साईड हिरो

अमेय गोगटे

ज्ञानेश्वरमाउलींच्या प्रेमात ओतप्रोत बुडाल्यामुळे मराठी प्रतिभावंतांनी निवृत्तीनाथांना न्याय दिला नाही. अपवाद एकटे ग. दि. माडगूळकर. त्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’ या सिनेमात निवृत्तीनाथ नेहमीप्रमाणे साईड हिरो नाहीत, तर मुख्य भूमिकेत आहेत

सीन १ : समाजानं बहिष्कृत केल्यानं हताश-हतबल होऊन रुक्मिणीबाई रडत आहेत. आपल्या कुटुंबाला शुद्ध करून घेण्याची विनंती करण्यासाठी विठ्ठलपंत धर्मसभेत गेलेत. रुक्मिणीबाईंच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू छोट्या निवृत्तीच्या गालावर पडताच, तो जागा होतो. आईची आस्थेनं विचारपूस करतो आणि तिला रागातच विचारतो, परत कशाला गेले बाबा ब्रह्मवृंदाकडे? कोण म्हणतो आम्ही धर्मबाह्य आहोत? धर्मबाह्य आहेत ते आळंदीचे पंडित. थोतांड आहे सारं. आपण पतीत कशासाठी?

सीन २ : विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी देहान्त प्रायश्चित्त घेतल्यानंतर तरी समाजानं आपल्याला स्वीकारावं म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई पैठणच्या धर्मपीठापुढे गेलेत; परंतु या संन्याशाच्या मुलांना समाजात स्थान नाही, त्यांनी देवाचं नामस्मरण करत जीवन कंठावं, असा निकाल ब्रह्मसभा सुनावते. तेव्हा निवृत्तीनाथ चिडतात आणि समतेचा अर्थ काय? असा सवाल करतात. सभेतील पंडित आणि रस्त्यावरचा सोम्यागोम्या सारखेच नव्हेत का? असं सर्वांसमोर विचारण्याचं धाडसही ते दाखवतात.

सीन ३ : पैठणहून निघाल्यानंतर छोटा ज्ञाना हताश झाला आहे. कुठे जायचं, कशाला जायचं, सार्‍यांच्या अवहेलना सहन करून कशासाठी, कुणासाठी जगायचं, असा प्रश्न त्याला पडलाय. तेव्हा, खरा धर्म प्रस्थापित करणं हाच तुझा धर्म आहे, हातपाय गाळू नकोस, श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलेली गीता तू पुन्हा सांग, मायबोलीत सांग, तुझ्या मुठीत श्रीकृष्णाच्या मुरलीचे स्वर आहेत, मुका राहू नकोस, नवा धर्म सांग, असा उपदेश निवृत्ती करतात.

सीन ४ : दादा, जिणं जड झालंय आता. जन्माच्या पलीकडे विठ्ठलभेटीला जायचंय, मला निरोप द्या, मला समाधी घ्यायचीय, अशी इच्छा ज्ञानदेव व्यक्त करतात. ती ऐकून निवृत्तीनाथांना धक्का बसतो. ज्ञानेश्वर प्रत्यक्ष समाधीस्थ झाल्यानंतर, समाधीस्थानी दगड लावताना तर त्यांना मुर्च्छा येते.

१९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’ या चित्रपटातली ही दृश्यं. संत निवृत्तीनाथ हे आदर्श मुलगा होते, जबाबदार भाऊ होते, मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक, गुरू होते, अनिष्ट रुढींविरोधात परखडपणे भाष्य करणारे विचारवंत होते आणि आपल्या भावांवर जिवापाड प्रेम करणारे मेणाहून मऊ स्वभावाचे वडीलबंधू होते. ही त्यांची वेगवेगळी रूपं चार प्रसंगांमधून ठळकपणे जाणवतात.

