो. अर्थ असतो तो ‘त्याच्या’ बरोबर राहण्याचा.

‘एक तू ना मिला सारी दुनिया मिले भी तो क्या हैं’ अशी स्थिती. माझा लेकुरवाळा विठू माझ्याबरोबर राहायला पाहिजे. खांद्यावर निवृत्ती, सोपानाचा हात हातात, पुढं ज्ञानेश्‍वर, मागे इटुकली छान छान मुक्ताई, गोरा कुंभार मांडीवर, चोखोबा जीवा सोबतीला, बंका कडेवर आणि नामदेवानं करंगळी धरलेली, काय सुंदर दृष्ट लागण्यासारखं दृश्य. जनाबाईनं मीठ-मिरच्या ओवाळून टाकावं असा सोहळा. असा सोहळा सोडून वाराणशीला कशाला जावं? म्हणे तिथं गेल्यावर मुक्ती मिळते. ती मुक्ती तर माझ्या पंढरीत पावलोपावली आहे. शिखर दर्शन झालं की भीमातीरी मोक्ष. पुंडलिकाच्या पायी लागताच मुक्तीची महत्ता वाया जाते. मुक्ती तर इथं घरोघर दासी म्हणून वावरते आणि मोक्ष पाठीमागे सतत उभा असतो. मोक्ष मुक्ती तर पायदळी लोळतात इथं. कसं आहे, समर्थांच्या श्रीमंतांच्या दारावर भीक म्हणून थोडंबहुत काहीबाही वाढतातच. पण पंचपक्वान्न सोडून भिकेचे डोहाळे कशाला धरावेत? इथं तर साम्राज्याचं सुख आहे मोक्ष मुक्तीच्या पलीकडलं. आम्हाला नको वाराणशी.

पण वाराणशीचा कबीर आला ना पंढरीला. भीमेला पूर. लोक काठावर थांबलेले. कबीर म्हणाला चला. संसार सागर पार करण्याचं साधन विठू. तो कमरेवर हात ठेवून म्हणतोय पाणी फार नाही. कबीर विठ्ठल विठ्ठल म्हणत पैलतीरी गेले. पंढरीत गवगवा झाला. भीमेला पूर असताना वाराणशीचा कबीर विठ्ठलनाम घेत विठ्ठलाच्या दर्शनाला आला. कबिराच्या दर्शनाला पंढरी लोटली. जनीला पण जायचं होतं पण वाळलेल्या गोवर्‍या गोळा करण्यावरून तिचा दुसर्‍या गोवर्‍या गोळा करणार्‍या बाईशी झाला वाद.

‘अहो महाराज, आमचा वाद मिटवा.’

‘मी वाद कसा मिटवणार? मला काय माहीत तुमच्या गोवर्‍या कोणत्या? मग मी कसं ओळखणार?’

‘महाराज, माझ्या गोवर्‍या कानाशी धरल्या की त्यातून विठ्ठल विठ्ठल नाद ऐकू येतो. कानाशी धरून ऐका ना.’

कबिरानं गोवरी कानाशी लावली. त्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येऊ लागला. ‘आवाज तर येतोय.’

‘तर त्या गोवर्‍या माझ्या. ज्यातून असा आवाज येत नाही त्या तिच्या त्या माझ्या नाहीत.’ कबीर विचार करू लागला. गोवर्‍या थापणार्‍या हातांनी निर्जीव गोवर्‍यांना चैतन्य प्रदान केलं. ही कसली साधना? तो विचार करत बसला आणि गोवर्‍यांसाठी भांडणार्‍या बाया गेल्या. ‘या कोण?’, कबिरानं भोवती उभारलेल्या लोकांना विचारलं. ‘या होय, ही तर जनी, नामयाची जनी.’ जनी कबिराचा नक्षा उतरून निघून गेली.

कबिरा कबिरा क्या करे, जा भीमा के तीर
इक जनी की भक्ती में, बह गए लाख कबीर

कबिराच्या नावावर वर्षानुवर्ष लोक कहे कबीर म्हणून रचना करत आहेत. मग आपण का करू नये?

