म्हारो नामदेव

दानाराम छिपा

राजस्थानात आज नामदेवांची साडेतीनशेहून अधिक मंदिरं आहेत. तिथला संख्येनं खूपच मोठा असलेला नामदेव शिंपी समाज जसजसा जागृत होतोय तसतसा नामदेवांचा राजस्थानवरील प्रभावही वाढत चालला आहे. सांगताहेत, राजस्थानातील श्रीगंगानगर येथील निवृत्त शिक्षक दानाराम छिपा.

आज पंजाबवरचा संत नामदेवांचा प्रभाव प्रसिद्ध आहे. पण त्यांचा तितकाच दृश्य प्रभाव राजस्थानातही दिसून येतो. तिथे नामदेवांना पूजनीय मानणा-या शिंपी तसेच अन्य समाजांची संख्या खूपच मोठी असल्यामुळे हा प्रभाव जाणवतो. त्यामुळे शिंपी समाजाच्या वस्त्यांमध्ये गेल्यानंतर तिथे नामदेवांची अनेक मंदिरं आढळतात. अनेक ठिकाणी दुकानांवर, हो़र्डिंगमध्ये नामदेवांचे फोटो दिसून येतील. हे नामदेव पंजाबी नामदेवांसारखे बुचडा बांधलेले नसून मराठी नामदेवांसारखे पुणेरी पगडी घालणारे आहेत. नामदेवांची राजस्थानात कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे मंदिरं असतीलच. नामदेवांचा हा प्रभाव त्यांच्या आठशे वर्ष जुन्या तीर्थयात्रेमुळे आहे.

उत्तर भारतात वारंवार तीर्थयात्रा केलेल्या नामदेवांनी वाटेतल्या राजस्थानमध्ये अनेक दिवस मुक्काम ठोकला. नामदेव पहिल्यांदा राजस्थानात गेले ते श्री ज्ञानदेवांच्या सोबत. या दोन्हीही महापुरुषांच्या यात्रेची स्मृती इथं अजूनही जपली जाते. त्याची एक कथा आहे. बिकानेरपासून ५० मैलांवरील वाळवंटी प्रदेशात चालत असताना दोघांनाही खूप तहान लागली. शोधता शोधता त्यांना एक खूप खोल विहीर दिसली. तेव्हा ज्ञानदेवांनी लघिमासिद्धीचा अवलंब करून सूक्ष्म देह धारण केला. ते विहिरीत उतरले आणि ते पाणी प्यायले. नामदेवांसाठी योगसिद्धीनं पाणी आणून देण्याची तयारीही त्यांनी दाखवली.

पण नामदेवांनी आपला नाममहिमा दाखवला. डोळे झाकून त्यांनी धावा सुरू केला. त्याबरोबर ती विहीर पाण्यानं उचंबळून आली. भरून वाहू लागली. ज्ञानदेवासारख्या योग्यानं नामदेवांच्या या सहजसोप्या भक्तीचं मोठं कौतुक केलं. योग हा व्यक्तीसाठी आहे आणि भक्ती ही समष्टीसाठी आहे. त्यात समाजाचं भलं आहे, असं बहुदा या दोन थोर महात्म्यांना आपल्या सगळ्यांना सांगायचं असेल. बिकानेरजवळील कोलायतजी येथील या विहिरीला `नामदेव कुवा` असं म्हणतात. त्या निर्जल प्रदेशात तेव्हापासून ती विहीर प्रख्यात तीर्थस्थान बनली आहे. तिथं नामदेवांच्या नावानं एक धर्मशाळा आहे. दर वसंत पंचमीला तिथं उत्सव साजरा होतो. आजूबाजूला पाण्याचं दुर्भिक्ष्य असलं तरीही आजही पाणी असतेच. पण या चमत्कारापेक्षाही नामदेवांचा प्रभाव पडला तो विचारांमुळे. राजस्थानात फिरताना ठिकठिकाणच्या मुक्कामांत नामदेवांनी भजन-कीर्तनाचा पाऊस पाडला. त्यामुळे राजस्थानच्या जीवनावर अनंत काळ संस्कार करणारे परिणाम झाले.

राजस्थानावर ज्यांचा थेट प्रभाव आहे अशा प्रसिद्ध संत कवयित्री मीराबाई ( १४९८ ते १५४६) यांच्यावरही नामदेवांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. आपल्या आधीच्या कवींचा उल्लेख करताना त्यांनी नामदेवांचाही भावपूर्ण शब्दांत निर्देश केला आहे.

