नामयाची पंढरी

पराग पाटील

पंढरपूर इथेच चंद्रभागेच्या तीरावर संत नामदेवांनी क्रांती घडवली. हीच त्यांची कर्मभूमी आणि काही विद्वानांच्या मते जन्मभूमीही. पण नामदेवराय आजच्या पंढरपुरात सापडतात का, हा शोध घेतला आहे ज्येष्ठ संपादक पराग पाटील यांनी.

उत्तरेतली माणसं पंढरपूरमध्ये आली की खंतावतात. त्यांचे महान संत नामदेवबाबाजी इथे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीपुरतेच सीमित कसे काय, असा प्रश्न त्यांना पडतो. आज तीर्थक्षेत्रांची संस्थानं आणि प्राधिकरणं होण्याच्या काळात पंजाबातल्या लोकांना असा प्रश्न पडणं साहजिक आहे. कारण अगदी लाहोरपासून अमृतसर, जालंधर, हयालपूर, घुमान, गुरुदासपूर, जोधपूर, जयपूर, भरतपूर, बिकानेर, अलवार इथे नामदेवांची मोठी मंदिरं आहेत. नामदेवांच्या नावाच्या विहिरी आणि तलाव आहेत. तिथे नामदेवांच्या मोठ्या यात्रा भरतात. इथे नामयाच्या पंढरीत नामदेवांची अवस्था दुर्लक्षित असल्यासारखी त्यांना वाटली तर त्यात नवल ते काय. दुर्लक्षित हा शब्द वापरला, उपेक्षित नाही. कारण नामा महाराष्ट्रात उपेक्षित होऊच शकत नाही, इतकं त्यांचं संचित मोठं आहे. मात्र हल्ली वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिकतेला जी भौतिक झालर लागली आहे त्या निकषावर मात्र पंढरपुरातून देशभर पदयात्रा करून प्रभाव टाकणारे नामदेव पंढरीतच दुर्लक्षित तर झाले नाहीत ना याचा शोध घेणं क्रमप्राप्त होतं.

भागवत धर्माच्या सर्वच संतांचं पंढरीशी अतूट नातं. पांडुरंगाचे निस्सीम भक्त आणि संत म्हणून नामदेव उलगडतात. पंढरपूर या तीर्थाशी निगडित त्यांचं डायनॅमिक्स वेगळंच आहे. आधुनिक कॉर्पोरेट निकष लावून नामदेवांच्या चरित्राकडे पाहिलं तर लक्षात येतं, की ज्ञानदेव हे भागवत धर्माचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक असतील तर नामदेव हे त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. भागवत धर्माची धुरा खांद्यावर घेतलेल्या महात्म्यांना संतपण बहाल करून त्यांचा दुवा सर्वसामान्यांशी जोडण्याचं अद्वितीय काम नामदेवांनी सातशे वर्षांपूर्वी केलं. ओव्या, अभंग, कवनं, भारूड रचना आपल्या कीर्तनाद्वारे लोकांपर्यंत पोहचवल्या आणि ज्ञानोबारायांच्या बंडखोरीला व्यापक क्रांतीचं स्वरूप दिलं. हे जबरदस्त ब्रॅण्डिंग नामदेवांनी साधलं ते पंढरपूरच्या नाममाहात्म्यावर. कर्मकांडांमुळे धर्मग्लानी आलेल्या निरक्षर रयतेला केवळ नाममहिम्यातून भगवंताचा साक्षात्कार घडवून आणून त्याचा एक आध्यात्मिक जनप्रवाह तयार करण्याचं श्रेय नि:संशय नामदेवांना जातं.

