पाऊले चालती…

मोतीराम पौळ

पैठणच्या धर्मपीठानं निवृत्तीनाथादी भावंडांवर अन्याय केला, ही भावना सर्वत्र पसरली. आपल्या विद्वत्तेनं धर्मठकांची बोलती बंद करणारी ही भावंडं पैठणहून निघाल्यावर ‘सेलिब्रिटी’ बनली. आळंदीला परतताना वाटेत जागोजागी त्यांचं जंगी स्वागत झालं. त्या वाटेनं या भावंडांच्या आठवणी अजून जपून ठेवल्यात

पैठणच्या शुद्धीपत्रकाच्या घटनेनंतर निवृत्तीनाथादी भावंडं ‘त्या’ वेद बोलणार्‍या रेड्याला सोबत घेऊन आळंदीला निघाली. वाटेत नेवासा लागलं. ही मंडळी तिथं थांबली. ज्ञानेश्वरांनी तिथल्या करविरेश्‍वराच्या मंदिरातील ‘पैस’ खांबाला टेकून निवृत्तीनाथांच्या आदेशानं ज्ञानेश्‍वरी लिहिली आणि पुन्हा लवाजम्यासह आळंदीला निघाले. त्यांच्या त्या प्रवासाचा मागोवा घेण्यासाठी एका भल्या सकाळी सकाळी उठून एसटीनं आळेफाट्याचा रस्ता धरला. पुणे-नाशिक महामार्ग क्रमांक ५० वरील नारायणगावच्या पुढं १५ किलोमीटरवरचं आळे हे गाव. मृग नक्षत्राला सुरुवात होऊन दहा-बारा दिवस उलटले होते. पावसाचा पत्ता नव्हता. वांझ पांढर्‍या ढगांनी आकाश व्यापलं होतं. ‘ट्रॅक्टर’नं नांगरलेली शेतं उन्हात तापत पडली होती. बाया-माणसं शेतात मशागतीची कामं करताना दिसत होती. मधेच कोरडे पडलेले कॅनॉल लागायचे. रिकाम्या वावरात शेळ्या-मेंढ्यांचे कळप गवत शोधताना दिसायचे. पावसाच्या ढगांना पळवून लावणारं वारं भरा-भरा सुटलेलं. एरवी सुजल-सुफल असणार्‍या या भागावरही यंदा दुष्काळाची छाया दिसत होती. सकाळी ९च्या सुमारास आळेफाट्यावर पोचलो. आळे गावच्या माधवराव भुजबळ गुरुजींना फोन केला. गुरुजी काही वेळातच तिथं दाखल झाले. त्यांनी विविध माहिती, संदर्भ आणि लोकांचे फोन नंबर दिले. पुन्हा भेटूत म्हणून गुरुजी काही कामासाठी पुण्याकडं रवाना झाले. मीही आळे गावाकडं निघालो. आळे गाव तिथून दोन किलोमीटरवर आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणं चौकशी करत अॅडव्होकेट दत्ता भागवत यांच्या घरी पोचलो. त्यांनी स्वागत केलं. मग आमच्या गप्पा रंगल्या.

ते सांगू लागले, नेवासा इथं ज्ञानेश्‍वरी लिहिल्यानंतर लेखक सच्चिदानंदबाबा आणि वेद म्हणणारा ज्ञानोबा नावाचा रेडा आणि त्यांचा मालक वाकोबा यांच्यासह निवृत्तीनाथ आणि भावंडं आळंदीकडं निघाली. हा लवाजमा मुक्कामासाठी आळे गावात थांबला. इथंच रेड्याच्या विनंतीवरून माउलींनी त्याला स्वहस्ते समाधी दिली. हे ठिकाण गावापासून दोन किलोमीटरवर आहे. कालांतरानं म्हसोबा म्हणून लोक या समाधीच्या दगडाला शेंदूर फासू लागले. दोनशे वर्षांपूर्वी गावकर्‍यांनी हा शेंदराचा चारेक फुटांचा थर फोडला तर त्याखाली रेड्याचं मुख आढळलं. त्यानंतर पंचक्रोशीतील लोक ज्ञानेश्‍वरांनी वेद म्हणायला लावलेल्या रेड्याच्या या समाधीच्या दर्शनाला येऊ लागले. १९५५मध्ये या ठिकाणी ज्ञानेश्‍वर महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. गावातील सावकार बाबूराव शेटे आणि गावकर्‍यांनी त्यावर मोठं मंदिर बांधलं.