संत ज्ञानेश्वरांचं कार्य, त्यांनी रचलेली ज्ञानेश्वरी अलौकिक आहे. त्यांच्या या कार्यामागची प्रेरणास्थान होते, संत निवृत्तीनाथ. आपल्या धर्मात, अध्यात्मात गुरूचं स्थान सर्वोच्च मानलं आहे. आपल्या शिष्यातील सुप्त गुण हेरून, त्याच्यातील नवनवोन्मेषी प्रतिभेला चालना देण्याचं काम गुरू करत असतात. ते निवृत्तीनाथांनी वडीलबंधू या नात्याने केलं होतं आणि ज्ञानदेवांनी त्यांना गुरू मानलं होतं. ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’ या चित्रपटात या दोन भावांमधील हेच उत्कट, अद्भुत नातं प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे.

तैसी गुरुकृपा होये | तरी करितां काय आपु नोहे |
म्हणौनि तें अपार मातें आहे | ज्ञानदेवो म्हणे ॥

असं म्हणत निवृत्तीनाथांचे आशीर्वाद घेत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचण्यास सुरुवात केल्याचा प्रसंगही या चित्रपटात आहे. त्यातून निवृत्तीनाथांची थोरवी सहज लक्षात येते.

पण हा फक्त अपवाद. ज्ञानेश्वरांवर मराठीसोबतच हिंदीतही अनेक चित्रपट झालेत. त्यात निवृत्तीनाथ दुर्लक्षित साईड हिरो म्हणूनच भेटतात; पण निवृत्तीनाथांच्या कर्तृत्वाला न्याय देणारा मधुकर पाठक दिग्दर्शित ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’ हा एकमेव सिनेमा. त्यात ज्ञानेश्वरांपेक्षा निवृत्तीनाथांवर जास्त प्रकाशझोत आहे. त्याचं कारण ‘आधुनिक वाल्मिकी’ ग. दि. माडगूळकर हेच असावेत. त्यांनी या चित्रपटाचं लेखन केलंय. नावापासून प्रत्यक्ष सिनेमातही निवृत्तीनाथांची छाप या सिनेमावर आहे. गदिमा यामागे नसते तर असं घडू शकलं असतं का, प्रश्नच आहे. या संपूर्ण सिनेमाची भाषा ओघवती आणि प्रभावी आहे. गदिमांनी निवृत्तीनाथांचं क्रांतिकारकत्व अधोरेखित करण्यासाठी हा सिनेमा घडवून आणला असावा. यातली गाणीही गाजली. त्यामुळं सिनेमा एका वेगळ्याच उंचीवर जातो. ज्ञानदेव, निवृत्तीनाथांच्या अभंगांबरोबरच गदिमांच्या लेखणीतूनच साकारलेली गाणीही यात आहेत. सी. रामचंद्र यांनी या गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. जगदीश खरे हा बालकलाकार या चित्रपटात निवृत्ती झालाय, तर ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांनी या सिनेमात मोठ्या निवृत्तीची भूमिका साकारली आहे. त्याशिवाय, रुक्मिणीबाईंच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, छोट्या ज्ञानेश्वराच्या भूमिकेत महेश कोठारेही आपल्याला भेटतात. या चित्रपटाला मराठी चित्रपट श्रेणीत प्रतिष्ठेचा ’फिल्मफेअर’ पुरस्कारही मिळाला होता.

