कोणे रचिला पाया? ज्ञानदेवे की नामदेवे?

प्रा. रामदास डांगे

परभणी येथे राहणा-या प्राचार्य रामदास डांगे यांनी ‘मूळपाठदीपिका ज्ञानेश्वरी‘चं संशोधन करून संतपरंपरेच्या चाहत्यांवर मोठे उपकारच केलेत. संतसाहित्य आणि भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणून महाराष्ट्राला परिचित असणा-या डांगे सरांची भूमिका मात्र कायम एका नम्र वारक-याचीच असते. त्याच भूमिकेतून त्यांनी ‘ज्ञानदेवे रचिला पाया‘ म्हणण्यातच नामदेवांचंही मोठेपण कसं सामील आहे, हे या लेखात सांगितलंय. ‘ज्ञानोबा तुकाराम’या वारक-यांच्या पारंपरिक गजरात ‘नामदेव तुकाराम’ असा बदल ब्राम्हणविरोधी मांडणी करणा-या काही लेखकांनी गेली काही वर्ष सातत्यानं सूचवला आहे. ‘नामदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस‘, अशी मांडणी आज होत आहे. त्याचा प्रतिवाद करणारा हा लेख. तब्येत साथ देत नसतानाही केवळ ’रिंगण’साठी डांगे सरांनी सहा महिन्यांनी लेखणी हाती घेतली, म्हणूनही याचं महत्त्व.

महाभारतात ‘यक्षप्रश्न’ नावाची एक घटना आहे. पांडव वनवासात असताना घडलेली. ग्रीष्म ऋतू असावा. धर्मराज तहानेनं व्याकुळ झाला होता. सहदेव पाणी आणण्यासाठी गेला. तो परत आलाच नाही. पाठोपाठ नकुलही गेला. तोही परत आला नाही. भीमार्जुन गेले. तेही परत आलेच नाहीत. शेवटी स्वतः धर्मराज पाण्याच्या शोधार्थ बाहेर पडला! थोडं अंतर चालून गेल्यावर एक सुंदर सरोवर त्याच्या दृष्टीला पडलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाणी आणण्यासाठी गेलेले चारही भाऊ तेथे मरून पडले होते. धर्मराज पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ गेला, तेवढ्यात कोठून तरी आवाज आला, ‘थांब, पाण्याला स्पर्श करू नकोस. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरे दे. नाहीतर जी गत तुझ्या चार भावांची झाली, तीच गत तुझी होईल.’ यक्षानं अनेक प्रश्न विचारले. त्यात एक प्रश्न होता, ‘का दिक्?’ म्हणजे खरी दिशा कोणती?

प्रश्न यक्षाचा होता. चार, आठ, किंवा दहा दिशांची नावे घेऊन चालणार नाही, हे धर्मराजास ज्ञात होतं. ‘पोटासाठी दाही दिशा’ भटकंती करणाऱ्यास ‘खरी दिशा’ कळत नसते. धर्मराजाच्या उत्तरानं यक्षाचं समाधान झालं. कारण धर्मराजाचं उत्तर होतं, ‘सन्तो दिक्’! म्हणजे ‘संत हीच दिशा’.

थोर चिंतनशील लेखिका श्रीमती मुक्ता कंटक यांच्या ‘महाभारत : एक मुक्त चिंतन’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आचार्य विनोबांनी संतवाणीचा गौरव मोठ्या खुबीनं केला आहे. सर्वच इतिहास संशोधकांनी कृष्णचरित्रातील राधेचा शोध घेण्याचा कसून प्रयत्न केला. शोधान्ती ‘राधा नावाची व्यक्ती अनैतिहासिक आहे’, असा सर्वांचा एकमुखी निष्कर्ष. विनोबांनी या अभिप्रायाची चांगलीच खिल्ली उडवलेली आहे. मी काही इतिहाससंशोधक नाही, असं स्पष्ट करून ते म्हणतात, या निमित्तानं का होईना, जर भगवान श्रीकृष्ण माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘विन्या, राधेच्या या प्रकरणात मी नाही, हा खोटा आळ आहे.’ तर मी म्हणेन, ‘देवा, तू मुलखाचा लबाड आहेस. तुझ्यावर माझा विश्वास नाही. आमच्या संतांचं तसं नाही. ते कधी खोटं बोलत नाहीत. त्यांनी राधेचा गुणगौरव केला आहे. तेव्हा राधा ही असलीच पाहिजे.’

