एका गाथेची वाटचाल

डॉ. मंगला सासवड

‘उपलब्ध नामदेव गाथेचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर पीएचडी असणाऱ्या जुन्नर येथील अभ्यासक डॉ. मंगला सासवडे यांनी नामदेवांचे अप्रसिद्ध ४० अभंग शोधून काढले आहेत. आज आपल्यासमोर असलेल्या नामदेव गाथेचा प्रवास त्यांनी या लेखातून मांडला आहे.

ज्ञानदेवांनी लावलेल्या इवल्याशा भक्तीच्या रोपट्याचं फळाफुलांनी बहरलेल्या विशाल वृक्षात आज जे रूपांतर झालं, ते नामदेवांच्या गगनाला गवसणी घालणाऱ्या प्रतिज्ञांच्या पूर्ततेनीच. त्यांनी जगी ज्ञानदीप लावण्याचं, भक्तीप्रसाराचं व्रत अविरत आचरण करत सारा उत्तर भारत ज्ञानप्रकाशानं तेजस्वी केलेला दिसतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची ती शतकोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा.

वाल्मिकीनं शतकोटी ग्रंथ रामायण केला, हे नामदेवांनी चंद्रभागेकाठी ऐकलं. त्यांना आतापर्यंत आपण काहीच न केल्याचं दुःख वाटू लागलं. त्यातूनच त्यांनी विठ्ठलापुढे शतकोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा केली.

‘असेन मी खरा तुझा भक्त देवा।
सिद्धीस न्यावा पण माझा।।’

असं विनवू लागले. ‘वाल्मिकीचा काळ वेगळा होता, ते दीर्घायुषी होते, आता आयुष्याचा काळ थोडा आहे’, असं म्हणत विठ्ठल त्यांची समजूत घालू लागले. तर नामदेव ‘जिव्हा उतरीन तुजपुढे।।’, असं म्हणू लागले. तेव्हा देवानं सरस्वतीला नामदेवांना स्फूर्ती देण्यास सांगितलं. भक्ताच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी स्वतः विठ्ठलच नामदेवांचे अभंग लिहिण्यास बसले. मला अभंग लिहिण्याची, अभंग करण्याची कला काहीच माहीत नाही, असं म्हणतानाच ते अभंगाच्या छंदाची व्याख्याच सांगून जातात. जन्मपत्रिकेच्या अभंगात बाबाजी नावाच्या ब्राह्मणानं जन्मपत्रिका लिहिल्याचा उल्लेख आहे. त्यातही नामदेव म्हणतात,

प्रसवली माता मज मलमूत्री। तेव्हा जिव्हेवरी लिहिले देवे।
शतकोटी अभंग करील प्रतिज्ञा। नाम मंत्रखुणा वाचुनी पाहे।।

त्यांचा परिवार आणि स्वतः श्रीरुक्मिणी पांडुरंगाने केलेल्या अभंगांची संख्या दर्शविणारा पुढील अभंग हस्तलिखिताच्या पंढरपूर प्रतीत आहे. काळाच्या प्रवाहात एवढे अभंग हाती लागणं शक्यच नाही. तरीही नामदेवांनी शतकोटी अभंगांचा जो हिशेब इथे सांगितला आहे, तोही लक्षणीय आहे.

नामयाचा संकल्प झाला शतकोटी। पूर्व पुण्य शेवटी कैसे झाले ।।१।।
पिता दामुशेटी अभंग दोन कोटी। भक्ती भावे ताटी नैवेद्य देवा ।।२।।
तीन कोटी अभंग गोणाईचा संवाद। आत्मसुख बोध सुखाचा तो ।।३।।
चार कोटी अभंग राजाईची वाणी। प्रेमाची ते खाणी, प्रेमळ ते ।।४।।
एक कोटी अभंग लक्ष झाले सोळा। प्रेमाचा जिव्हाळा आऊबाई ।।५।।
पंचाहत्तर लक्ष लिंबाईचे करुणा। प्रेमे नारायणा आळविले ।।६।।
तीन कोटी अभंग विठ्याचा झगडा। प्रेमाचा रगडा, प्रेमळ तो ।।७।।
चार कोटी अभंग नारोबाचे कवित्व। उगवे स्वहित दानमात्र ।।८।।
गोंदा आणि महादा बोलिले शेवटी। अडीच अडीच कोटी केले त्याने ।।९।।
लाडाई येसाई येसा साखराई। दीड दीड कोटी पाही केले तेणे ।।१०।।
एक कोटी पांडुरंगे केले। रुकमाईने केले पन्नास लक्ष ।।११।।
साडेबारा कोटी जनाईची वाणी। प्रेमाची ते खाणी, प्रेमळ ते।।१२।।
दळिता कांडिता वाहता शेणपाणी। येती चक्रपाणी तिच्या घरी ।।१३।।
चौपन्न कोटी अभंग केलेत प्रत्यक्ष। कवित्व हे खास नामयाचे ।।१४।।
नामा म्हणे आई निवड केली निकी। राहिले ते बाकी चार कोटी ।।१५।।

