भक्ताच्या भेटीला परब्रह्म आले गा

नितीन शिंदे

भक्त देवाच्या भेटीला जातो ते स्वाभाविक आहे. पण आमचा विटेवरचा देव वेगळाच. तो आजही भक्तांना भेटायला जातो. दरवर्षी साक्षात विठ्ठलाची पालखी सावता महाराजांना भेटायला पंढरपुरातून अरणला जाते.

पंढरपुरात आषाढीची यात्रा म्हणजे महाराष्ट्रात नंबर एक. गोपाळपुरातल्या गोपालकाल्यानं आषाढी यात्रेची सांगता होते. पंढरपुरात विठ्ठलाच्या भेटीला आलेल्या संतांच्या पालख्या आपापल्या गावांना परतायला सुरुवात होते. पण त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे आषाढ वद्य एकादशीला पंढरपुरातून एक पालखी निघते.

ती पालखी कुठल्या संताची नसते. तर साक्षात परब्रह्म असणारा पंढरीनाथ पांडुरंग त्या पालखीत बसून त्याचं भूवैकुंठ सोडून अरणच्या दिशेने जायला निघतो. संत सावता माळी यांच्या गावाला. कारण सावतोबा आपल्या शेतीच्या कामात गुंतलेले असतात. त्यांना यायला फुरसत नसते. त्यांचा देव कांदा, मुळा, भाजीत असतो. त्यामुळे झक मारत पांडुरंगालाच सावतोबांच्या गावी जावं लागतं. धन्य तो भक्त. धन्य तो देव. आणि धन्य अशा देवाची पालखीही.

गेली १७५ वर्ष न चुकता पंढरपुरातली भाविक मंडळी देवाला अरणला नेऊन भक्त आणि देवाची भेट घडवून आणत आहेत. देव भक्ताच्या भेटीचा सोहळा ही कल्पनाच अद्भूत आहे. ती सूचली अंतोबा म्हणजेच अनंतराव गिरमाजी अरणकर-कुलकर्णी यांना. १८४३च्या दरम्यान हा सोहळा सुरू झाला असावा. अंतोबांपासून आजच्या मोहन आणि विजय अरणकरांपर्यंत ही परंपरा सुरू आहे.

पोलीस खात्यातून रिटायर्ड झालेले मोहनराव कुलकर्णी-अरणकर यांच्याकडून ही माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं, ‘पंढरपूरमधे कोष्टी गल्लीत अरणकर महाराजांचा मठ होता. तिथून पूर्वी देवाच्या पादुका अरणला सावता महाराजांच्या भेटीला जात असत. काही कारणांनी तो मठ गेला; परंतु ही परंपरा सुरू ठेवणं गरजेचं होतं. म्हणून दत्तोपंत अरणकर-कुलकर्णी यांनी १९५४मध्ये देवाच्या पादुका पंढरपूरातल्या शंकर विठ्ठल कळसे यांच्याकडे सोपवल्या आणि काशीकापडी समाजाच्या मठातून या पालखीचं प्रस्थान होऊ लागलं. देवाच्या पादुका वर्षभर कळसेंच्या घरी असतात. प्रस्थानाच्या दिवशी कळसे कुटुंबीय देवाच्या पादुका काशीकापडी समाजाच्या मठामध्ये घेऊन जातात.’

या पालखीचा मान काशीकापडी समाजातील गंगेकर कुटुंबीयांना आहे. काशीकापडी समाजाचा भव्य असा मठ आहे. या मठामधे पालखी सोहळ्यासाठी आलेले भाविक रात्री विश्रांती घेतात. सकाळी कळसे यांच्या घरातून पादुका मठामध्ये आणल्या जातात. गंगेकर कुटुंबातील सदस्य पादुकांची पूजा करून त्या पालखीमध्ये ठेवतात आणि श्री विठ्ठल मंदिरात घेऊन जातात. पूर्वी मठातून पालखीचं प्रस्थान अरणच्या दिशेनं होत होतं. गेल्या दोन वर्षांपासून पादुका श्री विठ्ठल मंदिरात नेण्याची प्रथा सुरू झाली आहे.

