मायबा, कान्होबा

शर्मिष्ठा भोसले

निवृत्तीनाथांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा विस्तार झाला तो नाथ पंथातून. समतेचा विचार सांगणारा हा पंथ महाराष्ट्रात गावोगावी रुजला. त्यांची मूळं शोधण्याचा प्रयत्न ‘टीम रिंगण’ने केला आहे. त्याची सुरुवात नाथ पंथांचा उगमस्थान परिसर असणार्याक मढीपासून...

मी चालत होते ती वाट काही अनवट, अनोळखी नव्हती नक्कीच. झुंजूमुंजू पहाटवेळी या वाटेवरच वासुदेवांनी सुरेल अभंग आळवले असतील. कित्येक साधू-फकीर ‘अलख निरंजन’ची साद घालत हिच्यावरून चालते झाले असतील. केवढ्या तरी अनाम भगत-जोग्यांची धूळभरली पावलं उमटली असतील… मोक्ष म्हणतात तो गवसला नसेलही यातल्या प्रत्येकाला, चकवेही आले असतील कुणाच्या पायांत… मात्र, वाटेचं गारूड काय कमी होत नाहीच…

शतकांपासून आपलं गारूड जनमाणसावर मिरवणारी नाथपरंपरा शोधत मी या वाटेवरून निघालेय. सगळ्या भवतालात भरून वाहणारी प्रतिकूलता. सदोदित दुष्काळ अंगाखांद्यावर वागवणार्‍या मातीत भक्तीचा मळा मात्र बारमाही फुललेला. हरेक गावखेड्यात मंदिरांची रेलचेल. आणि त्यातले बहुतेक जागृत, हमखास नवसाला पावणारे असंच. वाटलं, अभावग्रस्ततेतून भक्तिरसाचा उमाळा येतो आणि भक्ती अभावाला साहण्याचं बळ देते असं हे गणित असावं काहीतरी.

मी नगरहून पाथर्डीला पोचले. तिथून तिसगाव ओलांडून मढीकडं निघाले. रखरखीत उन्हात न्हाऊन निघालेला गर्भगिरीचा डोंगर आता दिसायला लागला. माझ्यासोबत माझा पैठणचा मित्र संदीप जगदाळे असतो. संदीपसाठी इथली सगळी वाटावळणं ओळखीची आहेत. नाथ संप्रदायाचा आदिम विचार त्याला भावतो. पुन्हापुन्हा कडेकपारी-दर्‍याडोंगरात बोलावतो.

त्याच्या गाडीवर आम्ही जवळपास १००० फूट उंचीवर मच्छिंद्रनाथांनी जिथं संजीवन समाधी घेतली त्या स्थानावर पोचतो. इथं जायला पूर्वी एकच दुर्गम रस्ता होता. अवघड पायर्‍यापायर्‍यांनी डोंगर गाठावा लागायचा; पण आता ग्रामसडक योजनेंतर्गत दोन वर्षांपूर्वी पक्का रस्ता झालाय. वर भव्य मंदिर बांधलंय. लोकवर्गणी आणि राजकारण्यांच्या निधीचा सढळ ओघ ट्रस्टला आहे. ‘चलो मच्छिंदर गोरख आया’ची आळवणी करत अनेक भक्तगण आसपास विखुरलेले. कुणी घटकाभर दर्शन घेऊन लगेच निघणारे, तर कुणी आपली दुखणी नाथाकानी सविस्तर घालायला म्हणून महिना-पंधरा दिवसांसाठी मुक्कामी येऊन राहिलेले. आसपास उन्हाचा दाह कमी करणारी खूप सारी रसवंतीगृहं, ‘कोल्ड्रिंक्स’ची दुकानं. ‘मिनरल वॉटरचा’ धंदा तर कमालीचा तेजीत आलेला.

आम्ही एका झाडाखाली घटकाभर विसावलो तर एका मध्यमवयीन जोडप्यानं आम्हाला आग्रहानं जेवायला बोलावलं. त्यांच्यासोबत अजुनेक समवयीन गृहस्थ होते. त्या जोडप्यातले गैहिनीनाथ बडे म्हणाले, ‘आमचं गाव पाथर्डी तालुक्यातलं येळी. मी माझी मंडळी यमुनासह दर महिन्याला दर्शनाला येतो. आम्हाला नाथांची मोठी प्रचिती आलेली आहे.’ मी विचारलं कशी? तर गैहिनीनाथ भारावून बोलू लागले, आमची परिस्थिती हलाखीची होती. माझं लग्न कमी वयातच झालं. ते १९८८ साल होतं. आमच्या वस्तीतले लोक नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचे. मलाही तो वाचावा वाटला. मी पत्नीला हे बोलून दाखवलं. तिनं तयारीच्या नियमानुसार सगळं घर साफसूफ केलं. नारळ आणि सुपारी वाहून पारायण सुरू करायचं असतं; पण ते तेवढं आणायलाही घरात पैसे नव्हते. मग मी असाच काही न सुचून बाजारात भटकत होतो. तेवढ्यात एक अनोळखी माणूस समोर उभा राहिला. म्हणाला की, ‘बरं झालं भेटलात, मी तुम्हाला किती दिवसांपासून शोधत होतो. हे घ्या तुमच्याकडून मागं उसने घेतलेले १०० रुपये.’ आता मला तर आठवना झालं, मी कधी याला पैसे दिले होते; पण हा तेवढ्यात पैसे देऊन निघूनही गेलता! मला नाथांच्या चमत्काराची प्रचिती आली. आता गेली २७-२८ वर्षं झाली आम्ही पतीपत्नी नाथांची उपासना करतो. माझा एक मुलगा परदेशात आहे. तोही तिथं माळ घालतो, पोथी वाचतो.’

मी विचारलं, ‘खूप कडक असतंय का नवनाथाचं व्रत?’ तशा यमुनाताई उत्साहात बोलू लागल्या, ‘‘ नाही असं काय. पण, घर साफ ठेवायचं आन बाईमाणसानं विटाळाच्या काळात पोथीला आन ती वाचणार्‍याला शिवायचं नाही.’’ मी आपसूक विचारलं, का बरं असं? तर बाईंना अडवून त्या जोडप्यासोबत आलेले मोहन पडोळे मध्ये पडले. म्हणाले, ‘कसं आहे, बाईनं आपल्या पायरीनं राहावं. त्या चार दिवसांत बाई अपवित्र होते.’ मी विचारलं, की ‘असं कसं? तुम्ही ज्या संतपरंपरेला मानता तिने तर बाईला कधीच कुठं उणं ठरवलं नाही. उलट जनाबाई, सोयराबाई, मुक्ताई तर सतत पुरुषसत्तेला आव्हान देत बाईपणाचा उंबरा ओलांडत राहिल्या. ‘देहाचा विटाळ म्हणती सकळ | आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ॥’ म्हणणार्‍या सोयराबाई तुम्हाला माहीत असतीलच की!’ यावर पडोळे उद्गारले, हायत म्हाईत, पण कुठं सोयराबाई आणि कुठं आपण सामान्य माणसं! संतजनांची बरोबरी आपण कशी करणार? मी वारकरी माणूस आहे. संतपरंपरा मानतो; पण शंका संतांनी घ्याव्यात. तुम्ही-आम्ही नाही. मी म्हणाले, बरं, पण नाथभक्त आज चमत्काराची मोहिनी, अंगात येणं, भूतबाधा उतरवणं अशात गुंतलेत. इथं येणारे बहुतेक लोक त्यासाठीच येतात, मुक्काम करतात. संतांनी तर चमत्कार, अंधश्रद्धा यांना कडाडून विरोध केला. यावरही पडोळेंचं उत्तर तयार होतं. ते म्हणाले, अहो, कसं आहे, हे सगळं मलाही पटत नाही; पण आम्ही ज्या संतांना मानतो, त्यांनी नाथपंथाचा पुरस्कार केला.

आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा |
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ॥
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला |
गोरक्ष वोळला गहिनीप्रति ॥
गहिनीप्रसादे निवृत्ती दातार |
ज्ञानदेवे सार चोजविले ॥

आता संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनीच नाथपंथाचं असं श्रेष्ठत्व सांगितल्यानं आम्हाला त्याचा अंगीकार करणं भाग आहे. मग चमत्कार वगैरेकडं आम्ही नाईलाजानं कानाडोळा करतो. तसा नाथपंथ तरी काय, त्याकाळच्या चतुर्वर्ण्याला नाकारायलाच पुढं आला. तेव्हा वैदिक धर्माचं स्तोम माजलं होतं. ब्राह्मणवर्ग ज्ञानाच्या चाव्या आपल्याकडेच ठेवत बहुजनांना फसवत होता. नाथांनी जात, धर्म, लिंगनिहाय रुजलेल्या श्रेष्ठत्वाला मूठमाती दिली. म्हणून तर हिंदूंसह, शीख, बौद्ध, मुस्लीम अशा सर्व समाजात नाथ संप्रदाय पसरला. आता एकीकडं सनातन वैदिक धर्माला विरोध करणारे पडोळे बाईचा विटाळ मानताना नकळत त्याच धर्माची मुळं घट्ट करत होतां! चमत्काराला नमस्कार करताना त्या बाईही याला मूक संमती देत होत्या. ब्राह्मणी परंपरेचं वहन करणार्‍या माध्यम बनत होत्या.

मंदिराच्या आवारात आपापल्या ‘पेशंट’ला बरं करण्यासाठी घेऊन लोक आलेले. सगळे कनिष्ठवर्गीय किंवा त्याहूनही खालच्या वर्गातले. कुणाला भूतबाधा झालेली, तर कुणाचं कुठलं दुखणं बरं होत नसलेलं. इथं पंधरा दिवस-महिना राहून साग्रसंगीत पोथी वाचणं, आरतीसह इतर कर्मकांड करणं असा त्यांचा दिनक्रम असतो. दुपारी बारा वाजता आरती होते. त्या वेळी अनेक स्त्री-पुरुषांच्या हमखास अंगात येतं. हा मुक्कामी साधनेचा काळ पूर्ण झाला की, ती व्यक्ती बरी होतेच होते, अशी सगळ्यांची ठाम श्रद्धा.

आदल्या दिवशी पैठणला मुक्काम करून दुसर्‍या दिवशी मी पाथर्डीला निघते. माझ्यासोबत माझा मित्र सदानंद घायाळ असतो. मढी गावातच श्री संत कैकाडी महाराज संस्थान मठ आहे. नारायण जाधव यांनी १९९० साली मोठ्या कष्टानं पैसे उभे करून तो बांधलाय. तेव्हापासून ते मठाची, तिथल्या येणार्‍या-जाणार्‍याची व्यवस्था पाहतात. कुठल्याही भक्ताची राहायची-जेवायची सोय इथं अगदी अगत्यानं होते. मढीला दरवर्षी फाल्गुन महिन्यात दशमीपासून पाडव्यापर्यंत मोठी यात्रा भरते. या महिन्यात कानिफनाथांनी समाधी घेतली होती. मढीतलं कानिफनाथांचं सामाधीस्थानचं मंदिर अठरापगड जातीच्या लोकांनी उभं केलंय. त्यात कैकाडी समाजाचा वाटा मोठा होता. त्यामुळं कैकाडी समाजाला त्यांची मानाची काठी कळसाला आणि समाधीलाही लावायचा मान असतो. इतर जातींनाही त्यांचे मान ठरवून दिलेले आहेत. त्यात गोपाळ समाज पाच गवर्‍या घडवून आणतो आणि होळी पेटवतो. यात्राकाळात प्रत्येक समाज आपापली मानाची काठी आणून कळसाला लावतो.

नारायण जाधव कैकाडी समाजाचं जाणतेपणानं नेतृत्व करतात. वधू-वर मेळावे भरवणं, सोयरिकी जमवणं, लोकांचे लहान-सहान प्रश्न सोडवणं यासाठी ते सतत फिरतीवर असतात. काठीबाबत विचारल्यावर उत्साहानं सांगू लागतात, पहिल्यांदा आम्ही पैठणला जाऊन कावडीत पाणी आणतो. तो दशमीचा दिवस असतो. पाथर्डीला मंदिरात असलेली काठी मिरवणूक काढून मढीला नेली जाते. ढोल, ताशे, झांजरी यांच्या पथकासह आगळीवेगळी मिरवणूक निघते. ४५ लोकांचा ताफा अखंड डफ वाजवत असतो. सजवलेला छबिना निघतो. रात्री जल्लोषात चालत निघालेले लहानथोर पहाटे चार वाजता मढीला पोचतात. वाद्यांच्या घोषात कळसाला आणि समाधीला मानाची काठी टेकवली जाते. मग पुढे महिनाभर बाकीच्या काठ्यांचा मान सुरू असतो. कानिफनाथाला आमच्या समाजाकडून गूळ आणि गव्हाच्या पोळीपासून बनवलेल्या मलिंद्याचा प्रसाद असतो.

