अभंग संपदा

किशोरी बेलसरे

निवृत्तीनाथांकडं आपलं दुर्लक्ष झालं. साहजिकच त्यांचं साहित्यही उपेक्षित राहिलं. वारकर्यां मध्येही त्यांचे अभंग फारसे गायले जात नाहीत. त्यांच्या अभंगांवर कीर्तन, प्रवचनं होत नाहीत; पण वारकरी संप्रदायाचा खरा पाया रचला तो निवृत्तीनाथांच्या अभंग विचारांनी. त्या विचारांवरच टाकलेला हा प्रकाश...

निवृत्तीनाथांच्या काव्याच्या अभ्यासात प्रमाणभूत संहितेचा अभाव फार जाणवतो. ‘सकलसंतगाथा’ या ग्रंथात एका आवृत्तीत ३५७ अभंग त्यांच्या नावावर दिसतात, तर आवटे यांच्या ‘सकलसंतगाथा’ या ग्रंथात ३३५ अभंग निवृत्तीनाथांच्या नावावर आढळतात. ‘गाथापंचक’ या आवटे यांच्या ग्रंथात ३७४ अभंग दिसून येतात. या अभंगांशिवाय इतरत्रही निवृत्तीनाथांचे अप्रसिद्ध अभंग आढळून आले आहेत. म्हणजे एकूण अभंगसंख्या ही अनिश्‍चितच आहे. धुळे येथील ‘समर्थ वाग्देवता मंदिर’ या संस्थेत हस्तलिखित स्वरूपात काही अभंग सापडले आहेत. तसंच, १९२७-२८ सालच्या ‘मुमुक्षू’ या अंकातही निवृत्तीनाथांचे  काही दुर्मीळ अभंग प्रसिद्ध झाले आहेत. प्रस्तुत लेखात निवृत्तीनाथांच्या अभंगांची संहिता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

निवृत्तीनाथांच्या अभंगांच्या छापील उपलब्ध प्रती

निवृत्तीनाथांनी स्वहस्ते लिहून ठेवलेली अभंगांची पोथी मिळत नाहीच; पण त्यांच्या नजीकच्या काळातीलही एखादी हस्तलिखित प्रत अद्याप सापडलेली नाही. भिन्न भिन्न काळात गायलेल्या अभंगांच्या प्रती सांप्रदायिकांनी लिहून काढल्या असाव्यात. मग त्याच्या नकला करून मुद्रित आवृत्ती निघाली असावी, असं वाटतं. उदा. ‘आवटे’ प्रतीच्या ‘गाथापंचक’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील खुलासा पाहण्यासारखा आहे.

श्री ज्ञानदेव महाराज यांच्या अभंगांची गाथा

॥ श्री निवृत्तीनाथ महाराज, श्री सोपानदेव महाराज, श्री मुक्ताबाई व श्री चांगदेव महाराज यांच्या अभंगांसह ॥

सांप्रदायिक ब्रह्मीभूत श्री नानामहाराज साखरे

ज्ञानेश्‍वरी भाषांतरकार यांच्या संग्रˆहातील पुरातन हस्तलिखित वह्यांवरून पाठ दुरुस्त करून तयार केली. ती त्र्यंबक हरी आवटे यांनी अभंगांची विषयवार निवड करून पुणे येथील आपल्या इंदिरा छापखान्यात छापून प्रसिद्ध केली. विजयादशमी शके १८३०, या ग्रंथाचाच आपण प्रस्तुत प्रकरणामध्ये आधारभूत व प्रामाण्य ग्रंथ म्हणून विचार करणार आहोत. याशिवाय ‘सकलसंतगाथा’ या ग्रंथांचे लेखक व अभंगसंख्या पुढीलप्रमाणे :

१. ‘संकलसंतगाथा’ – खंड १ – नानामहाराज साखरे

संपादक : काशिनाथ अनंत जोशी, प्रकाशक : रमेश शंकर आवटे, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, १००६, सदाशिव पेठ, पुणे ३०, आवृत्ती दुसरी, पृष्ठे १२६ ते १५८, अभंगसंख्या १ ते ३५७.

