आजही भेटते माहेरवशीण जनाई

अमृता देसर्डा

जनाई. संत सावता माळी यांची पत्नी. भेंड हे तिचं माहेर. गावात तिची एकही ठळक खूण नाही. तरीही जनाई इतकी वर्षं या गावात कशी कानोकानी टिकून राहिलीय? सावता@भेंड.

सूर्य डोक्यावर येऊन आग ओकत होता. उन्हानं जमीन चांगलीच तापली होती. आजूबाजूचा सगळा परिसर भाजून निघत होता. माळरानावर सावलीचा ठिपकाही कुठं नव्हता. वार्‍याच्या स्पर्शातूनही फक्त ऊनच होतं. अचानक मैलाच्या पांढर्‍या दगडावर काळ्या अक्षरात भेंड पाहिलं आणि भयाण उन्हातही बरं वाटलं. विचार आला, या रस्त्यावरून कधीतरी सावता माळी आणि त्यांची बायको जनाई दोघं मिळून गेली असतील.

आम्ही टेंभुर्णीपासून भेंडला जाण्यासाठी रिक्षा केली होती. हायवेवर गाड्यातरी होत्या. माणसांची चाहूलही होती. वरवडे सोडल्यानंतर रस्ता निर्मनुष्य होता. फक्त सूर्याचा ताप रखरखीत माळाला सोबत करत होता. त्यात जनाईच्या भेंडला तिला शोधायला चाललो होतो. उन्हात चमकणारे शेताचे हिरवे बारीक ठिपके मनाला दिलासा देत होते. पूर्ण सपाट पठारी भाग. कुठं चढ नाही. मोठी झाडंही नाहीत. फक्त मोकळी सरळ, तापलेली, पिवळसर रंगाची जमीन. असं काही अंतर गेलं आणि भेंड आलं.

भेंडमधे शिरलो. रिक्षावाला आम्हाला सोडून गेला. दूरपर्यंत रिक्षाचा आवाज येत राहिला. इतकं सामसूम. समोरच महादेवाचं देऊळ. देवळात गोष्टी करणारी तरुण मुलं. कांबळावर झोपाळलेली वयस्कर माणसं. गावच दुपारच्या उन्हात मरगळून गेलेलं. एका आजोबानं आमची चौकशी केली. देवळासमोरच्या घरात जायला सांगितलं.

अंगणात एक साठीच्या बाई शहाबादी फरशीचं अंगण पुसत होत्या. शंकुतला घुगे त्यांचं नाव. निवृत्त मुख्याध्यापिका. त्यांना ‘घरात येऊ का विचारलं?’ त्यांनी हातातलं काम पूर्ण केलं. पुसून झालेल्या पाण्याचा टब अंगणातल्या जास्वंदीला ओतला. मग आम्हाला आत घेतलं. मनात म्हटलं, ‘अरे, या तर जनाई. हातातलं काम पूर्ण करणं हा सावता माळींचा विचार प्रत्यक्षात राबवणार्‍या.’ घरात गेल्यावर त्यांनी आमची मायेनं विचारपूस केली. माठातलं थंड पाणी पाजलं.

