नागघाट

संदीप जगदाळे

निवृत्तीनाथादी भावंडांना कर्मठ धर्मपीठानं जिथं शुद्धीपत्रक देणं नाकारलं, त्या धर्मक्षेत्र पैठणमधूनच या भावंडांचा उत्कर्ष सुरू झाला. त्या घटनेची साक्ष देत पैठणचा नागघाट अजूनही उभा आहे. त्या वेळी या भावंडांच्या जयजयकारात दुमदुमून गेलेली पैठणनगरी आजही त्यांचे समन्वय, समतेचे विचार जपते आहे की, त्यांना विसरून गेलीय?

या गावाच्या वाटा जन्मापासूनच माझ्या पायाला बिलगलेल्या. गावात वावरत असताना अनेक भास सतत होत राहतात. एकाच वेळी आपण अनेक कालखंडांत वावरतोय असं वाटत राहातं. कधी वाटतं, ज्या गावाची माती सातवाहनांच्या घोड्यांच्या खुरांसंगे चारी दिशेला पसरली त्या गावात आपण राहात आहोत… कधी ‘गाथासप्तशती’सारखं अनमोल काव्य संकलन मराठीला देणार्‍या सातवाहन राजा हाल याच्या संस्कृतीसंपन्न राजधानीचे आपण नागरिक आहोत असं वाटतं. एकादशीला वेगवेगळ्या वारकरी मठांमधून कीर्तनाचे सूर ऐकू येऊ लागले की, भानुदास-एकनाथ यांच्या समकाळात आपण जगत आहोत असं जाणवत राहातं. मध्येच आठवण येते, ‘मर्‍हाटी व्हावे’ असं निक्षून सांगणार्‍या चक्रधर स्वामी यांच्या पैठण येथील रहिवासाची. याचबरोबर अगदी अलीकडच्या काळातला एक माणूस डोळ्यासमोर येतो. आजच्या पैठणच्या शेजारीच असणार्‍या गोदावरीच्या हजारो वर्ष गाळाखाली दबून पडलेल्या ‘पालथ्या नगरीत’, उन्हातान्हात फिरणारा, जुनाट मडक्यांच्या खापरांपासून ते हजारो वर्षांपूर्वी रोममधून पैठणपर्यंत आलेल्या सुरईपर्यंतच्या हजारो प्राचीन वस्तू शोधत, असंख्य जुनाट कागदपत्रं धुंडाळत पैठणचा इतिहास जगासमोर आणणारा, गांधी टोपी, पांढरेशुभ्र धोतर अन् सदरा या वेशातला अस्सल इतिहास संशोधक-बाळासाहेब पाटील.

हजारो वर्षांपासूनच्या इतिहासाच्या खाणाखुणा घेऊन एक वैभवशाली भिंत इथं राहाणार्‍या प्रत्येकाच्या पाठीमागं उभी आहे. तिच्या अंगावरच्या त्या खाणाखुणा माझ्याही अंगावर उमटल्यात.

इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून ते इसवी सनाच्या तिसर्‍या  शतकापर्यंत, एक सहस्त्रभर राजधानीचा दर्जा लाभलेले हे नगर! अगदी बुद्धकाळापासून या नगराचं अस्तित्त्व आहे. वेगवेगळ्या काळात वेगवेगळी नावं धारण करून हे गाव नांदत होतं. ‘पईटन’, ‘पत्तिनान’, ‘पेतनिक’, ‘पट्टन’, ‘जयजैत्रपट्टन’, ‘प्रतिष्ठानपूर’, ‘पोयनूर’, ‘सुप्रतिष्ठित’ अशा अनेक नावांनी या गावाचा उल्लेख होत होता. बौद्ध वाङ्मयातील जातक कथांमध्ये पैठणचा उल्लेख ‘प्रतिष्ठान’ असा येतो. सातवाहन राज्याची अतिवैभवसंपन्न राजधानी म्हणूनही पैठण इतिहासात प्रसिद्धच आहे. सातवाहनांनी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील बंदरांना जोडणार्‍या महामार्गांना संरक्षण देऊन पैठण येथील उत्पादित वस्तूंना विशेषत: रेशीमवस्त्र, सुती तलम आणि चिटाचे कापड इत्यादी मालाला रोमन साम्राज्याची बाजारपेठ मिळवून दिली. यामुळे युरोपातील प्रचंड संपत्ती, व्यापाराच्या माध्यमातून सातवाहन साम्राज्याकडे येत होती. अशा या संपन्न नगरीचं चित्र रोमन इतिहासकार टॉलेमी आणि ग्रीक इतिहासकार स्ट्राबो यांनी रंगवलं आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासातही सातवाहनांचं मोठं योगदान आहे. एकट्या सातवाहन कालखंडात महाराष्ट्रात असणार्‍या ९१५ लेण्यांपैकी सुमारे ५५० लेण्या कोरल्या गेल्या. गुणाढ्याची ‘बृहद्कथा’, ‘वासुदेव हिम्डी’, ‘उदयसुंदरी’, ‘लीलावई’, ‘कथासरित्सागर’, ‘सिंहासन बत्तीशी’, ‘वेताळ पंचविशी’ आदींमधील कथानकं पैठणभोवतीच गुंफलेली आहेत. साहजिकच या नगराच्या वैभवाचं प्रतिबिंब काव्यामध्येही पडलं आहे. यादवकालीन कवी नागराज याचा ‘प्रतिष्ठानवर्णन’ हा काव्यसंग्रह असो की, अलीकडच्या काळातील कवी गजमल माळी यांचा ‘उद्ध्वस्त प्राचीन नगरी’ हा काव्यसंग्रह. यांमधून पैठणच्या वैभवाचे दाखले मिळत राहातात.

महाराष्ट्राच्या समाजजीवनावर ज्या वारकरी संप्रदायाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे, त्या वारकरी संप्रदायाचा पाया उभारणीची स्फूर्तिदायक घटना पैठणमध्येच घडली. ती घटना म्हणजे, संत निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांचं शुद्धीपत्रक प्रकरण.

दक्षिणेत पैठणला ‘धर्मपीठ’ म्हणून सार्वजनिक मान्यता होती. प्राचीन प्रतिष्ठान नगरीत वैदिक धर्माची स्थापना झाल्यानंतर काही कालखंडानंतर इथं श्रोत्र धर्माचं केंद्र विकसित झालं. या परिसरात अनेक गुरुकुलांचा विकास झाला. गोदावरीच्या काठावर वसल्यामुळं पैठण तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं. सातवाहनांची राजधानी असल्यानं सर्व धर्मांचे प्रसारक पैठणमध्ये स्थायिक झाले. सातवाहनांनी स्वत:च्या वैदिक धर्माबरोबरच जैन, बौद्ध या धर्मांना उदार आश्रय दिला होता. त्यामुळं इथं धर्माचं शिक्षणकेंद्रं सुरू झालं. यातून पुढं धर्मपीठांची निर्मिती झाली.

धर्मांतर वादविवादाचं निरसन करण्यासाठी सार्‍या देशभरातून पैठणला धर्माचार्यांचं आगमन होत असे. येथील धर्मपीठाला यादवांच्या काळात मोठ्या प्रमाणात राजाश्रय मिळाला. असं म्हणतात की, यादवांच्या राज्यात देहदंड देण्याचे अधिकार फक्त दोघांनाच होते. एक म्हणजे स्वत: देवगिरीचा यादव राजा अन् दुसरं म्हणजे पैठणचं धर्मपीठ. यावरून त्या काळात धर्मपीठाला असणारं अनाठायी महत्त्व लक्षात येतं.

निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत यांनी संन्यास घेतला होता; पण गुरूच्या आज्ञेवरून ते पुन्हा गृहस्थाश्रमात आले. यानंतर त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई अशी चार अपत्यं झाली. विठ्ठलपंतांनी संन्यास घेऊन पुन्हा संसारात येणं हे मनुस्मृतीनं आखून दिलेल्या चार आश्रमांच्या चौकटीत बसणारं नव्हतं. ते कर्मठ धर्माच्या विरोधातील कृत्य होतं. मनुस्मृतीत कुमारवयात अध्ययन, तारुण्यात प्रपंच, वृद्धावस्थेत वानप्रस्थान अन् शेवटी संन्यास अशी सर्वसाधारण माणसाच्या जगण्याची चौकट आखून दिली आहे. शिवाय एखाद्याला मधेच संन्यास घ्यायचा झाल्यास तो प्रपंचात अर्थात गृहस्थाश्रमात परत न येण्याच्या अटीवर घेता येत असे; परंतु विठ्ठलपंत संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रमात आले अन् या नंतर त्यांना चार अपत्यं झाली.

पुढे निवृत्तीनाथ आदी भावंडं मोठी झाल्यानंतर त्यांची परंपरेनुसार मुंज करावी, असं विठ्ठलपंतांना वाटू लागलं. मात्र या चार अपत्यांना संन्याशाची पोरं ठरवून त्यांच्या मुंजीस नकार दिला गेला. शेवटी विठ्ठलपंत आणि त्यांची पत्नी रुक्मिणीमाता न्याय मिळवण्याच्या अपेक्षेनं पैठणच्या धर्मपीठाकडं आले. पूर्णपणे कर्मकांडात बुडालेल्या अन् कर्मठ धर्माची पाठराखण करणार्‍या या धर्मपीठाला विठ्ठलपंतांचं गृहस्थाश्रमात परत येणं मान्य असणं शक्यच नव्हतं. धर्मपीठानं या दांपत्याला देहत्याग करण्याचं प्रायश्चित्त सुनावलं. त्यानंतरच निवृत्तीनाथ आदी भावंडांना मुंजीचा अधिकार मिळेल, असं सांगितलं. आपल्या लेकरांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवण्यात येऊ नये, धार्मिक दृष्ट्या त्यांना स्वीकारलं जाऊन त्यांचं जगणं सुकर व्हावं यासाठी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीमाता यांनी देहत्याग केला. भररात्री घरातून निघून जाताना विठ्ठलपंतांनी ‘आपल्या देहत्यागानंतर आपल्या मुलांना स्वीकारलं जावं’, असं विनंतीपत्र लिहून ते ज्ञानदेवांच्या उशाशी ठेवलं.

आईवडिलांविना ही चार पोरं उघड्यावर आली. चारी लेकरांमध्ये सर्वात मोठे असणारे निवृत्तीनाथ यांच्यावर आपोआपच भावंडांची जबाबदारी आली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीमाता यांनी देहत्याग करण्यापूर्वी काही काळ आधी आपल्या चारही मुलांसह ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा केली होती. ही प्रदक्षिणा करत असताना एकदमच निघून जाऊन गहिनीनाथांकडून उपदेश घेणारे निवृत्तीनाथ पुढे तीन-चार वर्षांनी स्वत:च्याच घरासमोर नाथजोग्याच्या वेशात भिक्षा मागण्यासाठी आले. घरात सुरुवातीस त्यांची मुक्ताईसोबत भेट झाली. मुक्ताईनं ब्रह्मगिरी पर्वत प्रदक्षिणेदरम्यान निवृत्तीनाथ निघून गेले तेव्हापासून आईवडिलांचा देहत्याग वगैरे सगळी हकीकत त्यांना सांगितली. यानंतर निवृत्तीनाथांनी आपल्या भावंडांना आपण कधीही सोडून जाणार नाही, असं वचन दिलं अन् ते अखेरपर्यंत निभावलं.

