थेम्सतीरावरून चंद्रभागा पाहताना

डॉ. माधवी आमडेकर

लंडनमधील खालसा कॉलेजच्या प्राचार्य डॉ. माधवी आमडेकरांनी संत नामदेवांवर पीएचडी केली आहे. युरोपातील शीख समाजात नामदेवांविषयी असणारा पूज्यभावही त्यांनी अनुभवला आहे. आठशे वर्षांपूर्वीच्या या ग्लोबल संताकडे आज थेम्सतीरावरून पाहताना नेमकं काय वाटतं याचा हा एक अनुभवपट.

मी मूळात गणिताची शिक्षिका. दादरच्या किंग जॉर्ज शाळेच्या मॉडर्न इंग्लिश स्कूलमधे शिकवायचे. आम्ही पुढे लंडनला गेलो. १९९७ सालापासून मी इथल्या खालसा कॉलेजात शिक्षिका म्हणून लागले. हळूहळू एकेक पायरी चढत मी आता २००४ पासून कॉलेजची प्रिंसिपल आहे.

खालसा कॉलेजमुळे लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात स्थायिक असणा-या शीख समाजाशी माझा जवळचा संबंध आला. युरोपात अनेक गुरुद्वारा आहेत. तिथेही अन्य गुरुद्वारांप्रमाणेच दहा गुरूंनंतरचे गुरू म्हणून मान्य असणा-या गुरू ग्रंथसाहेबांचं पूजन होतं. तिथं अनेक कीर्तनांना मी हजर राहत असे. तिथं गुरू ग्रंथसाहेबांमधल्या पदांचं अत्यंत पवित्र वातावरणात होणारं पठण मला नेहमीच आवडत आलं आहे. कोणाचा वाढदिवस असेल, कुणाचं लग्न असेल अथवा कुणाला परीक्षेत यश मिळालं असेल तरी अशा कीर्तनांचं आयोजन करण्याची पद्धत इथं आहे. अनेकदा माझ्या शीख मित्रांच्या घरातही मी कीर्तन ऐकण्यासाठी जात असते.

या सगळ्यातून मला वर्ल्ड सीख युनिवर्सिटीद्वारे चालवण्यात येणा-या अभ्यासक्रमांत रस निर्माण झाला. युनिवर्सिटीतर्फे रिलिजियस स्टडिजमध्ये तेव्हा पदवी अभ्यासक्रम चालवले जात. ‘अ कम्पॅरिटिव स्टडी ऑफ वर्ल्ड रिलिजन’ हा विषय घेऊन मी एम.ए. केलं. त्यानंतर पीएचडी करायची होती. तिथं अशाप्रकारचं संशोधन करू इच्छिणारी मी एकटीच मराठी होते. म्हणून संत नामदेव हाच विषय ठरवला. संत नामदेव हे शीख समाजात फक्त माहितच नाहीत तर अत्यंत लोकप्रिय आहेत. तिथल्या कीर्तनांमधून नामदेव बानी नेहमीच गायली जाते. त्यामुळे मी पीएचडीला विषय घेतला, ‘अ डायग्नोस्टिक स्टडी ऑफ द बानी ऑफ नामदेव’. अर्थात संत नामदेवांच्या गुरू ग्रंथसाहेबातील पदांचा चिकित्सक अभ्यास.

नामदेवांचे पंजाबशी असणारे ऋणानुबंध मला माहीत होतेच. मी त्यांचा आधीही अभ्यास केला होताच. पण जो जो अधिक सविस्तर अभ्यास करत गेले, तो तो मला नामदेवांचं मोठेपण अधिकाधिक कळत गेलं. आठशे वर्षांपूर्वीचे नामदेव आजच्या काळातही जुने झालेले नाहीत, किंबहुना त्यांच्या शिकवणुकीची आपल्याला अधिकच गरज आहे, असं मला वाटू लागलं.

आज लाखो वारकरी नाचत, गात, हरीनामात तल्लीन होऊन पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. या वारकरी प्रवाहाच्या प्रारंभीच्या काळात नामदेवांचं योगदान खूपच मोठं आहे. आपल्या मृदू वाणीनं इतर भक्तांमध्ये प्रतिनिधित्व करून एक संघटना तयार केली आणि वारक-यांचा पहिला फड स्थापन केला. नामदेवांची `नामभक्ती` आणि ज्ञानदेवांची ज्ञानज्योत यांचा समन्वय साधून भागवतधर्माची ध्वजा फडकवली. चंद्रभागेच्या वाळवंटात एका कीर्तनकाराच्या नात्यानं आपल्या प्रतिभेनं समाजप्रबोधनाची वाट उजळून टाकली.

