समाधीसुख

प्रतिभा औटी - पंडित

‘समाधीबोध’ हे संत निवृत्तीनाथांच्या नावावर असलेलं अवघ्या तीस ओव्यांचं पुस्तक. यात निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरमाउलींना संजीवन समाधी घेण्याचा मार्ग वर्णन करून सांगितला आहे. त्याची ही अभ्यासपूर्ण ओळख.

निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांच्या भावबंधाची गुंफण मनाला मोहवून टाकणारी आहे. परस्परांना समजून घेण्याची त्यांची पद्धत जाणीव नेणीवेच्या पलिकडची. आई-वडिलांच्या पश्चात धाकट्या भावंडांचं पितृत्व अनायसे स्वीकारणारे निवृत्तीनाथ किती लहान वयात प्रौढ झाले. सांभाळ करणं म्हणजे नुसतं खायला प्यायला घालून मोठं करणं नव्हे, त्याबरोबर निवृत्तीनाथांनी ज्ञानदान अधिक महत्त्वाचे समजले. ते ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताईचे सद्गुरू झाले. नात्यानं ते ज्येष्ठ बंधू होतेच. बंधुत्व, पितृत्व अन् गुरूत्वाचा त्रिवेणी संगम निवृत्तीनाथांमध्ये झाला अन् ज्ञानदेवादी भावंडांचं विश्व बदललं. निवृत्तीनाथांच्या सख्यत्वाचा हळूवार स्पर्शही त्यांच्या भावविश्वाला होता. ज्ञानदेवांच्या दृष्टीनं निवृत्तीनाथ ‘विश्वात्मक देव’ झाले. निवृत्तीनाथांच्या संस्कारांना मान देत, धाकट्या भावंडानी त्यांचा एकही शब्द खाली न पडू देता स्वीकारला. सर्वच भावंडांच्या हातून महान कार्य घडलं. आपण ज्या कार्यासाठी या विश्वात आलो ते पूर्ण झाल्याची समंजस जाणीव सर्वांना योग्य वेळी झाली. सर्वप्रथम ज्ञानदेवांचं मन समाधानानं तृप्त झालं. त्यांनी निवृत्तीनाथांकडे जीवितकार्य पूर्ण करून समाधी घेण्याची परवानगी मागितली. परिपूर्ण समाधीचा अर्थ गुरूवर्य निवृत्तीनाथांकडून समजून घेण्यास ज्ञानदेवांचं मन उत्सुक झालं होतं.

खरं तर, ज्ञानदेव धाकटे बंधू असल्यानं ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठानं समाधीविषयक विचार करणं निवृत्तीनाथांना अस्वस्थ करून गेलं; परंतु ज्ञानदेवांचा दृढ निश्चय पाहता निवृत्तीनाथांच्या गुरूप्रेमानं बंधूप्रेमावर मात केली. समाधीच्या संदर्भात यथासांग माहितीपर उपदेश निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना केला, तोच ‘समाधीबोध’. अवघ्या तीस ओव्यांच्या ग्रंथातील शब्दाशब्दात विस्तृत ज्ञान भरलेलं आहे. संजीवन समाधीविषयीची आपली उत्सुकता वाढवत नेणारा आणि मनाचं पूर्ण समाधान करणारा हा महान ग्रंथ आहे. समाधीबोधाची सुरुवात संवादरूपानं होते. पहिल्या ओवीतच ज्ञानदेवांच्या मनातील अपार उत्सुकता जाणवते. निवृत्तीनाथांच्या मनातील बंधूप्रेम अन् अभ्यासपूर्ण विचारांची परिपक्वता पहिल्या ओवीतूनच लक्ष वेधून घेते. निवृत्तीनाथ म्हणतात,

ऐक बापा ज्ञानेश्वरा | समाधीचा विश्रांती थारा ॥
योगधारणेच्या विचारा | वर्तत जावे ॥

