हरवलेला नायक

आदिती बर्वे

ज्ञानेश्वर माउलींवर आपल्याकडे खूप लिखाण झालंय. त्यात इतिहास आणि कल्पनेच्या खेळ करणार्याल कादंबर्या.ही. त्यात संत निवृत्तीनाथ केवढे सापडतात?

‘रिंगण’साठी लिही असं सांगितल्यावर जो काही आनंद झाला, तो गगनात न मावणारा आनंद, संत निवृत्तीनाथांविषयी साहित्य धुंडाळताना कमी कमी होत गेला.

आता काय लिहावं? केवळ पुस्तकांमधील सत्य लिहायचं आहे आणि ते कटू सत्य मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. गोव्याच्या कृष्णदास शामा सेन्ट्रल वाचनालयात पुस्तकं सापडत गेली, पिंजून काढता आली. आभार वाचनालयाचे. हा लेखनप्रवास खंत लावणारा असला तरी, जे वाचलं ते वाचताना मौज आली. अनेक पुस्तकं नजरेखालून गेली. ‘ज्ञानेश्वरांचे जीवन दर्शन’ (प्र. ग. जोशी), श्री ज्ञानेश्वर महाराज (ल. रा. पांगारकर), संत ज्ञानेश्वर (भाऊ मांडावकर), ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ (स. कृ. जोशी), ‘गुरूची गुरुमाउली मुक्ताई’ (विजया संगवाई), वेध ज्ञानेशांचा (डॉ. हे. वि. इनामदार), वैष्णवांचा मेळा (शं. बा. मठ), पावन मनाचा योगी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (गोविंद गोवंडे). निवृत्तीनाथांवर मला सापडलेले एकमेव पुस्तक म्हणजे डॉ. बाळकृष्ण लळीत लिखित ‘श्री संत निवृत्तीनाथ चरित्र’ हे फॉण्ट साईझ मोठा असूनही ६४ पानीच असलेलं पुस्तक. त्यात श्री शंकराचा अवतार ते अवतार समाप्ती अशी एकूण एकोणीस प्रकरणं आहेत.

‘ज्ञानयोगी ज्ञानेश्वर’ हे अर्जुन जयराम परब यांचं पुस्तक सापडलं. त्याच्या मुखपृष्ठावर ज्ञानोबामाउलींच्या छातीवर एक भलीमोठी ज्योत दिसली. चला. आपलं काम झालं. ज्ञानयोगापर्यंत संत ज्ञानेश्वरांना नेणार्‍या निवृत्तीनाथांबद्दल आता काहीतरी कळेल या आशेनं पुस्तक पिंजून काढलं. पण, निवृत्तीनाथांपर्यंत पोचण्याऐवजी कार्ल मार्क्सची धर्म ही अफूची गोळी इथपासून ते पोर्तुगीजकालीन गोव्यातील ‘तेर्म’ असा जगप्रवास घडला. इथेही निवृत्ती नाहीत.

‘वेध ज्ञानेशांचा’ या पुस्तकात डॉ. हे. वि. इनामदार म्हणतात, ‘गुरुभक्तीचे सर्वोत्कृष्ट पाठ म्हणून ज्ञानेश्वरीतील अनेक संकेतस्थळे दाखवता येतील. गुरू हा सुखाचा सागर, धैर्याचा डोंगर व प्रेमाचे आगर असतो. गुरुकृपेने साध्या श्वासोच्छवासांनाही प्रबंधाची पदवी प्राप्त होऊ शकते.’ गुरूबद्दल अशाप्रकारचे गौरवोद्गार असणार्‍या या पुस्तकात ज्ञानेश्वरांच्या गुरूबद्दल खूप काही मिळेल या आशेनं पुस्तक संपवलं. पुस्तकातल्या पंधरा प्रकरणांत निवृत्तीनाथांवर मात्र एकही प्रकरण सापडलं नाही.

भाऊ मांडावकर ‘संत ज्ञानेश्वर’च्या प्रस्तावनेत म्हणतात, ‘विकृती, चमत्कृती आणि विसंगती टाळून ज्ञानेश्वर चरित्राचे लेखन व्हावे, असा माझा या चरित्र लेखनासंदर्भात प्रयत्न राहिला.’ त्यांच्या पुस्तकात निवृत्तींना गहिनीनाथांकडून योगज्ञान आणि अन्य शिक्षण मिळालं, असा उल्लेख आहेच. शिवाय ज्ञानदेवांना गुरुप्रती असलेल्या आत्यंतिक आदराचंही चित्रण आहे. जेव्हा लोकसमुदायाला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी सांगत तेव्हा गुरू निवृत्तीनाथ प्रमुख जागी बसत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणं, ‘निवृत्तीनाथांच्या प्रगत विचारधारेच्या विरोधी मतांचा मांड ज्ञानेश्वरीत झाला असल्याने तीमधील काही मते निवृत्तीनाथांना आवडली नसावीत.’