मी त्यांना नाथ संप्रदायाशी कैकाडी समाजाच्या नात्याबद्दल विचारलं. ते म्हणाले, की आमचं मूळ गाव पैठण. तिथं जालिंदरनाथ आणि कानिफनाथ असे दोघेच गुरूशिष्य असायचे. तिथं जवळच्या जांभूळवाडी गावात आमच्या समाजाचा एक माणूस काड्या वेचायला गेला. आमच्या समाजाचा मुख्य व्यवसाय टोपल्या बनवणं. तर, तो काड्या वेचत असताना कानिफनाथ त्याच्या समोर येऊन उभे राहिले. त्यांनी त्या माणसाची सत्वपरीक्षा घेण्याचं ठरवलं. त्यात तो उत्तीर्ण झाल्यावर ते म्हणाले की, ‘मी आता काही दिवसांतच मढीला वास्तव्य करणार आहे. तू तिथं ये. चंद्र-सूर्य असेपर्यंत मानाच्या काठीचा पहिला मान तुझाच राहील. तर या प्रमाणं नाथ मढीला आले आणि पुढच्या गोष्टी घडत गेल्या. आता याला सातशे वर्ष झाली. ही भटक्या समाजाची पंढरी आहे. त्यात ज्या ४२ जमाती आहेत त्या सगळ्या इथं दर्शनाला येतात. महाराष्ट्रात तीन ठिकाणी प्रामुख्यानं जातपंचायती भरतात. जेजुरी, माळेगाव आणि मढी इथं वर्षातून एकदा एकत्र येत त्या-त्या जमातींचे पंच भटक्यांची समांतर न्यायव्यवस्था चालवतात. पूर्वी विधायक न्यायदान करणार्‍या या जातपंचायती अनाहुतपणे मिसळलेल्या प्रदूषित घटकांमुळे पुरुषी, सरंजामी आणि विघातक बनत चालल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं ‘जातपंचायत मूठमाती अभियान’ सारख्या उपक्रमातून भटक्या-विमुक्तांचं सातत्यानं प्रबोधन केलं. त्यांना जातपंचायती विसर्जित करायला लावत न्यायासाठी पर्यायी व्यवस्था देण्याचे प्रयत्न चालवले. कृष्णा चांदगुडेंसारख्या कार्यकर्त्यांनी हे आव्हान समर्थपणे पेललं.’

या सगळ्या बदलांबाबत विचारलं असता, नारायण महाराजांचं उत्तर हा सुखद धक्का होता. ते म्हणाले की, कार्यकर्ते आणि शासनाने आमच्या पंचायतींमध्ये हस्तक्षेप केला हे बरंच झालं. कारण सतत जातीतून बाहेर काढणं, नाही नाही त्या कठोर शिक्षा सुनावणं अशी दुर्बुद्धी आमच्या लोकांना सुचू लागली. मी स्वत: वीस वर्ष पंच म्हणून काम केलेलं आहे. जातपंचायत चांगलं काम करायची. म्हणजे, काहीही लहानमोठं प्रकरण असो, कधी कोर्टात जायची वेळ यायची नाही. शहाणे लोक पंच म्हणून न्याय द्यायचे. तो अंतिम असायचा. एका दिवसात पन्नास प्रश्न निकाली काढायचो आम्ही. लोकांनी चुका केल्या. त्यामुळं शासनानं बंदी आणून योग्यच केलं. अजूनही समाजातली लोकं माझ्याकडे येतात. आता मी किंवा अजून कुणी अधिकृत पंच म्हणून काम करत नाही; पण लोकांना समजावून सांगून मी त्यांचे कौटुंबिक, आर्थिक प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या समाजातली तरुण मुलं-मुली आता शिकतात. काही कलेक्टर, डीसीपीसुद्धा झालीत; पण एक आहे, त्या शिकलेल्यांनी पुढे मागच्यांना हात दिला नाही. ते समाजापासूनच तुटले. त्यांच्या मुला-मुलींची सोयरिक जमेना. मग असे लोक आमच्याकडे येतात. आम्ही पुढाकार घेऊन त्यांची लग्नं जमवून देतो. आमच्यात दहा-पाच हजार हुंडा असतो. साधं-सोपं लग्न करतात. पूर्वी नवरदेवच मुलीला पैसे द्यायचा. अगदी मी पण तसे दिलेले आहेत. पूर्वी आमचा समाज विखुरलेला होता. एक गाव असं कुणाला नाही. सतत स्थलांतर. केवळ वर्षातून एकदा मढीच्या यात्रेत एकत्र यायचा. सहा महिने अगोदरपासूनच त्याची तयारी सुरू व्हायची. ‘मढीला बोकड कापणार, या.’ असे सांगावे गावोगाव पायीच चालत जाऊन एकमेकांना सांगितले जायचे. आता देवाला थोडीच बोकड पाहिजे? तो तर उदबत्तीचा धूरही मागत नाही. आता एकत्र येण्याचा आनंद बोकड कापून साजरा व्हायचा. त्यातून मढीला ‘बोकड्या मढी’ नाव पडलं होतं. पण, बोकड खालीच कापलं जायचं. त्याचा नैवेद्यही कधी वर गेला नाही. बीड जिल्ह्यात येवलवाडी हे नाथपंथीयांचं महत्त्वाचं ठाणं आहे. तिथं जालिंदरनाथांनी संजीवन समाधी घेतली. तिथंही प्रचंड बोकडं कापली जायची. आता ते सगळं थांबलंय. लोकांनीच ते स्वत:हून बंद केलं.

वारकरी आणि नाथ संप्रदायाचा अनुबंध जोडताना महाराज सांगतात, आम्ही ज्ञानदेव, तुकारामांनाही मानतो. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाथपंथीयांसाठी सदैव महत्त्वाचा आहे. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला. आणि गहिनीनाथांचे गुरू गोरक्षनाथ. समाजात होणारे सप्ताह हा त्याच श्रद्धेचा भाग. नाथांची उपासना म्हणजे श्रावण महिन्यात लोक उपास करतात. पूजा, पोथी वाचणं असं असतं. जास्त अवडंबर काही नाही. इतर कुठले देव पूजायचे नाही असंही काही नाही. आमच्या समाजात तरुणपिढी मात्र इतकी आध्यात्मिक नाही.

नारायण महाराजांचा तरुण मुलगा राजू आणि त्याचा चुलतभाऊ धनंजय हे दोघे मात्र सगळी परंपरा, तिचं मोल, तिची जपणूक याबाबत केवढे तरी सजग दिसले. काठी कळसाला टेकवण्याच्या समारंभाचा व्हिडीओ धनंजयनं आम्हाला दाखवला. राजूच्या मोबाईलवर ‘कानिफनाथाय नम:’ची रिंगटोन अधूनमधून वाजत असते. राजू सांगतो, ‘मिरवणुकीत कधी डीजे लावला नाही. डफ, ढोल अशी वाद्यं अजूनही आग्रहानं जपतो. आम्ही दोघंही मिरवणुकीत लहानपणापासून सहभागी होतो. आमचा समाज विखुरलेला आहे. बहुतांश कुटुंबांची आर्थिक स्थिती इतकी खालावलेली आहे की, त्यांच्याकडे मोबाईल किंवा कॅलेंडरपण नसतंय. पण, अचूक दिवस हेरून ते मढीच्या उत्सवाला येतात.’

