ज्ञानकर्माच्या मार्गाने जातभेदाच्या पलीकडे

डॉ. सदानंद मोरे

बरं झालं मला ब्राह्मण जन्म दिला नाहीस, असं संत सावता माळी एका अभंगात म्हणतात. जातभेदाच्या विरोधी वारकरी बंडखोरीचा, हा अगदी सुरुवातीच्या अविष्कारांपैकी एक आहे.

बाराव्या-तेराव्या शतकातली स्थिती-परिस्थिती पाहिल्यास लक्षात येतं की त्यावेळी सामान्य जनांची सगळ्याच बाजूनं कोंडी झाली होती. ज्ञानाचा अधिकार स्त्री-शूद्रांना नव्हता. मुळात वेदाचा अधिकार हा तीन वर्णांनाच होता. चौथ्या वर्णाला आणि स्त्रियांनाही वेद अधिकार देत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर संस्कृत भाषेतलं ज्ञान सगळ्यांना खुलं करून द्यायचं अशा प्रकारचं ते धोरण होतं. ही कोंडी फोडण्यासाठी ज्ञानेश्वरांनी फार शिताफीनं काही गोष्टी केल्या.

व्यासांच्या काळात स्त्री-शूद्रांना संस्कृत कळत असेल, पण मधल्या काळात ते ज्ञान त्यांच्यापासून लुप्त झालं. पण म्हणून ते आता पुन्हा संस्कृतमध्ये सांगण्यात काही अर्थ नाही, आपण ते मराठीत सांगूया आणि स्त्री-शूद्रांना ज्ञानाचा अधिकार मिळवून देऊया, ही त्यामागे व्यापक भूमिका होती. पण ही भूमिका मांडताना त्यांना व्यवस्थेचा विरोध झाला असता. त्यामुळं योजनापूर्वक त्यांनी काही गोष्टी तेव्हा केल्या. भगवद्गीतेचा अर्थ समजावून सांगताना, व्यासांनी स्त्री-शूद्रांसाठी भगवद्गीतेची निर्मिती केली, असं ज्ञानेश्वर म्हणतात. गीता हीच मुळात स्त्री-शूद्रांसाठी आहे, अशा पद्धतीची भूमिका ज्ञानेश्वरांनी ठामपणे मांडली. गीता संस्कृतमध्ये लिहिली. ती स्त्री-शूद्रांसाठी आहे, संस्कृत स्त्री-शूद्रांना समजत नाही म्हणून तर मी गीतेचा अनुवाद मराठीत करतोय, असं शिताफीनं त्यांनी पटवून दिलं.

जन्माधिष्ठित उच्च-नीचतेला आव्हान देत सर्वांना परमार्थाचा, साहित्य व्यवहाराचा सारखाच अधिकार आहे, हे सांगण्यासाठी वारकरी संप्रदायाचा जन्म झाला. तेराव्या शतकातला हा वारकरी इथॉस हा जसा ज्ञानेश्वरांमध्ये प्रकट होतो, तसाच तो नामदेवराय आणि जनाईमध्येही प्रकट होतो. आणि तसाच तो सावतोबांमध्येही प्रकट होतो. मुळात ज्ञानाची मक्तेदारी मोडून ते ज्ञान सगळ्यांसाठी खुलं करणं, सर्वांना एका समान पातळीवर आणणं आणि साहित्य व्यवहार सगळ्यांसाठी खुला करणं यासाठीच वारकरी विचार जन्माला आला. अर्थात तो कसा जन्माला आला, त्याची क्रोनोलॉजी नेमकी काय आहे, हे शोधता येणार नाही. म्हणजे ज्ञानदेवांची अमुक एक ओवी आधी का नामदेव-सावता यांचा अभंग आधीचा असं हे स्पष्ट करता येणार नाही. पण हा जो काही वारकरी इथॉस आहे, तो मात्र या संतांमध्ये दिसतो.