समाधी म्हणजे सर्व सुखांच्या अंतिम विश्रांतीचा आधार आहे. समाधी समजून घ्यायची, तर आधी योगधारणा जाणून घ्यायला हवी, असं निवृत्तीनाथांनी म्हटलं आहे. समाधी हे योगाचं अंतिम अंग आहे. अंत:करण ध्येयाशी पूर्णपणे एकरूप होतं; त्यावेळी समाधीस्थिती प्राप्त होते. समाधी ही ध्यानाची परिपक्व अवस्था होय. महामुनी पतंजलींनी योगशास्त्रात दोन प्रकारची समाधी सांगितली आहे. सबीज समाधी म्हणजे ज्यामध्ये अस्मिता जागृत असते; पण ती पूर्णपणे ध्येयाकार झालेली असते. हिलाच सहविकल्प समाधी असंही म्हणतात. निर्बिज किंवा निर्विकल्प समाधीत चित्त पूर्णपणे वृत्तीशून्य होते. चित्त ब्रह्माकार होऊन जातं. ज्ञानदेवादी सर्व भावंडांनी ‘संजीवन समाधी’ स्वीकारली. त्याचा उल्लेख मात्र पतंजली योगशास्त्रात नाही. समाधीबोधातील पहिल्याच ओवीतून श्रीनिवृत्तीनाथांनी नेमक्या शब्दांतून योगशास्त्रावर पूर्ण प्रकाश टाकला आहे.

समाधीस्थिती प्राप्त होण्याकरिता कसं बसावं? काय करावं? यासारख्या साध्या गोष्टींचं महत्त्व श्रीनिवृत्तीनाथांनी सांगितलं आहे.

घालोनिया पद्मासन | नासाग्री दृष्टी देऊन ॥
चंचल न करावे मन | प्राणायाम साधावा ॥

वास्तविक ज्ञानेश्वरीच्या प्रतिपादनात गीतेच्या सहाव्या अध्यायाचं निरूपण करताना ज्ञानदेवमाउलींनी विस्तारानं आणि शास्त्रशुद्ध वर्णन केलेलं आहे. त्यावेळी देखील माउलींनी आधी मन एकाग्र करून सद्गुरू स्मरणाचा अनुभव घ्यावा, असं म्हटलं आहे. प्रत्यक्ष समाधीच्या निश्चयानंतरही सर्वप्रथम अत्यंत विनम्र भावनेनं ते निवृत्तीनाथांकडून समाधीबोध जाणून घेत आहेत, हे ज्ञानदेवांच्या गुरूश्रद्धेचं वैशिष्ट्य.

समाधी स्थितीसाठी विशिष्ट योगमुद्रा स्वीकारावी, असं निवृत्तीनाथ सांगतात. योगमुद्रा म्हणजे कमरेपासून डोक्यापर्यंतच्या भागाची विशिष्ट रचना होय. त्यामध्ये ‘भूचरी’ म्हणजे जमिनीकडे पाहणं, ‘खेचरी’ म्हणजे आकाशाकडे पाहणं आणि ‘चराचरी’ म्हणजे दोन्हीकडे पाहणं, अशा तीन मुद्रांचा उल्लेख केला आहे. विशिष्ट मुद्रेच्या साहाय्यानं अलक्षाला, म्हणजे न दिसणार्‍या आत्म्याला प्राप्त करता येतं. त्यासाठी दीर्घ श्वास घेऊन स्थिर होण्यास सांगितलं आहे. समाधीसाठी पूर्व दिशेला तोंड करून बसावं आणि स्थिर आसन लावावं. आसन म्हणजे मनाला प्रसन्नता देणारी शरीराची स्थिती होय. आसनस्थितीबद्दल ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात ज्ञानेश्वरमाउलींच्या अभ्यासपूर्ण ओव्या आहेत. त्यानुसार त्यांनी स्पष्ट केलं आहे की, जेथे मन स्थिर होईल अशा जागी आसन मांडावं. तळाला अग्रासह कोवळे दर्भ अंथरावेत. त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी. आसन उंच-सखल होऊ नये; अन्यथा शरीर डोलेल अन् एकाग्रता प्राप्त होणार नाही. अशी सूक्ष्म जाणीव व्यक्त करणारा त्यांचा हा सर्व अभ्यास आधीच परिपूर्ण आहे. श्रीनिवृत्तीनाथ त्याची केवळ आठवण करून देत असावेत.