आम्ही नारायण महाराजांचा निरोप घेऊन निघतो, महाराज राजूला आम्हाला मढीपर्यंत सोडायला सांगतात. आम्ही नको म्हणतानाही राजू आम्हाला त्याच्या कारमध्ये बसवत सोडायला निघाला. पाथर्डी ते मढी आठ किलोमीटरचं अंतर. या प्रवासात राजूच्या मनीचं बरंच काही आमच्यापुढं वाहतं झालं. तो बोलत राहिला, ‘मागच्या वर्षीपर्यंत आमच्या कैकाडी समाजात जुन्या पिढीची मानसंच कमिटी उत्सवाचं काम पहायची; पण यंदापासून आम्ही त्यांना ‘आता कारभार आमच्याकडं द्या. तुम्ही मार्गदर्शन करा’, अशी विनवणी केली. त्यांनी विनंतीचा मान राखत आम्हाला काम दिलं. मी जुन्या लोकांना विचारून गडाचा सगळा इतिहास समजून घेत असतोय. मला माहीत झाल्याप्रमाणं गडावर केवळ दोनच मान आहेत. एक कैकाडी समाजाला काठीचा, आणि गोपाळ समाजाला होळीचा. हा साक्षात देवानं दिलेला मान आहे. आमच्या समाजाचे मूळपुरुष म्हणजे गुलाबबाबा. त्यांना देव प्रत्यक्ष भेटला होता. तिथून आमचं कूळ कसं सुरू झालं, वाढलं याचा इतिहास शोधून मला तो पुस्तकरूपात आणायचाय. नवनाथांचा चमत्कार मला अनेकदा अनुभवायला मिळालाय. अनेकदा मी मरणाच्या तोंडातून परत आलो. पूर्वी मी बेरोजगार होतो. आता जमिनीचे व्यवहार करण्याच्या धंद्यात पडलो. नाथांचं नाव घेऊन केलेला कुठलाही व्यवहार असो, यश मिळतंच. माझ्याकड इतक्या ‘फास्ट’ पैसा आला, गाडी आली ती देवानंच दिली की! देवस्थानच्या ट्रस्टवरही कुण्याही माणसानं पैसा खाल्ला की तो पदावरून बाजूला झाल्यानंतर त्याला ‘अटॅक’ येतोच. देवाचा पैसा खाल्ला की तो पचत नाहीच. मी आता जुनी कागदपत्रं शोधतो, जुन्या माणसांशी बोलतो; तेव्हा मला कळलंय, की आमच्या समाजाच्या नावे तब्बल अडीचशे एकर जमीन होती. हा अख्खा गड कैकाडी समाजानं बांधून काढला. त्याकारणं प्रत्यक्ष शाहू महाराजांनी ती जमीन कैकाडी समाजाला इनाम म्हणून दिलती. दोन चिर्‍यांमध्ये चुना भरण्याचं काम गोपाळ समाजानं केलं. म्हणून त्यांना वीस एकर जमीन आहे. गडाला चुन्याची रंगसफेदी करण्याचं काम मुस्लीम समाज करायचा. शाहूराजांनी त्यांनाही जमीन दिलेली. अगदी तेली समाज तिथं दिवा उजळायचा म्हणून त्यालाही जमीन दिलेलीय. देवस्थानाची संपूर्ण महाराष्ट्रात साडेसातशे एकर जमीन आहे. गडावरच्या दोन समाध्यांपैकी एक कैकाडी समाजाच्या सेवकाची आहे. तो नाथांच्या सेवेत होता. एके काळी सगळा गड कैकाड्यांच्याच ताब्यात होता. पण, समाज दारिद्र्यात होता, त्याला समाजात पत नव्हती. सगळा समाज भटका होता. एका ठिकाणी कुठं कायमचा मुक्काम नसायचा. शेती कुठली कसणार? मग समाजातल्या काही जाणत्यांनी इथल्या गावकर्‍यांना म्हणलं, की ही शेती तुम्ही करा. आम्ही एक महिन्यासाठी यात्रेला येऊ तेव्हा आम्हाला चटणी-भाकरी तेवढी देत जा. त्या वेळी अशी केवळ कसायला दिलेली जमीन आता आम्ही स्थिर झालो तरी आमच्या ताब्यात आली नाही. कसेल त्याची जमीन म्हणणार्‍या कूळकायद्यात ती गेली. ती परत मिळवण्याचा लढा सुरू आहे. आमच्या समाजानं गड बांधून काढला आणि मग तो तिथंच पायथ्याशी राहिला. कुठं गेला नाही. सगळा गडच त्यांच्या ताब्यात होता. पुढं चालून वाईट दिवस आले. आमचा समाज सगळ्यात जास्त पांगला तो ७२च्या दुष्काळात. मग नाहीच अजून एकत्र आला.

तसा आमचा समाज तरी कितीय राव? अख्ख्या महाराष्ट्रात दीडेक लाख आसंन. त्यात नगर आणि सोलापुरात सर्वात जास्त वस्ती आहे. आमची भाषा कैकाडी. ती बोलायचा, जपायचा प्रयत्न आम्ही तरुणपन करतोत; पण समाजातच. बाहेर बोलाय गेलं की, लोकांना ती समजत नाय. मग मराठीवरच यावं लागतंय. लक्ष्मण मानेंनी मात्र त्यांच्या ‘उपरा’ आत्मकथनातून आमची दु:ख लय चांगली लिहलीत. आता आमच्यावर अन्याय असा झालाय, की इकडं मराठवाड्यात आम्ही व्हिजे कॅटेगरी’त येतो आणि विदर्भात आम्हाला ‘एससी’त टाकलंय. आमच्या मुलांचा मग लई ‘प्रॉब्लेम’ झालाय. आम्हाला कुणी मुलीच देईना झालंय आता. आजवर आमचे कुठले लोक हे असं का म्हणून विचारायला गेलेच नाहीत. त्यामुळं कुणी लक्षच दिलं नाही. आता आम्ही केंद्र शासनाला विनंती केलीय, की, महाराष्ट्रात एकच ‘एससी कॅटेगरी’ करा आमची.

आमच्या समाजानं काहीच बदल स्वीकारलेले नाहीत. जे थोडेबहुत शिकले ते आमच्यात राहिलेच नाहीत. निघून गेले. तिकडं विदर्भात गायकवाड, माने आहेत आणि इकडं जाधव आहेत सर्वात जास्त. मी आमच्या समाजाचा इतिहास वाचला. आमची लोकं वस्त्या करून रहायची. चोर्‍या करणं हाच मुख्य व्यवसाय. पोलिस सतत मागावर राहायचे. मग त्यांच्यापासून लपण्यासाठी, त्यांना हूल देण्यासाठी आम्ही जाधव, माने अशी मराठ्यांची आडनावं घेतली. आधी आमचं आडनावचं कैकाडी होतं. तेव्हा लगेच हे चोर आहेत म्हणून लक्षात यायचं. मग लगेच गावाबाहेर काढायचे. एखाद्या गावात घेतलंच, तर तिथला कोतवाल लिहून द्यायचा, इतके लोक, इतकी जनावरं आन इतके कुत्रे आहेत यांच्यासोबत असं. आणि गावाबाहेर तितके लोक गेलेच पाहिजेत. कुत्रपन गायब झालं तर ते आमच्यावर कारवाई करायचे. गावात कमरेला बोरीची फांदी, कुठं थुकायचं नाही आन् विहिरीचं पाणी पाहिजे असलं तर कुणी देईपर्यंत लांब ताटकळत उभं राहायचं असे आमच्या समाजाचे हाल होते. अजूनही ब्राह्मण आमचं लग्न लावायला येत नाही. बळंच आणावं लागतंय.

