माणुसकीचं उगमस्थान

अभिजित सोनावणे

माणूस म्हणून जगण्याच्या भाषेचा उगम नेवासा इथं झाला. विश्व बंधुतेचं पसायदान मागणार्यास ज्ञानेश्व.रांनी निवृत्तीनाथांच्या प्रेरणेवरून इथल्या पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वारी सांगितली. तो खांब आणि निवृत्तीनाथांचा महिमा या दोन्हीही गोष्टी या परिसरात अजून जागत्या आहेत.

ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी जिथं लिहिली ते ऐतिहासिक ठिकाण म्हणजे नेवासे. या नेवाशाबद्दल बरंच ऐकलं होतं. बरीच उत्सुकताही या गावाबद्दल, विशेषतः तिथल्या ‘पैस’ खांबाबद्दल होती. तिथं एक खांब आहे म्हणे, असा खांब की, ज्या खांबाला टेकून संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी हा ग्रंथ रचला. माझ्या मनातल्या उत्सुकतेची कारणं ही दोन होती.

एक : ज्ञानेश्‍वरांनी याच ठिकाणाची, याच जागेची आणि त्याच खांबाची निवड का केली असावी?

दोन : ऐतिहासिक स्थानांचं मोल न समजण्याची दीर्घ परंपरा आपल्याकडे आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तेराव्या शतकात घडलेल्या घटनेचा अचल साक्षीदार जपला जाण्याचा प्रवास नेमका कसा असेल?

२९ मे २०१६ला सकाळी पुण्यातून नेवाशाला निघताना हे दोन प्रश्‍न मनात होते. माझ्या सोबत संत साहित्याचा अभ्यासक आणि युवा कीर्तनकार ज्ञानेश्‍वर भोसले हा मित्रही होता. ज्ञानेश्‍वरच्या घरात कीर्तनपरंपरा आहे. सातवीत असताना त्यानं पहिलं कीर्तन केलं. ज्ञानेश्‍वरी, तुकाराम गाथा हे त्याच्या आवडीचे आणि अभ्यासाचे ग्रंथ; पण नेवासा पाहण्याचा योग आजपर्यंत आला नव्हता. ज्या ज्ञानेश्‍वरीतल्या ओव्यांवर आपण इतके दिवस कीर्तन-प्रवचन करतो आहोत, अभ्यासतो आहोत. त्या ज्ञानेश्‍वरीच्या जन्मस्थानाला भेट देण्याची उत्सुकता माझ्यापेक्षाही जास्त त्याच्यातच दिसत होती.

आम्ही पुण्याहून निघालो होतो. पुणे म्हणजे आळंदीच्या अगदीच शेजारचं गाव. आळंदी म्हणजे ज्ञानेश्‍वरांचं समाधीस्थान. आळंदी-पैठण-नेवासा- आळंदी असा प्रवास निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई यांचा झालेला आहे. या प्रवासाबाबत वाचताना ‘खडतर’ हा शब्द वारंवार वाचायला मिळाला. या भावंडांच्या आयुष्यात तेव्हा घडत असलेल्या घटना आणि त्या पार्श्‍वभूमीवर त्यांचा प्रवास तेव्हा कसा झाला असेल? हाही विचार मनात आला. स्मार्टफोनवर इंटरनेट सुरू करून पुणे ते नेवासा हे अंतर पाहिलं. ते १८० किमी इतकं दाखवलं. शिवाय सोबत तिथं पोहोचायचं कसं याचा नकाशाही स्क्रिनवर आला. थोडक्यात आमच्या प्रवासाची दिशा स्पष्ट होती. या भावंडांच्या तेव्हाच्या प्रवासाची दिशा त्यांनी कशी आखली असेल? पैठणहून निघताना नेवासा हेच ठिकाण का निवडलं असेल? पैठणही तेव्हा महत्त्वाचं केंद्र होतंच; मग तरीही नेवासाच का? असे काही प्रश्‍न मनात येत-जात होते.

सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास नेवासा फाटा इथं पोहोचलो. गजबजलेलं ठिकाण. उतरल्या उतरल्याच ‘संत ज्ञानेश्‍वर मंदिर’ अशी पाटी दिसली. उत्सुकता मनात ताजी होतीच. विचारलं, ‘पैस खांब मंदिराकडे कसं जायचं?’

एकानं पलीकडून रिक्षा मिळेल, अशी माहिती पुरवली.

‘पाच रुपये होतील’, असं रिक्षावाल्यानं सांगितलं. आम्ही दोघं बसल्यावर त्यानं रिक्षा सुरू केली. ती धडधडत राहिली. आम्ही दोघं म्हणजे दहा रुपये. दहा रुपयांत याला कसं परवडणार? हा विचार माझ्या मनात सुरू होता. रिक्षा धडधडत होती. तो आवाज ऐकून आणखी काही माणसं जमा झाली. रिक्षात बसली. दहा-अकरा माणसं कशी बशी कोंबली आणि पैस खांबाकडं प्रवास सुरू झाला. नेवासाफाटा ते नेवासा हे अंतर साधारण पाच-सहा किलोमीटर आहे. आजूबाजूचा जरा ओसाड-जरा हिरवा माळ मागे पडत होता. रस्त्यात मध्येच उतरवत रिक्षावाल्यानं पैस खांबाकडे कसं जायचं त्याची दिशा दाखवली. आम्ही चालत निघालो. थोडं अंतर पुढं गेलो आणि ‘कॅथलिक आश्रम ज्ञान माउली मंदिर’ दिसलं. ही अशी मिसळण जरा नवी वाटली. फोटो घेतला.