समाधी घेणं म्हणजे केवळ शरीराची अवस्था नव्हे. त्यासाठी आधी अंत:करणाची सिद्धता होणं महत्त्वाचं आहे. अंत:करण शुद्ध व्हायला हवं. त्यासाठी मन, बुद्धी आणि चित्ताला मोह घालणारे विषय अंत:करणातून काढून टाकले पाहिजेत. योगधारणेला सुरुवात करताना, आत्म्याच्या जवळ पोचताना प्रथम गुरूचरणांचं स्मरण करायला निवृत्तीनाथ सांगतात.

शुद्ध करोनि अंत:करणा | वेगी साधी योगधारणा ॥
आठवोनि श्रीगुरूचरणा | अगोचरी साधावी ॥

समाधीकरिता असणारी ही प्राथमिक तयारी पूर्ण करावी. शरीर आणि मन स्थिर झाल्यानंतर दीर्घ श्वास घ्यावा. निश्चयपूर्वक बळाचा वापर करून तो श्वास अष्ट इंद्रियांमध्ये कोंडावा, म्हणजे शरीर स्थिर होतं. अशा वेळी अंतर्मुख होऊन आत्मरूप परमेश्वराचं सगुण स्वरूप पहावं. आत्मा हृदयात प्रगट होतो, त्यामुळं शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होऊन पंचप्राण कंठस्थानी येऊन स्थिर होतात. त्यांच्यावर इडा, पिंगला, सुषुम्ना नाड्या नियंत्रण ठेवतात. तेव्हा सुप्त कुंडलिनी जागृत होऊन क्रियाशील बनते. अष्टांगयोग साध्य होऊन योगबलानं आपोआप जठराग्नी शांत होतो. कुंडलिनी म्हणजे परमेश्वराचं वैभव होय. परमेश्वराची शक्ती जेव्हा ज्ञान आणि क्रियांच्या रूपानं जाणवते तेव्हा ती कुंडलिनी असते. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात कुंडलिनीची विस्तारपूर्वक माहिती ज्ञानदेवांनी दिलेली आहे. ज्ञानदेव म्हणतात, कुंडलिनी जागृत झाली की, योग्यामध्ये अंतर्बाह्य बदल होतात. त्याचे ठायी चैतन्य नव्यानं प्रगट होतं. योग्याच्या शरीराला अप्रतिम तेज प्राप्त होतं. एखाद्या स्वयंभू स्फटिकाच्या तेजासम किंवा रत्नाच्या बीजाला कोंब निघावेत असा देदिप्यमान देह होतो. शुद्ध निर्मळ अंतर्ज्योतिचं, चैतन्यप्रकाशाचं ते तेज असतं. ती मूर्तिमंत शांती असते. ज्ञानदेवांचे शब्द आहेत,

