सावतोबांच्या अभंगात मिरची कुठून आली?

दिशा खातू

आपण जिला मिरची म्हणतो ती पोर्तुगीजांनी पंधराव्या सोळाव्या शतकात भारतात आणली. मग त्यापूर्वी होऊन गेलेल्या संत सावता महाराजांच्या अभंगात ती कशी काय आली?

प्रत्येक संताचा एक अभंग असतो. त्यामुळे तो सर्वसामान्यांना माहीत असतो. संत सावता माळी यांचाही असा अभंग आहे. शाळेच्या पुस्तकांमुळं अगदी तरुण पिढीलाही तो माहीत आहे.

कांदा, मुळा, भाजी । अवघी विठाबाई माझी ॥
लसूण, मिरची, कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥
मोट, नाडा, विहीर, दोरी । अवघी व्यापली पंढरी ॥
सांवता म्हणे केला मळा । विठ्ठल पाया गोविला गळा ॥1॥

या अभंगात मिरचीचा उल्लेख आला आहे. मिरची? मिरची तर भारतात पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात आणली, हे तर इतिहासाने मान्य केलंय. मग सावता महाराजांच्या काळात मिरची कुठून आली असावी? त्यामुळं काही संत अभ्यासकांचं म्हणणं आहे की, हा अभंग सावता माळी यांनी लिहिलेला नाही. तो नंतर जोडलेला आहे.

पण शेकडो वर्षांच्या काळात अनेक शब्दांचे अर्थ बदलतात. आज भारतात आपण ज्याला मिरची म्हणतो, तिच्यापेक्षाही इतर कोणत्या गोष्टीला तेव्हा मिरची म्हटलं जात असेल. विशेष म्हणजे आपण भारतीयच मिरचीला मिरची म्हणतो. बाकी सगळीकडे तिला चिलीसारखी वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे मिरची हा भारतीय भाषांमधला भारतीय शब्द आहे.

मिरची भारतात पोर्तुगीजांनी आणली, हे खरंच. त्याच्या आधी आपण काही तिखट खातच नव्हतो, असं होतं का? बिलकूल नाही. आपण हजारो वर्ष तिखट खाणारे आहोत, असे इतिहासाचे पुरावे सांगतात. पण आपण मिरचीच्या जागी खात होतो, ती होती काळी मिरी. आजच्या मिरचीने काहीशे वर्षांपूर्वी आपल्या स्वयंपाकघरांमध्ये काळी मिरीची जागा घेतलीय. तरी आजही काळीमिरी जगात मिठानंतर सर्वाधिक वापरला जाणारा स्वयंपाकाचा पदार्थ आहे. काळी मिरी हा भारताच्या मूळ मसाल्याच्या पदार्थांपैकी एक आहे. साधारण इ.स.पूर्व ३०००पासून भारतीय काळी मिरी खात असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

‘मनोसोउल्लासा’, ‘अन्नपिनविधी’ आणि आयुर्वेदाच्या विविध संस्कृत ग्रंथांमधे काळीमिरीचा उल्लेख ‘मरीच’ असा केला आहे. मरीच म्हणजे सूर्य किंवा सूर्यासमान. याचा अर्थकाळी मिरीत सूर्याएवढी शक्ती आहे.याच काळीमिरीला द्रविड भाषेत आणि द्रविडी हस्तलिखितांमध्ये ‘पिप्पली’ असं संबोधलं आहे. त्यावेळी काळीमिरीचे दोन प्रकार होते. आता मात्र एक प्रकार भारतातून जवळपास नामशेष झाला आहे. काळीमिरीसारखा दिसणारा आणि लांबट दाणे असणारा हा पदार्थ होता. त्याची चव अधिक तिखट होती.