वरचे दोन्ही दाखले अशासाठी कारण ज्या देवालयाचा ‘ज्ञानेदेवे रचिला पाया’ आणि ‘तुका झालासे कळस’ त्या देवालयाची इमारत ‘संतकृपा झाली’ म्हणूनच उभी राहिली, हे उद्गार आहेत संत बहिणाबाईंचे हे विसरता कामा नये.

संत बहिणाबाईंचा गौरव तुमच्या आमच्या थिट्या लेखणीनं नाही होऊ शकणार. ‘अगा, नवल वर्तलें’ अशा कोटीतील ही स्त्री-संत. वेदैकनिष्ठ ब्राह्मण असे माहेर-सासर! या उभय कुळांत श्रीमद्भभगवदगीतेवर बहिष्कार!! बहिणाबाईंनी हे सारे बंध तोडून, विरोध-उपहास सहन करून, संत तुकारामांना गुरू केलं. ‘वर्णानां ब्राह्मणो गुरू:’ असा तो काळ होता. संत तुकाराम महाराज हेच खरे ब्राह्मण आहेत, हे सिद्ध करण्यासाठी बहिणाबाईंनी अश्वघोषांच्या ‘वज्रसूची’ या उपनिषदावरच भाष्य केलं, स्वतःचे बारा पूर्वजन्म उलगडून दाखविले. अशा या अलौकिक स्त्री-संत बहिणाबाईंच्या विचारांचं विश्लेषण फार काळजीपूर्वक केलं पाहिजे.

थोडंसं विषयांतर करून सांगावंसं वाटतं, ३०-३६ वर्षांपूर्वी एका अग्रगण्य दैनिकाच्या रविवार आवृत्तीत एका प्रतिथयश समीक्षकानं संत बहिणाबाईंच्या या देवालयाचा विध्वंस केला होता. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांसाठी वापरलेला ‘तुका झालासे कळस’ या विधानातील ‘कळस’ हा शब्द त्यांना खुपत होता. त्यांचं म्हणणं असं, की कळस आकारानं खूपच लहान. ज्ञानेश्वरांसाठी पाया, नाथांसाठी खांब हे आकारानं मोठे; कळस लहान, क्षुद्र. हा तुकारामांचा अपमान वगैरे वगैरे. बहिणाबाईंच्या मनात तुकारामांविषयी असलेला सद्भाव, आदर यांचा थोडाही विचार न करता या थोर समीक्षकानं केलेली ही रूपकमीमांसा तर्कटबुद्धीचे उत्तम उदाहरण होय. याच काळात रामेश्वरभट्ट, जयरामस्वामी इत्यादी महात्म्यांनी केलेला तुकाराम महाराजांचा गौरवही लक्षात घेण्यासारखा आहे. रामेश्वरभट्ट तर आरतीत गातात – ‘तुकितां तुळणेसी ब्रह्म तुकासी आलें’. एका अभंगात तर ते म्हणतात…

तुकाराम तुकाराम । म्हणता कांपे यम ।।
ऐसा तुकोबा समर्थ । ज्याने केला हा पुरुषार्थ ।।

जयरामस्वामींच्या कीर्तनातून प्रेरणा घेणारी बहिणाबाई म्हणते, ‘तुका झालासे कळस’. ‘कलश’ हा प्रारंभबिंदू. तर ‘कळस’ हा पूर्णत्वाचा साक्षात्कार दर्शविणारा बिंदू! पण या समीक्षकांना त्याचं भान नाही. तुकारामांचा एवढा गौरव कोणी केला असेल, असं वाटत नाही. पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा हेच खरं!