१९६४मध्ये आणखी एका चित्रपटातून संत निवृत्तीनाथांचं दर्शन घडलं होतं. सिनेमाचं नाव होतं, ‘संत ज्ञानेश्वर’. ‘रंगलोग’चा हा सिनेमा हिंदीत होता आणि त्याचे दिग्दर्शक होते मणीभाई व्यास. ‘संतनिवृत्ती ज्ञानदेव’ हा पूर्ण ‘निवृत्तीमय’ झालेला सिनेमा होता, तर संत ज्ञानेश्वरमध्ये निवृत्तीनाथ तोंडी लावण्यापुरतेच होते. ‘ज्योत से ज्योत जलाते चलो’, या गाण्यानं या चित्रपटाला चारचांद लावले होते. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं संगीत आणि लतादीदी, मुकेशचा आवाज असा योग या गाण्यात जुळून आला आणि सिनेसंगीतप्रेमींचे कान आणि मनं तृप्त झाले. अभिनेता सुधीरकुमार या सिनेमात संत ज्ञानेश्वर झाला होता. त्याच्यासोबत सुरेखा, जीवन, उल्हास, असित सेन आणि सुलोचनादीदींच्याही या चित्रपटात भूमिका होत्या. सुलोचना याही सिनेमात निवृत्ती-ज्ञानदेवांची आई झाल्या होत्या, फक्त इथे भाषा मराठीऐवजी हिंदी होती.

त्याआधी १९४० ला ‘प्रभात’च्या ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटातून निवृत्तीनाथ मोठ्या पडद्यावर दिसले होते. अर्थात, या सिनेमात पूर्ण ‘फोकस’ ज्ञानदेवांवरच होता. १८ मे १९४० रोजी हा सिनेमा मुंबई आणि पुण्यात एकाच वेळी प्रदर्शित झाला होता आणि तब्बल ३६ आठवडे चालला होता. विष्णुपंत दामले आणि एस. फत्तेलाल या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. शाहू मोडक या ख्रिश्चन दलित कलाकाराला ज्ञानेश्वरांच्या भूमिकेसाठी निवडून ‘प्रभात’ने ‘भेदाभेद अमंगळ’ ही वारकरी संप्रदायाची शिकवण चित्रपटासोबतच प्रत्यक्ष कृतीतूनही जनमानसांत नेण्याचा स्तुत्य प्रयत्न केला होता. या चित्रपटात मधुकर हा छोटा निवृत्ती झाला होता आणि जनुभाई पंडित यांनी मोठे निवृत्तीनाथ रंगवले होते. ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’मध्ये ज्या निवृत्तीनाथांचं दर्शन घडतं, तसे आणि तेवढे निवृत्तीनाथ या सिनेमात दिसत नाहीत. प्रभातने ‘संत ज्ञानेश्वर’ हा चित्रपट मराठीसोबतच हिंदीतही प्रदर्शित केला होता. मराठी सिनेमाचं लेखन शिवराम वाशीकर यांनी केलं होतं, तर हिंदी चित्रपटाचे लेखक होते पं. आनंद. या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, हा चित्रपट अमेरिकेतही प्रदर्शित झाल्याची नोंद आहे.

‘संत ज्ञानेश्वर’ हेच नाव असलेला तिसरा चित्रपट १९८२मध्ये प्रदर्शित झाला होता. तो हिंदीत होता आणि बॉलिवूड स्टाइलने रंगवण्यात आला होता. त्याच नाचगाणी होती आणि कथेला थोडी फोडणीही देण्यात आली होती; पण मराठी प्रेक्षकांमध्ये तो वेगळ्या कारणामुळं चर्चेचा विषय ठरला होता. ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’मध्ये बाल ज्ञानदेव साकारणारे महेश कोठारे या सिनेमात मोठे ज्ञानेश्वर झाले होते, तर मोठ्या निवृत्तीनाथांच्या भूमिकेत सुधीर दळवी दिसले होते. आज आपण त्यांना पडद्यावरचे साईबाबा म्हणून ओळखतो.

