विठोबाच्या गावात सावतोबांचा शोध

सुनील इंदुमान ठाकरे

सावतोबा पंढरपूरला कधी गेलेच नाहीत, असं म्हणतात. तरीही सावतोबा पंढरपुरात सापडतात. मात्र ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी सहजपणे दिसत नाहीत. त्यांचा शोध घ्यावा लागतो. सावता@पंढरपूर.

सगळे संत पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले. पण पांडुरंग संत सावता माळी यांना भेटायला अरणला गेला. त्यामुळे सावतोबा काही आले नाहीत. ही गोष्ट पंढरपुरात सगळ्यांच्या डोक्यात पक्की असावी. त्यामुळे ‘सावतोबा कुठे भेटतील?’ यावर ते इथे कसे काय सापडणार?, हा प्रश्नच माझ्या प्रश्नांचं उत्तर म्हणून यायचा. तरीही त्याच प्रश्नाचं पंढरपूर स्टाईलचं टिपिकल उत्तर तयार होतंच. ते म्हणजे, ‘मठात गवसतील सावतोबा’.

मठात तर जायचं होतंच. त्याआधी सावतोबा मठाच्या पलीकडे पंढरपुरातल्या कानाकोपर्या,त शोधायचे होते. या शोधात सर्वात आधी भेटले ते, सुभाषकाका देवमारे. केंद्रे महाराजांच्या मठामागे सुभाषकाकांचं घर. सागवानी दारावर संत सावता माळी यांची प्रतिमा कोरलीय. पंढरीतल्या सावतोबांच्या शोधात सुभाषकाका ही एक खूप मोठी लिंक होती. कारण त्यांचं कनेक्शन साक्षात पंढरीनाथाशी होतं.

सुभाषकाका १९८४पासून विठ्ठलमूर्तीसाठी हारतुरे करतात. रोज चार हार, पगडीसाठी पाच तुरे आणि १००१ तुळशींची व्यवस्था ते नित्यनेमानं करत आहेत. रुक्मिणीमातेसह देवळातल्या बाकीच्या देवांची फुलं आप्पा माळी पोचवतात. आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी एकादशीसाठी फुलांची विशेष तरतूदही त्यांना करावी लागते. मंदिर समितीच्या वतीनं केवळ ३२ लोकांना दर्शनमंडपात हारफुलं विकण्याचा परवाना आहे. त्यातही प्रत्येकाला सहा तास अशी आठ विक्रेत्यांची बॅच ठरवली जाते. माळी समाजाचे जवळपास ५०० उंबरे या व्यवसायावर पूर्णपणे अवलंबून आहेत.

संत सावता आपल्या मळ्यातल्या फळाफुलांत रमायचे. फुलांची शेती हा त्यांचा व्यवसाय. त्यामुळे त्यांच्या पांडुरंगाच्या पंढरीतली फुलांची बाजारपेठ पाहायलाच हवी. सुभाषकाकांसोबत संतपेठेतल्या फूल मार्केटमध्ये गेलो. डोळ्यांचं पारणं फेडावं, असं फुलांचं जग तिथं पाहायला मिळालं. महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यामागे हा फुलांचा बाजार सजतो.

‘फूलविक्रेता संघा’चे अध्यक्ष असलेले सुभाषकाका रोज विठ्ठलासाठी इथूनच फुलं नेतात. फुलं ही किलोनं किंवा नगानं मिळतात, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र तुळशी कशी मिळत असेल? तुळशी म्हणजे वारकर्यांवचा प्राण. सुभाषकाकांना विचारलंच, ‘काका, तुळशीचे रेट कसे ठरवतात?’ काकांनी तेवढ्याचं श्रद्धेनं म्हटलं, ‘तुळशी ही अमूल्य असते. तिचा भाव केला जात नाही. तिच्यात भाव ओतला जातो. पण फूलविक्रेते त्यांच्या सोयीसाठी तुळशीच्या जुड्या करतात. त्याचा विशेष मोलभाव होत नाही.’