सावता आणि जनाई यांच्याबद्दल त्यांना विचारल्यावर त्या सांगू लागल्या, ‘या गावात मी सत्तर सालापासून राहते. ताई, पन्नास वर्षांपूर्वी हे समोर आमचं मातीचं घर होतं. त्यावेळी सासरची माणसं उंबर्‍याच्या बाहेर पडू द्यायची नाही. जनाई तर खूप जुनी. इथंच लहानाची मोठी झाली. अरणला लग्न करून पाठवली. तिथं तिनं नवर्‍याला साथ दिली. विठ्ठलाची सेवा केली. तिच्याबद्दल मी काय सांगणार. मी शिक्षिका होते. वाचनाचा नाद लागला. सावता माळी आमच्या समाजातले. देव माणूस. त्यांच्याबद्दल एक पुस्तक घेतलं होतं. पण आमच्या नात्यातल्या एका माणसानं नेलं. वाचायचं राहून गेलं बघा.’
बोलत असताना शकुंतला ताईंच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्या पुन्हा म्हणाल्या, ‘तीसेक वर्षांपूर्वी दोन बायका इथं येऊन गेल्या. जनाईच्या नात्यातल्या. आता त्या या जगात पण नसतील. बहुतेक जवळच्या नात्याच्या असाव्यात. सगळा गाव पाहून गेल्या. जनाई भानवसे कुटुंबातल्या. आता भानवसे आडनावाचं गावात कुणी न्हाई. सगळी माळ्याची घरं घुग्यांची. माझी त्यांची गाठ काही पडली नाही. त्या भेटल्या असत्या, तर काही कळलं असतं मला. राहून गेलं. त्यानंतर त्या कधी आल्या नाहीत. पण गावात देवकर राहायचे. त्यांना सहा मुली. त्यांनी इथं जनाई-सावता यांचं देऊळ बांधायचं ठरवलंय.’
बोलता बोलताच त्यांनी आम्हाला देवळाच्या बांधकामाच्या जागी नेलं. जमिनीवर खोदकाम करून चार कॉलम उभे राहिले होते. माहिती विचारल्यावर त्यांनी देवकरांच्या मुलींचा पुन्हा उल्लेख केला; पण आता इथं त्यांचं कुणी राहत नाही, हेही सांगितलं. नंतर त्यांच्यासोबत आम्ही विठ्ठल मंदिरात गेलो. एक शंभर पावलांवर परबत कुटुंबानं बांधलेलं विठ्ठल मंदिर दिसलं.

एक लहानसा गुटगुटीत पोरगा सुरवातीपासून आमच्या मागोमाग फिरत होता. उदयराज त्याचं नाव. आम्ही काय बोलतो, हे ऐकायला तो उत्सुक दिसला. आम्ही त्याच्याशी ओळख केली. त्यानं आम्हाला सोबत केली. गावातल्या माणसांशी गाठ घालून दिली. आम्ही मंदिराच्या मंडपात बसलो. उदयनं गाभार्‍याची चावी मंदिराच्या गुरवांकडून आणली. गाभार्‍यात विठ्ठल, रखुमाई यांच्यासह सावता-जनाई यांचीही मूर्ती. कशी का असेना पण साकार जनाई पहिल्यांदाच दिसत होती.

देवळात इंदुबाई दळवी आणि वैशाली दळवी वारा खात निवांत पहुडल्या होत्या. आम्हाला बघून नऊवारीतल्या इंदुबाई उठल्या. आम्ही त्यांना मूर्तींबद्दल विचारलं. त्या म्हणाल्या, ‘या दोघांच्या मूर्ती देवकर कुटुंबात होत्या. त्यांनी इथं आणून ठेवल्या. आता देऊळ व्हायला लागलंय, तिथं त्यांची स्थापना व्हईल.’ इंदुबाई या लग्न होऊन भेंडला आल्या, त्याला चाळीस वर्षं होऊन गेली. आता नातवंडं, सून यांच्या सान्निध्यात जमेल तसा परमार्थ करत आनंदात जगत आहेत. त्यांच्यासोबत वैशालीताई आम्हाला गावाबद्दल उत्साहानं सांगत होत्या. बोलता बोलता त्यांना विचारलं, ‘तुम्हाला तुमचा संसार सुखाचा वाटतो का?’ यावर त्या हसल्या. म्हणाल्या, ‘ह्यांची साथ आहे तवर संसार सुखाचा व्हनार. सोबत असंल तरच संसार होतो. जगायला आणखी काय लागतं?’ वैशालीताई जगण्याचं सार बोलून गेल्या. त्यांच्या तोंडून जणू जनाईच बोलत होत्या.