ही माहिती सांगत असतानाच अॅड. भागवत यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांच्या संदर्भातलं हे महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे; पण देहू-आळंदीच्या तुलनेत त्याला फारसं महत्त्व मिळालेलं नाही. वारकरी संप्रदायातील अनेकांना हे तीर्थक्षेत्र माहितही नव्हतं; पण, अलिकडं या क्षेत्राची प्रसिद्धी होत आहे. आता यात्रेला, पालखी सोहळ्याला महाराष्ट्रभरातून लोक येत आहेत. शिवाय महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणाला तीर्थक्षेत्र विकासाचा ‘क’ दर्जा दिला आहे. त्या माध्यमातून इथं आता भक्त निवासाचं बांधकाम सुरू आहे. मंदिर ट्रस्ट, आळे ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या मदतीनं मंदिराचा विकास सुरू आहे.

१९८८ मध्ये गावकर्‍यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं. मंदिराला एक गुंठा जमीन दान करण्याचं आवाहन गावातल्या लोकांना करण्यात आलं. त्यातून मंदिराच्या सभोवतालची तब्बल १६७ गुंठे जमिनीची खरेदी केली गेली. अॅड. भागवत यांच्याकडं ज्ञानेश्‍वर महाराज मंदिराच्या ट्रस्टचं अध्यक्षपद आल्यानंतर २३ फेब्रुवारी १९९६ रोजी मंदिराचा शिखर जीर्णोद्धार झाला. १३ दिवसांचा मोठा सोहळा झाला. त्यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार सहभागी झाले. गावकर्‍यांनी लक्ष भाविकांना भोजन घातलं.

प्रत्येक वर्षी चैत्र वद्य एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशीला आळ्याला यात्रा भरते. ही या परिसरातील सर्वात मोठी ‘प्रापंचिक यात्रा’ म्हणून प्रसिद्ध आहे. शेतीची लाकडी अवजारं, जीवनोपयोगी सर्व साहित्य या जत्रेत मिळतं. या वेळी ‘हगामा’ म्हणजे कुस्त्यांचा मोठा आखाडा भरतो. तीन दिवसात अखंड हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, काकड आरती असे धार्मिक कार्यक्रम पार पडतात. तिसर्‍या दिवशी काल्याच्या कीर्तनानं ही यात्रा संपते. त्याचबरोबर वर्षभरातील शुद्ध एकादशीला आळे ग्रामस्थ आणि वद्य एकादशीला पंचक्रोशीतील १२ गावांचा प्रत्येकी एक याप्रमाणं पूजेचा मान असतो. दुसर्‍या दिवशी द्वादशीचा महाप्रसाद म्हणून सर्वांना भोजन घालतात. वर्षातून दोन वेळा तसंच महाशिवरात्री आणि अधिक मासातही इथं अखंड हरिनाम सप्ताह होतो.

देवस्थान ट्रस्टनं प्रशासनाच्या सोईसाठी काही विभाग केले आहेत. भंडारा विभाग, पालखी विभाग, हगामा विभाग आणि अंबाबाई विभाग या चार विभागांतर्फे इथं विविध कार्यक्रम साजरे होतात. गावातील एखाद्या समाजाकडं किंवा सारखी आडनावं असलेल्या लोकांकडं एकेका विभागाची जबाबदारी सोपवली आहे. अॅड. भागवत माहिती देत असताना त्यांच्यासोबत बसलेले शांताराम नामदेव राईंज हे ६७ वर्षांचे आजोबा आठवून आठवून जुन्या घटना सांगत होते.

