पहिला विद्रोह

रावसाहेब कसबे

‘‘संतांनी प्रत्येक धर्माला अडचणीत आणलेलं आहे. मी तर असं मानतो की, खरी धर्मचिकित्सा ही संतांनीच केली आहे...’’ संत विचारांबाबत अशी रोखठोक मतं मांडली आहेत, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी पुण्यातील ‘कलाजागर -२०१६’मध्ये त्यांच्या व्याख्यानाला दिलेलं हे शब्दरूप...

साहित्याच्या क्षेत्रात, अध्यात्माच्या क्षेत्रात, मानवी संदर्भांचा अधिक खोलवर विचार करण्याच्या समाजशास्त्रीय क्षेत्रात सहाव्या-सातव्या शतकामध्ये भारतात अनेक कलावंत उदयाला आले आणि त्यांनी भक्ती चळवळीचा पाया घातला. भक्ती चळवळ म्हटलं की, आपली सुरुवात ज्ञानेश्वरांपासून होते आणि शेवट तुकारामांपर्यंत होतो. याच्या पुढचा आणि मागचा विचार आपला मराठी माणूस करताना दिसत नाही. ज्ञानदेवे रचिला पाया | तुका झालासे कळस ॥ आपण याच्या पलिकडेही गेलो नाही आणि अलिकडंही आलो नाही.

ज्ञानेश्वर फार उशिरा आले. तेराव्या शतकामध्ये. भारतामध्ये भक्तीची परंपरा सुरू झाली ती दक्षिणेतल्या तामिळनाडूमधून. आणि ती सुरू केली ‘अलवार’ संतांनी. प्रमुख १३ अलवार संत होते. त्यातले दोन संत ब्राह्मण होते आणि उरलेले सगळे ब्राह्मणेतर होते. त्यात चार अपृश्य होते. एक बेवारस टाकलेली मुलगी होती, तिचं नाव आंदळ. एक दरोडेखोराचा मुलगा होता आणि तीन अशीच बेवारस टाकलेली संतती होती. या १३ संतांनी पृथ्वीतलावर पहिल्यांदा भक्ती चळवळीचा पाया रचला. मी भक्तीला धर्माशी अजिबात जोडत नाही. मी भक्ती परंपरेला सामाजिक प्रक्रियेतून जी विद्रोहाची एक अतिशय मोठी परंपरा मनुष्यजातीत निर्माण झाली तिचा प्रतिनिधी मानतो. कारण माणसाला व्यवस्था पचतेच किंवा सहन होतेच असं नाही. प्राचीन काळामध्ये व्यवस्थेच्या विरुद्ध झुंजायचं म्हणजे काय करायचं, तर भिंतीवर टक्कर मारायची आणि डोकं फोडून घ्यायचं. त्याच्यापेक्षा त्यांनी काय पसंत केलं, तर जगापासूनच निघून जायचं. म्हणजे ‘संन्यास’ घ्यायचा. संन्यास म्हणजे माणसानं व्यवस्थेविरुद्ध व्यक्तिगत पातळीवर केलेलं पहिलं बंड. पुढं या संन्यासाचं आपल्याकडं काय झालं ते सर्वांनाच माहिती आहे. संतांनी या सर्व चळवळीला भक्ती आंदोलन बनविलं. मी भक्ती पंथ असा उल्लेख अजिबात करत नाही.

खरं पाहिलं तर भक्ती चळवळीचा ईश्वराशीही फार दुरन्वयानं संबंध आहे आणि धर्माशीही संबंध येत नाही. म्हणजे संस्थात्मक धर्माशी. ज्या अर्थानं आपण हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन धर्म म्हणतो, त्या अर्थानं भक्ती चळवळीचा धर्माशी संबंध नाही. हिंदू धर्म म्हटला की, त्यात पहिली गोष्ट चातुर्वर्ण्य येते. दुसरी गोष्ट तो सनातन धर्म आहे. तिसरी गोष्ट त्यात आत्मा आहे, तो अमर आहे, त्याचा पुनर्जन्म होतो. चौथी गोष्ट हिंदू धर्मात स्वर्ग-नरक आहे आणि एक ईश्वर आहे. या हिंदू धर्माच्या चौकटीमध्ये कुठलाही संत बसत नाही. संत ही पूर्ण चौकट खोडून काढतात. तुकारामांपर्यंत सर्वांनी ही चौकट खोडली; पण आपल्या वारकरी पंथाला तुकाराम माहितीच नाही. ते परंपरेनं चालत आलेले अभंग म्हणत असतात. त्यामुळं खरे तुकाराम त्यांच्यापासून दूरच आहेत. कारण खालच्या समाजातून माणसंच नव्हती लिहिणारी. आणि जेव्हा संतांचं ब्राह्मणीकरण झालं, तेव्हा ते संत आपल्या डोक्यावर येऊन बसले. अलवारांचही नंतर ब्राह्मणीकरण झालं. म्हणून भक्ती चळवळ ही शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांची चळवळ होती आणि ते व्यवस्थेच्या विरुद्धचं सर्वात मोठं, अतिशय समर्थ, अतिशय ताकदवान असं बंड होतं. म्हणून ते समाजात रुजलं. जसं हिदूंचं सांगितलं तसंच मुसलमानांचं. हे सर्व सूफी संत नवव्या शतकापासून आले. आता या मुसलमानाचं काही कळत नाही. आता ते तिकडं सर्व सूफींचे दर्गे उद्ध्वस्त करत आहेत. कारण हे सूफी संत त्यांना अडचणीचे ठरत आहेत. तसं पाहिलं तर तुकारामही आपल्याकडं अडचणीचेच होते आणि आहेत. फक्त तसं कोणी म्हणत नाही किंवा दाखवत नाही.

