द मिथमेकर

म. वा. धोंड

विठ्ठल आणि नामदेव. देव आणि त्याचा लडिवाळ भक्त. स्वयें दोन्ही. दोघेही एकमेकांच्या ओढीने भक्तीपिशे झालेले. हा भावबंध गेली आठ शतकं महाराष्ट्राला प्रेमात पाडत आलाय. पण ज्येष्ठ समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक कै. म. वा. धोंड यांनी याकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिलंय. श्रीविठ्ठल या देवाला माणूसपण देणारा संतकवी म्हणून त्यांनी नामदेवांची थोरवी मांडली आहे. ‘देवा आम्हीं तुम्हां दिलें थोरपण’ किंवा ‘मीच माझा भक्त, मीच माझा देव’, असं विठ्ठलालाच खडसावणा-या नामदेवरायांचा हा वेगळाच चेहरा आहे. अठ्ठावीस युगे विटेवर तिष्ठणा-या विठ्ठलाला नामदेवांनीच पुन्हा चालताबोलता केला, भक्तासारिखा केला, ही मांडणी अद्भूतच नाही का? म्हणूनच ‘राजहंस प्रकाशना’ने प्रकाशित केलेल्या ‘ऐसा विटेवर देव कुठें!’ या पुस्तकातल्या ‘विठ्ठलचरिताचा उद्घाता - नामदेव’ हा अप्रतिम लेख पुन्हा एकदा वाचकांसमोर ठेवत आहोत.

नामदेवांच्या कवितेसंबंधी एका टीकाकाराने म्हटले आहे की, ‘त्यांची कविता जाणिवेतील नसून नेणिवेतील आहे.’ हेच विधान सामान्यतः सर्वच संतकवींच्या बाबतीत केले जाते. तुकारामांचे काव्य हे ‘हे अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी। धरितांही परि आवरे ना’ या स्वरूपाचे आहे, असे म्हटले जाते. जनाबाई तर स्वतःच ‘जनीचे हे बोल, स्वानंदाचे डोल’, असे आपल्या काव्यासंबंधी म्हणते. ही विधाने सामान्यत: बरोबरच आहेत; पण याचा अर्थ असा नव्हे, की या संतांनी जाणीवपूर्वक रचना केलीच नाही. संतांची रचना ही बहुंताशी सहजस्फूर्त असली, तरी आपण काव्यरचना करीत आहोत याची जाणीव त्यांना जरूर होती. नामदेवांच्या दोन अभंगांत ही जाणीव स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. पहिला अभंग असा :

चंद्रभागे तीरीं । आयकिल्या गोष्टी ।
वाल्मीकें शतकोटी । ग्रंथ केला ।।
तेणें माझ्या चित्ता । बहु झाले क्लेश ।
वृथा म्यां आयुष्य । गमाविलें ।।
जाऊनि राऊळा । विठोसी विनविलें ।
वाल्मीकीनें केलें । रामायण ।।
असेन मी खरा । तुझा भक्त देवा ।
सिद्धीस हा न्यावा । पण माझा ।।
शतकोटी तुझे । करीन अभंग ।
म्हणे पांडुरंग । ऐक नाम्या ।।
तये वेळीं होती । आयुष्याची वृद्धी ।
आतांची अवधी । थोडी असे ।।
नामा म्हणे जरी । न होतां संपूर्ण ।
जिव्हा उतरीन । तुजपुढें ।। १३८०

दुसऱ्या अभंगाची सुरुवात ‘अभंगाची कळा, नाही मी नेणत’ (१३८२) अशी आहे. त्यात ‘केशिराजा’ने सांगितलेले अभंगरचनेचे तंत्र स्पष्ट केलेले आहे. नामदेवांची रचना किती जाणीवपूर्वक आहे हे पाहण्याकरिता आपण त्यांचा आणखी एक सुप्रसिद्ध अभंग घेऊ :

