राजधानीतले संतशिरोमणी

गिरीश अवघडे

राजकारणाच्या धामधुमीत व्यग्र असणा-या राजधानी दिल्लीतही संतशिरोमणी नामदेवांच्या पाऊलखुणा लख्ख पाहायला मिळतात. विशेषतः दिल्लीतील लोधी गार्डन परिसरातलं त्यांचं मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेश, उत्तरांचल, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यांतही नामदेवांची लहान मोठी मंदिरं आहेतच. सांगताहेत दिव्य मराठी वृत्तपत्राचे दिल्ली प्रतिनिधी गिरीश अवघडे...

संतशिरोमणी नामदेव यांच्या आयुष्यातील बराच मोठा काळ उत्तर भारतात गेला. त्यांच्या येथील वास्तव्य काळात त्यांनी केलेल्या प्रवासाच्या टप्प्यात भक्तीच्या विचारांचा मोठा प्रसार झाला. आज जवळपास आठशे वर्षांनंतरही त्याच्या पाऊलखुणा या पट्ट्यात विराजमान आहेत. पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या घुमान येथील त्यांचं वास्तव्य प्रसिद्धच आहे. हरिद्वारमधून पंजाबात जाताना त्यांनी काही काळ दिल्लीत घालवला होता. त्याकाळी दिल्ली तशाअर्थानं विशाल पंजाबचाच एक भाग होता. त्यामुळे हरिद्वारपासून पंजाबच्या टोकापर्यंत त्यांचा काहीना काही प्रभाव दिसत राहतोच. त्याची सर्वात मोठी खूण म्हणजे दिल्लीच्या लोधी गार्डन परिसरातलं त्यांचं भव्य मंदिर.

नामदेवांनी दिल्ली येथील मुक्कामी बादशहानं मारलेली गाय जिवंत केल्याची आख्यायिका प्रचलित आहे. या परिसरात या आख्यायिकेसाठीच नामदेव ओळखले जातात, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा चमत्कार घडला तो तेराव्या शतकात तुघलकाबादच्या शेजारी असणाऱ्या जंगलात. आता हा भाग लोधी इन्स्टिट्यूशन एरिया किंवा लोधी गार्डन या नावानं ओळखला जातो. दिल्लीच्या अतिशय उच्चभ्रू भागांपैकी तो एक आहे. त्याचीच स्मृती म्हणून या ठिकाणी आता संतश्रेष्ठांचं भव्य मंदिर उभारण्यात आलं आहे.

नामदेवांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अनेक वर्ष निष्ठेनं करणा-या ‘नामदेव मिशन’ या संस्थेनं हे मंदिर उभारलंय. तेव्हा केंद्रात अर्थमंत्री असणा-या यशवंतराव चव्हाणांनी राजधानीत मराठी ठसा उमटवावा यासाठी जाणीवपूर्वक पावलं उचलली होती. त्यांची मदत या कामात फारच मोठी होती. भक्तीमार्गाची पताका उत्तरेत फडकावणाऱ्या संतश्रेष्ठांच्या मंदिराचं उद्घाटनही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं हा दुग्धशर्करा योगच. दिल्लीची थंडी ऐन भरात असताना १२ नोव्हेंबर १९७२ रोजी नामदेवांच्या ७०२व्या जन्मदिवसाचं औचित्य साधून यशवंतरावांच्या हस्ते या सुंदर मंदिराची फित कापली गेली आणि संतश्रेष्ठांच्या दिल्लीतील वास्तव्याच्या पाऊलखुणा धुंडाळणाऱ्यांसाठी एक नवं दालन उघडलं गेलं.

लोधी गार्डन परिसरात जवळपास सर्व दिल्लीकरांना माहीत असणाऱ्या साई मंदिराच्या शेजारीच नामदेव मिशनचं हे देखणं मंदिर उभं आहे. मंदिरात गेलं, की नामदेव मिशन ट्रस्टचे सचिव श्यामलाल पुरवाह भेटतात. ते आणि त्यांचे सहकारी याच मंदिरात ट्रस्टच्या कार्यालयात बसतात. महाराष्ट्रातून आलो म्हटल्यावर त्यांच्या चेह-यावरचा आनंद लपत नाही. ते मोठ्या आस्थेनं मंदिर दाखवतात. मंदिराच्या दर्शनी भागातच रुद्र आणि रुद्रावताराची प्रतीकं दिसतात. उजवीकडे शिवलिंग आणि डावीकडे मारूतीचं मंदिर.