संतकृपा झाली, इमारत फळा आली,
ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया,
नामा तयाचा किंकर, तेणे विस्तरिले आवर

भागवत धर्माचे प्रेरक संत ज्ञानदेव आणि प्रचारक संत नामदेव होते. समाजाच्या खालच्या मानल्या जाणा-या स्तरात जन्म झाल्यामुळे जातीभेदाचे चटके त्यानांही लागले होते. त्यांचे क्रांतिकारक विचार खूपच प्रभावी होते. तत्कालिन समाजात कर्मकांड आणि दांभिकपणा शिगेला पोहोचला होता. त्याला उद्देशून क्रोधानं ते म्हणतात,

पाखंडे बहुत कली माजी,
वर्णाश्रम सकली बुडविले तरी
पापाचिया राशी जळता नामे,
निश्चय हरीनामी नामा म्हणे

याचवेळी त्यांची विठ्ठलावरची निस्सीम भक्ती आणि तळमळ अनेक अभंगांमधून दिसून येते. त्यांची भक्तिरसात ओथंबलेली हृदयस्पर्शी रचना वाचताना त्यांना निखळ वात्सल्याची प्रचिती आलेली आहे, याची खात्री पटते. उदाहरणार्थ

पाहू द्या रे मज विठोबाचे मुख,
लागलीसे भूक डोळ्यामाजी
डोऊले शिणले, पाहता वाटुली,
अवस्था दाटुली, हृदयामाजी
सुखाचे हे सुख श्रीहरी मुख,
पाहता ही भूक तहान गेली
तू माझी माऊली मी तुझा तान्हा,
पाजे प्रेम पान्हा पांडुरंगे

पण परमात्मा सर्वव्यापी, सर्वसाक्षी आणि सर्वशक्तिमान आहे. तो सगुण-निर्गुण या द्वंद्वापलिकडे आहे, हेदेखील ते स्पष्टपणे मांडतात.

निर्गुण सगुण नाही ज्या आकार,
होऊनि साकार तोचि ठेला
सुवर्णी की धन, धन ते सुवर्ण,
निर्गुण सगुण यद्यापरी,
पांडुरंगी अंगे सर्व झाले जग,
निववी सर्वांग नामा म्हणे

भारतीय संस्कृतीत मध्ययुगाचा काळ हा शास्त्र, साहित्य, कला आणि अध्यात्म या दृष्टीने सुवर्णकाळच मानला जातो. या कालखंडात ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम, एकनाथ असे अनेक संत महाराष्ट्रात तर गुरु नानक, कबीर, रामानंद, पीपा, सूरदास अशा अनेक संतांनी महाराष्ट्राबाहेरही आपापल्यापरिनं योगदान दिलं. परंतु नामदेव हे एकमेव संत पूर्ण भारतभर सगळीकडे लोकप्रिय ठरले. क्रांती म्हणजे नवीन विचार, नव्या सुधारणा आणि उत्क्रांती म्हणजे जुन्यालाच नवीन दृष्टी देणं. समाजात परिवर्तन घडवण्यासाठी नवे प्रदेश आणि भाषांच्या भिंती ओलांडून त्यांनी क्रांती आणि उत्क्रांती या दोन्ही मार्गांचा वापर केला.

महाराष्ट्रात संत ज्ञानदेवांच्या काळात परकीय सत्ता नव्हती. उत्तरेकडे मात्र मुसलमानी राजवट होती. हिंदूंना जबरदस्तीनं बाटवत होते. त्यांच्यावर अत्याचार करत होते. त्यामुळे तिथं सामाजिक परिस्थिती दयनीयच होती. लोकजीवन विस्कळीत झालं होतं. लोकांचं नीतीधैर्य खचत चाललं होतं. समाजात अस्थिरता आली होती. इस्लामी राजकीय आक्रमणाचा फटका उत्तर भारतात दहाव्या शतकाच्या आरंभापासूनच बसत होता. त्याची झळ महाराष्ट्राला आणि दक्षिणेला बरीच उशिरा पोहोचली. मात्र १२९४ साली अल्लाउद्दीन खिलजीच्या दक्षिणेच्या आक्रमणानं बलाढ्य यादवसत्ता पत्त्यासारखी कोसळली.

तत्कालिन समाजातील धर्मभेद आणि असुरक्षितता रोखली पाहिजे आणि अरबस्तानातला इस्लामी ओघ थांबवला पाहिजे हे संत नामदेवांनी ओळखलं. महाराष्ट्राबाहेर भारताच्या दक्षिणेला तसंच राजस्थान आणि पंजाबमध्ये सुमारे पंचवीस वर्ष ते राहिले. ज्या विभागात राहिले त्या विभागातली भाषा, तेथील आचारविचार याचं पूर्ण निरीक्षण-आकलन करून स्थानिक भाषेतील साहित्यात एक अमूल्य भर टाकली. तिथलं जनमानस जिंकलं. हिंदी, पंजाबी भाषेतून निर्गुण परब्रह्माला आळवलं.

