नामदेवराया, तुम्ही हवे आहात!

सुनील यावलीकर

महाराष्ट्रात तेराव्या शतकात राज्य होतं ते कर्मकांडाचं. सर्वसामान्य माणूस विविध व्रतवैकल्यांमध्ये जखडून गेला होता. रोजचं साधं जगणंही त्याला अवघड झालं होतं. या सगळ्याच्या विरोधात संत नामदेवांनी बंडाचा झेंडा उभारला. सामान्य माणसाला जगण्याची सोपी वाट दाखवली. सांगताहेत सुनील यावलीकर...

या एकविसाव्या विज्ञानवादी शतकातही संतचळवळ जिवंत का आहे? परिवर्तनाच्या चळवळीत कार्यरत कार्यकर्त्यांना नामदेव, तुकारामांच्या खांद्यावर मान ठेवून स्वतःला हलकं का करावंसं वाटतं? आयुष्याच्या अस्वस्थ सैरभैर क्षणी संतांचे बोट का पकडावे वाटते… खूप उद्विग्न क्षणी स्वतःला अधिक क्षमाशील करताना संतच का सोबतीला असतात… याचा जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो… तेव्हा सद्यकालीन स्थितीमध्ये विज्ञानाची प्रगती, तंत्रज्ञानाचा वापर या अर्थानं झालेला विकास हा भाग जरी सोडला तरी संतकालीन मध्ययुगीन कालखंडातील स्थिती यामध्ये मानसिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक या अर्थानं खूप काही जाणवण्याइतका बदल दिसत नाही.

तत्कालीन व्यवस्थेवरचं संतांचं चिंतन, भाष्य, मुक्ततेचे उपाय हे कालातीत वाटतात. या क्षणी आपली वाट सोपी करतात. संतांची जगण्याची ही मानवीय चळवळ तेराव्या शतकात निर्माण झाली. चळवळीच्या निर्मितीची मुळे समाजव्यवस्थेमध्ये दडलेली असतात.

संतचळवळीच्या निर्मितीचा कालखंड अत्यंत विदारक असा होता. सामाजिक अवस्था अत्यंत विषमतापूर्वक होती. चातुर्वर्ण्याची चौकट घट्ट होती. सर्वत्र वैदिक धर्म आणि संस्कृत भाषेचं वर्चस्व होतं. मनुस्मृतीची आज्ञा शिरसावंद्य होती. उच्चवर्णीय वैदिक धर्माचे अनुयायी संस्कृतमधून ग्रंथ लिहीत होते. धर्माची कवाडं फक्त उच्चवर्णीय ब्राह्मणांनाच उघडी होती. शिकण्याचा वेदपठणाचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता. इतरांना ज्ञनाची कवाडं पूर्णतः बंद होती.

महाराष्ट्रात यादवांचं राज्य होतं. तेराव्या शतकात रामदेवराय राजाच्या दरबारात हेमाद्रीपंडित हा यादवांचा प्रधान होता. त्याने ‘चातुर्वर्ण्य चिंतामणी’ नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात वर्षभरात करायच्या दोन हजार व्रतांची मांडणी करून ठेवली. वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांत दोन हजार व्रतं म्हणजे दिवसाला पाच ते सहा व्रतं! या व्रतवैकल्यात बहुजन समाज पूर्णतः बुडून गेला होता. व्रतांसारख्या निष्क्रिय, निरुद्योगी कामात बहुसंख्यांकांचा मेंदू अडकून गेला होता. त्यामुळे समाजाचे प्रवाहीपण अवरूद्ध झालं होतं.