२. ‘संकलसंतगाथा’ – अर्थात गाथापंचक, त्र्यंबक हरी आवटे, इंदिरा छापखाना; २७०, सदाशिव पेठ, पुणे ३०. शके १८४५, सन १९२४, आवृत्ती पहिली. पृष्ठे ९ ते २९, अभंग संख्या १ ते ३३५.

३. ‘गाथापंचक’ – नानामहाराज साखरे. प्रकाशक : त्र्यंबक हरी आवटे, इंदिरा छापखाना. (विजयादशमी शके १८३०), १८१, सदाशिव पेठ, पुणे ३०. पृष्ठे १ ते ५७, अभंगसंख्या १ ते ३७४.

या तिन्हीपैकी ‘गाथापंचक’ या ग्रंथातील अभंगांची संख्या सर्वात जास्त म्हणजे ३७४ आहे. इतर दोन ग्रंथांतील अभंगांशी हे अभंग पडताळून पाहता वरील दोन ‘सकलसंतगाथा’ या आवृत्तीतील सर्व अभंग ‘गाथापंचक’मध्ये असून शिवाय, जास्तीचे काही अभंग आहेत. ‘गाथापंचक’ या ग्रंथातील अभंगांची विषयवार विभागणी पुढीलप्रमाणे.

क्र. विषय  अभंग संख्या
१.  श्रीहरीच्या सगुण-निर्गुण स्वरूपाचे वर्णन १३४
२. सद्गुरुप्रसादाने प्राप्त झालेल्या स्थितीचे वर्णन ०७७
३. पंढरीमाहात्म ०२०
४. पंढरीतील काला ०१३
५. नामसंकीर्तन माहात्म्य ०५२
६. संतमहिमा ००७
७. उपदेश (जन व मुमुक्षू यांस) ०४१
८. ज्ञान ०३०
एकूण अभंग ३७४

अभंगकर्त्यांची नाममुद्रा

प्राचीन मराठी कवींच्या स्फूट रचनेत प्रत्येक कवितेच्या अंत्य वा उपांत्य चरणात ते स्वतःचा संक्षिप्त नामनिर्देश करत असल्याचं दिसतं. ज्ञानेश्‍वर मात्र आपल्या अभंगांच्या अंत्य वा उपांत्य चरणात ‘बाप रखुमादेवीवरु’ असा नामनिर्देश करतात. निवृत्तीनाथांचेही अभंग नाममुद्रांकित आहेत. बहुतेक सर्व अभंगांत ‘निवृत्ती’ असा उल्लेख शेवटच्या ओळीत आढळतो. काही ठिकाणीच ‘निवृत्ती म्हणे’ असं आढळतं.

उदाहरणार्थ,

१. निवृत्ति निमग्न गयनीची प्रज्ञा |
नामे कोटी यज्ञा होत जात ॥

२. निवृत्ति विठ्ठल सोवितु सकळ |
दिनकाळफळ आत्माराम ॥

३. निवृत्ति म्हणे ते नाम नामनुदे जप |
फळले संकल्प रामनामे ॥

४. निवृत्तिसागर हरिरूप नित्य |
सेविला तो सत्य दो अक्षरी ॥

वरील अभंगांवरून निवृत्तीनाथांनी दोन-तीन प्रकारे आपली नाममुद्रा बदलली आहे; परंतु भाषेच्या साम्यावरून हे सर्व अभंग निवृत्तीनाथांचेच असावेत याबद्दल शंका वाटत नाही.

धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात ‘निवृत्ती-ज्ञानेश्‍वर संवाद’ नावाचं २६ अभंगांचं बाड पाहिलं त्यात कुठल्याही अभंगाच्या शेवटी ‘निवृत्ती म्हणे’ किंवा ‘ज्ञानेश्‍वर म्हणे’ असा उल्लेख आढळून येत नाही; परंतु त्यांची शैली आणि भाषा यावरून ते निवृत्तीनाथांचे अभंग असावेत याची खात्री पटते. त्या संवादाच्या शेवटी ‘इति’ श्री निवृत्तिज्ञानेश्‍वर संवादे प्रबोध संपूर्णमस्तु!’ असा उल्लेख आहे.