संत नामदेवांचा काळ १२७० ते १३५०. गुरू नानकांचा काळ १४६९ ते १५३९. ग्रंथ साहेबची निर्मिती पाचवे गुरू अर्जुनसिंग यांनी १५८१ ते १६०६ या काळात केली. गुरू ग्रंथसाहेबमध्ये एकूण ५८७३ ओव्या आहेत. त्यात नामदेव, कबीर, धन्ना जाट, सूरदास, पीपा, जयदेव, रामानंद, परमानंद, भिखन अशा अनेक धर्मांच्या आणि भाषांच्या संतवाणीचा समावेश आहे. शीख धर्मात नामस्मरणाला खूपच महत्त्व आहे. त्यामुळे नामदेवाच्या नामस्मरणाच्या अनेक ओव्यांचा समावेश गुरू ग्रंथसाहेबात आहे. त्यांच्या एकूण ६१ रचना निवडल्या गेल्या आहेत. मराठमोळ्या संत नामदेवांना न जाणणारा शीख अशक्यच आहे. त्यातील अनेकांना नामदेव हे महाराष्ट्रातील आहेत, हे माहीतही नसतं. ते त्यांना आपलेच मानतात. त्यांची खालील पदं पंजाबी समाजात लोकप्रिय आहेत.

मै अंधुले की टेक तेरा नाम खुन्दकारा

(संसारात अंध झालेल्या माझ्यासारख्या दीन मानवाला हरीनाम हा एकच आधार आहे)

बलि बलि जाऊँ , हु बलि बलि जाहुँ , नीकी तेरी बिगरी, आले तेरा नाउँ

(तुझ्यासाठी मी सर्वत्याग करायला तयार आहे. तुझी गुलामी उदात्त आहे, तुझा जप एवढा पवित्र आहे की तोच माझा उत्कर्ष करेल.)

हिंदू पुजे देहुरा , मुसलमान मसीत ,
नामा सोई सेविया, जहाँ देहुरा ना मसीत

(हिंदू देवळात तर मुसलमान मशिदीत पूजा करतात, पण मी जिकडे पूजा करतो तिकडे ना देऊळ आहे आहे ना मशिद.) हिंदू मुस्लिम एक व्हावे, त्यांनी प्रेमानं नि नीतीनं वागावं अशी ऐक्यािची भूमिका नामदेवांनी घेतली, हे त्यांच्या पदांतून प्रतीत होतं. मानवता हाच खरा धर्म आहे, असं ते सूचित करतात.

मन मेरा सुई, तन मेरा धागा,
खेचरची के चरण नामा शिम्पी लागा

(मनाची सुई आणि शरीराचा धागा घेऊन मी माझे गुरू विसोबा खेचर यांच्या चरणी लीन झालो आहे)

नामा कहे त्रिलोचना, मुखे ते रामू संभाली
हात पाव करी काम सभू, चित्त निरंजन नाली

(संत नामदेवांच्या सहवासात त्रिलोचन आणि जयदेव दीर्घकाळ होते. शरीर व्यवहारात अपरिहार्य कारणामुळे व्यग्र असले तरी हृदयात नामजप सहज शक्य आहे.)

जो राज देही तो कवन बधाई,
जो भीख मंगवाई तो क्या घटी जाई
तोहरे भजू मन मेरे, पदू निरबानू

(तू मला राजपद दिलेस तरी मला गर्व होता कामा नये. तू भीक मागायला लावलीस तरी दुःख करण्याचं कारण नाही. तुझं मी चिंतन केलं तर मला निर्वाणाचं सामर्थ्य येईल.)

`इभाई विठ्ठलु, उभाई विठ्ठलु, विठ्ठलु बिन संसार नाही`, अशा शब्दांत त्यांनी आराध्यदैवत विठ्ठलावर अखंड, अतुट श्रद्धा व्यक्त केली आहे. नामदेवांचं चरित्र पंजाबीतून लिहिणा-या बाबा पूरणदास यांनी नामदेवांच्या विठ्ठलाची एक आगळीच व्याख्या केली आहे. म्हणजे व्युत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा तो विठ्ठल. वि म्हणजे व्युत्पत्ती, ठ्ठ-ठहरना म्हणजे स्थिती आणि ल म्हणजे लय किंवा नाश.

नामदेवांचं हे विचारधन आजही महत्त्वाचं आहे. त्यांच्या विचारांचा अभ्यास केला म्हणून मला आज लंडनसारख्या भारतापासून लाखो मैल दूर शहरातही सन्मान मिळतो, हेच नामदेवांच्या वैश्विक विचारांचं महात्म्य आहे. आजही गाव सोडून जाणा-याला शंभर प्रश्न विचारले जातात. भारताबाहेर राहणा-या आमच्यासारख्यांना अशा प्रश्नांना नेहमीच सामोरं जावं लागतं. अशावेळेस आठशे वर्षांपूर्वी नामदेव आपलं गाव सोडून संपूर्ण भारत फिरतात. सगळ्या देशावर आपला प्रभाव टाकतात, हे त्यांच्या ग्लोबल वृत्तीचंच निदर्शक आहे. आजच्या ग्लोबल खेड्याची एक रहिवासी म्हणून मी त्यांच्या या वैश्विक वृत्तीला नमन करते.

0 Shares
खरे चमत्कार द मिथमेकर