पैठणच्या धर्मपीठानं दिलेल्या आदेशानुसार आईवडिलांनी देहत्याग केल्यानं आपल्याला आता न्याय मिळावा, यासाठी शुद्धीपत्रक मागायला ही भावंडं पैठणमध्ये आली. खरंतर निवृत्तीनाथांचा अशा प्रकारे शुद्धीपत्रकाच्या रूपानं कर्मठ धर्मपीठास शरण जाण्यास विरोध होता. आपल्याला कोणत्याही शुद्धीपत्रकाची गरज नसून आपण चारही भावंडं स्वयंभू आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली. परंतु, ज्ञानेश्वनरांना शुद्धीपत्रक महत्त्वाचं वाटत होतं. कदाचित या मागे आपल्या आईवडिलांचा देहत्याग निष्फळ जाऊ नये, अशी भूमिका असावी. पैठणमधील ब्राह्मण या भावंडांना ‘संन्याशाची पोरं’ म्हणून हिणवत असले तरी या पोरांचं चरित्र आणि ज्ञान यांची चर्चा संपूर्ण नगरीत होती. या भावंडांच्या विद्वत्तेविषयी ईर्षाही निर्माण झाली होती. या संदर्भात ज्ञानेश्ववरांनी ‘रेड्यामुखी वेद वदविल्या’चं मिथकही सांगण्यात येतं.

पैठणनगरीत या भावंडांच्या ज्ञानाची सार्वत्रिक चर्चा होऊ लागल्यानंतर त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी त्यांना नागघाटावर बोलावण्यात आलं. गोदावरीच्या काठावर असणार्‍या नागघाटावर यादवकाळात धर्मसभा भरत असे. निवृत्तीनाथ आदी भावंडं येथे आले असता तिथं असलेल्या एका ब्राह्मणानं ज्ञानदेवांना त्यांचं नाव विचारलं. ज्ञानदेवांनी नाव सांगताच दुसर्‍या ब्राह्मणानं, ‘ज्ञानदेव नाव असणारा तू खरंच ज्ञानी आहेस का?’, असा कुत्सित प्रश्न विचारून घाटावर पखालीनं पाणी भरण्यासाठी आलेल्या रेड्याच्या मालकाला बोलावलं. त्याला त्याच्या रेड्याचं नाव विचारलं. तर त्यानं रेड्याचं नाव ‘ज्ञान्या’ आहे, असं सांगितलं. त्यावर तुझ्याप्रमाणंच या रेड्याच्या नावातही ‘ज्ञान’ आहे, असं म्हणून त्या ब्राह्मणानं ज्ञानदेवांना हिणवलं. त्यानंतर ज्ञानेश्वरांनी त्या ज्ञान्या नावाच्या रेड्याच्या मुखातून वेद वदविले.

या मिथकाच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात येते की; आपल्याकडं संतांचं विभूतीकरण करण्यासाठी सातत्यानं चमत्कारांचा आधार घेण्यात येतो. त्याचाच भाग म्हणून रेड्यामुखी वेद वदविणं अथवा भिंत चालवण्याच्या मिथकांकडे आपण पाहू शकतो. पण, तरीही यातून पैठणच्या सनातनी पंडितांचा दृष्टिकोन समजून येतो.

