महासमन्वयक

देवदत्त परुळेकर

समन्वय हे महाराष्ट्राच्या संतपरंपरेचं सगळ्यात मोठं बलस्थान. त्याचा पाया निवृत्तीनाथांनी घातला असावा. नाथ आणि वारकरी या तेव्हाच्या सर्वात प्रभावी विचारधारांच्या समन्वयातून समन्वयाचा एक पिसाराच फुलून आला.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांनी वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांचा समन्वय घडवून आणला. समन्वय ही केवळ पारमार्थिक क्षेत्रातीलच नव्हे, तर एकूणच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाची घटना होय. कारण या विचारधारा फक्त पुस्तकांमध्ये लिहिलेल्या नव्हत्या, त्या समाजाच्या सर्व थरांवर लोकांच्या जगण्याचा भाग बनल्या होत्या. या समन्वयामुळे किमान महाराष्ट्रात तरी एक नवं स्थित्यंतर घडून आलं. विशेष म्हणजे हा समन्वय होत असतानाच आणखीही काही समन्वय आपसूक होत गेले. किंवा हे समन्वय घडल्यामुळं नाथ-वारकरी समन्वयाचं शिखर सर झालं. शैव वैष्णव, सगुण निर्गण, योग-भक्ती अशा परस्परविरोधी मानल्या जाणार्‍या विचारपद्धतींमधला दुरावा त्यामुळं संपुष्टात आला.

त्या काळी कट्टर शैव आणि कट्टर वैष्णव यांच्यात टोकाचं वैर होतं. शिवभक्त विष्णू आणि विष्णुभक्तांचा कमालीचा द्वेष करत तर विष्णुभक्त शिव आणि शिवभक्तांचा टोकाचा द्वेष करत. शैव विष्णुमूर्तीचं तोंडही पाहत नसत आणि विष्णूचं नावही उच्चारत नसत. तर वैष्णव शिवाबाबत हेच करीत. अशा परिस्थितीत या दोन्ही संप्रदायांमध्ये समन्वय साधून सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्य साधण्याचं अवघड काम निवृतीनाथांनी साध्य करून दाखवलं. या कामी निवृतीनाथांना अर्थातच मुख्य प्रेरणा लाभली ती नाथ संप्रदायाच्या गुरू परंपरेतून. निवृत्तीनाथ आपली नाथ सांप्रदायिक सुप्रसिद्ध गुरू परंपरा सांगतात ती पुढीलप्रमाणे :

आदिनाथ उमा बीज प्रगटिले |
मच्छिंद्रा लाधलें सहजस्थिती ॥
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली |
पूर्ण कृपा केली गहिनीनाथा ॥

या प्रसिद्ध अभंगाच्या शेवटी निवृत्तीनाथ म्हणतात,

निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण |
कूळ हे पावन कृष्णनामे ॥

परंपरेनं आदिनाथ म्हणजे शंकर तर, मच्छिंद्रनाथ म्हणजे विष्णू. गोरक्षनाथ हे पुन्हा शिवाचे तर गहिनीनाथ हे विष्णूचे अवतार मानले जातात. पुढे परंपरेनं खुद्द निवृत्तीनाथांना सदाशिव शंकराचा तर ज्ञानदेवांना विष्णूचा अवतार मानलं. संत जनाबाई म्हणतात –

सदाशिवाचा अवतार | स्वामी निवृत्ती दातार ॥
महाविष्णूचा अवतार | सखा माझा ज्ञानेश्वर ॥

निवृत्तीनाथांनी अनेक अभंगांतून शिव विष्णू म्हणजेच हरी हराचं ऐक्य प्रतिपादलं. त्यातील काही अभंग पंक्ती अशा –

विश्वाचा विश्वास विश्वरुपाधीश | सर्वत्र महेश एकरूप ॥
निवृत्ती सर्वज्ञ नाममंत्र यज्ञ | सर्व हाचि कृष्ण आत्माराम ॥

सर्वत्र भरलेला विश्वरूपाधीश महेश हाच कृष्ण असल्याचं ते सांगतात.

वैकुंठ कैलास त्यामाजी आकाश |
आकाशी अवकाश धरी आत्मा॥
न दिसे निवासा आपरूपे दिशा |
सर्वत्र महेशा आपरूपे ॥
तारक प्रसिद्ध तीर्थ पै स्वानंद |
नामाचा उद्बोध नंदाघरी ॥

नंदाघरी गोकुळी नांदणारा कृष्ण हा केवळ विष्णू नव्हे तर, तोच शिवही आहे, असं निवृत्तीनाथ सांगतात. एवढंच नव्हे तर पंढरीनाथ कोण आहे, याचं निवृत्तीनाथांनी केलेलं वर्णन वेगळंच आहे.