ज्ञानेश्‍वर ज्ञानियांचा राजा तर जनाबाई संतांची सम्राज्ञी. सगळ्यांची खबरबात ठेवणार. गोरोबाची खबरबात, चोखोबाची खबरबात, अवघ्या पंढरीची खबरबात. पंढरीत चोर्‍या फार होतात. चोर सापडत नाही. सापडत कसा नाही? खबरबात ठेवलीच पाहिजे. आणि जनीनं चोर धरिला. गळ्याला दोर बांधला आणि कोंडून पायी बेडी घातली. सोऽहमचा मारा केला. विठ्ठल काकुळतीला आला.

‘जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी तुला’ कोऽहम? सोऽहम! कळलं का तुला ऊठसूट चोर्‍या करतोस? धरिला पंढरीचा चोर. जनी सम्राज्ञीचा आदेश. जिवंत सोडायचंच नाही. नो सुप्रीम कोर्ट. सम्राज्ञीच्या वर का कुठे कोर्ट असतं? फायनल वर्डिक्ट. जनी आहे ती! कुण्णा कुण्णाला जुमानणार नाही. अशी अतिरेकी. अशा अतिरेक्याला कसं जिंकायचं, ते शिवशंकरालाच माहीत. आदिशक्ती बेफाम नाचू लागली. शंकराला खाली पाडून त्याच्या छाताडावर नाचू लागली. शक्तीच ती. तिला कोण अडवणार? मग शंकरानं अंत:करणात अनुराग प्रवाहित केला. पार्वतीच्या पायाला गुदगुदल्या होऊ लागल्या. आदेश ओसरला आणि ती हळूहळू शंकराच्या वक्षस्थळावर विसावली. ‘टिट फॉर टॅट’ हा पण खेळाचाच एक प्रकार. जनीचे दोन हात, त्याचे चार. तो तर चक्रपाणी.

एके रात्रीचे समयी| देव आले लवलाही|
सुखशेजे पहुडले| जनीसवे गुज बोले|
गुज बोलता बोलता| निद्रा आली अवचिता|
उठा उठा चक्रपाणी| उजाडले म्हणे जनी|

तिकडे काकड आरती सुरू झाली पण देव कुठं? निवृत्तीनाथ सचिंत झाले. तेवढ्यात देव आले. त्यांनी ज्ञानदेवाला खूण केली, बोलायचं नाही. ते गप्प राहिले. देव लगबगीनं येताना गळ्यातलं पदक जनीच्या वाकळात राहिलं. राहिलं की चक्रपाणीनं मुद्दाम लपवलं? हल्लकल्लोळ माजला. देवाचं पदक चोरीला गेलं. कुणी चोरलं? जनीवर संशय जास्त. काकड आरतीला येते अन् सारखी पदकाकडे पाहत राहते.

‘ये शिंप्याच्या जनी, सांग पदक कुठेय?’

‘मला नाही माहीत.’

‘मुकाट आणून दे. समोर तर राहते. सारख्या येरझारा चालूच असतात.’

‘मी नेले नाही. सख्या विठोबाची आण.’

पण गरिबाची आण, कोण विश्‍वास ठेवणार? लोक जनीच्या घरची झडती घ्यायला निघाले. वाकळ झाडता त्यातून पदक पडलं. झालं, जनी चोरटी. चाळीस जण धावत आले तिला फरफटत वाळवंटावर घेऊन गेले. तिथं सूळ उभा केला. सुळी या जनीला काढण्या लावल्या. विठ्ठला धाव रे धाव. धाव कुठला, तो कसचा येतो? लोक टाळ्या पिटू लागले. जनीला सुळावर चढवा. चोरटी जनी. सुळी उपर सेज हमारी, खरं आहे. पण जीव जायची पाळी आली तरी पत्ता नाही. लोकांचा येळकोट चालूच.