निवृत्तीनाथांचे जे हरिपाठाचे अभंग आहेत त्यातील काही अभंग तीन चरणी, पाच चरणी, सहा चरणी आहेत, तर उरलेले चार चरणी आहेत. या सर्व अभंगांतसुद्धा विविध नाममुद्रा आढळतात. उदा.

१. निवृत्ति जपतु अखंड नामावळी |

हृदयकमळी केशीराजे ॥

२. निवृत्ती म्हणे हरिनाम पाठ जपा |

जन्मांतर खेपा अंतरती ॥

३. निवृत्ति मंडळ अमृत सकळ |

घेतले रसाळ हरिनामा ॥

४. निवृत्तिदेवी साधिली राणीव |

हरपले बाव इंद्रियांचे ॥

अभंगकाराचे व्यक्तिमत्त्व

निवृत्तीनाथांचे अभंग कृष्णभक्तीनं नटलेले आहेत. योगीपुरुष असलेले निवृत्तीनाथ विवेक-वैराग्यसंपन्न असूनसुद्धा त्यांचे अभंग कृष्णभक्तीनं आणि नामभक्तीच्या ओलाव्यानं परिपूर्ण आहेत. अभंगांची भाषा साधी, सरळ, मधूर भावाने युक्त अशी आहे. त्यावरून त्यांच्या कवित्वाची ओळख पटते. उदा.

वैकुंठे दुमते नंदाघरी माये |
ते पूर्ण पान्हाये यशोदेसी ॥
ते रूप रुपस कासवी प्रकाश |
योगीजनमानस निवताती |२॥

सुंदर सुनीळराजस गोपाळ |
भक्तासी दयाळ एक्या नामे ॥
निवृत्ति गयनी मन ते चरणी |
अखंडता ध्यानी तल्लीनता ॥

या अभंगांवरून निवृत्तीनाथांना कृष्णाचं रूप किती आवडत होतं ते दिसून येतं. श्रीहरीचं गोकुळातील बालरूप निवृत्तीनाथांना मोहवीत होतं. नंदाघरचा हा कान्हा म्हणजेच मूर्तिमंत परब्रह्म आहे, हे त्यांनी अभंगांद्वारे सामान्य जनांना पटवून दिलं आहे. तसंच श्रीहरीच्या सगुण-निर्गुण स्वरूपाचं वर्णनही त्यात आहे.

सुखाचा सागर, धैर्याचा डोंगर, वैराग्याचे मूळ, असे हे निवृत्तीनाथ आहेत. प्रत्यक्ष ज्ञानेश्‍वरांनी आपल्या गुरुंबद्दल अपार भक्ती, अमाप श्रद्धा, त्यांचं पारमार्थिक ऐश्‍वर्य अनेक ठिकाणी व्यक्त केलं आहे.

अभंगकाराची भाषाशैली

भाषाशैलीवरून व्यक्तिमत्त्वाचा तसंच कवीच्या काळाचाही बोध होतो. निवृत्तीनाथांची भाषा ज्ञानेश्‍वरांसारखी साहित्यिक नाही तरी अर्वाचीनही नाही. निवृत्तीनाथांच्या आणि ज्ञानेश्‍वरांच्या अभंगांत काही ठिकाणी विलक्षण साम्य दिसतं. निवृत्तीनाथांचे अभंग रचनेनं थोडे मोठे, अर्थपूर्ण, गोड, त्यांच्या अनुभवजन्य ज्ञानाची छटा दाखवणारे आहेत. निवृत्तीनाथांच्या अभंगांवर गहिनानाथांची छाप तर ज्ञानेश्‍वरांच्या वाङ्मयावर निवृत्तीनाथांच्या विचारांचा दाट प्रभाव पडलेला दिसतो.

