नामदेवे रचिला (शीख धर्माचा) पाया

नीलेश बने

महाराष्ट्र से आया हूँ, बाबा नामदेवजी पर पढाई कर रहा हँ... अशी ओळख करून दिली की घुमानमधील अनेकांच्या चेहर्या वरील भाव बदलायचे. कोणीतरी ‘आपला’ दूरून भेटायला आल्यानंतर जसं वाटतं, तशी भावना त्यांच्या बोलण्या-वागण्यातून जाणवायची. उरलेल्या पंजाबमध्येही अनेक ठिकाणी असाच अनुभव आला. ही सारी संत नामदेवांची पुण्याई होती. ते आपल्या आयुष्याची शेवटची २० वर्षे पंजाबमध्ये होते. गुरू नानकदेवांनी शीख धर्माची स्थापना करण्याआधी सुमारे २०० वर्षे त्यांनी पंजाबी समाजात समतेचे, मानवतेचे अंकुर फुलवले. म्हणूनच पवित्र गुरुग्रंथसाहेबात नामदेवांची ६१ पदं आहेत. शीख धर्मात दहा गुरूंप्रमाणेच प्रातःस्मरणीय असणार्यार १५ भगतांमध्ये नामदेवांना ‘भगत शिरोमणी’ म्हणून ओळखलं जातं. गुरू अर्जुनदेवांनी तर ‘नामे नारायणे नाही भेद’, असं सांगत नामदेव आणि परमेश्वरामधील अंतरच संपवलं. आज साडेसहाशे वर्षानंतरही पंजाबी मनात असलेलं त्यांचं स्थान फार मोठं आहे. ते पाहिलं की, ‘नामदेवांनी शीख धर्माचा पाया घातला’ या अभ्यासकांच्या मताची मनोमन साक्ष पटते... सांगताहेत, थेट पंजाबमध्ये जाऊन नामदेवरायांचा शोध घेऊन आलेले ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वेबसाईटचे प्रमुख नीलेश बने...

पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान हे तसं गावही नाही आणि शहरही नाही… पंजाबात त्याला `कसबा` म्हणतात. मराठीत आपण बाजारपेठेचं गाव म्हणतो तसं. गावात दुकानं, दुकानांच्या वर किंवा मागे राहती घरं. ज्यांची दुकानं नाहीत त्यांची नुसतीच घरं आणि गावाभोवती लांबचलांब पसरलेली शेतं, असं हे गाव. गावातल्या प्रत्येक दुकानात आणि प्रत्येक घरात एक दाढीवाल्या बाबांचा फोटो, डोक्यावरील केसांचा बुचडा बांधलेला आणि हातात जपमाळ घेतलेला…

ते म्हणतात हा बाबा नामदेवांचा फोटो… पण आपल्याला हे नामदेव वेगळेच भासतात. चकाचक दाढी करून बा विठ्ठलापुढे वीणा वाजवत कीर्तन करणार्यां नामदेवांचा फोटो आपल्याला परिचयाचा. त्यामुळे त्यांचा हा पंजाबी अवतार पूर्णपणे अनोळखी वाटतो. पण संपूर्ण पंजाबमध्ये नामदेव याच रूपात भेटत राहतात. अगदी घुमानमध्ये जेथे बाबा नामदेवांची समाधी असल्याचं पंजाबी लोक मानतात, त्या अंतिम स्थानावरही याच रूपातील त्यांची सोन्याची प्रतिमा घडवण्यात आलीय.

त्यांचा हा फोटो घुमानमधील नामदेव दरबार कमिटीने तयार केलाय. या मंदिराची देखरेख सध्या ज्यांच्या घरात आहे ते सुखबीर सिंग सांगतात की, `त्या काळी फोटोग्राफी कुठे होती? पण बाबा नामदेव पंजाबात राहिले तेव्हा त्याची जीवनपद्धती एखाद्या तपस्वी साधूसारखी होती. तेव्हापासून रूढ असलेल्या बाबाजींच्या प्रतिमेवरून हे चित्र तयार करण्यात आलंय. पण आम्ही महाराष्ट्रातील बाबाजींचं चित्रही आमचं मानतो. आखिर जैसा देश वैसा वेश`.

सुखबीरजींच्या या उत्तरानंतर डोक्यात विचार येतो… संत नामदेव पंजाबात जवळपास वीस वर्षं राहिले. पंजाबी भाषा शिकले. आपल्याला आजही पंजाबी भाषा सहजगत्या कळत नाही. नामदेवांनी ती त्या काळात आत्मसात केली. तिथलं हवामान, खाणं-पिणं, जगणं-वागणं सारं सारं स्वीकारलं. शेतात राबणार्याज कष्टकरी पंजाबी माणसांमध्ये ते विरघळून गेले. त्यांनी जर एवढं केलं तर त्या काळी सर्वसामान्य पंजाबी शेतकर्या.चा पेहराव स्वीकारला नसणार?

हळहळू फोटोतील दाढीवाल्या बाबा नामदेवांची ओळख घट्ट होऊ लागते आणि संत नामदेव ते बाबा नामदेव हा प्रवास सुरू होतो…

भगत शिरोमणी नामदेव, बाबा नामदेव किंवा नुसतंच बाबाजी… अशा नावांनी पंजाबी माणूस संत नामदेवांना हाक मारतो. पण आपल्या मराठी जीभेला ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ याप्रमाणं फक्त नामदेव अशी फक्त नावानं हाक मारण्याची सवय. त्यामुळे `नामदेव यहां पे आये तब…`, `यहां नामदेव पंजाबी सिख गये`, अशी हिंदी भाषांतरीत वाक्यं तोंडातून यायची. मग बोलताबोलताच लक्षात यायचं की, फक्त नामदेव असा उल्लेख इथं उद्धटपणा ठरू शकतो. मग प्रत्येक वेळी बोलताना नामदेव शब्द आला की पुढे `जी` जोडायचा आणि `नामदेवजी` करायचं. पण भाषेची ही अडचण शरीराप्रमाणं मनानंही हट्टेकट्टे असणार्या नामदेवांच्या पंजाबी भक्तांनी समजून घेतली आणि नामदेवांचा हा पंजाबमधला शोध सोपा झाला.

जालंधरहून बियास, बियासवरून मेहता आणि तिथून हरगोविंदपूरकडे जाणार्याब रस्त्यावर असलेलं घुमान… घुमान नाक्यावर सायकल रिक्षावाल्याला सांगितलं, बाबा नामदेवजी के गुरुद्वारा जाना है… त्यानं `भगत नामदेव जी यादगारी गेट` असं लिहिलेल्या भव्य कमानीतून आत नेत अगदी गुरुद्वाराच्या दारावर रिक्षा उभी केली. आत शिरलो तर समोरच गुरुद्वाराचं ऑफिस दिसलं. बूट उतरवून आत शिरण्याआधीच एक वयस्कर गृहस्थ सामोरे आले. ओळख करून देण्यापूर्वीच प्रेमानं म्हणाले, `दूरसे आए दिखते हो. पहले पीठ से बॅग उतारो. थंडा पानी पी लो. बाद मे बात करेंगे`. जणू पंजाबमध्ये वसलेले नामदेव `त्यांच्या` महाराष्ट्रातून आलेल्या माणसाची `आपुलकीनं` विचारपूस करताहेत असा भास झाला.

ओळख करून देण्याचा कार्यक्रम झाला आणि म्हटलं, ‘आजचा दिवस इथं कुठं आसपास राहायची व्यवस्था होईल का?’ प्रश्न पूर्ण होण्याआधी उत्तर आलं… ‘इधर-उधर क्यू, यहां ही रह जाओ. जितना मर्जी है उतने दिन रहो.’ लगेच ते गृहस्थ उठलेही. म्हणाले, ‘चलो’. समाधी मंदिराच्या परिसरातच यात्रेकरूंसाठी राहायची व्यवस्था केली होती, तेथील एक खोली उघडून दिली. आणि म्हणाले, ‘अब यहां सामान रखो. और जितनी पढाई करनी है, उतनी करो. आप बाबाजी के लिए काम कर रहे हो, तो आपकी मदद करना हमारा काम है’. त्यांची ही भावना पाहून मला ‘सर्वाभूतीं केशव’, असं सांगणार्या नामदेवांनी इथे काय रुजवलंय त्याचं दर्शन घडलं… तेही त्यांच्या पंजाबमधल्या स्मृतिंचं दर्शन घेण्याआधीच.

‘बाबा नामदेवजी का गुरुद्वारा’ म्हणून ओळखला जाणारा हा परिसर तसा बराच मोठा आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरण्याआधी डावीकडे एक तलाव आहे. सरळ आत शिरणार्याी माणसाला तो पटकन दिसत नाही, मुद्दाम पाहावा लागतो. आत आल्यानंतर उजवीकडे आंघोळ करण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहं आहेत. दर्शनाला जाण्याआधी प्रत्येकानं स्वच्छ होऊन आत जावं, अशी अपेक्षा आहे. इथे गुरुद्वारा आणि मंदिर असा अनोखा संगम आहे. त्यामुळे आत उघड्या डोक्यानं जाऊ नका, असं सांगितलं जातं. डोक्यावर किमान रुमाल बांधा, अशी विनंती केली जाते.

मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला शुभ्र रंगातील इस्लामी पद्धतीची घुमटी दिसते. बादशाह तुघलकच्या चुलतभावानं हे मंदिर बाधलं असल्यानं त्याची रचना अशा पद्धतीची आहे, असं इथल्या विश्वस्तांचं म्हणणं आहे. पायर्यार उतरून मंदिरात शिरलो की, षटकोनी चौथर्यांवर योगीरूपातील बाबा नामदेवांची सुवर्णप्रतिमा दिसते. त्यापुढ्यात एक शीला असून, त्यावर कायम रेशमी वस्त्र पांघरलेलं असतं. त्याखाली पंजाबी म्हणजे गुरूमुखी लिपीत लिहिलंय… अंतिम समाधी.