आता मुख्य मुद्द्याकडे येऊ. कादंबर्‍या. ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील पाच कादंबर्‍या वाचल्या. ‘मोगरा फुलला’ (गो. नी. दांडेकर), ‘इंद्रायणीकाठी’ (रवींद्र भट), ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ (आनंद यादव), ‘संजीवन’ (भा. द. खेर) आणि ‘सुवर्णपिंपळ’ (लक्ष्मण सूर्यभान). शिवाय मुक्ताबाईंच्या जीवनावरील दोन कादंबर्‍या सुमती क्षेत्रमाडे यांची ‘वादळवीज’ ही १९८१ साली प्रकाशित झालेली कादंबरी पुन्हा ‘धन्य ती मुक्ताई’ या नावानं प्रकाशित झाली. दुसरी अनुराधा फाटक यांची ‘अमृत संजीवनी’. या लेखिकाद्वयींनी निवृत्ती खूपच ताकदीनं रेखाटले आहेत. विलास राजे यांनी लिहिलेल्या संत गोरोबाकाकांवरील ‘जीवनमुक्त’ या कादंबरीतही या चार भावंडांना स्थान आहे.

ज्ञानेश्वरांवरील पाचही कादंबर्‍यांमध्ये निवृत्तीच्या आईवडिलांचं लग्न ठरणं आणि होणं हा प्रवास सुंदर मांडला आहे. सूर्यभानांच्या पिंपळपानांत विठ्ठलपंत पहिल्यांदा रुक्मिणीच्या घरी येतात तेव्हा ‘व्हरांड्यातल्या उंबर्‍याजवळ येऊन थांबलेली नियती गूढ हसते’. आनंद यादवांच्या लोकसखात मात्र बरंचसं मॉडर्न वातावरण पाहायला मिळतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर विठ्ठलपंत आपल्या मित्रांशी काहीशी करिअरविषयक चर्चा करताना दिसून येतात. विवाह निश्चित होण्याआधी रुक्मिणीशी सारासार विचारविनिमय करतात. इथे रुक्मिणी म्हणतात, ‘गावात गावकरी, कचेरीत नोकर, अधिकारी आयुष्य कंठत असतातच की.’ विठ्ठलपंत म्हणतात, ‘तेव्हा माझ्या मर्यादाही तुझ्या लक्षात आल्याच असतील. त्या पत्करून तू मला स्वीकारशील काय?’ इथं रुक्मिणीचे वडील सिधोपंतही पुरोगामी वाटतात. विठ्ठलपंत लग्नानंतर संन्यास सोडून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारतात, त्यानंतर मूल होण्याची काहीच लक्षणं दिसत नाहीत. तेव्हा सिधोपंत दोघांच्याही वैद्यकीय चाचण्या करून घेतात. ती दोघंही मूल जन्माला घालण्यास सक्षम आहेत, असं वैद्यांचं म्हणणं असतं. यादवांचे विठ्ठलपंत तर खूपच मॉडर्न वाटतात. ते रुक्मिणीबाइंना सांगतात, ‘आज दोघांचीही पानं एकदम मांड. दोघे मिळून एकत्र बसून जेवू. पुरुषांनी अगोदर खायचं नि बायकांनी त्यांना जेवू घालायचं, पुरुष जेवल्यावर आपण जेवायचं, हा भेद आता नको.’