‘सगुण-निर्गुणु एकू गोविंदू रे’, असं मानणार्‍या या परंपरेत आदिस्थानावर विराजमान असलेल्या निवृत्तीनाथांच्या अभंगांत निराकाराचं, निर्गुणाचं, योगविषयक अनुभूतीचं जसं दर्शन होतं तसंच त्यातून रामकृष्णांच्या सगुण प्रेमाचं लाघवही विपुल प्रमाणात दिसतं. निवृत्तीनाथ हे नाथ संप्रदायी. नाथ संप्रदायाची अधिष्ठात्री देवता शिव म्हणजे शंकर. परंतु, ते पंढरीचं वर्णन करतात, विठ्ठलाच्या ठिकाणी ते विष्णू आणि शिवांची एकरूपता पाहातात आणि हरिहर-ऐक्य वर्णन करतात. निवृत्तीनाथांचं श्रेष्ठत्त्व हेच की बहुजनसमाजाला ब्रह्मतत्त्वज्ञान त्यांनी अगदी सोप्या भाषेत सांगितलं.

ज्ञानेश्‍वरीशी शब्दसादृश्य

निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्‍वरांचे थोरले बंधू तसंच गुरू असल्यामुळं दोघांचंही वाङ्मय समकालीन आहे. त्यामुळं भाषेतील सादृश्य अपरिहार्य आहे.

निवृत्तीनाथ गाथेच्या संशुद्धीची दिशा

गाथेत असलेले ३७४ अभंग, अप्रसिद्ध अभंग, ‘मुमुक्षू’ मासिकातील अभंग, हरिपाठाचे सर्व २५ अभंग हे सर्व निवृत्तीनाथांचेच आहेत, की काही प्रक्षिप्त आहेत, याचा विचार करणं गरजेचं आहे. निवृत्तीनाथांचे ‘समाधिबोध’ ज्ञानेश्‍वरांशी आणि मुक्ताईशी संवाद ही प्रकरणं यांचाही विचार यात महत्त्वाचा आहे.

निवृत्तीनाथांचे छापील ३७४ अभंग

श्रीहरिच्या सगुण-निर्गुण स्वरूपाचे वर्णन

या प्रकरणात एकूण १३४ अभंग आहेत. यात गोकुळाचं, कृष्णाचं स्वरूप, त्याच्या लीला, कृष्णाच्या गोपींबरोबरच्या क्रीडा या सर्वांचं वेधक, रोचक असं वर्णन आहे. जीवाशिवाशी एकरूप झालेलं श्रीकृष्णाचं निर्गुण रूप पाहून निवृत्तीनाथांना आनंद झालेला आहे. काही अभंगांत त्यांनी कृष्णाच्या वर्णनाचा आणि आपल्याला गहिनीनाथांनी दिलेल्या ज्ञानाचा परस्परसंबंध जोडलेला दिसतो. उदा.

अकर्ता पै कर्ता नाही यासी सत्ता |
आपण तत्त्वतां स्वये असे ॥
ते रूप चोखळ कृष्णनामे बिंबे |
यशोदा सुलभे गीती गाय ॥
व्योमाकार ठसा नभी दशदिशा |
त्यामाजि आकाशा अवकाश होय ॥
निवृत्ति म्हणे गुरु माझा पूर्ण ब्रह्म |
उपदेश सुगम कृष्णनाम ॥

यापुढील अभंगातदेखील निवृत्तीनाथ म्हणतात की, गहिनीनाथांनी मनीचं गूज म्हणजेच मंत्रबीजाचा उपदेश मला केला आहे. या सर्व अभंगांत निवृत्तीनाथांचं कृष्णप्रेम, कृष्णभक्ती ठिकठिकाणी दिसून येते.