नामदेवांनी या इथे अखेरचा श्वास घेतला आणि आपली इहलोकीची यात्रा संपवली, असं पंजाबी लोकांचं म्हणणं आहे. पण महाराष्ट्रात मात्र पंढरपूरातील विठ्ठल मंदिराच्या पायरीवर नामदेवांची समाधी असल्याचा विश्वास आहे. आयुष्याची अखेरची सुमारे वीस वर्ष नामदेव पंजाबात होते. तिथून फक्त समाधी घेण्यासाठी ते पंढरपूरला आले यावर त्यांच्या पंजाबी भक्तांचा विश्वास नाही. ते म्हणतात, इथेच घुमानमध्येच त्यांचं महानिर्वाण झालं. पण महाराष्ट्रातील श्रद्धेनुसार आणि रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या संशोधकांच्याही मतानुसार, नामदेव पंजाबमधील आपलं कार्य संपवून अखेरीस महाराष्ट्रात आले आणि त्यांनी पंढरपूरात समाधी घेतली.

ज्या भागवतधर्माची पताका खांद्यावर घेऊन नामदेव पंजाबमध्ये गेले, त्या भागवतधर्माचं केंद्र असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाचं अखेरीस दर्शन व्हावं, आपल्या आईची सेवा व्हावी ही नामदेवांची आस होती, असं ढेरे यांचं म्हणणं आहे. त्यासाठी ते ‘नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे वरी देती’ या नामदेवांच्याच अभंगासह, परिसा भागवत, गोंदा-विठा ही नामदेवांची मुलं आदींच्या वचनांची साक्ष देतात. त्यामुळे पंजाबला निरोप देऊन नामदेव अखेर पंढरीला आले आणि समाधिस्थ झाले, हे ढेरे नि:संदेहपणे मांडतात.

नामदेवांच्या पुण्यतिथीच्या तारखाही पंजाब आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या आहेत. पंजाबमध्ये माघ शुद्ध द्वितीया ही पुण्यतिथी मानली जाते. घुमानमध्ये दरवर्षी या दिवशी मोठा उत्सवही होतो. गावात जत्रा भरते, समाधी मंदिरावर रोषणाई केली जाते. पण महाराष्ट्रात मात्र आषाढ वद्य त्रयोदशी हीच नामदेवांची पुण्यतिथी म्हणून ओळखली जाते. पंजाबमधील पुण्यतिथीचं नक्की वर्ष कोणतं, यावरही मतमतांतरं आहेत. पण ढेरे यांच्या मते, नामदेवांनी पंजाब सोडले तो दिवस पंजाबमध्ये त्यांचा अखेरचा दिवस म्हणून ओळखला जातो, तर महाराष्ट्रात त्यांनी समाधी घेतला तो दिवस पुण्यतिथी म्हणून पाळली जाते.

असं असलं तरी पंजाबला निरोप देणं हेदेखिल नामदेवांसाठी अवघड गेलं असणार. त्यामुळे त्यांनी सर्वांना न सांगता पंजाब सोडलं असेल, अशीही एक शक्यता वर्तवली जाते. पण दुसरीकडे, नामदेवांच्या अस्थी किंवा फुलं पंजाबमधून महाराष्ट्रात नेऊन ती पंढरपूरच्या पायरीवर ठेवून त्यांची समाधी उभारली असेल, असं पंजाबी भक्तांचं म्हणणं आहे. त्यामुळे नामदेवांची नक्की समाधी कोणती यावर पंजाब आणि महाराष्ट्रातील भक्तांमध्ये मतभेद आहेत, पण वाद नाही… आणि या मतभेदामुळे त्यांच्या श्रद्धेला किंचितही बाधा पोहचत नाही.

या समाधीच्या मुद्दयावर नामदेव मंदिरातील पूजेची जबाबदारी सांभाळणार्यार भाई काश्मीर सिंग यांना विचारलं. त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे खर्याश अर्थानं, या मतभेदावर उमटवलेला समन्वयाचा पूर्णविराम आहे. ते म्हणाले की, ‘बेटा, बाबाजीकी एक कहानी सुनाता हूं. एक कुत्ता एक दिन रोटी लेके भागा. तो बाबाजी उसके पिछे घी की बाटी लेके भागे. बोले, सुखी रोटी कैसे खाओगे? बाबाजी को दुनिया के हर जीव में, हर जगह में भगवान दिखता था. अब जिसे हर जगह भगवान दिखते है, वो यहां भी हो सकते है और पंढरपूर में भी…’’

नामदेवांच्या या पंजाबमधील समाधीमंदिराच्या घुमटाच्या आतील बाजूवर त्यांच्या आयुष्यातील प्रसंग चितारण्यात आले आहेत. यात वर सांगितलेल्या कुत्र्याची गोष्टही आहे. पण आणखीही मजेशीर आणि चमत्काराने भारलेल्या गोष्टी आहेत. या गोष्टी भाई काश्मीर सिंहांनी सविस्तर सांगितल्या. महाराष्ट्रात जशा ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखे वदवलेले वेद, चालविलेली भिंत, तुकारामांचे वैंकुठगमन अशा कथा सर्वांना माहीत आहेत, तसंच नामदेवांच्या या कथा इथल्या प्रत्येकाला पाठ आहेत. या कथा ऐकताना, संतमहात्म्यामध्ये या चमत्कारांच्या गोष्टी अपरिहार्य असतात का, असा प्रश्न डोक्यात भूणभूण करत होता. पण लोकांमध्ये संतविचारापेक्षा या कथाच अधिक लोकप्रिय असतात. त्या किती खर्याप किती खोट्या हे सिद्ध करण्यास कोणताच पुरावा नाही. पण या कथांमधून संत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचले हे मात्र नाकारता येत नाही.

नामदेवांच्या या कथांमधून चमत्काराचा भाग काढला तरी त्यातून त्यांच्या पंजाबमधल्या स्मृती नोंदल्या गेल्या आहेत, हेही आवर्जुन समजून घ्यायला हवं. याच घुमटावरील चित्रांचा संदर्भ देत काश्मीर सिंग सांगत होते, एकदा नामदेवांची लोकप्रियता पाहून दिल्लीच्या बादशाहानं त्यांना दरबारात बोलावलं. त्यांच्यापुढे एक मेलेली गाय आणली आणि सांगितलं की, तुम्ही स्वतःला तपस्वी म्हणवता ना? मग ही मेलेली गाय जिवंत करा. नामदेवांनी बादशाहाला सांगितलं, जीवन आणि मरण परमेश्वराच्या हातात आहे, माझ्या हातात नाही. या गाईला जिवंत करणं मला शक्य नाही. नामदेवांच्या या उत्तरावर बादशाह चिडला. त्यानं नामदेवांना सांगितलं, तुम्ही गाय जिवंत केली नाहीत, तर तुम्हाला हत्तीच्या पायी देईन. नामदेव आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर राजानं पिसाळलेला हत्ती बोलावला. पण ध्यानस्थ बसलेल्या नामदेवांजवळ हत्ती आल्यावर तो शांत झाला. त्यानं मारण्याऐवजी नामदेवांपुढे डोकं झुकवलं. नामदेवांची ही शक्ती पाहून राजा अवाक् झाला आणि त्यानं नामदेवांची माफी मागितली.

या कथेमधील हत्तीचा चमत्कार सोडला तरी, दिल्लीवरून नामदेव अमृतसरजवळच्या भूतविंड गावात आले, असं काही संशोधकांचंही म्हणणं आहे. त्यामुळे या कथांमधूनही नामदेवांच्या उत्तरेतील प्रवासाचे संदर्भ सापडतात, असंही म्हणता येतं. याच घुमटावरील चित्रांमध्ये नामदेवांची महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली औंढा नागनाथाचं मंदिर फिरवल्याच्या कथेसह बादशाहाची आणखी एक कथा चितारली आहे.

काश्मीर सिंहांनी तीही कथा सांगितली. म्हणाले, एकदा बादशाहानं बाबा नामदेवांना झोपायला बिछाना पाठवला. तर बाबाजींनी समोरच्या नदीमधून हात फिरवला आणि अनेक बिछाने तरंगत येऊ लागले. ते पाहताच बाबाजी बादशाहाला म्हणाले, माझ्यासाठी अनेक बिछाने आहेत. पण माझ्यासारख्या साधकाने बिछान्याचा मोह बाळगून कसं चालेल? त्यामुळे मला तुमचा हा बिछाना नको.

नामदेवांच्या अनासक्त संन्यस्त जीवनाचे दर्शन घडविण्यासाठी कथाकारांनी ही कथा रचली असणार, हे कोणत्याही सूज्ञ माणसाला मान्य होईल. पण या कथांनीच भारतीय संस्कृती पिढ्यानपिढ्या पुढे सोपवली आहे, हे विसरून चालणार नाही. नामदेवांच्या या चित्रमालिकेत बालपणी वाघासोबत खेळणारे नामदेव तसंच चुलीमध्ये जाऊनही काहीही न होणारे नामदेव असे चमत्कारही दाखवण्यात आले आहेत.

या सर्व चित्रांमध्ये आणखीही एक चित्र आहे… ते चित्र पाहिलं आणि आत खोल खोल कुठेतरी काहीतरी जाणवलं… मराठी मन शहारून उठलं… ते चित्र होतं, विठ्ठल कीर्तनात तल्लिन झालेल्या नामदेवांचं… लहानपणापासून नामदेवांचं जे चित्र पाहत आलो ते हेच चित्र… आपण ज्या ‘आपल्या’ नामदेवांच्या शोधासाठी इथपर्यंत आलो ते हेच, ही खूणगाठ पटली आणि हात आपोआप जोडले गेले.