संतांनी प्रत्येक धर्माला अडचणीत आणलेलं आहे आणि मी तर असं मानतो की, खरी धर्मचिकित्सा ही संतांनीच केली आहे. जसं मार्क्स म्हणतो, सर्व चिकित्सेचा पूर्वपक्ष हा धर्म आहे. त्याची सुरुवात खरी संतांनी केली. अगदी सूफी, ख्रिश्चन मिशनरी आणि भारतातले सगळे संत एकत्र करून नीट पाहिलं तर त्यांचं पहिलं वैशिष्ट्य दिसतं, ‘वेदांना विरोध’.

आपल्या भारतीय माणसांची अडचण अशी आहे, आपल्याला जगातील अरिस्टॉटल, प्लुटो, कान्ट, हेगेल वगैरे सर्व माहिती असतात; पण आपल्या शेजारी कोण बसवेश्वर होऊन गेला ते माहिती नसतं. बसवेश्वर म्हणजे खरा बसवण्णा. बसवेश्वर हे बसवण्णाचं ब्राह्मणीकरण. आपल्याला बाजूच्या कर्नाटकातलं काहीच माहीत नाही. त्यामुळं तामिळनाडूतलं तर माहिती असण्याचं काहीच कारण नाही. हे असं फक्त संतांबाबतच नाही, तर साहित्य-नाटकाच्या क्षेत्रातही आहे.

तर पहिलं वैशिष्ट्य म्हणजे वेदांना विरोध. का विरोध? कारण ते समजतच नाही ना. तुमच्यापैकी कितीही मोठा संस्कृत विद्वान, अभ्यासक असेल तर, त्याला मी ऋग्वेदाच्या दोन ऋचा देतो आणि त्या त्यानं सोडवून किंवा भाषांतरीत करून दाखवाव्यात. करूच शकणार नाही तो. कारण वेद असो वा कुराण ते असंच वाचलं तर नाही कळत. ते वाचायचं एक सूत्र असतं. वेदाचं सूक्त वाचताना पहिल्यांदा सायनाचार्यांनी त्यांच्यावर काय भाष्य केलं आहे ते वाचावं लागतं. त्यानंतरच ती ऋचा आपल्याला समजते. त्याशिवाय ती समजत नाही. मग जे समजत नाही त्याचा काय उपयोग? भारतामध्ये संत आंदोलन हे पहिलं आंदोलन आहे की, त्यांनी सर्वसामान्य माणसाला असं सांगितलं, धर्मातल्या ज्या गोष्टी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला समजत नाहीत, त्या अनुपयोगी आहेत. त्यामुळं संतांच्या दृष्टीनं वेद अनुपयोगी होते. म्हणून या संतांनी आपली स्वत:ची प्रचंड संख्येत वचनं लिहिली आणि पहिल्यांदा वेद विरोध केला. तामिळनाडूमध्ये वेद नाहीत, तर अलवार संतांचे अभंग आहेत. नाथमुनींनी नवव्या शतकामध्ये त्यांचं संकलन केलं आणि त्याचे चार भाग केले. हे चार भाग म्हणजे त्यांच्यासाठी चार वेद. तिथं कोणतंही धार्मिक कार्य वैदिक मंत्रांनी होत नाही फक्त ब्राह्मणांची संध्या सोडून. ते जे अभंग एकत्रित केले, ज्याला ‘दिव्यप्रबंधम्’ असं नाव आहे. सर्व सामान्य बहुजन समाज त्याच्यातली गीतं गातात आणि कार्यक्रम पार पाडतात. तर वेदांना विरोध सुरू झाला तो तामिळनाडूमधून. स्त्रीमुक्तीची भारतातील पहिली प्रचारक म्हणजे आंदळ. खरं म्हणजे मी स्वत:ला भाग्यवान माणूस समजतो. कारण मला आंदळचं काव्य वाचायला मिळालंय. त्या वेळच्या ब्रिटिश सरकारला मी खूप धन्यवाद देतो; कारण त्यांनी हे सगळं साहित्य ऊर्जित अवस्थेत आणलं. हूपरसारखा एक मोठा विचारवंत तामिळनाडूत जाऊन बसला आणि त्यानं या सगळ्याचं संकलन करून इंग्रजी भाषांतर केलं. हूपरनं जर अलवार संतांच्या लिखाणाचं हे भाषांतर केलं नसतं तर मला काहीच कळलं नसतं.