सद्गुरुप्रसादाने प्राप्त झालेल्या स्थितीचे वर्णन

यात एकूण ७७ अभंग आहेत, गुरू गहिनीनाथांनी त्यांना नाथपंथाची दीक्षा दिली. तसंच ‘जयजय रामकृष्ण हरी’ हा मंत्र दिला. या अनुग्रहामुळे प्राप्त झालेल्या स्थितीचं वर्णन या सर्व अभंगांत दिसून येतं.

निवृत्ति गहिनी कृपा केली पूर्ण |
कूळ हे पावन कृष्णनामे ॥

वरील अभंगात निवृत्तीनाथ म्हणतात की, कृष्णनामाचा मंत्र गहिनीनाथांनी दिल्यामुळे माझं कूळ पावन झालं. यातील बहुतेक अभंगांत ‘निवृत्ती म्हणे’ अशी नाममुद्रा आढळते. एका अभंगात ‘निवृत्तीराज म्हणे’ असंही दिसतं.

‘निवृत्तिराज म्हणे तो गुरुविण न तुटे |
प्रपंच सपाटे ब्रह्मी नेतु॥’

या अभंगांत आपल्या गुरुंचा वारंवार श्रद्धापूर्वक उल्लेख केला आहे. श्रीकृष्णनामाचं रहस्य श्री सद्गुरुंकडून प्राप्त झाल्यामुळं बर्‍याच अभंगांत बालकृष्णाचं वर्णन दिसून येतं. या भागातील अभंगांची रचना थोडीशी क्लिष्ट आणि शब्द अवघड आहेत. उदा.

हरि आत्मा होय परात्पर आले |
नाम हे क्षरले वेदमते ॥
परम समाधान परमवर्यधन |
नाम जनार्दन क्षरले असे ॥

पंढरीमाहात्म्य : या विषयावर निवृत्तीनाथांचे २० अभंग आहेत. याच विषयावर ज्ञानेश्‍वरांनी २५ अभंग, सोपानदेवांनी १ अभंग, मुक्ताबाईनं ३ अभंग लिहिले आहेत. परंतु, या भावंडांचे अभंग निवृत्तीनाथांच्या अभंगाहून पूर्णपणे वेगळे आहेत.

निवृत्तीनाथांच्या या अभंगांत पुंडलिकाचं वर्णन, त्याच्या सहवासामुळे होणारा आनंद, गहिनीनाथांनी सांगितलेले विठ्ठलाचे गूज या विषयांवरील भाष्य अधिक आहे. ही रचना सुगम आहे. उदा.

पुंडलिकाचे भाग्य वर्णावया अमरी |
नाही चराचरी ऐंसा कोणी ॥
विष्णुसहित शिव आणिला पंढरी |
केले भीमातीरी पेरवणे जेणे॥
ब्रह्मादिका अंत न कळे रुपाचा |
एवढी कीर्ती वाचा बोलो काय ॥
निवृत्ति सांगे मातु विठ्ठल उच्चर |
वैकुंठ उतरे एक्या नामे ॥

यातील भाषा सोपी वाटते. पांडुरंगाचं विष्णू आणि शिवाचं ऐक्य असणारं रूप निवृत्तीनाथांनी वर्णन केलं आहे. हे भाग्य वर्णन करण्याला या चराचरावरील कोणीच समर्थ नाही, असं निवृत्तीनाथ म्हणतात. यात निवृत्तीनाथांच्या सुरम्य कल्पनाशक्तीचा प्रˆत्यय दिसतो.

पंढरीतील काला : या विषयावर फक्त १३ अभंग आहेत. याच विषयावर सोपानदेवांनीही १ अभंग लिहिला आहे. या सर्व अभंगांत कृष्णलीलांचंच वर्णन जास्त आढळतं. त्याचबरोबर नामदेव, ज्ञानदेव, सोपान, चांगा या संतांचे उल्लेखही केलेले दिसतात. उदा.