नेवासा त्या अर्थानं ज्ञानपीठ. भागवतधर्माचं आद्यपीठ. संतांनी जो ऐक्याचा संदेश दिला. प्रेमाचा संदेश दिला. त्याचं साक्षात रूप म्हणजे हे ज्ञानमाउली मंदिर असावं, असा मनातल्या मनात समज बाळगत आणि थोडासा आनंदी होत पुढं निघालो. थोडी वळणं घेतल्यावर ‘श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर श्री क्षेत्र नेवासा’ हे अगदीच नवं कोरं असं मंदिर दिसलं. माहिती घेतल्यानंतर कळलं, पैस खांब मंदिर तिथून अगदी काहीच अंतरावर आहे. चालत पुढं गेलो. विचारलं. एकानं लांब हात करून तेच पैस खांब मंदिर म्हणत एका कळसाकडं बोट दाखवलं. थोडकं चालून थकलेल्या शहरी पावलांना कळस पाहताच वेग आला. उत्सुकता संपली. उजव्या बाजूला दगडी कमान दिसली. त्यावर अगदी छोट्याशा अक्षरात लाल रंगात ‘श्री ज्ञानेश्‍वरी निर्माण स्थान श्री क्षेत्र नेवासे खुर्द’ अशी पाटी. आणि बाजूलाच असलेल्या ‘पैस खांब दर्शन मार्ग’ या भल्या मोठ्या पाटीनं लक्ष वेधलं.

कमानीपाशी दोन महिला हार-फुलं विकत होत्या. येणार्‍या-जाणार्‍याला ‘‘माउलीऽऽ माउलीऽऽ’’ म्हणत विनंती करत होत्या. त्यांच्या चेहर्‍यावरचं  हसू स्वीकारत आम्ही आत प्रवेश केला. आपण एका महत्त्वाच्या जागी आलो आहोत. म्हणून आपण त्या अर्थानं महत्त्वाचेच आहोत, असा भास देणारी ही जागा आहे. मोठं मंदिर. समोर दाट पिंपळ. बाजूला चिंच. या सगळ्या अचल गोष्टी या महत्त्वाच्या ठिकाणाची साक्ष देत उभ्या आहेत. आज जो काही महाराष्ट्र आहे तो वारकरी परंपरेतून आहे. आपण जे काही बोलतो, लिहितो, वाचतो, गातो, नाचतो त्या सगळ्यावर अगदी थेट प्रभाव वारकरी संप्रदायाचा आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसह सगळ्या विद्वानांवर, त्यांच्या विचारांवरही याच संप्रदायाचा अगदी थेट प्रभाव होता.

आज हे लिहिताना असं जाणवतं की, २९ मेच्या दिवशी, दुपारी मी ‘पैस खांब’ मंदिरासमोर उभा होतो. माझ्या तिथं असण्याची पाळंमुळं शोधत मागे मागे गेलो, तरीही मी ज्या ठिकाणी उभा होतो, तिथंच येऊन पोहोचतो. फक्त ७२६ वर्षांचं एक भलंमोठं काळाचं वर्तुळ निघून गेलं. ही कल्पनाच मला फार चमत्कारिक वाटते.

ज्ञानेश्‍वरांनी ७२६ वर्षांपूर्वी याच ठिकाणी ज्ञानेश्‍वरीची जेव्हा रचना केली; तेव्हा त्याच जागेवर माणसाला निव्वळ माणूस म्हणून किंमत होतीच, असं नाही; पण ७२६ वर्षांनंतर माणसाला माणूस म्हणून तेव्हाच्या तुलनेत आज कितीतरी अधिक किंमत आहे. या सार्‍या बदलाच्या सुरुवातीचं ठिकाण म्हणजे हेच ते नेवासे ठिकाण.

मंदिर परिसरात पोहोचलो तेव्हा आजूबाजूला फारशी वर्दळ नव्हती. दहा-बारा लोक आणि त्यांच्या सोबतीला मी आणि ज्ञानेश्‍वर असे काही मोजकेच लोक त्या परिसरात होतो. कमानीतून आत गेल्या गेल्या दोन्ही बाजूला धार्मिक पुस्तक विक्रीचे स्टॉल्स आहेत. त्यांच्याशी इकडचं तिकडचं बोललो. आमच्या येण्याचा विषय सांगितला, तर त्यांनी शिवाजी गवळी यांचं नाव सुचवलं. ‘‘संत निवृत्तीनाथांबद्दल.. संत ज्ञानेश्‍वरांबद्दल तुम्ही बोला’’, असं त्यांना म्हटल्यावर काहीसे लाजले. ‘‘आम्ही काय सांगणार?’’, असं म्हणत दोन पुस्तकं त्यांनी पुढं केली. यात सगळी माहिती मिळेल तुम्हाला असंही सूचित केलं. पुस्तकांबरोबर त्यांच्याकडे माळाही होत्या. ज्ञानेश्‍वर माळकरी. ‘‘तुळशीची माळ आहे का?’’, ज्ञानेश्‍वरनं विचारलं. त्यांनी काही माळा दाखवल्या.

‘‘कशावरून ही तुळशीचीच माळ आहे?’’ मी.