भली केली हीन याति । नाही वाढली महंती ॥
जरी असतां ब्राह्मण जन्म । तरी हें अंगी लागतें कर्म ॥
स्नान नाहीं, संध्या नाही । याति कुळ संबंध नाहीं ॥
सांवता म्हणे हीन याति । कृपा करावी श्रीपती ॥

हा सावतोबांचा महत्त्वाचा अभंग. वारकरी संतांमध्ये सावता माळी हे सगळ्यात ज्येष्ठ त्यामुळं या अभंगात वारकरी संप्रदायात जातविषयक, वर्णविषयक मांडणीची सुरुवात सावतोबांनी केली, असं म्हणताही येईल. पण ते नेमकेपणानं सांगता येणार नाही. अशी मांडणी ही सगळ्याच वारकरी संतांनी केली. केवळ सावतोबांनी त्याची सुरुवात केली. अशी मांडणी करणंही कदाचित चुकीचं होईल, कारण कोण आधी कोण नंतर यापेक्षा ‘वारकरी विचार’ महत्त्वाचा आहे.

आता हा वारकरी विचार नेमका काय सांगतो, तर धर्माचा, अध्यात्माचा अधिकार ठरावीक लोकांमध्ये एकवटल्यामुळं स्त्री-शूद्रांना उपनयनाचा अधिकार नाही म्हणून विद्येचा अधिकार नव्हता. विद्येचा अधिकार नसल्यामुळं वेदांचा आणि त्यातल्या ज्ञानाचाही अधिकार नव्हता. अशा लोकांबद्दल कळवळा व्यक्त करणं आणि अधिकारांपासून वंचित असलेल्यांना त्यांचे अधिकार मिळवून देणं आणि त्यासाठी योग्य ती वातावरण निर्मिती करणं, त्यासाठी आवश्यक त्या कृती करणं या सगळ्या गोष्टी वारकरी विचारात येतात. वैदिक व्यवस्थेविरुद्ध बंड न करता वारकरी संतांनी ही कृती केली, हेच वारकरी विचाराचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

मग त्यांनी ही कृती कशी केली, हे स्पष्ट करताना एक उदाहरण मी देतो. ते म्हणजे तत्कालीन व्यवस्थेचं एक मोठं वर्तुळ आणि या वर्तुळातच असं एक छोटं वर्तुळ की जे उर्वरित भागापेक्षा वेगळं आहे. म्हणजे उर्वरित भागात विषमतेचा व्यवहार आहे, आणि या मोठ्या वर्तुळातल्या छोट्या वर्तुळात समतेचा व्यवहार आहे. एक असं वर्तुळ की जे सगळ्यांना सामावून घेईल, त्यांच्यात कोणताही भेद करणार नाही. ‘या रे या लहान-थोर । याती भलते नारी नर । करावा विचार । न लगे चिंता कोणाची ।’ असं पुढं तुकाराम महाराजांनी म्हटलं. तुम्ही कुठल्याही जातीचे असा, धर्माचे असा, स्त्री-असा वा पुरुष असा, वयानं किंवा जातीनं लहान असा वा थोर असा, सारे सारे या, असं हे सगळ्यांना सामावून घेणारं वर्तुळच वारकरी विचाराला अपेक्षित होतं.

या विचाराच्या मांडणीतच एक उपजत आत्मविश्वास होता. या मांडणीतूनच तो आला होता. ‘बरं झालं मी उच्चवर्णियात जन्माला आलो नाही, नाहीतर मला नसती कर्मकांडं करावी लागली असती’,असं सावतोबा म्हणतात ते याच विश्वासातून. पुढं तुकाराम महाराजांनी तर हाच आशय अतिशय तिखट भाषेत सांगितला आहे. त्याकाळी जात-वर्ण हे इतके डोक्यावर बसले होते, की त्यांनी थेट हे डोक्यावरचं ओझं पायाखाली नेण्याची भाषा केली. असं म्हणून त्यांनी त्या काळचं त्याचं महत्त्वच नष्ट करून टाकलं आणि ज्याला त्याला त्याच्या त्याच्या जागेवर आणून बसवलं. त्याच्या आधी ‘वेदु संपन्न होय ठायीं ।  परि कृपणु ऐसा आनु नाही।’ असं म्हणत ज्ञानेश्वरांनीही आपली भूमिका कोणत्या दिशेनं आहे, हे अगदी स्वच्छपणे सांगितलं आहे.