‘महाराष्ट्राचे पंच-प्राण’ या पुस्तकात नामदेवांवरच्या प्रवचनात न्या. राम केशव रानडे सांगतात, “ डॉ. कोलते यांनी नामदेवांना मोठेपणा देऊन ज्ञानेश्वरांचे अवमूल्यन केले आहे; तर सारस्वतकार भावे यांनी ज्ञानेश्वरांना मोठेपणा देऊन नामदेवांचे अवमूल्यन केले आहे. या दोन्ही विद्वानांचे विचार एकांगी आहेत. या दोन वकिलांची बाजू ऐकून घेऊन जो निकाल द्यावा लागेल तो असा – ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदाय त्तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले व नामदेवांनी अमृताच्या खाणीप्रमाणे असलेल्या आपल्या वाणीने त्याचा प्रसार व प्रचार केला. ज्ञानेश्वर वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक आहेत, तर नामदेव हे त्या संप्रदायाचे प्रवर्धक आहेत.”

वारकरी संप्रदायाच्या या प्रवर्धकाच्या कार्याचा शोध घेताना अर्थातच पंढरपूर वगळणं शक्य नव्हतं. पालख्या निघण्याच्या एक आठवडा आधी पंढरपुरात पोहचलो तेव्हा मंदिराच्या साफसफाईचं आणि डागडुजीचं काम जोरात सुरू होतं. दिंडीच्या आधी रस्ते आणि बाकी पायाभूत सुविधांचं जाळं ठाकठीक करण्याचं काम सरकार करतंच, पण यंदा राष्ट्रपतींच्या आगमनाचं मोठं निमित्त होतं. त्यामुळे स्थानिक प्रशासनानं मरगळ झटकून काम करण्याचा सपाटा लावला होता. राष्ट्रपतींनीही कार्यकाळ संपताना विठ्ठलाला साकडं घालण्याचं ठरवलं असावं. मंदिराच्या डागडुजीचं आणि रंगरंगोटीचं केंद्रस्थान अर्थातच विठ्ठल-रखुमाई मंदिरच होतं. नामदेव पायरी दुर्लक्षितच होती. राष्ट्रपतींच्या मूळ राजस्थानी पार्श्वभूमीमुळे नामदेवांविषयी विशेष आस्था असायला हवी होती.

नामदेवांनी सातशे वर्षांपूर्वी मराठी मुलखाच्या बाहेर जाऊन राष्ट्रीय पातळीवर आपला प्रभाव दाखवला असला तरी त्यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि समाधीही पांडुरंगाच्या पायाशीच. त्यामुळे नामदेव आणि पंढरपूर यांच्या नात्याचा नव्यानं शोध घ्यायचा, हे एक आव्हानच होतं.

नामदेव आणि पंढरपूर दुवा खरं तर त्यांच्या जन्मापासूनचा. सुरुवातीच्या वादानंतर नामदेवांचा जन्म पंढरपुरातच झाला, हे आता ब-यापैकी मान्य झालेलं आहे. कारण नामदेवांनीच या संदर्भात बरचंसं डॉक्युमेण्टेशन करून ठेवलं आहे. नामदेव हे त्या अर्थाने मराठीतले आद्य आत्मचरित्रकारही मानले जातात.

हिंगोली जिल्ह्यातील नरसी या गावातून दामाशेटी आणि गोणाई पंढरपूर क्षेत्री आले. नामदेवांची थोरली बहीण आऊबाई हिचा जन्म नरसी येथेच झाला होता. मात्र पंढरपूरची वारी करणाऱ्या दामाशेट आणि गोणाई या दांपत्यानं श्री विठ्ठलास मुलासाठी नवस केला होता आणि त्या नवसाचा भाग म्हणून ते नामदेवांच्या जन्माआधीपासून पंढरपुरात येऊन राहिले होते. नामदेव हे श्रीविठ्ठलाला केलेल्या नवसामुळे झालेले असल्यामुळे अर्थातच त्यांचं आणि विठ्ठलाचं नातं कुटुंबातूनच दृढ झालेलं होतं. नामदेवांचा जन्म पंढरपुरातच झालेला असल्याच्या पुष्ट्यर्थ नामदेवांनी सहाव्या वर्षी भगवंताला कसं प्रत्यक्ष जेवू घातलं ही आख्यायिका आणि दामाशेटींचे उद्गार सांगितले जातात.