‘‘माळेतला मणी दाबल्यावर हातात तुटला, तर समजायचं की ती माळ तुळशीची’’. माळेतला मणी तोडत त्यांनी प्रात्याक्षिकच करून दाखवलं. मीही एक मणी तोडून पाहिला. तुळशीची माळ ओळखण्याची ही नवीनच पद्धत मला आणि ज्ञानेश्‍वरला कळाली. तुळशीची माळ घेतली आणि आम्ही शिवाजी गवळींकडे जायला निघालो. मंदिराची भिंत ओलांडली आणि समोर ‘संरक्षित स्मारक’ असा एक फलक दिसला. त्याचा अर्थ तेव्हा उमगला नाही; पण शिवाजी गवळींनी तो उलगडून सांगितला. नंतर या संरक्षित जागेमागील ऐतिहासिकताही एका पुस्तकात वाचायला मिळाली. हे संरक्षित स्मारक आणि पैस खांब मंदिराला लागून गवळी यांचं घर आहे. गवळी भेटले. बोलणं सुरू झालं. प्रत्येक गावकर्‍याच्या मनात स्वतःच्या गावाबद्दल अभिमान असतो, तसा त्यांच्याही बोलण्यात दिसला. ते बोलायला लागले – ‘‘नेवासा गाव हे फार पुरातन आहे. हे पूर्वी सोनारांचं गाव म्हणून ओळखलं जायचं; पण कालांतरानं गाव उलटलं. नेवासा खुर्द आणि नेवासा बुद्रुक असे दोन भाग पडले. सगळीकडे ‘बुद्रुक’ हे मोठं असतं आणि ‘खुर्द’ हे छोटं असतं; पण नेवाशाला हे उलट आहे. इथं ‘खुर्द’ हे मोठं आहे. हा सगळा परिसर म्हणजे नेवासा खुर्द चा भाग आहे. खंडोबाच्या म्हाळसेचं माहेर हे नेवासाच आहे. अमृताचं वाटप होताना देवानं मोहिनीचं रूप घेतलं ते मोहिनीराजाचं मंदिरही नेवाशातच आहे. नारदाचं एकमेव मंदिर नेवाशात आहे. आणि मुख्य म्हणजे एखाद्या खांबाचं मंदिर ही गोष्ट जगात कुठंही पाहायला मिळणार नाही. ते फक्त तुम्हाला नेवाशातच पाहायला मिळेल.’’

गावाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याचं त्यांच्या बोलण्यात आलं. गावात पाण्याचीही समस्या आहे. नेवासा हे गाव तसं तालुक्याचं ठिकाण. सगळी शासकीय कार्यालयं या गावात आहेत; पण या गावापेक्षा नेवासाफाटा या भागाचा विकास जास्त झालेला आहे. नेवासा हे गाव त्या मानानं विकासापासून दुर्लक्षित राहिलं आहे. एखादी वस्तू नेवासा गावात मिळणार नाही; पण नेवासा फाट्यावर नक्की मिळते. गावातील अनेक जण नेवासा फाट्याला स्थायिक झाले आहेत. फक्त शासकीय काम असेल तरच नेवासा गावात त्यांचं येणं होतं. तालुक्याचं केंद्र आणि तेही ऐतिहासिक ठिकाण असूनही या गावाचा विकास म्हणावा तितका होऊ शकला नाही. गावात वद्य एकादशीला मोठ्या संख्येनं भाविक येतात. ही संख्या जवळपास लाखाच्या वर असते. या भाविकांच्या सेवेमुळे गावातल्या अनेकांचा उदरनिर्वाह होतो. नेवासा हे महत्त्वाचं धार्मिक पर्यटनस्थळ झाल्यास या गावाचा विकास होईल, अशी अपेक्षाही त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली.

संत ज्ञानेश्‍वरांच्या ज्ञानेश्‍वरी निर्मितीचं प्रत्यक्ष दिसणारं असं ठाणं म्हणजे पैस खांबाचं मंदिर. संत निवृत्तीनाथांचं असं कोणतंही प्रत्यक्ष ठाणं या भागात नाही. असं असलं, तरीही संत ज्ञानेश्‍वरांच्या बरोबरीनंच इथं संत निवृत्तीनाथांचं नाव आजही घेतलं जातं, हे मला महत्त्वाचं वाटलं. प्रत्यक्षात एखादं ठिकाण जपून राहणं आणि पिढ्यान् पिढ्या लोकांच्या हृदयात-मनात एखाद्या नावानं जागा करून राहणं, ही भावना नेवाशात संत निवृत्तीनाथांबद्दल दिसते. ‘संत निवृत्तीनाथांसह चार भावंडं इथं कशी आली, त्यांनी सच्चिदानंद बाबांना कसं जीवदान दिलं, ज्ञानेश्‍वरांनी संत निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून कशी ज्ञानेश्‍वरी लिहिली.’ या सगळ्या गोष्टी इथल्या लोकांना अगदी तोंडपाठ आहेत.

गवळी यांच्याकडून निघालो आणि पुन्हा ‘संरक्षित स्मारक’ फलकापाशी आलो. एक तारेचं कुंपण दिसलं. आत झाडं-झुडपं.. काय असेल आत? उत्सुकता ताणली गेली. जरा चौकशी केली, तर कळलं ‘आत चक्रधरांचं एक ठाणं आहे.’ चक्रधरांचं ठाणं आणि इथं? काही मेळ लागेना. कारण मुकुंदराजांच्यानंतर आणि ज्ञानेश्‍वरांच्या आधी महानुभाव संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला. चक्रधरांचा कालखंड (इसवीसन ११९४ ते इसवीसन १२७२) हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं ऐश्‍वर्याचा आणि समृद्धीचाही समजला जातो. धर्माचं तत्त्वज्ञान सर्वसामान्यांच्या भाषेत सांगणार्‍यांत चक्रधरांचं मोठं योगदान होतं. पुढं हेच काम निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून ज्ञानेश्‍वरांनी केलं.