आंदळच्या एका अतिशय मोठ्या आणि मनस्वी कवितेचं भाषांतर मी माझ्या ‘भक्ती आणि धम्म’ या ग्रंथात केलं आहे. प्रेम काय असतं? कसं असतं? स्त्रीला प्रेम करण्याचं स्वातंत्र्य कसं असतं? ते कसं उपभोगता येतं? हे मीरेनं नंतर सांगितलं; पण तिच्यापूर्वी आंदळने सांगितलं होतं आणि आंदळनंतर सूफी संत राबिया हिनंही सांगितलं. काय असतं प्रेम? ईश्वराची बायको म्हणून आयुष्यभर जगणं ही काय सोपी गोष्ट आहे का? याला एका स्तरावर पोचल्याशिवाय सहनच करता येत नाही किंवा ती भूमिकाही पार पाडता येत नाही, अशी ती आंदळ.

मग हे भक्ती आंदोलन १२व्या शतकात आलं कर्नाटकामध्ये. बसवण्णा आले. जातीनं ब्राह्मण कर्नाटकातला पहिला सर्वात मोठा ब्राह्मण संत. त्यांनी वीरशैव पंथ स्थापन केला आणि पहिला वार केला तो वेदांवर. बसवण्णांचा एक अभंग आहे. तोही मी भक्ती आणि धम्म या ग्रंथात सांगितला आहे. बसवण्णा म्हणतो, जे वेद माणसा माणसांमध्ये भेद करतात, स्त्री-पुरुषामध्ये भेद करतात, ते वेद माणसाची समाजाची काय उन्नती करणार? आणि म्हणून ते म्हणतात,

मी चालवीन तलवार वेदावर |
आणि नाक कापीन आगमाचे ॥

मला वाटलं काय भारी माणूस आहे हा, आगमाचे नाक कापायला निघाला आहे. वेदावर तलवार उगारतो आणि प्रश्न विचारतो. त्याचं जे सगळं संत मंडळ होतं (जसं नामदेवाचं होतं. आपल्याकडं, चोखोबा, गोरोबा मग एक कुंभार होता, एक महार होता, न्हावी होता.) त्यात बसवेश्वर प्रश्न विचारायचा, मी याला चांभार समजू, हिला चांभारीण समजू आणि मग स्वत:ला ब्राह्मण समजू. असं जर मी समजू लागलो तर माझा देव तोंडात खेटरं नाही का मारणार?

त्यानंतर भक्ती चळवळ १३व्या शतकामध्ये महाराष्ट्रात आली. ती आणली पहिल्यांदा चक्रधरांनी. त्यांच्यानंतर आले ज्ञानेश्वर आणि त्यानंतर ती बहुजन समाजात पसरली ती नामदेवांच्या शिष्य मंडळामुळे. खरं पाहिलं तर संत चळवळीचा आणि ज्ञानेश्वरांचा तसा दूरवरचा संबंध होता. संत चळवळीचा खरा संबंध नामदेवांशी होता.

ज्ञानदेवे रचिला पाया | तुका झालासे कळस ॥

आता हे बहिणाबाईंनी म्हटलंय खरं, पण ते खरं नाहीये.

ते नामदेवे रचिला पाया | तुका झालासे कळस ॥

असं हवं.

त्यामुळं मी माझ्या ग्रंथात हे लिहिलेलं आहे. जोखीम घेऊन लिहिलेलं आहे.

प्रत्येक जातीत एक संत निर्माण झाला. त्या सगळ्यांचा गुरू नामदेव. नामदेवाचा एक अभंग आहे, मोठा सुंदर अभंग आहे. नामदेव म्हणतो, माझी या विठोबावर भक्ती. मग मी गेलो त्याला भेटायला, त्या वेळी बडव्यांनी मला लाथ मारून हुसकावून दिलं. कारण मी शूद्र. मग मी फिरत राहिलो त्या मंदिराभोवती. आणि ज्या मंदिराभोवती मी फिरत राहिलो त्या मंदिराचं दारही माझ्या बाजूनं फिरत राहिलं. तरी या बडव्यांना कळालं नाही. हे काय आहे? हा नामदेवांचा विद्रोह आहे अंत:करणातून आलेला.