याचा अर्थ काशीकापडी मठात वेळेवर पोचणं गरजेचं होतं. आषाढ वद्य एकादशी. म्हणजे ७ ऑगस्ट २०१८ हा दिवस. पहाटेपासून पालखी प्रस्थानाची तयारी सुरू होती. संत सावता माळी यांच्या भेटीसाठीची श्री विठ्ठलाची पालखी आणि रथ सजवायला सुरुवात झाली होती. माळी समाजाचे लोक हे काम स्वयंस्फूर्तीनं करत होते. झेंडू, चमेली, जाई, जुई, मोगरा, तुळशी यांचा सजावटीत प्रामुख्यानं वापर केला जात होता. या भक्त भेटीच्या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतून एक ते दीड हजार वारकरी भाविक काशीकापडी समाजाच्या मठात दाखल झाले होते. काहीजण आदल्या रात्री मुक्कामीच आले होते. पहाटे कळसे यांच्या घरातून देवाच्या पादुका काशीकापडी समाजाच्या मठात आणल्या. तिथं गंगेकर कुटुंबीयांच्या वतीनं विधिवत पूजा अर्चा, आरती करण्यात आली. सर्वांना प्रसाद आणि तीर्थही दिलं गेलं. त्यानंतर गंगेकर कुटुंबातील सदस्यांनी पादुका डोक्यावर घेत त्या पालखीत ठेवल्या. देवाची पालखी उचलण्याचा मान गंगेकर कुटुंबाला आहे. पालखी ‘रामकृष्ण हरी… जय सावता माळी…’च्या जयघोषात रथात ठेवली गेली.

अन्य पालख्यांमधे असणारी शिस्त इथंही पाहायला मिळाली. पालखीपुढं टाळ-मृदुंग वाजवणारे वारकरी, त्यांच्या पुढं बॅण्ड पथक, पालखीचा मानाचा घोडा आणि मानकरी, तर पालखीच्या मागं तुळसमंजिरी डोक्यावर घेतलेल्या महिला आणि पालखीचं साहित्य आणि बैलांसाठी लागणारा चारा असणारी बैलगाडी. काशीकापडी गल्लीतून निघालेल्या पालखी सोहळ्यानं पहिल्यांदा मार्केट कमिटीतल्या हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर पालखीतील विणेकर्‍यांच्या पूजेचा कार्यक्रम झाला. ही पूजा झाल्यावर पालखी बाजारातून थेट विठ्ठल मंदिरात आली. तिथं मानकर्‍यांनी डोक्यावर पादुका घेऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि पालखीतून साक्षात श्री विठ्ठलानं सावता माळी यांच्या भेटीसाठी अरणकडे प्रस्थान केलं. पालखीनं पंढरपूरपासून पाच किमी अंतरावर असणार्‍या निंबाळकर यांच्या घरी पहिला थांबा घेतला. या ठिकाणी वारकर्‍यांना महाप्रसाद दिला गेला. गणेश निवृत्ती निंबाळकर यांच्याकडून गेली १५ वर्ष ही सेवा सुरू आहे. निंबाळकर सांगतात, ‘ही श्रींची सेवा सुरू केल्यापासून आम्हाला काहीही कमी नाही. या सेवेत समाधान आहे.’

दुपारचं जेवण आणि विसाव्यानंतर पालखी लागलीच अरणच्या दिशेनं निघाली. इथून तीन किमी अंतरावर असणार्‍या आढीव गावात पालखीचं ग्रामस्थांकडून स्वागत झालं. आढीवमधल्या भैरोबा मंदिरामध्ये श्रींच्या पादुकांची पूजा झाली. तिथल्या भीमराव वसेकर यांच्या वतीनं वारकर्‍यांचं चहा-पाणी झालं आणि पालखी पुढचा पल्ला गाठण्यासाठी निघाली. आढीवपासून पुढं पालखीचं स्वागत होतं ते बाभूळगावात. इथं महिलांनी पादुकांचं औक्षण केलं. गावकर्‍यांनी पालखीचं दर्शन घेतल्यानंतर पालखीचा प्रवास सुरू झाला. पंढरपूरपासून २० किमीवर असणार्‍या रोपळे गावात देवाच्या पालखीचा मुक्काम होता. रोपळे ग्रामस्थांनी पालखीचं भव्य स्वागत केलं. त्यानंतर वारकरी, भाविक गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि हनुमान मंदिरात विसावले. वारकर्‍यांचं चहापान झाल्यावर श्री विठ्ठल मंदिरात भागवत महाराज चवरे महाराजांच्या कीर्तनसेवेचं आयोजन करण्यात आलं.