जोडलेल्या हातांसोबत डोक्यात विचारांचे कल्लोळ सुरू होते… नामदेव जन्मले ते महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी कुठे? नामदेवांचा निजध्यास असलेलं पंढरपूर कुठे? आणि नामदेवांनी आपल्या अमोघ वाणीनं जिंकलेलं पंजाब कुठे? भूगोलाच्या भाषेत पाहायचं तर सुमारे दीड हजार किलोमीटरचं हे अंतर. आजही घुमानमध्ये येण्यासाठी करावा लागणारा प्रवास खूप मोठा आहे. चौदाव्या शतकात कोणतीही दळणवळणाची साधनं नसताना नामदेवांनी हा प्रवास कसा केला असेल? अशी काय प्रेरणा असेल जी त्यांना इथवर घेऊन आली.

‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हा नामदेवांचाच संकल्प. त्याचसाठी त्यांनी देशभर यात्रा केल्या. हरिद्वारवरून नामदेव दिल्लीत आणि तेथून पंजाबमधील भूतविंड या गावात आले. या गावात त्यांना त्यांचा पंजाबातील उत्तराधिकारी बाबा बोहरदास भेटले. हेच बाबा बोहरदास अखेरपर्यंत नामदेवांसोबत होते. त्यांनीच नामदेवांचं पंजाबमधील कार्य त्यांच्या पश्चात सुरू ठेवलं. आज घुमानमध्ये असलेलं त्यांचं स्मृतिमंदिर आधी याच बाबा बोहरदासांनी उभारलं आणि मग बादशाहाने त्याला भव्य स्वरूप दिलं, असं सांगतात.

घुमानमधील नामदेवांच्या समाधी मंदिराशेजारीच या बाबा बोहरदासांचंही छोटं समाधी मंदिर आहे. मंदिराबाहेर अखंड तेवत राहणारा दीप आहे आणि त्या दिव्यासमोर एक डांळिंबाचं झाड आहे. हे झाड नामदेवकालीन असल्याचं सांगतात. त्याला तिथे ‘पुरातन समय की निशानी, बुटा अनार’, असं म्हणतात. तो तिकडचा अजानवृक्षच. त्याची पूजा-अर्चनाही केली जाते. पण एखादं झाड एवढी वर्ष कसं जगलं असेल, अशी शंकेची पाल मनात चुकचुकत राहते. अखेर कितीही काही म्हटलं तरी, श्रद्धेपुढे बुद्धी चालत नाही, हेच खरं.

नामदेवांच्या या मंदिरासमोर गुरुद्वारा आहे. हा बाबा नामदेवजी का गुरुद्वारा… म्हणजे नामदेवांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेला गुरुद्वारा. साधारणतः पाचशे माणसे बसतील एवढ्या मोठ्या सभागृहात, दर्शनी चौथर्यासवर महिरपीत शीख धर्माचा आदिग्रंथ गुरुग्रंथसाहेब ठेवला आहे. सभागृहाच्या उजव्या भिंतीवर शीख धर्माचे दहा गुरू तर डाव्या भिंतीवर नामदेवांसह १५ भगतांचे फोटो लावले आहेत. सभागृहाच्या डाव्या बाजूला याच गुरूग्रंथसाहेबाचे तिन्ही त्रिकाळ अखंड वाचन सुरू असतं. तिथे नामदेवांची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली आहे.

गुरुद्वारामध्येच आत उजवीकडे राधाकृष्णाचं छोटेखानी मंदिर आहे. शीख धर्माचा गुरुद्वारा आणि हिंदू धर्माचं मंदिर असा हा इथे दिसणारा संगम फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो, असं इथल्या विश्वस्तांचं म्हणणं आहे. आज जिथे राधाकृष्णाचं मंदिर आहे, तिथे आधी विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती होत्या. पण कालांतरानं त्या झिजल्या. त्याजागी राधाकृष्णाच्या या मूर्ती बसविण्यात आल्या, असंही काहींचं म्हणणं आहे. या मंदिराच्या मागील बाजूस हनुमानाची छोटीशी घुमटी आहे. शेजारी शिवमंदिरही आहे. ‘नामा म्हणे शिव विष्णु एकरूप, ताराया अमूप अवतार’, असं सांगत शैव-वैष्णवांचा वाद संपवणार्या नामदेवांनी पंजाबातही विठ्ठल आणि शिवलिंग एकत्र स्थापित केले असावेत, असा अंदाज आहे. या मंदिरातही आम्ही गुरुद्वारातील नित्योपचारांप्रमाणेच नियमित पूजा-आरती करतो, असं इथले पुजारी सांगतात.

मंदिर परिसरात आणखीही काही छोट्या समाध्या आहेत. त्या बोहरदासांच्या कुटुबातील आणि नामदेवांच्या शिष्यपरिवारातील भक्तांच्या आहेत, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. शेजारी कीर्तन-भजनासाठी सभागृह, यात्रेकरूंच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी छोटी धर्मशाळा आहे. मंदिराबाहेर `नामदेव भवन` नावाचं मोठं सभागृह आणि `नामदेव विद्यालय` नावाची एक शाळाही आहे. एकंदरित हा सारा परिसर तुम्हाला पदोपदी नामदेवांचं नाममहात्म्य सांगत राहतो.

या मंदिराच्या आसपासही देवस्थानची जमीन आहे. तेथे असलेल्या दुकानांमधून मंदिराला उत्पन्न मिळतं. तिथंच गुरुदयाल सिंग यांचं शिलाईकामाचं दुकान आहे. पंजाबी मजबूत देहयष्टीला अपवाद ठरतील, असा त्यांचा सडपातळ बांधा आणि जेमतेम पाच-साडेपाच फूट उंची… पण चेहरा सतत हसतमुख. त्यांच्या शिलाईच्या मशीनच्या मागेच नामदेवांचा फोटो आहे. त्यांचं शिलाईचं काम सुरू होतं आणि पाठी नामदेवांचा फोटो ही मांडणी पाहून नामदेवांनी स्वतःची करून दिलेली ओळख आठवली…

शिंपीयाचे कुळीं, जन्मा माझा जाला |
परि हेतु गुंतला | सदाशिवी ||

`सदाशिवी` या शब्दावर कोटी करत नामदेवांनी या अभंगात आपल्या शब्दसामर्थ्याची चुणूक दाखवली आहे. त्याच नामदेवांची व्यावसायिक परंपरा सांभाळणार्यार या गुरुदयालजींच्या दुकानात जायलाच हवं, असा विचार मनात आला आणि आत शिरलो. ओळख करून दिली आणि म्हटलं तुमचा एका फोटो काढू का? त्यांनी विचारलं, माझाच का? त्यावर काय उत्तर देऊ हे कळत नव्हतं. अखेर त्यांना सांगितलं, की बाबाजी एक दर्जी के घर पैदा हुए थे, और आप भी दर्जी का काम करते है. मुझे ये संजोग अच्छा लगा, इसलिए… त्यावर ते सहजगत्या म्हणाले, की हां मुझे पता है, बाबाजी दर्जी के घर पैदा हुए थे. पर उन्होने सिर्फ कपडो के तुकडे नही, इन्सान को इन्सान से जोडा है…

नामदेवांनी परस्परांशी गुंफलेली ही धाग्याची वीण सार्याे घुमानमध्ये पाहता येते. खरं तर हे संपूर्ण गावच नामदेवांनी वसवलं, असं सांगतात. इथे आधी जंगल होतं. गावाजवळ असलेल्या भट्टिवाल या गावातून नामदेव या जंगलात येऊन वसले. त्यांच्या येण्यानंतर लोकांची वर्दळ वाढली. त्यांच्या भक्तांची वस्ती आसपास होऊ लागली आणि बघताबघता घुमान नावारूपाला आलं. नामदेव घुमत घुमत म्हणजे देशभर फिरत इथे आले आणि स्थिरावले म्हणून `घुमान` किंवा घुमान आडनावाचे भक्त इथे त्यांच्या सेवेसाठी राहत होते म्हणून `घुमान`, अशा या गावाच्या नावाच्या दोन उत्पत्त्या सांगतात. कारण इथले काही जण आपलं आडनावच घुमान असं लावतात. काही असो, पण आज जसं पंढरपूर म्हणजे विठ्ठल तसंच घुमान म्हणजे बाबा नामदेव, असं समीकरण बनलं आहे.

या घुमानच्या आसपासही नामदेवांच्या आणखी काही खाणाखुणा सापडतात. घुमानच्या मंदिराच्या मागे एक-दीड किलोमीटरवर `तपियाना` म्हणून गुरुद्वारा आहे. येथे नामदेव तप करत बसायचे म्हणून हे तपियाना. हे तपस्थान पाहण्यासाठी काही पायर्याय खाली उतरून जावं लागतं. तिथं असलेल्या ध्यानगुंफेवर आता काचेची दारं लावण्यात आली आहेत. या ध्यानगुंफेवर तीन अधिक तीन असा सहा मजली उंच मिनार उभाण्यात आला असून, तळ मजल्यावर नामदेवांची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. शेजारीच `तपियाना साहेब गुरुद्वारा` असून समोर पाण्याचा तलावही आहे.

घुमान आणि तिथला परिसरात फिरता फिरता दिवस संपला होता. नामदेव मंदिराच्या पाठी सूर्य अस्ताला चालला होता आणि गावातले अनेकजण गुरुद्वारामध्ये जमू लागले होते. यातील काही दर्शनाला येत होते तर काही सेवेसाठी. सेवा ही शीख धर्मात पूजेएवढीच, किंबहुना त्याहून महत्त्वाची मानली जाते. त्यासाठी कोणतंही काम ते कमी मानत नाहीत. कुणी कचरा काढला, कुणी लादी पुसली, कुणी दिवाबत्ती केली तर कुणी सतरंज्या बदलल्या… पाहता पाहता चित्र पालटलं. रात्रीची पूजा झाली आणि साडेनऊ-दहाच्या सुमारास गावचा दिवस संपू लागला. तितक्यात भाई काश्मीर सिंग भेटले. त्यांना विचारलं, उद्या सकाळी किती वाजता उठणार? म्हणाले, सुबह साडेतीन बजे. आप भी उठ जाओ. देखो तो सही कैसा शुरू होता है यहां का दिन.

