विद्यापीठ झाले पंढरपूर

वसुंधरा काशीकर

राष्ट्रपती डॉ. ग्यानी झैलसिंग यांच्या इच्छेनुसार पुणे विद्यापीठात संत नामदेव अध्यासन सुरू झालं. सध्या डॉ. वीणा मनचंदा या अध्यासनाच्या प्रमुख आहेत. या अध्यासनातर्फे काय उपक्रम राबवले जातात, याविषयी त्यांच्याकडून जाणून घेतलंय पत्रकार वसुंधरा काशीकर-भागवत यांनी.

२८ नोव्हेंबर २००७चा दिवस. पुणे विद्यापीठाला जणू काही पंढरपूरचं स्वरूप आलं होतं. संत नामदेवांच्या जयंतीनिमित्त हातामध्ये टाळ-मृदंग घेऊन, वारकरी संप्रदायाच्या पताका फडकवित, ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात दिंडी निघाली होती. पुणे परिसरातल्या पंचक्रोशीतले जवळपास चारशे ते पाचशे वारकरी, विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि स्वत: कुलगुरू दिंडीमध्ये सहभागी झाले होते. अगदी प्रत्यक्ष वारीत घालतात तशा फुगड्या, रिंगण वारकर्यांतनी घातलं. अभंग, भजन, गुलाल-बुक्का उधळत वारकरी विठ्ठलाचा जयघोष करीत होते. पुणे विद्यापीठाच्या इतिहासातील हा अविस्मरणीय कार्यक्रम आयोजित केला होता पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन : संत अध्ययन आणि संशोधन केंद्रानं. विद्यापीठ ही केवळ विद्वानांची मक्तेदारी न राहता ते सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचावं हाच यामागचा महत्त्वाचा हेतू… संत नामदेव अध्यासनाच्या प्रमुख डॉ. वीणा मनचंदा सांगत होत्या… नुकताच पाऊस पडून गेलेला… पुणे विद्यापीठाचा निसर्गरम्य आणि विस्तीर्ण परिसर…डॉ. वीणा मनचंदांसोबत बोलत असताना विद्यापीठ दिंडीचं दृश्य माझ्या डोळ्यासमोर मूर्तिमंत उभं राहिलं. २ नोव्हेंबर १९८५ रोजी संत नामदेव अध्यासनाची पुणे विद्यापीठात स्थापना झाली. या स्थापनेमागचा इतिहासही फार महत्त्वाचा आहे. तत्कालिन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हे पुणे विद्यापीठात पदवीदानासाठी आले होते. त्यावेळी पंढरपूरमध्ये गेले असताना संत नामदेवांच्या अभ्यासासाठी विद्यापीठात असं अध्यासन असावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्यावेळी ज्येष्ठ राज्यशास्त्रज्ञ वि. मा. बाचल यांनी पुढाकार घेऊन यासंदर्भात अर्ज दिला. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री यांनी ८ लाखांचं अनुदान देऊन संत नामदेव अध्यासनाची स्थापना केली. अशा प्रकारचं शासनमान्यता असलेलं हे भारतातील एकमेव अभ्यास केंद्र आहे. भारतातील सर्व जाती-धर्मातील संतांचा, त्यांच्या साहित्याचा आणि त्यातही केंद्रस्थानी संत नामदेवांचा अभ्यास हे या अध्यासनाच्या निर्मितीमागचं उद्दिष्ट आहे.