या गावात दरवर्षी हरिभक्तीचा जागर केला जातो. एकीकडे भाविक हरीनामात दंग होतात तर दुसरीकडे दिंडीत चालून थकलेल्या भाविकांना थोडा विरंगुळा मिळावा, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून विनामूल्य भजन, कीर्तन, भावगीतं, भक्तिगीतं सादर करण्याचं काम वैभव थोरवे करत आहे. त्यांची वीस जणांची टीम रोपळे इथं ही सेवा देते.

गावचे सरपंच दिनकर कदम यांनी या पालखी सोहळ्यात काहीही कमी पडणार नाही, याची दक्षता घेतली होती. वारकर्‍यांच्या जेवणाची सोय माळी बंधूंनी केली होती. काही गावकर्‍यांनी वारकर्‍यांना आपल्या घरी नेऊनही आदरातिथ्य केलं. पहाटे ४ वाजता हरी विठ्ठलाची काकडआरती आणि नित्योपचार झाले. भक्तिमय वातावरणात वारकर्‍यांचं चहा-पाणी झालं आणि प्रत्येकानं आपापलं गाठोडं बैलगाडीत ठेवून पुढची वाट धरली. सकाळी अकराच्या सुमारास रोपळे ग्रामस्थांनी पालखीला निरोप दिला आणि पालखीनं गाव सोडलं. आता पुढचा मुक्काम रोपळ्यापासून १० किमी अंतरावरच्या आष्टी गावात होता. ‘ज्ञानोबा..तुकाराम…’, असा जयघोष करत पालखी आष्टीच्या दिशेनं निघाली. रस्त्यात, वाड्यावस्त्यांवर वारकरी मनोभावे सेवा देत होते. कुणी चहा पाजत होतं, कुणी पाणी, तर कुणी फराळ.

आष्टीच्या अलीकडे गावडे वस्ती आहे. पूर्वी पालखी बैलगाडीतून यायची, तेव्हापासून या वस्तीतलं गावडे कुटुंब पालखीची सेवा करतं. या सेवेप्रती शेतात राबणार्‍या, मळके कपडे असणार्‍या बाबासाहेब गावडे यांच्या चेहर्‍यावर प्रचंड समाधान दिसत होतं. त्यातून त्यांच्या मनाच्या श्रीमंतीचं दर्शन होत होतं. गावडे वस्तीपासून थोड्या अंतरावर कदम वस्ती आहे. या वस्तीत राहणारे सिद्धेश्वर कदम यांनी आपल्या शेतातच पालखीसाठी चौथरा बांधला आहे. या ठिकाणी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पादुकांचं पूजन, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. वारीच्या वाटेवर वारकर्‍यांसह अनेक लोक भक्तिभावानं श्रींची सेवा करत होते. भालदार, चोपदार, विणेकरी, वासुदेव, गाडीवान, अश्व सांभाळणारा अशा अनेक जणांचा त्यात समावेश होता.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यापालखी सोबत असतो तसा अश्व श्री विठ्ठलाच्या पालखीबरोबरही असतो. या अश्वाचं नाव ‘राजा’. ही या अश्वाची पाचवी वारी. अरणच्या भैरवनाथ शिंदे यांचा हा अश्व आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते ही सेवा करतात. यापूर्वी त्यांचे मामा बैलगाडी घेऊन पालखीत सहभागी व्हायचे. आता भैरव स्वतः तीन दिवस या पालखीबरोबर चालत येतात. पालखीत अश्वाची काळजी घेणं, पालखीसोबत चालणं हे भाग्याचं असून, त्यातून आत्मिक समाधान मिळत असल्याचंही शिंदे सांगतात.