जेऊनिया देवे हाती दिधली वाटी । तेव्हा दामासेठी काय बोले।।
बारा वर्षे तुज उपवासी मारिले । आजि जेवविले नामदेवे ।।

पंढरपूरच्या नामदेव मंदिरात आज नामदेवांपासूनची सतरावी पिढी भेटते. सोळाव्या पिढीचे पाच भाऊ आणि आता त्यांची उमेदीला आलेली मुलं. सगळे नामदास हेच आडनाव लावतात. मुकुंद महाराज नामदास हे ज्येष्ठ पिढीचे. कामानिमित्त ते बाहेर निघाले होते. त्यांनी सांगितलं, की तरुण पिढीचे तरुण ज्ञानेश्वर महाराज नामदास आता निरूपण करतात. तुम्ही त्यांच्याशीच बोला. ज्ञानेश्वर नामदासांनी चांगली माहिती दिली.

पंढरपूरच्या नोंदी शोधताना ब्रिटिश गॅझेटमध्ये तीन टेकड्यांचा उल्लेख आढळतो. त्यात विठ्ठल मंदिर, हरिदासाची टेकडी आणि तिसरी नामदेव मंदिराची टेकडी आहे. हा संदर्भ ऐकून कुठेतरी वाचलेलं आठवलं… ‘मनात आणले असते तर संत नामदेव वारकरी मंडळाचे मठपती बनून श्रीक्षेत्र पंढरपूरला राहू शकले असते.’ पण त्यांनी तसं केलं नाही.

नामदेवांच्या वंशजांना दुर्लक्ष किंवा उपेक्षेबाबत छेडल्यावर या श्रेष्ठ संताच्या वंशजांमध्येही ती योग्य परिपक्वता दिसून आली. त्यांच्या उत्तरात साधेपणा होता आणि ईश्वरावरची अढळ निष्ठा होती. नामदेवांच्या पायरीवरच्या सेवेकरी हक्कावरून स्वातंत्र्यपूर्व काळात काही वाद झाले होते. त्याबाबत विचारलं असता, सतरावे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास सांगतात, ‘सुरुवातीला आमच्या घरातले लोक पायरीवर बसायचे. मात्र आम्ही शिंपी समाजाचे असल्यामुळे पायरीवर बसण्यास आक्षेप येऊ लागले. स्वातंत्र्यपूर्व काळात आमच्या पणजोबांच्या काळात हा वाद झाला होता. प्रकरण कोर्टातही गेलं होतं आणि न्याय आमच्याविरोधात गेला. आमच्या पणजोबांनीही ब्रिटिशकाळात हा दावा विशेष ताणून धरला नाही. प्लेगच्या साथीत वाताहत झाली होती. पणजोबा एकटेच जिवंत राहिले होते. शिवाय सव्वाशे वर्षांपूर्वी ही नामदेव मंदिराची इमारतही बांधली गेली होती. नामदेव महाराज ज्या केशवराज मूर्तिची पूजा करायचे तीही होतीच. त्यामुळे आमच्या घरातल्या लोकांनी नामदेव मंदिरापुरताच आपला कारभार मर्यादित ठेवला.’

नामदेव महाराजांनी आपल्या शिंपी समाजाची सातत्यानं जाणीव ठेवली होती.

सिंपियाचे कुळी जन्म मज जाला।
परि हेतु गुंतला सदाशिवी ।।

त्या काळातल्या जातीय उतरंडीचं भान ठेवूनही त्यांनी आपला भक्तीमार्ग लोकांवर ठसवला याचं आश्चर्य वाटतं.

नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे ।
संत पाय हिरे देती वरू ।।

पण तरीही शिंपी समाजाचा आर्थिक स्तर त्या काळच्या परिस्थितीनुसार चांगला असावा. पण त्याबाबतीत नेमका अंदाज येत नाही. नामदेवांच्या वंशजांच्या मते तेव्हा आर्थिक परिस्थिती बरी नसावी. साक्षात भगवंत आणि लोकांच्या सहभागावरच त्यांचं सगळं चालत होतं. नामदेवांनीही म्हणून ठेवलंय की,

कण्या-भाकरीचे खाणे।
गाठी रामनाम नाणे ।।

पण त्यांचं बाकी कौटुंबिक जीवन समृद्ध असावं. नामदेव आठ वर्षांचे असताना श्रीमंत कुटुंब असलेल्या गोविंदशेट सदावर्ते यांच्या मुलीशी -राजाईशी- त्यांचं लग्न झालं. विठ्ठलानं कपडे आणि बाकी सरंजाम केला, अशी कथा सांगितली जाते. मात्र त्या काळातील विणकर व शिंपी समाजाला आर्थिक उन्नती होती. डॉ. श्री. वा. अत्रे ‘युगबोध’च्या अंकात सांगतात, ‘त्या काळात विणकामाचा दर्जा श्रेष्ठ प्रतीचा होता. विणकर सुंदर तलम कापड विणत. या वस्रांना परदेशातही मागणी असे. कापडावरील कलाकुसर श्रेष्ठ दर्जाची होती. कलाकारांचे जीवन सुखी होते.’ नामदेवांनी त्या काळात केलेले प्रवास, पंढरपुरातील संतमेळे, लोकसंग्रह या इव्हेण्ट मॅनेजमेंटसाठी त्यांनी घेतलेले कष्ट पाहता एकतर त्यांची आर्थिक परिस्थिती बरी असावी किंवा त्यांना पतपुरवठा करणारं व्यावसायिक जग पाठिशी असावं.

स्वतः नामदेवांचं मात्र प्रपंचात लक्ष नव्हतं. त्यांना लागलेले देवपिसे हा त्यांच्या पत्नीचा आणि आईचा चिंतेचा विषय होता. राजाई आणि आई गोणाई यांनी त्यांना व्यवसायात लक्ष घालावे म्हणून प्रयत्न केले. ‘कापड घेऊन जाय बाजारासी’, असे गोणाईचे उद्गार आहेत. अर्थात काही काळानं नामदेवांची विठ्ठलभक्ती या दोघींना आणि घरातल्या साऱ्यांनाच उमगली. राजाईचे नंतरचे उद्गार असे आहेत,

आता ये संसारी मीच धन्य जगी। जे तुम्हा अर्धांगी विनटले।।

जनाबाईंनीही नामदेवांच्या कुटुंबाचं डॉक्युमेण्टेशन करून ठेवलं आहे.

गोणाई राजाई दोघी सासू सुना । दामा नामा जाणा बापलेक ।।
नारा विठा गोंदा महादा चौघे पुत्र । जन्मले पवित्र त्यांचे वंशी ।।
लाडाई गोडाई येसाई साखराई । चवघी सुना पाही नामयाच्या ।
लिंबाई, ते लेकी आऊबाई बहिणी । वेडीपिशी जनी नामयाची ।।

चार पुत्र, चार सुना, एक मुलगी, एक बहीण, पंधरावी ती दासी जनी या सर्वांनीच कमी-अधिक प्रमाणात रचना केल्या आहेत.

नामदेवांच्या जडण-घडणीतल्या प्रत्यक्ष भगवंत दर्शनाच्या खूप आख्यायिका आणि चमत्कारसदृश कथा आहेत. त्यातून त्यांची पांडुरंग भक्ती प्रचंड आग्रही होती हे लक्षात येतं. सतरावे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास नामदेवांना पांडुरंगाच्या अधिकृत भक्तांमधले मानतात. अधिकृत अशासाठी की देवा सत्ता राबवावे, अशी त्यांची ख्याती होती. देव त्यांच्यासाठी प्रत्यक्ष राबायचा अशी त्यांच्या भक्तीची ताकद होती.