सीझनप्रमाणे मार्केटमध्ये फुलं येतात. काही खूप लांबून, तर काही आजूबाजूच्या ग्रामीण भागातून. रोज २० हजार गुलाब, ५०० किलो मोगरा, ५०० किलो अस्टर, ५०० किलो झेंडू, २५ किलो कण्हेर, 100 किलो शंकेश्वर, ३०० पेंड लिली, ५०० किलो गुलछडी, २५ गठ्ठे तुळस विकली जाते. असा बडा व्यवसाय करणार्याल फूलवाल्यांना सावतोबांविषयी विचारलं. पण ते धंद्यापलीकडे काहीच बोलू इच्छित नव्हते. सावतोबांच्या फुलांच्या मळ्यात साक्षात विठोबा होता. पंढरीतल्या फूल मार्केटमध्ये सावतोबा मात्र नाहीत.

तरीही माझ्या डोळ्यासमोर सावतोबांचा फुललेला मळाच होता. सावतोबा देवाचं नाव गुणगुणत आपल्या मळ्यात काम करत असतील. काम करता करता त्यांना अनेक अभंग सहज स्फुरत असतील. मग ते कधी लिहून काढत असतील? सोबत कागद-पेनसारखं काही जवळ बाळगत असतील काय? घरी येऊन ते आपल्या वहीत उतरवत असतील? या प्रश्नांचं उत्तर संत जनाबाईंनी देऊन ठेवलंय. त्यांचा अभंग प्रसिद्धच आहे,

ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दा।
चिदानंद बाबा लिही त्यास॥

या अभंगात वेगवेगळ्या संतांचे लेखनिक कोण याची नोंद करताना त्यांना सावतोबांचे लेखनिक म्हणून काशिबा गुरव यांचं नाव दिलंय. जनाबाईंचे उपकार आहेतच आपल्यावर.

सावत्या माळ्याचा काशीबा गुरव।
कर्म्याचा वासुदेव काईत होता॥

सावतोबांचं माहीत नाही, पण त्यांचे अभंग लिहून काढणार्याह काशिबा गुरवांचा प्रेझेंट अॅ्ड्रेस मात्र पंढरपुरातच आहे. कारण त्यांचं एकमेव देऊळ पंढरपुरातच आहे. त्यांच्या गावी म्हणजे अरणमध्येही नाही. विठ्ठल मंदिर महाद्वाराजवळ संत काशिबा महाराजांचं देऊळ आहे. काशिबांचे वंशज माऊली महाराज गुरव यांना फोन करून मठाच्या शोधात निघालो. महाद्वाराकडे तोंड केल्यावर उजव्या हाताला बोळीत काही पावलांच्या अंतरावर हे दोन मजली देऊळ सापडतं. आत गेल्यावर ‘राम, कृष्ण, हरी’च्या तीन मूर्ती दिसतात. त्याच्याच पुढे काशिबा महाराजांचं चित्र लावलेलं आहे.

त्या चित्राचा वेगळाच किस्सा माऊली महाराजांनी सांगितला. काशिबांचं चित्र असावं, असं सगळ्यांना वाटत होतं. म्हणून पुण्यातल्या आर्ट कॉलेजातले रावसाहेब गुरव यांनी एक चित्र काढून आणलं. पण चित्रात काशिबा झाडाला टेकून बसलेले असावेत, असं माऊली महाराजांना वाटत होतं. त्यानुसार कर्नाटकातल्या संकेश्वर येथील निरक्षर असणार्याे शंकर पेंटरनं आवश्यक त्या दुरूस्त्या करून नवं चित्र काढलं. सात शतकानंतर पहिल्यांदाच काशिबांचं चित्र तयार झालं. आज तेच सगळीकडे वापरलं जातं.

पांडुरंगासोबत नामदेवराय आणि ज्ञानेश्वर माऊली सावतोबांना भेटायला अरणला गेले. तेव्हा त्या सगळ्यांची भेट काशिबा महाराजांशीही झाली. नामदेवांनी त्यांना बाबा म्हणाले होते. याचा अर्थ काशिबा वयानं ज्येष्ठ असावेत, असा तर्क माऊली महाराज मांडतात.

सावतोबा अभंग म्हणायचे, ते काशिबा लिहून घेत. काशिबा हे गुरव. देवाचे पुजारी. सावतोबा माळी. देवाला फुलं आणून देणारे. माळी आणि गुरव हे एक व्यावसायिक नातं. मात्र या दोघांचं पुढं आध्यात्मिक नातंही जुळलं. काशिबा सावतोबांना गुरुस्थानी मानत. सावतोबांच्या ओवीबद्ध चरित्रातल्या पाचव्या अध्यायात काशिबा महाराजांचं विस्तृत वर्णन आहे.काशिबांनीही सावतोबांवर एक ग्रंथ लिहिला होता म्हणे. पण आज असा कोणताही ग्रंथ मिळत नसल्याचं माऊली महाराज म्हणाले.