या दोघाही मान्यवरांचा नेवाशाला झालेला स्पर्श, हा माझ्या दृष्टीनं उत्सुकतेचा मुद्दा होता. या दोघा जणांनी नेवाशाची केलेली निवड पाहता हे ठिकाण त्या काळी बर्‍यापैकी लोकप्रिय आणि महत्त्वाचं स्थान असणार इतकंतरी मनाशी स्पष्ट झालं.

जाण्याआधी नेवाशाबद्दल माहिती काढली होतीच. त्यात काही संदर्भ मिळाले होते. ते असे ,‘डेक्कन कॉलेज पुणे’च्या पुराण वास्तू संशोधन विभागाच्या विशेष पथकानं १९५३-५४ मध्ये पैसखांब मंदिराच्या उत्तरेच्या बाजूच्या टेकड्यांवर उत्खनन केलं होतं. या विशेष पथकात डॉ. सांकलिया आणि इरावती कर्वे यांचा समावेश होता. हा टेकड्यांचा भाग पुरातत्त्व खात्यानं संरक्षित करून ठेवला आहे. विशेष पथकानं जे उत्खनन केलं त्यावरून प्रवरा नदीच्या खोर्‍यात मानवी वस्तीचं स्थान होतं. इथं जे अवशेष सापडले त्यावरून त्या वस्तू अश्मयुगातील, ताम्र पाषाण युगातील तसेच सातवाहन काळातील आहेत, असा निष्कर्ष निघाला. नेवाशातून ग्रीक, रोम आदी देशांशी व्यापार चालत असे याचे काही संदर्भ त्या संशोधनातून हाती लागले होते.

आम्ही जिथं उभा होतो, तेच या मिळालेल्या माहितीतलं जुनं-पुराणं ठिकाण होतं. आणि याचं विशेष म्हणजे याच जागी चक्रधरांचं ठाणं होतं. देव आणि दानव यांच्या समुद्रमंथनाच्या वेळी अमृत बाहेर निघालं. ते दानवांच्या हाती लागलं. तेव्हा विष्णूनं मोहिनीराजाचं रूप घेऊन अमृत पुन्हा मिळवलं. तो प्रसंग याच नेवाशात घडला. म्हणून मोहिनीराजाचं मंदिर नेवाशात आहे. शिवाय जेजुरीच्या खंडेरायाची म्हाळसा हिचं माहेर नेवासाच आहे, या कथाही ऐकून होतो.

नेवाशाला असलेल्या या ऐतिहासिक वलयाचा विचार करत तारेचं कुंपण ओलांडून आम्ही आत गेलो. दीडशे-दोनशे मीटर अंतर आत चालत गेलो; तेव्हा तात्पुरत्या बांधणीची एक हिरवी शेड दिसली. त्यावर ‘सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी’ अशी पाटी होती. तिथं अगदी साध्या बांधणीचा महानुभावांचा आश्रम आहे. शाममुनी अंकुळणेरकर हे या आश्रमाचं काम पाहतात. मराठीतलं पहिलं गद्य चरित्र हे चक्रधरांचं मानलं जातं. त्याचं नाव ‘लीळाचरित्र’. या लीळाचरित्राची विभागणी एकाक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा तीन भागात केलेली आहे. चक्रधर जिथं जिथं गेले तिथं प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या बद्दलच्या आठवणींचं संकलन करण्यात आलेलं आहे. आम्ही दुपारी जेव्हा पोचलो तेव्हा शाममुनी हे झोपले होते. त्यांचे शिष्य आम्हाला भेटले. आमचं प्रयोजन त्यांना सांगितलं आणि त्यांना बोलतं केलं. तुमचं नाव काय असं विचारल्यावर त्यांनी ते सांगायला नकार दिला. ‘‘शाममुनीं यांचचं नाव लिवा’’ म्हटलं, ‘‘तुमचं नाव सांगा, तुमच्या नावानं आम्ही तुमचं म्हणणं प्रसिद्ध करू.’’, ‘‘नाय, त्यांचंच लिवा.’’ हाच आग्रह त्यांनी लावून धरला होता. शेवटपर्यंत त्यांनी स्वतःचं नाव सांगितलं नाहीच. स्वतःचं नाव छापून येण्याबद्दलचा विरक्ती भाव त्यांच्यात दिसून आला. चक्रधर स्वामींबद्दल सांगताना त्यांच्या चेहर्‍यावर एक उत्साह जाणवत होता. त्यांनी सांगितलं ,

‘‘स्वामींचा मुक्काम डोमेग्रामला (बहुदा श्रीरामपूरजवळचं कमलपूर) दहा महिने होता. निधी नेवाशातून म्हणजे इथून भक्त बाजार करून स्वामींकडे जात. इथं मोठा बाजार भरायचा; पण एक दिवस त्यांचा भक्त निधी नेवाशावरून आला नाही. मग त्यांनी विचार केला की, आपण त्या भक्ताला बघायला निधी नेवाशाला जाऊ आणि भक्ताला शोधत शोधत ते इथं आले. या जागेवर तेव्हा सूर्य नारायणाचं मंदिर होतं. त्यांना ही जागा आवडली आणि ते इथंच थांबले. आता इथं मंदिर राहिलं नाही; पण आम्हाला माहितीये की स्वामी इथं उतरले होते. म्हणून आम्ही ते जतन केलं. जेव्हा ते इथं पहिल्यांदा आले तेव्हा ते चार महिने थांबले. दिवाळी साजरी केली आणि मग इथून ते रांजणगावला गेले. पुर्‍या आयुष्यात स्वामींनी आठ वेळा दिवाळी साजरी केली. त्यातली सहावी दिवाळी स्वामींनी या ठिकाणी साजरी केली. मग पुन्हा इथं ते आले आणि तेव्हा इथं सहा महिने राहिले.’’