दुपार चांगलीच अंगावर आली होती. गाव संध्याकाळची वाट पाहत होतं. आमचा नवा मित्र उदय उत्साहानं आमच्या सोबत उन्हात फिरत होता. गाव दाखवत होता. भूक लागली. पण गाव इतकं लहान की एकही हॉटेल नव्हतं. उदयनं आम्हाला रंजना गुरव यांच्या घरी नेलं. रंजनाताई तीस वर्षं मुंबईत राहिलेल्या. आता उतारवयात गावात राहायला आल्यात. विठ्ठल मंदिरातल्या पूजेचं काम त्यांच्या कुटुंबाकडे आहे. त्या म्हणाल्या, ‘ताई तुम्ही फिरून या. मी काहीतरी खायला करते. पोहे चालतील?’ आम्ही गावात गेलो. बर्‍याच घरांना कुलुपं होती. काही घरं पडकी होती. अर्ध्यावर घरांचे दगडांचे ढिगारे पडलेले होते. मी उदयला उत्सुकतेनं विचारलं, ‘उदय, ही घरं अशी पडकी का रे? आणि जी चांगली आहेत ती बंद का?’ ‘बरीच लोकं रानात राहत्याती. घर सोडून. त्यांनी बंगले बांधले. इथं र्‍हात न्हाईत. त्यांची घरं हायत ही. आणि काहीजण नोकरीसाठी शहरात गेली, त्यांची घरं बंद हाईत.’
चौकशी केल्यावर समजलं की शंभरेक कुटुंब गावातली घरं सोडून रानात राहायला गेली आहेत. भेंड परिसरात आजूबाजूला शेतातच घर बांधून त्यांच्या सोयीसाठी लोक राहत आहेत. भेंडची लोकसंख्या साधारण अडीच हजार. आणि मतदार पंधराशे. त्यातही एकदम जुनी मूळ कुटुंबं आता चार ते पाचच राहिली. बाकी सगळी कामानिमित्त स्थलांतरित झालेली. त्यामुळं गावात शुकशुकाट. गावात एक मशीद आहे. माळी आणि मराठा कुटुंबांची घरं तुलनेनं जास्त आहेत. शिवाय मुसलमान, गुरव, सुतार, चांभार, नवबौद्धांची घरं. गावातली मंडळी माहिती पुरवत होती.

मशिदीच्या शेजारी झाडाच्या सावलीत एक आज्जी आपल्या नातवंडांना घेऊन बसल्या होत्या. काही लहान मुलंमुली मस्त कॅरम खेळत होती. आम्ही त्यांच्याकडे गेलो. आजी झोपून त्या मुलांचा खेळ पाहत होत्या. आज्जींनी त्यांच्या गोधडीवर मला बसायला जागा करून दिली. त्या ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ या गोष्टीतल्या आज्जीसारख्या दिसत होत्या. त्यांचं हसणं खूप गोड. आम्ही तिथं बसलोय, हे पाहून घरासमोरच्या अंगणात गोष्टी करत बसलेल्या बायका तिथं उत्सुकतेनं आल्या. त्यांच्याशी बोललो. इथं का आलो, ते सांगितलं. आज्जी एका 13-14 वयाच्या मुलीच्या खांद्यावर हात टाकून म्हणाल्या, ‘ही माझ्या लेकाची पोर. खेळतीया बघा. माझ्याकडंच असती. हिला बघायला येत्यात माणसं. पण म्या घालवून देती त्यांना. अजून काय वय हाय व्हय पोरीचं प्रपंचात अडकायचं. हुंदडायाचं, खेळायचं वय हाय. लेकाला म्हणले, म्या हाय खंबीर. तिला बघायला. आपण जोव्हर हाओत, तोवर संसार सुटत न्हाई.’ आणखी एक आज्जी हे ऐकत होत्या. आम्ही त्यांना सावता-जनाईचा संसार सुखाचा झाला तसा तुमचा झाला का असं विचारलं, तर त्या म्हणाल्या, ‘माझा संसार सुकाचा झाला आशी पाटी लावू का मी आता? आणि तशी पाटी म्या लावलीच समजा, तर मंग संसार सुकाचा झाला असं व्हतंय व्हय? म्हणल्यानं व्हईल का सुकाचा संसार? कोण मला भाकरी आणून दिईल? आपली आपल्यालाच मिळवाया लागतीया.’ त्यांचं बोलणं इतकं प्रामाणिक होतं, ते ऐकून काय बोलावं क्षणभर समजलं नाही. पण एक गोष्ट समजली, या सगळ्या बायका खंबीर आहेत. जगणं काय हे समजून घ्यायला उत्सुक आहेत. आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो. मुलांशीही बोललो. त्यात सातवीत जाणारी वैष्णवी भेटली. वैष्णवी आमचं बोलणं मन लावून ऐकत होती. तिला सहज विचारलं, ‘तुला काय व्हायचं, वैष्णवी?’ तर ती काहीवेळ काहीच बोलली नाही. फक्त हसली. मग हळूच म्हणाली, ‘मला फक्त अभ्यास करायचाय आणि खूप शिकायचंय.’कुसुम मोरे भेंडची अंगणवाडी चालवतात. त्यांनाही या गावात येऊन पन्नास वर्षं उलटून गेली. आम्हाला खायला बोलावणार्‍या काकू आमच्या गप्पांत पुन्हा सामील झाल्या. त्या कुसुमताईंच्या कानात काहीतरी कुजबुजल्या. आधीच खूप भूक लागली होती. पुन्हा त्यांना खायला द्या कसं म्हणायचं; पण त्या दोघी काहीतरी खाण्याचा बंदोबस्त करायला गेल्या, हे लक्षात आलं. गावातल्या अनेक बायका झाडापाशी येऊन बोलू लागल्या.