अलीकडे ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ या वचनाचा विपर्यास करून नवं संशोधन पुढे मांडलं जातं. या विधानाचा ‘पुन:शोध’ घेण्यात गुंतलेली मंडळी आग्रहाने प्रतिपादितात की बहिणाबाईंचे हे उद्गार अनैतिहासिक आहेत. मध्ययुगीन मराठी साहित्याचा अभ्यास केला असता एक गोष्ट सहज लक्षात येते, की प्रस्तुत कार्य ज्ञानदेवांच्या आधी नामदेवांनी सुरू केलं. याला प्रमाण देताना हे समीक्षक पुढील दोन-तीन घटनांचा आवर्जून उल्लेख करतात. नामदेव हे वयानं ज्ञानेश्वरांपेक्षा मोठे आहेत. लहानपणापासून त्यांचा भक्तीकडे ओढा होता. नामदेवांच्या कीर्तनात स्वतः ज्ञानेश्वर श्रोते म्हणून बसत असत. संत जनाबाई म्हणते –

नामदेव कीर्तन करी । पुढे नाचे पांडुरंग ।
जनी म्हणे बोला । ज्ञानदेवा अभंग ।।

वेदशास्त्रसंपन्न भागवताचार्य परिसा भागवत हे आधी नामदेवांची निर्भर्त्सना करीत. त्यांच्या पत्नीने समजावले की,

तुम्हासी चाड जरी हरिशी ।
तरी मत्सरू नका नामदेवासी ।।

परिणामी परिसा भागवत नामदेवांचे पहिले शिष्य झाले, ते म्हणतात,

‘मागें होतें तें अवघेंचि विसरलो । लोटांगणी आलो नामयासी।।’

असे हे नामदेव ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असल्यानंतर ‘नामदेवे रचिला पाया’ असं का न म्हणावं, असा या समीक्षकांचा सवाल. शिवाय असंही आहे, की नामदेव आले असता मुक्ताबाईंचा अपवाद वगळता निवृत्तीनाथ, ज्ञानदेव आणि सोपान हे नामदेवांपुढे नतमस्तक झाले, असा इतिहास आहे. एवढंच नव्हे तर भक्तीचं वर्म ज्ञानेश्वरांना कळलं ते नामदेवांमुळे. असं असता ‘नामदेवे रचिला पाया’ असं का नको?

श्रद्धावान वारकऱ्यांना या अशा चर्चेत रस नाही. ‘तो रस येथे नाही’, अशी त्यांची धारणा. पण संशोधक, सुधारक यांना कसं स्वस्थ बसवणार? या सुधारकांचं म्हणणं असं, की ‘ज्ञानदेव-तुकाराम’ या गजराऐवजी वारकऱ्यांनी आता ‘नामदेव-तुकाराम’ म्हटलं पाहिजे. नामदेव महाराजांवर झालेला अन्याय दूर केला पाहिजे.

नामदेव आणि ज्ञानदेव हे दोघेही अधिकारसंपन्न महापुरुष जगाच्या कल्याणासाठी अवतीर्ण झाले. त्यांच्या बाबतीत असा वाद निर्माण होणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. वारकऱ्यांचा बुद्धिभेद करण्याचा हा एक डाव आहे. गेली सातशे वर्ष लक्षात न आलेली ही बाब, आपणच वारकरी समाजाचे उद्धारक आहोत अशा थाटात ही मंडळी उचलून धरीत आहेत. आम्हा वारकऱ्यांना या वादाशी काही घेणं देणं नाही. हा वाद कसा निरर्थक आहे हे संतवचनांच्या आधारे थोडक्यात समजून घेऊ या. स्वत: ज्ञानदेव नामदेवांविषयी मोठ्या आदरानं बोलतात. त्यांच्या एका अभंगात,

भक्त भागवत बहुसाल ऐकिले । बहु होऊनि गेले होती पुढे ।।
परि नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व । तो रस अद्भुत निरुपम ।।

(हे = साधे, कवित्व = शब्दांचा खेळ. अद्भुत विशेषण वापरून ज्ञानदेवांनी ब्रह्मरसांचा निर्देश केला आहे. वाचे बरवें कवित्व। कवित्वीं रसिकत्व। रसिकत्वीं परतत्त्व। स्पर्शु जैसा।। या ज्ञानेश्वरीतील ओवीचा साक्षात् अनुभव म्हणून ‘अद्भुत’) आणखी एका अभंगात नामदेवांना उद्देशून म्हणतात,