मग नंतर ही चळवळ गेली उत्तरेत. तिथं कबीर वेदांना काय म्हणतात, तर ‘आयना’ म्हणतात. किसका आयना तर अंधे का आयना. ‘वेद अंधा दर्पण पुराना’. आता आंधळ्याला कितीही आरसा दाखविला तर त्याला त्यात काहीच दिसणार नाही. सोबतच कबीर मनुस्मृतीला म्हणतो, ‘वेद की कन्या स्मृती’ ही माझ्यासाठी फास घेऊन आली. तिला बळी पडू नका, तिच्या जंजाळात पडू नका.

मीरेबद्दल तर काय सांगायचं, तिच्याएवढा विद्रोह तर कोणीच केला नाही. भारतातल्या स्त्री-मुक्तिवाल्या महिलांनी मीरेला पहिल्यांदा नीट समजून घ्यायला हवं. राणी! तिचं नखही कोणाला दिसलं नसतं. बघायची हिंमत कोणी केली नसती. केली असती तर त्याचे डोळे काढले असते, अशी ती मीरा. एक दिवस हातात एकतारी धरून बाहेर पडली. आगडपगड जातीच्या संतांच्याबरोबर नाचली. बेभान होऊन नाचली, पर्वा नाही केली कोणाची आणि त्या काळात रविदासासारखा चांभार गुरू केला. केवढा विद्रोह आहे हा. ही संतांची चळवळ आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे. काही ऐतिहासिक दृष्टी आहे की नाही आपल्याकडं? नाही तर काय झालं, सगळे बाबा पुरंदरे. महाराज तिथ्थं बसले होते. मग महाराज इथ्थं बसले होते, या तटावर आणि त्याच्यामागे बाबा पुरंदरे उभा होता. संत चळवळ म्हणजे पुरंदरेंची कादंबरी नाहीये. ते वास्तव जीवन आहे. जगण्याचा संघर्ष आहे. जगणं अर्थपूर्ण करण्याचा संघर्ष आहे आणि जगणं सुंदर करण्याचा हा मनोमन प्रयत्न आहे.

तुकाराम म्हणाले,

वेद आम्हांवरी रुसुनिया गेला |
आम्ही त्याच्या बा ला धरले कंठी ॥

त्यांना वेद वाचायचा अधिकारच नाही कारण त्यांना संस्कृतच येत नाही. या देशात कसली संस्कृती आहे आणि हा कसला देश आहे? या देशातल्या अर्ध्या लोकसंख्येला स्त्रियांना शिक्षणाची बंदी होती. उरलेल्या मागासांना तर शिक्षणाची आणि संस्कृतचीच बंदी. मग या सगळ्याला संस्कृती कसं म्हणायचं? ही विकृती आहे की काय? असा प्रश्न मला पडतो. म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, वेद हे झोपेतलं चालणं आहे. त्याचं जागृतीशी काय काम. जागृत झालेल्या माणसाच्या काय उपयोगाचं आहे. हे तर झोपेत बडबड करणं आहे. कारण वेद हे परमेश्वराच्या श्वासोश्वासातून निर्माण झाले अशी आपली कल्पना आहे. म्हणून मला मुद्दा असा सांगायचा आहे, तो म्हणजे संतांच्या चळवळीचा पहिला आघात आहे, तो म्हणजे वेदांना विरोध.

संतांचा दुसरा विरोध होता तो संस्कृत भाषेला. जर भारतामध्ये संत झाले नसते तर बहुजन समाजाला तत्त्वचिंतन, धर्मचिंतन आपल्या बोलीभाषेत समजलंच नसतं. तेव्हा हे जे संस्कृतपंडित काय बडबडतात तेच काय ते खरं आणि ते जे बडबडतात ते आपल्याला कळत नाही. खरं म्हणजे ते त्यांचं त्यांनाच कळत नाही. आणि मग ते काही तरी पाप पुण्य कृत्य असं काही तरी म्हणत असतात.

अलवार संताची एक कविता आहे, या संतांच्या कविता मोठ्या सुंदर आहेत. भूतल अलवार नावाचा एक संत, त्यानं लिहिलंय

प्रेम असते जळणार्‍या दिव्या समान
त्यातील तेल असते मनातील तीव्र इच्छा
शाश्वत सुखात विरघळून जाणारे मन असते त्याची वात
मी पेटवली आहे प्रकाशमान ज्ञानज्योत
वितळणार्‍या आत्म्यासहित माझ्या तमिळ भाषेत
जिला लावले आहे कामी नारायणाच्या

म्हणजे त्यानं ती ज्ञानज्योत पेटवली; पण ती संस्कृतमध्ये नाही तर त्याच्या तामिळ भाषेमध्ये, सामान्य माणसांच्या भाषेमध्ये. ही ज्योत पहिल्यांदा अलवार संतांनी तामिळनाडूमध्ये पेटवली मग ती आपल्याकडं आली. कर्नाटकामध्येसुद्धा जेवढी सगळी वीरशैव संतांची वचनं आहेत ती कानडी भाषेत आहेत. महाराष्ट्रात तर चक्रधरांनी सरळ त्यांच्या शिष्यांना सांगितलं, तुमचं ‘अस्मात तस्मात’ आम्हांला काही समजत नाही. इथं झिरपलेली मराठी आहे ती बोला.