पहाटे साडेतीन… हे ऐकूनच धक्का बसला होता. पण म्हटलं नक्की उठायचं. मोबाइलवर अलार्म लावून उठलो. बाहेर डोकावून पाहिलं तर मंदिर परिसराला जाग आली होती. सकाळचे सेवेकरी येऊन साफसफाई करत होते. आंघोळ आटपू म्हणून बाहेर पडणार तोच भाई काश्मीर सिंगांची हाक ऐकू आली, `उठ गये, बढिया है, चलो तय्यार हो जाओ`. आवराआवर होईपर्यंत साफसफाई संपली होती. मंदिरात आणि गुरुद्वारात पूजेचे सूर ऐकू येऊ लागले होते. गुरुद्वारात अहोरात्र सुरू असलेले पठण सुरूच होतं. पण त्यात आता गुरुमुखीतील भजनाचे सूर मिसळले होते. हळूहळू सर्वांना ऐकू येतील एवढ्या आवाजात स्पीकरवरून गुरुग्रंथसाहेबमधील रचनांचं पठण सुरू झालं. त्याचा अर्थ कळत नसला तरी त्या मंगल स्वरांनी ती पहाट अविस्मरणीय केली होती.

घुमानपासून गाडीमार्गानं साधारणतः १५ मिनिटांच्या अंतरावर भट्टिवाल नावाचं गाव आहे. नामदेव भूतविंडवरून आधी मरडमध्ये आणि तिथून या भट्टिवाल गावात आले, असं सांगतात. येथील गावक-यांनी नामदेवांना आपले हाल सांगितले. गावासाठी पाणी नाही आणि त्यामुळे सार्याप गावात अंदाधुंदी माजल्याचं चित्र नामदेवांना आढळलं. त्यांनी एका जागेकडे बोट दाखवत सांगितलं, की इथे तलाव खणा… गावक-यांनी तलाव खणण्यास सुरुवात केली आणि चक्क बारमाही पुरेल एवढा पाण्याचा साठा सापडला. गावक-यांनी त्या तलावाला नाव दिलं… नामियाना… आजही तो तलाव याच नावानं ओळखला जातो.

नामियानाच्या बाजुलाच नामियाना साहेब गुरुद्वारा उभारण्यात आलाय. त्याच्यासमोर एक ध्यानगुंफा असून, तेथे नामदेवांची ध्यानस्थ मूर्ती आहे. येथे नामदेव महाराज तप करत असल्याचं स्थानिक सांगतात. नामियानामध्ये स्नान केल्यास अनेक रोग बरे होतात, क्लेश दूर होतात, अशी गावक-यांची श्रद्धा आहे. त्यामुळे दर रविवारी येथे आजूबाजूच्या गावातील लोकांची गर्दी जमते. या गर्दीची सेवा करण्यासाठी लोक येतात. मग लंगर लागतो आणि सहभोजनही होतं.

‘नामियाना’ पाहायला पोहचलो तेव्हा नेमका रविवार होता. सोमवारी शंकराच्या देवळात गर्दी होते तशी गर्दी होती. या गुरुद्वारामधील सर्व व्यवस्थापन जे पाहतात, ते महाराष्ट्रातील आहेत, मराठी उत्तम बोलतात, असं कळलं होतं. त्यामुळे त्यांना भेटण्याची कमालीची उत्सुकता होती. पंजाबमध्ये आल्यानंतर कोणाशीही मराठीत बोलता आलं नव्हतं त्यामुळे ‘आपल्या भाषेचा भेटो कोणी’ ही भावना उचबंळून आली होती. तिथे पोहचलो आणि एकाला विचारलं, ‘बाबाजीसे मिलना है, कहां मिलेंगे?’ ते म्हणाले, ‘चलिये, मै दिखाता हूँ’… आम्ही गुरुद्वाराशेजारीच असलेल्या एका बैठ्या चाळवजा इमारतीत गेलो. तेथील एका खोलीकडे बोट दाखवत ते म्हणाले, ‘वोह रहे बाबाजी’

खोलीच्या दरवाजातूनच विचारलं, ‘आत येऊ का?’… ‘या, बसा’, असं शुद्ध मराठीतूनच उत्तर आलं आणि त्यांनी सतरंजीकडे हात दाखवला… मी मांडी घालून बसलो. अस्सल पंजाबी पद्धतीनं वाढवलेली दाढी, डोक्यावर पंजाबी शेतकरी बांधतो तसं मुंडासं, पंजाबी पद्धतीचाच झब्बा आणि धोतर… गादीशेजारील टेबलावर नामदेवांचा फोटो, गुरू गोविंदसिंगांचा फोटो आणि काही पोथ्या वगैरे… घरात थोडेसं सामान… त्यामुळे आपल्यासमोर गादीवर बसलेले हे आजोबा मराठी आहेत, असं नुसतं पाहून कोणालाही खरं वाटणार नाही.

ओळख वगैरे झाल्यानंतर म्हटलं की, ‘पंजाबात आल्यापासून पहिल्यांदाच मराठीतून बोलतोय. आतापर्यंत अनेकांच्या तोंडून नामदेवांच्या पंजाबमधील कार्याबद्दल ऐकलंय. पण खरंच सांगतो, त्यातील काही गोष्टी भाषेमुळे कळल्या नाहीत. कारण इथलं हिंदीही पंजाबीमिश्रित असते. त्यामुळे आज तुमच्याकडून नामदेव महाराज तर समजून घ्यायचेच आहेत. पण आणखी एक गोष्ट जाणून घ्यायचीय. ती म्हणजे तुमच्याबद्दल. एवढ्या दूर तुम्ही महाराष्ट्रातून इथे कसे काय आलात? कसे काय स्थिरावलात? प्रचंड कुतुहूल आहे, या सार्यााबद्दल…’

यावर ते हसत हसत म्हणाले…
‘सांगतो ना. अगदी सुरुवातीपासून सगळं सांगतो.

माझं नाव नारायणदास गायकवाड. पण इथे सगळे बाबा नारायणदास किंवा बाबाजी म्हणूनच ओळखतात. मी मूळचा जालन्याचा. बदनापूरमधील सायगाव हे माझं गाव. पण हे गाव आता सुटलं. सध्या नामियाना हेच माझं घर, हेच माझं गाव. महाराष्ट्रात कधी कामानिमित्त जाणं होतं… पण तेवढ्यापुरतंच. माझं शिक्षण आळंदीतलं. जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतलं. आजही ज्ञानेश्वरी-गाथेचे वाचन, हरिपाठ सारं नियमित सुरू आहे. तीर्थयात्रेच्या निमित्तानं इथपर्यंत आलो. संत नामदेव यांना गुरुस्थानी मानतो. त्यामुळे गुरुची सेवा करण्यासाठी १९७२ मध्ये इथे राहिलो. आता ४० वर्ष झाली. त्यामुळे आता इथलाच होऊन गेलोय. इथली माती, इथली माणसं… सर्वांचं माझ्यावर प्रेम आहे. माझंही त्यांच्यावर आहे. त्यामुळे आता पंजाब हीच माझी कर्मभूमी.’

…पण भाषा, संस्कृती, हवामान एवढंच काय पण खाणंपिणंही वेगळं आहे इथलं… त्या सर्वांशी जुळवून घेताना कसा अनुभव आला?

‘फार त्रास नाही झाला. कारण काय करायचं ते नक्की होतं. शेवटी नामदेव महाराजांच्या वाटेवरच चालत आलो. त्यांना त्यावेळी जमलं. आज तर जग किती बदललंय. त्यामुळे सारं जमून गेलं. शेवटी बाजूबाजूच्या दोन गावांमध्येही फरक असतो. त्यामुळे हे बदल स्वीकारूनच राहायला शिकलं पाहिजे. पण पंजाबी माणूस श्रद्धाळू आहे. धर्माची आणि गुरुची सेवा आपल्या हातून होत राहावी, अशी त्याची इच्छा असते. त्यामुळे मी इथं काम करू लागलो आणि मला मदत मिळत गेली. त्यामुळे हा अनुभव नक्कीच चांगला होता.’

आता नामदेवांबद्दल सांगतो….

ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेण्यापूर्वी त्यांनी नामदेव आणि आपल्या भावंडासह उत्तरेची यात्रा केल्याचं सांगितलं जातं. पण माऊलींनी १२९६ मध्ये समाधी घेतल्यानंतर नामदेवांनी खर्याऊ अर्थानं महाराष्ट्र सोडला. त्यांनी आधी दक्षिणेच्या आणि नंतर उत्तरेकडील यात्रा केल्या. काशी, पुष्कर, हरिद्वारला असताना त्यांना दिल्लीच्या बादशाहानं कैद करून दरबारात नेलं. तेथे मेलेली गाय जिवंत करण्याचा किस्सा सांगतात. तेथून नामदेव महाराज पंजाबातील भूतविंडमध्ये आले.

आपण ज्याला पाण्याचा पाट म्हणतो, इथे नहर म्हणतात. त्याच्या आसपास ते कीर्तन-भजन करत. त्यांचं भजन ऐकून लोक भेटण्यासाठी येत. नामदेवांच्या उपदेशानं अनेकांना आयुष्याचा मार्ग सापडला. लोकांमध्ये नामदेव महाराजांबद्दल श्रद्धा निर्माण झाली. अशाच प्रवचनांमधून आणि कीर्तनांमधून त्यांनी गावातील अनेक वाईट चालीरिती, व्यसनं याविषयी लोकांचं प्रबोधन केलं. लोकांना त्यांच्याच भाषेतून समजावून सांगितलेल्या विचारांमुळे नामदेवांचा भक्तपरिवार वाढत गेला.