एक बाई मला बाजूला घेऊन सांगू लागल्या, ‘ताई, माझे मालक जाऊन तीन वर्षं होऊन गेली. डोक्यावर परिणाम झाला होता त्यांच्या. रानातल्या विहिरीत पडून गेले. पन गाव लई चांगलं बघा. मला लई आधार हाय गावाचा. मुलगाबी सांभाळतोय. समाधानी हाय बगा मी. पण त्यांची लई आठवण येती कधीकधी.’ जनाईच्या रूपात गावातल्या बायका जणू माझ्याशी संवाद साधत आहेत, असं वाटून गेलं. नंतर गुरवांकडे खायला गेलो. याच बाई आमच्याशी बोलून थेट घरी गेल्या. घरातून चार इडल्या आणल्या आणि आम्ही गुरवांच्या घरी असताना आमच्या ताटात वाढल्या. घरात पोहे नव्हते; पण मग मोरेबाईंच्या घरातून रवा आणून आमच्यासाठी त्यांनी उपीट बनवलं होतं.

आमच्या भुकेची चिंता करणार्‍या गुरवकाकू, नवरा गेल्याचं दुःख दुमडून समाधानानं इडली वाढणार्‍या ताई, जनाबाईंच्या नात्यातल्या बायकांची भेट नाही झाली म्हणून डोळ्यांत पाणी आणणार्‍या शकुंतला ताई, नवर्‍यानं तरुणपणात दुसरी बायको केली म्हणून त्याला सोडून गेली चाळीस वर्षं भेंडमधे एकट्या राहणार्‍या आज्जी.. या सगळ्याच मला ग्रेट वाटू लागल्या. खाणं झाल्यावर गुरवकाकू म्हणाल्या, ‘ताई, तुमी इथं येऊन चूक केलीत. इथं काय न्हाई. तुमी अरणला जावा. समदी माहिती तिथं मिळंल. इथं येऊन काय उपेग झाला न्हाई तुमाला.’ त्यांना मी बोलू दिलं. गावात अजून थांबावं वाटत होतं.
आम्ही शाळेपाशी एका पारावर बसलो. उदय आमच्या सोबत होताच. एक आज्जी चालताना दिसल्या. उदयनं त्यांना हाक मारली. तो म्हणाला, ‘या जमुनाआज्जी. त्यांची सगळीजण रानात राहत्याती. ह्याच एकट्या गावातल्या घरात राहत्यात. अजुनी लोकांची धुणंभांडी करत्यात.’ आमच्याशी बोलता बोलताच जवळ आलेल्या आज्जींना उद्देशून उदय म्हणाला, ‘आज्जे, बस की वाईच, लई कामाची तू. हे पावने पुण्यातून आल्याती.’ त्या हसल्या आणि आमच्या शेजारी येऊन बसल्या. ‘दमलीस का गं पोरी, थांब तुला चहाला पैसे देती.’ असं म्हणत त्यांनी त्यांच्या लुगड्यातल्या वळकटीतून चुरगळलेली दहाची नोट माझ्या हातात कोंबली. मी नाही म्हणत होते, तर आग्रही आवाजात म्हणाल्या, ‘घे. न्हाई म्हणू नगं. इतक्या लांबून आलीस. चा तर पिऊन जा. घे.’त्यांच्या प्रेमळ आवाजानं नाही म्हणण्याची हिंमत झाली नाही. गप्पा रंगल्या. त्याच ओघात त्यांनी लग्नात म्हणायचं हळदीचं गाणं म्हणून दाखवलं. मग म्हणाल्या, ‘पोरी मला काम हाये, म्या जाते.’ मला पुन्हा जनाई भेटल्या. सतत कामात राहणार्‍या. जणू म्हातार्‍या जनाई.