म्हारे नैंणा आगे रहाजो जी, स्याम गोविंद
दास कबीर घर बालद जो लाया, नामदेव की छान छबन्द
दास घना को खेत निपजायो, गज की टेर सुनन्द
सब सन्तो का काज सुधारा, मीरा सूं दूर रहन्द ||

(हे श्यामवर्ण गोविंद, माझ्या डोळ्यासमोर तुम्ही राहा….आपण कबीराच्या घरी बैल आणला, नामदेवाचं छप्पर शाकारून दिलं. घन्नादासाच्या शेतात बी पेरलंत आणि गजेन्द्राचा धावा ऐकून त्याच्या सहाय्यार्थ धावून गेलात. सर्व संतांची कामे केलीत परंतु मीराबाईपासून तुम्ही दूर का राहता?)

सामाजिकदृष्ट्या नामदेवांच्या पदयात्रेचा दुसरा असा एक परिणाम झाला, की या भागातील शिंपी तेव्हापासून स्वतःस `नामावंशी छिपा दर्जी`, असं म्हणू लागले. या जातीची संख्या राजस्थानात मोठया प्रमाणात आहे. या समाजात संत नामदेवांच्या नावे राजस्थानमध्ये आता अनेक साप्ताहिकं, पाक्षिकं, मासिकं निघतात. त्यात नामदेवांचा महिमा तसंच नामदेव छिपा समाजाशी संबंधित कार्यक्रमांची माहिती असते. १९७०पर्यंत नामदेवांविषयी फारशी छापील माहिती मिळत नव्हती. वसंत पंचमी मात्र फार पूर्वीपासून मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते. वसंत पंचमीच्या दिवशी नामदेवांनी राजस्थान सोडलं तसंच त्यांचं लग्न याच दिवशी झालं होतं, असं आमच्या लोकांचं म्हणणं आहे.

१९९६मध्ये गंगानगरमध्ये छिपा समाजाचं राष्ट्रीय अधिवेशन भरलं. या अधिवेशनाला दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमधून शेकडो लोक आले होते. तेव्हापासून राजस्थानातील या समाजात जागृती अधिकच वाढली. त्यापूर्वीही सिमला आणि डेहराडूनमध्ये हे अधिवेशन पार पडलं होतं. या समाजाला राज्यसभेवर प्रतिनिधित्व मिळावं, अशी मागणी नामदेव मासिकातून करण्यात आली. ही मागणी मान्यही झाली. सरदार संतोखसिंह यांना १९६२मध्ये राज्यसभेवर घेण्यात आलं. त्यानंतर देशभरातील नामदेव शिंपी समाज संघटनांना जोर आला. केलेल्या पाहणीनुसार हरियाणा आणि राजस्थानातील जयपूर, जोधपूर, बिकानेर, गंगानगर या ठिकाणी छिपा, टाक क्षत्रिय, नामदेव शिंपी, रोहिला, रोहिला टाक क्षत्रिय, दर्जी आदी समाज मोठ्या संख्येनं आहे. हा समाज शिलाई तसंच कपडे रंगवण्याचा व्यवसाय करतो.

या समाजानं ठिकठिकाणी नामदेवांची भव्य मंदिरं उभारली आहेत. त्यामध्ये गंगानगर बसस्टँडजवळचं मंदिर, ४२ डी ब्लॉक येथील नामदेवांचं गुरुघर, सुरतगट जिल्ह्यातील नामदेवांची दोन जुनी मंदिरं, बिकानेरजवळच्या कोलायतजवळील धर्मशाळा, नागोर जिल्ह्यातील नोरणा येथील नामदेव मंदिर, जोधपूरमधील दोन मंदिरं आणि धर्मशाळा, जयपूरमधील सहा प्राचीन मंदिरं, चुरू जिल्ह्यातील नामदेव मंदिर यांचा प्रामुख्यानं समावेश होतो.

जोधपूरमध्ये पाकिस्तानमधून मोठ्या संख्येनं आलेला सिंधी समाज राहतो. त्यांनी या ठिकाणी नामदेवांचं भव्य मंदिर उभारलं आहे. या ठिकाणी भजन, कीर्तनादी कार्यक्रम मोठ्या उत्साहानं साजरे होतात. जोधपूरमधील सिंधी समाजाचे लक्ष्मण खेतानी यांना पुणे विद्यापीठाचा संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार याच वर्षी एप्रिल महिन्यात देण्यात आला. त्यांच्या पूर्वजांनी पाकिस्तानात नामदेवांची मंदिरं बांधली होती. त्या मंदिराचे दस्तावेजही त्यांच्याकडे आहेत. पण ही मंदिरं आज कोणत्या अवस्थेत आहेत, हे कोणालाही माहीत नाही.

0 Shares
राजधानीतले संतशिरोमणी नामदेवनो गुजरात