मधेच एके ठिकाणी राजू गाडी थांबवतो. पुन्हा बोलू लागतो, या ठिकाणी आमची काठीची मिरवणूक थोडा वेळ थांबते. कारण इथं पूर्वी जंगल होतं. इथं कानिफनाथ महाराज आमच्या लोकांना कोणत्यातरी रूपात भेटायचे. इथं अजूनही रात्री आमच्यासोबत या, घंटेचा आवाज येणार, वाघाचाही आवाज येणार. इथं अर्धा तास काठी थांबवायची हा नेमच आहे. रात्री वातावरण वेगळं असतंय. सगळं शांत आणि नुसते आमचे लोक मंदिरापर्यंत ढोल-ताशे वाजवत असतात. असं तरुण पोरं सात तास अखंड वाजवतात. आमच्याकड काय होतं? गाढवाला घेऊन गावोगाव फिरायचो. आता मी गाडीत फिरतो, ती देवानंच दिली म्हणून!

रस्त्यात राजूनं आम्हाला तेली समाजाची आणि त्यांच्याही लोकांची जमीन दाखवली. देवस्थानात पोचवून म्हणाला, इथं तुम्ही ट्रस्टच्या लोकांना भेटा; पण बहुतेकजनं आमच्या विरोधातच बोलतील. चिरेबंदी गडाच्या पायर्‍या चढताना आम्हाला दोन महिला पोलिस भेटल्या. गडावर उत्सवकाळात तैनातीला होत्या. त्यातल्या एकीला जरा बाजूला घेऊन मी जरा भाबडेपणानंच विचारलं, बाजूला बसायचं असलं तर मंदिरात जाता येत नाही? ती म्हणाली, नाही. मग मी विचारलं, तुम्ही त्या वेळी काय करता? ती म्हणाली, आम्हाला हे कारण वरिष्ठांना सांगायला संकोच वाटतो; पण मग सोबतच्या महिला सहकार्‍यांना सांगून आम्ही ड्युटी मंदिरात असेल तर ती बदलून घेतो. म्हणजे बाई पुरुषांच्या वर्चस्वाला ओलांडून पोलिस खात्यात आपली मुद्रा उमटवती झाली खरी; पण आपल्या स्त्रीत्वाच्या ओझ्याखाली ती अजून दबलेलीच आहे की..! मी जराशी अडखळले.

मंदिराच्या उजव्या हातालाच देवस्थान ट्रस्टचं प्रशस्त ऑफिस दिसलं. तिथं विचारणा केल्यावर लगेच दोघंतिघं पुढे आले. त्यांनी ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर राजळे यांची भेट घालून दिली. सोबत सी.ई.ओ. अशोक पवार, विश्वस्त मधुकर साळवे, सुधीर मरकड आणि अप्पासाहेब मरकड होते. राजळे पस्तीशीचे तर साळवेंचं वय ऐंशीपार. आम्हा दोघांना ट्रस्टच्या खास बैठकीच्या खोलीत नेऊन त्यांनी तब्येतीत संवाद सुरू केला. राजळे सांगू लागले, इथल्या गडाला आणि यात्रेला ७०० वर्षांची परंपरा आहे. साधारण हजारभर काठ्या महिनाभराच्या यात्राकाळात इथं येतात. एका काठीबरोबर पाचशे तरी लोक असतात. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार इथून वीसेक लाख लोक याकाळात दर्शन घेऊन जातात. या संप्रदायाचा उदय उत्तर भारतात आणि प्रसार दक्षिण भारतात झाला. पंजाबमध्ये जालिंदरनाथांचं ठाणं जालिंधर आणि गोरक्षनाथांचं गोरखपूर. होळीला तर एकाच दिवशी १४-१५ लाख लोक दिवसभरात येतात; पण आजवर कधीही काही गोंधळ, गैरप्रकार झाला नाही. फाल्गुन वद्य प्रतिपदेपासून होळी सुरू होते आणि होळीच्या पंधरा दिवस आधी गडावर गावाची सामूहिक होळी असते. यानंतरचा टप्पा म्हणजे फुलबाग यात्रा. पाडव्याच्या आदल्या दिवशी फाल्गुनी अमावास्येला समाधीला गंगेच्या पाण्याचा कावड अभिषेक असतो. ही कावड पैठणहून भरून आणली जाते. इतर ठिकाणी कावड ओतून यात्रा सुरू होते. इथं मात्र कावड शेवटी ओतली जाते.

त्यामागची कथा मग साळवे गुरुजी सांगू लागले. ते म्हणाले की, कानिफनाथांची एक डालीबाई नावाची शिष्या होती. ती एकमेव स्त्री शिष्या. मूळ राजस्थानची. कानिफनाथांनी तिला नाथ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यानंतर काही काळातच ते समाधिस्थ झाले; पण डालीबाईनं ‘मला कानिफनाथांनी समाधी द्यावी’ असा हट्ट धरला. आणि नाथांच्या समाधीजवळ तीन दिवस अन्नसत्याग्रह केला. तेव्हा नाथांनी बाहेर येत डालीबाईला फाल्गुन वद्य अमावास्येला समाधी दिली. या दिवशी नाथ पुन्हा समाधीत जातात म्हणून त्यांना स्नान घालण्यासाठी कावड ओतली जाते. ट्रस्ट कीर्तन सप्ताहांसह विविध उपक्रम सातत्यानं आयोजित करत असते. एकदा सगळ्या धर्मांमधल्या विद्वानांना एकत्र बोलावून त्यांचा परिसंवाद भरवला. एकदा महिला कीर्तनकारांचाच सप्ताह केला. ट्रस्टनं आता स्वतंत्र ग्रंथालयाची उभारणीही सुरू केलीय. आता देवस्थानचं मोबाईल अॅपही येणार आहे. चर्चेदरम्यान राजळे यांनी एक सौम्य तक्रार केली की, या ठिकाणाला सतत ‘भटक्यांची पंढरी’ असं गौरवल्यानं देवस्थानाला खूप फटका बसलाय. सदानं कुतूहलानं विचारलं कसा काय? तर राजळे थेटच बोलले की, कानिफनाथाची वारी खुद्द शिर्डीचे साईबाबा, पुण्याचे शंकरमहाराज करायचे. साईबाबांच्या शिर्डीतल्या मंदिरात आतमध्ये कानिफनाथांची समाधी आहे; मात्र त्याचा गवगवा कधी झाला नाही. भटक्यांचा देव अशी ओळख बनल्यानं तिरुपती किंवा शिर्डीचं ‘ग्लॅमर’ या देवाला नाही. इथं येणारे बहुतांश भक्त हे गरीबच असतात. ते सढळ हातानं देणग्या वगैरे देऊ शकत नाहीत. आता आम्हाला देवस्थानाचा चेहरा ‘बहुजनांची पंढरी’ असा करायचाय.