ज्ञानदेव म्हणे भला भक्तराज ।
कळलें गौप्य गुज सर्व तुझें ।।

आणखी एका अभंगात ज्ञानदेव म्हणतात,

धन्य तुझा जन्म धन्य तुझें कुळ ।
धन्य तुज राऊळ जवळी असे ।।

ही भावना केवळ ज्ञानदेवांचीच आहे असं नाही. या संतमंडळात सर्वांत ज्येष्ठ म्हणजे गोरोबा काका. नामदेवांची परीक्षा घेणारे हेच ते गोरोबा काका. ते म्हणतात…

म्हणे गोरा कुंभार सहज जीवमुक्त । सुखरूप अद्वैत नामदेवा ।

या चरणातील ‘सहज’ आणि ‘सुखरूप’ ही साभिप्राय विशेषणं लक्षात घेतली म्हणजे नामदेवांचं उच्चकोटित्व लक्षात येतं. अशा ‘नामदेवांचे ठेवणें जनीस लाभलें। धन सापडलें विटेवरी। ही जनाबाईंची साक्षही लाखमोलाची आहे. निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचे गुरू. ते म्हणतात,

या नामदेवासंगे देवाचा ओठा । देवद्वेला वेडा पांडुरंग ।।
भक्तिचिया बळें देव पैं जिंकिला । ऋणाइत केला कैसा येणें ।।

आता ज्ञानदेवांविषयी स्वत: नामदेवांची काय धारणा होती हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. ‘ज्ञानदेवें रचिला पाया’ या अभिप्रायाला पुष्टी देणारी अनेक वचनं नामदेवांच्या अभंगांतून स्पष्टपणे दिसून येतात. ‘नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ।।’, अशा ग्रंथोपजीवी धारणेतून ज्या ग्रंथाची महती नामदेवांनी गायिली त्या ज्ञानेश्वरी ग्रंथात ‘अवघाचि संसार सुखाचा करीन’ म्हणणारे ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात…

तरि अवधान एकवेळ दिजे । मद सर्वसुखासि पात्र होईजे ।
हे प्रतिज्ञोत्तर (तुम्ही) माझें । उघड आईकां ।। ज्ञा. ९.१।।

पाठभेदचर्चेचं हे स्थळ नव्हे. परंतु ‘कलिकलित भूतां’च्या उद्धारार्थ ज्ञानेश्वरांनी ‘ब्रह्मविद्येचा सुकाळ’ करण्यासाठी ‘गीतार्थग्रंथनमित्रे’ ‘आर्ताचेनि वोरसें’ ‘अमृतातेंही पैजा जिंकणाऱ्या ‘मऱ्हाटी’ शब्दांत ‘अरूपाचे रूप’ प्रगट केले. वरच्या ओवीतला ‘एकवेळ’ हा पाठ फक्त वै. मामासाहेब दांडेकरांच्याच प्रतीत आहे. इतर सर्व प्रतीत ‘एकलें’ असा पाठ आहे. नवव्या अध्यायाच्या शेवटी ‘अळुमाळु’ असे ‘अवधान’ द्या, असा निर्देश आहे. त्यावरून येथे ‘एकलें’ (= समग्र) या पाठापेक्षा ‘एकवेळ’ हाच पाठ योग्य आहे, असं मामांनी पहिल्या आवृत्तीतील परिशिष्टात स्पष्ट केलं आहे.

दुसरं असं, की ‘एकलें’ हा पाठ योगमार्गाचा, ज्ञानमार्गाचा दर्शक आहे. ज्ञानेश्वरांची भूमिका संताची आहे. ‘पंढरीसी जारे एकवेळ’ ‘आठांही प्रहरी माझा हरी।’ एक निमिष ‘देवाचिया द्वारी उभा क्षणभरी’ हे फक्त संतच सांगू शकतात. हे सगळं विवेचन करण्याचं कारण नामदेवांनी ज्ञानदेवांविषयी आपली भावना

संसारी आसक्त मायामोहे रत । तापत्रय संतप्त जाले जीवा ।।
ऐसिया पतितांचा करावेया उद्धार । झाला अवतार तुमचा जगी ।।