या चित्रपटांनंतरही निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई यांच्यावर आधारित सिनेमे आले; पण ते गाजले नाहीत, फारसे यशस्वी ठरले नाहीत. ‘अशी ही ज्ञानेश्वरी’ या १९९२ सालच्या सिनेमात या भावंडांचं चरित्र नव्हतं. तर ज्ञानेश्वरीच्या आधारे समाजप्रबोधन हे सिनेमाचं कथानक होतं. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला कॅसेटकिंग गुलशनकुमार निर्मित २०००मध्ये प्रदर्शित झालेला ‘संत ज्ञानेश्वर’ हा सिनेमा यूट्युबवर आहे. त्यात अमन वर्मा ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत आहे आणि आदर्श गौतम हे निवृत्तीनाथ झालेत. निवृत्ती-ज्ञानदेवांमधील गुरू-शिष्याच्या नात्यावर या चित्रपटात भर देण्यात आला आहे. हा चित्रपट मराठीत डबही करण्यात आलाय. बहुधा हा मोठ्या पडद्यासाठी नाही तर तेव्हाच्या शिरस्त्याप्रमाणे धार्मिक विषयावरच्या व्हिडीओपटांपैकी एक असावा.

त्या पद्धतीचा आणखी एक सिनेमा म्हणजे ‘मुंगी उडाली आकाशी’. २००४मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट नावावरून मुक्ताईच्या आयुष्यावर बेतला असावा असं वाटतं; परंतु १९४०चा ‘संत ज्ञानेश्वर’ आणि ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’ या दोन सिनेमांचं कथानक एकत्र गुंफून हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. शाश्वत कुलकर्णी छोटा निवृत्ती तर केतन क्षीरसागरने निवृत्तीनाथांची भूमिका केली आहे.

या सगळ्या सिनेमांमधून भेटणारे निवृत्ती-ज्ञानदेव थोडेबहुत वेगळे असले तरी आजच्या भाऊबंदकीच्या काळात त्यांचं नातं बरंच काही शिकवणारं आहे. मोठ्या भावाला ‘वडील बंधू’ का म्हणतात, हे यातल्या निवृत्तीनाथांना  सहज लक्षात येतं. यातले ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आज इंटरनेटवर पाहता येतात. ते पाहताना एक प्रसन्न समाधान वाटतंच; पण ते तितक्याच ताकदीनं नव्या ‘रंगात’ करायला हवेत. थोडा अभ्यास केला तर गदिमांसारखंच संत निवृत्तीनाथांमधला ‘हिरो’ही एखाद्या चित्रकर्मीला नक्की दिसेल.

मोठ्या पडद्यावरचं निवृत्तीदर्शन

‘संत ज्ञानेश्वर’ (१९४०) मराठी, हिंदी

निर्मिती – ‘प्रभात’

दिग्दर्शक – विष्णुपंत दामले आणि एस. फत्तेलाल

लेखक – शिवराम वाशीकर

निवृत्तीनाथांच्या भूमिकेत जनुभाई पंडित, मधुकर

‘संत निवृत्ती ज्ञानदेव’ (१९६४) मराठी

निर्मिती – भागीरथी चित्र

दिग्दर्शक – मधुकर पाठक

लेखक, गीतकार – ग. दि. माडगूळकर

निवृत्तीनाथांच्या भूमिकेत श्रीकांत मोघे,  जगदीश खरे

‘संत ज्ञानेश्वर’ (१९८२) हिंदी

निर्मिती – गीतमाला पिक्चर्स

लेखक, दिग्दर्शक – एस. एन. त्रिपाठी

कलाकार – सुधीर दळवी

‘संत ज्ञानेश्वर’ (२०००) हिंदी

निर्मिती – गुलशन कुमार

दिग्दर्शक – धर्मेश तिवारी

लेखक – सी. के. मस्त

निवृत्तीनाथांच्या भूमिकेत आदर्श गौतम

‘मुंगी उडाली आकाशी’ (२००४) मराठी

निर्मिती – सुभाष परदेशी

लेखक – दिग्दर्शक राजू फुलकर

निवृत्तीनाथांच्या भूमिकेत केतन क्षीरसागर, शाश्वत कुलकर्णी

निवृत्तीनाथ साकारणं हे भाग्यच!