ज्ञानेश्वरांचं मराठीवर प्रेम आहे; पण ते संस्कृतचं वर्चस्व मानणारे. प्रेम केल्याशिवाय भाषा टिकत नाही. तुम्ही मराठीच्या नावानं ज्या बोंबा मारता, आरोळ्या ठोकता ना मराठी मेली मराठी मेली, याचं मला हसू येतं. मी आपला गावठी माणूस आहे, अशा वेळी लई हसतो मी. मूर्ख लोक आहेत हे. मराठी कशी मरेल. जर तुमचं तिच्यावर मनापासून प्रेम असेल तर ती मरायचं कारण नाही ना. पण, तुमचंच मराठीवरचं प्रेम आटलेलं आहे. मग आता काय म्हणता मराठी मेली. मेली कशी? तुम्ही मराठी भाषेपासून दूर गेलात ना. केलं संशोधन तिच्यावर?  मराठीत वैचारिक साहित्य काही नाही. खडखडाट आहे सगळा. कथा, कविता, कादंबर्‍या आहेत बर्‍यापैकी. पण, एवढ्यावर नाही ना भागणार. जर भाषा जिवंत ठेवायची असेल तर ती ज्ञानविज्ञानाची वाहक बनावी लागते. आम्ही इंग्रजीत लिहिलं नाही असं नाही, इंग्रजीत लिहिलं. पण नंतरचं अख्खं आयुष्य मराठी लेखनात घालवलं. जर हे साहित्य वा संशोधन आम्ही इंग्रजीत लिहिलं असतं तर आम्ही जगातले किती मोठे तत्त्ववेत्ते विचारवंत बनलो असतो. इंग्रजी वाचणारे आम्हांला म्हणतात, इंग्रजीत असं पुस्तक का नाही लिहित? मी म्हणतो, तुम्हांला एवढं वाटत असेल तर करा की भाषांतर. मला वाटतं म्हणून मी लिखाण करतो; कारण ती माझी गरज आहे. मी काही ‘करिअरिस्ट’ माणूस नाही.

ज्ञानेश्वर म्हणतात ना,

माझी मराठीची बोलु कौतुके |
परि अमृतातेही पैजा जिंके |

पण तरी ती संस्कृतच्या खालचीच. ज्ञानेश्वरांनीच संस्कृतला वरचं स्थान दिलं आहे. ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे,

राजहंसाचे चालणे | जगी जालिया शहाणे | म्हणोनी कवणे काय | चालोचि नये ॥ ज्ञानेश्वरांच्या मते, संस्कृत हा राजहंस आहे. तो चालतो म्हणून काय बाकीच्यांनी चालायचंच नाही. बाकीच्यांनी पण तुडूतुडू धावायचं ना. माझी मराठी पण तुडूतुडू धावते. तुडूतुडू धावून राजहंस कधी ओलांडायचा?

मराठीला खरी ऊर्जितावस्था आणली संत नामदेवांनी. नामदेवांचे, चोखोबांचे अभंग वाचा, शब्द वाचा. आपल्या सगळ्या समग्र संत साहित्यातली अतिशय मोठी विदुषी म्हणजे सोयराबाई. ती ज्ञानेश्वरांच्या तोडीची विद्वान होती. तिचा एकच अभंग

अवघाची रंग एक झाला | रंगी रंगला श्रीरंग ॥

हा अख्ख्या ज्ञानेश्वरीला पुरून उरणारा आहे. पण, ती जातीनं महार. करणार काय? तर तिनं प्रश्न विचारला…

कोण तो सोवळा कोण तो ओवळा |
दोहींच्या वेगळा विठू माझा ॥
देहाशी विटाळ शास्त्राशी विटाळ् |
ब्रह्मयाशी विटाळ् पुराणे अभंग विटाळाचे ॥

हेच प्रश्न चोखोबा, नामदेवांनी पण विचारले. तिकडं उत्तरेत कबीर तर म्हणतात,

संस्कृत है कूप जल | भाषा बहता नीर ॥

माझी बोली भाषा ही खळखळ वाहणार्‍या एखाद्या प्रवाहासारखी आहे आणि संस्कृत हे डबकं आहे. या संतांचं दुसरं आपल्यावरचं सर्वात मोठे उपकार करणारं काम असेल तर ते त्यांनी आपल्या समजेल अशा भाषेत हे सगळं ज्ञान-तत्त्वज्ञान विज्ञान इथं आणलं. म्हणून संतांच्या प्रती कायम कृतज्ञता आपल्या अंत:करणात असली पाहिजे.