चक्रधरस्वामीं जिथं जिथं गेले ती सगळी ठिकाणं महानुभावांनी नोंदवून ठेवली आहेत. नेवाशाला तर त्यांनी दिवाळी साजरी केली. त्यामुळं महानुभांच्या दृष्टिनं या स्थानाचं मोल अधिक आहे. मुंबईहून इथं एक महानुभावी आले होते. त्यांचं नाव बी. एम. पाटील. ते म्हणाले, ‘‘मी इथं दरवर्षी येतो. एक दिवस मुक्काम करतो आणि परत मुंबईला जातो. इथं संपूर्ण देशभरातून लोकं नेहमी येत असतात. दिल्ली, पंजाब, अमृतसर इथूनही लोक येतात. दर नवरात्रात इथं उत्सव साजरा केला जातो. तेव्हाही इथं गर्दी होते. पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात हा परिसर असल्यामुळं जरा बंधनं आहेत. इथं फारशा सोयीसुद्धा नाहीत; पण चक्रधर स्वामींचा सहवास मिळतो म्हणून आम्ही येतो.’’

चक्रधर ज्या अर्थी या ठिकाणी आले. रमले. त्याअर्थी या ठिकाणाला एक सांस्कृतिक महत्त्व अगोदरपासून असणार. इथला श्रोता त्या अर्थानं प्रगल्भही असणार. निवृत्तीनाथ आणि भावंडांनी हे ठिकाण निवडण्यामागे चक्रधरांच्या वास्तव्याची पार्श्‍वभूमीही सांगता येऊ शकते. चक्रधरांच्या आगमनानंतर अंदाजे १५-१६ वर्षांनी निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही भावंड नेवाशात आली.

नेवासेकरांबद्दल म्हणजेच इथल्या श्रोत्यांबद्दल ज्ञानेश्‍वरांनीही नोंदवून ठेवलं आहे.

तुमचेया दिठीवेचिया वोले | सासिन्नले प्रसन्नतेचे मळे |
तेथ साऊली देखोनि लोळे | श्रांतु जी मी ॥

श्रोता हा सर्वज्ञ आहे त्याला काही शिकविण्याची आवश्यकता नाही. तसंच श्रोत्यांचं आपल्याकडे लक्ष असणं म्हणजे, ‘वक्तृत्वा अवधानाचा होय चारा’ हे ज्ञानेश्‍वरांनीच लिहून ठेवलं आहे. तिथून निघालो. पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात हा परिसर असल्यामुळं इथं लोकांची फारशी वर्दळ नसते. पुन्हा पैस खांब मंदिराकडे निघालो. वाटेत बाळकृष्ण आजोबा भेटले. तेही मंदिराकडेच निघाले होते. जाता जाता त्यांच्याशी गप्पा मारल्या. म्हटलं या मंदिराबद्दल माहिती गोळा करतो आहोत, जे तुम्हाला माहीत आहे ते ते सांगा. त्यांनी सांगायला सुरुवात केली. ‘‘हे मंदिर आधी होतं करविरेश्‍वराचं. त्या मंदिराच्या एका खांबाला टेकून ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी लिहिली; पण हे मंदिर नंतर मुघलांच्या ताब्यात गेलं. त्या जागेवर हक्क कुणाचा हिंदूंचा की मुसलमानांचा हा वाद बराच काळ सुरू होता. मग १९३८मध्ये या मंदिराचा हक्क हिंदूंना मिळाला. हा निकाल खूप ऐतिहासिक आहे. अयोध्येच्या राम मंदिर प्रकरणातही हा खटला रेफरन्स म्हणून वापरला आहे.’’

हिंदू-मुस्लीम दंगलींची मोठी पार्श्‍वभूमी नेवाशाला आहे. त्याचं कारणच बोलता बोलता आजोबांनी सांगितलं. पुढं चालत चालत आम्ही त्यांच्याबरोबरच मंदिरात गेलो. मंदिरात गेलो तेव्हा मंदिर खूपच शांत होतं. गाभार्‍यातला पैसखांब लांबूनच दिसला. जवळ गेलो. पैसखांबावर पांढरी-पिवळी फुलं वाहिली होती. आजपर्यंत फोटोतून पैसखांब अनेकवेळा पाहिला. आज प्रत्यक्ष पैसखांबाच्या शेजारी आम्ही उभे होतो. एके काळी महत्त्वाची ऐतिहासिक घटना जिथं घडली, त्या घटनेची साक्ष देत पैसखांब उभा होता.

या खांबाच्या कोणत्या बाजूला ज्ञानेश्‍वरांनी पाठ केली असेल? श्रोते कुठे बसले असतील? करविरेश्‍वराची पिंड ज्ञानेश्‍वरांच्या पाठी असेल की पुढे असेल? तेव्हा निवृत्तीनाथ कोणत्या जागी बसून ऐकत असतील? सच्चिदानंद बाबा या खांबाच्या उजव्या बाजूला बसले असतील की डाव्या, की अगदी समोर? श्रोते प्रश्‍न विचारत असतील तेव्हा त्यांना काय नावानं हाक मारत असतील? ती वेळ कोणती असेल? सकाळची की संध्याकाळची? श्रोत्यांना सामोरं जाण्याआधी ज्ञानेश्‍वर आधी तयारी करत असतील का? एवढं अभ्यासपूर्ण विवेचन करायचं तर त्यासाठी ते काय वाचत असतील? कुठं करत असतील अभ्यास? कोणती असेल ती ग्रंथसंपदा? त्यांची आणि निवृत्तीनाथांची काय चर्चा होत असेल?…

पैसखांबासमोर उभं राहिल्यावर हे सगळे प्रश्‍न मनाशी येऊन साचले होते.