नामदेवांचा संपूर्ण परिवार, पंधरावी दासी जनी, प्रत्यक्ष विठ्ठल आणि रुक्मिणी या सर्वांनी केलेल्या या अभंगांची ९६ कोटी संख्या इथे सांगितली आहे. नामदेवांनीच पुन्हा संत तुकाराम असा अवतार घेऊन उरलेले चार कोटी अभंग लिहिल्याची मान्यता आहे. वारकरी संप्रदायात ‘ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका’ म्हणजे ज्ञानदेवांचा एकनाथ आणि नामदेवांचा तुकाराम अवतार आहेत, अशी श्रद्धा आहे. म्हणून राहिलेले अभंग तुकारामांनी पूर्ण केल्याचा एका अभंगात तुकारामांनीच उल्लेख केला आहे. प्रसिद्ध बारा अभंगात ते सांगतात,

चार कोटी एक लक्षांचा शेवट।
चौतीस लक्ष स्पष्ट सांगितले।।
सांगितले तुका कथोनिया गेला।
बारा अभंगाला सोडू नका।।

तरीही सातशे वर्षांच्या कालप्रवाहात एवढे अभंग टिकणे, हाती लागणे शक्यच नाहीत. नामदेवांची पाच हजारांच्याही आतच अभंगसंख्या विविध निकषांनी, मतमतांतरातून प्रक्षेप, आक्षेपातून विविध संपादकांच्या प्रतींमधून वेगवेगळी हाती लागते. हा सर्व प्रवास कसा झाला? तेच आपणास आता अभ्यासून संशोधन करताना हाती आलेली नामदेव गाथेची वाटचाल या लेखात सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे.

हस्तलिखिते

नामदेवांच्या अभंगांचं विविध बाडांमधून हस्तलिखितातून दर्शन घडतं. या हस्तलिखितांच्या वह्यांमधील अभंगांचं संपादन इ.स.१८९२पासून छापील स्वरूपात झालेलं दिसून येतं. हस्तलिखितांमध्ये पंढरपूर प्रत, शिरवड प्रत, धुळे प्रत इ. बाडं मिळतात. प्रस्तुत लेखिकेस संशोधन करताना पंढरपूरला चातुर्मास्ये महाराज यांच्या मठात आणि वेळापुरे घराण्यात नामदेव मंदिरात काही हस्तलिखित वह्या मिळाल्या. त्यांचा अभ्यास करताना नवीन ३५ अभंग उपलब्ध झाले, जे इतर कोणत्याही वह्यांमध्ये, छापील ग्रंथांमध्ये नाहीत. धुळे येथील बाडांमध्येही ५ अभंग नव्यानं उपलब्ध झाले आहेत.

मुद्रण कला विकसित झाल्यावर वेगवेगळ्या संपादकांनी हस्तलिखितांमधील अभंगांचं त्यांच्या पद्धतीनं संपादन केलेल्या गाथांचं स्वरूप थोडक्यात असं आहे.