विविध कोरीव लेख आणि ग्रंथ यामधून यादवकालीन समाज कसा जीवन जगत होता याची कल्पना येते. चातुर्वर्ण्यावर आधारलेला, कर्मकांडांचे प्रभुत्व असलेला, जातीभेदांनी विभागलेला असा जो समाज होता. सर्वसामान्य माणसाला कुठलेही अधिकार नव्हते. शूद्रातिशूद्र लोकांना गावाबाहेर पशुतुल्य जगणं जगावं लागत होतं. स्त्रियांचं जीवन अत्यंत हलाखीचं होतं. अल्पवयातच लग्नं व्हायची. बहुपत्नीत्वाची चाल सर्वत्र होती. वतनदारी, ग्रामसंस्था परंपरागत पद्धतीनं चालू होती. जातीवर आधारित व्यवसाय असणारी बलुतेदारी रूढ होती. गावावर जात पंचायतीचं अधिराज्य होतं. परमार्थाचा फार मोठा पगडा होता. व्रतवैकल्यं, तीर्थयात्रा, नवस, श्राद्धविधी, यासारख्या निरर्थक गोष्टींमध्ये समाज पूर्णतः गुंतून गेला होता. निरनिराळे उपासना पंथ प्रचलित होते. भीती, अज्ञान, स्वार्थबुद्धीनं मंगळाई, जाखाई, जोखाई, म्हसोबा, बहिरोबा इत्यादी देवतांच्या भक्तीचं स्तोम माजलं होतं. मंत्रतंत्र, जादुटोणा, भुतंखेतं या गोष्टींचा भयप्रद पगडा समाजावर होता. शकुन-अपशकुन, शुभाशुभ यावर लोकांची गाढ श्रद्धा होती. दैवी कृपा प्राप्त करण्यासाठी, अरिष्ट टाळण्यासाठी वाटेल ते करण्याची लोकांची तयारी होती. यज्ञ, जप, तप, अनुष्ठान सतत चालत असे. अंधश्रद्धेच्या गर्तेत समाजजीवन बुडालं होतं.

न्यायव्यवस्था कुठेच नाही. आर्थिक दुरवस्था, सामाजिक चारित्र्याचा ऱ्हास, स्थिरता नाही या कारणांनी समाज अत्यंत हलाखीत जगत होता. अत्यंत भयग्रस्तता आणि त्यातून आलेली असुरक्षितता यांच्या सावटात समाजजीवन होतं. अशा स्थितीत दिलासा देणारं सामाजिक, राजकीय स्तरावरचं कोणतंही नेतृत्व नव्हतं. समाजाचं हे चित्र बदललं पाहिजे, अंधारलेल्या वास्तवात प्रकाश पेरला पाहिजे… असं कृतीशील चिंतन समाजाबद्दल कळवळा असणारी व्यक्तीच करू शकते… हे कृतीशील चिंतन तेराव्या शतकात संत नामदेवांनी केलं.

अंधारलेल्या स्थितीतून समाजाला बाहेर काढण्याची तळमळ नामदेवांना लागून राहिली. धर्म हे समाजजीवनाचं केंद्र होतं. धर्माचं खरं स्वरूप सामान्य जनतेला दाखवावं, मानवतेला अनुसरणारी भक्ती हे चारित्र्याचं साधन बनवावं, हे त्यांना वाटलं. नामदेवांच्याच समकालीन असलेले संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतची मिरासदारी मोडून काढत सर्वसामान्य जनतेच्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. संस्कृत भाषेतलं ज्ञान जर शूद्रातिशूद्रांच्या कानात पडलं तर कानात तप्त शिश्याचा रस ओता…अशी अघोरी तरतूद मनुआज्ञेमध्ये होती… त्या काळी प्रस्थापित धर्मव्यवस्थेच्या विरोधात ही मोठी बंडाळी होती. या बंडाचा झेंडा मोठ्या ताकदीनं नामदेवांनी आपल्या खांद्यावर घेतला.