या सगळ्यांचं साहित्य बैलगाडीतून वाहत नेणारे मोडलिंबचे दत्तू नारायण डोंगरे सांगतात की, ‘गेल्या वीस वर्षांपासून मी ही सेवा करत असून, पूर्वी पालखी खांद्यावरून आणली जायची. नंतर बैलगाडीतून आणि आता स्वतंत्र रथ आहे. म्हणून आमच्या बैलगाडीतून पालखीचं सर्व साहित्य, जनावरांचा चारा वाहून नेला जातो. हे काम करताना खूप आनंद होतो.’

पालखीसोबत असणारे चोपदार उत्तम नागटिळक हे पंढरपूर तालुक्यातल्या कौठळीचे. पूर्वी त्यांचे आजोबा, नंतर वडील ही सेवा करत होते. पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यानं मनाला आनंद मिळतो, अशी त्यांची भावना आहे. पालखीचा रथ ओढण्याचं काम करणार्‍या हौश्या आणि महादू या बैलजोडीचे मालक ‘आम्हाला बैलाचा मान आहे’, असं रुबाबात सांगतात. पालखी सोहळ्यात अनेक वर्ष सहभागी होणारे रघुनाथ जानकर हे अनेक बदलांचे साक्षीदार आहेत.

कदम वस्तीत पालखी विसावल्यानंतर महाप्रसाद झाला. नंतर भाविकांनीही थोडा विसावा घेतला. कुणी झाडाखाली तर कुणी बांधावर अंगं टाकलं. जरा वेळानं चोपदारानं शिट्टी वाजवली आणि कदम वस्तीच्या पुढं तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आष्टी गावाकडे पालखी निघाली. आष्टी ग्रामस्थांच्या वतीनं देवानंद गुंड आणि बाळासाहेब गुंड यांनी पालखीचं स्वागत केलं. दिंडीतल्या वारकर्‍यांसाठी चहापानाची सोय करण्यात आली होती. पालखीचा मुक्काम आष्टीतल्या मारुती मंदिरात होता. पूर्वी १९४१च्या सुमारास दगडू एकनाथ व्यवहारे यांच्या घरी पिंपळाच्या झाडाखाली पालखीचा मुक्काम होत होता. त्याकाळी अवघे पाच-सहा लोक पालखीबरोबर असत. तसंच रात्रभर डोंगरे महाराजांचं कीर्तनही इथं व्हायचं, अशी आठवण १९४१चा फोटो दाखवून मच्छिंद्र व्यवहारे यांनी सांगितली. पालखी सोहळ्यातला हा सगळ्यात जुना फोटो असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं हा फोटो विशेष म्हणावा लागेल.

आष्टी ग्रामस्थ आणि व्यवहारे यांच्या वतीनं पादुकांची पूजा करण्यात आली. गावातल्या लोकांनीही दर्शनाला गर्दी केली. नंतर विठ्ठल महाराज चवरे यांचं कीर्तन झालं. कीर्तन संपल्यावर सगळ्यांनी आवरा आवर केली आणि दिवसभर थकलेलं अंग जमिनीवर टाकलं.

पहाटे देवाचे नित्योपचार, काकडा झाला. दिंडीकर्‍यांचा चहा-नाश्ता झाल्यावर पालखी अरणची वाट चालू लागली. ‘बोला..पुंडलिक वरदे..हरीविठ्ठल…श्री ज्ञानदेव तुकाराम..पंढरीनाथ महाराज की जय…’, असं म्हणत मजल दरमजल करत दिंडी पुढं जात राहिली. वाटेत ‘अरण ७ किमी’, असा फलक दिसला. या ठिकाणी एका चौकातच श्री विठ्ठलाचं एक छोटसं मंदिर आहे. या मंदिरातही संजीवन समाधीचा सोहळा साजरा केला जातो. भजन, कीर्तन आदी कार्यक्रम इथंही याच काळात सुरू असतात. या ठिकाणी पादुकांची पूजा करण्यात आली आणि पावलं पुढच्या प्रवास करू लागली.