तूं अवकाश, मी भूमिका । तूं लिंग, मी साळुंका ।
तूं समुद्र, मी द्वारका । स्वयें दोन्ही ।।
तूं वृंदावन, मी चिरी । तूं तुळशी, मी मंजिरी ।
तूं पावा, मी मोहरी । स्वयें दोन्ही ।।
तूं चांद, मी चांदणी । तूं नाग, मी पद्मिनी ।
तूं कृष्ण, मी रुक्मिणी । स्वयें दोन्ही ।।
तूं नदी, मी थडी । तूं तारूं, मी सांगडी ।
तूं धनुष्य, मी भातोडी । स्वयें दोन्ही ।।
तूं वेद, मी स्तविता । तूं शास्त्र, मी गीता ।
तूं गंध, मी अक्षता । स्वयें दोन्ही ।।
नामा म्हणे पुरुषोत्तमा । स्वयें जडलो तुझ्या प्रेमा ।
मी कुडी, तूं आत्मा । स्वयें दोन्ही ।। १५०१

देव आणि भक्त हे भिन्न भासले तरी अभिन्नच आहेत, हे सांगण्याकरिता का नामदेवांनी या अभंगात वेगवेगळे दृष्टान्त दिले आहेत? या सर्व दृष्टान्तांतील अभिन्नता एकाच स्वरूपाची आहे का?

आपण यांतील काही दृष्टान्त तपासून पाहू. ‘तूं अवकाश, मी भूमिका’ यात आकाश हे व्यापक आहे आणि भूमी व्याप्य. म्हणजे देव हा व्यापक तर भक्त हा व्याप्य. ‘तूं लिंग, मी साळुंका’ यात लिंग हे आधेय आहे आणि साळुंका हा आधार, म्हणजे भक्त हाच देवाचा आधार ठरतो. ‘तूं समुद्र, मी द्वारका’ यातील देवभक्त संबंध तर वेगळ्याच प्रकारचा आहे. द्वारका ही समुद्राने परिवेष्टित आहे. जरासंधाच्या हल्ल्यापासून सुरक्षितता लाभावी म्हणून श्रीकृष्णाने द्वारका समुद्रात वसविली. भक्त हा असाच देवाने परिवेष्टित आणि म्हणून सुरक्षित असतो. ‘तूं तुळशी, मी मंजिरी’ यात देव-भक्ताचा कोणता संबंध दिसतो? तुळस ही माता व मंजिरी तिचे बालक का? की मंजिरी हे तुळशीचेच गोजिरवाणे व मोहक रूप? ‘तूं शास्त्र, मी गीता’ यात हा दुसराच संबंध अभिप्रेत दिसतो. ‘तूं नदी, मी थडी’ याच नदीचे दोन तीर हीच जशी नदीची मर्यादा, तशी भक्त हीच देवाची मर्यादा हा विचार असावा. ‘तूं धनुष्य, मी भातोडी’ यातील संबंध हा परस्परावलंबित्वाचा दिसतो. धनुष्य व भातोडी यांना परस्परांशिवाय काहीच अर्थ उरत नाही. देवभक्तांचेही तसेच आहे. ‘तूं कृष्ण, मी रुक्मिणी’ यात मधुराभक्ती आहे.

प्रतिमा म्हणजे अनुभवाचे स्वरूप न्याहाळण्याकरिता त्याला दिलेले इंद्रियगम्य सुटसुटीत रूप. प्रतिमेची ही व्याख्या लक्षात घेतली की, हे दृष्टान्त नसून या आधुनिक परिभाषेतील प्रतिमा आहेत, हे लक्षात येते. या प्रतिमांच्या साहाय्याने नामदेव आपल्या अनुभवाचा शोध घेत आहेत. आणि म्हणूनच हा अभंग ही आधुनिक अर्थाने एक श्रेष्ठ भावकविता आहे. वेगळ्या प्रतिमांच्या द्वारे देवभक्तसंबंधाचे पदर उलगडून दाखवता दाखवताच प्रत्येक ओळीच्या अंती ‘स्वयें दोन्ही’ म्हणून नामदेव त्यांना जी पक्की गाठ मारतात, ती विलक्षण अर्थपूर्ण आहे. त्याचप्रमाणे पहिल्या सर्वच ओव्यांत येणारा तू-मीचा क्रम अखेरच्या ओळीत ‘मी कुडी, तूं आत्मा’ असा बदलतो, हेही तेवढेच सूचक आहे.

नामदेवांनी किती जाणीवपूर्वक रचना केली आहे, हे पाहण्याकरिताच या अभंगाचा एवढ्या विस्ताराने विचार केला. यात जरी नामदेवांनी प्रतिमांचा उपयोग केला असला, तरी प्रतिमांची निर्मिती आणि योजना हे काही नामदेवांचे वैशिष्ट नाही. तो मान ज्ञानेश्वरांकडे जातो.