भागवत यांचा निरोप घेऊन मंदिराकडं निघालो. आळे गाव १० ते १२ हजार लोकवस्तीचं. मोडकळीस आलेले मातीचे वाडे, छपराची घरं, पडक्या भिंती गावाच्या जुनेपणाची साक्ष देत होत्या. या सोबतच गावात अत्यंत साधी, धोतर, लुगडी नेसलेली, म्हातारी माळकरी माणसं, दिसत होती. गावाबाहेर दोन किलोमीटरवरच्या रेड्याच्या समाधी मंदिराकडं जाण्यासाठी शांताराम आजोबांनी एका मोटरसायकलवाल्या शेतकर्‍याला विनंती केली. त्याच्या मोटरसायकलवर बसून मी मंदिराकडं आलो. परिसरात शुकशुकाट होता. ट्रस्टच्या कार्यालयात जाऊन पोचलो. तिथं पाच व्यक्ती बसल्या होत्या. त्यांच्यात कसला तरी हिशोब चालू होता. मी येण्याचं कारण सांगितलं. शिवाय ‘रिंगण’चा अंकही दाखवला. बसलेल्या एका व्यक्तीनं माझ्याकडे पाहून, आमचं झाल्यावर तुमच्याशी बोलतो, अशी खूण करत मला बसायला सांगितलं. माझ्या हातात आषाढी वारीचं माहितीपत्रक टेकवलं. काही वेळानं दर्शन घेऊन येतो म्हणून मी तिथून सुटका करून घेतली.

मंदिरात गेलो. गाभार्‍यात माउलींची सुंदर मूर्ती. मागं विठ्ठल-रखुमाई आणि समोर रेड्याची दगडाची समाधी. शांत वाटलं. सभामंडपातील दोन-तीन म्हातारे कोपर्‍यात बसले होते. एक जण झोपलेला होता. बबन शेलार नावाचे ७०-७५ वर्षांचे विणेकरी वीणा घेऊन पहारा देत होते. सुमारे दोनशे वर्षांपासून हा वीणा खाली ठेवलेला नाही. शिवाय नंदादीपही अखंडपणे तेवतो आहे, असं त्यांनी सांगितलं.

कोपर्‍यात बसलेल्या तुकाराम दगडू सहाने या ८५ वर्षांच्या बाबांजवळ जाऊन बसलो. त्यांनी गप्पा मारल्या. त्यांचा जन्म मंदिराशेजारचाच. बाजूला त्यांची शेती आणि घर होतं. मुलगा मुंबईला आहे. मुलाकडं राहायला मुंबईला गेले होते; पण मुंबई मानवेना म्हणून गावाकडं परतले. आता माउली हेच त्यांचं सर्वस्व. शरीरयष्टी अजून खणखणीत. गळ्यात तुळशीची मोठी माळ. ते मंदिरात देणगी पावत्या फाडण्याचं काम करतात. मंदिराबाबत विचारल्यावर, त्यांच्या आजोबा-पंजोबांनी सांगितलेल्या अनेक जुन्या आठवणी त्यांनी सांगितल्या. दीड-दोनशे वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातील कान्हूर पठारचे पंढरीनाथबुवा आणि हनुमंतबुवा यांना आळ्यात रेड्याची समाधी असल्याचा साक्षात्कार झाला. ते आळ्याला आले. त्याअगोदर गावकरी रेडा समाधीला म्हसोबा म्हणून शेंदूर लावायचे. कोंबडं-बकरं कापायचे. त्यांनी गावकर्‍यांना हे सर्व बंद करायला लावलं. शेंदरा-मातीत असलेली जागा साफ केली. तिथं दगडाची समाधी दिसायला लागली. तिची नीट पूजाअर्चा केली. मग लोक तिला गेणुबा म्हणायला लागले. त्या दोघांनीच गावकर्‍यांच्या मदतीनं समाधीवर छोटं मंदिर बांधलं. गावात साक्षात माउलींच्या रेड्याची समाधी असल्यानं परिसरातील लोक औताला रेडे जुंपत नाहीत. तशा अनेक प्रथा-परंपरा आळे गाव आणि पंचक्रोशीत आहेत. म्हशीचं रेडकू जगत नसेल तर एक रेडकू इथं देवाला आणून सोडतात. मग त्यानंतरची सगळी रेडकं जगतात, असं लोक सांगतात.