जमुना आज्जी घरकाम करतात, पण त्याबदल्यात अन्न-धान्य घेतात. आजही त्यांना जगायला फारसे पैसे लागत नाहीत. दोन वेळेला गावात कुणीही जेवायला घालतं. गुरव कुटुंबाचंही तसंच काहीसं. मंदिरात पूजा करतात म्हणून गावातले लोक त्यांना धान्य, भाजीपाला पुरवतात. कष्ट करणारं माणूस आणि देवाची सेवा करणारं कुटुंब उपाशी राहणार नाही, याची काळजी घेणारं हे गाव गुण्यागोविंदानं राहत आहे, हेच निरीक्षण मनाशी घेऊन आम्ही अरणला आलो. भेंड ते अरण हा प्रवास मोठ्या कष्टाचा. तशी ही शेजारी शेजारी असणारी गावं. पण या दोन्ही गावांना जोडणारी एकही एसटी नाही. भेंडला कुर्डुवाडीहून सकाळी आणि संध्याकाळी एसटी येते. शाळा सातवीपर्यंतच. गावात बँक नाही की पतसंस्था नाही. बँकेत जायचं, किंवा काही आणायला जायचं तर सकाळच्या एसटीनं कुर्डुवाडीला जायचं, आणि दिवसभराची कामं उरकून संध्याकाळच्या एसटीनं पुन्हा गावी परतायचं. इतरवेळी गावात यायचं असेल किंवा गावाबाहेर जायचं असेल तर स्वतःच्या वाहनाशिवाय पर्याय नाही.

आम्हाला अरण गाठायचं होतं. गुरवांच्या मुलानं स्वतःची टू व्हिलर काढली. आणि आम्ही अरणला निघालो. मातीचा ओबडधोबड रस्ता. वाटेत गुरवांच्या मुलानं गाडी चालवता चालवता सांगितलं, ही बाजू भेंडची आणि ही बाजू अरणची! जनाईचं माहेर एका बाजूला आणि सासर दुसर्‍या बाजूला. एका गावची मुलगी दुसर्‍या गावची सून होण्याच्या सीमारेषेवरून आम्ही जात होतो. तेव्हाच वाटलं पुन्हा एकदा जनाईच्या माहेरी म्हणजेच भेंडला जावं आणि तिला पुन्हा शोधावं. अरणला पोचलो. थेट मंदिरात. ऊन उतरल्यावर गावात एक फेरफटका मारला. सावतामाळी यांचं जुनं घर पाडून सरकारच्या एका विकास योजनेतून त्यांच्या घराचं बांधकाम करण्यात आलं आहे. त्या घरी जाताना गावातल्या बायका आपापल्या घरातल्या दारांशी गोष्टी करीत बसल्या होत्या. मी त्यांच्यात सामील झाले.