‘जनी म्हणे विठो मेला’ आपणच तर रात्री वाकळात शिरला. पदक टाकून गेला आणि मला मात्र सुळीवर द्यायची शिक्षा. कसं वाटतंय जनी? माझ्या पायात बेड्या घालून मला कोंडतेस काय? कोऽहम? सोऽहम. आता बैस सुळावर. पण सूळ कुठंय? त्याचं तर पाणी पाणी झालं. धन्य म्हणे दासी जनी. राजा असो की रंक. राम असो की कृष्ण अथवा सम्राज्ञी जनी सगळ्यांनाच वेदनेतून वाट काढावी लागते. म्हणूनच विठू ज्याच्या पाठीवर बसून त्याच्याशी गूज करतो तो कबीर म्हणतो, ‘ये गत सबकी होती रे’ याला कुणाचाच अपवाद नाही म्हणून मग

मरोनिया जावे| शरण विठोबासी व्हावे|
देहभान पूर्ण जाय| तेव्हा हे विदेही सुख होय|
तया निद्रे जे निजले| भवजागृती नाही आले|
तेथे सर्वांग सुखी जाले| लिंग देह विसरले|
त्या एकी एक होता| दासी जनी नाही आता|

कुठे आहे जनी? जनी गेली. विठ्ठलात विलीन झाली. तर अशी ही गम्मत जम्मत! एकरूपही व्हायचं आणि चक्रपाणीला गोवर्‍या गोळा करायला लावायचं, धुणं धुवायला लावायचं आणि दळायला बसवायचं. प्रेमात हे सगळं असतं. शिव्या देणं पण असतं तितक्याच त्वेषानं.

अरे विठ्या विठ्या| मूळ मायेच्या कारट्या|
तुझी रांड रंडकी झाली| जन्मसावित्री चूडा ल्याली|
तुझे गेले मढे| तुला पाहून काल रडे|
उभी राहूनी अंगणी| शिव्या देत दासी जनी|

शिव्या द्यायच्या त्या अंगणात उभं राहून. लपून छपून नाही. परत विचारायची सोय नाही. जनी तू अस का करतेस. करते, करणारंच. नवस करू का खंडेरायाला? थांब नवसच करते.

खंडेराया तुज करिते नवस| मरू देरे सासू खंडेराया…
जनी म्हणे खंडे अवघे मरू दे| एकटी राहूं दे पायापाशी|

तिला एकटी कोण राहू देतो? चोखामेळा येतो आणि देव बाटवितो. अरे धरा धरा त्याला. जनी हसत सुटते. गाणं गाऊ लागते. ‘चोखामेळा संत भला| तेणे देव भुलविला|’ चोखोबानं विठ्ठलाचे चरण धरून त्याच्यावर उपकार केले. त्याचं महत्त्व वाढवलं. त्याचे चरण पवित्र केले. जनीला सगळी तत्त्व माहीत आहेत आणि नसतीलही. पण एक तत्त्व माहीत आहे ते म्हणजे आत्मतत्त्व! चोखा काय, गोरोबा काय, सावता काय, ज्ञानेश्‍वर काय आणि विठ्ठल काय, सगळ्यांत एकच आत्मतत्त्व भरून राहिलं आहे. त्यात भेद नाही. लहान मोठा नाही.

दळू कांडू खेळू| सर्व पाप ताप जाळू|
सर्व जिवामध्ये पाहू| एक होऊनी राहू|
जनी म्हणे ब्रह्म होऊ| ऐसे सर्वांघटी पाहू|

ईश्वरी सर्वभूतानाम्. सर्वांघटी ब्रह्म. तरीपण दळता-कांडता थकवा आला की तो घालवायला जात्यावरती गाणी म्हणावीच लागतात. त्या गाण्यांतूनच अनेक जनाबाई, बहिणाबाईंची प्रतिभा फुलत जाणार. त्या गाण्यात नवनवीन ऊर्जा धावत राहणार.