संतांचा वास ज्या ठिकाणी असतो त्या परिसरावर, समाजावर चांगले संस्कार कसे घडतात, याचं एक उदाहरण आळ्यात पाहायला मिळालं. इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून बाहेर पडलेल्या मुलांना गीतेतील संस्कृत अध्याय मुखोद्गत आहेत. याचं संपूर्ण श्रेय माधवराव भुजबळ गुरुजींना. गुरुजी म्हणजे, पंचाहत्तरीतही तरुणांना मागं टाकणारं उत्साही व्यक्तिमत्त्व. ते शेतात, गाईगुरांमध्ये राबता राबता संतसाहित्याचा अभ्यास करतात. तसंच योगाचा प्रसार  करतात. त्यांनी आपल्या गीतापठण उपक्रमाची माहिती सांगितली. १९६८-६९मध्ये आळंदीत एक परिषद भरली होती. सोनोपंत दांडेकरमामा आणि इतर मान्यवर, अभ्यासक परिषदेला उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार वसंतराव काणे हे अध्यक्ष होते. त्यांनी मनोगतात एक खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आळंदीत येऊन मराठवाडा, विदर्भातील मुलं संस्कृत गीता पाठ करतात. त्यांचे उच्चार शुद्ध होतात; पण आळंदी आणि परिसरातील स्थानिक मुलांना मात्र गीतेतील एकही श्‍लोक पाठ नाही. त्यासाठी मी ७०० गीता आळंदीतील शिक्षकांना देतो. शिक्षकांनी मुलांना गीता शिकवावी.’ त्याप्रमाणं शिक्षकांनी प्रयत्न केले; पण हा प्रयोग यशस्वी झाला नाही. तेव्हा भुजबळ गुरुजी आळंदीत शिक्षक होते. पुढं १९८४मध्ये आळ्याच्या शाळेत त्यांची बदली झाली. तेव्हा जिल्हा परिषदेची शाळा रेडा समाधी मंदिराच्या बाजूच्या खोल्यांमध्ये भरायची. वसंतराव काणे यांची खंत आपण दूर करायची, असा ‘पण’ त्यांनी केला. त्यानुसार त्यांनी शाळेत गीतापाठाचा उपक्रम सुरू करायचं ठरवलं. सहकारी शिक्षक, मुख्याध्यापकांशी चर्चा केली. सकाळच्या परिपाठाच्या वेळी रोज १५ मिनिटं द्यायची, असं ठरलं. सोप्या वाटणार्‍या १५व्या अध्यायापासून शिकवायला सुरुवात केली. घरी-दारी संस्कृतचा गंधही नसणार्‍या या मुलांना गुरुजी १५ दिवस फक्त एकच शब्द शिकवत होते; पण मुलांचीही जिद्द अशी की, वर्षभरात शाळेतील सर्व मुलांना गीतेचा नववा, बारावा आणि पंधरावा अध्याय मुखोद्गत झाला. शिवाय उच्चारही अगदी स्पष्ट आणि शुद्ध. बाहेरून आलेल्या लोकांना इथं संस्कृत पाठशाळा असल्याचा भास व्हायचा. रेडा मंदिर शाळेतल्या या गीतापठणाची चर्चा महाराष्ट्रभर झाली. मनःशांतीसाठी लोकं मंदिरात यायचे आणि मुलांच्या तोंडून गीतेचे श्‍लोक ऐकायचे. यात नामवंतही होते. त्यात निळू फुले, केशवराव कबीर महाराज, गुरुजींचे वर्गमित्र आणि माजी कामगारमंत्री साबीर शेख अशी अनेक नावं आहेत. १९८४ ते २००० पर्यंत पाहिली ते पाचवीच्या ४०० मुलांना गीतेतील संस्कृत अध्याय शुद्ध उच्चारांसहित पाठ होते. हा एक चमत्कारच म्हणायला हवा, असं म्हटल्यावर गुरुजी उत्तरले, अहो, ज्ञानेश्‍वर महाराजांनी जिथं रेड्याच्या मुखातून वेद बोलविले, तिथं आपण तर माणसं. शेवटी ही त्यांचीच कृपा. या मातीतही त्यांचा अंश आहेच ना! गीतापठण उपक्रमासाठी भुजबळ गुरुजींना सहकारी शिक्षक वाघोले गुरुजी, कुर्‍हाडे गुरुजी, कांबळे बाई यांची सतत मदत झाली. २०००मध्ये गुरुजी सेवानिवृत झाले. त्यानंतर शिकवण्यासाठी कोणी नसल्यानं हा उपक्रम हळूहळू बंद पडला. निवृत्त झाल्यानंतरही गुरुजी स्वस्थ बसलेले नाहीत. आदर्श शेतकरी म्हणून तर त्यांनी नावलौकिक कमावला आहेच; परंतु एक नामांकित योगशिक्षक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. गुरुजी आळंदीत राहिले. त्यामुळं रोज माउलींचं दर्शन व्हायचं. ज्ञानदेव म्हणजे योगियांचा योगी. त्यामुळं आपणही योग शिकायला पाहिजे, असा त्यांनी ध्यास घेतला. त्यानंतर १९६६ पासून आज वयाच्या पंचाहत्तरीतही त्यांची योगसाधना सुरूच आहे. ते शाळांमध्ये तसंच ठिकठिकाणच्या शिबिरांमध्ये जाऊन योगा शिकवतात.