नामदेवांच्या या थेट भंगवंताशी संवाद साधण्याच्या भक्तीप्रभावामागे अर्थातच एक बंडखोरी होती. कारण तो काळ पुरोहित वर्गाच्या वर्चस्वाचा होता. कर्मकांड, विधिनिषेध यांचं प्रचंड स्तोम माजलं होतं. आणि ही मिरासदारी मोडून काढण्यासाठी भक्तीची वेगळी परंपरा निर्माण होण्यासाठी लोकांची मानसिकता तयार झाली होती. याच कालखंडात अल्लाउद्दिन खिलजी धुमाकूळ घालत होता. यवनांच्या आक्रमणाचे काळे ढग मध्य भारतावर पसरू लागले होते. ही आध्यात्मिक बंडखोरी बहुधा या कालखंडाचंच प्रॉडक्ट असावं. संत ज्ञानेश्वरही नामदेवांची समकालीन. नामदेव हे ज्ञानोबारायांना तसे वडिलच. ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर ज्ञानदेवांचा गवगवा होऊ लागला होता. आणि इकडे नामदेवांची कीर्तनं गाजू लागली होती. त्या दरम्यान ज्ञानेश्वर आणि नामदेव या दोन संतांचं कुठेतरी मैत्र प्रस्थापित झालं. नामदेवांनी मग वारकरी संप्रदायाच्या पताकेचा उपयोग या बंडखोरीसाठी करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी पंढरपूर क्षेत्राचा अतिशय चतुराईने उपयोग करून घेतला. सर्वप्रथम त्यांनी संत ज्ञानेश्वरांना पंढरपूरचं आमंत्रण दिलं.

नामयाचे भेटी ज्ञानदेव आले । प्रत्यक्ष भेटले पांडुरंग ।।

नामदेवांनी ज्ञानदेवांची अलौकिक प्रतिभा हेरली आणि त्याला भागवत धर्माचं कोंदण बहाल केलं. आणि एवढ्यावरच न थांबता त्यांनी ज्ञानदेव आणि इतर संतांसह तीर्थयात्रेची टूम काढली.

राऊळा भीतरी चला जाऊ वेगे । आज्ञा मागू दोघे तीर्थयात्रे ।।

नामदेवांचा हा संदर्भ बघितला तर वारकरी संप्रदायातील संत टाळ कुटत बसले होते किंवा ते निवृत्तीवादी होते हा आक्षेप किती चुकीचा आहे हे लगेच लक्षात येतं.

१२७५ ते १२९६ हा ज्ञानेश्वरांचा काळ. १२९१ ते १२९६ अशी सहा वर्ष पहिली तीर्थयात्रा करून आल्यावर नामदेव महाराज ज्ञानदेवांना घेऊन पुन्हा पंढरीस आले. सोबत ज्ञानदेवांची भावंडे, गोरा कुंभार, परिसा भागवत, नरहरी सोनार वगैरे संत सांगाती होते. तीर्थयात्रेनंतर विधियुक्त उद्यापन म्हणून या संतमेळ्याचं प्रयोजन नामदेवांनी घडवून आणलं. सर्व संतसज्जनांना घेऊन

जेवू एका पंक्ती। सरिसे आम्ही ।।

असा थाट घातला.

निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान खेचर । नरहरी सोनार आदिकरोनी ।
समस्त भक्त मिळोनी लोटांगण । अलिंगन देती नामयासी ।।

नामदेव महाराजांनी या सर्व संत जाति-पातीच्या संतांना केवळ एकत्रच आणलं नाही तर त्यांच्या रचनांचं डॉक्युमेण्टेशन करून घेतलं. आणि त्या प्रत्येक संताला प्रतिष्ठा बहाल केली. त्यांची चरित्र लिहिली आणि लिहून घेतली. एवढंच नाही तर त्या-त्या जातीतल्या संताचा महिमा निर्माण केला. हे सगळं सातशे वर्षांपूर्वी जेव्हा कम्युनिकेशन्सची किंवा प्रवासाची साधनं खूपच मर्यादित होती. नामदेवांचं संवाद साधण्याचं कौशल्य खूपच वरच्या कोटीचं असावं. जातिवादाच्या पलीकडे जाऊन नामदेवांनी जो प्रसार केला त्यामुळे