याच भूतविंडमध्ये त्यांना बोहरदास हा शिष्य मिळाला. इथून नामदेव महाराज मर्डी किंवा मरड या गावात गेले. तेथे बोहरदासांचं लग्न लावून दिलं, असं सांगतात. मरडवरून ते या भट्टिवाल गावात आले. तेव्हा पाण्याचा प्रचंड दुष्काळ होता. लोक पाण्यासाठी हाल सहन करत होते. नामदेवांनी तलाव, विहिरी पाडण्यासाठी लोकांना उद्युक्त केलं आणि पाण्याचा दुष्काळ संपला. भट्टिवाल आणि आसपासच्या सखोवाल, धारिवाल या गावांमध्ये बाबा नामदेवांना मानणा-यांची संख्या वाढू लागली. आजही त्याच्या कित्येक खाणाखुणा सापडतात.

‘इथे आल्यानंतर त्यांनी या गुरुदासपूर जिल्ह्यालाच आपली कर्मभूमी म्हणून निवडलं आणि अखेरपर्यंत इथेच राहिले. शेवटची काही वर्ष ते भट्टिवालच्या शेजारीच असलेल्या जंगलात राहण्यासाठी गेले. बोहरदासासह शिष्यपरिवार त्यांच्यासोबत होता. त्या जंगलात नामदेवांच्या निवासस्थानामुळे लोकांचं येणं-जाणं वाढलं. हळूहळू काही भक्त तेथेच आसपास राहूही लागले. बघताबघता त्या जंगलाचं रूपांतर एका गावात झालं. त्याचं नाव घुमान. आजही नामदेवांनी वसवलेलं गाव म्हणून घुमानची ओळख आहे. याच घुमानमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असा इथल्या लोकांचा विश्वास आहे.’

या कळीच्या मुद्द्यावर त्यांना अडवलं. विचारलं… पण तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या आयुष्याची अखेर नक्की कुठे झाली?

शेवटी हा विश्वासाचा हा भाग आहे. आज त्याचा कुठेही लिखित पुरावा उपलब्ध नाही. १३५० मध्ये त्यांनी समाधी घेतली, असं मानलं तरी आज साडेसहाशे वर्ष उलटून गेली आहेत. त्यामुळे या वादात न पडता, त्यांचं कार्य समजून घ्यायला हवं. पंजाबी माणसाची श्रद्धा घुमानमध्ये आहे. मराठी माणसाची श्रद्धा पंढरपूरातील नामदेव पायरीवर आहे. आपण दोन्ही मानुया… शेवटी ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती’, असं म्हणतात. त्यात वाद घालणारे आपण कोण?

एकीकडे नारायणबाबा नामदेवांविषयी असं भडाभडा सांगत असताना, दुसरीकडे लोकांचा ओघ सुरूच होता. त्यांचा एकदा माझ्याशी मराठीतून आणि मध्येच येणार्याओ लोकांशी पंजाबीमधून, असा दुहेरी संवाद सुरू होता. त्या पंजाबीमधलं सगळंच काही कळत नव्हतं, पण ‘चाय-वाय शागो’… म्हणजे चहा घेऊन जा एवढं मात्र कळत होतं. प्रत्येक जण आत यायचा, बाबाजींच्या पाया पडायचा. कुणी नुकत्याच जन्माला आलेल्या मुलाला बाबाजींच्या पायावर ठेवायचा. मग बाबाजी त्या मुलाला जवळ घेऊन काही मंत्र वगैरे म्हणायचे. कुणी पिशवीभरून सफरचंदं आणलेली. बाबाजींना म्हणाले, शेतातील पहिली काढलेली सफरचंदं आहेत. बाबाजींनी पिशवीतून पाच-सहा सफरचंदं बाहेर काढली. काहीतरी मंत्र पुटपुटला. त्यातील दोन त्या माणसाला प्रसाद म्हणून परत दिली. उरलेली कापून तिथे असलेल्या सर्वांना वाटली.

एकीकडे नामदेवांच्या पंजाबयात्रेचं कथन सुरू असताना, मनात बाबाजींबद्दल विचार सुरू होता… आज या नारायणबाबांना येथे आसपासचे सर्वच जण बाबाजी म्हणून ओळखतात. त्यांना कुणी दक्षिणा देताहेत, कुणी फळे देताहेत, नमस्कार सुरू आहेत… हे सारे नक्की काय आहे? ज्या शीख समाजात व्यक्तिपूजा बळावू नये म्हणून दहावे गुरू गोविंदसिंगांनी यापुढे कोणीही गुरू होणार नाही. गुरूग्रंथसाहेब हाच गुरू, असं सांगितलं. त्याच शीख समाजात हे काय चाललंय?

मनातील विचारांचा हा कल्लोळ सुरू असतानाच बाबा नारायणदासांचा निरोप घेऊन निघालो. जाताना ते म्हणाले की, थांब अजून थोडा वेळ. थोड्याच वेळात लंगर सुरू होईल. जेऊन जा. त्यावर म्हटलं की… नको, सखोवाल आणि धारिवालला जायचंय. उशीर होईल, निघतो आता…. निघेस्तोवर गुरुद्वारातील आणि बाबाजींच्या दर्शनाला येणा-यांचीही गर्दी वाढली होती. रविवारच्या या गर्दीचा अंदाज बांधून गुरुद्वाराबाहेर स्थानिकांनी दुकानंही मांडली होती. त्या गर्दीतून वाट काढत, अनेक सापडलेली उत्तरं आणि न सुटलेले प्रश्न डोक्यात घेऊन सखोवाल आणि धारिवालच्या दिशेनं निघालो…

सखोवाल हे नामियानापासून पायी वीसएक मिनिटावर असलेलं गाव. खरं तर पंजाबमधील जमिनींची रचना सपाट असल्यानं मोठमोठ्या शेतांनंतर सुरू होणारं गाव अलिकडल्या गावामधून नीट दिसतं. नामियानाजवळून सखोवाल आणि थोडं दूर धारिवाल दाखवता येतं. तेथील गुरुद्वारांचे कळस तर लांबूनही ओळखता येतात. त्यामुळे नामियानाचा निरोप घेऊन शेतांमधील चिंचोळ्या रस्त्यातून सखोवालच्या दिशेने जात होतो. सोबत तिथलाच नव्याने झालेला छोटा मित्र होता, मनदीप.

सखोवालमध्ये राहणारा मनदीप दर रविवारी आपल्या घरच्यांसोबत नामियानामध्ये येतो. मनदीप आता शाळेमध्ये आठवीला असल्यानं त्याला ‘थोडा-थोडा हिंदी’ म्हणजे पंजाबीमिश्रित हिंदी बोलता येते. त्यामुळे त्याला म्हटलं, चल, दाखव मला तुमचं गाव. तोही उत्साहानं निघाला. ही सारी गावं मुख्य शहरापासून थोडी दूर असल्यानं हिंदीचा वापर जवळपास नाहीच. अनेकांना तर हिंदी कळत नाही आणि बोलता तर बिलकुल येत नाही. त्यामुळे या गावांमधून फिरताना कुणाशीही बोलता येत नसे. अशा वेळी छोट्या मनदीपचा आधार खरंच मोठा होता.

सखोवालच्या गुरुद्वारामध्ये पोहचलो. आम्ही गेलो तेव्हा गुरुद्वारात कोणीही नव्हते. कोकणातील अनेक देवळात जसं दुपारच्या वेळी कोणीही नसतं, तसं वाटलं. दरवाजा बंद नव्हता, पण ओढून घेतलेला होता. दरवाजा उघडला आणि आत गेलो, गुरुद्वारामध्ये असतं तसं वेदीवर गुरुग्रंथसाहेबची पोथी, सभोवती अंथरलेल्या रजया, नामदेवांचा पंजाबी रूपातला फोटो. या गुरुद्वाराबाहेर एका घुमटीमध्ये एक रेशमी वस्त्र अर्पण केलेली समाधी होती. मनदीप म्हणाला, ‘ए बाबा लद्धो जी की समाधी’

लद्धो जी म्हणजे नामदेवांचा शिष्य लद्धा. त्यांची गोष्ट भाई काश्मीर सिंगांनी सांगितली होती. ती आठवली. लद्धा हे जातीनं खत्री होते. ते आसपासच्या गावांमध्ये तेलाची विक्री करण्याचा व्यवसाय करत असत. नामदेवांची कीर्तनं ऐकून ते त्यांचे भक्त झाले होते. त्यामुळे नेहमी घरी परतताना ते नामदेवांच्या दर्शनाला येत आणि जाताना त्यांच्या घरातील दिव्यामध्ये तेल घालत. एक दिवस त्यांचं सारं तेल संपलं. त्यामुळे आता महाराजांच्या दिव्यात घालायला तेल नाही, म्हणून ओशाळलेले लद्धाजी नामदेवांना न भेटता लपूनछपून जात होते. नामदेवांनी त्यांना पाहिलं आणि हाक मारली. आपल्या चुकीबद्दल क्षमा मागतच ते नामदेवांजवळ आले आणि म्हणाले, ‘आज घाईघाईत सर्व तेल संपलं. तुम्हाला द्यायला तेल नाही म्हणून तोंड लपवून जात होतो.’ नामदेव म्हणाले, ‘परमेश्वरावर विश्वास ठेवून सत्याला सामोरा जा. म्हणजे तुला तोंड लपवावे लागणार नाही. बघ तुझ्या बुधल्यात तेल आहे की नाही ते?’. त्यांनी पाहिलं तर खरंच त्याच्या बुधल्यात एका दिव्यापुरतं तेल होतं. त्यांनी नामदेवांचे पाय धरले आणि शिष्यत्त्व मागितलं. याच लद्धाजींनी सखोवालमध्ये नामदेवांच्या स्मृत्यर्थ गुरुद्वारा बांधला, असं सांगतात.