श्रीक्षेत्र आळे येथील वेदप्रणीत रेडा संजीवन समाधी मंदिरातून पंढरपूरसाठी पायी पालखी सोहळा निघतो. पालखीमध्ये मंदिरातील रेड्याचा चांदीचा मुखवटा ठेवला जातो. या पालखीत आळे, कोळवाडी, संतवाडी आदी परिसरातील गावकरी सहभागी होतात. पालखी मार्गावर नागरिक रांगोळी रेखाटतात. घरांवर गुढी उभारतात. हा सोहळा एक महिन्याचा असतो. आळे, पारगाव, हाजी टाकळी, रामलिंग, निमोणे, इनामगाव, दौंड, भिगवण, पळसदेव, वनगळी, टेंभुर्णी, कुरकंभमार्गे पंढरपूर असा ही पालखी प्रवास करते.

मी काहिसा भारावूनच आळं गाव सोडलं. आता मला जायचं होतं, चास-नारोडीला. जिथं निवृत्तीनाथादी भावंडांनी वेदमंत्र रेड्याचा दशक्रिया विधी केला होता. चिंचोली फाट्यावरून एका काकांनी बाईकवर चासमध्ये सोडलं. रेडा मंदिर कुठं आहे, असं त्यांना विचारलं. त्यांनी गावाच्या बाहेर दोन किलोमीटर जायला सांगितलं. मी मंदिराकडे चालतच निघालो. सूर्य मावळतीकडं निघाला होता. गाईगुरं, माणसं शेतातून घरी निघाली होती. घरट्याकडं परतणारी पाखरं किलबिलाट करत होती. घोडनदी खडकांमधून खळखळ करत वाहत होती. या नयनरम्य दृश्यानं मन प्रसन्न केलं. तितक्यात मंदिरातून घराकडं निघालेले शिवाजी भिवाजी बारवे काका भेटले. त्यांनी मंदिराबद्दल प्राथमिक माहिती सांगितली. शिवाय आम्ही मंदिरावर विशेषांक काढला आहे, तो पुजार्‍याकडं मिळेल, असंही म्हणाले. त्यांचा निरोप घेऊन मंदिरात पोचलो. पुजारी गावात गेले होते. त्यांच्या खोलीला कुलूप होतं. तोपर्यंत मी मंदिर पाहून घेतलं. घोडनदीकाठी उभारलेलं छोटंसं पण सुबक मंदिर. मंदिरात ज्ञानेश्‍वर महाराजांची मूर्ती आहे. बाहेर मंदिराकडं तोंड करून बसलेली रेड्याची मूर्ती आहे. गावकर्‍यांनी इथं कोंडाजीबाबा डेरे यांचीही मूर्ती बसविली आहे. वैशिष्ट्य म्हणजे मुख्य मंदिराच्या पुढे नदीकाठी मुक्ताबाईंचंही छोटं मंदिर आहे. सूर्यास्ताची वेळ, बाजूला वाहणारं नदीचं निव्वळशार पाणी. परिसरात नीरव शांतता आणि माउलींचं सान्निध्य. परम शांती देणारा अनुभव. मंदिरासमोरील चबुतर्‍यावर एक आजोबा हरिपाठ वाचत बसले होते. त्याचं नाव गणपत येवले. ८१ वर्षांचे हे आजोबा तब्येतीनं ठणठणीत होते. गळ्यात तुळशीची माळ. कपाळाला गंध. त्यांना मंदिराबद्दल विचारलं. ते पोथी बाजूला ठेवून माझ्याशी बोलू लागले. आळ्यामध्ये रेड्याला समाधी दिल्यानंतर माउली आणि त्यांच्या भावंडांनी रेड्याचा दशक्रिया विधी करायचं ठरवलं. यासाठी ते दक्षिणवाहिनी नदीचा शोध घेऊ लागले. तशी नदी त्यांना चास गावी आढळली. या ठिकाणी घोडनदी ९० अंशात वळते. मग याच ठिकाणी या भावंडांनी रेड्याचा दशक्रिया विधी केला. या जागीही रेड्याची समाधी बांधली गेली. कालांतरानं लोक या समाधीला म्हसोबा म्हणू लागले. संस्कृत शब्द ‘महिशा’चा अपभ्रंशानं ‘म्हसोबा’ झाला, असं म्हटलं जातंय. ही समाधी एकदा महापुरात वाहूनही गेली होती. नंतर या जागेवर १९४७मध्ये जुन्नरचे वारकरी संप्रदायातील कोंडाजीबाबा डेरे यांनी ज्ञानेश्‍वरांची मूर्ती स्थापन केली. ती पुरात वाहून जाऊ नये म्हणून तीवर माशाच्या आकारातील छोटा घुमट बांधला. तरीही पावसाळ्यात पुराचा तडाखा मंदिराला बसू लागलाच. त्यानंतर चासच्या ग्रामस्थांनी त्याच ठिकाणी भराव टाकून, आताचं हे सुंदर मंदिर बांधलं.