त्यानंतर संतांनी केला जातीला विरोध. हा संतांचा तिसरा विद्रोह. हा जातीला केलेला विरोध इतका प्रखर होता की, त्या काळामध्ये प्रचंड सामाजिक संघर्ष झालेले असावेत; परंतु इतिहासात त्याच्यासंबंधी फारसं कोणी लिहिलेलं नाही.

त्यानंतर सर्वांत मोठी गोष्ट संत चळवळीनं केली ती म्हणजे, आपल्या सगळ्या धर्मशास्त्रामध्ये देव केंद्रस्थानी आणि माणसं त्याच्या भोवती फिरणारी. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तशी. नंतरच्या काळामध्ये राजा केंद्रस्थानी आणि साम्राज्य फिरतंय त्याच्याभोवती. त्याच्यानंतर सामंत केंद्रस्थानी आणि बाकी सगळी जनता फिरते त्याच्या भोवती.

संत हे भारतातले पहिले लोक की, ज्यांनी सांगितलं, या सगळ्या विश्वाचं केंद्र कष्टकरी सामान्य माणूस आहे. संत चळवळीनं केलेली ही तिसरी सर्वात मोठी गोष्ट. केंद्रस्थानी असणारा हा माणूस ईश्वराचा बाप आहे. त्याला आम्ही म्हणजे माणसानं ईश्वर केलं. आम्ही त्याला ईश्वर केलं नसतं तर तो ईश्वर होऊ शकला नसता. हे सर्व जर तो विसरला तर त्याचे कान धरून आम्ही त्याला सांगू, मी तुला ईश्वर मानलं म्हणून तू ईश्वर झालास, नाहीतर तुला कोणी ईश्वर केलं असतं? तुकारामाचा अभंगच आहे ईश्वरावरचा,

आमुचिया भावे तुज देवपण |
ते कां विसरोन राहिलीसी ॥
जेणे तुज आले रूप आणि नाव |
पतित हे देवा तुझे पायी ॥
नाही तरी तुज कोणहो पुसतो |
निरंकारी पेटे एकाएकी ॥
तुका म्हणे आम्ही असोनिया जाण |
तुझ दैवपण घडविले आम्ही ॥

तेव्हा त्यानं माणसाला श्रेष्ठत्व दिलं. म्हणजे देवाची निर्मिती माणसानं केली, हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पाश्चात्य तत्त्वज्ञ सांगत होते. तेच तुकाराम सतराव्या शतकात जगाला सांगत होते की, ईश्वराचा निर्माता माणूस आहे. माणसानं देवाला निर्माण केलेलं आहे. हे आपण विसरूनच गेलो. संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’

संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे.

तिकडं बिहार आणि बंगालच्या सीमेवर बावूळ संत होऊन गेले. त्यांच्याबद्दल आत्ता बोलत नाही. आपल्या लोकांना खरंच माहिती नाही बावूळ नावाचे कोणी संत होते. त्यांच्याबद्दल बोलायला मला वेगळे दोन तास लागतील. म्हणून आत्ता ते टाळतो.

मग आपल्या असं लक्षात येतं की, पहिली स्त्रीमुक्ती स्त्री संतांनी केली. जसं मी तुम्हांला आंदळचं सांगितलं. तिकडं राबियाचं सांगितलं. इकडं मीराबाईचं सांगितलं. तसं आपली जनाबाई काही साधी नव्हती. जनाबाईनं सांगितलं,

स्त्रीजन्म म्हणूनी न व्हावे उदास |
साधू संता ऐसै केले मज ॥

साधू संतांनी सांगितलं, स्त्री जन्म काही चांगला नाही. बाकी काही नाही तरी कमीत कमी ज्ञानेश्वरी तरी नीट वाचा. स्त्रीजन्म हे किती वाईट आहे. हे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत अनेक उदाहरणं देऊन सांगितलं आहे. स्त्री मुक्तीच्या दारातली कशी अडचण आहे? हे फार वाईट पद्धतीनं सांगितलं आहे.