पुंडलिकाचे भाग्य वर्णावया अमरी |
नाही चराचरी ऐसा कोणी ॥
विष्णुसहित शिव आणिला पंढरी |
केले भीमातीरी पेखणे जेणे ॥
पुंडलिकाला भेटायला हरी आणि हर |
एकरूप होऊन आले ॥ तोच पंढरीनाथ पांडुरंग ॥

निवृत्तीनाथांचं हे प्रतिपादन वारकरी संप्रदायानं श्रद्धापूर्वक स्वीकारलं. त्यामुळे बहुतेक सर्व संतांनी शिव विष्णू एकत्वाचा आणि शैव वैष्णव ऐक्याचा हिरीरीनं पुरस्कार केला. संत नरहरी सोनार हे कट्टर शैव. पुढे त्यांना विठ्ठलमूर्तीत शंकराचं दर्शन झालं आणि ते वारकरी विठ्ठलभक्त बनले. तर अलिकडच्या काळात कट्टर शैव लिंगायत असलेल्या मल्लाप्पाअण्णा वासकर यांच्यात देखील असंच परिवर्तन झालं. त्यांनी वासकर फडाची स्थापना केली. आज वासकर फडाला वारकरी संप्रदायात मानाचं स्थान आहे. या सर्व परिवर्तनाचे प्रेरक होते निवृत्तीनाथ.

परमात्म्याचं स्वरूप सगुण की निर्गुण हा एक अत्यंत पुरातन वादाचा विषय. ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम या सेमेटीक धर्मात निर्गुण ईश्वर मानला. हिंदू धर्मात मात्र, सगुण आणि निर्गुण ही ईश्वराची दोन्ही रूपं मानली आहेत. तरी निर्गुण हेच परब्रह्माचं खरं स्वरूप असून, सगुण साकाराची उपासना करणं हे अडाणीपणाचं आहे, असं मानणारा एक मोठा समुदाय आहे. हे लोक स्वतःला ज्ञानी समजतात. ‘सगुण निर्गुण एकु गोविंद रे’, असं ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलेलं आहेच. माउली ज्ञानदेवांनी सगुण निर्गुण यांचं एकत्व आग्रहानं प्रतिपादलं आहे ते त्यांचे सदगुरू निवृत्तीनाथ यांनी दिलेल्या ज्ञानाला अनुसरून.

जेथुनि उद्गारू प्रसवे ॐकारू |
तोचि हा श्रीधरू गोकुळी वसे ॥
जनकु हा जगाचा जीवलगु साचा |
तो हरि आमुचा नंदाघरी ॥
न माये वैकुंठी योगियांचे भेटी |
पाहता ज्ञानदृष्टी न ये हाता ॥
निवृत्ति म्हणे देवो म्हणविता हे रावो |
तो सुखानुभवो यादवांसी ॥

सगुण निर्गुणाचं एकत्व निवृत्तीनाथांनी अशा अनेक अभंगांतून प्रतिपादलं आहे.

निरालंब सार निर्गुण विचार |
सगुण आकार प्रगटला ॥
ते रूप सुंदर शंखचक्रांकित |
शोभतो अनंत यमुनातटी ॥

आणखी एका अभंगात ते म्हणतात,

हा आकार नाही हा विकार |
चतुर्भुज कर हरि माझा ॥

हाच मुद्दा त्यांच्या एका अभंगात अधिक स्पष्टपणे आलेला आहे,

नित्य निर्गुण सदा असणे गोविंदा |  सगुणप्रबंधा माजि खेळे ॥
ते रूप सगुण अवघेचि निर्गुण |  गुणि गुणागुण तयामाजि ॥

निवृत्तीनाथांनी पांडुरंग विठ्ठलाचं वर्णन ‘ब्रह्म हे साकार विटे नीट’,असं करताना सगुण निर्गुणाची परिभाषा वापरली आहे,

निराकार वस्तू आकारासी आली | विश्रांती पै जाली भक्तजना ॥
भिवरा संगमी निरंतर समी | तल्लीनता ब्रह्मी उभी असे ॥

भोळ्या भाविकांना सगुण उपासना सहज सुलभ आहे. त्यामुळंच जनसामान्यांच्या कळवळ्यातून निवृत्तीनाथांनी सगुण भक्ती आणि नामसंकीर्तन या सुलभ मार्गाचा आग्रहानं अंगिकार, प्रचार आणि प्रसार केलेला दिसून येतो. हा मार्ग इतर कोणत्याही मार्गापेक्षा यत्किंचितही उणा नाही हे त्यांनी ठासून सांगितलं. त्याकरिता सगुण निर्गुण एकत्व पुन्हा पुन्हा प्रतिपादलं आहे.