‘मोगरा फुलला’मधील रुक्मिणीबाई आपली मैत्रीण कावेरीला म्हणतात, ‘आजेसासुर्‍यान्स मत्स्येंद्रनाथांची दीक्षा. सासुर्‍यांस गहिनीनाथांची. त्यांच्या कृपाप्रसादें इकडचा जन्म झाला.’ हा ‘इकडचा जन्म’ म्हणजे विठ्ठलपंत कुलकर्णी, आपल्या निवृत्तीनाथांचे वडील. ‘जीवनमुक्त’ लिहिणारे विलास राजे धरून आठही कादंबरीकार एकाच मुद्द्याशी ठाम आहेत की विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांना चार अपत्यं झाली, ती अनुक्रमे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. मुक्ता किंवा मुक्ताराणी असाही उल्लेख आढळतो. निवृत्ती आणि इतर भावंडांचा जन्म दोन दोन वर्षांच्या अंतरानं झाला, असं म्हणून आनंद यादवांनी त्यांच्या नावांचा अर्थ सांगितला आहे. कर्मकांडांनी भरलेल्या तथाकथित श्रेष्ठवर्णाच्या जातीतून त्यांनी प्रत्यक्षात नसली तरी मनानं निवृत्ती घेतली. म्हणून पहिला निवृत्ती. त्यानंतर त्यांनीच असंही म्हटलं आहे की, ज्ञानदेव झाला तेव्हा निवृत्ती अडीच वर्षांचा होता. हे थोडंसं बुचकळ्यात टाकणारं होतं.

निवृत्तींच्या जन्माबद्दल ‘इंद्रायणीकाठी’त रवींद्र भट म्हणतात, ‘देवानं स्वप्नात दृष्टांत दिला! गुरुनं संसार करण्याची आज्ञा दिली! या दोन्हींविषयी आजवर कुठेतरी मनात संभ्रम होता. या शुभलक्षणी पुत्रसंभवामुळे या संभ्रमाची निवृत्ती झाली.’ आनंद यादव ‘लोकसखा ज्ञानेश्वर’मध्ये म्हणतात, ‘…कर्मकांडांनी भरलेल्या तथाकथित श्रेष्ठ वर्णाच्या जातीतून त्यांनी प्रत्यक्षात नसली तरी मानाने निवृत्ती घेतली. म्हणून पहिला निवृत्ती.’ गोनीदांच्या ‘मोगरा फुलला’त रुक्मिणीबाईंची बालमैत्रीण कावेरी त्यांचं बाळंतपण करते. निवृत्तींचं नाव योग्यच असल्याच्या विश्वासानं कावेरी म्हणते, ‘रडणे नाही, रोवणे नाही, शांतपणे जे द्यावे त्याशीं ते बाल खेळत असते.’

‘इंद्रायणीकाठी’ आणि ‘सुवर्णपिंपळ’मध्ये कुंभाराची लक्ष्मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. गोविंद गोवंडे लिखित ‘पावन मनाचा योगी’ या पुस्तकात ‘आपलं बाळंतपण रखुमाईनं स्वत:च पार पाडलं’, असा उल्लेख आहे. शालिवाहन शके १९९५, श्रीमुखनाम संवत्सर, माघ वद्य प्रतिपदेला निवृत्तींचा जन्म झाला. सोमवारी जन्मलेल्या या बालकाच्या दंडावर त्रिशुळाची खूण असल्याचंही बहुतांश पुस्तकं सांगतात. निवृत्तीच्या जन्माचंच काय ते कौतुक पाहायला मिळतं. जन्मानंतरच्या कर्तृत्वाबद्दल मात्र काही नाही. मराठी साहित्यानं निवृत्तींकडे फारसं लक्ष दिलेलं नाही. त्या भावंडामध्ये ‘सिबलिंग रायवलरी’ व्हावी, एवढी उपेक्षा निवृत्तींच्या वाट्याला नक्कीच आलेली आहे. परंतु, त्यांच्या समतापूर्ण स्वभावानं किंवा मातापित्याच्या अकाली जाण्यानं प्रौढ झालेले निवृत्ती जन्माला येतात तेव्हाच आभाळाएवढे असतात की काय असं वाटतं. त्यामुळं ‘किस चीज के बने हो तुम निवृत्ती?’, असा आजच्या भाषेतला प्रश्न हे वाचताना कुणालाही पडू शकतो.