त्यांना सावतामाळी-जनाई यांच्याबद्दल विचारलं, तर एक आज्जी थरथरत्या आवाजात म्हणाल्या, ‘त्यांच्याबद्दल खूप गोष्टी ऐकल्यात. वाचल्यात. त्यावरून तुला सांगते. दोघंजण खूप सहनशील होते. गावातल्या लोकांनी खूप त्रास दिला त्यांना; पण दोघांनी सहन केलं. समजुतीनं घेतलं. दोघांचा संसारही खूप एकजीव होता. मिसळून राहायचा त्यांचा स्वभाव होता. आता त्यांच्यासारखी समजूतदार जोडपी मिळायची नाहीत बघ.’
जनाई जिथं नांदली ते ठिकाण आलं. जुनं घर पाडून आता तिथं नवी दुमजली इमारत उभी राहिलीय. ते पाहून थोडं वाईट वाटलं. या घरात सावतामहाराजांचं चित्ररूप चरित्र लावलंय. या चरित्रात सावतोबा, त्यांचं कुटुंब, मुलगी नागू, आणि जनाईंचं चित्र दिसलं. क्षणभर का होईना सावता आणि जनाई त्या घरात राहतायंत, असं जाणवलं. मनात आलं आम्ही ज्या रस्त्यानं आलो, त्याच रस्त्यानं जनाई भेंडहून अरणला आली असेल का? पुन्हा दुसरा प्रश्नही मनात आला, ती इथं आली तर मग ती इथं जाणवत का नाही? कारण सावतोबांबरोबर जनाई या गावात आली आणि तिनंही हे गाव आपलंसं केलं. त्यांची विठ्ठलभक्तीही आपलीशी केली. म्हणून तर त्यांचा संसार फुलला. समतेचा झाला. पण अरणमधे चित्ररूपानंच फक्त जनाई भेटते. सावतोबांच्या मंदिरात, मळ्यात कुठंच तिच्या खाणाखुणा सापडत नाहीत. पुन्हा तिला भेटून जावं, असं वाटलं. भेंडची वाट खुणावू लागली. रात्र होत आली होती. जवळच वाडीकुरोली गावात मित्राकडे मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी त्याची गाडी घेऊन पुन्हा भेंड गाठलं. गावातली माणसं ओळखत होतीच. देवळात नेहमीप्रमाणं उदय आणि त्याचे मित्र बसले होते. भेटल्या भेटल्याच उदयनं काल भेट न झालेल्या नानांच्या घरात नेलं.