मग समुद्रापैलाडी देखे | स्वर्गीचा आलोचू ऐके | मनोगत ओळखे | मुंगियेचे ॥

कुंडलिनी जागृत झाल्यानंतर योगी असा दिव्यत्वाला पोचतो. त्यापुढे जाऊन जे घडतं ते निवृत्तीनाथ सांगतात, कुंडलिनी जागृत होऊन शरीरात वरच्या दिशेनं जाऊ लागली की, शरीरातील रोम रोम कंपित होतात. आपलं शरीर ज्या सप्तधातूंपासून बनलेलं आहे, त्या सप्तधातूरूपी सात समुद्रांचं जणू कुंडलिनी आचमन करते. त्यामुळं तिची तहानभूक तृप्त होते. अशा वेळी जो अंतर्मुख होतो, त्याला निश्चितच सगुण रूप जाणवतं. ती निर्गुण परब्रह्माची शोभा म्हणजे सगुणरूप असते. सगुण निर्गुणाचं पूर्ण ऐक्य होतं, अशा वेळी कुंडलिनी आपल्या शरीरातील सात चक्रांना भेदून हृदयकमळापाशी पोचते. त्या हृदयकमळात अत्यंत सोज्ज्वळ आत्मा तेजस्वीतेनं विलसतो. कुंडलिनीच्या प्रभावानं आत्मादेखील वरच्या दिशेनं क्रियाशील होतो. आत्मशक्ती योगेश्वरी म्हणजेच कुंडलिनी. ती प्रकाशाच्या स्वरूपात प्रगट होते अन् शरीरातील षडचक्रात फिरू लागते. अर्थातच योग्याच्या मनावरचा एकेक पडदा दूर होतो. त्याला अलौकिक सामर्थ्य प्राप्त होतं. कुंडलिनी चिदाकाशात प्रवेश करते तेव्हा शरीर आणि मनाचं तादात्म्य सुटतं. कुंडलिनी शक्तीचं शिवासह ऐक्य होऊन योगी मुक्त होतो. त्याची तहानभूक हरपते. जीवनाचं कारण असणारे जन्म-मृत्यू नाहीसे होतात अन् त्याला अविनाशी तत्त्वाचं सुख अनुभवायला मिळतं. सतरावी कला अनुभवण्याचा हा आनंद असतो, असं निवृत्तीनाथ म्हणतात. हाच अनुभव ज्ञानश्वरमाउलींनी ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायातील पुढील ओवीतून दिला आहे.

जे ज्ञानामृताचे जान्हवी | आनंद चंद्रीची सत्रावी | विचार क्षीरार्णवीची नवी | लक्ष्मी जेथ ॥

ही ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे. आनंदरूपी चंद्राची जणू सतरावी कला आहे. विचाररूपी ज्ञानसागरातून निघालेली नवी लक्ष्मी आहे. तिच्या प्राप्तीनं समाधीबोध होतो, असं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे. तोच अनुभव प्रत्यक्षपणे घेण्यास त्यांचं मन उत्सुक झालं.

अशा क्षणी जे घडते ते किती सुंदर आहे ! निवृत्तीनाथ म्हणतात की, अनाहत ध्वनीचा नाद येतो. अनाहत ध्वनी म्हणजे, कुंडलिनी हृदयाठायी आल्यावर उमटणारा ध्वनी होय. त्यापासूनच वेदांची निर्मिती झाली, असं संतांचं म्हणणं आहे. या अनाहत नादातून अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा अशा निर्विकार ओंकार स्वरूपात आत्मा प्रगट होतो. ओंकार हे जगाचं आदिबीज आहे. आत्मा तेथून निघून हृदयगुंफेत जातो. आत्मा परमात्म्यास भेटून त्याच्यात समरस होतो. त्यांच्यात अद्वैत निर्माण होते. कुंडलिनी हृदयाच्या पुढे सरकली, की आत्मस्थिती प्राप्त होते. या स्थितीत जे घडतं ते निवृत्तीनाथांच्या शब्दातून उमलतं.

तेथे योगनिद्रा आरंभिली | विश्रांती सत्रावी | चिदस्तु प्राप्त जाली | समाधि भुवनी ॥

भगवान श्रीकृष्णांनी प्रतिपादन केलेली आणि ज्ञानदेवांनी निरूपण केलेली दुसर्‍या अध्यायातील स्थितप्रज्ञाची लक्षणं परिपूर्णतेनं जाणवतात, अशी समाधी अवस्था म्हणजे ब्रह्मानंदाची प्राप्ती होय. मनातील सर्व प्रकारचे द्वैत, द्वैतभावना, देहभावना नाहीशी झालेली असते. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, अहंकार या सहा विकारांच्या रूपातील चांडाळ जणू जळून जातात आणि अत्यंत निर्मळ शुद्धस्वरूप झालेला योगी समाधीसुखात दंग होऊन जातो. प्रत्यक्षात समाधी सुखाचं विश्रांतीस्थान असलेला आत्मा समाधीस्थितीत प्रकट होतो. तो प्रकाशमय ज्योतीच्या स्वरूपातील पुरुषोत्तमच असतो.