काशिबा महाराजांना नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचं श्रेय जातं ते, मधुकर महाराज गुरव यांना. त्यांनीच पंढरपुरात महाद्वाराजवळ त्यांचं मंदिर उभारलं. त्यातून आज महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी काशिबांचे उत्सव साजरे केले जातात. पंढरपुरातल्या काशिबांच्या मठातही वर्षभर विविध उपक्रम आणि उत्सव होतात.

पंढरपुरातल्या मूर्तींची ख्याती सर्वदूर आहे. नाथचौकापासून तर सर्वत्र अनेक मूर्ती कारखाने आहेत. इथल्या मूर्ती घडवण्याचा प्रवासही कितीतरी खडकाळ, खडतर आणि तरीही रंजक आहे. इथे शेकडो कारागीर दिवसरात्र आपल्या कलाकृतींमधे व्यग्र असतात. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरातपर्यंत इथून मूर्ती जातात. विठ्ठल-रुक्मिणींच्या मूर्तींच्या व्हरायटी इथं मिळतात. संतांच्या मूर्तींमध्ये तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्ती इन्स्टंट मिळतात. मात्र अन्य संतांच्या मूर्तींसाठी आधी ऑर्डर द्यावी लागते.

अर्थातच सावतोबांची मूर्ती हवी असेल तरीही काही महिने आधी सांगावं लागतं. एका कारखान्यात त्यांच्या वर्षाला १० ते १५ मूर्ती तयार होतात. स्थानिक वडार आणि काशीकापडी समाजाचा तो पिढीजात व्यवसाय आहे. त्याचसोबत राजस्थानातील काही परिवार अनेक पिढ्यांपासून पंढरपुरात रुजले आहेत. मूर्ती उभी की बैठकीची यावरून तिचं मूल्य ठरतं. मूर्तिकार राजेंद्र हरिभाऊ परदेशी म्हणाले की, उभ्या मूर्तीपेक्षा बैठकीची मूर्ती महाग असते. कारण बैठकीच्या मूर्तीला दगड जास्त लागतो आणि कामही खूप बारीक करावं लागतं. दोन फुटांची मूर्ती २५ हजाराला आणि तीन फुटांची मूर्ती ३५ हजाराला पडते.

एक मूर्ती तयार करायला जवळपास १० ते १२ दिवस लागतात. शाळीग्राम, पाषाण, काळा मार्बल, पांढरा मार्बल इत्यादी दगड वापरले जातात. सावतोबांची जयंती, पुण्यतिथी अशा उत्सवांमध्ये मूर्तींची विशेष मागणी असते. पंढरपूर परिसरातल्या कोरटी, वाखरी, कासेगाव, ओजेवाडी, करकंब, तावसी या गावांमधील मंदिरात सावतोबांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. गावातल्याही एक-दोन मठांमध्ये सावतोबांच्या मूर्ती आहेत.

मूर्ती कारखान्यांसारखेच फोटोंच्या दुकानांतही विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे टॉपवर दिसतात. सावता महाराजांबद्दल चौकशी केली तरच दुकानदार आतून कुठूनतरी फोटो आणून देतो. डिस्प्लेमधे संत सावता महाराजांचा फोटो क्वचितच दिसतो.

चंद्रभागेच्या तीरावर संत मुक्ताबाई मठाच्या पुढून गेलं की ‘नगर वाचन मंदिर’ येतं. १८७४मध्ये‘नेटिव सेंट्रल लायब्ररी’ या नावानं पंढरपुरात या ग्रंथालयाची सुरुवात झाली. इथं सावतोबांवर काही मिळतं का, याचा शोध घेतला. पण तिथेही सावतोबांवर स्वतंत्र पुस्तक मिळालं नाही. संतसाहित्यावरचे जपून ठेवलेले काही जुने ग्रंथ सावतोबांसाठी संदर्भ म्हणून अभ्यासकांना उपयोगी पडू शकतात.