मग नामदेवांच्या काव्याचे वैशिष्ट कोणते?

नामदेवांच्या गाथ्यातील बराचसा भाग आत्मचरित्र, ज्ञानेश्वर आणि इतर संत यांची चरित्रे आणि कृष्णलीला, यांनीच व्यापलेला आहे. नामदेवांच्या आत्मचरित्रात आणि संतचरित्रांत विठ्ठलही राही, रुक्माई, सत्यभामा, गरूड इत्यादी कुटुंबीयांसह वावरताना दिसतो. म्हणजे या सर्वच चरित्रांना सांधणारा दुवा विठ्ठल हाच आहे. या दृष्टीने पाहता नामदेवांचे आत्मचरित्र आणि इतर संतांची चरित्रे हे एका विठ्ठलपुराणाचेच अध्याय वाटतात. वाल्मीकीने शतकोटी रामायण रचले तसे आपण विठ्ठलाचे शतकोटी अभंग रचणार, ही नामदेवाची प्रतिज्ञा आठवली की, सर्वच प्रकरणे या संकल्पित शतकोटी विठ्ठलपुराणाचाच भाग असावीत हे मत दृढ होते आणि कृष्ण हा विठ्ठलाचाच पूर्वावतार हे लक्षात घेतले की, कृष्णलीला हा या संकल्पित विठ्ठलपुराणाचा पूर्वार्ध वाटतो.

वाल्मीकींहून नामदेवांचा वेगळेपणा व मोठेपणाही हा की, वाल्मीकीने राम या मानवी व्यक्तीला देवपण दिले, तर नामदेवांनी विठ्ठल या देवाला मानवी रूप दिले. नामदेवांचा विठ्ठल नामदेवासंगे बोलतो, त्याचा नैवेद्य भक्षण करतो. जनाबाईची दळणकांडण, झाडलोट, इत्यादी कामे करतो, चोख्याबरोबर मेलेली ढोरे ओढतो. एवढेच का, पण सेना न्हाव्यासाठी बादशाहाची हजामतही करतो.

आजच्या विज्ञानयुगात हे चमत्कार पटत नाहीत. देव नामदेवांशी कसा बोलत असे, त्यांचा नैवेद्य कसा खात असे, अशा शंका उपस्थित केल्या जातात. नामदेवांना हे सारे खरे वाटत असे कारण ते भाबडे होते, असा समज रूढ आहे. पण खुद्द नामदेवच तर म्हणतात :

प्रस्तराचा देव । बोलत भक्तांते ।
सांगते, ऐकते । मूर्ख दोघे ।। १३६९

मग या चमत्कारांची संगती कशी लावायची?

भाविकपणा बाजूला ठेवून जरा विचार केला की, हे चमत्कार देवाने केलेले नसून नामदेवांच्या प्रतिभेने केले आहेत हे कळून येते. त्याकरिता नामदेवांच्या काही अभंगांची तुकारामांच्या तत्सम अभंगांशी तुलना करून पाहा. तुकाराम एका अभंगात म्हणतात :

नलगे देवा तुझें । आम्हांसी वैकुंठ ।
सायुज्यता पद । नलगे मज ।।
देई तुझें नाम । मज सर्वकाळीं ।
मागणें वनमाळी । हेंचि तुज ।।
नारद, तुंबर । उद्वव, प्रल्हाद ।
बळी, रुक्मागंद । नाम ध्याती ।।
तुका म्हणे हरी । देई तुझें नाम ।
अखंडित प्रेम । हेंचि द्यावें ।।

हाच आशय नामदेव कसा व्यक्त करतात?

आपल्या सुखाचा । देऊन मी वांटा ।
जरी येसी वैकुंठा । एक वेळ ।।
आपुलें निजपदीं । तुज बैसवीन ।
उभा मी राहेन । मागें पुढें ।।
पीतांबर छाया । करीन तुजवरी ।
जीवें क्षणभरी । विसंबेना ।।
अंबऋषि, प्रल्हाद, रुक्मांगद ।
त्याहूनि निजपद । देईन तुज ।।
ऐसा धीर नाम्या । होता माझ्या मनीं ।
परी तूं सर्वांहुनी । उदासीन ।।
नामा म्हणे केशवा । नलगे माझ्या चित्तीं ।
मज आहे विश्रांती । तुझ्या नामीं ।। १७६४ (साखरे प्रत)

या दोन्ही अभंगांचा आशय एकच आहे, पण शैली वेगळी. तुकारामांचे निवेदन एकमुखी आहे तर नामदेवांचे संवादात्मक, या संवादातील दुसरी व्यक्ती खुद्द विठ्ठलच आहे. त्यातही विशेष हा की, नामदेवांचे म्हणणे मुख्यत: विठ्ठलच सांगतो आणि तेही हिरमुसला होऊन.