या सगळ्यातून जे वारकरी वर्तुळ तयार होईल, त्यातही वारकर्‍यांनी एक वेगळं विश्व तयार केलं. या वर्तुळात जे येतील ते विषमतेचा बळी ठरणार नाहीत, अशी भूमिका स्पष्ट केली. हे आणखी स्पष्ट करायचं तर त्याकाळी अस्तित्वात असलेली जातिव्यवस्था ही अर्थव्यवस्था आणि उत्पादनव्यवस्था होती. त्यामुळं पर्यायी उत्पादन व्यवस्था अस्तित्वात आली तरच ही व्यवस्था मोडून काढणं शक्य होतं. पण ती मोडणं ही एक दीर्घ प्रक्रिया असते. एकतर त्याच व्यवस्थेमधले आंतर्विरोध इतके तीव्र व्हायला हवेत की तिच्या बाहेर पडावं असं वाटेल. ‘आउट गो’ करावं असं वाटेल किंवा मग बाहेरून दुसरी एखादी व्यवस्था, समूह इथं येऊन स्वतःची व्यवस्था इथं आणेल तरच ते शक्य होतं.

पण संतांच्या काळात अस्तित्वात असलेल्या जातिव्यवस्थेतले आंतर्विरोध इतके प्रगट झालेले नव्हते. त्यामुळं ती व्यवस्था तशीच राहिली. ती मोडण्याचं सामर्थ्य कोणाचंच नव्हतं. कारण चार-चौघांचं ते काम नव्हतं. मग संतांनी काय केलं तर या असलेल्या व्यवस्थेत ते जे जे करू शकत होते ते ते त्यांनी केलं. व्यवस्थेत राहून त्यांनी वारकरी संतांनी तत्कालीन सामाजिक परिस्थितीला आव्हान दिलं. संतांचा सामाजिक विचार नेमका काय, हा भाग वरच्या काही विधानांमध्ये स्पष्ट झाला आहे. आता संतांच्या या सामाजिक विचारात धार्मिक-आध्यात्मिक विचार हरवतो आहे का, असा तुमचा प्रश्न. तर त्याचं असं आहे की धार्मिक विचाराचं सामाजिक इम्प्लिकेशन काय आहे, हे नीट दाखवून देता आलं नाही. कोणत्याही विचारसरणीमध्ये आपल्या सोयीनुसार माणसं पुढं जातात. पेलेल, झेपेल तिथपर्यंतच माणूस जातो. त्यापलीकडे जात नाही. हीच परिस्थिती नंतरच्या काळातही झाली. इतकंच काय तर वारकरी संप्रदायामध्येही झाली. पुढं जावं, अशी वारकर्‍यांकडून जी अपेक्षा होती. पण ते नाही पुढं जाऊ शकले, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

असं जरी असलं तरी संतांचा बहुजनवाद हा राजकीय बहुजनवादापेक्षा खूप वेगळा होता. राजकीय बहुजनवाद हा सत्ता केंद्रित आहे. सत्ता मिळवणं एवढंच त्याचं उद्दिष्ट आहे. अर्थात त्या काही गैर आहे, असं मी म्हणणार नाही. राजकारणात सत्तेचीच अपेक्षा असते. सत्ता म्हणजे वर्चस्व गाजवणं, या दृष्टीनं संतांसमोर सत्तेचा विचार नव्हता. मुळात त्यांना कोणावरही वर्चस्व गाजवायचं नव्हतं. त्यामुळं त्यांचा बहुजनवाद हा आध्यात्मिक प्रकारचा होता, असं म्हणता येईल.

