अवघा रंग एक करणारा भजनाचा आनंद सोहळा!

रोहित पवार

राज्याचं तरुण नेतृत्व म्हणून उदयाला येणार्यां रोहित पवार यांनी फक्त रिंगणचा जुना अंक पाहून या अंकाला मोठी जाहिरात दिली. लोकांना देण्यासाठी अंक विकत घेतले. त्यांचे आभार मानतानाच त्यांनी लिहिलेला हा लेख देत आहोत.

सर्व सुखाचे सुख निर्मळ ।
कैसे दिसत आहे श्रीमुख निर्मळ ॥
सावत्या स्वामी परब्रम्हपुतळा ।
तनमनाची कुरवंडी ओवाळा ॥

संत सावता महाराज यांनी शेतात कष्ट करत लोकांना खरा मानवता धर्म समजावून सांगितला. भजन, कीर्तनाच्या रूपानं लोकांच्या मनातल्या अंधश्रद्धांचं तण उपटून काढून त्यांनी समाजमनाची मशागत केली. हे सांगायचं कारण म्हणजे, सावता महाराजांनी शेतीच्या माध्यमातून समाजामधे जनजागृती केली, तसाच शेती आणि अध्यात्म संस्कृतीचा धागा जुळण्याचा प्रयत्न सृजनच्या माध्यमातून झाला. खरंतर पंढरीची वारी आणि वारकरी हा महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक सांस्कृतिक प्रवाह आहे. भागवत संप्रदायात वारी हा आनंदसोहळा तर आहेच, शिवाय तो जगातील सर्वात मोठा स्वयंशिस्तीचा सोहळादेखील आहे. संपूर्ण जगाला विश्वशांती आणि आध्यात्मिक जीवनाची सुखी प्रणाली दाखवून देणार्‍या या सोहळ्यातील क्षेत्र पंढरी ही उभ्या महाराष्ट्राची लोकदेवता आहे.

वारकर्‍यांचं आराध्य दैवत असलेला विठुरायाच्या भजन, कीर्तनातून महाराष्ट्राची संस्कृती अधिकच प्रगल्भ झाली. भक्ती आणि शांतीची अनुभूती घेऊन विधायक जीवनशैलीची वाटचाल घडवणारा हा आनंद सोहळा नव्या पिढीतही संक्रमित होत राहिला. म्हणूनच आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानाच्या दुनियेतही भजन, कीर्तनाचं महत्त्व अबाधित राहिलं. याच अबाधित संस्कृतीला नव्या पिढीमध्ये आणखी रुजवताना सृजननं देखील थोडाफार हातभार लावला याचा खूप आनंद होतो आहे.

तंत्रज्ञानाच्या आणि आधुनिक जीवनशैलीच्या काळात आजकाल जी ग्रामीण-शहरी अशी काही दरी रुंदावताना दिसते आहे, ती मिटविण्यासाठी, तिला एकतेचं व्यापक रूप देण्यासाठी महाराष्ट्राचा हा लोकवारसा आणि आध्यात्मिक वसा फार महत्त्वाचा ठरणार आहे, हे जाणून घेऊनच मागील वर्षी ‘सृजन’च्या माध्यमातून भजन स्पर्धांची आखणी केली. खरंतर सुरुवातीला ‘सृजन’च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धाच्या रूपानं युवकांशी संवाद वाढला आणि युवकांमधील आजच्या जिज्ञासा, त्यांच्या अपेक्षा, वर्तनातील संस्काराची रेष अधिक गडद करण्यासाठी खेळाबरोबर त्यांना सृजनशील उपक्रमाची साथ देण्याची मला गरज वाटू लागली आणि त्यातूनच भजन स्पर्धेची कल्पना पुढं आली.