सावतोबांवर अनेक पुस्तकं आहेत. मात्र पंढरपुरातल्या पुस्तकांच्या दुकानांत एकमेव वीणा आणि र.रा. गोसावी यांनी लिहिलेलं ३० रुपयांचं छोटेखानी पुस्तक मिळतं. पुस्तकविक्रेते सांगतात, पुस्तक हवं असेल तर अरणला जा. आजही अशी दुरवस्था असताना साप्ताहिक ‘पंढरी संदेश’ने १९८३ साली संत सावता महाराजांवर विशेषांक काढला होता. हे कळलं की त्याचं महत्त्व लक्षात येतं.

त्यासाठी ‘पंढरी संदेश’चे मालक आणि प्रकाशक गजानन पंढरीनाथ बिडकर यांना भेटावं लागतं. वारकरी विचारांचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून पन्नास वर्षांपूर्वी साप्ताहिक ‘पंढरी संदेश’ सुरू झालं. आजही ते अखंडपणे वाचकांपर्यंत जात आहे. सावतोबांसह जवळपास पन्नासहून अधिक संतांवर ‘पंढरी संदेश’ने विशेषांक काढलेत. आजपासून ३६ वर्षांपूर्वीच्या या अंकात सांप्रदायिक मंडळींबरोबरच अभ्यासकांनीही सावतोबांवर महत्त्वाचे लेख लिहिलेत.

सावतोबांचा पुढचा शोध हा कीर्तनकारांमध्ये घ्यायचा होता. सावतोबांच्या एखाद्या अभंगावर कीर्तन होत असतं. मात्र याचं प्रमाण अत्यल्प आहे. तरीही आज सावतोबांवर अधिकारवाणीने बोलणारे काही कीर्तनकार पंढरपुरात नक्की भेटतात. संत कैकाडी महाराज विश्वपुण्यधामचे रामदास महाराज जाधव यांनी संत सावता आणि पंढरपुराचं थेट नातं असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, सावतोबा नामदेव महाराजांचं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात ऐकत. त्यांना त्यांचा विठोबा तिथंच भेटायचा. वनस्पतींमध्ये जीव असतो, हा अलीकडचा वैज्ञानिक शोध. मात्र सावतोबांनी तर त्यांच्या ‘कांदा, मुळा, भाजी’तही केवळ आत्माच नव्हे तर परमात्मादेखील पाहिला. संत हे माळ्यासारखेच असतात. ते शरीररूपी मळ्यात आध्यात्मिक बागायत करतात. ओसाड, उजाड प्रपंचात भक्तीचा मळा फुलवतात. त्यांचे अभंग आणि त्यांचं जीवन कर्म आणि परिश्रमाचा पुरस्कार करतं.

संत माणकोजी बोधले महाराजांचा मठ सावता महाराज मठासमोरच आहे. त्यांचे वंशज प्रभाकरदादा बोधले महाराज आणि अॅोड. जयवंत बोधले महाराजांची भेट घेतली. अॅकड. जयवंत बोधले यांनी सांगितलं, ‘अनेक संतांनी या महाराष्ट्राच्या भूमीत कार्य केलं. समाज निष्क्रियतेकडे वळलेला असताना सावतोबांनी समाजाला कर्मप्रवृत्त केलं. कर्म करीत आपण भक्ती कशी करावी, हे सावतोबांनी जगाला आपल्या कर्तृत्त्वानं सांगितलं. सावता महाराजांचे अभंग हे अनेक कीर्तनकार घेतात. त्यांचे विचार समाजात आजही रुजलेले आहेत.’

संतश्रेष्ठ नामदेवरायांचे वंशज निवृत्तीमाधव महाराज नामदास यांनी सावतोबांच्या कार्यावर आध्यात्मिक आणि सामाजिक अंगाने प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘संतांनी सर्व जीव एक मानले आहेत. सर्वांना भक्तीचा अधिकार आहे. भगवंताशी एकनिष्ठ राहावं, याचा आग्रह सावतोबांनी ठेवला. सर्वांत विशेष म्हणजे त्यांनी कामामधेच राम पाहिला. परमेश्वराचं स्मरण करतच त्यांनी आपलं कर्म निरंतर सुरू ठेवलं. नामदेव महाराज कीर्तन करत, तेव्हा श्रवणभक्तीने सावतोबा कीर्तनाचा रसास्वाद घेत.’