सुंदर माझे जाते गं फिरते भवती
ओव्या गाऊ कौतुके तू येरे बा विठ्ठला|
सासू आणि सासरा दीर तो तिसरा
ओव्या गाऊ भ्रतारा तू येरे बा विठ्ठला|
प्रपंच दळण दळिले पीठ भरले
सासू पुढे ठेविले तू येरे बा विठ्ठला|

येरे बा विठ्ठलाचा ठेका गुंगवणारा आहे. ‘दळिता कांडिता’ पासून ‘विठू माझा लेकुरवाळा’, ‘धरिला पंढरीचा चोर’ आणि ‘ये ग विठाई माऊली’पर्यंतची गाणी वर्षानुवर्ष लोकांच्या ओठांवर विराजमान आहेत.

अंत:करणात सतत स्पंदनं होत आहेत. अशी ब्रह्मानंदी टाळी लागल्यावर जनी कसची परत येते. नामयाची जनी सागरी मिळाली| परतोनी मुळी केवी जाय|

जनीची जातकुळी बरीच असणार पण बरीचशी अज्ञातच. ज्ञातांमध्ये महाराष्ट्राच्या बाहेरील म्हणजे कर्नाटकातील अक्कमहादेवी, तमिळनाडूची अंडाल, गुजरातची मीरा आणि बगदादची राबिया बसरावी. या सगळ्या एकमेकीच्या सख्या बहिणीसारख्या. भाव संवेदना आणि चिंतनानं परस्परांशी निगडीत असलेल्या. सगळ्या बिनधास्त. ‘पंढरीच्या पेठे मांडियले पाल| मनगटावर तेल घाला तुम्ही|’ मनगटावर तेल घालून तुम्ही बोंबलत राहा. डोईचा पदर खांद्यावर टाकून जनी पंढरीच्या पेठेत टाळ, वीणा घेऊन निघाली आहे. मी तर देवा तुझी. मला कसली लाजलज्जा? सरळ तुझ्या घरात घुसणार.

तशीच मीरा ‘बेचे तो बिक जाऊँ’. आज कल्पना करवत नाही पण त्या काळी गुलामाचा बाजार भरायचा आणि गायी, म्हशी, शेळ्या, बकर्‍यांप्रमाणे स्त्री-पुरुषांची विक्री व्हायची. मीरा म्हणते मी तुझी दासी. तू देशील ते खाईन. जिथं बसवशील, बसेन आणि मला तू विकून टाकलंस तर निमूट विकत घेतलेल्या धन्यामागं जाईन. तू सर्वाधिकारी. तुझी मर्जी सर्वोपरी. मी तर वेसवा. मला काय? ही प्रीतीची चरमावस्था आणि ब्रह्मज्ञानाचा असीम विस्तार. ब्रह्मकाय, घटकाय, सागरकाय हे सगळं आलं कुठून? पंडितांना कोड्यात टाकणारी वाणी जनानं आणली कुठून?

शून्यावरी शून्य पाहे| तयावरी शून्य आहे|
प्रथम शून्य रक्तवर्ण| त्याचे नाव अध:शून्य|
ऊर्ध्वशून्य श्वेतवर्ण| मध्यशून्य श्यामवर्ण|
महाशून्य वर्णनीले| त्यांत स्वरूप केवळ|
अनहत घंटा श्रावणी| ऐकुनी विस्मित जाहली जनी|

विस्मित व्हायचीच स्थिती आहे. जना म्हणते, बाई मी लिहिणं शिकले सद्गुरूपाशी. म्हणजे या दगडाच्या देशात रत्नाच्या खाणी उलगडून दाखवणारे सद्गुरू होते. नामा काय, चोखोबा काय, गोरोबा काय, सगळे एकापेक्षा एक. नामाचं कुटुंब चौदाजणांचं. म्हणजे चौदा रत्नं. पंधरावी जनी, महापद्म! चोखोबाची सोयराबाई, मुलगा कर्मा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका. सगळे एकापेक्षा एक. एक एक कुटुंब म्हणजे एक एक विद्यापीठ अध्यात्माचं. याची नोंद सगळी जनाकडे. ‘ज्ञानदेव अभंग बोलले ज्या शब्दा| चिदानंद बाबा लिही त्याला|’ पासून ‘चोखामेळ्याचा अनंतभट अभंग| म्हणोनी नामयाचे जनीचा पांडुरंग|’पर्यंत सगळी नोंद.