सखोवालपासून आणखी थोड्या अंतरावर गुरुद्वारा कुंवा साहेब आहे. येथे एक विहीर असून, तिही नामदेवांनी गाववाल्यांच्या पाण्यासाठी बांधायला सांगितल्याची कथा आहे. पंजाबमध्ये प्रत्येक पवित्र गोष्टीपुढं आदरानं साहेब लावण्याची पद्धत आहे. त्यामुळे कुंवा साहेब, नामियाना साहेब, निशान साहेब अशी नावं आढळतात. कुंवा साहेब येथेही सखोवलासारखाच बंद असलेला गुरुद्वारा होता. संध्याकाळच्या वेळी येथे गुरुग्रंथसाहेबचं पठण होतं, असं मनदीपनं सांगितलं.

मनदीपचा निरोप घेऊन धारिवालला निघालो. धारिवाल समोर दिसत असलं, तरी दुपारचं टळटळीत ऊन आणि पंजाबी भाषा न येणं, या दोन मोठ्या अडचणी होत्या. वाटेत पाणीही मिळणार नाही असा तो रस्ता होता. घुमानमध्ये अशीच नवी ओळख झालेला एक मित्र होता, बबलू. घुमानमध्ये हार्डवेअरचं दुकान चालवणार्यात बबलूला फोन केला. म्हटलं, धारिवालला जायचंय, तुझी स्कूटर घेऊन येशील का? नामदेव बाबांच्या सेवेसाठी सज्ज असणार्याू घुमानमधील बबलू लगेच हो म्हणाला आणि काही मिनिटांत मला धारिवालला घेऊन जाण्यासाठी पोचलाही.

धारिवालला जाण्याच्या रस्त्यावर खुंडी साहेब नावाचा गुरुद्वारा आहे. नामदेव महाराज भट्टिवालला आले तेव्हा काही दिवस त्यांनी आपली ओळख सांगितली नव्हती, असं सांगतात. पण दिल्लीहून आलेल्या एकानं त्यांना ओळखलं. तो नामदेवांना म्हणाला, बादशाहाच्या दरबारात चमत्कार करणारे तुम्हीच बाबा नामदेव. सांगा ना खरं की नाही? नामदेव महाराज काहीच बोलले नाहीत. शेवटी तो भक्त म्हणाला, मला विश्वास आहे की तुम्हीच बाबा नामदेव. जर तुम्ही नामदेव महाराज असाल, तर ही सुकलेली बेलाची खुंडी म्हणजे काठी हिरवी होईल. त्याचा शब्द खरा ठरला. नामदेव महाराजांना त्यानं ओळखल्यानं त्या सुकलेल्या बेलाच्या काठीला पालवी फुटली. आजही ते बेलाचे झाड तेथे दाखवलं जातं. त्याच्या शेजारी गुरुद्वारा बांधला असून, तो खुंडी साहेब गुरुद्वारा म्हणून ओळखला जातो.

धारिवालला पोहचलो तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता. धारिवाल म्हणजे बाबा जल्लोंचं गाव. व्यवसायानं सुतार असलेले जल्लो उर्फ जाल्हण नामदेवांच्या जवळच्या शिष्यांमध्ये एक म्हणून ओळखले जातात. नामदेवांसह ते पंढरपूरलाही आल्याचं, तसंच ते पंढरीची वारी करत, असं काहींचं म्हणणं आहे. ‘निवृत्ती, ज्ञानेश्वर, जनमित्र सोपान सावता जाल्हण घेऊन सरिसे’ या रचनेमधील जाल्हण म्हणजे जल्लो, असं अभ्यासकांचं मत आहे.

आज धारिवालमध्ये ‘बाबा जल्लोजी का गुरुद्वारा’ म्हणून ओळखला जाणारा एक गुरुद्वारा आहे. तेथे एका घुमटीमध्ये बाबा जल्लोजी यांची समाधी असून, शेजारी गुरुद्वारा आहे. पंढरीच्या वारीची परंपरा सांगणार्याज या गावात कुणी अजून वारी करतं का? याची उत्सुकता होती. पण या गुरुद्वाराचे पुजारी असलेल्या आणि वार्धक्यानं थकलेल्या बाबा चंदनसिंग यांनी ‘आम्हाला पंढरपूर माहीत आहे, पण अशी वारी करणारं आता तरी कोणी नाही’, असं सांगितलं.

घुमान पंचक्रोशीतील नामदेवस्थानांचं दर्शन घेऊन पुन्हा घुमानमध्ये परतलो. घुमानमधलं सारं पाहून झालं होतं, पण नामदेव दरबार कमिटीचे सेक्रेटरी असणार्याा बाबा गुरुचरण सिंह यांना भेटायचं राहिलं होतं. गुरुद्वाराच्या ऑफिसमध्ये गेलो तर कळलं की गुरुचरणजी आत्ताच दुकानात गेले. बाजारपेठेत त्यांचं टिम्मी रेडिमेड नावाचं कपड्यांचं दुकान आहे. तिथे भेटतील, असं सांगण्यात आलं.

टिम्मी रेडिमेडमध्ये पोहचलो. साधारणतः सत्तरहून अधिक पावसाळे पाहिलेले गुरुचरणजी दुकानात गल्ल्यावर बसले होते. ओळखपाळख झाल्यावर म्हणाले, चाय लेंगे? त्यावर `खूप उकडतंय, चहा नको`, असं सांगताच, त्यांनी दुकानामागेच असणार्या. आपल्या घरातून शिकंजवी आणण्यास सांगितलं. शिकंजवी म्हणजे उत्तरेतल्या पद्धतीनं केलेलं लिंबाचं सरबत. थंडगार शिकंजवीचे घोट घेत संवाद सुरू झाला.

गुरुचरणजींनी नामदेव आणि घुमानची माहिती देणारं ‘शिरोमणी भगत नामदेवजी : संक्षिप्त इतिहास’ हे एक छोटेखानी पुस्तक प्रसिद्ध केलंय. त्यांच्याशी बोलताना जाणवत होतं की, नामदेव हा या माणसाचा ध्यास आहे. शक्य तेवढ्या माध्यमातून त्यांनी नामदेव समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे नामदेवांचं पंजाबी धर्मातील स्थान आणि त्यांच्यासोबत जोडले गेलेले चमत्कार याविषयी त्यांना विचारलं.

ते म्हणाले की…

“फक्त नामदेवांच्याच नाही तर साधारणतः सर्वच महापुरुषांबाबत आपल्याला अशा चमत्कारांच्या कथा सांगितल्या जातात. या महापुरुषांचं मोठेपण सांगण्यासाठी कथाकार या कथांचा आधार घेतात. पण दुर्दैवानं समाज या कथांमध्येच अडकून राहतो. त्यांचे विचार, त्यांचा आदर्श जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करत नाही. नामदेवांनी स्वतःला या चमत्कारांपासून वेगळं ठेवण्याचा प्रयत्न केलाय. गुरुग्रंथसाहेबमधील त्यांच्या एका पदामध्ये नामदेवांनी ‘मेरा किया कछु न होय, करि हे राम होय हे सोय’, असं म्हणत निष्काम कर्मयोग्याप्रमाणं या सार्याय चमत्कारांचं श्रेय नाकारलं आहे.”

त्यांच्या या निष्काम कर्मयोगातच त्यांचं मोठेपण आहे. आपला जो काही व्यवसाय असेल तो करतानाच भक्तिमार्गाची साधना करणं शक्य आहे. त्यासाठी कोणत्याही कर्मकांडांची गरज नाही, हे नामदेवांच्या अभंगांचं सार आहे. त्याचा फार मोठा प्रभाव गुरू नानकांवर झाल्याचं जाणवतं. नामदेवांच्या समाधीनंतर तब्बल १२० वर्षांनी गुरू नानकांचा जन्म झालाय. नानकपूर्व काळातील ज्यांच्या रचना गुरुग्रंथसाहेबमध्ये आहेत, त्यातील सर्वाधिक म्हणजे ६१ रचना नामदेवांच्या आहेत. त्यामुळे नानकदेवांनीही याच नामदेवांच्या कर्मयोग विचाराला आधार मानून शीख धर्माची स्थापना केली, असं नि:संदेहपणे म्हणता येतं.

नानकदेवांप्रमाणं शीख धर्माचे अन्य गुरू आणि भगत यांच्यावरही त्यांचा प्रभाव दाखवता येतो. गुरू अर्जुनदेवांनी तर ‘सकल कलेस निंदक भया खेद, नामे नारायणे नाही भेद’, असं म्हणत नामदेव आणि परमेश्वरात भेद नसल्याचं सांगितलंय. गुरू रामदासांनी ‘अहंकारिया निंदका पिठ दे नामदेव मुख लाया’, असं म्हणत नामदेवांची स्तुती केली आहे. तर गुरू अमरदास जातीपातींचं बंधन नाकारताना म्हणतात, ‘नामा छींबा कबीर जोलाहा पुरे गुर ते गति पाई, ब्रह्म के बेते शब्द पछाणै हऊमे जाती गवाई’.

भगत कबीरांनीही ‘गुर प्रसादी जैदेव नामा, भगति के प्रेम इन ही है जाना’, असं म्हणत नामदेवांना गुरुस्थानी मानलं आहे. तसंच भगत रविदासांनी नामदेवादी संतांचा भक्तीमार्ग सांगताना ‘नामदेव कबीर तिलोचन साधना सैन तरै’, अशी रचना केली आहे. या सार्यानतून नामदेवांचं शीख धर्मातील स्थान स्पष्ट होतं. पण याही पुढे जाऊन सांगायचं तर नामदेव हे उत्तर भारतातील संतपरंपरेचे अग्रदूत आहेत. त्यांना ‘आदिसंत’, असंही म्हणता येईल.’’