बाहेर आलो, तेव्हा मंदिराची व्यवस्था पाहणारे शिवाजी रामजी होन यांची भेट झाली. ते गेल्या १२-१३ वर्षांपासून इथं सेवा करतात. त्यांच्याशी चर्चा झाली. तुम्ही आत चला तुम्हाला सगळी माहिती देतो; असं म्हणत त्यांनी पुन्हा पैस खांब मंदिराच्या गाभार्‍यात आम्हाला नेलं. ते स्वतः एका कोपर्‍यात उभे राहिले आणि आम्हाला समोर उभं केलं. पैसखांबाचं दर्शन घेऊन न अडखळता, अगदी स्पष्टपणे सांगायला सुरुवात केली.

‘‘आधी करविरेश्‍वराचं मंदिर प्रवरा नदीच्या काठी होतं; पण काळाच्या ओघात हा नदीप्रवाह बदलला. या नदीच्या काठी चौघं भावंड स्नान करायला यायची. तेव्हाच सच्चिदानंद बाबांचा अंत्यविधी सुरू होता. कुणीतरी योगी पुरुष दिसताहेत म्हणून सच्चिदानंदबाबांची पत्नी आशीर्वाद घ्यायला आली. माउलींचं जेव्हा तिनं दर्शन घेतलं. तेव्हा माउलींनी तिला ‘सौभाग्यवती भवं’, असा आशीर्वाद दिला. ती म्हणाली, ‘माझ्या पतीचा अंत्यविधी चालू आहे. मी आता सती जायला निघाले आहे. मी कुठली सौभाग्यवती.’ मग माउली त्या स्थानावर गेले. सच्चिदानंद बाबांच्या मस्तकावर हात ठेवला. आणि सच्चिदानंद बाबा उठले. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्यांचंच अंत्यकार्य सुरू असल्याचं त्यांना दिसलं. आपल्याला माउलींमुळं, चौघा भावंडांमुळं जीवदान मिळालं म्हणून पुढचा सगळा जन्म त्यांच्यासोबत घालवायचं त्याच क्षणी ठरवलं. मग निवृत्तीनाथांच्या आदेशावरून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्‍वरी सांगितली. सच्चिदानंदबाबांनी ती लिहून घेतली. तेव्हा ते याच खांबाला टेकून बसले होते. जगात मंदिराकरता खांब आहे. पण खांबाकरिता मंदिर हे एकमेव इथं आहे. हे या स्थानाचं विशेष आहे. विश्‍वाच्या कल्याणासाठी विश्‍वात्मक देवानं म्हणजे ज्ञानोबा माउली, विश्‍वात्मक देवाकडे म्हणजे गुरू निवृत्तीनाथांकडे मागितलेलं पसायदान म्हणजे ज्ञानेश्‍वरी. ज्ञानेश्‍वरी लिखाणाचं काम अडीच-तीन वर्षं सुरू होतं.

महिन्याच्या वद्य एकादशीला इथं लाख-दीड लाख भाविक जमतात. तेव्हा इथं रात्रभर जागर होतो. रामकृष्ण हरिचा पाठ मंदिरात गेल्या चाळीस वर्षांपासून रोज या मंदिरात होतो. ज्ञानेश्‍वरीचं पारायण सुद्धा इथं रोज होतं. गोकुळाष्टमीला वार्षिक सप्ताह होतो. दत्तजयंतीच्या निमित्तानं, महाशिवरात्रीच्या निमित्तानं, तुकाराम बिजेच्या निमित्तानं इथं सप्ताह चालतात. इथला सगळा खर्च देणग्या आणि लोकवर्गणीतून होतो. इथं कोणत्याही राजकीय गोष्टीला परवानगी दिली जात नाही. ’’

एका दमात त्यांनी सगळं सांगून टाकलं. पैस खांबाला खडीसाखर-नारळ लावून तो प्रसाद आम्हाला दिला. आम्ही विचारलं, ‘‘येता येता आम्हाला ‘कॅथलिक आश्रम ज्ञान माउली मंदिर’ दिसलं. ते नेमकं काय आहे?’’

‘‘नाही.. नाही.. त्याचा आणि आपला काहीही संबंध नाही. ते ख्रिश्‍चनांचं आहे. आपली लोकं तिकडं वळण्यासाठी त्यांनी ते तसं नाव दिलं आहे.’’ होन यांनी स्पष्टीकरण दिलं. खुद्द पैस खांबाच्या मंदिरातच ‘आपलं’ आणि ‘त्यांचं’ ही भाषा काहीशी खटकली. गाभार्‍यात जाताना शेजारच्याच बाजूला एक मोठी पिंड आहे. आधीच्या करविरेश्‍वर मंदिरातली हीच ती पिंड बहुतेक.

अजून पारायणाला वेळ होता, त्यामुळं गर्दी नव्हती. पण, पारायणाची वाट बघत मंदिरात एक आजी वत्सलाबाई विधाटे बसल्या होत्या. त्यांच्याशी बोलायला लागलो. ‘‘आधी इथं जुनं मंदिर व्हतं. माज्या देखतच एवढं मोठं झालंय. आदी फकस्तं एक टेकाड होतं. जाळ्या-जुळ्याबी खूप व्हत्या. मग बन्सीबाबांनी एवडं समदं बांदलं. समोर त्यांचंबी मंदिर हाये. आदी एवडी गर्दी नवती. आता लय गर्दी व्हती. येक ग्येलं की येक.. येक ग्येलं की येक.. अशी पारायणं सुरू असतात. मला लिहिता वाचता येत न्हाई; पण तरीबी मी येऊन बसते पारायणाला. तू कुडून आला?’’