अशा स्पष्ट शब्दांत व्यक्त केला आहे. पुढील तथाकथित अभ्यासकांना एवढ्यानं पुरं समजणार नाही म्हणूनच की काय,

नामा म्हणे यांनी तारिले पतित ।
भक्ति केली ख्यात ज्ञानेदेवें ।।

अशी पुरवणी जोडतात! या पुरवणीत भर टाकतात नामदेवांचे शिष्य आणि शिष्या. ‘संतजना माहेश्वरी’ असं ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान प्रगट करणारी संत जनाबाई ज्ञानदेवांना उद्देशून म्हणते, ‘नामयाची जनी म्हणावी आपुली।’ कारण

धन्य ज्ञानेश्वर धन्य त्याचा भाव ।
त्याचे पायीं देव आम्हा भेटे ।।

नामदेवांचे शिष्य संत चोखामेळा ‘ऐसा समर्थ ज्ञान देवो । तेया चरणी ठेवा भाव’, असं सांगून ज्ञानेश्वरीसंबंधी आपली अनुभूती प्रगट करतात –

चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ । वाचितां सनाथ जीव होती ।।
फारशी ज्ञात नसलेली एक संत कन्या म्हणते –

विश्रांतीचा ठावो । भागू म्हणे ज्ञानदेवो ।।

यात भर टाकता येईल – ‘सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जीणें । ज्ञानदेव दरशनें मुक्त होती ।।’. शेवटी कळस चढवितात तुकाराम महाराज –

ब्रह्मादिक जेथे तुम्हा बोळगणें । इतर तुळणें काय पुढे ।।

तुकारामांच्या या वचनापुढे कोणीही नतमस्तक व्हावं असंच दिव्य व्यक्तिमत्त्व आहे ज्ञानेश्वरांचं. ‘व्यक्तिमत्त्व ज्ञानेशांचें । अलौकिक असे साचें । ओतीव परब्रह्माचा कैसें वानूं ।’, असं पाचव्या अध्यायाच्या उपोद्घातात मी का म्हटलं होतं ते लक्षात येईल. ‘नाम एव देवा यस्य स नामदेव:’ हे तर खरंच आहे. परंतु या देवाला ‘विश्वात्मक’ करण्याचं फार मोठं कार्य ज्ञानदेवांनी केलं. त्या दृष्टीनं –

ते या सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।
पूजा केली होय अपारा । तोषालागी ।।

या ओवीतून ‘जें जें भेटे भूत । तें मानी भगवंत’ अशा ज्ञानेश्वर प्रेमभक्तीची बैठक प्राप्त होते. ज्ञानदेवांनाही बैठक ‘वयसेचिया गावात येतां’च बालपणीच प्राप्त झाली होती. म्हणूनच ‘तैसें ज्ञानाचें बोलणें । आणि एणें रसाळपणें’ करणारा ज्ञानदेवच ‘द्वैतदैन्य’ दूर सारून ‘सिवें कां श्रीवल्लभें’ याचा विचार न करता ज्ञानोत्तर प्रेमभक्तीच्या मंदिराचा पाया रचू शकतात. त्या पायातील चिरे होण्याचे भाग्य मिळावं असंच सर्व संतमहात्म्यांना वाटत असावं.

अलीकडे मर्ढेकर, कुसुमाग्रज या आधुनिक कवींची जन्मशताब्दी साजरी झाली आहे. मर्ढेकरांची एक सुंदर कविता आहे. ‘काळ्यावरती जरा पांढरे या पाप्याच्या हातून व्हावें, एरव्ही पांढऱ्यावरती हेच काळे’. हे समजलं नाही तर कुसुमाग्रजांच्या ओळी आहेतच, ‘व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले’. ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ म्हणणाऱ्या नामदेवामुळे आठवलं, कीर्तनाच्या प्रारंभी अभंग असतो ‘रूप पाहतां लोचनी’ आणि कीर्तनाचा रंग आवरता घेताना, ’ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’.

यावर भाष्य करण्याची गरज नाही. खरं सांगू? विनोबा म्हणतात तेच खरं. ‘ज्ञानबा तुकाराम’ हा मध्यमपदलोपी समास आहे. त्यात सारं काही आलं.

बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम।

0 Shares
द मिथमेकर परिवार