जनाबाई ही पहिली संत होती. दासी. शूद्राती शूद्र. तिनं ठणकावून सांगितलं,

डोईचा पदर आला खांद्यावरी |
भरल्या बाजारी जाईन मी ॥
हाती घेईन टाळ खांद्यावर वीणा |
आता मज मना कोण करी ॥

काय विद्रोह आहे हा! हा विद्रोह स्त्रीमुक्तिवाल्यांनी समजून घ्यायला हवा. जनाबाईला गुरू स्थानी बसवा. त्या सिंमादी बोहराला बसवू नका. तिनं केलं असेल खूप काम तिकडं; पण ती जनाबाईएवढी मोठी होती का? जनाबाईनं हे सांगणं केवढं धाडस होतं त्या काळामध्ये, ते तिनं केलंय. आणि मीरा तर बेभान होऊन नाचली.

तेव्हा हे जे मानवप्रेमी आंदोलन आहे, त्यात बसवण्णांनी सांगितलं,

ज्यात नाही प्रेम तो होऊ शकतो कोणत्या प्रकारचा धर्म,

असते अनिवार्य प्रेम समस्त सृष्टीबद्दल,

आहे धार्मिक अस्थेचे मूळ अनुकंपेत,

जे मोडत नाहीत या प्रकारात भगवंत करीत नाही त्याची चिंता

ज्या धर्मात प्रेम नाही तो धर्म नाही. त्यामुळं संतांनी प्रेमाचा संदेश दिला आहे. आज जगातील समस्त मानव चिंतेत वावरत आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी काही जण अंमली पदार्थांचं सेवन करतात. झोपेच्या गोळ्या घेतात. त्यामुळं ही निर्माण झालेली उदासी, ही पोकळी, ही अस्वस्थता जी आत्म्याचा उद्गार असते, तिच्यापासून वाचण्यासाठी माणूस सृजनशील होतो. मग रंगवतो, पेटिंग्ज करतो, कविता करतो, नृत्य, मग वाजवतो पखवाज, गातो गायन, अळवतो सूर ही दुसरी एक बाजू आहे त्या अस्वस्थतेतून बाहेर पडायची.

आजच्या जगातल्या माणसाच्या समस्येला एकच उत्तर आहे. ते म्हणजे, फक्त आणि फक्त प्रेम. या संतांच्याबद्दल मी पूर्वी खूप कडवट माणूस होतो. संतांबद्दल खूप ऐकलं होतं, हे षंढ होते वगैरे. सातवळेकर महाराज यांचा माझ्यावर बाप पगडा होता. तर त्यांनी मला एकदा ज्ञानेश्वरीतली एक ओवी घेऊन सांगितलं, जो झाड लावतो त्यालाही ते सावली देतं आणि जो तोडतो त्यालाही सावली देतं. सातवळेकर म्हणाले, हा काय मूर्खपणा आहे. हे संत काहीही सांगतात. हे काय दिशा देणारेत, यांना हद्दपार केलं पाहिजे. मग मलाही असं वाटायचं. हे काय करतात, नुसतं टाळ कुटतात. खूप वाईट मत होतं माझं.

मग बदललं कधी? इथं पुण्यामध्ये एकदा साहित्य संमेलन होतं. कदाचित १९७८-७९च्या दरम्यान किंवा नंतर असावं. भरपूर कार्यक्रम होते. त्यात मीही एक वक्ता होतो. संमेलनातल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात कीर्ती शिलेदारांचा गायनाचा कार्यक्रम होता. मला काही गाणं फार समजतं असं नाही; पण ऐकायला आवडतं. गायन ऐकण्यासाठी मला पहिल्या रांगेत बसविण्यात आलं. माझ्या शेजारी दया पवार होता. तेव्हा मी ऋग्वेदाचा अभ्यास करत असल्यामुळं चित्राव शास्त्री यांच्या संपर्कात होतो. ते माझ्या दुसर्‍या बाजूला होते.

आणि कार्यक्रमाच्या शेवटी कीर्ती शिलेदारांनी एक अभंग गायला सुरुवात केली. ‘ जोहार मायबाप जोहार’ आणि तिनं जोहारची जी तान घेतली त्या वेळी सगळं अंग शहारून गेलं. आत काहीतरी गडबड होतेय, असं मला वाटलं. मी बेचैन झालो. मला वाटलं आपण वेडा होतो की काय? दया पवार माझ्याकडं बघून जरा घाबरला. त्यानं मला विचारलं, काय होतंय? मी म्हणालो, काहीतरी होतंय पण, काय होतंय माहिती नाही.