साळवेंना मी विचारलं की, नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचा सहसंबंध कसा सांगाल? तर ते म्हणाले, नाथ संप्रदाय ही वारकरी संप्रदायाची जननी आहे. नाथ संप्रदायातील लोक वैष्णव आहेत, त्यांची वेशभूषा शैव आणि वृत्ती शाक्त आहे. वैदिक धर्म हा भेदभाव मानणारा होता; पण नाथ संप्रदायानं त्याच्यासमोर आव्हान उभं करत त्याला एक पर्याय दिला. लिंगभेद, जाती-धर्मभेद मोडून काढत समाजाला एकत्र आणलं. कानिफनाथ कापादिक तर मच्छिंद्रनाथ भैरवी शाखेचे. त्यांनी जारण-मारण, मंत्र-तंत्र टाकून द्या म्हटलं. हे करणी, काळ्या जादूचे प्रादुर्भाव शक्तांकडून झाले. ‘यारे यारे लहान थोर | याती भलती नारी नर…॥’ कानिफनाथांनी सगळ्यांना एकत्र करून हाती दंड (काठी) दिला. सांगितलं की, ‘हा माझ्या समाधीला लावा. शक्तिपात होईल आणि पुन्हा अपूर्व शक्ती येईल. कानिफनाथांची दीक्षा घेण्याची पद्धतही अगदी सोपी आहे. त्यांच्या समाधीवर माळ ठेवून माळकरी व्हायचं असतं. मांसाहार, व्यसन वर्ज्य करायचं असतं.’

राजळे सांगतात की, ‘आमचा अंगात येणं वगैरे अंधश्रद्धांना विरोधच आहे; पण इथं लोकांच्या अंगात आल्यावर आम्ही हस्तक्षेप करत नाही. तो शेवटी भावनेचा मुद्दा असतो ना!’ आता सदाच्या बाजूला बसलेले राजळे त्याला हळूच माझं आडनाव विचारतात. सदा सांगतो, ‘भोसले’. आता राजळे साळवेंना खुणावतात, ‘गुरुजी, सांगा यांना काय गोष्ट घडली होती ते.’ आता गुरुजी जरा रहस्यमय सूर लावत सांगू लागतात, छत्रपती शाहू महाराज म्हणजे संभाजीराजांचे पुत्र. त्यांच्या पत्नी येसूबाई भोसले यांनी नवसपूर्तीच्या रूपात ४०० वर्षांपूर्वी हा गड बांधून घेतला. चिमाजी सावंत आणि पिलाजी गायकवाड यांनी गडाचं बांधकाम पाहिलं. कान्होजी पुजारी आंग्रे यांनी गडाला नंदादीप आणि पितळी घोडा बांधून दिला. गडावरचे पुजारी होते गंगाधरशास्त्री दीक्षित-जोशी. त्यांच्या दोन मुलांपैकी एकाला पाच मुलं झाली. आणि एकाला एकच झाला. आता १७९५ साली दोघा भावांच्या मुलांमध्ये वाटण्या करताना या पाच जणांमध्ये ५० टक्के आणि दुसर्‍या भावाच्या एकट्या मुलालाच ५० टक्के वाटा मिळू लागला. त्यातून वाद निर्माण झाले. खर्ड्याच्या लढाईमध्ये मराठ्यांनी जी अकरा गावं निजामाला दिली, त्यात हे मढी गावही गेलं. आणि वादाची परिणती इतकी भीषण झाली की, बाबासाहेब दादासाहेब दीक्षित या वैदिक ब्राह्मणानं, गंगाधरशास्त्रींच्या मुलानं, इस्लाम धर्म स्वीकारला. त्याचं नाव जलालुद्दीन झालं. पुढे पुन्हा त्याला धर्मात घेतल्यानंतर तो जालिंदरनाथ झाला. त्यांचीही समाधी कानिफनाथांच्या मंदिरासमोरच आहे. यावरच न थांबता त्यानं सगळ्या मंदिराचं इस्लामीकरण केलं. या ठिकाणी असणारा सातपुते आणि चव्हाण नावाचा जो मराठा समाज होता, त्यांना पाचारण केलं. सांगितलं, हे सगळे ब्राह्मण हाकलून लावा. त्यांच्या वाट्याचा आठाण्याचा हिस्सा मी तुम्हाला देतो. असे ब्राह्मण बाहेर काढले. आठाण्याचा हिस्सा मिळणार्‍या चव्हाण आणि सतापुतेंचं आडनाव जाऊन मढकर/ मढीकर झालं. त्यांना ब्राह्मण म्हणाले, ‘स्वधर्मातून उडी मारून इस्लाम स्वीकारलात. मर्कट आहात!’ असे ते मढकर पुढे ‘मरकड’ झाले. मग मराठा पुढे मंदिराच्या देखभालीत वा पूजाअर्चेत राहिलाच नाही. तर मुसलमानांनी संपूर्ण कब्जा मिळवला. मराठा फक्त यात्रेच्या वेळी दिसायचा. सगळा आर्थिक फायदा मुसलमानांना मिळाला. पण १९५१ साली हभप किसनदासमहाराज लोहिया नावाचे संत इथं आले. गणपतमहाराज देशमुखांनी त्यांना इथं आणलं होतं. त्याचं कीर्तन इथं झालं. ते कीर्तनात म्हणाले की, ‘मंदिराच्या संदर्भातली योग्य माहिती मला आणून द्या. मग तिथून प्रेरणा घेऊन मी ऐतिहासिक कागदपत्रं मिळवली. त्यात मला खुद्द शाहू महाराजांनी त्या गंगाधरशास्त्रींना लिहून दिलेली सनदही हाती लागली. त्याची मूळ प्रत आता नगरला एका कुटुंबाकडे संग्रही आहे. आत्ताचा जो मंदिराचा ट्रस्ट आहे, त्याची स्थापना बंडू खानसाहेब नावाच्या मुस्लिमानं १९५४ साली केली. गावात १/३ मुस्लीम समाज आहे. ब्राह्मणांकडून पूजेचा मान मुस्लिमांकडे गेला; पण ७२-७३मध्ये मुस्लिमांनी बोकडाचा नैवेद्य मंदिरात नेण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही त्यांना मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप केला तेव्हा मी कायदेशीर पद्धतीने सगळे हक्क मिळवले. असा ३१ मे १९८७ साली मराठ्यांकडे हक्क आला. पुढंही मंदिराच्या आवारात एक मशीद होतीच. मग ६ डिसेंबर १९९२ साली बाबरी मशीद पाडली नं, तेव्हा मलाही स्फुरण चढलं. सरपंचाला विश्वासात घेऊन मी पुढाकार घेतला. रात्रीत उद्ध्वस्त केली ना मशीद! २४ ऑक्टोबर २००० पर्यंत माझ्यावर अनेक केसेस होत्या.’ साळवे गुरुजींच्या सुरेल आध्यात्मिक आवाजाचा वर्ख गळून पडत तिथं तीक्ष्ण हिंदुत्ववादी स्वर एव्हाना प्रगटलेला.