परिवर्तनाचं काम हे एकट्यादुकट्याचं काम नाही. त्यासाठी सर्व समविचारी एका ध्येयाने प्रेरित झालेल्या परिवर्तनाची आस असणाऱ्या सर्वांना सोबत घेऊन नामदेवांनी सामूहिक कृतीशील चळवळ सुरू केली. या सामूहिक नेतृत्वाच्या चळवळीमध्ये नामदेवांनी संत गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी, चोखामेळा, बंका मेळा, सोयराबाई, जनाबाई यांना सोबत घेतलं.चातुर्वर्ण्याच्या चौकटीत बद्ध असलेल्या, मनुआज्ञा पाळण्यात धन्यता मानणाऱ्या समाजव्यवस्थेमध्ये शुद्रातिशूद्र म्हणून हिणवल्या जाणाऱ्या अतीसामान्य जीवन जगणाऱ्या माणसांमध्ये मानवमुक्तीचा विचार बिंबवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास पेरून आत्मभानाची चळवळ उभी करणं हे तत्कालीन धर्मव्यवस्थेविरुद्ध प्रचंड मोठं बंड केलं.

समाजात पिढ्यानपिढ्या रुजलेल्या, चुकीच्या परंपरांना नकार देताना खळखळ होतेच. समाजाला एक गोष्ट नाकारताना दुसरा पर्याय हवा असतो. तो पर्याय विठ्ठलाच्या रूपानं नामदेवांनी समाजापुढे ठेवला. परंपरेतून आलेले विविध देवीदैवतं, शस्त्रधारी देव, बहिरोबा, जाखी, जोखाई यांसारख्या दैवतांच्या जळमटात अडकलेल्या समाजाच्या समोर त्यांनी नि:शस्त्र असलेला, कमरेवर हात ठेवून उभा असलेला विठ्ठल हा पर्याय ठेवला. चातुर्वर्ण्य नाकारलेल्या, प्रेम, आदर, भूतदया, परोपकार, नैतिकमूल्य यांवर उभा असणाऱ्या समाजाचं प्रतीकात्मक रूप म्हणजे विठ्ठल.
या विठ्ठलावरची भक्ती म्हणजे या आदर्श समाजव्यवस्थेची भक्ती. या भक्तीचं ओलं रूप वारकरी संतचळवळीतील सर्व कार्यकर्त्या संतांच्या बोलीतून जागोजागी वात्सल्यानं, आदरानं फुलताना दिसतं. आदर्श समाजव्यवस्थेबद्दल फुलणारी अभंगवाणी कर्मकांडाबाबत, दंभाबाबत मात्र अंगार बनताना दिसते. सामाजिक, धार्मिक पाखंडावर तुटून पडताना ही वाणी आक्रमक बनते.
नामदेवांच्या मांदियाळीतील चोखामेळा ढोंगी साधूंबद्दल आक्रमक होतात.

‘माकडाचे परि हालविती मान। दावी थोरपण जगामध्ये।।
स्वहिता मुकले, स्वहिता मुकले। बळी झाकी डोळे नाक धरी।।
माळा आणि मुद्रा दाविताती सोंग। डोलविती अंग रंग नाही।।
पोटाचा पोसणा विटंबना करी। भीक दारोदारी मागितले।।
चोखा म्हणे जगामध्ये भोंदू। तया कोण साधू म्हणे देवा।।’

नामदेवांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ या प्रतिज्ञेनं आयुष्यभर शूद्रातिशूद्रांच्या प्रबोधनाचं कार्य केलं. देव दगडात नाही. तो माणसांच्या सेवेत आहे. माणसांची सेवा करा. हा मानवतावादी दृष्टिकोन दिला. लोकांना आपल्या धार्मिक, सामजिक, सांस्कृतिक, अधिकारासाठी प्रचलित धर्माच्या विरोधात लढण्यास तयार केलं. व्रतवैकल्यं, धनदक्षिणा, यज्ञयाग, तीर्थभेटी, ब्राह्मणभोजन या कर्मकांडांतून बाहेर काढलं. वारकरी चळवळीचं लोन त्यांनी महाराष्ट्राबाहेर नेलं. कबीर, रविदास, मीराबाई आदी उत्तर भारतीय संतांनी त्यांचा गौरव केला आहे.