इथे जलाल-उद्दीन रुमीची एक कथा आठवते :

एकदा सैतानाने एका दरवेशास विचारले, ‘‘तू तिन्ही त्रिकाळ अल्लाला हाका मारतोस, एकदा तरी त्याने तुझ्या हाकेला ओ दिली आहे काय? मग कशाला अल्लाची फुकट प्रार्थना करतोस?’’ दरवेशाला हे पटले आणि त्याने प्रार्थना करणे बंद केले. रात्री झोपेत त्याला दृष्टान्त झाला. पैगंबर अल्लाचा संदेश घेऊन आला होता. संदेश असा होता :

मीच तुला माझ्या सेवेला प्रवृत्त केले नाही काय?
मीच तुला माझ्या नामस्मरणात रमविले नाही काय?
तुझ्या ‘अल्ला’ या हाकेतच माझी ‘ओ’ आहे!

नामदेवांनी हेच ‘मीच माझा देव मीच माझा भक्त’ (१७५१) या अवघ्या सहा शब्दांत सांगितले आहे.

भक्त देवाशी बोलतो तो देव त्याचे बोलणे ऐकतो, त्याला प्रतिसाद देतो म्हणून. तुकाराम आपल्याला वैकुंठ नको म्हणतात, ते देवाने त्यांना वैकुंठ देऊ केले म्हणूनच. ते अखंडित प्रेम मागतात, ते देव देईल या खात्रीनेच. नाहीतर या नको-हवेला काहीच अर्थ उरत नाही. तुकारामांना देवाचा प्रतिसाद ऐकू येत असला, तरी अभंगात सांगितला तो केवळ आपला सादच. नामदेवांच्या अभंगात साद आणि प्रतिसाद दोन्ही आहेत आणि त्यातही प्रतिसादावरच भर आहे. याने काय झाले? भक्तांशी बोलणारा देव लोकांसमोर उभा राहिला!

भक्ताने देवाशी बोलणे आणि देवाने भक्ताला प्रतिसाद देणे, ही जशी एकाच संवादाची दोन अंगे, त्याप्रमाणेच भक्ताने देवाला नैवेद्य समर्पण करणे आणि देवाने तो भक्षण करणे, ही एकाच व्यवहाराची दोन अंगे आहेत. यांतील केवळ पहिलेच अंग आपण पाहत आलो आहोत, म्हणूनच तर ‘नैवेद्य समर्पण करणे’ ऐवजी ‘नैवेद्य दाखविणे’, असे आपण म्हणतो. भक्तालाच दुसरे अंग दिसते. नामदेवांनी ते लोकांना दाखविले आणि नैवेद्य समर्पणाचे चित्र पुरे झाले.

नामदेवांनी देवभक्तसंवादाचा एका वेगळ्या प्रकारे उपयोग केला आहे. तुकारामांचा एक अभंग आहे :

रिद्धीसिद्धी दासी कामधेनु घरीं ।
परि नाहीं भाकरी भक्षावया ।।
लोडें बालिस्ते पलंग सुपति ।
परि नाहीं लंगोटी नेसावया ।।
पुसाल तरी आम्हा वैकुंठींचा वास ।
परि नाहीं राह्यास ठाव कोठें ।।
तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे ।
परि नाहीं कोणाचें उणें पुरें ।। १२८७

तुकारामांचा हा ‘आपुलाचि वाद आपल्याशी’ आहे. हा अभंग वाचताना नारायण सुर्वे यांच्या ‘ऐसा गा मी ब्रह्म’ची आठवण होईल. (अर्थात तो सुर्व्यांचा समाजाशी वाद आहे.) नामदेवांनी हाच आशय देवभक्तसंवादाच्या रूपाने व्यक्त केला आहे. नामदेवांचा अभंग असा :