ही सगळी संत विचारांची-आचारांची पार्श्वभूमी लक्षात घेतल्यावर संत जातिअंताचा विचार सूचित करतात; पण त्याचवेळी स्वतःच्या जातीचा ठामपणे उल्लेख करतात. सावतोबांनी त्यांच्या जातीचा उल्लेख आपल्या अभंगात केला आहे. पण तो करताना तो अभिमानानं केला आहे, असं आपल्याला म्हणता येत नाही. त्या उल्लेखातही एक प्रकारचा उपहास आहे. आमच्या जातीला मिळवण्यासारखं काहीही नाही, ही बाब त्यांना सूचित करायची आहे. जातीचा उपयोग करून उच्चवर्णियांच्या वर्तनावर टीका करणं, हे त्यांचं मुख्य टार्गेट आहे. म्हणजे ब्राह्मण ज्या अभिमानानं त्यांच्या जातीचा उल्लेख करू शकायचे, तसा अभिमान त्यात नाहीये. आपापल्या जातीच्या न्यूनगंडावर मात करण्यासाठी त्या त्या काळात निश्चित काही गोष्टी झाल्या असतील. म्हणजे काही तथाकथित खालच्या जातींनी आम्हीच कसे भारी होतो किंवा आम्हीच कसे मूळ राज्यकर्ते होतो किंवा आमची उत्पत्ती कशी वेगळ्या प्रकारे झाली आहे, असं विविध प्रकारे ठसवण्याचा प्रयत्न केला. या गोष्टी म्हणजे न्यूनगंडावर मात करण्याचाच एक प्रकार असतो.

इथं एक गोष्ट सांगितली पाहिजे, ते म्हणजे संत त्यांच्या जातीचा उल्लेख करतात तो या न्यूनगंडातून निश्चित नाही. त्यामागे एक वेगळी भूमिका आहे आणि ती कर्माशी निगडित आहे. त्याकाळच्या समाजव्यवस्थेत प्रत्येक जातीच्या वाट्याला एकेक कर्म आलं होतं. स्वतःच्या उपजीविकेसाठी ते त्याकाळी गरजेचं होतं. कुणी कुठलं कर्म करायचं, हे त्याकाळी जातीवरून ठरत होतं. मग संतांनी आपल्या स्वतःच्या कामाकडे कमी प्रतीचं म्हणून न पाहता त्या कामाच्या माध्यमातूनच परमार्थ विषद केला. म्हणजे नरहरींनी तो सोनार कलेच्या भाषेत मांडला. सेना महाराजांनी नाभिकाच्या भाषेत मांडला. सावतोबांनी तो शेतीच्या भाषेत मांडला. म्हणजे संतांनी कर्मव्यवस्था म्हणून जात स्वीकारली होती पण त्यातली उच्चनीचता, जात-वर्ण व्यवस्थेतले भेदाभेद हे मात्र नाकारले होते.

संतांची ही मांडणी निश्चितपणे नवी होती. नवी सांस्कृतिक मांडणी असंही त्याकडे पाहून म्हणता येतं. अर्थात त्यावेळी संस्कृती, सांस्कृतिक ही परिभाषा विकसित झाली नव्हती. कारण त्याकाळी धर्म ही एकमेव संकल्पना वरचढ होती. पण त्यांच्या त्या कृतीचं आज वर्णन करताना आजच्या परिभाषेत आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की वारकरी ही एक संस्कृती आहे. मघाशी म्हटलं त्याप्रमाणं मोठ्या वर्तुळातलं छोटं वर्तुळ विस्तारत चाललं आहे, असा त्याचा अर्थ आहे.

कर्म हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे. परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी कर्म सोडायची गरज नाही. भक्तिप्रधान कर्मयोग हाच वारकरी संप्रदायाचा संदेश आहे. मुख्य म्हणजे तो ज्ञानाधिष्ठित आहे. हा ज्ञानाधिष्ठित भक्तिप्रधान कर्मयोग सर्वच वारकरी संतांमधून व्यक्त झाला आहे. आपापल्या कामाच्या माध्यमातून समाजाची सेवा करणं, हेच तर सूत्र सावतोबांनी अधोरेखित केलं आहे.

0 Shares
रंग भरल्या जगण्यातलं समयाचं सुभाषित जोतिबाबा, तू मला ज्ञानेश्वर भेटलास