हा सद्गुरू चांगला आहे. जनीला शिकवतो आणि त्याचबरोबर तिचे अभंगपण लिहून देतो. जनी, तो लिहून देतो ते आम्ही वाचू. पण त्यानं जे शिकवलं आणि तू लिहिलंस, ते आम्ही कसं वाचावं? आम्हाला कसं कळावं? उमजावं? आणि उमजण्याच्या पलीकडचं असलं तर मग काय करावं?

ब्रह्मी जाला जो उल्लेख| तोचि नादाकार देख|
पुढे ओंकाराची रेख| तूर्य म्हणावे तिसी|
माया महतत्त्वाचे सुभर| तीन पांचाचा प्रकार|
पुढे पंचविसाचा भार| गणित केले छत्तीस|

आता हे छत्तिसाचं गणित समजून घ्यायचं असेल तर अण्णालाच विचारावं लागेल. अण्णा म्हणजे कन्नडचे महाकवी द. रा. बेंद्रे. जनीचे शब्द शब्दकोशात सापडतच नाहीत. सापडले तरी त्यांचा अर्थ कळत नाही. परत जनीला अपेक्षित अर्थ, परा पश्यंतीचा. त्याचं काय करायचं? जनी, एवढी अवघड भाषा कशाला शिकलीस? दळिता कांडिता बरं होतं ना? अरे, पण त्यात छत्तीस येतेच ना.

बारा सोला एकवीस हजार| आणिक सहाशेचा उबार|
माप चाले सोहंकार| ओळखिले बावन्न मात्रेसी|

हो बाई खरंय तुझं. पण हे तुझं गणित न्युटननं आईन्स्टाईनला विचारलं म्हणे. तर तो म्हणाला गंगाखेडच्या नानू महाराजांना विचार, ते शुद्धीवर असताना, नसता काही खरं नाही. त्याचं जाऊ दे पण आम्हाला तूच सांग. आम्ही काय करावं, म्हणजे आम्हाला तुझ्या गोवर्‍यांचा हिशेब करण्यापुरतं तरी शहाणपण येईल. ‘तर असं कर. अगदी सोपा मार्ग सांगते.’ सम्राज्ञीनं आदेश दिला.

पंढरीचा वारकरी| त्याचे पाय माझे शिरी|
होका उत्तम चांडाळ| पायी ठेवीन कपाळ|

म्हणजे पंढरीची वारी गंगाखेड ते पंढरपूर. गंगाखेडला गोदावरीत स्नान करून पायी निघायचं. नाम विठोबाचं घ्यावं. शब्द पाठी अवतरे कृपा आधी. निघायचं कसं? नाम विठोबाचं घ्यावं. मग पाऊल टाकावं.

नाम तारक हे थोर| नाम तारिले अपार|
अजामिळ उद्धरला| चोखामेळा मुक्तीस नेला|

नाम दळणी कांडणी. नाम आधी विठ्ठलाचं, मग पाऊल टाकायचं. अशी पदयात्रा. सोबतीला वाटलं तर विनोबाला घ्या. तेव्हढीच गीताई ऐकायला मिळेल, भूदान भेटेल. अशी वारी. भीमातिरी पुंडलिकाला दंडवत करा. मग नामदेवाच्या पायरीवर ठेवा माथा. तिथंच कुठंतरी असेन मी, नामयाची जनी. अजून जाणार तरी कुठं?