आता ते आम्हाला घेऊन बाहेर पडतात. मशीद पाडून मंदिर बांधलेली आवारातली जागा मोठ्या अभिमानानं दाखवतात. तिथून एका खोलीत नेतात. तिथं आम्ही तिघंच असतो. एका फायलीत जपून ठेवलेला एक लेख दाखवतात. मशीद उद्ध्वस्त करत हिंदू धर्मरक्षणासाठी लढल्याबद्दल कौतुक करणारा तो लेख कुठल्याश्या मासिकात छापून आलेला. भाषा केवढी तरी दर्पयुक्त, वल्गना करणारी आणि असंवैधानिक. वैश्विक कल्याणाचं पसायदान मागणार्‍या अध्यात्मालाच हरताळ फासणारी. आणि हो, जाता-जाता हलक्या आवाजात गुरुजी त्यांची खंत बोलतात, शेवटी काही झालं तरी मी जातीनं मांगाचा. हे लोक आदर देतात; पण कसले निर्णय घेण्याचा अधिकार देत नाहीत मला. आता काय बोलावं?

डालीबाईंच्या समाधीसमोर डाळींबाचं झाड लावलं आहे. त्यावर धागा बांधून लोक नवस करतात. मनोकामना मागतात. ट्रस्टचे लोक नाथांचं भस्म, फुलं, दवणा भरून भक्तांना ताईत देतात. दवणा नाथांना आवडतो. हा दवणा निवडुंगा आणि साकेगावला फुलतो. भट्टी पेटवण्यासाठीही या परिसरातली चुनखडी आणि गोवर्‍या एकत्र करून आम्ही होळी पेटवतो. होळीनंतरच्या पंधरवड्यात सगळं गाव व्रतस्थ राहून देवाचं काम करतं. मोहन मरकड सांगतात की, याकाळात आम्ही सोयरिक करत नाही, तळण करत नाही, जमीन नांगरत नाही.

मंदिराच्या बाहेर निघालो तेव्हा आवारातली दुकानं न्याहाळू लागलो. मरकड, शेळके, बोरुडे यांच्याच ताब्यात बहुतांश दुकानं दिसली. दोनएक दुकानं मुस्लिमांची. त्यातल्या एका दुकानात आम्ही गेलो. चाळीशीतले बाबा गुलाब शेख आमच्याशी बोलू लागले. सुरुवात करतानाच त्यांनी कहानीतला ‘मेलोड्रामा’ स्पष्ट केला. म्हणाले, माझ्या ७०० वर्षांपूर्वीच्या मूळ पूर्वजाचं नाव संतराम वामन दीक्षित. माझं दुकान इथं २५ वर्षांपासून आहे. सुन्नी समाजच इथं मंदिरात येतो. तब्लिग पंथ एकेश्वरवादी आहे. तो इथं येत नाही. कानिफनाथांचा जन्म हिमालयात झाला. ते धर्मप्रसारासाठी पैठणला गेले. सय्यद सादात सुफी तिथं होते. त्यांचं दुसरं नाव शहा रमजान माहीसवार चिश्ती. गंगेच्या दुसर्‍या किनार्‍यावर असताना कानिफनाथांनी मासळीला हुकूम दिला. मला सुफी दर्ग्यात नेऊन सोड. मग ते १२ वर्ष चिश्तींकडे त्यांच्या सेवेत सुफी दर्ग्यात राहिले. शेख यांच्यासोबत त्यांचे मित्र चांद वजीर शेख असतात. ते सांगतात, मंदिराचा ट्रस्ट ज्यांनी स्थापन केला ते बंडू खानसाहेब हे माझे चुलते होते. मढीमध्ये ७०-८० घरं मुस्लीम आहेत. आम्हा मुस्लिमांना ट्रस्टमध्ये काही स्थान द्या, अशी आम्ही अनेकदा विनंती केली; पण दाद मिळत नाही.

गावात फिरताना एका घरात एक दाढीवाले आजोबा अंगणात बाजेवर बसलेले दिसले. शुभ्र दाढी, गहिरी नजर आणि सुरकुत्यांच्या जाळीदार नक्षीतून डोकावणारं जाणतेपण… मी त्यांच्याशी बोलू पाहिलं, तर बाजूची मुलगी म्हणाली, दीदी वो जरा उंचा सुनतेय. सौ साल उमर हो गई न अभी. मग त्यांना ऐकू जाईल अशा स्वरात प्रश्न केला, क्या आप लोग मंदिर में जाते हो? त्यांनी घटकाभर माझ्याकडं रोखून पाहिलं आणि म्हणाले, नही. मी पाठोपाठ विचारलं, क्यूँ? तर खोल आवाजात बोलले, बेटी, मंदिर क्या जाना… उसकी वजहसे तो गावके दोनो समाजमें दंगा हुआ. बहुत बुराईयत आ गई एक दुसरे के लिये. त्या अचानक मना-मेंदूवर कोसळलेल्या ‘बुराईयत’ शब्दाचा अदृश्य घाव वागवत मी तिथून निघाले.

नाथ संप्रदायाचा पाया भक्कम करणार्‍या गोरक्षनाथांना ज्ञानेश्वरांनी ‘योगाब्जिनीसरोवरूख विषयविध्वंसैकवीरू’ अशा शब्दात गौरवलं. नाथपंथीयांनी म्हणे सगळ्या धार्मिक विचारधारांमधलं हीन जाळत केवळ सत्य जनमानसांत पोचवलं. कपाळी चंदन-बुक्का, कानी कुंडलं, सर्वांगी भस्म, छातीवर मेखला, रुद्राक्षमाळा, हाती त्रिशूळ, पायी खडावा असा वेष करून अनासक्तपणे हठयोग अंगीकारणारे नाथपंथी. सगळी भौतिकता ओलांडून जाऊ पाहणारे हे बैरागी; पण इथं त्यांचं मंदिर हाच धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक ध्रुवीकरणाचा केंद्रबिंदू बनलेला.