गुढीपाडवा ते चैत्र पोर्णिमा या दरम्यान येथे सप्ताह होतो. भजन, कीर्तन, प्रवचन, काकड आरती असे धार्मिक कार्यक्रम होतात. रोज सायंकाळी मंदिरात येऊन हरिपाठ, नामस्मरण हा या आजोबांचा नित्यक्रम. मधेच काहिसं आठवून म्हणाले, पुण्याला जाणार असशील तर, लवकर निघ. कारण मंचरला जाणारी शेवटची बस गावात गेलीय. ती येण्याचा वेळ झालाय. बघ, तुझी काळजी माउलींनाच. कारण संध्याकाळी साडेसहानंतर इथून बस नाही. तुला इथं मुक्कामच करावा लागला असता. मग मीही माउलींना नमस्कार करून निघालो. गाडीत बसल्यावर वाटलं, माउलींवर श्रद्धा ठेवून अत्यंत साधेपणानं पण आनंदानं जगतात ही माणसं. निवृत्तीनाथ-ज्ञानदेवांनी सांगितलेले विचारच जगतायत जणू.

तिसरं ठिकाण होतं नारायणगाव. पुणे-नाशिक हायवेवरचं मोठं व्यापारी गाव. जुन्नर, शिवनेरीला किंवा लेण्याद्रीवर जायचं म्हटलं तरी नारायणगावातूनच जावं लागतं. आशिया खंडातील मोठी खगोल दुर्बीण नारायणगावजवळच्या खोडद गावी आहे. हे नारायणगाव महाराष्ट्रात द्राक्षांसाठी आणि दुसरं म्हणजे तमाशासाठी प्रसिद्ध आहे.

निवृत्तीनाथ आणि भावंडांच्या पैठण ते आळंदी या प्रवासात नारायणगाव हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. इथं मुक्ताबाईंची महाराष्ट्रातील एकमेव अशी चतुर्भुज मूर्ती आहे. तर मुक्ताबाई मंदिराच्या बाजूलाच काळोबा महाराजांची दगडाची समाधी आहे. हे काळोबा म्हणजे ज्ञानोबा रेड्याचे मालक. मुक्ताबाई नारायणगावचं ग्रामदैवत आहे. या स्थानाचं महत्त्व असं की, लहानग्या मुक्ताबाईनं इथं लोकांना ज्ञानदेवांनी नेवासे इथं लिहिलेली ज्ञानेश्‍वरी स्वतः वाचून दाखवली. थोडक्यात ज्ञानेश्‍वरीचं पारायण केलं. मुक्ताबाई गावातील हरिस्वामी मंदिरात गेल्या होत्या. तिथं त्यांना दृष्टांत झाला आणि त्यांनी काळोबांना म्हणजे रेड्याच्या मालकाला चतुर्भुज जगदंबेच्या रूपात दर्शन दिलं. ज्ञान दिलं. या मंदिराचा जीर्णोद्धार १८१८मध्ये करण्यात आला. त्यानंतर परत २००२मध्ये काळोबा महाराजांच्या मंदिराचा तर २०११ साली मुक्ताई मंदिराचा जीर्णोद्धार करून सध्याचं भव्य मंदिर बांधलं, असं मुक्ताई, काळोबा देवस्थान ट्रस्टचे महाव्यवस्थापक महेश जाधव सांगत होते.