अनुबंध पंजाब आणि महाराष्ट्राचा

संत नामदेव हे भारतातली एकमेव संत ज्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. त्यामुळेच शीखांसाठी अत्यंत पवित्र अशा गुरूग्रंथसाहेबमध्ये संत नामदेवांचे अभंग आढळतात. अगदी राजस्थान, पंजाबमध्ये अनेक ठिकाणी संत नामदेवांची मंदिरं आहेत. पंजाबमध्ये २० वर्ष घुमान येथे संत नामदेवांचं वास्तव्य होते. ज्यावेळी २००८ साली गुरू-ता-गद्दीला ३०० वर्ष पूर्ण झाली त्यावेळी डॉ. वीणा मनचंदा यांनी पुन्हा अश्याच एका अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. संत नामदेव अध्यासन, पुणे विद्यापीठ आणि गुरूद्वारा सिंघ सभा, गणेश पेठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं गुरूद्वारा सचखंड, नांदेड आणि नरसी नामदेव भक्तियात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये पुणे विद्यापीठातील अधिकारी, नामदेव समाज, वारकरी समाज, शीख समाजातील भाविक वर्ग असे जवळपास १२० लोक सहभागी झाले होते. पुण्याहून निघून ही यात्रा पहिल्यांदा नांदेड इथल्या सचखंड गुरूद्वारामध्ये पोहोचली. त्यानंतर संत नामदेवांच्या मूळ स्थानी म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी या त्यांच्या मूळ गावी सर्व यात्रेकरू गेले. या गावात पहिल्यांदाच नामदेव समाजातील ८० वर्षांचे भाविकही यात्रेच्या निमित्तानं आले होते. संत नामदेवांच्या मूळ गावी आयुष्यात पहिल्यांदाच येत असल्यानं साहजिकच त्यांच्या आनंदाला पारवार राहिला नाही. जीवन धन्य झाल्याची भावना त्यांच्या चेहर्याावर दिसत होती. या संपूर्ण प्रवासात पंजाबी बांधवांनी सर्व यात्रेकरूंसाठी भोजन आणि निवासाची अत्यंत उत्तम अशी व्यवस्था केली होती. या यात्रेच्या निमित्तानं ७०० वर्षांपूर्वी महाराष्ट्र आणि पंजाबला जोडून राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा जो प्रयत्न संत नामदेवांनी केला त्याचे अनुबंध आजही किती दृढ आहेत याची प्रचिती प्रत्येक भाविकाला आली.

का करौं जाती, का करौं पाती

केवळ संत वांड्मयाचा अभ्यास, प्रचार आणि प्रसार असं संत नामदेव अध्यासनाचं मर्यादीत उद्दिष्ट नाही तर राष्ट्रीय एकात्मता साधणं, समाजातील संकुचित जाती, धर्म भावनेपासून समाजाला वर उचलण्याचा प्रयत्न करणं या दृष्टीनंही अध्यासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरू-ता-गद्दीच्या ३००व्या वर्षानिमित्त अध्यासनानं जवळपास ७०० शीख मंडळींना विद्यापीठात बोलावलं. गुरूग्रंथसाहेबांची मिरवणूक काढली. या मिरवणुकीत बायका-पुरुषांनी कीर्तन करता करता फेर्या. मारल्या. पंजाबी बांधवांनी तलवारबाजी करून दाखवली. गदगा, गिद्दाचे खेळ खेळले गेले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी वारकरी संप्रदायातील मान्यवर व्यक्तींना बोलावण्यात आलं होतं. आणि या सर्व कार्यक्रमाचा खर्च शीख बांधवांनीच केला हे विशेष.

अध्यासनानं ‘संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार’ही सुरू केला आहे. पहिला पुरस्कार वारकरी संप्रदायाचे ह. भ. प. श्री. प्र. द. निकते यांना देण्यात आला तर दुसरा जीवनगौरव पुरस्कार पंजाबमधल्या घुमान येथील संत नामदेवांचे उपासक, अनुयायी सरदार गुरूचरणसिंग बाबा यांना पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते देण्यात आला. अध्यासनाच्या प्रमुख डॉ. वीणा मनचंदा यांनी नामदेव गाथेचं पंजाबीमध्ये १० खंडांत भाषांतर करून खूप मोलाचं काम केलं आहे. तर अध्यासनातील प्राध्यापक दत्तोपासक यांनी नामदेव गाथेवरची टीका १० खंडांत लिहिली आहे. याशिवाय अध्यासन संत साहित्यावर दर महिन्यात एक शोधनिबंध लिहून घेण्याचा उपक्रम घेतं. आणि ही शोधनिबंधावरची पुस्तकं पुणे विद्यापीठाशी जोडलेल्या सर्व कॉलेजेसना आणि लायब्ररीजना मोफत दिली जातात. एवढंच नाही तर जे कोणी संत वांड्मयाचे चाहते आहेत त्यांच्यासाठी संत नामदेव अध्यासनात येऊन वाचन करण्याचीही सोय आहे. अध्ययन- अध्यापन, लेखन-संशोधन, शोध मार्गदर्शन, व्यापक जनसंपर्क आणि समाज संघटनासाठी सामाजिक- सांस्कृतिक प्रबोधन ही अध्यासनाची सप्तसूत्री आहे.