मिरीला मिरची म्हटलं जात होतं का, हा तिढा सोडवण्यासाठी आम्ही जागतिक प्राचीन खाद्यपदार्थांचे अभ्यासक आणि अमेरिकेतले प्रसिद्ध कॉलमिस्ट हेन्री ट्वेक्सबरी यांना फोनवर विचारलं. ते कॅलिफॉर्निया कॉलेज ऑफ आयुर्वेदमध्ये आयुर्वेदिक जेवण या विषयाचे प्रोफेसर आहेत. ते म्हणाले, मरीचचं प्राकृत भाषेत मिरची झालं. पण मग परदेशी लोक काळी मिरीला पेपर का म्हणतात? दक्षिण भारतात विशेषत: केरळमध्ये काळी मिरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं होतं. त्यामुळं काळीमिरीचा व्यापारही तिथूनच केला जात होता. त्या भागात पिप्पली हे नाव प्रचलित असल्यामुळं परदेशी व्यापा-यांनी त्याचा अपभ्रंश करत पेपर हे नाव परदेशात रुढ केलं.

काळी मिरीचे दाणे कॉर्नसारखे असल्यामुळं कालांतरानं त्याला ‘पेपर कॉर्न’ असंही म्हटलं गेलं. पायपर निगरम या शास्त्रीय नावानं ओळखल्या जाणा-या वेलीची फळं म्हणजे मिरी. या वेलींची बागांमध्ये विशेष काळजी घेऊन लागवड करावी लागते. त्याच्या फळांवर प्रक्रिया करून मिरीचे दाणे बनवले जातात. पूर्वी मिरीचे ताजे हिरवे दाणेसुद्धा जेवणात, औषधासाठी वापरले जात होते. म्हणूनच त्यावेळी या काळीमिरीला ‘ब्लॅक गोल्ड’ असं संबोधलं जात होतं. पण आता ही उपाधी खनिज तेलाला दिली जाते. काळी मिरी ही सर्व मसाल्यांमधेच नाही, तर सोनं आणि हि-यांपेक्षाही महाग होती. काळी मिरी जेवणात वापरणं हा स्टेट्स सिम्बॉल होता.

इ. स. ४१०मध्ये मिरीचा वापर व्यापारात होऊ लागला. त्याच काळात हॅन्स आदिवासींनी रोमवर हल्ला केला. त्यावेळी बदल्यात ३ हजार पाऊंड अर्थात अडीच लाख मिरीची मागणी केली होती. इ.स.पूर्व पहिल्या शतकात होऊन गेलेला ग्रीस तत्त्वज्ञ स्ट्रॅबो यांनी जगभ्रमंतीचे अनुभव लिहून ठेवलेत. त्यानुसार इ.स.पूर्व १२१३ साली इजिप्तमध्ये काळी मिरी निर्यात केली जात होती. ही काळी मिरी कोचीहून मुंबईजवळच्या सोपा-याला समुद्रमार्गे नेली जात होती आणि तिथून परदेशी जाण्यासाठी जहाज सुटत असे. सोपारा हे सर्वात प्राचीन आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर होतं. या बंदरातून मालाची ने-आण करण्यासाठी सर्वाधिक भाडं आकारलं जात होतं. त्यामुळं निर्यात महाग होत असे.

ग्रीसशी भारताचे खूप जुने संबंध असल्याचं म्हटलं जातं. साधारण चौथ्या शतकापासून भारत ग्रीसमध्ये काळी मिरी पाठवत असे; पण ही काळी मिरी महाग असल्यामुळं फक्त ग्रीसच्या राजदरबारी आणि उच्चभ्रू लोकांमध्येच वापरली जात होती.
काळी मिरी जेवणाचा स्वाद तर वाढवतेच; पण त्यात औषधी गुणधर्मही असतात. सर्दी, कफ, पचनक्रिया, हर्निया, हृदयविकार इत्यादी आजारांसाठी काळी मिरीचा वापर केला जात होता. आयुर्वेदातही काळी मिरीला अधिक महत्त्व दिलं आहे. तसंच इजिप्तमध्ये ममीज बनवण्यासाठी काळी मिरी वापल्याचे पुरावे पुरातत्व शास्त्रज्ञांना मिळाले आहेत.