जनीचे बोल स्वानंदाचे डोल| स्वात्ममुखी बोल दुणावती|
शुद्ध सत्त्व कागद नित्यकारी शाई|
अखंडित लिही जनापाशी|
हांसोनि ज्ञानदेवे पिटीयेली टाळी|
जयजयकार सकळी केला थोर|

जयजयकार. जनीचा जयजयकार. भक्तीभावनेचा सर्वश्रेष्ठ आविष्कार म्हणजे प्रपत्ती किंवा शरणागती. तुकोबाराय म्हणून तर म्हणतात, ‘ठेविले अनंत तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान’. सर्व काही विठ्ठलावर सोडून द्यावं म्हणजे मग तो स्वत:हून सगळं काही, दळण-कांडण, केरकचरा, गोवर्‍या थापणं, गोळा करणं, धुणी धुणं, जनीला न्हाऊ घालणं, पाणी भरणं ही कामं निमूट करत राहतो. संपूर्ण शरणागती.

माझे दु:ख नाशी देवा| मज सुख दे केशवा|
आम्हा सुख ऐसे देई| तुझी कृपा विठाबाई|
चरणी अनन्य शरण| त्यासी नाही मरण|
जनी म्हणे हेच मागे | धण्या सर्व तुज सांगे|

जनीची निष्ठा ही अशी अनन्य आहे, म्हणून जनीचे अभंगही. जगभर संत खूप आहेत, पण

जनीचे बोलणे वाची नित्य| तयाचे अंगणी भगवंत|
जनीचिया पदा अखंडित गावे| तयाचे पायी मी वंदी माथा|
जनीचे आवडे जयासी वचन| तयासी नारायण कृपा करी|
पांडुरंग म्हणे ऐक ज्ञानदेवा | ऐसा वर द्यावा जनीसाठी|

पांडुरंगानं सांगितल्यावर ज्ञानदेव तर वर देणारच पण किती करायचं? पुरे झालं आता

आता पुरे हा संसार| कोठे फेडू उपकार|
सांडुनिया थोरपण| करी दळण कांडण|
नारीरूप होऊन हरी| माझे न्हाणे धुणे करी|
राना जाये वेची शेणी| शेखी वाहे घरी पाणी|
ठाव मागे पायापाशी| म्हणे नामयाची दासी|

पायापाशी ठाव मागायचा, पण त्या पायापर्यंत जायचं कसं?

विवेकाची पेठ| उघडी पंढरीची वाट|
तेथे नाही काही धोका| उठा उठी भेटे सखा|
मरोनिया जावे| शरण विठोबासी व्हावे|
म्हणे नामयाची जनी| देव करा ऐसा ऋणी|

जनी विवेकाची पेठ उघडणारच. कारण जनी म्हणजे ज्ञानी. ज्ञानाचा झंझावात प्रत्ययकारी प्रलयंकार. ‘निर्गुण, निर्भय गुणरे गाऊंगा’ तरी पण युगे अठ्ठावीस. अठ्ठावीसचा स्क्वेअर किती? एके ठायी म्हणजे सर्वत्र. अणूपासून ब्रह्मांडापर्यंत आणि त्याच्याही पलीकडे सर्वत्र दाटला घनदाट. रिक्त नाहीच.

फाया कुन फाया कुन
जब कहीं पे कुछ नही भी नही था वही था वही था
वो जो तुझ में समाया वो जो मुझ में समाया
मौला वही वही माया था

नासतो विद्यते भावो| ना भावो विद्यते सता| जनी आणि जनीचा विठो असून नसणार आणि नसून असणार. बसणार दोघं जातं दळीत. जन्म-मृत्यूचे दोन पाट पाहून कबीर रडणार. पण रडून तरी उपयोग काय?

चलती चक्की देखकर दिया कबीर रोय
दो पाटन के बीच में साबित बचा न कोय

रडू नको कबिरा. दोन पाटाच्या मधल्या खिट्टीजवळ काही दाणे राहतात. रामनामाची खिट्टी धरून असावे साधो,

दो पाटन के बीच में कुछ दाने रह जात
दळिता कांडिता नाम घेईन अनंता.
विठू चल ये, तू येरे बा विठ्ठला.

0 Shares
माहेरात पोरकी स्वरूपाचा पूर आला