निवृत्तीनाथ हे नाथ संप्रदायी सिद्ध सत्पुरुष. नाथ संप्रदाय हा योग मार्गी म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. असं असतानाही त्यांनी भक्तिमार्गाचा पुरस्कार केला, त्याचं कारण शोधायला हवं. योग हा शब्द अलीकडे आपण खूपच स्वस्त करून ठेवला आहे. काही आसनं करता आली म्हणजे साधला योग आणि झाला योगमहर्षी, अशी आपली समजूत. पण, ही आसनं हा महर्षी पतंजलीनं प्रतिपादिलेल्या अष्टांग योगातील केवळ एक छोटासा भाग आहे. पतंजलीनं आपल्या योग दर्शनात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा आठ क्रमवार पायर्‍यांचा सविस्तर विचार मांडला आहे. त्याचबरोबर पतंजली खेरीज इतर अनेकांनी अनेक अर्थांनी ‘योग’ हा शब्द वापरला आहे. जिवाशिवाचं ऐक्य म्हणजे योग आणि हे साधण्याचा मार्ग म्हणजे योगमार्ग. आता योगमार्ग हा लांबलचक शब्द न वापरता कित्येकवेळा या मार्गालाच योग संबोधलं जातं. भगवद्गीतेत १८ अध्यायांत १८ निरनिराळे योग सांगितले आहेत. त्यातले भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, हठयोग (म्हणजेच अष्टांग योग) हे विशेष प्रसिद्ध आहेत.

निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हे स्वतः नाथ संप्रदायी सिद्धयोगी होते. अष्टांग योगात पारंगत होते. पण, हा योग मार्ग सर्वसामान्य लोकांना साधणं अवघड आहे, याची त्यांना यथार्थ जाणीव होती. या अवघड मार्गाचं वर्णन ज्ञानेश्वरीतही आलंय.

किंबहुना पांडवा | हा अग्निप्रवेशु नीच नवा |
भातारेंवीण करावा | तो हा योगु ॥
एथ स्वामीचें काज | ना बापिकें व्याज |
परि मरणेंसी झुंज | नीच नवें ॥

ऐसें मृत्युहूनि तिख | का घोंटे कढत विख |
डोंगर गिळितां मुख | न फाटे काई ॥
म्हणोनि योगाचिया वाटा | जे निगाले गा सुभटा |
तया दु:खाचाचि वाटा | भागा आला ॥

त्यामुळंच निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांनी सर्वसामान्यांसाठी योगमार्ग सोडून सोप्या भक्तिमार्गाचा पुरस्कार केला. योग मार्गानं साधायचं काय? पतंजलीनं योगसूत्रात योगाची व्याख्याच ‘योगश्चित्तवृत्तिनिरोध:’ अशी केली आहे. चित्तवृत्तीचा उपशम करणं याला योग म्हणतात. आता हीच गोष्ट सोप्या नामसंकीर्तन, भक्तिमार्गानं साधते, असा स्पष्ट अभिप्राय निवृत्तीनाथ देतात.

सार हरिनाम सार हरिनाम |
नित्यता सप्रेम जपो आम्ही ॥
ध्येय ध्यान स्थिर मनाचा साठा |
नामेचि वैकुंठा गेले भक्त ॥
निवृत्ति तत्पर रामनाम चित्ती |
एका नामे तृप्ति सर्वकाळ ॥

जनसामान्यांचा कळवळा हेच खरं संतत्व. म्हणूनच निवृत्तीनाथांनी पंढरीच्या वारीची पताका ज्ञानोबांच्या खांद्यावर दिली. निवृत्तीरायांनी सोज्ज्वळ मार्ग दाखवला, असं माउलींनी सांगितलं आहे. भाविकपणे संतसंग, पंढरीची वारी, नामसंकीर्तन, शुद्ध आचरण असा सोपा भक्तिमार्ग निवृत्तीनाथांनी तुम्हा आम्हाला सांगितला.

समता वर्तावी अहंता खंडावी | तेणेचि पदवी मोक्षमार्ग ॥
क्षमा धरी चित्ती अखंड श्रीपती | एक तत्त्व चित्ती ध्याईजेसु ॥
नाम हाचि मंत्र नित्य नाम सार | दुसरा विचार घेऊ नको ॥

0 Shares
पहिला विद्रोह अनाथांचा नाथ