वारकरी चळवळीतील संतांचा सन्मान स्वतःपेक्षा त्या संतांना मोठेपणा देऊन नामदेवांनी केला. स्त्रियांना कुठलाही अधिकार नसण्याच्या काळात जनाबाईंना त्यांनी आपल्या घरी ठेवलं. त्यांचा सांभाळ केला. जनाबाईंच्या अभंगांना संतचळवळीमध्ये मानाचं स्थान आहे. चोखामेळ्याच्या अस्थी मागवून पंढरपूरला देवळाशेजारी त्यांची समाधी बांधली. प्रचलित धर्ममार्तंडांच्या विरोधात जाऊन वारकरी चळवळीचा झेंडा आपल्या खांद्यावर वाहून नेणाऱ्या संतांचा सन्मान त्यांनी केला.

व्यक्तिगत जीवनामध्ये भावनेनं ओथंबलेल्या मानवीय संवेदनांनी जगणारे नामदेव समाजातील दंभाबाबत आक्रमक होतात. तिथे ते कोणाचीही भीडमुर्वत ठेवत नाहीत.

जाखाई, जोखाई, बहिरोबा यासारख्या दैवतांची बजबजपुरी माजली असताना…. सर्व समाज दैवशरण होऊन शेंदूर माखलेल्या दगडातच देव शोधत आयुष्य नासवण्याच्या वृत्तीबद्दल कोरडे ओढताना त्यांची वाणी आक्रमण होते.

‘देव दाखवी ऐसा नाही गुरू। जेथ जाय तेथे दगड शेंदरू।।
देव दगडाचा बोलेल कैचा। कोणे काळी त्यास फुटेल वाचा।।
देव देव करिता शिणले माझे मन। जेथ जाय तेथे पुजा पाषाण।।

क्रांतिकारी संत गाडगेबाबांनी नामदेवांच्या या अभंगाचं बोट धरून आपल्या कीर्तनातून या विसाव्या शतकात समाजाचं प्रबोधन केलं. आजही या स्थितीत खूप बदल झालेला नाही. समाजामध्ये वाढलेली बुवा, साध्व्यांची संख्या, वाढलेली तीर्थक्षेत्रं, तेथील बोकाळलेला भ्रष्टाचार, तथाकथित भक्तांची वाढलेली संख्या या अवैज्ञानिक मानसिकतेवर चपराक हाणणारा हा अभंग आहे. ‘दगडात देव नाही तो माणसातच आहे’ हे नामदेव काकुळतीनं सांगतात. ‘वेदांचे महिमान – जनी जनार्दन। आणिक वचन तेथे नाही।।’ पुढे ते सांगतात,

‘पाषाणाचा देव बोलेचिना कधी। हरी भव व्याधी केवी घडो।।
दगडाची मूर्ती मानिल ईश्वर। परितो साचार देव भिन्न।।
दगडाचा देव इच्छा पुरविती। तरी का भंगत आघाताने।।
पाषाण देवाची करिती जे भक्ती। सर्वस्व मुकती मूढपणे।।
प्रस्तराचा देव बोलत भक्ताते। सांगते ऐकते मूर्ख दोघे।।’
ऐशांचे माहात्म्य जे कां वर्णिताती। आणि म्हणविती तेणे भक्त।।
धोंडापाण्याविना नाही देव कोठे। होता सान मोठे तीर्थक्षेत्र।।
तो देव नामया हृदयी दाविला। खेचराने केला उपकार।।

जाखाई जोखाई उदंड दैवते। वादुगेची व्यर्थ श्रमतोसी।।
नामा म्हणे ऐसे बहु झाले भांड। उच्चारी लंड नामवाचे।।