अरण आता खूपच जवळ आलं होतं. वाटेत कुणी कुणी पालखीचं मनोभावे स्वागत करत होतं. भिंगे वस्ती, घाडगे वस्ती, केदार वस्ती या ठिकाणी दारामधे सडा, रांगोळी, स्वागत कमान उभी करून पालखीचं स्वागत केलं गेलं. याच दरम्यान पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या ९० वर्षांच्या आजींची भेट झाली. ‘साक्षात श्री विठ्ठलाची पालखी आपल्या दारातून जाते, हे आमचं भाग्य आहे’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

चालता चालताच पालखी सोहळ्यातला शेवटचा विसावा लागला. वाटेतच सावता माळी यांच्या पादुकांचं छोटसं मंदिर आहे. या विसाव्याच्या ठिकाणापासून समोरच पुण्याकडे जाणारा हायवे लागतो. हा हायवे ओलांडल्यावर भाविकांना सावता महाराजांच्या मंदिराचा कळस खुणावू लागला. अरणमध्ये दाखल झाल्यावर भाविक पहिल्यांदा दर्शन घेतात ते याच कळसाचं. मजल दरमजल करत वारकरी अरण गावात दाखल होऊ लागले. सगळ्या भक्तांना एकच आस लागली, ती म्हणजे विठुरायाच्या आणि संत सावता माळी यांच्या भेटीची! या भेटीसाठी मंदिराच्या दिशेनं वारकर्‍यांची पावलं वळू लागली.

हा सोहळा अनुभवण्यासाठी अरणमध्ये भाविकांची खूप गर्दी झाली होती. सर्व दिंडीकरी, वारकरी आणि गावकर्‍यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. बॅण्ड पथकामुळं वातावरण भक्तिमय झालं होतं. पालखी शिंदेवाडा इथं मुक्कामासाठी आली. या वाड्यातच श्री विठ्ठलाचं मंदिर आहे आणि बाजूला पालखी ठेवण्यासाठी चौथराही आहे. या चौथर्‍यावर पालखी विसावल्यानंतर नारळाच्या फाट्यांनी सजवलेल्या शिंदे वाड्यात भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला.

वयाची साठी पार केलेले भाविक या संजीवन समाधी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यातलेच एक रामेश्वर राऊत. ते सांगतात, ‘पूर्वी आम्ही सहकुटुंब बैलगाडीनं यात्रेत यायचो. आता एसटीनं यावं लागतं. पूर्वीपेक्षा आता सोहळ्यात जास्त गर्दी असते. सुखसोयी, घरटी गाड्या यामुळं ही संख्या वाढली आहे.’

अहमदनगर जिल्ह्यातल्या तिसगावचे पोपट बोरुडे हे गेल्या तीन वर्षांपासून या सोहळ्यासाठी येत आहेत. इथं येऊन मनाला समाधान मिळतं. यंदा त्यांच्या गावातील ४० जण या सोहळ्यास आल्याची माहिती त्यांनी दिली.

पालखी सोहळा म्हणजे अरणकरांसाठी महत्त्वाचा दिवस. त्यामुळंच प्रत्येकाच्या घरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. पाच-सहा हजार लोकसंख्या असणार्‍या गावात मराठा आणि माळी समाजाची संख्या मोठी आहे. हा उत्सव पाहण्यासाठी कुणी आपल्या लेकीकडं आला आहे, तर कुणी आपल्या जावयाकडे. देवदर्शन आणि पैपाहुणे अशी सांगड घालणारी अनेक मंडळी या ठिकाणी पाहायला मिळाली.

या उत्सवात युवकांचं प्रमाण कमी पाहायला मिळतं. मध्यमवयीन, वयोवृद्ध महिला, मिशीला पीळ दिलेले, फेटा बांधलेले आणि जणू सावता माळी यांचंच रूप वाटावं अशी अनेक वयोवृद्ध मंडळीही या सोहळ्यात आनंदानं सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. युवकांची संख्या या सोहळ्यात कमी असल्याचं निरीक्षण बजरंग खंडू आतकर यांनीही नोंदवलं. ते माढा तालुक्यातल्या बारलोनी गावचे. गेल्या पंचवीस वर्षांपासून मंदिरात चंदनउटी उगाळण्याचं काम काम करतात. आतकर म्हणाले, ‘उन्हाळ्यात चंदनउटी पूजेच्या वेळी पाच-पाच किलोचे चंदनाचे खोड उगाळून देवाला आणि सावता माळी यांच्या मूर्तीला चंदनउटीचा लेप दिला जातो. पूर्वी ते उगाळताना आम्ही अभंग, गवळणी म्हणायचो. ते ऐकायला तेव्हा खूप लोक जमायचे. आता नव्या जमान्यात कुणाला ऐकायला सवड नाही. तुझ्यासारखी पोरं तर खूपच कमी आहेत.’