गुरुचरणजी बोलत होते आणि त्यांच्या या शब्दाशब्दांतून पंजाबमधील नामदेवांचं स्थान किती मोठं आहे, याची जाणीव होत होती. त्याचवेळी असंही वाटत राहिलं की, आपल्या महाराष्ट्रात किती जणांना नामदेवांची ही थोरवी माहीत असेल? काहींना माहिती असेलही, पण सर्वसामान्यांपर्यंत ती पोहचली आहे का?

‘नामा तयाचा किंकर, त्याने केला हा विस्तार’ या बहिणाबाईंच्या शब्दांचा अर्थ आता नव्याने लागत होता… ‘जो पंजाब सिकंदरला भल्यामोठ्या सैन्य वापरून जिंकता आला नाही, तो नामदेवांनी प्रेमाच्या ताकदीने जिंकला’ या विनोबांच्या वाक्यातील ताकद साक्षात समोर दिसत होती…

गुरुचरणजींची आज्ञा घेऊन आता घुमानचाही निरोप घ्यायचा होता. त्याआधी गुरुद्वारात जाऊन पुन्हा एकदा नामदेवांच्या समाधीपुढं डोकं टेकवलं. गुरुद्वाराच्या ऑफिसमध्ये खोलीची चावी द्यायला गेलो, तर ते काका म्हणाले, ‘इतने जल्दी निकल चले. एक दिन और…’. अक्षरशः गहिवरून आलं. मी कोण होतो त्यांचा. कशासाठी ते मला थांबण्याचा आग्रह करताहेत. पण अखेर औपचारिकरित्या आभार मानले आणि म्हटलं, ‘अमृतसर जाना है. उसके पहेले मरड और भूतविंड भी देखना है. आग्या दिजिये’. त्यावर त्यांनी ‘ठीक है, संभल के जाना. खाना खाया क्या? कैसै जाओगे?’, अशी घरच्यांसारखी चौकशी करत निरोप दिला. का ठाऊक नाही, पण तो गुरुद्वारा सोडताना आत काहीतरी ठेवून चाललोय, असं वाटलं. या भेटीचं तेच खरंखुरं संचित होतं.

घुमानवरून बटाला, बटालाहून जयंतीपूर असा प्रवास करून जयंतीपूरहून मरड किंवा मर्डीला पोहचलो. आपल्याकडे खुर्द आणि बुद्रुक अशी गावाची विभागणी केलेली असते. तसंच मरड या गावाचे छोटी मरड आणि वडी मरड म्हणजे मोठी मरड असे दोन भाग आहेत. यातील वडी मरड भागात नामदेवांचा भव्य असा गुरुद्वारा आहे.

काही पायर्याव चढून वर गेलं की एका बाजूला सुंदर तळं आणि समोर गुरुद्वारा अशी रचना आहे. गुरुद्वारामध्ये गेलो तर पूजा करणार्याा बाबाजींखेरीज कोणी नव्हतं. रितसर डोकं टेकवून नमस्कार केल्यानंतर बाबाजींना ओळख सांगितली. पण त्यांना हिंदी येत नव्हतं. त्यांना फक्त एवढंच कळलं, की महाराष्ट्रातून कोणीतरी आलंय. त्यांनी मला हातानंच ‘थांब’ असं सांगितलं आणि वाटेतून जाणार्या. एकाकडे पंजाबीमधून निरोप पाठवला.

थोड्या वेळाने एक शर्ट पँट घातलेले पण गावातलेच राहणीमान असलेले गृहस्थ आले. बाबाजींनी माझ्याकडे बोट दाखवत त्यांना पंजाबीतून ‘हे महाराष्ट्रातून आल्याचे वगैरे’ सांगितलं. त्यांनीही नमस्कार करत आपली ओळख करून दिली, ‘मै सच्चो सिंग, किसान हूं, समय मिले तो यहा बाबाजी की सेवा करता हूं. बोलिये, आपकी क्या मदद करू?’.

नामदेव आणि मरड या गावांचं नातं काय, असं विचारलं असता, ते म्हणाले की, ‘बाबा नामदेवजी भूतविंडसे यहां मरड आये. यहां ही उन्होंने अपने शिष्य बहोरदास की शादी करवाई. यहां से बाबाजी भट्टीवाल गये’. सच्चो सिंगांनी तलाव, आसपासचा परिसर आणि नामदेवांच्या वेळची एक विहीरही दाखवली. सध्या ही विहीर आटली आहे. पण नामदेवांची आठवण म्हणून नवं बांधकाम करतानाही, विहिरीची जागा तशीच ठेवलीय.

बोलताबोलता पंढरपूरचा विषय निघाला. तितक्यात सच्चो सिंग म्हणाले की, यहां के कुछ लोक पंढरपूर गये है. भगवान बिठ्ठल का और बाबाजी का दर्शन करने के लिए. हमे भी जाना है. देखते कब बुलावा आता है… मनात म्हटलं, की पंढरपूरच्या विठ्ठलाची आस महाराष्ट्रातल्या वारकर्याेच्या मनात असते ते माहीत होतं. पण त्या पंढरीच्या विठुरायाची आणि त्याच्या पायरीवरील नामदेवाच्या दर्शनाची ओढ इथे पंजाबातील एका छोट्या गावातही पाहायला मिळाली आणि उर भरून आला.

गुरुद्वाराच्या मागील बाजूला मोठमोठी शेतं होती. सध्या गव्हाचा हंगाम संपत आला होता. त्यामुळे अनेक शेतांत गव्हाची पोती ठेवलेली दिसत होती. कापणी, झोडणी झालेला गहू पोत्यात भरून बाजारात पाठवला जात होता. आता पाऊस पडला की याच शेतात तांदूळ लावण्याची तयारी सुरू होणार होती. पण त्याआधी शेताची मशागतीची वगैरे कामंही चालली होती. अशाच एका शेतात सुरू असलेल्या मशागतीकडे हात दाखवत सच्चो सिंग म्हणाले की, ‘खेत में फसल अच्छी हो इसलिए मिट्टी अच्छी होनी चाहिए. नये फसल के पहले सब कुडा-कचरा निकालकर जला देनेसे मिट्टी अच्छी होती है. बाबा नामदेवजी ने यही किया. उनके बाद गुरू नानकजी ने ये फसल लगाई जिसे आज हम सिक्ख कहते है’.

मरडवरून अमृतसरला निघालो. दुतर्फा असणार्याा शेतामधून बस अमृतसरकडे निघाली होती. बसमधून दिसणारी ती शेती पाहून सच्चो सिंगांचे शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते… की शीख धर्माचं जे पीक आज सार्याप जगभर आलंय त्याची मशागत बाबा नामदेवांनी केली होती.

अमृतसरहून भूतविंडला जायचं होतं. भूतविंड म्हणजे नामदेवांचं पंजाबमधील पहिलं स्थान, जिथे त्यांना बोहरदास हे पहिले शिष्य भेटले. भूतविंडला जायचे तर अमृतसरवरून रामपुराला जाणारी बस पकड, असं सांगितलं होतं. त्यामुळे अमृतसर बस डेपोतून रामपुराला जाणारी बस पकडली. बस सुटली, कंडक्टर तिकिट काढायला आला. म्हटलं, भूतविंड जाना है. तो म्हणाला ‘कित्ते?’ म्हटले ‘भूतविंड, रामपुरा के नजदीक है’. त्यावर तो पंजाबीतून काहीतरी म्हणाला, पण काही कळलं नाही. अखेर त्यानं तिकीट दिलं. अन्य काही प्रवाशांशीही बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून एवढंच कळलं की, त्या बसमध्ये कोणालाही हिंदी येत नव्हतं. अखेर तास-दीड तासानं मला त्या कंडक्टरनं उतरविलं. पण उतरल्यावर कळलं की, आपली बस चुकली होती. ती बस ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावरही रामपुरा आणि भूतविंड आहे. पण हे बाबा नामदेवजी का गुरुद्वारा असणारं भूतविंड नाही. एकाच नावाच्या दोन गावांमुळे आणि पंजाबी भाषा येत नसल्यानं हा गोंधळ झाला.

अखेर जिथे उतरलो त्या गावातल्या एका दुकानदाराला हिंदी कळत होतं. त्यानं नीट समजून घेतलं आणि मला परतीचा मार्ग सांगितला. पुन्हा दोन तासांचा प्रवास करत, तीन-चार बस बदलत अखेर खडूर साहेबच्या मार्गावर असलेल्या भूतविंडमध्ये जाण्यासाठी बस मिळाली. बसमध्ये चढलो आणि पाहिलं तर शेजारच्या माणसाच्या हातात आयफोन आहे. म्हटलं याला हिंदी किंवा इंग्रजी नक्की कळत असणार. विचारलं, ‘भाईसाब, भूतविंडमे बाबा नामदेवजी का गुरुद्वारा जाना है.’. तो म्हणाला, ‘जी, खडूर साहेबवाले मोड पे उतर जाओ. वहा से दुसरी बस आएगी. वो रामपुरा जाएगी. मैं खडूर साहेब जा रहां हू. आप को बताता हूं.’ अखेर आपला रस्ता बरोबर आहे हा विश्वास खूप काही देणारा होता. पण दिवस मावळत चालला होता. म्हटलं, रात्र झाली तर परतता येणार नाही. म्हणून पुन्हा विचारलं की, ‘वापस आने के लिए बस मिलेगी?’. तो म्हणाला, ‘मिल सकती है. पर गॅरंटी नही. पर डरने की बात नही. कोई ना कोई इंतजाम हो जाएगा.’ गप्पा रंगत गेल्या आणि मग कशासाठी आलोय, काय करतो वगैरे वगैरे सारे सवालजवाब झाले.