समोर पाहताच भजन – कीर्तनात लीन असलेली नामदेवांची शुभ्र संगमरवरी प्रसन्न मूर्ती दिसते. प्रसन्न चेहरा, ठाशीव डोळे, डोईवर पुणेरी पगडी, बाराबंदी आणि हाती वीणा या नेहमीच्या वेशात नामदेव महाराज आपल्याला भेटतात. महाराष्ट्रातही नामदेवांची इतकी सुंदर मूर्ती असेल का, अशी शंका येते. मूर्तीच्या उजव्या बाजूला वीटेवर कर कटेवर ठेवून उभ्या श्रीविठ्ठलाची मूर्ती दिसते. पण ती आपल्या विठोबापेक्षा श्रीनाथजीच्या जवळ जाणारी असते. तर डावीकडे संतश्रेष्ठांनी जिवंत केलेल्या गाय आणि तिच्या बछड्याची मूर्ती आहे. या तिन्ही मूर्तींच्या वरच नामदेवांचं घुमान येथील दाढीवालं चित्रही रंगवलेलं आहे. सध्या नामदेवांच्या या मंदिरात पहिल्या मजल्यावरही भव्य मंदिर तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर प्राथामिक शाळा आहे. या शाळेतही संत नामदेवांची भजनं सकाळ-संध्याकाळ मुलांकडून गाऊन घेतली जातात. संस्कार करणारी म्हणून ही शाळा परिसरात खूपच प्रसिद्ध आहे. याशिवाय भजनी मंडळांचाही या भागात मोठा बोलबाला असून गाजलेली भजनी मंडळे संत नामदेवांच्या दरबारात आपली हजेरी लावून जातात.

मंदिराच्या सभागृहाला लागून असणाऱ्या ओवऱ्यांमधून नामदेवांच्या आयुष्यातील प्रसंग दाखविणारी ‘म्युरल्स’ आहेत. या सर्वांचं मोठ्य़ा उत्साहाने वर्णन करताना नामदेव समाजाचा उत्तर भारतातील सांस्कृतिक ठेवा कायम ठेवण्यात मोलाचा वाटा असल्याचं पुरवाह सांगत होते. त्यांच्या मते तुघलकाबाद परिसरात नामदेवांनी गाय जिवंत केल्याची घटना घडली, ती नेमकी याच जागी घडली नाही. पण याच किलो-दीड किलोमीटर परिसरात घडली आहे. ही नेमकी जागा कोणालाच ठामपणे सांगता येत नव्हती. त्यामुळे अखेर या मोक्याच्या जागेवर प्रातिनिधीक मंदिर उभारून नामदेवांच्या दिल्लीतील वास्तव्याच्या स्मृती चिरंतन जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