पण या एका कलावंताच्या गाण्याच्या एका तानेनं माझं आख्खं आयुष्य बदललं. संतांच्या अंत:करणात पेटलेला विद्रोह आणि त्यांनी समाजाप्रती स्वीकारलेली शरणागतता या दोन्ही गोष्टींचं दर्शन मला कीर्ती शिलेदारच्या त्या एका अभंगातून झालं. मग मी संतांच्याकडे वळलो. ही दृष्टी एका अभंगातून बदलली. संगीतात ती ताकद आहे. चित्रात ती ताकद आहे. कलेत ती ताकद आहे की, माणसाचं आख्खं जीवन ती एका चुटकीसरशी बदलून टाकते. मोठ्या कलावंतांना मी कधी भेटत नाही. क्वचितच भेटतो. काही कलावंत माझ्यावर प्रेम करतात. गिरीश कर्नाड प्रेम करतो. पु. ल. करत होते. बरं वाटतं. मोठी माणसं होती प्रेम करणारी. पण, हे कीर्ती शिलेदारांना कसं काय सांगायचं. मग मी हे खूप अलिकडं सांगितलं. सहा-सात महिन्यांपूर्वी. माझ्याकडं तिचा फोनही नव्हता. कुमार अनिलकडून फोन घेतला. फोन केला आणि सांगितलं, कीर्तीताई मला माझ्या ग्रंथामध्ये तुमचा उल्लेख करायचा आहे. करू का? मग त्यांना मी हा किस्सा सांगितला. एक तान अख्खं आयुष्य बदलून टाकते.

भक्ती आंदोलन हे मानवी प्रेमाचं आंदोलन होतं. ते मानव मुक्तीचं आंदोलन होतं आणि ते नुसतं आंदोलन नव्हतं, तर ते प्रेमाचं पण आंदोलन होतं.

कबीर बादल प्रेम का | हम परि बरशा भाई ॥
अंतर भिगी आत्मा | हरी भरी बनराई ॥

ज्याचं जीवन प्रेमानं ओलंचिंब झालेलं असतं त्याच्या जगण्याला अर्थ येत असतो. कलावंत हा जसं जीवन सार्थ करतो, जसं ते सजवतो तसंच तो मृत्यूही साध्य आणि सुंदर करतो. हे आपण विसरता कामा नये. या कलावंतासाठी मृत्यू दु:ख राहत नाही. तो आनंद सोहळा बनतो. बुद्धासाठी तो आनंद सोहळाच होता. म्हणून बुद्ध मृत्यूचा स्वीकार करण्यासाठी स्वागत करण्यासाठी हार घेऊन उभे होते. आणि म्हणत होते, ये तुझीच वाट बघत होतो.

मृत्यूच्या स्वागताची तयारी करण्याची प्रेरणा आपल्याला संत चळवळ आणि तुकाराम देतो. तुकाराम हा फार मोठा होता, आपण त्याला गमावून बसलो. माझ्या दृष्टीनं भगवान बुद्धाच्यानंतर या भारतामध्ये फक्त तुकाराम. त्यानंतर कबीर. सहा-सात महिन्यांपूर्वी भेटायला गेलो होतो तुकारामाला. मी माझ्या देशीवाद, समाज आणि साहित्य या ग्रंथात त्याचं वर्णन लिहिलं आहे. काय हाल आहेत? हे जे वारकरी आहेत ना, यांना कुठं हगावं ते पण कळत नाही. अख्खी ती पाऊलवाट घाणीनं भरलेली होती. मी गेलो तिथं त्या गुहेत. हा तुकाराम, असा माणूस होणे नाही. मृत्यू पाहिलेला माणूस. जसं सूर्य पाहिलेला माणूस सॉक्रेटिस तसा तुकाराम हा मृत्यू पाहिलेला माणूस होता. मृत्यूचा आनंद सोहळा जिवंतपणी साजरा केलेला होता.

तुकाराम म्हणतात,

आपुले मरण पाहिले म्या डोळा |
तो जाला सोहळा अनुपम्य ॥
आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने |
सर्वात्मकपणे भोग जाला ॥

हा मृत्यूचा सोहळा हा आनंद सोहळा. हा आनंद सोहळा करण्याचं भाग्य ज्याला लाभतं तो संत होतो. संत होण्यापेक्षा तो खरा माणूस होतो. तो आपल्यालाही समजावून घेतो आणि इतरांनाही समजावून घेतो. असा आनंद सोहळा आयुष्यभर आपल्या वाट्याला यायचा असेल आणि मृत्यूतून आनंद मिळवायचा असेल तर संगीतमय व्हा, नाटकमय व्हा, कलामय व्हा आणि संतांच्या साहित्याचे रसिक व्हा. तुम्हाला जीवनाच्या मुक्तीचा मार्ग सापडेल. हा मार्ग आपल्याला सापडावा. माझ्या भाषणानं आपल्या मनात अनंत प्रश्न निर्माण व्हावेत आणि त्याची उत्तरं मला न विचारता आपण आपल्यालाच विचारावीत. आपण आपलं जीवन एक आनंद सोहळा करावा, अशी आशा व्यक्त करतो.

शब्दांकन : अभिषेक भोसले

0 Shares
न करावा शिष्य महासमन्वयक