नानापरिची दैवते। बहु असती असंख्याने।।
सेंदूर शेरणीजी इच्छिती। ती काय आर्त पुरविती।।
नाना धातूंची प्रतिमा केली, षोडोपचारे पुजा केली।।
दुकळी विकून खादली। ते काय आर्त पुरविती।।

तीर्थयात्रा हा निरर्थक उद्योग आहे. याबद्दल नामदेव म्हणतात,
‘तीर्थाशी जाऊनी काय म्या करावे।
वाउगे हिंडावे पंथे तेणे’

काय करूनी तीर्थाटने। मन भरीले अवगुणे
काय करावे ते तप। चित्ती नाही अनुताप

असत्याचे मळ बैसले ये वाचे।
ते न फिटती साचे तीर्थोदके।।

आजही वेगवेगळ्या माध्यमांतून मध्ययुगीन कालखंडातील भंपक व्रतांचे महात्म्य समाजाच्या गळी उतरवले जाते. समाज व्रतवैकल्यात बुडाला आहे. अनेकांच्या हाती धागे-दोरे, गंडे, ताईत दिसतात. यावर नामदेव सुनावतात – ‘व्रततप न लागे करण सर्वथा। न लग तुम्हा तीर्था जाणे।।
विविध चॅनेल्समधून बुवा, साध्व्यांची निरर्थक आध्यात्मिक बडबड ऐकू येते. वैज्ञानिक साधनांचा उपयोग अवैज्ञानिक बाबींचा प्रचार, प्रसार करण्यासाठी केला जातो. सभोवताली सत्संगाचं पीक आलं आहे. त्यातून भंपक उपदेश केला जातो. अशा ढोंगी वृत्तीवर नामदेव आपल्या अभंगातून तुटून पडतात.

‘बकाचिये परि ध्यानस्थ राहिला
जीविचा जिव्हाळा वेगळाची।’

पापिष्ठांचे जीणे काय ते जियाले।
गळा स्तन आले शेळीयाचे।।
येथेचि जो खोटा, तेथे तो करंटा।
व्यर्थ आला पोटा माऊलीच्या।।

डोई बोडून केली खोडी। काया वागविली बापुडी।।
ऐसा नव्हे तो संन्यास। विषय देखोनी उदास।।
नामा म्हणे वेष पालटे। परि अंतरिचे ओशाळपण न तुटे।।

काय थोरपण मिरविसी व्यर्थ।
खोटेपण स्वार्थ कळो आले।।

चंद्रसूर्यादी बिंबं, लिहिताती सांग।
परि प्रकाशाचे अंग लिहिता नये।।
संन्याशाशी सोंगे आणिताती सांग।

परि वैराग्याचे अंग आणिता नये।।
नामा म्हणे कीर्तन करीताती सांग।
प्रेमाचे ते अंग आणिता नये।।

मुखी नाम हाती टाळी। दया नुपजे कोणे काळी।।
काय करावे ते गाणे। धिक् धिक् ते लाजीरवाणे।।
वरीवरी आर्त दाविती झगमग। अंतरी तो संग विषयाचा।।
व्यर्थ लोकांपुढे हालविती मान।
विटंबन केली संसाराची।।

***

लाखो रुपयांची बिदागी घेऊन कीर्तन करणारे महाभाग आज मोठ्या प्रमाणात आहेत. या वृत्तीचा परखड समाचार नामदेव घेतात.
‘द्रव्याचिये आशे हरिकथा करी।
तया यमपुरी नित्यवास।।
नामा म्हणजे ऐसे होत जे रे कोणी।
ते नर नयनी पाहु नये।।’

जातीवर माणसाचं श्रेष्ठपण वा कनिष्ठपण अवलंबून नसतं. याविषयी आपल्या अभंगात नामदेव सांगतात,
‘काक विष्ठेमाजी जन्मे तो पिंपळ। जया अमंगळ म्हणो नये।।
नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी। उपमा जातीची देवो नये।।’
खऱ्या संतांचं आणि सज्जनाचं वर्णन नामदेव करतात,
‘संतांचे लक्षण ओळखाया खूण। जो दिसे ते उदासिन देहभावा।।’