गाय जिवंत केल्याची आख्यायिका पटो किंवा न पटो, दिल्लीचा विचार करता तिला टाळता येणार नाही. इथल्या लोकांकडून ऐकायला मिळते ती कथा अशी, महाराष्ट्रात चंद्रभागेच्या तीरावर क्रांती केल्यानंतर नामदेव भक्तीमार्गाचा प्रसार करण्यासाठी उत्तरेत आले होते. त्या काळात दिल्लीचं तख्त तुघलकांच्या हाती होतं. मुहम्मद तुघलक या जुलूमी शासनकर्त्यानं या देशातील संस्कृती धुळीला मिळविण्याचा चंग बांधला होता. याचाच एक भाग म्हणून मूर्तीपूजा आणि मूर्तीपुजक यांना नष्ट केलं जात होतं. त्यात नामदेवांची पाळी होती. बादशाहने आपल्या काही विश्वासू सैनिकांना पाठवून नामदेवांना जेरबंद करून दिल्ली येथे आणण्याचा हुकूम दिला. बादशाहच्या हुकुमाची ‘तामिली’ही लगेचच झाली. नामदेवांना बादशाहच्या समोर हाजीर करण्यात आलं. बादशाह नामदेवांना ठार मारायचं याच उद्देशानं बसला होता. परंतु नामदेवांना पाहताच तो हे विसरून गेला. पण त्यानं दिल्लीच्या बाहेर त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले. तेथे मुहम्मद तुघलकाच्या सैनिकांनी नामदेवांना छळायला सुरुवात केली. पण तरीही नामदेवांचं भजन-कीर्तन पूर्वीसारख्याच भावानं सुरू होतं. ही बातमी बादशाहला कळताच तो तावातावानं तिथं आला. त्यानं नामदेवांच्या समोरच एक गाय तिच्या बछड्यासह तलवारीनं मारून टाकली. नामदेवांना त्यानं आव्हान दिलं की, जर ही गाय जिवंत झाली नाही तर पुढची गर्दन तुझी. नामदेवांनी विठ्ठलाचा धावा केला आणि ती गाय-बछड्याची जोडी जिवंत झाली. या घटनेमुळे मुहम्मद तुघलक नामदेवांचा मोठा प्रशंसक झाला आणि त्यानं ईश्वराच्या आराधनेत मग्न असणाऱ्यांना त्रास दिला नाही. याशिवाय त्याच्या राज्यातील गोहत्याही पूर्णपणे बंद झाली. नामदेवांच्या भक्तिमार्गाचा कीर्तीगंध या घटनेमुळे संपूर्ण उत्तर भारतात दरवळण्यास सुरुवात झाली, हे मात्र खरं.

या कथेची आणखी एक थोडी अधिक पटण्याजोगी आवृत्तीही आहे. त्यात नामदेवांसमोर मेलेली गाय आणून टाकली जाते. पण नामदेव सांगतात, की मेलेल्याला जिवंत कसं करता येईल, ते तर देवाचं काम आहे. त्यामुळे नामदेवांना हत्तीच्या पायी देण्याचा आदेश होतो. पण तो पिसाळलेला हत्ती नामदेवांना पाहताच त्यांच्यासमोर लीन होतो. लीन झालेल्या हत्तीचं चित्र पंजाबात प्रसिद्धही आहे. वारकरी संतांनी चमत्कारांचा कायमच विरोध केला आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील चमत्कारांमागचा खरा अर्थ शोधायला हवा. नामदेव हे उत्तम संघटक आणि प्रसारक होतेच. त्यामुळे त्यांनी गोहत्याबंदीचा प्रचार केला. त्याचा प्रभाव तेव्हाच्या शासकांवर पडला आणि त्यांनी गायीची हत्या बंद केली. त्यामुळे अनेक गायींचा जीव वाचला, असा अर्थ या कथेतून काढता येईल.

नामदेवांच्या मंदिरात आलेल्या भाविकांशी संवाद साधतानाही ही कथाच प्रामुख्यानं ऐकायला मिळते. नामदेवांच्या भूमीतून आलोय हे कळताच लोक माझ्याशी आस्थेनं संवाद साधत होते. नामदेवांच्या चरित्रातील अनेक प्रसंग त्यांना माहीत असतात. आप पंढरपूर गए हो क्या, हा प्रश्न मला अनेकांनी विचारला. दिल्लीच्या टिळकनगर परिसरात राहणारे गुरूबक्षसिंह यांनीदेखील माझे महाराष्ट्र कनेक्शन कळताच पंढरपूरचा विषय काढला. जी, मै पंढरपूर गया हूँ…. माझे हे उत्तर ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव तरळले. आप से मिलकर बडी खुशी हुई. मै भी पंढरपूर जाना चाहता हूँ औऱ भगत नामदेवजी के भगवान के दर्शन करना चाहता हूं. मनाच्या कोपऱ्यात दडून असलेली एक सुप्त इच्छा त्यांनी मला आवर्जुन सांगितली. हजारो किलोमीटर दूरवरच्या पंढरीच्या विठ्ठलाची आस नामदेवांनी इथं कशी रूजवली आणि त्याचा प्रभाव आजही कसा टिकून आहे, याचं दर्शन घडलं.