आपल्या ज्ञानानं सर्व पैठणला अचंबित करणार्‍या आपल्या भावंडांना घेऊन निवृत्तीनाथ धर्मपीठासमोर गेले. विठ्ठलपंतांनी धर्मपीठाला उद्देशून लिहिलेलं पत्र निवृत्तीनाथांनी धर्मपीठासमोर ठेवलं आणि यापूर्वी त्यांनी दिलेल्या निर्णयानुसार शुद्धीपत्रक देण्याची मागणी केली. वर्णाश्रम धर्म पद्धतीच्या स्वीकारातून येणारा उच्चनीच भाव या धर्मपीठास टिकवून ठेवायचा होता. यामुळं धर्मपीठानं पूर्वी दिलेला स्वत:चाच निर्णय नाकारत या भावंडांना कोणत्याही परिस्थितीत शुद्धीपत्रक देण्यास नकार दिला. धर्मपीठासमोर, आपण स्वयंभू आहोत ही ‘स्व’ची प्रखर जाणीव असणार्‍या निवृत्तीनाथांनी नक्कीच बिनतोड युक्तीवाद केला असणार; परंतु तरीही धर्मपीठानं शुद्धीपत्रक देण्याचं मान्य केलं नाही. इथं कॉम्रेड कृष्णा मेणसे यांच्या वाक्याचा थोडा विस्तार करून असं म्हणता येईल, ‘पैठणचे ब्राह्मण या भावंडांना देव मानण्यास तयार होते; परंतु ब्राह्मण मानण्यास तयार नव्हते.’

या सर्व घटनाक्रमाच्या दरम्यान निवृत्तीनाथ एकाच वेळी दोन स्तरांवर संघर्ष करत होते. त्यांचा पहिला संघर्ष धर्मपीठासोबत शुद्धीपत्रक मिळवण्यासाठीचा होता तर, दुसरा स्वत:चाच स्वत:शी असणारा अंतरिक संघर्ष होता. स्वयंभू असण्याची तीव्र जाणीव होती. त्यामुळं धर्मपीठासाठी त्यांच्या मनात खोलवर नकार होता. अशा प्रकारे मानवाला शुद्ध-अशुद्ध ठरवता येत नाही. त्याला त्याच्या जातीधर्मानं उच्चनीच ठरवता येत नाही, ही जाणीव निवृत्तीनाथांना नाथसंप्रदायानं करून दिली. बौद्ध विचारांचा मोठा प्रभाव नाथसंप्रदायावर आहे. बौद्धातील वज्रयान संप्रदायात चौर्‍याऐंशी दक्षांची परंपरा सांगितली आहे. त्याचप्रमाणं नाथसंप्रदायातही चौर्‍याऐंशी दक्षांची परंपरा आहे. गहिनीनाथांच्या माध्यमातून निवृत्तीनाथांमध्ये हा समतेचा विचार पोचला. यातूनच सनातनी धर्मव्यवस्थेला नकार देण्याचं बळ त्यांच्यामध्ये आलं असावं. निवृत्तीनाथांच्या आधीही त्यांच्या घरात नाथसंप्रदायाची परंपरा होती. निवृत्तीनाथांचे पणजोबा त्र्यंबकपंत यांना गोरक्षनाथांचा तसंच आजे गोविंदपंत आणि आजी निराबाई यांना गहिनीनाथांचा अनुग्रह होता.

पैठणच्या धर्मपीठानं शुद्धीपत्रक नाकारल्यानंतर ही भावंडं पुन्हा शुद्धीपत्रकाच्या मागं धावली नाहीत. उलट तिथून पुढं त्यांच्या मनात ब्राह्मणी धर्माविषयी असणारा नकार विद्रोहात रूपांतरीत झाला. निवृत्तीनाथांनी ‘समतेचा संदेश’ देणार्‍या नाथसंप्रदायाची दीक्षा आपल्या भावंडांना दिली. ते एकाच वेळी त्यांचे बंधू, आई, वडील आणि गुरू बनले. आपल्या सर्व भावंडांना त्यांनी योगविद्या शिकवली. यामुळं ज्ञानेश्वरीत (भावार्थदीपिका) योगविद्येवर बरीच चर्चा दिसून येते. या चारही भावंडांना एक जाणीव झाली होती की, धर्माच्या नावानं करण्यात येणारा भेदभाव हा सार्वत्रिक आहे. धर्माच्या असहिष्णूतेचा त्यांना आलेला अनुभव हा कित्येक लोक पिढ्यान् पिढ्या अन

0 Shares
जन्मभूमी पाऊले चालती...