मुक्ताईदेवीची नवरात्रांमध्ये नऊ दिवस यात्रा भरते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ही यात्रा प्रसिद्ध आहे. ‘तमाशाची पंढरी’ म्हणून नारायणगावची महाराष्ट्रात विशेष ओळख आहे. यात्रा काळात मुक्ताईपुढं मोफत तमाशा सादर करणं हे तमाशा क्षेत्रात मानाचं आणि भाग्याचं समजलं जातं. म्हणून महाराष्ट्रातील सर्व फडमालक यात्राकाळात इथं मुक्ताईचरणी कला सादर करतात. देवीला नारळ फोडूनच तमाशा फडमालक गावोगावच्या खेळांच्या सुपार्‍या घेतात.

मुक्ताईदेवीची दर मंगळवारी भजन, आरती असते. दर एकादशीला भजन, कीर्तन, प्रवचन होतं. तर श्रावण महिन्यात इथं ज्ञानेश्‍वरी पारायण होतं. चैत्र एकादशी ते वैशाख शुद्ध यादरम्यान यात्रा उत्सव भरविला जातो. त्यावेळी महाराष्ट्रातून ५ ते ७ लाख भाविक इथं भेट देतात. या देवस्थानला शासनाकडून तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा मिळाला आहे.

मुक्ताबाईच्या यात्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेत सर्व धर्मीय नागरिक सहभागी होतात. गावातलं आत्तार हे मुस्लीम धर्मीय कुटुंब मुक्तादेवीच्या पुढं फटाक्यांची आतषबाजी करतं. हा त्यांचा पिढ्या न् पिढ्याचा मान आहे. ही आतषबाजी ते पदरखर्चानं करतात. त्यासाठी ते काही लाख रुपये खर्च करतात. ही आतषबाजी पाहण्यासाठी इथं प्रचंड गर्दी होते.

नारायणगावात मुक्ताईचं दर्शन घेऊन पुढं निघाल्यावर या भावंडांच्या पाऊलखुणा जपणारं एक महत्त्वाचं ठिकाण लागतं, ते म्हणजे चाकणजवळचं वाकी खुर्द हे गाव. इथंही ज्ञाना रेड्याचा मालक वाकोबा कोळ्याची समाधी आहे. चाकणपासून नाशिककडं जाताना तीन किलोमीटरवर हे ठिकाण लागतं. गावची लोकसंख्या दीड हजारांच्या आसपास. गावाशेजारून भीमा नदी वाहते. हायवेच्या उजव्या बाजूला वाकोबाचं छोटं मंदिर आहे. मंदिरात प्रवेश केला. मंदिरात पुजारी नव्हते. मंदिर परिसरात पंढरपूरला निघालेली कर्नाटकातील एक दिंडी मुक्कामी थांबली होती. मी एका मुलाकडं मंदिराबाबत चौकशी केली. त्यानं मला वाकोबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अनिल जाधव यांचं जवळच असलेलं घर दाखवलं. तिथं अॅड. जाधव भेटले. मंदिराविषयी त्यांनी बरीचशी माहिती दिली.