काळी मिरीचे एवढे फायदे असल्यामुळं युरोपियन भारताच्या शोध मोहिमेवर होते. कोलंबस भारतात काळी मिरी शोधण्यासाठी निघाला; मात्र तो पूर्वेकडं वळण्याऐवजी पश्चिमेकडं वळला. त्यामुळं तो अमेरिकेत जाऊन पोचला. तिथं त्याला आता आपण जिला मिरची म्हणतो ती मिळाली. तिच्या चवीवरून त्यानं तिलाच काळी मिरी समजण्याची चूक केली. म्हणूनच या मिरचीला ‘चिली पेपर’ असं म्हटलं जातं. पुढं संपूर्ण युरोपात हे चिली पेपर प्रसिद्ध झाले. म्हणजे मिरचीमुळे फक्त आपलाच गोंधळ झालेला नाही, तो कोलंबसचाही झाला होता.

सोळाव्या शतकात मिरची भारतात आली, असं म्हणतात; पण सोळाव्या शतकात मिरची वापरात येऊ लागली. पंधराव्या शतकाच्या शेवटी मिरची पहिल्यांदा भारतात आली. ती वास्को द गामामुळे. या मिरचीचा स्वाद सर्वात आधी गोव्याला चाखण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी स्थानिकांनी मिरचीला स्वीकारलं नाही. त्यावेळी काळी मिरीचा संपूर्ण व्यवसाय अरबांच्या ताब्यात होता. त्यांनी मिरचीच्या व्यापारात रस दाखवला नाही. त्यामुळं वास्को द गामानं आणलेले हिरे, सोने, चांदीची नाणी सर्व देऊन त्यांनी दोन किलो काळी मिरी घेतली. ती युरोपात विकून त्याला त्या सोन्यानाण्याच्या ६ पट संपत्ती मिळाली, अशी माहिती ‘डिस्कव्हरी ऑफ वर्ल्ड फूड’ या ग्रंथात लेखक अल्बर्ट शेली यांनी दिलीय.

सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी दक्षिण भारत काबीज केला आणि काळी मिरीचा व्यापार ताब्यात घेतला. त्याकाळात कोची हे काळी मिरीच्या आंतरराष्ट्रीय निर्यातीचं केंद्र बनलं. थेट कोची बंदरातून व्यापार सुरू झाल्यानं दरात घट झाली.काळी मिरीचा व्यापार संपूर्ण जगात होऊ लागला; पण त्याचवेळी भारतात मिरची मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. मिरची मूळची दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील आहे. अमेरिकेत इ.स. पूर्व ७००० वर्षांपासून आहे. तिथे मिरचीची लागवड इ.स.पूर्व ६००० वर्षांपूर्वी सुरू झाली.

वास्को दा गामानं चिली पेपर भारतात आणलं. भारतीयांसाठी पेपर म्हणजे मिरची; पण ही मिरची लाल रंगाची होती. मिरचीची वाढ ही भारतीय वातावरणात चांगल्या पद्धतीनं होत असल्यामुळं जगभरातल्या अनेक मिरची आणून प्रयोग करण्यात आले. आज साधारण ४०० प्रकारच्या मिरची मिळतात.

भारतीय स्वयंपाकघरात रोज वापरली जाणारी हिरवी मिरची ही मेक्सिकोमधली युबटेन मिरची आहे. भारतात काळी मिरीऐवजी मिरची मोठ्या प्रमाणात वापरण्याचं कारण म्हणजे मिरचीची कमी खर्चात लागवड होते. त्याला काही प्रक्रिया करण्याची गरज लागत नाही, जेवणात वापरण्यास सोपी आणि मुळात स्वस्त होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरची भारतातल्या प्रत्येक वातावरणात वेगवेगळ्या पद्धतीनं उगवते आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वापरली जाते. म्हणूनच आद्यसंत सावता माळी यांच्या काळात काळी मिरी असलेल्या मिरचीऐवजी भारतीयांनी चिली पेपरला सहज मिरची म्हणून स्वीकारलं.

0 Shares
नवज्वर काय आहे? अवघा रंग एक करणारा भजनाचा आनंद सोहळा!