‘हे कलियुग हाय बाबा. सगळं बदललं हाय. मला काय कुणाला नावं ठिवायची न्हाईत’, असं म्हणत त्यांनी एक ओवी म्हटली,

पहिली बांगडी भरली काकानं दुनया दाखवली बापानं
दुसर्‍या बांगडीला पाय धरते गाईचं, उपकार फिटत नाहीत आईचं
तिसर्‍या बांगडीला नाव सांगते गावाचं, नाव राखते भावाचं
चौथ्या बांगडीला नका करू घाई, सीता सारखी भाऊजई
पाचव्या बांगडीला धरला पसारा, बापासारखा आहे सासरा
सहाव्या बांगडीला आल हसू, आईसारखी आहे सासू
सातव्या बांगडीला झाला आनंद, बहिणीसारखी आहे नणंद
आठव्या बांगडीला धरा धीर, भावासारखा आहे दीर
नवव्या बांगडीला किती अठाहास, पती शंकर-पत्नी पार्वती आठवीस

फिरत फिरत ज्या ठिकाणी श्रीफळ हंडी होते, तिथं मी आलो. तिथंच अरण गावचे हरिभाऊ शिंदे भेटले. त्यांनी सांगितलं, ‘या ठिकाणी दोन माणसांच्या कवळ्यात मावणार नाही, एवढा लिंब हुता. त्या लिंबाच्या झाडाला श्रीफळ हंडी बांधली जायची. जुना होऊन तो लिंब वार्‍यानं पडला. मग आता ती लोखंडी अँगलला बांधली जाते.’

श्रीफळ हंडी हे या सोहळ्यातलं एक आकर्षणच म्हणावं लागेल. या श्रीफळ हंडीबद्दल बरंच ऐकलं होतं. या सोहळ्यात मला ती प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार होती. हाच अनुभव घ्यायला आणि सोहळ्यात सहभागी व्हायला कितीतरी भाविक अरणला दाखल झाले होते. अरणची बाजारपेठ भाविकांनी फुलून गेली होती. ठिकठिकाणी प्रसाद, खेळणी, फुलं, पुस्तकं यांची दुकानं थाटलेली होती. या सोहळ्यामुळं गावाला बाजाराचं रूप आलं होतं. पलीकडे मंदिराशेजारी असणार्‍या अन्नछत्रामधेही स्वयंपाक बनविण्याची लगबग सुरू झाली होती.

ही सगळी तयारी ज्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी सुरू होती, तो थोड्याच वेळात सुरू होणार होता. मंदिर आज भाविकांनी भरून गेलं होतं. संत तुकाराम महाराजांचे वंशज बाळासाहेब देहूकर महाराजांचं कीर्तन मंदिरात सुरू होतं. तेव्हाच फुलांच्या पाकळ्यांनी भरलेल्या पाट्या भाविकांमधून फिरत होत्या. त्यातून झेंडूच्या आणि गुलाबाच्या पाकळ्या भाविक हातात घेत होते. पाकळ्यांचं वाटप सुरू असतानाच देहूकर महाराजांनी आपल्या कीर्तनात सांगितलं, ‘संत सावता महाराजांना योग-प्राणायाम कला अवगत होती. योग साधनेतूनच महाराज समाधिस्त झाले. साक्षात पांडुरंगानं सावता महाराजांना समाधी दिली.’