‘‘पुण्यावरून’’

‘‘ हा इथनंच माउली तिकडं गेल्ते. आळेफाट्याच्या बाजूनं. तिथं रेड्याला समाधी दिली. मग गेले आळंदीला. मी येते की तिकडं वारीला. लय वार्‍या केल्या. आधी जायचे वारीला. नंतर चालनं व्हायना. मग गाडीनी जायाचे. ह्या बारीला जमल असं वाटत न्हाई. मला गावातून इथवर आन्ती माउली. तेवढंच लय हाय. वय झालं ना आता.’’

विधाते आज्जींच्या बोलण्यात बन्सीबाबांचा उल्लेख आला. सकाळी जेव्हा मंदिराच्या प्रांगणात आलो; तेव्हा त्यांचं मंदिर पाहिलं होतं. त्यांच्याबद्दल माहिती घ्यावी म्हणून पैस खांब मंदिराबाहेर पडलो. पुस्तकांच्या स्टॉलपाशी गेलो. तर ‘वै. ह. भ. प. गु. बन्सी महाराज तांबे जीवन चरित्र’ असं पुस्तक हाताशी लागलं. लगेच विकत घेतलं.

श्री ज्ञानेश्‍वरी मंदिर अर्थात पैस खांब मंदिर हे नेवासा परिसरात आहे, हे अनेक लोकांना माहितही नव्हतं इतकं हे ठिकाण दुर्लक्षित होतं. अगदी बोटावर मोजण्याइतकी मंडळी इथं येत. पंधराव्या शतकापर्यंत करविरेश्‍वराचं मंदिर हे सुस्थितीत होतं. मधल्या काळात इथं परकीय आक्रमणंही झाली. काळाच्या ओघात मंदिराचे अवशेषही सापडणं अवघड होऊन बसलं. मात्र, तरीही हा ऐतिहासिक पैस खांब स्वतःचं अस्तित्व टिकवून होता. १८००च्या अगोदरपर्यंत हे क्षेत्र विपन्नावस्थेतच होतं. फक्त वद्य एकादशीला इथं भजन, कीर्तन, जागर असा कार्यक्रम होत होता. मग सगळ्यात पहिल्यांदा जळके खुर्द इथल्या परदेशी नावाच्या गृहस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि इथं छोटं मंदिर बांधलं. पुढं १९१७च्या सुमारास कृष्णाजी त्र्यंबक जोशी वकील आणि इतर ग्रामस्थांनी या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला. १८ बाय १८ फूट गाभारा आणि पुढं पाच खणाचे लाकडी खांब असं ते बांधकाम होतं. पुढं मग बन्सी महाराज इथं १९३९मध्ये आले. आणि त्यांनी या ज्ञानेश्‍वरी रचना स्थानाला उर्जितावस्था देण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपली सर्व मालमत्ता विकली आणि जीर्णोद्धाराचं काम सुरू केलं. मधल्या अडीअडचणींना सामोरं जात १९६३मध्ये या मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. बन्सी महाराजांचं १९९४ला निधन झालं आणि १९९७ला याच मंदिर प्रांगणात त्यांचं मंदिर बांधलं.

मिळालेल्या पुस्तकातून ही माहिती मिळाली.

पैस खांब मंदिराच्या कमानीतून बाहेर आलो. आणि पैस खांब मंदिराच्या समोरच असलेल्या मशिदीजवळ आलो. बाहेरच्या नळावर नासीर शेख हात पाय तोंड धुवत होते. माहीत असूनही विचारलं, ‘‘मशीद आहे का?’’

‘‘हां. मशीद है.. लाल मशीद’’

‘‘कबसे है?’’

‘‘ये शायद बारासो सालसे है’’

‘‘हमने कभी देखी नही अंदरसे मशीद’’

‘‘आओ ना.. देखो..’’

‘‘सचमुच देख सकते हैं?’’

‘‘ हां क्यूं नही’’

नासीरनं दरवाजा आमच्यासाठी उघडला. आत रिकामी खोली होती. एका उंच जागेवर उर्दू अक्षरं असलेली दोन-तीन धार्मिक पुस्तकं होती. बहुतेक कुराणाची प्रत असावी. बाहेर आलो. नासीरला विचारलं, ‘‘उस मंदिर मे गये है कभी?’’

‘‘जानेका मन तो करता है.. लेकीन..’’

नासीर छोटं हसला. मीही. हातात हात मिळवला आणि पैस खांबाच्या कमानीपाशी आलो.

पुण्याकडे निघालो. परतीच्या प्रवासाला लागलो. येताना संत तुकाराम महाराजांचं मंदिर पाहिलं. एकमेव असं नेवाशातलं मोहिनीराजाचं देखणं मंदिरही पाहिलं. हेमाडपंथी शैलीचं हे मंदिर अतिशय देखणं आहे. ते पाहिलं. त्याभोवती जवळपास चिकटूनच उभ्या असणार्‍या २१व्या शतकातल्या सिमेंट शैलीतल्या इमारती मात्र या मंदिराच्या सुबक बांधकाम शैलीचा जाहीर अपमान करताहेत, असाच भास झाला.