डॉ. लळीत यांच्या निवृत्तीनाथ चरित्रातील विठ्ठलपंत निवृत्तीची कुंडली पाहून म्हणतात, ‘आपला हा मुलगा म्हणजे साक्षात शंकराचा अवतार आहे. सर्व लोकांमध्ये हा वंदनीय होईल. याच्या वृत्ती अतिशय निवृत्त आहेत; म्हणून स्वप्नांतही याला विषयवासनांचा संपर्क होणार नाही.’ जन्मापासूनच मनात समता असणार्‍या निवृत्तींना गहिनीनाथांकडून ज्ञानप्राप्ती झाली. त्यांना ज्ञानप्राप्तीसाठी नेमकं काय करावं लागलं, त्यांना गहिनीनाथांनी नेमकं काय शिकवलं, कसं शिकवलं, याबद्दल काहीच सापडत नाही. या ज्ञानप्राप्तीनंतर निवृत्तींनी आपल्या भावंडांना उपदेश केला. इंद्रायणीकाठी निवृत्तीनाथ आपल्या वडिलांना म्हणतात, ‘चहु वर्णी समभाव! हेच ज्ञानदेवाचं विहित कार्य आहे! मी त्याला हाच मार्ग सांगीन. स्वत: निवृत्त असूनही त्याच्या करवी प्रवृत्तीमार्गाचा प्रसार करवीन.’

राजेंच्या ‘जीवनमुक्त’मध्ये ज्ञानेश्वर म्हणतात, ‘ज्या वेळी मला ज्ञानप्राप्ती झाली, त्या वेळी माझे वय फक्त अकरा वर्षांचे होते आणि माझे गुरू निवृत्तीनाथ तेरा वर्षांचे होते.’ ‘सुवर्णपिंपळ’मध्ये निवृत्तींना अचानक ज्ञानेश्वरांचे ‘गुरुबंधू’ असं संबोधण्यात आलंय. ते गूढ उकलत नाहीच. भा. द. खेर यांच्या ‘संजीवन’मधील निवृत्तीनाथ माउलीचे वात्सल्य बाजूला ठेवून पित्याचा कणखरपणा दाखवतात, ‘ज्ञानेश्वरा, तू फारच धीम्या प्रवृत्तीचा आहेस. मला काही वेळा वाटतं की एक घाव दोन तुकडे करावेत! माणसानं किती सहन करायचं?’

ज्यांना व्यक्तिस्वातंत्र्य हा आजचा ताजा विषय वाटत असेल त्यांनी ‘निवृत्तीनाथांना’ जाणून घेतलंच पाहिजे. ‘इंद्रायणीकाठी’त देवरामबाबा नावाचे गृहस्थ निवृत्तींना म्हणतात, ‘आपले वडील या गावचे कुलकर्णी होते. आपण इथं राहत असाल, तर हे पिढीजात कुलकर्णीपण आम्ही आपल्याला देण्याची व्यवस्था करू. सार्‍या गावकर्‍यांची तशी इच्छा आहे.’ निवृत्ती हे स्वीकारणार नाहीत हे नक्कीच; पण व्यक्तिस्वातंत्र्य इथे त्यांच्या बोलण्यातून दिसतं. ते म्हणतात, ‘देवरामबाबा, मी नाथपंथी आहे. कुलकर्णीपणासारख्या ऐहिक वृत्ती आमच्या पंथाला अभिप्रेत नाहीत. आपण ज्ञानदेवाला विचारावं.’ स्वत: नाथपंथी आहोत हे सांगताना जे नाथपंथी नाहीत त्यांच्याबद्दल अनादर नाही. ज्या शिष्याला परिपक्व केलं, त्याच्यावरदेखील निवृत्तींनी आपला पंथ थोपवला नाही.

असे समतेत सदैव स्थित असलेले निवृत्ती, ‘इंद्रायणीकाठी’त म्हणतात, ‘ज्ञानदेवा, सत्कर्माला मुहूर्त नको. उद्यापासूनच या शिवमंदिरात तू तुझ्या वाग्यज्ञाला आरंभ कर.’ अशाप्रकारे संस्कृत भाषेतील ज्ञानभांडार प्राकृतभाषेसाठी खुले झाले. रेड्याच्या तोंडून वेद वदवण्यासारखे चमत्कार ज्ञानेश्वरांकडून घडल्यानंतर निवृत्तीनाथांनी आपल्या शिष्याचे पाय जमिनीवर राहावेत यासाठी ‘आता तुला आणखी एक चमत्कार करावा लागेल’, असं सांगितलं आणि सामान्यांचं जीवन सुगंधित करणारी ‘भावार्थदीपिका’ जन्मली.

‘लोकसखा ज्ञानेश्वर’मध्ये विसोबा ज्ञानेश्वरांचा अपमान करतात तेव्हा पित्याच्या करारी वाणीने म्हणतात, ‘प्रसिद्धीच्या आणि लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झाल्यामुळे तुला तो ग्रंथ ‘भावार्थदीपिका’ न वाटता ‘ज्ञानेश्वरी’ वाटू लागला असावा. अशा कल्पनाभ्रमात तू पूर्ण बुडून गेल्यामुळेच तुला विसोबाकाकांची प्रखर टीका सहन झाली नाही.’