काहीवेळानं याच समाधीवर फुलं टाकायला सांगितलं गेलं आणि एकाच वेळी हजारो हातांनी समाधीवर फुलांची उधळण केली. फुलांची उधळण करताना भाविकांमध्ये एक वेगळाच उत्साह होता. फुलं उधळल्यानंतर साखर वाटली गेली. समाधीचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येकजणच आतूर होता. दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांग केली. प्रत्येक देवाचा प्रसाद वेगळा आणि देवाला वाहणारी फुलंही वेगळी. इथं सावता महाराजांच्या दर्शनासाठी जाणार्‍या प्रत्येक भाविकाच्या हातात चंदनाची पानं आणि फुलं होती.

देहूकर महाराज सांगतात, ‘अरण हे पूर्वी मिरज संस्थानमधे होतं. मोडनिंबच्या पेटाखात्यातून अरणच्या यात्रेसाठी अनुदान मिळायचं. आमचे पूर्वज दास महाराज यांचा इतिहासात उल्लेख आहे. दास महाराज, विठ्ठल महाराज, भाऊसाहेब महाराज, नामदेव महाराज, सोपानकाका महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि मी, अशी आमची परंपरा चालू आहे आणि आमच्या पुढच्या पिढीतही ही परंपरा अव्याहत चालू राहणार.’

याच श्रीफळ हंडीच्या ओढीनं अरणच्या दिशेनं येणार्‍या भाविकांची संख्या मोठी होती. अरणचा अरुंद रस्ता गर्दीनं फुलला होता. आपल्या ऐपतीप्रमाणं किंवा नवसाप्रमाणं कुणी एक, कुणी दोन, कुणी पाच तर कुणी अकरा नारळांचं तोरण घेऊन लिंबाच्या पारावर नेऊन ठेवत होता. नारळ तोरण सावता महाराजांना अर्पण केल्याची भावना असते. तोरणांची सुरवात पन्नास-शंभर नारळांपासून झाली. बघता बघता पारावर सहा ते सात हजार नारळ तोरणं जमा झाली. जरावेळानं श्री विठ्ठलाची पालखी शिंदे वाड्यातून वाजत गाजत आणण्याची लगबग सुरू झाली तर संत सावता माळी यांची पालखी मंदिरातून वाजत गाजत आणण्याची हालचाल सुरू झाली.

काही वेळातच वाजत गाजत, हरिनामाच्या जयघोषात दोन्ही पालख्या बाहेर पडल्या. श्री विठ्ठलाची पालखी मंदिराच्या पाठीमागे अन्नछत्रासमोरच्या मंडपात ठेवण्यात आली, तर सावता माळी यांची पालखी लिंबाच्या पारावर ठेवण्यात आली. या दोन्ही पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पुन्हा मोठी गर्दी केली. सावता माळी यांच्या पालखीसमोर संत तुकाराम महाराज यांचे वंशज देहूकर महाराज यांचं काल्याचं कीर्तन सुरू होतं आणि विठ्ठलाच्या पालखीसमोर चवरेमहाराजांचं भजन सुरू होतं. या भजन-कीर्तनात भाविक तल्लीन झाले होते. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला हंडी बांधण्याची तयारी सुरू झाली होती. ही हंडी बांधण्यासाठी लागणार्‍या कड्याचा मान अरणच्या गिड्डे कुटुंबीयांना आहे. गिड्डे कुटुंबातला एक सदस्य वाजत गाजत हे कडं आपल्या डोक्यावर घेऊन लिंबाच्या पारावर आला आणि हंडी बांधण्यास सुरुवात झाली. भाविकांनी अर्पण केलेली नारळ तोरणं या कड्यावर बांधण्याचं काम सुरू झालं. या तोरणात जी हंडी फोडण्यात येते, त्यात लाह्या, चुरमुरे, दही, प्रसाद, तुळस ठेवून ती हंडी कड्याच्या मधोमध बांधली आणि त्याभोवती सहा ते सात हजार नारळ तोरणं बांधण्यात आली. ही विशाल हंडी मोठ्या नायलॉनच्या कासर्‍यानं दोन्ही बाजूला लोखंडी स्टँडला बांधली गेली आणि ती फिरवण्यासाठी दोन-तीन व्यक्ती स्टँडवर बसले.