चोखा डोंगा परि भाव नव्हे ढोंगा।।
असे म्हणणारे चोखा महार,

कांदामुळा भाजी। अवघी विठाई माझी।।
असं समजणारे सावता माळी,

देह वागेसरी जाणे। अंतरात्मा नाम सोने ।।
असं सांगणारे नरहरी सोनार,

आम्ही वारीक वारीक । करु हजामत बारीक ।।
असं आश्वासन देणारे सेना न्हावी

आणि

दळिता कांडिता। तुझ गाईन अनंता ।।
असं म्हणणारी दासी जनी, आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात. म्हणोनि कुळजाति वर्ण । हे आवघेचि गा अकारण ।। हे ज्ञानेश्वरांचे शब्द आपल्या जीभेवर येतात. नामदेवांच्या श्रेष्ठ शिष्यांमध्ये संत चोखा मेळा आणि संत जनाबाई यांची दखल घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही.

चोखा म्हणे धन्य नामया तू गुरू ।
फेडिला अंधारू जीवित्वाचा ।।

चोखोबांना नामदेवांनी मिळवून दिलेली प्रतिष्ठा स्तिमित करणारी आहे. या सगळ्या काळात त्यांना विरोध नक्कीच झाला असणार. पण नामदेवांनी तो अत्यंत ग्रेसफुली मोडून काढला. इतर संतांच्या तुलनेत नामदेवांच्या वाट्याला कन्फ्रंटेशन कमी आलं, असं वाटू शकतं. त्यांच्या चरित्रातही फारसा खलनायकी भाग नाही. मात्र त्यांनी आपलं व्यक्तिमत्त्व आणि मुत्सद्दी कौशल्य दाखवून या सगळ्या नकारात्मकतेवर मात केली असावी. कारण चोखोबांना मंदिराच्या आसपास प्रवेश नव्हता. मग नामदेवांनी नदीच्या पलिकडून चोखोबांची दर्शनाची सोय केली. नदीच्या पलीकडे एका उंचवट्यावर चोखोबांची दीपमाळ होती. पंढरपुरात तिचे अवशेष शोधायचा आम्ही प्रयत्न केला. पण ही दीपमाळ नेमकी कुठे होती हे आज कुणालाच सांगता येत नाही. १३३८ साली मंगळवेढ्याला गावकूस पडून चोखोबांचा अंत झाला. मात्र नामदेवांनी चोखोबांच्या अस्थी आणून मंदिराच्या महाद्वाराजवळ त्यांची समाधी बांधली. हे सारं बिनविरोध झालं असेल असं नाही. पण प्रसंगी आख्यायिका आणि चमत्काराचं कोंदण देत नामदेवांनी ते घडवून आणलं. ज्या अस्थिंमधून विठ्ठल, विठ्ठल असा ध्वनी येईल त्या चोखोबांच्या, असं म्हणत या अस्थी आणल्या आणि आपल्या या शिष्याचा त्यांनी विठ्ठलासमोर स्मृतिसन्मान केला.

संत जनाबाईंच्या बाबतीतही त्यांनी हेच केलं. त्यांची दासी असं जनाबाईंना म्हटलं जात असलं तरी संतांच्या प्रभावळीत त्यांनी जनाबाईंना महत्त्वाचं स्थान दिलं होतं. स्त्री आणि तीही शुद्र जातीची तिला इतकी मोठी प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी नामदेवांनी खूपच रिस्क घेतली होती, असं आज म्हणता येईल.

धन्य मायबाप नामदेव माझा । तेणे पंढरीराजा दाखविले ।।
नामयाचे ठेवणे जनीस लाधले । धन सांपडले विटेवरी ।।

जनाबाईंचा हा अभंगच खूप बोलका आहे. मात्र आज पंढरपुरात जनाबाईंचं अस्तित्त्व जाणवत नाही. नामदेवांच्या मंदिरात जनाबाईंचा फारसा संदर्भ नाही. नामदेवांच्या समाधीबरोबर जनाबाईंचीही समाधी आहे, असं म्हटलं जातं. त्यात नामदेव आणि जनाबाई यांच्यातील जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधाची ग्वाही दिली जाते. जनाबाई नामदेवातच विलीन करून टाकत भक्तीमार्गाची एक वेगळी आध्यात्मिक उंची प्राप्त करून दिली जाते. मात्र त्यात जनाबाईंचं अस्तित्त्व संपून जातं. नामदेवांची दूरदृष्टी थोर म्हणून त्यांनी तिचे अभंग लिहून घेतले. जनाबाई आज ओव्या आणि अभंगांच्या रूपात टिकून आहे; अन्यथा तिचाही एखादा मठ झाला असता.