नाना म्हणजे नामदेव शिदु घुगे. वय वर्षे पंच्याऐंशीच्या पुढं. तरीही रुबाबदार. त्यांच्या घरात सावता माळी आणि जनाबाई यांचा मोठा फोटो होता. त्या फोटोखाली बारीक अक्षरात ‘संत जनाबाई सावता माळी देवस्थान ट्रस्ट, भेंड.’ असं लिहिलं होतं. नामदेव घुगे यांच्यासोबत त्यांचा मुलगा नवनाथ घुगे हेही होते. या फोटोबद्दल आणि ट्रस्टबद्दल आम्ही विचारलं. नवनाथ घुगे म्हणाले, ‘हे गाव संतपत्नी जनाईंचं भेंड’ म्हणून ओळखलं जावं यासाठी 2011 मध्ये आम्ही हा ट्रस्ट बनवला. जनाई या सावतोबांच्या उत्तम सहचारिणी होत्या. त्यांच्यासोबत त्याही मळ्यात काम करायच्या. संसार सांभाळत देवाची भक्ती करायच्या. सावता माळी पंचक्रोशी सोडून कधीही कुठं गेले नाहीत. आपलं काम, आपलं घर आणि विठ्ठलभक्ती यातच ते गुंग असायचे. दिवसभर दोघंही मळ्यात राबून संध्याकाळी ते जोडीनं पंचक्रोशीतल्या गावांमध्ये जाऊन कीर्तन, भजन करायचे. जनाईदेखील त्यांना यात साथ द्यायच्या. त्याही अभंग म्हणायच्या. कीर्तन करायच्या. पुढं त्या सावता महाराजांच्या शिष्या झाल्या. सावतोबांच्या प्रत्येक कामात त्यांचा सहभाग असायचा. त्यांना सन्मान मिळावा आणि गावाच्या इतिहासात जनाईंची नोंद टिकून राहावी म्हणून लोकसहभागातून ‘संत जनाबाई सावता माळी देवस्थान ट्रस्ट’ स्थापन केला. त्याद्वारे आता जनाईंच्या मंदिराची पायाभरणी केलीय. या परिसरात जनाई जन्मल्या, राहिल्या आणि इथंच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं राहतं घर होतं, त्याच ठिकाणी मंदिर उभं करण्याचं काम ट्रस्टच्या वतीनं सुरू आहे.’

नवनाथ घुगे यांच्या मते, सावता माळी गेल्यावर जनाई यांनी अन्न-पाणी सोडून दिलं. त्यांची तब्येत बिघडली. म्हणून अरणवरून त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी त्यांना माहेरी भेंडला आणलं. या गावातच त्यांचा मृत्यू झाला.या ट्रस्टची स्थापना अकरा लोकांनी मिळून केलीय. त्यात देवकर, घाडगे आणि घुगे या मंडळींनी पुढाकार घेतला आहे. हा ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर गावाचा तीर्थक्षेत्र ‘क’ मध्येे समावेश झालाय. त्यामुळं नवा रस्तादेखील गावात झालाय. भेंड गावातूनही अनेक दिंड्या जातात. दिंडीतल्या वारकर्‍यांसाठी विसाव्याचं ठिकाण म्हणूनही जनाईंचं मंदिर बांधायचंय, असंही कारण त्यांनी सांगितलं.

नामदेव घुगे यांनी तर आणखीनच वेगळी माहिती दिली. ते म्हणाले, ‘आम्ही भेंडला दरवर्षी जनाईची यात्रा भरवतो. भानवसे-माळी कुटुंब आता हिथं न्हाई. त्यांच्या पिढ्या कधीच टेंभुर्णीत गेल्या. त्यांची नातेवाईक मंडळी अधूनमधून यायची. अनेक पाहुणे येऊन गेले. मग पिंपळकुट्याचे देवकर माळी त्यांच्या घरात राहायला आले. आता तेबी न्हाईत. पण ही जागा हाये. त्यांनी तयार केलेली जनाईंची मूर्ती हाये. तीच आता नवीन मंदिरात स्थापन करणार हाये.’ ते एक वेगळीच माहिती सांगतात, ‘मला हे फक्त ऐकीव माहीत हाये. त्याचा काही पुरावा न्हाई. पण लहानपणापासून म्या ती ऐकली हाये. सावता माळींचा मुलगा विठ्ठल हा तरुणपणी कीर्तनकार व्हता. लई अभ्यासू पण व्हता. आत्ता अरणला संजीवन समाधी हाय महाराजांची, तिथंच त्यांनी बी समाधी घेतली. त्याची खूण पन हाय म्हणं मंदिरात. पण कुणी त्याबद्दल काही बोलत न्हाई. गुमान राहत्यात. गावात कुलकर्णी हाय, खूप आधीपासूनचा त्यांनी स्वतः ही गोष्ट सांगितली हाये. आता तेच्यादेकील खूप पिढ्या जन्मून आणि मरून गेल्या. पण ही एक गोष्ट माझ्या चांगली लक्षात हाय. आपून फक्त ऐकायचं. बाकी खरं देवालाच ठावं.’ मग आम्ही जनाईचं देऊळ बांधलं जातंय, तिथं गेलो. तिथून जनाईचा जन्म झाल्याची जी जागा सांगितली जाते, तिथंही गेलो. ही जागा या प्रस्तावित मंदिराच्या जागेपासून काही पावलांवरच आहे. ती जागा आता संतोष माळी यांनी विकत घेतलीय. त्या जागेचे एक-दोन फोटो घेऊन आम्ही गावातल्या विठ्ठलाच्या मंदिरात गेलो. एकादशी असल्यानं मंदिरातला विठ्ठल पुजार्‍यांनं मस्त सजवला होता. तो माझ्यावर कालच भेंडमध्ये आले तेव्हापासून प्रसन्न झालाय.