गाडीत भेटलेला तो पंजाबी तरुण काही मिनिटांत मित्र झाला होता. त्याचं नाव लवली सिंग. खडूर साहेबमध्ये राहणारा लवली सध्या डॉट नेट प्रोग्रामिंग शिकतोय. नामदेवांवर अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातून आलोय हे कळल्यावर त्याचीही भाषा बदलली. औपचारिक बोलण्याला ओलावा आला. त्यानं त्याच्या आयफोनवर गुरुवाणीचं अॅप दाखवलं आणि त्यातील नामदेवांचे अभंगही ऐकवले. मनात म्हटलं की, गुरुद्वारात काश्मीर सिंगांनी नामदेवांचे अभंग गाऊन दाखवले आणि याने आता आयफोनवर ऐकवले. पिढीमधलं अंतर बदललं, तंत्रज्ञान बदललं पण नामदेव पिढ्यानपिढ्या कायम आहेत आणि यापुढेही राहतील.

शेवटी त्यानं त्याचा नंबर दिला आणि सांगितलं, ‘कहीं फस गए तो फोन करना, मै आ जाऊंगा.’ खडूर साहेब फाट्यावर उतरलो तेव्हा त्यानं गाडीतून डोके बाहेर काढत मला ‘थम्स अप’ केलं आणि कानाजवळ हात आणून पुन्हा एकदा फोन करण्याची आठवण केली. इच्छा तिथे मार्ग म्हणजे काय ते कळत होतं.

दिवस संपण्याआधी अमृतसरला परतायचं होतं. त्यामुळे बसची वाट न पाहता रस्त्याशेजारी असलेल्या रिक्षावाल्याला सांगितलं की, ‘बाबा नामदेवजी के गुरुद्वारा जाना है. वापस अमृतसर के लिए बस मिलेगी वहां छोड देना’. दिवसभराचं काम संपवण्याच्या तयारीत असलेला तो रिक्षावालाही तयार झाला. एका कालव्याच्या शेजारून कच्च्या रस्त्यावरून जात जात रिक्षा एका बांधकाम सुरू असलेल्या जागी पोहचली आणि तो रिक्षावाला म्हणाला की, ‘ये है बाबा नामदेवजी का गुरुद्वारा’.

एका जुन्या खोलीसारख्या वास्तूत नामदेवांच्या मोठ्या फोटोपुढे गुरुग्रंथसाहेबची मांडणी केली होती. रिक्षावालाही सोबत आत आला. आम्हाला पाहून तेथील काम पाहणारा एक तरुण सामोरा आला. रिक्षावाल्यानं त्याला पंजाबीतून समजावल्यावर त्यानं पाणी दिलं. त्यानंही मग उत्साहानं गुरुद्वाराच्या पाठी असलेली नामदेवकालिन विहीर दाखवली. याच विहिरीच्या पाण्यानं नामदेवांनी बोहरदासांना जिवंत केलं, असं त्यानं सांगताच बोहरदासांची कथा आठवली.

या भूतविंड गावातील माता अडोली आपल्या मुलाच्या मृत्युबद्दल शोक करत होती. नामदेव तिथे पोहचले. त्यांनी मातेचं ते अपरंपार दुःख पाहून त्या मृत मुलाच्या देहावर विहिरीतील पाणी शिंपडलं आणि हाक मारली, उठ, जागा हो. मृतावस्थेतील त्या मुलानं डोळे उघडले. त्याला नवा जन्म मिळाला. नामदेवांमुळे आपल्याला नवं आयुष्य मिळालं म्हणून बोहरदासांनी नामदेवांचं शिष्यत्व स्वीकारलं आणि अखेरपर्यंत त्यांची सेवा केली.

सध्या या जागेवर मोठा गुरुद्वारा बांधण्याचं काम सुरू आहे. शेजारीच कोण्या एका मुस्लिम संतांचा छोटा दर्गाही आहे. गुरुद्वाराजवळून नवा रस्ता जाणार आहे, अशीही माहिती रिक्षावाल्यानं दिली. डॉ. भगवंत सिंग हे गुरुद्वाराच्या या जीर्णोद्धाराच्या कामाचं नेतृत्त्व करत आहेत. बहुमजली गुरुद्वारा, लंगर-कीर्तनासाठी सभागृह, विहिरीची पुनर्बांधणी आणि भक्तनिवास, अशी ही योजना आहे. त्यामुळे नामदेवांच्या पंजाबप्रवेशाचं हे ठाणं भविष्यात नव्या रूपात सामोरं येणार आहे.

भूतविंडवरून निघालो तेव्हा दिवस मावळला होता. रिक्षावाल्याला म्हटलं, अमृतसरला जाणारी बस कुठून मिळेल? तो म्हणाला, ‘अब खडूर साहेब मोड पे मिलना मुश्किल है. मै आपको हायवे तर छोड देता हूं. वहां से रातभर बसें चलती है’. पुन्हा त्या रिक्षातून तासाभराचा प्रवास करून हायवेपर्यंत पोहचलो. पैसे मिळाल्यानंतर एखादा रिक्षावाला निघून गेला असता. पण त्या रिक्षावाल्याच्या मनात काय आले ठावूक नाही. तो म्हणाला, ‘मै बस आने तक रुकता हूं. आप को बस मिल जाने के बाद निकल जाऊंगा’. बस येईपर्यंत तो गप्पा मारत राहिला. अखेर बस आली. खिडकीतून पाहिले तर तो हात हलवून निरोप देत होता. जणू कोणी नातेवाईकच असावा, असे तो का वागला? याचं उत्तर आजही देता येत नाही.

प्रवास संपला होता आता अमृतसरहून परतीचा प्रवास सुरू होणार होता. पण अमृतसरला गेलो तर सुवर्णमंदिरात न जाऊन कसं चालेल, असा विचार करून पहाटे चार वाजता हरमंदिरसाहेब म्हणजेच सुवर्ण मंदिरात पोहचलो. हिंदूंसाठी काशी, मुस्लिमांसाठी मक्का, ख्रिश्चनांसाठी व्हॅटिकन तसं शीखांसाठी सुवर्णमंदिर, अशी याची ख्याती आहे. पण आज हे फक्त शिखांचं श्रद्धास्थान उरलं नसून, सर्वधर्मियांसाठी ती ‘मत्था टेकायची जागा’ झाली आहे. त्यामुळेच जगभरातील भाविकांच्या, पर्यटकांच्या गर्दीत सुवर्णमंदिर अहोरात्र झळाळलेलं आढळतं.

एखाद्या मंदिरामुळे संपूर्ण शहर बहरून जावं तसं आज अमृतसरचं झालं आहे. देश-विदेशातून येणारे सर्व धर्मांचे लोक. त्यांच्या गाड्या पार्क करण्यासाठी एका मैदानाएवढी केलेली भव्य व्यवस्था, मोठमोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि बरंच काही… पंजाबी माणूस जगभर पोहचल्यानं आज अमृतसरही आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ झालं आहे. काश्मीर, सिमल्याला येणारे पर्यटकही अमृतसरला सुवर्णमंदिरासह जालियनवाला बाग, वाघा बॉर्डर पाहण्यासाठी अमृतसरला येतात. एकंदरीत अमृतसरमध्ये दिवसाचे चोवीसही तास माणसांची वर्दळ अनुभवता येते.

त्यातही सुवर्ण मंदिराची शान ही शब्दात पकडता येत नाही. अध्यात्म आणि ऐश्वर्य यांचा मिलाफ असलेली ही वास्तू फक्त त्यावर जडवलेल्या सोन्यामुळे श्रीमंत नाही. इथल्या पावलापावलावर इतिहासाचे दाखले दिले जातात. शीख धर्माचे चौथे गुरू रामदास यांनी या गुरुद्वाराच्या बांधकामास सुरुवात केली, तर पाचवे गुरु अर्जुनदेवांनी गुरुग्रंथसाहेबची रचना केल्यानंतर त्याची इथे स्थापना केली. पुढे महाराजा रणजित सिंह यांनी त्यावर सोन्याचा साज चढवला आणि हे सुवर्णमंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

पहाटेचे चार वाजता पोहचलो तरीही दर्शनासाठी अर्धा-पाऊण तास लागेल एवढी रांग होती. अमृतसरोवर म्हणून ओळखल्या जाणार्याल त्या भव्य तलावामध्ये भव्य दिव्य असं सुवर्णमंदिर अक्षरशः डोळे दीपवून टाकत होतं. सुवर्णजडीत अशा या नितांतसुंदर वास्तूत शीख धर्माचा परमपवित्र असा गुरुग्रंथसाहेब ठेवलेला आहे. रांग पुढे सरकत होती. लोक कडाह प्रसाद अर्पण करत होते, आत शबद-कीर्तन सुरू होतं आणि त्या केशरी रंगाच्या रेशमी वस्त्रानं झाकलेल्या गुरुग्रंथसाहेबचं दर्शन झालं.

शीख धर्माचा अकरावा, अखेरचा आणि चिरंतन गुरू असलेल्या त्या गुरुग्रंथसाहेबपुढे डोके टेकवताना मनात विचार आला की, ‘‘आज जगभरातील लक्षावधी डोकी ज्यापुढे झुकताहेत त्या या पवित्र गुरुग्रंथसाहेबमध्ये ‘आपल्या’ नामदेवांचेही अभंग आहेत’’ …आणि त्या विचारासोबतच सर्वांग शहारून टाकणारी वीज अंगातून वाहून गेली.

0 Shares
नामयाची पंढरी राजधानीतले संतशिरोमणी