वाकोबाचं मूळ नाव गहिबीराय. कोळी समाजाचा हा गहिबीराय पैठण घाटावरून पखालीनं घरोघर पाणी घालायचा. रोजच्या कामानं तो कमरेत वाकला होता. म्हणून लोकं त्याला ‘वाकोबा कोळी’ म्हणायचे. त्याच्या रेड्याच्या मुखातून ज्ञानदेवांनी वेद बोलवल्यानंतर तोही रेड्याला घेऊन माउलींसोबत आळंदीला निघाला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, सच्चीदानंद बाबा, वाकोबा कोळी हे सर्व जण चास येथे रेड्याचा दशक्रिया विधी आटोपून भीमाशंकर जोतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गेले. तिथून नंतर सर्व जण नारायणगावला आले. त्या ठिकाणी काही दिवस राहून मुक्ताबाईंनी वाकोबा कोळ्याला अनुग्रह दिला आणि त्याला ज्ञान प्राप्त झालं. काही दिवस तिथं राहिल्यानंतर पुढं ते वाकी खुर्द इथं आले. इथं वाकोबा कोळ्यानं देह ठेवला. या ठिकाणी सर्व जण १० दिवस राहिले. वाकोबांचा दशक्रिया विधी केला. सुरुवातीला इथं वाकोबांच्या समाधीची फक्त शिळा होती. १० वर्षांपूर्वी त्यावर मंदिर बांधण्यात आलं. त्यात माउलींची तसंच विठ्ठल-रुक्मिणी यांची मूर्ती आहे. हायवेच्या डाव्या बाजूला आणि वाकोबांच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला माउली जिथं राहिले, त्या ठिकाणी ज्ञानेश्‍वर महाराजांचं मंदिर आहे. इथं फाल्गुन महिन्यात शुद्ध द्वितीया ते सप्तमी असा पाच दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह होतो. भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ असे अनेक कार्यक्रम होतात. सप्ताहात अन्नदान केलं जातं. कार्तिकी एकादशीला आळंदीला काळोबा महाराजांची दिंडी जाते. त्याचबरोबर बाहेरून आलेल्या कुठल्याही दिंड्यांना राहण्याची, पाण्याची सुविधा उपलब्ध केली जाते. जाधव यांनी या मंदिराचं बांधकाम केलं आहे. मंदिरातील पूजा त्यांचे कुटुंबीय करतात. आता मंदिराचा ट्रस्ट स्थापन झाला आहे. या देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी शासनाकडे प्रयत्न सुरू आहेत, असं अनिल जाधव म्हणाले.

या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथला अजान वृक्ष. मंदिराभोवती लहान-मोठे असे सुमारे १००हून अधिक अजान वृक्ष आहेत. जणू अजान वृक्षाचं बेटच. ज्या ठिकाणी माउलींचा वास असतो, त्याच ठिकाणी अजान वृक्ष येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. इतरत्र कुठंही हे वृक्ष येत नाहीत, असं अनिल जाधव यांनी सांगितलं. शेवटी त्यांचा निरोप घेऊन आणि वाकोबाचं दर्शन घेऊन पुण्याला निघालो. जाताना डाव्या बाजूला आळंदी फाटा दिसला. मला आळंदीला जायचं नव्हतं. कारण निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई मला वाटेतच भेटले होते. त्यांच्या सोबतच तर होतो मी. आळंदीकडं निघालेली ही भावंडं मला जणू पाठमोरी दिसली. मी हात जोडले. मनोमन साष्टांग नमस्कार केला.

————————-

वाकोबा-काळोबाचा वाद

पैठणच्या घाटावर वेद बोलणार्‍या ज्ञानोबा नावाच्या रेड्याचा मालक वाकोबा कोळी यांनं समाधी कुठं घेतली यावर एकमत नाही. म्हणजे चाकणजवळच्या वाकी खुर्द गावातील लोक म्हणतात, की आमच्या गावातच वाकोबाला समाधी दिली. तर नारायणगावचे ग्रामस्थ म्हणतात ही समाधी नारायणगावातच आहे. शिवाय वाकीला या मालकाला वाकोबा म्हणतात तर नारायणगावला काळोबा! या प्रकरणी आम्ही तीन वर्षांपासून कोर्टात लढतो आहोत, असं नारायणगावचे रामदास अभंग यांनी सांगितलं. नारायणगावला वाकोबांना मुक्ताबाईंनी ज्ञान दिलं. त्याचं प्रतीक म्हणून समाधी किंवा मंदिर बांधलं असेल. पण, नारायणगावहून निघून सर्व भावंडं आणि वाकोबा वाकी इथं आले आणि ज्ञानेश्‍वर महाराजांनी त्यांना इथं समाधी दिली. वाकोबाच्या नावावरुन या गावचा नाव वाकी पडलं, असं वाकीतील वाकोबा समाधी आणि ज्ञानेश्‍वर महाराज मंदिराचे अध्यक्ष अॅड. अनिल जाधव यांनी सांगितलं.

0 Shares
नागघाट माणुसकीचं उगमस्थान