१. श्री. तुकाराम तात्या घरत प्रत

ही सर्वात जुनी अशी नामदेव गाथेची प्रत तुकाराम तात्या घरत यांनी संपादन करून १८९४ व तत्पूर्वी १८९२ साली सांप्रदायिक अभंग गाथा प्रकाशित केली. ‘नामदेवांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील व समकालीन साधुंच्या अभंगांची गाथा’, असं शीर्षक दिलं असून, ती तत्त्वविषयक छापखाना यांनी मुंबईहून प्रकाशित केली. यामध्ये जनाबाईंसह नामदेवांची २५४८ व एकूण ३१४८ एवढी अभंगसंख्या आहे. हिंदुस्थानी पदं १०६ आहेत. अभ्यास करताना चुकीचे उल्लेख, अपूर्णता, प्रक्षेप काही प्रमाणात आढळले तरी, सर्वात जुनी प्रत म्हणून वैशिष्ट्य आणि महत्त्व आहेच. त्याकाळात किंमत ४ रुपये ठेवून सर्व नामदेवभक्तांना ती सहज प्राप्त व्हावी, अशी संपादकीय दूरदृष्टी दिसून येते. नामदेव हेच आद्य अभंगरचनाकार हे संपादकांनी विविध उदाहरणांसह सिद्ध केलं आहे.

२. गोंधळेकर प्रत

ही गाथा गोंधळेकरांनी पांडुरंग विनायक गोडबोले यांच्या साहाय्यानं वाढवून आणि शुद्ध करून पुणे, शनिवार पेठ, मेहुणपुरा इथे ‘जगदहितेच्छु’ छापखान्यात १८९६ साली प्रकाशित केली. या गाथेत एकूण अभंगसंख्या १६२५ एवढी आहे.

३. आवटे प्रत

आवटे यांनी १९०८ साली विजयादशमीला ही गाथा प्रकाशित केली. यामध्ये नामदेवांचे २४२६ अभंग, १०१ हिंदी पदं आहेत. १९५३ सालच्या चौथ्या आवृत्तीत २३०५ व १०२ हिंदी पदं आहेत. यातही प्रक्षिप्त असं नामदेवांनंतर होऊन गेलेल्या संत कबीर, कमाल, नरसी मेहता यांचं चरित्र आणि नामदेव चरित्राचा विवाद्य असा ५६ चरणी अभंग आहेच. उठून दिसावीत अशी वैशिष्ट्यं नाहीत.

४. जोग प्रत

जोग यांनी संपादित करून १९३१ साली पुणे येथील चित्रशाळा प्रकाशनाने प्रकाशन केलं. यात एकूण अभंगसंख्या २३७१ एवढी आहे. विविध प्रक्षिप्त अभंग तर आहेतच, प्रस्तावनेत नामदेवांचं आयुष्य अवघं २६ वर्षांचं लिहिलं. अशा आक्षेपार्ह उणिवा आहेतच.

५. सुबंध प्रत

प्र. सी. सुबंध यांनी १९४९ ते १९६२ या काळात ‘श्री नामदेवरायांची सार्थ गाथा’ या ग्रंथाचे एकूण सहा भाग प्रकाशित केले. सर्व भागांत मिळून एकूण नामदेवांचे २०००, जनाबाईंचे ३३२, परिसा भागवतांचे १९, परिवाराचे १०० अभंग आहेत. सर्व मांडणी, संपादन अभ्यासपूर्ण, त्यांच्या चौफेर व्यासंगाचं दर्शन घडवतं. ५६ चरणी विवाद्य अभंग नाही, हे या गाथेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.

६. श्री. नानामहाराज साखरे प्रासादिक प्रत

एकूण २३७३ अभंगसंख्या असलेली ही गाथा श्री सकल संत गाथेचाच एक भाग आहे. शीर्षक ‘श्री नानामहाराज साखरे प्रासादिक श्री नामदेव गाथा’, असं आहे. विवाद्य ५६ चरणी अभंग नाही हेच वैशिष्ट्य. बाकी सर्व पारंपरिक पद्धतीचं संपादन आहे.

७. जोग प्रत

सटीप गाथेची ह. भ. प. जोग पद्धतीनं शुद्ध केलेली ही प्रत ‘ज्योत्स्ना प्रकाशन, दिल्ली’ येथून प्रकाशित झाली. एकूण २३७१ अभंगसंख्या आहे. आक्षेपार्ह ५६ चरणी अभंग वगैरे उणिवा आहेतच.