सावता महाराजांशी संबंधित काही मठ पंढरपुरात आहेत. झेंडे गल्लीत सावतोबांना आदर्श मानणार्याम उखळीकर परिवारांचे काही मठ आहेत. ते बीड जिल्ह्यातल्या परळीजवळच्या उखळी या गावातले ननवरे. आता ते पंढरपूरचेच झालेत. त्यातल्या सावता महाराज उखळीकरांचा मठ ३०० वर्ष जुना आहे. त्यांची उखळी ते पंढरपूर अशी दरमहा वारी १७२०पासून आजही नियमित निघते. या मठात संत सावता माळी यांची मूर्ती आहे. १९०५पासून उखळीकर फडाला ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात स्थान मिळालं. त्यांची दिंडी पाचव्या क्रमांकावर असते.

सावता महाराज ननवरे यांचे चिरंजीव श्याम महाराज उखळीकर म्हणाले की, ‘संत हे व्यापक असतात. ते कोणत्याही जाती-धर्मात बांधलेले नसतात. पंढरपुरातील जवळपास सर्वच मठात सर्वच संतांचे उत्सव साजरे केले जातात. एवढंच नव्हे तर अनेक खेड्यांमध्ये, शहरांमध्ये सावतोबांचे पुण्यतिथीहोतात. तेव्हा केवळ माळी समाजच नसतो. सर्व समाजाचे लोक असतात. परळीलादेखील अरणसारखंच सुंदर मंदिर आहे. तिथे सावतोबांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो.’

आषाढी एकादशीच्या आधी जवळपास सर्वच संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात. सावतोबांची पालखी मात्र पंढरपूरला येत नाही. या उलट पंढरपुरातून आषाढी एकादशी झाल्यावर पांडुरंगाची पालखी सावतोबांना भेटायला त्यांच्या अरण या गावी निघते. १७५ वर्ष जुनी ही पालखी आहे. नगरप्रदक्षिणा झाल्यावर पालखी चंद्रभागा नदी ओलांडते. अरण मार्गावर पहिला विसावा हा बोराटे परिवाराकडे असतो. पणजोबा नारायण बोराटेपासून ही परंपरा सुरू झाली. आज भगवान बोराटे यांचा सबंध परिवार दिंडीच्या विसाव्यात सेवा देतो.

सावतोबांचा पंढरपुरातला सगळ्यात मोठा ठिकाणा म्हणजे सावता महाराजांचा मठ. संतपेठेतल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ हा मठ आहे. चर्मकार समाजातील संत संताबाई यांना छत्रपती शाहू महाराजांनी इथे जागा दिली. म्हणून या परिसराला संतपेठ म्हणतात. काही जणांचा दावा आहे की, याच परिसरात राहिलेल्या संत जळोजी-मळोजी या भावंडांमुळे संतपेठ नाव पडलंय.

संतपेठेतील सावतोबांचा मठ गेल्या काही दशकांत नव्यानं उभारण्यात आला. १९६० साली पंढरपुरात संत सावता महाराजांचं देऊळ असावं, असा विचार पुढं आला. त्यासाठी चर्चा आणि प्रयत्नही सुरू झाले. मंदिरासाठी जागा नव्हती. मात्र याच परिसरातील संभू महादू लोखंडे आणि अहिल्याबाई दशरथ नवले यांनी जागा दिली.

जागा मिळाल्यावर लोकसहभागातून देऊळ उभारण्यात आलं. सुरुवातीला पत्र्याचं शेड आणि दोन खोल्या होत्या. बांधकाम सुरू असताना आर्थिक अडचणी आल्या. पंढरपुरातल्या फूल विक्रेता संघानं, माळी समाजाने पुढाकार घेतला. लोकसहभागातून देऊळ पूर्ण झालं. मंदिरात काकडा, पूजा, नित्योपचार नियमित सुरू झाले. अखंड पहारा सुरू झाला.