तव आनंदला हरि परिपूर्ण लोटला |
मुक्ताई लाधला प्रेमकवळू ॥
चांगयाचे मुखी घालीत कवळु |
आपण गोपाळु दर्यासिंधु ॥
दिधले ते घेई पुर्ण ते तू होई |
सप्रेमाचे डोही संतजन ॥
नामया विठ्या नारया लाधले |
गोणाई फावले अखंडित ॥
राही रखुमाई कुरवंडी करिती |
जिवे वोवाळती नामयासी ॥
निवृत्ति खेचर ज्ञानदेव हरि |
सोपान झडकरी बोलाविला ॥

यातील प्रत्येक अभंगात सर्व संतांची नावं दिसून येतात. तसंच पंढरीच्या वाळवंटांचं, भीमातीराचं वर्णन केलेलं दिसतं. त्यावरून या सर्व अभंगांची रचना पंढरपूर यात्रेच्या वेळी केली असावी; कारण याच वेळी सर्व संतांचा मेळा भीमातीरी जमतो.

नामसंकीर्तनमाहात्म्य

या विषयावर ५२ अभंग रचलेले दिसतात. ज्ञानदेवांनीही याच विषयावर २५ अभंग लिहिले आहेत. सोपानदेवांनीही ‘नाममहिमा’ या नावाखाली हाच विषय घेऊन अभंग लिहिले आहेत. मुक्ताईनं या विषयावरील प्रकरणाला नुसतेच ‘नाम’ असं नाव दिलं आहे. यावरून चारी भावंडांना नामाचं प्रेम आणि महत्त्व अलोट होतं, हे दिसतं. नाम कसं असावं, कसं घ्यावं, ते घेतल्यामुळे तृप्ती कशी मिळते, याचं वर्णन पुढील अभंगांत केलेलं दिसतं.

भावभक्ति, प्रेम, दया, शांति, क्षमा |
अखंडित प्रेमा असो द्यावा ॥
सर्वभूति भजन करावे सर्वथा |
रामनाथ कथा आरंभाव्या ॥

नाम मुखात असल्यामुळे भाग्य येतं, तसंच त्यास यमाचा धाक नसतो. जेथे ‘राम राम हरि’ असा मंत्र असतो तेथे नेहमी हरीचं वास्तव्य असतं आणि शत्रुचं भय नसतं, हे सर्व निवृत्तीनाथ त्यांच्या अभंग क्र. २४८मध्ये सांगतात. तसंच हे नाम आपल्याला गहिनीनाथांनी दिलं आहे, त्यामुळं चित्तामध्ये अखंड प्रेमाचा वास आहे, असंही ते सांगतात.

संतमहिमा

यात एकूण सातच अभंग दिसतात. एवढी कमी संख्या असण्याचं कारण असं वाटतं की, कदाचित यातील काही अभंग गहाळ झाले असतील किंवा ते इतर प्रकरणांत गेले असतील. ज्ञानेश्‍वरांनीही याच विषयावर अभंग रचना केलेली आहे. आतापर्यंत पाहिलेल्या सर्व अभंगांच्या विषयावर तुलनेवरून असं दिसतं की, निवृत्तीनाथांच्या आणि ज्ञानदेवांच्या अभंगरचनेत विषयाचं साधर्म्य जास्त आहे. म्हणजेच ते वडीलबंधू आणि गुरू असल्यामुळं ज्ञानेश्‍वरांनी त्यांचं अनुकरण केलं असल्यास नवल नाही. संतांचा महिमा सांगणारा एकच अभंग उदाहरणादाखल पुरेसा आहे.

सोपान सवंगडा स्वानंद ज्ञानदेव |
मुक्ताईचा भाव विठ्ठलराज ॥
दिंडी टाळघोळगाती विठ्ठलनाम |
खेचरासी प्रेम विठ्ठलाचे ॥
नरहरी विठा नारा ते गोणाई |
प्रेमभरित डोही वोसंडती ॥

आपल्या भावंडांना (म्हणजेच शिष्यांनासुद्धा) निवृत्तीनाथांनी संतांच्या थोर पंगतीत नेऊन बसवलं आहे. तसंच, पुढच्या एका अभंगात निवृत्तीनाथांनी संतांना फुलं आणि भ्रमर यांची उपमा दिली आहे. सुमनाच्या वासानं भ्रमर जसे स्वतःला विसरतात तसे विठ्ठलाच्या नामात संत तल्लीन झाले की स्वतःला विसरतात, असा संतांचा महिमा अवर्णनीय आहे.