८. शासकीय प्रत

प्राचार्य सोनोपंत मामा दांडेकर अध्यक्ष असलेल्या संपादक मंडळाकडून सरकारनं १९७० साली ही अभंगगाथा प्रकाशित केली. २५ पृष्ठांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना असून, विविध हस्तलिखितांबद्दल चर्चा आहे. हिंदी शब्दकोष आणि हस्तलिखितांचे नमुने दिले आहेत. आक्षेपार्ह उणिवा असणारे अभंग यात नाहीत हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. नामदेवांची एकूण अभंगसंख्या २३३७ आहे. संत जनाबाई आणि परिवाराचे अभंगही आहेत. नामदेवचरित्र, जन्मस्थान, जन्मकाल, जन्मकुंडली, घराणे, नामदेवांचे कार्य व महत्त्व, तीर्थावळी इ. प्रभुत्व बाबींचा संशोधनपर विचार आणि महत्त्वपूर्ण चर्चा आहे. १९५९ साली मामा प्रमुख संपादक, अध्यक्ष असलेली समिती स्थापन झाली आणि १९७० साली गाथा प्रकाशित झाली. प्रमाणगाथा म्हणून या प्रतीचं महत्त्व आहेच.

९. डॉ. रा. चिं. ढेरे संपादित सकल संतगाथा

१९८३ साली डॉ. ढेरे यांनी पुण्यास वरदा प्रकाशनकडून १९२४ सालच्या त्र्यं. ह. आवटेंच्या ‘गाथापत्र’ या सकल संतगाथेचं पुनर्मुद्रण केलं आहे. वेगळं असं कोणतंच वैशिष्ट्य नाही. एकूण अभंगसंख्या २३२४ असून आक्षेपार्ह ५६ चरणी अभंगही समविष्ट आहेत.

१०. प्र. द. निकते प्रत

पंढरपूर येथील प्रकाश दत्तात्रय निकते यांनी ४ मार्च २००० साली संत नामदेव सेवा मंडळातर्फे ‘संत शिरोमणी श्री. नामदेव महाराज यांच्या अभंगांची गाथा’ या शीर्षकानं संपादन करून, नामदेव गाथा प्रकाशित केली. त्यामध्ये ४१ प्रकरणांमधून ७६१ पृष्ठांची ही नामदेव गाथा अतिशय उत्कृष्ट अशा स्वरूपात प्रकाशित केली आहे. हिंदी पदावलीसह एकूण अभंगसंख्या २३३७ एवढी आहे. अप्रकाशित अभंग, आरती अभंगांचं स्पष्टीकरण, लेख आणि पंढरपूर येथील भागवताचार्य वा. ना उत्पात यांचा ‘श्री संत नामदेवांचे पसायदान’ हा दीर्घ उत्तम लेख हे ही या गाथेचे वैशिष्ट्य आहे. तसंच नामदेवांच्या स्फुट अभंगांचं सार्थ स्पष्टीकरण ह. भ. प. चंद्रशेखर एकनाथमहाराज देगलूरकर यांनी प्रदीर्घ लेखातून केलं आहे. शेवटी अभंगसूची आहे. सर्वात शेवटी नामदेव महाराज यांच्याविषयी ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकोबाराय व निळोबाराय यांनी केलेले अभंग दिले आहेत. उत्कृष्ट छपाई, प्रस्तावना, अभ्यासात्मक प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक लेख, आक्षेप-प्रक्षेपरहित अभंग, इ. वैशिष्ट्यांमुळे ही गाथा अभ्यासकांना, भाविकांना, संशोधकांना उत्तम मार्गदर्शन करणारी ठरली आहे.