मी निघाले. जाताना एकवार वळून पाहिलं. आता संध्याकाळ गडाच्या अंगाखांद्यावर उतरत होती. वैराग्याची झळाळी मिरवणारी भगवी पताका सोनेरी उन्हात उजळून गेलेली… गडावर भजनात दंगलेल्या दोन चिमुकल्यांचे कोवळे स्वर आभाळभर पसरले होते… टाळकरी आणि बाकीचं भजनी मंडळ त्यांच्या मागे सूर धरत होते. आता ते गात होते त्याचा अर्थ मात्र त्यांना उमजलाच होता की नाही, काय माहीत?

संत कैकाडी महाराज

नाथ आणि वारकरी संप्रदाय जोडणारी परंपरा वाढवण्याचं काम अलीकडच्या काळात संत राजाराम उर्फ कैकाडी महाराज (जन्म- १९०७, मृत्यू- १९७८) यांनी केलं. संत गाडगेबाबा यांचं शिष्यत्व पत्करून त्यांनी समाजप्रबोधनाचं मोठं काम केलं. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, सर्व धर्मांसाठी समान न्याय आदी सामाजिक उद्दिष्टांसाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. कीर्तनातून भक्तिमार्गाचा प्रसार केला. कैकाडीमहाराज अहमदनगर जिल्ह्यातील मांडवगणचे रहिवासी. मढीमध्ये येणारा सर्व कैकाडी समाज त्यांना मानतो. या कैकाडी समाजाला सन्मार्गावर नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कैकाडी महाराज यांचे बंधू कोंडीबा काका यांनी पंढरपूर येथे कैकाडी महाराज मठ नावाचा भव्य मठ बांधला आहे. हा मठ म्हणजे वारकर्‍यांसाठी एक धार्मिक पर्यटन स्थळच बनला आहे. देशभरातून लोक हा मठ पाहण्यासाठी येतात. सहस्त्र कोटी नाम मंदिर (विष्णु पुण्यधाम), हिंदू देव देवता, ऋषीमुनी, संत यांनी दिलेली शिकवण, भारतीय संस्कृती, इतिहास, समाजकार्य, स्वातंत्र्यलढा आदी गोष्टींचे देखावे या ठिकाणी मूर्ती आणि नेपथ्याद्वारे साकारण्यात आले आहेत.

याबाबत या मठाचे सध्याचे प्रमुख रामदासमहाराज कैकाडी म्हणाले, कैकाडीमहाराज मठाला लोक जरी मठ म्हणत असले, तरी हे प्रत्यक्षात ‘विचारमंदिर’ आहे. १९७२मध्ये ते मूर्तरूपात आलं. श्रीसंत राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार माझे वडील कोंडीराम काकांनी या मंदिराचं बांधकाम करवून घेतलं. श्रीसंत महाराजांनी १२ वर्ष उभं राहून अखंड तपश्‍चर्या केली. २४ वर्ष मौन धारण केलं. भारतभ्रमण करून १८ भाषा अवगत केल्या. ते म्हणायचे की, देवाशी अनुबंध फक्त नामस्मरणानं जोडला जातो. बाकी कर्मकांड सगळं व्यर्थ आहे. त्यामुळं मंदिराचं नाव आहे ‘नामाची झोपडी’ किंवा ‘विश्‍व पुण्य धाम’, असंही म्हणतो आम्ही त्याला. कारण उदात्त कार्य केलेल्या जगातल्या सगळ्या महामानवांच्या प्रतिमांना आम्ही इथं अभिवादन करतो. त्यात महान संशोधक अल्बर्ट आइनस्टाइन, मार्टिन ल्युथर किंग, कार्ल मार्क्स यांच्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पं. नेहरू अशा अनेकांचा समावेश आहे. त्यांना पानं-फुलं वाहून नवस न करता त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्या, असं आम्ही सांगतो.

नाथ संप्रदायाबाबत बोलायचं झालं तर हा भारतातला पहिला संप्रदाय आहे. तो वर्णभेद, जातपात, स्त्री-पुरुषभेद मानत नाही. हठयोग ही त्याची ओळख आहे. यात अतिशय कडक साधना करावी लागते. वारकरी संप्रदाय हे नाथ संप्रदायाचंच पुढचं पाऊल म्हणता येईल. हठयोगानं जे साध्य होतं तेच प्रेमभक्तितूनही होतंच, असा ठाम विचार वारकरी संप्रदायानं दिला. हा क्रांतिकारी सिद्धांत वारकरी विचारधारेची ओळख आहे. दोन्ही संप्रदायांचं सार घेऊन आम्ही वाटचाल करतो आहोत.

व्यापक परंपरा

वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदायातील गाढ अनुबंध उलगडून दाखवताना ज्येष्ठ कीर्तनकार आणि अभ्यासक बद्रीनाथ महाराज तनपुरे सांगतात, ‘मुळात हे दोन्ही संप्रदाय परस्परांवर आधारलेले आहेत. नाथ संप्रदायात ‘एक गुरू एक शिष्य’ अशी परंपरा होती. मात्र, ज्ञानदेवांनंतर ही परंपरा व्यापक झाली. त्यांनी अवघ्या वैष्णवांना या परंपरेत सामावून घेतलं. एकत्वाची पताका सगळ्यांच्या खांद्यावर दिली. इथंच विश्वबंधुत्वाची स्थापना झाली. अवघं विश्वच घर मानण्याची थोर भावना जन्म घेती झाली. याचा स्त्रोत आदिनाथांपासून उगम पावलाय. मुळात नाथ संप्रदाय बहुजनांचा संप्रदाय आहे. ज्यांना सनातन धर्मानं दूर लोटलं त्यांचा हुंकार यात उमटलेला दिसतो. वारकरी-भागवत संप्रदायातही तेच तर झालं. संत नामदेवांनी जनाबाईंना सन्मान दिला. कीर्तनफडात तिच्या हाती वीणा दिला. याच बरोबर काव्य करण्याचाही अधिकार जनाबाई मिळवत्या झाल्या; तेव्हा हे तिच्या पाठी उभे राहिले. अशी ही मोठी क्रांतीच घडली. चांगदेव प्रकरणातही संत निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना सांगितलं की, ‘चांगदेवांना उपदेश देण्यासाठी मुक्ताईला सांग’. तुकोबांनीही पुढे बहिणाईला काव्य करायला प्रोत्साहन दिलं. त्यांची काव्यरचना प्रकाशात आणली; मात्र आज पाहिलं तर देहू आळंदीच्या वीणामंडपात स्त्रीला कीर्तन करायला परवानगी नाही. माझे गुरू श्रीसंत तनपुरे महाराज मोठेच पुरोगामी होते. साने गुरुजींनी दलितांना विठ्ठल मंदिरप्रवेशाचा हक्क मिळावा म्हणून आंदोलन पुकारलं तेव्हा त्यांना या आंदोलनासाठी जागा द्यायला कुणीच राजी होईना. त्या वेळी तनपुरे महाराजांनी मठात त्यांना पाचारण केलं. आजही मठाची वाटचाल प्रगतीशील पद्धतीने सुरू आहे.’

0 Shares
साईड हिरो नाथशृंखला