जन व मुमुक्षू यास उपदेश

या विषयावरील ४१ अभंग आहेत. यात त्यांनी सामान्य जनांना साध्या, सोप्या भाषेत उपदेश केला आहे. त्यांच्या तिन्ही भावंडांनी याच विषयावर रचना केल्या आहेत. निवृत्तीनाथांनी आपल्या अभंगात जनांनी काय करावं आणि काय करू नये याबद्दल फार सुरेख शब्दांत सांगितलं आहे. उदा. अभंग क्र. ३०५

समता धरा आधी टाका द्वैतबुद्धी |
आपोआप शुद्धी गोविंदी रमा॥
शम नांदे हरि विषम अगोरी |
निवृत्ति चराचरी सांगुतसे ॥

निवृत्तीनाथांनी या सर्व अभंगांतून आपपर भाव सर्व एका हरीच्या ठायी लीन करावेत, असं सांगितलं आहे.

ज्ञान

या विषयावर एकूण ३० अभंग रचले आहेत. या विषयावर चारी भावंडांनी भाष्य केलं आहे. निवृत्तीनाथांच्या अभंगांपैकी एक अभंग ज्ञानदेवगाथेत आढळतो; परंतु तो निवृत्तीनाथांचाच आहे, याबद्दल खात्री पटते; कारण तो अभंग निवृत्तीनाथांच्या गाथेत मुद्रित आहे. तसंच त्याची नाममुद्रा ‘निवृत्ती म्हणे’ हीच आहे. तो अभंग असा :

उन्मनी अवस्था लागली निशाणी |
तन्मयता ध्यानी मुनिजन ॥
मन तेथे नाही पहासी रे काही |
सर्व हरी डोही बुडी देखा ॥

वरील अभंग ज्ञानदेवगाथेत मुद्रक, प्रकाशक यांच्या नजरचुकीनं गेला असावा किंवा शेवटच्या चरणातील ‘ज्ञाना’ या नावाच्या उल्लेखावरून तो ज्ञानदेवांचा अभंग समजला गेला असावा. याबाबत इतर कोणी काही मतं मांडली असल्याचं माझ्यातरी पाहण्यात आलं नाही.

प्रस्तुत प्रकरणात निवृत्तीनाथांनी ज्ञानाचं महत्त्व वर्णन करताना ब्रह्म, ब्रह्मांड, पिंड, आत्मा इत्यादी गोष्टींच्या ज्ञानाची अथांगता वर्णन केली आहे, ती सामान्य माणसाला चटकन आकलन होणारी नाही.