मंदिराला आर्थिक मदत होऊ लागली. आण्णा कृष्णा माळी यांच्या मार्गदर्शनात सप्ताह सुरू झाले. मठात जवळपास सर्वच महत्त्वाचे उत्सव साजरे होतात. प्रत्येक एकादशीला भजन-कीर्तन होतं. दह्यादुधाचा अभिषेक होतो. द्वादशीला अन्नदान केलं जातं. ग्रीष्म ऋतूत दशहार उत्सव होतो. मूर्तीला चंदनाची उटी लावतात. दहा दिवस अन्नदान होतं. कोणत्या ना कोणत्या निमित्तानं वर्षभर अनेक ग्रंथांचं पारायण सुरूच राहतं.
अखंड वीणा पहारा देणार्याा विणेकर्यांासाठी पंढरपुरातले माळी समाजाचे लोक माधुकरी देतात. ती परंपरा १२० घरांतून पिढ्यान्पिढ्या सुरूच आहे. रामभाऊ मदने यांनी जवळपास ५० वर्ष मठाचं व्यवस्थापन सांभाळलं. विशेष म्हणजे ते माळी नाही, तर वंजारी आहेत. आता ते बर्या५पैकी थकलेत. तरीदेखील पहाटे चारपासून काकडआरती आणि बाकीच्या नित्यविधीत त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. रामभाऊ सांगतात, पूर्वी विणेकर्यांपना महिन्याला दाढीसाठी २० पैसे आणि कटिंगसाठी ४० पैसे मानधन मिळायचं. त्यांना वर्षभरात मानधन आणि दान मिळतं. त्यातून ते पुण्यतिथी महोत्सवात अन्नदान करतात.

मठातल्या पुण्यतिथी उत्सवाचं नियोजन बापू महाराज वाघमारे करतात. ते कीर्तनांना मृदंग, पखवाजाची साथदेखील करतात. पूर्वी आठ दिवसांचा हा उत्सव असायचा. धोंडोपंत दादांनी हा उत्सव १५ दिवसांचा केला. आषाढ प्रतिपदा ते आषाढ अमावस्या असा १५ दिवसांचा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. या पुण्यतिथी उत्सवाला जवळपास चार हजार भाविक येतात.

नाशिक, सिन्नर, सांगवी, सोनआंबा, मेंढी येथील श्रद्धाळू गेल्या ६० वर्षांपासून पुण्यतिथी उत्सवात सेवा देत आहेत. पुण्यतिथी महोत्सवात मंदिराला रोषणाई केली जाते. दत्ता देवमारे फुलांची विशेष सजावट करतात. जवळपास ५० लोक संत सावता महाराज चरित्रग्रंथ पारायणाला बसतात. हरिपाठ, कीर्तन आणि उत्सवात तीन वेळा अन्नदान होतं. अरणला जशी श्रीफळ हंडी असते, तशीच पंढरपुरातही असते. श्रीफळ हंडीचा मान प्रसाद महाराज बडवे यांना असतो.

पुण्यतिथीदरम्यान भव्य नगरप्रदक्षिणा असते. फूल विक्रेता संघ जमखंडीचा प्रसिद्ध बॅण्ड आणतो. पालखी मार्गावरील अंगणांमध्ये रांगोळ्या काढतात. सगळा समाज यात वेगवेगळ्या रूपांत सहभागी होतो. ही पालखी चंद्रभागेला जाते. तिथं पादुकांचं पूजन होतं.

पंढरपुरात संत सावता असे उघड्या डोळ्यांनी सापडत नाहीत. सावतोबांना त्यांचा विठ्ठल त्यांच्या मळ्यात दिसत होता. त्यांनी पिकवलेल्या कांदा, मुळा, भाजीत दिसत होता. तसाच आपल्याला सावतोबांचा शोध घ्यावा लागतो. सगुणातून निर्गुणाचा असा हा ‘वाईस वर्सा’ प्रवास आहे. रामभाऊ मदनेंच्या ५० वर्षांच्या नि:स्वार्थ सेवेतून, कीर्तनकारांनी निरुपणाला घेतलेल्या अभंगांतून, काशीकापडी समाजाच्या पालखीतून, बोराटेंच्या घरी होणार्या. पहिल्या विसाव्यातून, शिल्पकाराच्या छिन्नी हातोड्यातून, सुरकुत्या पडलेल्या गळ्यातील एखाद्या जुनाट तुळशीमाळेतून, सुईच्या अग्रभागावर आपले देह ठेवणार्या फुलांतून, काकडआरतीच्या कल्लोळातून, शेजारतीच्या नादातून आपल्याला सावतोबा हुडकून काढावे लागतात. सावतोबा पूर्णपणे अजूनही सापडले नाही. शोध अजूनही सुरूच आहे; मिशन सावतोबा@पंढरपूर सुरूच आहे.

0 Shares
आजही भेटते माहेरवशीण जनाई भक्ताच्या भेटीला परब्रह्म आले गा