‘संजीवन’मधले निवृत्ती म्हणतात, …आपण आता आपली स्वतंत्र प्रतिभा दर्शविणारा ग्रंथ लिहावा. आपल्याजवळ असंख्य आध्यात्मिक अनुभव आहेत. त्या आपल्या ग्रंथाचं नाव असेल, ‘अमृतानुभव’. ‘इंद्रायणीकाठी’त निवृत्ती म्हणतात, ‘मनात कोणतंही किल्मिष येऊ न देता लेखन करावं. सर्वस्व पणाला लावावं. तुझा हा ग्रंथ सर्वार्थानं स्वतंत्र होईल, याची मला खात्री आहे. पारमार्थिक अनुभवाचं निखळ, निकोप आणि केवल स्वरूप कसं असतं, तो अनुभव तू कैवल पातळीवर विशुद्धपणानं कसा अनुभवतोस, याचं दर्शन त्यात घडावं, अशी अपेक्षा आहे.’ ‘ट्रडिशन अँड इंडिविजुअल टॅलेण्ट’ लिहिणार्‍या थॉमस इलियटपूर्वी शेकडो वर्ष हा विचार स्वच्छपणे मांडणारे निवृत्ती.

नाथपंथाच्या निवृत्तींनी भक्ती संप्रदायासाठी तीर्थयात्रा केल्या. ज्ञानेश्वरांना ग्रंथरचनेची प्रेरणा दिली. धर्माच्या, प्रदेशाच्या दावणीला बांधून न घेता विश्वाच्या देवाला वाङमययज्ञ करून आळवणार्‍या तेराव्या शतकात ग्लोबल विचार आणि आचार करणार्‍या ज्ञानेश्वरांना ज्यांनी घडवलं, ते निवृत्ती. ‘पावन मनाचा योगी’तील निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना म्हणतात, ‘आमच्यानंतर नाथ संप्रदाय संपुष्टात यावा व भक्ती संप्रदाय वर्धिष्णू व्हावा ही गुरूंची आज्ञा’. गुरूंची म्हणजे अर्थातच गहिनीनाथांची. बहुतेक कादंबर्‍या ज्ञानेश्वरांच्या समाधीशी समाप्त होतात. ‘सुवर्णपिंपळ’मध्ये त्यांचं समाधीस्थान त्र्यंबकेश्वर असा एक-दोन वाक्यांचा उल्लेख आहे. ‘पावन मनाचा योगी’त निवृत्तीनाथ समाधीस्थ होतात तेव्हा गहिनीनाथ म्हणतात, ‘आम्हास योग्य शिष्य लाभला. आमच्या आज्ञेनं तू ज्ञानेश्वरांसारखा शिष्य पारखलास. संस्कृत भाषेत लपलेलं ज्ञानभांडार तू ज्ञानेश्वरांकरवी उघडं केलंस. ठरल्याप्रमाणे सारं पार पडलं, तुझं कार्य संपलं.’

आईवडिलांनी घेतलेल्या देहान्त प्रायाश्चित्तानंतर निवृत्तीनाथ तीनही भावंडांची माउली झाले. गुरू झाले. आणि अवघ्या मराठी मुलखासाठी ज्ञानेश्वर माउली देऊन गेले. चार भावंडांत ज्येष्ठ आणि तिघांनाही निरोप देऊन शेवटी देहत्याग करणार्‍या या महामानवाबद्दल इतकी पुस्तकं पाहूनही फारसं काही हाती लागत नाही. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, असं म्हटलं जातं. त्या पायाचा पाया रचण्याचं काम करणारे निवृत्तीनाथ मात्र, दुर्लक्षितच राहिले. निवृत्तीनाथ, त्यांचं बालपण, त्यांचे गुरूशी असलेले स्नेहसंबंध, त्यांचं घडणं आणि ज्ञानेश्वरांना घडवणं, त्यांच्यातील वैचारिक देवाणघेवाण, गुरुशिष्य संभाषण, असं सगळं काही असलेली केवळ निवृत्तीनाथांच्या जीवनावरच लिहिली गेलेली एकतरी कादंबरी कुणीतरी लिहायला हवी.

0 Shares
समाधीसुख गाणं निवृत्तीचं