तेथे ज्योतिर्आत्माराम | समाधीसुखाचा विश्राम | प्रकट जाला पुरुषोत्तम | समाधीच्या ठाई ॥

समाधी हीच ब्रह्मसुख प्राप्त करण्याची स्थिती आहे. त्याकरता योगाभ्यासानं योगाची उपासना करून चित्तातील काजळी अर्थात द्वैत भावना अन् षड्रिपुंची काजळी नष्ट होते. योगी स्वयंप्रकाशी दीपस्वरूप होऊन जातो. त्याचा आत्मा आणि प्रत्यक्ष परमात्मा यांच्यात अद्वैतस्थिती प्राप्त होते. ही सर्वोच्च स्थिती म्हणजे समाधीस्थिती. निवृत्तीनाथांचे तेजस्वी शब्द समाधीचा अर्थ प्रकाशमान करतात.

समाधी सुखाचे साधन | योगी अभ्यास करी जाण | त्याची काजळी ओलांडून | दीपरूप होय ॥

एकेक पायरी चढत हळूहळू सर्वोच्च शिखरापाशी न्यावं तसं निवृत्तीनाथांनी समाधीबोधाबद्दल ज्ञानदेवांना सांगताना केलं आहे. समाधीचं सुखवर्णन करताना ते ज्ञानदेवांना म्हणतात की, काळाची विवंचना, काळजी सोडून द्यावी. आत्म्याचं परमात्म्याशी ऐक्य घडवून आणणारी कुंडलिनी जागृत करावी आणि तो आनंद, ते सुख उपभोगावं; मात्र त्यानंतर पुन्हा मनात विषयविकार आणू नयेत. षड्रिपूंना जवळ करू नये. मनात संभ्रम निर्माण होऊ देऊ नये. परमात्म्याशी ऐक्य पावलेला आत्मा पुन्हा मूळ ठिकाणी आणून द्वैतभावना निर्माण करू नये, तसं झालं तर जेवढी साधना केली ती सगळी वाया गेल्यासारखं होईल.

उच्च स्थिती प्राप्त केलेला आत्मा पुन्हा खालच्या पातळीवर आला तर मनुष्याचं अध:पतन होतं. त्यातून खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. केलेलं सर्वच वाया जातं. असं होऊ देऊ नये. कायमस्वरूपी समाधीसुखच अनुभवावं. आत्मा परमात्म्याशी स्थिर ठेवावा. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे पूर्णब्रह्म आहेत; पण ते अवतार असल्याचे भासतात. योगसाधनेमुळं ज्ञान प्राप्त झालं की, परब्रह्म हे निर्गुण निराकार असल्याचं सत्य समजून येतं अन् द्वैतभावना संपून परब्रह्माचा साक्षात्कार घडतो. योगमार्गाचं रहस्य निवृत्तीनाथांनी असं समजावलं. हे सर्व ऐकून ज्ञानदेवांना अतिशय समाधान प्राप्त झालं. त्यांनी गुरूवर्य निवृत्तीनाथांच्या चरणी लोटांगण घातलं. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना आपल्या हृदयाशी धरलं. ही गुरूशिष्यांची अपूर्व भेट होती.

निवृत्तीनाथांच्या मनात आपला शिष्य ज्ञानदेव समाधीकरिता सर्वार्थानं सिद्ध झाला असून, कसोटीला उतरल्याचं समाधान प्राप्त झालं. खर्‍या अर्थानं समाधीबोध प्राप्त झालेले ज्ञानदेव आता वेगळं काही करणं शक्य नव्हतं. निवृत्तीनाथांनी दिलेला समाधीबोध म्हणजे संजीवन समाधी घेण्यासाठी त्यांना मिळालेली परवानगी होती. हे जाणून त्यांनी एकच केलं, जे निवृत्तीनाथांनी समाधीबोधाच्या अखेरच्या ओवीत प्रसन्न मनानं पण जडावलेल्या अंत:करणानं लिहिलंय,

मग शिष्य प्रणिपात केला | मस्तकी हस्त गुरूने ठेविला | जावोनि समाधी बैसला | योगिराज ॥