निवृत्तीनाथ हे वारकरी संप्रदायाचे तसेच नाथ संप्रदायाचे एक लोकप्रिय संतकवी होते. नाथ संप्रदाय तसा थोडासा कठोर व्रताचरणाचा मानला जातो. त्या तुलनेत वारकरी संप्रदाय हा सर्वसामान्य माणसाला सहजतेने साधला जाणारा केवळ भक्तिमार्गावर आधारित असा संप्रदाय आहे. निवृत्तीनाथांच्या अभंगगाथेचं स्थान सर्व संतांच्या तुलनेत वरचं असूनदेखील या साहित्याची मराठीच्या भाषिक अभ्यासात थोडीशी हेळसांडच झालेली दिसते. तरी त्या दृष्टीनं वरिष्ठांनी काही प्रयत्न करून निवृत्तीनाथांच्या अभंगगाथेला महत्त्व लाभण्यासाठी तिची प्राचीनतम आणि संशोधित संहिता उपलब्ध केल्यास अनेक अभ्यासकांना दिलासा मिळेल. धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिर येथे बाड क्र. ७०२मध्ये २६ ओव्यांचं हे प्रकरण प्रत्यक्ष जाऊन लिहून आणलं आहे. या ओव्यांमध्ये दोघांमधलं संभाषण असं अजिबात दिसून येत नाही. सर्व अभंग निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्‍वरांना उपदेशपर रचले असावेत असं वाटतं. ज्ञानदेवगाथेमध्ये निवृत्ती-ज्ञानदेव संवाद याच नावाखाली ३१ अभंगांचं प्रकरण प्रसिद्ध आहे. यात संभाषणासारखे संवाद आहेत; तसंच निवृत्तीनाथांच्या अभंगांची सुरुवात ‘अरे अरे ज्ञाना’ अशी केलेली आढळते. त्यातील अभंग हे निवृत्तीनाथांचेच असावेत, असं वाटतं; कारण त्यांची नाममुद्राही इतर अभंगांसारखीच त्यात आढळते आणि भाषाही इतर अभंगांच्या भाषेशी जुळणारी आहे. त्या उलट धुळे येथील २६ अभंगांत ‘निवृत्ती’ ही नाममुद्रा एकाही ओवीत आढळत नाही. भाषाही अशुद्ध वाटते. र्‍हस्व-दीर्घाच्या चुकाही या हस्तलिखितात बर्‍याच दिसतात. यावरून हे अभंग प्रक्षिप्त असावेत, असं वाटतं.

निवृत्तीनाथांचे धुळे येथे सापडलेले अप्रसिद्ध अभंग

हे सर्व स्फूट स्वरूपातील अभंग असून, ते धुळे येथील ‘समर्थ वाग्देवता मंदिर’ या संस्थेत हस्तलिखित अशा अनेक बाडांमधून शोधून काढून प्रत्यक्ष जाऊन लिहून आणले आहेत. त्याची ग्राह्यग्राह्यता ही अभंगांची नाममुद्रा आणि त्यातील भाषा या दोन गोष्टींवरून ठरविता येईल.

यांतील काही अभंग ‘नीवर्तीदास’ या नाममुद्रेचे आहेत. हे अभंग धुळे येथील ‘रामदासी संशोधन’ या पुस्तकात निवृत्तीनाथांचे आहेत, असं म्हटलं आहे. परंतु, ते निवृत्तीनाथांचे नसून त्यांच्या नंतरच्या पिढीतील एखाद्या शिष्याचे असावेत. जो स्वतःला ‘नीवर्तीदास’ म्हणवून घेत असेल त्याचे अभंग निवृत्तीनाथांच्या नावावर घुसडले गेले असण्याची शक्यता आहे. त्या अभंगांची भाषाही वेगळी आहे. उदा.

भक्ती भावे आवळीला | जावो नेदी उबा केला ॥
नीवर्तीदास म्हणे विठ्ठला | जन्मोजन्मी न वीसंबे ॥

निवृत्तीनाथांचे ‘मुमुक्षू’ या मासिकातील छापील अभंग

‘मुमुक्षू’ या मासिकाच्या १९२७ सालच्या काही अंकांत हे अभंग छापलेले आहेत. हे अभंग नगर जिल्ह्यातील जुन्या घराण्यातील कागदपत्रे आणि वह्या तपासून एका शोधक मित्रानं संपादकांकडे पाठवले होते. हे कुठेही न प्रसिद्ध झालेले असे ३०० अभंग आहेत. अभंग फार बहारीचे आहेत. वरील अंकातील फक्त निवृत्तीनाथांचे अभंग उतरवून घेतले आहेत. त्यांची संख्या ३५ आहे. त्याशिवाय ‘निवृत्ती-मुक्ताई संवाद’ नावाच्या २१ अभंगांत ‘निवृत्ती म्हणे’, ‘मुक्ताई म्हणे’ असे उल्लेख आहेत. त्यावरून हे प्रकरण त्या दोघांतील संभाषणाच्या स्वरूपात घडलं असण्याची शक्यता वाटते.

0 Shares
अनाथांचा नाथ समाधीसुख