बारामतीत जगदगुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा मुक्कामी असतो. याच मार्गानं तो पंढरीकडे वाटचाल करतो. ही स्वयंशिस्त येणार्‍या काळात जीवनशैलीला आश्वासक आधार देण्यासाठी खूपच महत्त्वाची आहे, हे ठसवण्याचाही एक प्रयत्न यामागे होता आणि त्यातून सृजन भजनस्पर्धेची तयारी सुरू झाली. फक्त बारामती किंवा तालुक्यांचा काही विभाग अशी स्पर्धा न घेता ती संपूर्ण पुणे जिल्ह्यात घेतली जावी, असा विचार पुढं आला. या उपक्रमात मनापासून अनेक जणांनी सक्रिय योगदान दिलं आणि पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह संपूर्ण ग्रामीण भागात पहिली सृजन भजन स्पर्धा झाली. माझे बाबा आणि अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या एकसष्टीचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. खरंतर शेतकरी हा बहुसंख्येनं अध्यात्माशी जोडलेला आहे, संत आणि कृषी संस्कृती त्यामुळंच तर महाराष्ट्रात तो अबाधित नांदतो आहे.

ट्रस्टमधे गेल्या पन्नास वर्षात शेतीच्या उक्रांतीचे काम झालं. इथल्या शैक्षणिक संकुलात बहुसंख्येनं शेतकर्‍यांच्या मुली शिक्षण घेतात, महिला सक्षमीकरणाचं काम होत असलेल्या या ठिकाणी हा संत-कृषी संस्कृतीचा एका अर्थानं योग जुळून आला. खरंतर वारकरी संप्रदायातील काहींनी पर्यावरणाला हानिकारक असणार्‍या चळवळी केल्या. स्त्री-पुरूष समता आणि शेतकर्‍यांच्या अपेक्षांसाठीही काम केलं. त्यामुळंच ग्रामविकासापासून ते लोक सक्षमीकरणापर्यंत नवा विचारही लागलीचआत्मसात करणार्‍या वारकरी संप्रदायाचा वसा पुढं चालवताना गुणगोविंदाच्या ‘भजना’चा मान आम्हाला मिळाला, हे आम्हीही आमचं भाग्य समजतो.

या पहिल्या स्पर्धेत काही विभाग करून तिथं एका ठिकाणी काही तालुक्यांतील भजनी मंडळे एकत्रित बोलावून त्यांच्या विभागीय स्पर्धा घेतल्या गेल्या. त्यातून निवडलेल्यांची बारामतीत अंतिम फेरी झाली आणि कविवर्य मोरोपंत सभागृहात झालेल्या या देखण्या कार्यक्रमात पाच ते सात वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ भजन गायकांपर्यंत हजारो जण आनंदानं सहभागी झाले. या आनंदाला प्रोत्साहन आणि शाबासकीची थाप देण्यासाठी राज्यभरातील संत महात्म्यांच्या देवसंस्थांनांचे सर्व प्रमुख उपस्थित राहिले. वारी जसा आनंदसोहळा असतो, तसाच एक भजनसोहळा! या निमित्तानं बारामतीत पार पडला आणि आध्यात्मिक उंचीनं आम्हा सर्वांनाच कृतकृत्य केलं.

त्यानंतर यावर्षी सृजन भजन स्पर्धेचं दुसरं पर्व नुकतंच पार पडलं. यावर्षीचं खास वैशिष्ट्य म्हणजे पुणे, सातारा आणि नगर या तीन जिल्ह्यांची एकत्रित विभागीय सृजन स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा राज्यालाच नव्हे, तर भजनक्षेत्रात असलेल्या देशभरातल्या कोणालाही नवी दिशा देणारी ठरेल अशीच रचना झाली. भजन ही ऐकण्याची, अनुभूतीची कला असली तरी कान तृप्त होण्यासाठी ती प्रत्यक्ष पाहून ऐकली पाहिजे, अशी आजवरची धारणा आहे. मात्र या धावपळीच्या युगात ही आध्यात्मिक परंपरा नव्या पिढीनं उत्साहानं आत्मसात करण्यासाठी त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या‘कला’नं घेतलं जावं, अशी अपेक्षा यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला.