११. ह. भ. प. श्री पांडुरंगमहाराज धुले प्रत

मु. तुकारामवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे येथील ह. भ. प. श्री. पांडुरंगमहाराज धुले यांनी ‘श्री संत तुकाराम महाराज वाङ्मय, प्रकाशन संस्था, श्रीक्षेत्र आळंदी’ या प्रकाशनानं, नामदेव महाराजांची गाथा संपादन करून २२ नोव्हेंबर २००० साली प्रकाशित केली. नामदेवांचे एकूण अभंग २४२९, परिवाराचे आणि जनाबाईंचे तसंच विसोबा खेचरांच्या अभंगांचाही समावेश आहे. तसंच पंढरपूर प्रत, गंगावने बाड व शिरवड प्रतीतील अप्रकाशित अभंग आहेत. शेवटी वर्णानुक्रमणिका आहे. पौराणिक कथानकांचे अभंग दिल्यामुळे, अभंगसंख्या जास्त आहे. आधार सरकारी गाथेचा घेतल्यामुळे संपादन व्यवस्थित व आक्षेपरहित झालेलं आहे.

१२. डॉ. अशोक कामत प्रत

पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाचे माजी प्रमुख डॉ. अशोक कामत यांनी ‘गुरुकुल प्रतिष्ठान, पुणे’ या संस्थेतर्फे ‘संत नामदेव गाथा’ याचे जुलै २००७मध्ये संपादन करून प्रकाशित केली. डॉ. कामतांची प्रस्तावना अतिशय अभ्यासपूर्ण आहे. त्यात तेरावे शतक, समाजजीवन, नामदेवांचं जीवनचरित्र, संत नामदेवांची काव्यसंपदा, उपलब्ध नामदेव गाथा, डॉ. सौ. मंगला सासवडे यांच्या प्रबंधातील विचारणीय निष्कर्ष, डॉ. सासवडे यांना संशोधनातून प्राप्त झालेले ‘नवोपलब्ध अभंग व त्यांचे महत्त्व’, विवाद्य अभंग, हिंदी रचनेचे महत्त्व, नामदेव गाथा आणि तुकाराम गाथा, नामदेव गाथेचे महत्त्व इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांची संशोधनातून चर्चा केली आहे. नामदेव गाथा पारायण करणाऱ्यांसाठी उत्तम मार्गदर्शन केले आहे. यामध्ये नामदेवांचे २१०७ + डॉ. सासवडे यांना मिळालेले नवोपलब्ध ४० अभंगांचा समावेश आहे. तसंच हिंदी २२९ पदं आणि परिवाराच्या अभंगांचा समावेश आहे. शेवटी वर्णानुक्रमणिका व मराठी कठीण शब्दांचे अर्थ दिले आहेत.

स्फुट अभंगांचे संपादन

हस्तलिखित बाडे, वह्या आणि समग्र नामदेव गाथांचे प्रकाशन या बरोबरच नामदेवांच्या स्फुट अभंगांचंही मुद्रण १८२७ सालापासून झालेलं आहे. गणपत कृपणानी यांनी शिवरात्रीचे अभंग, १८५० साली वि. स. अग्निहोत्री यांनी काही अभंग प्रकाशित केले. आजपर्यंत माधव आप्पाजी मुळे, गुरुदेव रा. द. रानडे, ज. र. आजगावकर, आचार्य विनोबा भावे, ह. श्री. शेणोलीकर, हे. वि. इनामदार इत्यादींनी अभंग श्रमपूर्वक निवडून काही संपादनं प्रसिद्ध केली आहेत. मराठी अभंगांबरोबरच नामदेवांच्या हिंदी रचनेची विविध स्फुटे, संपादने प्रकाशित झाली आहेत.

भक्तशिरोमणी नामदेवरायांची अभंगगाथा खऱ्या अर्थानं अ – भंग, अ – क्षय अशीच आहे. आज सरकारी नामदेव गाथेत २३३७ व अप्रकाशित ६१ अभंग आहेत. घरत प्रतीत जास्तीत जास्त २५४८ एवढी अभंगसंख्या आहे. उपलब्ध सर्व नामदेव गाथांचा, हस्तलिखितांचा अभ्यास करून धांडोळा घेतला असता आज नामदेवांचे अभंग अडीच हजारांच्या आसपास मिळतात. अजूनही नामदेवांच्या अभंगांची हस्तलिखिते उपलब्ध होऊ शकतील. संशोधन ही अखंड सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे भविष्यात नामदेवांच्या अभंगसंख्येत अजूनही भर पडत राहील, असं म्हणता येईल.

0 Shares
सिंपियाचें कुळीं जन्म माझा झाला विद्यापीठ झाले पंढरपूर