‘संत निवृत्ती ज्ञानदेव’ हा माझ्या कारकिर्दीतला दुसराच चित्रपट. वडील कीर्तनकार असल्यामुळे घरातलं वातावरण संस्कृतीसंपन्न, आध्यात्मिक होतंच. अशातच, हा सिनेमा केल्यानं सांस्कृतिकदृष्ट्या आणि मनाच्या विकासाच्या दृष्टीने खूप चांगला परिणाम झाला. एक मूलगामी विचार या निमित्ताने सुरू झाला. साक्षात ज्ञानदेवांनी स्वतःला निवृत्तीदासू का म्हणावं, असा प्रश्न अनेकदा मनात यायचा. त्यावर चिंतन करण्याची संधी सिनेमाच्या निमित्ताने मिळाली. स्वतः माडगूळकरांनीच या भूमिकेसाठी माझी निवड केली होती. विनायक सरस्वते आणि माडगूळकरांसोबत काम करताना, चार भावंडांच्या जीवनप्रवासाबद्दल बरेच नवे आणि  वेगळे पैलू कळले. सबंध जन्म पारायणं करूनही आपल्याला न उमगणारी ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांनी वयाच्या अठराव्या वर्षी लिहिली, याचा अर्थ त्यांनी किती सोसलं असेल, भोगलं असेल. त्यांना लिहितं करणारे, त्यांच्यातला उपजत कवी हेरणारे निवृत्तीनाथही थोरच म्हणायला हवेत. म्हणूनच, वयाच्या तिशीत संत निवृत्तीनाथांची भूमिका करायला मिळणं हे माझं भाग्यच समजतो.
– श्रीकांत मोघे, ज्येष्ठ अभिनेते

ज्ञानेश्वरपटांत असंही

‘प्रभात’च्या ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटात एक आगळा योग जुळून आला होता. त्याचे एक दिग्दर्शक विष्णुपंत दामले हिंदू ब्राह्मण, दुसरे दिग्दर्शक एस. फत्तेलाल हे मुस्लीम आणि प्रमुख कलाकार शाहू मोडक हे ख्रिश्चन दलित असा त्रिवेणी संगम या चित्रपटात पाहायला मिळाला. भारतीय चित्रपटसृष्टीतल्या धर्मनिरपेक्षतेचं हे आगळं उदाहरण मानायला हवं.

‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटात ज्ञानेश्वर साकारणारे शाहू मोडक हे धर्माने ख्रिश्चन होते. १९३२ मध्ये आलेल्या ‘श्यामसुंदर’ या चित्रपटातील कृष्णाच्या भूमिकेनं त्यांनी सिनेमात पदार्पण केलं होतं. त्यांचे वडील चर्चमध्ये फादर होते. पण, शाहू मोडक या नावावरून त्यांचा ख्रिश्चन धर्म कुणालाच कळला नाही. म्हणूनच, ज्या काळात जनमाणसावर जाती-धर्माचा प्रचंड पगडा होता, त्या काळातही शाहू मोडक यांचे ज्ञानेश्वराच्या रूपातील फोटो देवळांमध्ये लागले.

‘संत निवृत्ती ज्ञानदेव’ या चित्रपटाचे संगीतकार होते सी. रामचंद्र. त्यांच्याकडे हा सिनेमा दिला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण ‘इना मिना डिका’, ‘आना मेरी जान संडे के संडे’, ‘मै हू एक खलासी, मेरा नाम भीमपलासी’ ही त्यांची गाणी त्या काळात गाजली होती. त्यामुळे संतपटाला ते कसं संगीत देतील, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती; पण सी. रामचंद्र यांनी कमाल केली. ‘मुंगी उडाली आकाशी’ हे गाणं ऐकून खुद्द गदिमाही म्हणाले होते, ‘बावर्चीने आज श्रीखंड पुरीचं जेवण तयार केल्यासारखं वाटतंय.’

(इसाक मुजावर लिखित संतपटांची ‘संतवाणी’ या पुस्तकातील माहिती)

0 Shares
गाणं निवृत्तीचं मायबा, कान्होबा