नेवाशात आल्यावर ऐकलं, की इथं पूर्वी खूप मोठा बाजार भरायचा.. नेवाशातल्या माणसांना जरा खोदल्यावर कळलं, की इथं सूर्यनारायणाचं देखणं मंदिर होतं आणि ते मंदिर आणि इथला परिसर चक्रधरांना भावला होता. नेवाशाबद्दल वाचल्यावर समजलं, की व्यापाराच्या दृष्टीनंही हे महत्त्वाचं केंद्र होतं. नेवाशात वावरल्यावर जाणवलं, की नेमकं काय आहे ज्ञानेश्‍वरी ग्रंथाचा एकमेव साक्षीदार असलेल्या पैस खांबाचं मोल…

नेवासा हे ठिकाण आज ओळखलं जातं ते याच पैस खांबामुळं. त्याची आधीची ओळख पूर्ण नाहीशी होऊन ही नवी ओळख या गावाला मिळाली आहे. आधीच्या माणसांनी काही कर्तृत्व केलं म्हणून नेवासा गावाला विशेष ओळख मिळाली. इथं एक संस्कृती नांदली. त्यामुळं नेवासा हे या चारही भावंडांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आणि त्यांनी इथं विसावा घेतला. निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून इथं ज्ञानेश्‍वरीची निर्मिती केली. आणि या गावाला एक नवी ओळख मिळाली. आधीची ओळख पुसट होत होत, एक ठळक ओळख निर्माण झाली. काळ नावाची भयंकर गोष्ट अस्तित्वात असते. आज नेवासा म्हटलं की, ज्ञानेश्‍वर इतकी ठळक ओळख अस्तित्वात आहे. ती काळाच्या ओघात पुसट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ही ठळक ओळख पुसट करणारी महत्त्वाची घटना पुढच्या काही शंभर-पाचशे-हजार वर्षांत घडेल; न घडेल आणि काळाच्या उदरात जुनी ओळख नाहीशी होत कदाचित नवीनच ओळख नेवासा शहराला मिळेल. हा असा काही तरी विचार पैस खांब मंदिर परिसरातून बाहेर पडताना मनात डोकावत होता. कारण आधीच्या सगळ्या ओळखी नेवाशानं पुसत केवळ एकच ओळख टिकवून ठेवली होती.

मला नेहमी वाटतं. कुठल्याही ठिकाणानं, जुन्या-नव्या अशा दोन्ही ओळखी आपल्या आत साठवाव्यात. त्या जपत जपत जुन्याचा आदर आणि नव्याचा स्वीकार करत करत त्या ठिकाणानं नवं अस्तित्व निर्माण करत राहावं.

निघताना नेवाशाशी निगडित आधीच्या सगळ्या ओळखी पुसल्या गेल्याचं जरासं दुःखं मनात होतं; पण त्याच वेळी पैस खांब टिकून राहिल्याचा, आपल्या पूर्वजांनी तो टिकवल्याचा मनोमन आनंदसुद्धा मनात होता. दुःख आणि आनंद या दोन्ही भावना एकाच वेळी अनुभवण्याची संधी या प्रवासानं मला दिली. नेवासा फाट्याला आलो.

काही प्रश्‍न मनात होते. त्याची जुळवाजुळव मनात सुरू होती. जुळवणी झाल्यावर सोबत असलेल्या ज्ञानेश्‍वरला विचारलं, ‘‘संत निवृत्तीनाथ हे नाथ संप्रदायी. म्हणजेच शिवभक्त. म्हणजे शैव. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्‍वरांना विष्णूचा अवतार मानला जाणार्‍या श्रीकृष्णाची भगवद्गीता सोप्या शब्दात समजावून सांगण्याचा आदेश दिला. भगवान विष्णूंना मानणारे ते वैष्णव. शिवाचं तत्त्वज्ञान मानणार्‍या निवृत्तीनाथांनी वैष्णवांची गीता सर्वांसाठी खुली केली. सर्वसामान्यांना तत्त्वज्ञान कळावं आणि त्यांना स्वतःच्या आत्मिक विकासाची संधी उपलब्ध व्हावी, ही त्यामागची तळमळ असणार. मग शैव आणि वैष्णव वादाचं काय?’’

‘‘शैव आणि वैष्णव हा एक मोठा संघर्ष पूर्वीच्या काळात चालत आलेला होता. इतका की त्यात हिंसा झाल्याचं मी वाचलंय. तेराव्या शतकापर्यंत शैव, शाक्त आणि वैष्णव यांच्यातला संघर्ष पराकोटीला पोहोचला होता. तो वाद मिटविण्याच्या दृष्टीनं निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्‍वरांना गीतेचं तत्त्वज्ञान सोप्या शब्दात समजावून सांगण्याचा आदेश दिला. म्हणूनच त्यांनी त्या काळात उचललेलं हे पाऊल ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं ठरतं.’’ ज्ञानेश्‍वरचं हे उत्तर ऐकून त्याच्या या आकलनाचं मला खूप कौतुक वाटलं.

नेवासा हे खरं ज्ञानपीठ आहे. ज्ञानेश्‍वरांनी इथं ज्ञानेश्‍वरी लिहिली आणि मराठीत वैचारिक वाङ्मयाची भर घातली. आज आपण समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या मूल्यांचा स्वीकार केला आहे. ही सगळी सूत्रं तेव्हाच्या परिभाषेत मांडण्याचं धाडस संतांनी केलं. तत्त्वज्ञान सगळ्यांना खुलं झालं पाहिजे, अमुक एका वर्गापुरतंच ते मर्यादित राहायला नको, ही ती तेव्हाची परिभाषा होती. ही परिभाषा व्यापक होत होत लोकशाही व्यवस्थेपर्यंत आपण आलो आहोत. माणूस म्हणून जगण्या-वागण्याची भाषा आज आपण करू लागलो आहोत. या सगळ्याचा एक उगम नेवासा इथूनही सांगता येतो.

0 Shares
पाऊले चालती... महामाउली