शिष्योत्तम ज्ञानदेवांनी नमस्कार केला. सद्गुरूंनी आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवला अन् योगिराज ज्ञानदेवांनी समाधी लावली. निवृत्तीनाथांच्या मनात भावनांचं वादळ उठलं. त्यांच्यातील पितृत्व भावनेनं मन गलबललं. जणू काही म्हणू लागलं,

ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांचे जाणे | केले नारायणे उफराटे ॥
उफराटे फार कळले माझे मनी | वळचणीचे पाणी आढ्या गेले ॥

पितृत्व, बंधुत्व आणि सख्यत्व या नात्यांपेक्षा गुरूत्व भावना सर्वश्रेष्ठ ठरली. म्हणूनच सातशे वर्षांहून अधिक काळ होऊन गेला तरी गुरूवर्य निवृत्तीनाथांच्या समाधीबोधास अनुसरून ज्ञानदेव समाधी परिपूर्ण बैसलेले आहेत. ज्ञानदेवांच्या आळंदीतील समाधीस्थळी समाधीबोधाचे शब्द न् शब्द आपल्या मनापर्यंत पोचत राहतात. निवृत्तीनाथ-ज्ञानदेवांची भावबंधाची गुंफण आपलं मन व्याकूळ करते अन् व्यापून टाकते… आजही!

निवृत्तीनाथांच्या नावावरचे ग्रंथ

निवृत्तीनाथांच्या समकालीन संतांनी त्यांचं वर्णन कवी असं केलेलं आहे. पण अभंगांशिवाय त्यांनी लिहिलेला स्वतंत्र दीर्घ ग्रंथ अद्याप सापडलेला नाही. निवृत्तीनाथांनी गीतेचं सार लिहिलंय, असा उल्लेख संत नामदेवांनी केलेला आहे. पण तेही आपल्याकडे नाही. ‘उत्तरगीताटीका’ ही आठ अध्यायांची टीका धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरातील पोथीमध्ये आढळते. ती निवृत्तीनाथांनी लिहिलेली पण अपूर्ण असलेली टीका होती, असा दावा शंकरराव देव यांनी केला होता. पण निवृत्तीदेव नावाच्या उत्तरकालीन कवीच्या अठरा अध्यायी ग्रंथाचा भाग असल्याचं स्पष्ट झालं.  निवृत्तिबोध, निवृत्तिसार किंवा निवृत्तेश्‍वरी हे तीन वेगळे ग्रंथ आहेत की एकच याविषयी संभ्रम आहे. वाग्देवता मंदिरातीलच एका बाडाच्या कागदावर निवृत्तेश्‍वरीचा उल्लेख आहे. पण मूळ ग्रंथ अद्याप उपलब्ध नाही. तो उपलब्ध झाल्यानंतरच त्याच्या लेखकाचा निर्णय घेता येईल. कदाचित हा निवृत्तीनाथांविषयी माहितीपर ग्रंथ असू शकतो. निवृत्तिबोध नावाचा ग्रंथही कुठे आढळत नाही. निवृत्तिनाथांचा समाधीबोध नावाच्या छोटेखानी अंकाचेच हे दुसरं नाव असू शकतं. तसंच निवृत्ती-ज्ञानेश्‍वर संवाद असं २६ अभंगांचं बाड वाग्देवता मंदिरात आहे. निवृत्ती अवधूत यांनी लिहिलेलं ज्ञानबोध नावाचं ८३ ओव्यांचं प्रकरण निवृत्तीनाथांचंच मानलं जातं. पण ते खरं नाही. याच ओव्या परमप्रकाश नावानंही प्रसिद्ध झालेल्या आहेत. निवृत्ती मुक्ताई संवादरूप ज्ञानबोध हे पुस्तक नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयानं १९७६ साली प्रकाशित केलं होतं. पण हा ग्रंथ मुक्ताबाईंच्या नावावर मानायला हवा. या संवादातील १२६ ओव्या निवृत्तीनाथांच्या तोंडी आहेत तर ५६ ओव्या मुक्ताईंच्या.

0 Shares
अभंग संपदा हरवलेला नायक