जनाबाईंच्याच अनुषंगानं संत कबीरांचाही उल्लेख येतो. कबीरांनी जनाबाईंना ‘सब संतन की काशी’, असं म्हटलं आहे. कबीरांच्या पंढरपुरातील भेटीबाबतही काही कथा आहेत. मात्र यातून उत्तरेतल्या अनेक संतकवींना नामदेवांनी आकर्षित केल्याचं लक्षात येतं. त्यासाठी त्यांनी पंढरपूर क्षेत्राचा छान उपयोग करून घेतला. त्यामुळेच संत कबीरदास, दादूदयाल, मलूकदास, पलटूदास इत्यादी उत्तरेतले संतकवी नामदेवांचा प्रभाव मान्य करतात.

पंढरपुरात नामदेवांची अभ्यासक प्र. द. निकते सर भेटतात. त्यांचा नामदेवांवरच अभ्यास चांगला आहे. नामदेवांची गाथा आणि इतर डॉक्युमेंटेशनचं काम ते निष्ठेनं करत आहेत. निकते सर नामदेवांच्या पांडुरंग भक्तीचं माहात्म्य सांगतात त्याचबरोबर त्यांच्या सर्व जाती-प्रांताच्या लोकांना एकत्र करून सातशे वर्षांपूर्वी या भारतवर्षाच्या संकल्पनेचं सिंचनही अधोरेखित करतात.

नामदेवांनी लिहिलेल्या तीर्थावळीचा संदर्भ घेतला तर त्यांनी चारवेळा दक्षिणोत्तर पदयात्रा केल्या असल्याचं लक्षात येतं. यवनांच्या आक्रमणकाळात उत्तर भारतात त्यांनी हे भ्रमण केलं हे विशेष. १३२९ ते १३४९ या शेवटच्या यात्रेत ते वीस वर्षे उत्तरेत होते. उतारवयात घुमानमध्ये ते बऱ्यापैकी स्थायिक झालेले होते. मात्र त्यांना पंढरीची ओढ स्वस्थ बसू देत नसावी. ते निघाले आणि १३५० च्या सुरुवातीला पंढरीत त्यांच्या प्रिय पांडुरंगाच्या पायाशी परतले. ३ जुलै १३५० रोजी समाधी-विश्रांती घेतली. त्यांच्या पाठोपाठ जनाबाईसह त्यांच्या घरातल्या १४ लोकांनी समाधी घेतली. त्यांची एक सून गर्भारपणासाठी माहेरी असल्यानं तिनं मात्र समाधी घेतली नाही. विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराची पायरी तेव्हापासून नाममय झाली.

संत नामदेव हे भावकवी होते, धर्मसुधारक होते, पुरोगामी विचारवंत, उदार धर्मनेता, वारकरी संप्रदायाची ध्वजा घेतलेले प्रचारक होतेच, पण ते एक डोळस कृतिशील पर्यटकही होते. त्यांनी तृषार्तांसाठी तळी बांधली, वनराया तयार केल्या, व्याधिग्रस्तांसाठी आरोग्यधामं उभी केली. सातशे वर्षांपूर्वी इतकी दूरदृष्टी असलेला हा एक बहुआयामी युगपुरूष या मातीत जन्मला होता; एवढी जाणीव विठ्ठल मंदिराची पायरी चढताना ठेवली तरी नामाचं ऋण फेडल्यासारखं होईल.

तीर्थ विठ्ठल । क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल ।

0 Shares
विश्वरूपदर्शन नामदेवे रचिला (शीख धर्माचा) पाया