केशव पुसे नामयासी । तुझी नांदणूक कैसी ।।
आम्हां काय उणें । तुझेनि धर्में दातारा ।।
तुम्हां घरी बोचकें लुगडीं । आम्हां घरी पोरें उघडीं ।।
तुम्हां दुर्ग दारवंटा । आम्हां घरीं बारा वाटा ।।
तुम्हां घरीं गाई म्हैशी । आम्हां घरीं उंदिर घुशी ।।
तुम्हां घरीं बटकी दासी । आम्हां घरीं आहेत लासी ।।
तुम्हां घरीं शेजा बाजा । आम्हां घरी तृणसेजा ।।
तुम्हां घरी सुवर्ण मडकीं । आम्हीं घरी खापरें फुटकीं ।।
तुम्हां घरीं लेकुरें वाडें । आम्हां घरीं तुळशी झाडें ।।
नामा म्हणे तुमचे घरीं सोनें दाम । आमुचे घरीं तुमचें नाम ।। १७३९

दोन्ही अभंगांचा आशय एकच, पण तुकाराम स्वतःशीच वाद घालतात तर नामदेव देवाशी संवाद करतात. नामदेवांच्या शैलीचाच हा विशेष आहे.

नामदेवांच्या शैलीचा आणखी एक विशेष म्हणजे, त्यांना जेव्हा एखादा विचार सांगायचा असतो, तेव्हा ते एखाद्या कथेच्या द्वारे सांगतात. ती कथा स्वतःसंबंधी वा एखाद्या संतासंबंधी असते आणि विठ्ठल हाही त्या कथेतील एक पात्र असतो.

तुकाराम- नामदेवांची पुन्हा एकदा तुलना करू. तुकारामांचा अभंग असा आहे :

भूतांचिये नांदे जीवीं । गोसावी च सकळां ।।
क्षणाक्षणां जागा ठायीं । दृढ पायीं विश्वास ।।
दावूनियां सोंग दुजे । अंतर बीजें वसतसे ।।
तुका म्हणे जाणे धर्म । धरी तें वर्म चिंतन ।। ३२१४

नामदेवांचा अभंग असा आहे :

नामा स्वयंपाक करूं बैसला । केशव श्वानरूपें आला ।
रोटी घेऊनि पळाला । सर्वांभूतीं केशव ।।
हातीं घेऊन तुपाची वाटी । नामा लागला श्वानापाठी ।।
तूप घे गा जगजेठी । कोरडी रोटी कां खाशी ।।
तंव श्वान हांसोनी बोलिलें । नामया तुज कैसें कळलें ।
येरू म्हणे खेचरें उपदेशिलें । सर्वांभूतीं विठ्ठल ।। १३६७

नामदेवांच्या या काव्यशैलीतूनच विठ्ठलाची ‘मिथ’ निर्माण झाली. पुंडलिकाच्या भेटीसाठी विठ्ठलाचा अवतार झाला; पण त्यानंतर अठ्ठावीस युगे तो राउळात विटेवर तिष्ठत उभा राहिला होता. नामदेवांनी त्याला परत बोलता-चालता केला. राउळातून भक्तांच्या घरी आणला, भक्तांच्या बरोबरीने कामाला लावला, त्याला ‘भक्तासारिखा’ केला. एका स्त्रीगीतात म्हटले आहे :

इटु इटु म्हूण जन । हाका मारिती राउळातु ।
इटु जनीच्या देवळातु ।।

नामदेवांनी निर्माण केलेली ही विठ्ठलाची ‘मिथ’ जनमानसात एवढी रुजली की, त्यानंतरच्या संतकाव्यांत आणि लोकगीतांत तिला अनंत धुमारे फुटले आणि नामदेवांच्या विठ्ठलपुराणात इतर संतकाव्यांची आणि लोकगीतांची भर पडून नामदेवांची शतकोटी ग्रंथाची प्रतिज्ञा पूर्ण झाली. व्यासवाल्मिकींचे ग्रंथ असेच नाही का वाढत गेले?

नामदेव हे मराठी संतकवीतील पहिले ‘मिथमेकर’ आणि तेच त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य.

(आभार : सुलभा मधुकर धोंड आणि राजहंस प्रकाशन)

0 Shares
थेम्सतीरावरून चंद्रभागा पाहताना कोणे रचिला पाया? ज्ञानदेवे की नामदेवे?