संवादाचा हा सिलसिला असाच सुरू राहिला. जवळपास पंधरा मिनिटांच्या गप्पांत गुरूबक्षसिंह यांनी नामदेवांच्या आयुष्यातील काही प्रसंगाचा आवर्जुन उल्लेख केला. प्रत्येक प्रसंग सांगत असताना त्यांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रुंना ते रोखू शकले नाहीत. मला याचं खरंच अप्रूप वाटत होतं. मी विचारलं, गुरूबक्षजी, आप सिख्ख हो, ग्रंथसाहब मे नामदेव का कितना महत्त्व है? माझ्या प्रश्नावर गुरूबक्ष यांनी एक मोठा पॉझ घेतला. डोळे बंद केले आणि म्हणाले, मैं ज्यादा कुछ नहीं जानता बस्स इतना जानता हूँ, गुरूग्रंथसाहिब को मत्था टेंक दिया तो नामदेव को भी टेक दिया…

हीच आदराची भावना नामदेवांच्या वृंदावन येथील मंदिरातही दिसून येते. वृंदावनच्या गोवर्धन या भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या तीर्थक्षेत्रात हे नामदेवांचं प्रसिद्ध मंदिर आहे. राजस्थान येथील एका नामदेव भक्तानं हे मंदिर बांधलं आहे. गोवर्धनचा राधा कुंड हा परिसर मंदिरांसाठीच प्रसिद्ध आहे. त्यातल्या या उंच कळसाच्या मंदिरात नामदेवांची सुंदर मूर्ती आहे. त्यांच्याच शेजारी सावळा विठ्ठल पण शुभ्र रुक्मिणीची मूर्ती आहे. या मूर्ती खूपच उंच आहेत. शिवाय हरिद्वार येथील जस्साराम रोड येथेही नामदेवांच्या नावानं एक प्रसिद्ध धर्मशाळा आहे. पण तिथं संत नामदेवांपेक्षाही नामदेव समाजाच्या यात्रेकरूंची सोय म्हणून ही धर्मशाळा बांधण्यात आली आहे. हरिद्वार शहरापासून जवळच ज्वालापूर नावाच्या खेड्यात नामदेवांच्या स्मरणार्थ एक जुना मठ असल्याचं सांगण्यात आलं. नामदेवांनी तिथं वास्तव्य केलं होतं, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. शिवाय उत्तर प्रदेश आणि उत्तरांचलमधल्या शहापूर, महंमदपूर देवमल, पाकवडा, छपरोली, भगवानपूर, सारंगा येथे नामदेवांची देवळं असल्याची माहिती नामदेवांचे अभ्यासक ग. वि. कविटकर यांच्या एका लेखात सापडते. तसंच हरियाणातल्या भिवानी येथेही नामदेवांची दोन मंदिरं असल्याचं त्यांनी नोंदवून ठेवलं आहे.

हरियाणातच सूरजकुंड येथेही एक धर्मशाळा आहे. तसंच हिमाचल प्रदेश, जम्मू या पंजाबी प्रभावातील राज्यांमध्येही नामदेवांची छोटी मंदिरं आहेतच. नामदेव शिंपी समाज हा जिथं जिथं थोड्याफार संख्येनं आहे, तिथं त्यांनी नामदेवांचं मंदिर बांधलेलं आहे. गुरगाव या दिल्लीला लागून असलेल्या हायफाय शहरात ‘नामदेव जागृती मिशन’ नावाची संस्था काम करते. त्यात त्यांनी नामदेवांची माहिती देणारं डॉ. निशिकांत मिरजकर यांचं पुस्तकही छापलेलं आहे. तसंच या सगळ्या परिसरात फिरताना नामदेव नाव असलेली दुकानंही अधूनमधून दिसत राहतात.

0 Shares
नामदेवे रचिला (शीख धर्माचा) पाया म्हारो नामदेव