संत नामदेव खर्याि अर्थानं साम्यवादी संत

डॉ. वीणा मनचंदांनी सांगितलं की, संत नामदेव हे संपूर्ण भारतभर फिरले. ज्या ज्या ठिकाणी संत नामदेव गेले तिथे तिथे त्यांची स्मृतीमंदिरं उभारण्यात आली आहेत. राजस्थानमध्ये पुष्कर, जोधपूर, पाली, बिकानेर इथे संत नामदेवांची मोठमोठी भव्य मंदिर आहेत. विश्वास बसणार नाही पण, टाळ, मृदंग घेतलेल्या संत नामदेवांच्या ६-६ फूट उंचीच्या संगमरवराच्या मूर्ती या मंदिरांमध्ये आहेत. गुजरात, राजस्थान, पंजाब इथे संत नामदेवांचा मोठा शिष्यपरिवार आहे. या सर्व राज्यांमध्ये नामदेवांची ३० ते ३५ मंदिरं आहेत. हे सर्व पाहता संत नामदेव हे खर्या् अर्थानं साम्यवादी संत होते, असं म्हणावंसं वाटतं. संत नामदेवांचं हे कार्य जरी व्यापक असलं तरी त्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास एकत्रितरित्या सापडत नाही. नामदेवांचे उपासक वेगवगेळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत. म्हणूनच देशभरातील संत नामदेवांच्या शिष्यांचा शोध घेणे, त्यांच्या मंदिरांचा अभ्यास करणं, त्या त्या भाषेतील संत नामदेवांचं साहित्य गोळा करणं, नवीन हस्तलिखितांच्या प्रतींचा शोध घेणं आणि त्यावरील डॉक्युमेंटरी तयार करणं असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अध्यासनानं हाती घेतला आहे. डॉ. वीणा मनचंदा यासाठी प्रत्यक्ष राजस्थानमध्ये गेल्या. तिथल्या नामदेव समाजाचा, त्यांच्या शिष्यांचा, त्यांच्या मंदिरांचा त्यांनी शोध घेतला. आता यानंतर मध्यप्रदेशमध्ये जाऊन शोध घेण्याचा त्यांचा मानस आहे.

सर्वच संतांनी आपल्या जगण्यातून, साहित्यातून मानवता आणि प्रेम हीच सर्वश्रेष्ठ मूल्यं आहेत हे दाखवून दिलं आहे. मग ते गाढवाला गंगा पाजणारे संत एकनाथ असू देत की कुत्र्याच्या पाठीमागे तूप घेऊन पळणारे नामदेव की समाजानं एवढा छळ करूनही किंचितही कटूता न ठेवता विश्वासाठी पसायदान मागणारी ज्ञानोबा माऊली. जात, धर्म, पंथ, भाषा, वर्ण, लिंग या संकुचिततेपलीकडं जाऊन माणसाचा केवळ माणूस म्हणून विचार संतांनी शिकवला. परमेश्वर आणि भक्त यामधले दलाल काढून टाकले. संस्कृतमधलं कठीण ज्ञान सर्वसामान्यांच्या भाषेत आणलं. ‘का करौं जाती, का करौं पाती, राजाराम सेऊं दिन राती’, असं संत नामदेवांनीच गुरूग्रंथसाहेबमध्ये म्हटलं आहे. आणि म्हणूनच विद्यापीठ म्हणजे केवळ विद्वान, तज्ज्ञासांठीचं ठिकाण हा समज मोडीत काढून, संतांच्या शिकवणुकीचा केवळ पुस्तकी आणि पंडिती अभ्यास न करता सर्वसामान्य वारकर्यांसना, भाविकांना, लोकांना जोडून घेण्याचं मोलाचं काम पुणे विद्यापीठाचं संत नामदेव अध्यासन करते आहे. त्यासाठी त्यांचं निश्चितच अभिनंदन करायला हवं.

0 Shares
एका गाथेची वाटचाल वारकरी सर्वजनवादच!