‘जैसे वृक्ष नेणे मान अपमान। तैसे ते सज्जन वर्तताती।।’
‘भोगावरी आम्ही घातला पाषाण। मरणा मरण आणियले।।’
‘निंदील हे जन सुखे निंदू द्यावे। सज्जनी शोभावे नये बापा।।’

दुर्जनांचं वर्णन त्यांनी एका अभंगात केलं आहे.
दुर्जनाची बुद्धी वोखटी दारूण। आपण मरून दुज्या मारी।।
माशी जाता पोटी मेली तेचि क्षणी। प्राण्या ओकवुनी कष्टी करी।।
दीपकाची ज्योती पतंग नासला। अंधार पडला जनांमध्ये।।

श्रीकृष्णलीलांच्या निमित्तानं त्यांनी जे काही अभंग लिहिलेत ते बालगीतांचा उत्कृष्ट नमुना आहेत. या अर्थानं नामदेव मराठीतील आद्य बालकवी ठरतात.
नामदेव ऐंशी वर्षांचं दीर्घ चळवळं आयुष्य जगले. त्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमंती करून देशातील समाजजीवनाचं सूक्ष्म अवलोकन केलं. त्या काळातला त्यांचा पंजाब प्रांतापर्यंतचा प्रवास स्तिमीत करणारा आहे. त्यांनी हिंदीमध्ये पदरचना केली. शिखांच्या पवित्र गुरूग्रंथसाहिबमध्ये त्यांची पदं आहेत. महाराष्ट्राबाहेर आपल्या कर्तृत्वाची, कवित्वाची द्वाही फिरवणारे नामदेव एकमेव महाराष्ट्रीय संत आहेत. विश्वात्मक झाल्याशिवाय एवढं सगळं शक्य होत नाही. नामदेवांच्या संतत्वाला, कवित्वाला, कर्तृत्वाला विश्वात्मकतेचा पाया आहे.

वारकरी चळवळीतील विद्रोही संत तुकाराम आपल्या कार्याची प्रेरणा नामदेव आहेत, असं नम्रपणे सांगतात. नामदेवांचं आणि तुकारामांचं काळाचं अंतर तीनशे वर्षांचं. इतक्या दीर्घ कालानंतरही हा विचार प्रवाह प्रवाहित राहतो. त्यानंतर एकविसाव्या शतकातही तो प्रवाहित राहतो. याचं कारणच मुळी ही चळवळ समाजकेंद्री आहे. सर्वसामान्य, संवेदनशील व्यवस्थेत समायोजित न होऊ शकलेल्या उपेक्षित माणसांना दिलासा देणाऱ्या मानवी मूल्यांच्या पायावर ती उभी आहे.

सद्यकालीन स्थितीमध्ये वारकरी चळवळीचं रूप हे पंथीय वळणाचं झाले आहे. थोरांच्या विचारांचा पराभव त्यांचे तथाकथित अनुयायी करत असतात. हे सर्वच महापुरुषांच्या बाबत झालं आहे. संतांनी जी व्यवस्था नाकारली… जे कर्मकांड नाकारलं त्याच व्यवस्थेत त्यांना अडकवून त्यांच्या विचारांचा पराभव करण्याचं काम सुरू आहे. हे जरी खरं असलं तरी, ‘त्यांचे गळा माळ असो नसो’ या वृत्तीनं मानवी मूल्य घेऊन जगणारी संवेदनशील माणसं नामदेवांच्या वारकरी बंडाचा अदृश्य झेंडा अभिमानानं आपल्या खांद्यावर घेऊन वाटचाल करताहेत. ही नामदेवांचं बंड धगधगत असल्याची खूण आहे.

0 Shares
वारकरी सिंपियाचा पोर एक खेळिया