आज सर्वांच्याच हातातलं प्रमुख शस्त्र बनलेल्या ‘सोशल मीडिया’चा त्यासाठी आधार घेतला. सोशल मीडियाचा वापर हा विधायक कारणांसाठी झाला पाहिजे, हाही एक छोटा संदेश याद्वारे देण्याचा प्रयत्न झाला. भजनस्पर्धेसाठी स्पर्धेच्या ठिकाणीच जायचं असेल तर अनेक कारणांनी स्पर्धेतला सहभाग वंचित राहू शकतो, याची जाणीव पहिल्या पर्वात आली होती.

त्यामुळं इच्छाशक्ती आणि गायन, वादनाचा प्रचंड व्यासंग आणि क्षमता असूनही काही संघ यात केवळ वेळ आणि अंतरामुळं सहभागी झाले नव्हते, याची जाणीव ठेवून वॉटस्अप फेरीद्वारे स्पर्धेची सुरुवात करण्याचा निर्णय झाला. आश्चर्याची गोष्ट ही की नाविन्याला स्वीकारण्यात वारकरी संप्रदाय सर्वात अग्रस्थानी आहे, हा देखील अनुभव आणि प्रचिती आली.

तीन जिल्ह्यांमधून, अगदी दुर्गम भागातूनही भजनी मंडळांनी प्रतिसाद देत कोणाच्या तरी घरी, कुठंतरी एकत्र येऊन सर्वांनी मिळून म्हटलेलं भजन व्हॉटसअपवर ध्वनिमुद्रित, चित्रिकरण करून पाठवलं आणि त्यावर पहिली फेरी झाली. या पहिल्या फेरीसाठी तब्बल ३५०हून अधिक संघांनी सहभाग घेतला. एकाहून एक सरस आणि परीक्षकांनाही विचार करायला लावणारी सुश्राव्य भजनं या फेरीसाठी दाखल झाली होती. त्यामुळंच या वर्षीच्या दुसर्‍या पर्वाच्या स्पर्धेचा खर्‍या अर्थानं कस लागला.

यातून निवडलेल्या ९६ संघांची बारामतीत, शारदानगर इथल्या दिनकर सभागृहात उपांत्य फेरी झाली. महिला सक्षमीकरणाच्या पंढरीत हा अध्यात्माचा तीर्थसोहळा दिमाखदार झाला आणि या संघांतून निवडलेल्या २६ संघांमध्ये अप्पासाहेब पवार सभागृहात १६ जून रोजी अंतिम सोहळा झाला. याही स्पर्धेसाठी राज्यभरातल्या विविध संत महात्म्यांचे देवसंस्थांनांचे प्रमुख आणि विश्वस्त तेवढ्याच उत्साहानं, स्वयंस्फूर्तीनं उपस्थित राहिले, नव्या दमाच्या, नव्या पिढीच्या भजन कौशल्याला दाद देत त्यांना आशीर्वाद देत त्यांनी या स्पर्धेची उंची अशीच कायम ठेवून ती राज्याची करावी, राज्याला नव्हे तर देशाला दिशा देणारी ठरावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

सलग दोन वर्षातल्या भजन स्पर्धेनं वारीतील आनंद, उत्साह, चैतन्य, ऊर्जेचा अखंड सोहळा आम्हीही अनुभवला. आता जबाबदारी नक्कीच वाढली आहे. अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आम्ही यापुढील काळात सदैव अखंड प्रयत्नशील नक्कीच राहू आणि हा भजनाचा आनंद सोहळा, यापुढील काळातही असाच उत्तरोत्तर बहरत नेऊ, हेच यानिमित्तानं आश्वस्त करू इच्छितो!

0 Shares
सावतोबांच्या अभंगात मिरची कुठून आली? केदारी महाराज