आम्ही गेलो, तोच उदय आणि त्याच्या दोस्तमंडळींनी गावातल्या काही बायकांना मंदिरात गोळा केलं. जानकीबाई, जमुनाबाई, पार्वतीकाकू, इंदूबाई, वैशालीताई सगळ्याजणी जमल्या. जानकीबाईंनी जनाई-सावता यांचं एक गाणं म्हटलं. जनाईकडे विठ्ठल आला आणि त्याला तिची वाकळ आवडली. त्या वाकळवर विठ्ठलानं आराम केला आणि जनाई आपल्या कामाला लागली, असा आशय होता.

खरंतर हे लोकगीत सावतोबांच्या पत्नी जनाई यांच्याविषयी नाही, तर नामदेवांची दासी संत जनाबाई यांच्याविषयीचं आहे. दोघीही एकाच काळातल्या. जना तेव्हाचं कॉमन नाव असणार. दोघी एकमेकांना भेटलेल्या असतीलच. एकमेकींच्या मैत्रीणीही असतील. किमान संतांचा मेळा तीर्थयात्रेला निघाला, तो सर्वात आधी अरणला आला. तिथं त्यांची भेट झाली असेलच. त्यामुळं ही जनाई असो वा ती जनाई. दोघी एकाच विचाराच्या. गाण्यातलं श्रमप्रतिष्ठेचं महत्त्व दोघींच्या बाबतीतही सारखंच.

त्यातल्या एका आज्जींनी ‘सावता सुखाचा सागर, सावता प्रेमाचा आगर’ हे गाणं म्हटलं. याच अर्थाचा संत नामदेवांचा एक अभंग आहे. त्यात त्यांनी सावतोबांच्या स्वभावाचं वर्णन केलंय. त्यात सांगितलेलं सावतांचं प्रेम जनाईत पाझरलं असेल. कदाचित जनाईंचंच प्रेम सावतोबांत पाझरलं असेल. बहुतेक दोघांच्याही प्रेमातून सावता सागर बनला असेल.

भेंडला आलो की ते प्रेम आजही अनुभवता येतं. लहान वैष्णवीपासून ते वयस्कर जानकी, जमुनाबाई यांच्यापर्यंत. सतत कष्ट करत राहणार्‍या, रोजच्या जगण्यातून, कामातून, सततच्या व्यग्र राहण्यातून जनाईचा अंश इथल्या बायांमधे मुरला आहे. जगण्याबद्दलचं अतोनात प्रेम आहे त्यात. आपल्या संसारात स्वतःचं अस्तित्व विसरून एकरूप होण्याची ताकद आहे त्या प्रेमात.

त्यामुळं आज सावता सगळ्यांना माहीत आहेत. जनाई कुणालाच नाही. तेच जनाईचं मोठेपण आहे. तिच्या गावातही तिची खूण नाही. तरीही ती आहे. पिढ्यान्पिढ्या कानोकानी ती वाहत आलीय. आता ती माझ्यापर्यंतही पोहचलीय. तिच्या प्रेमाच्या सागरात मीही वाहून गेलेय.

0 Shares
भक्तीच्या हायवेवरचं टाईममशीन विठोबाच्या गावात सावतोबांचा शोध