हंडी बांधून तयार झाली आणि भक्तिमय वातावरणात हरिनामाचा गजर सुरू झाला. ही हंडी म्हणजे एक मर्दानी खेळच. भक्ती आणि शक्तीचा संगम. ही हंडी फोडण्याचा मान देहूकर महाराजांना असतो, तर या हंडीतील नारळ काढण्यासाठी पंचक्रोशीतील युवकांचे संघ अरणमध्ये दाखल होतात. या उत्सवाला सुरुवात झाली आणि गर्दीतून मुसंडी मारून या हंडीपर्यंत हे युवक येऊ लागले. एकमेकांना खांद्यावर घेत युवकांनी या हंडीतील नारळ काढण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडून देहूकर महाराजांच्या वंशजांनी मोठ्या काठीनं ही हंडी फोडण्यास सुरुवात केली. हा सोहळा पाहण्यासाठी अरणमध्ये वीस ते पंचवीस हजार भाविक दाखल झाले होते. हा खेळ वीस मिनिटं चालला. बाजूचे नारळ तोरण निघाल्यानंतर आतल्या माठाची हंडी दिसू लागली. सगळ्यात शेवटी ही हंडी फोडली गेली. हंडी फुटता क्षणी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर टाळ्यांचा कडकडाट केला. हंडीतला प्रसाद भाविकांनी घेतला आणि मोठ्या उत्साहात हा भक्तीमय सोहळा झाला. मंदिर ट्रस्टकडून मान्यवरांचे सत्कार करण्यात आले आणि या कार्यक्रमाची सांगता झाली.

हा सोहळा पार पडेपर्यंत रात्र झाली. विद्युत रोषणाई केलेल्या सावता महाराजांच्या मंदिराचं विलोभनीय दृश्य भाविकांनी डोळ्यात साठवून ठेवलं. आपल्या गावात श्री विठ्ठल मुक्कामाला आलाय. मग गावकरी झोपतील तरी कसे? त्यामुळंच रात्रभर जागर, भारूडाचे कार्यक्रम सुरू होते.

पहाट झाली आणि देवाचे नित्योपचार सुरू झाले. जो तो मंदिराच्या परिसरात नगर प्रदक्षिणेसाठी येऊ लागला. अरण ग्रामस्थांनी विठ्ठलाची पालखी खांद्यावर घेतली तर पंढरपूरहून आलेल्या मानकर्‍यांनी सावता माळी यांची पालखी खांद्यावर घेतली आणि नगरप्रदक्षिणेला सुरुवात झाली. प्रदक्षिणेदरम्यान प्रत्येकजण दोन्ही पालख्यांचं दर्शन घेत होता. प्रत्येक घरातील महिला पालख्यांचं औक्षण करत होत्या. वाटेत सोंगांची भारूडं सुरू होती. भक्तिमय वातावरणात वाजत-गाजत देवाच्या आणि भक्ताच्या पालखीनं नगर प्रदक्षिणा पूर्ण केली.

वारकरी संप्रदायात अशी एकमेव पालखी असेल की ज्या पालखीची मिरवणूक देवाच्या पालखीसोबत निघते. पालख्या मंदिरात आल्या आणि कीर्तनाचा कार्यक्रम सुरू झाला. सावता माळी मंदिरात सप्ताह सुरू होता. त्याची सांगता या वेळी करण्यात आली.

सावता माळी यांच्या मळ्यात झालेल्या या सोहळ्याच्या आठवणी मनात घेऊन पालखी पंढरपूरच्या दिशेनं निघाली. या पालखीला वेशीपर्यंत पोचवण्यासाठी सगळं गावच पालखीसोबत चालू लागलं. शेवटचा थांबा हायवेशेजारी असणार्‍या ‘सावता माळी यांचा विसावा’ इथं होता. हा विसावा घेतल्यानंतर पुन्हा देवाची पालखी पंढरपूरच्या दिशेनं निघाली. देव पालखीतून निघाला खरा; पण कदाचित तोही म्हणत असेल, ‘जातो अरणनाथा, तुझी भेट झाली आता…!’

0 Shares
विठोबाच्या गावात सावतोबांचा शोध लऊळमधलं देऊळ भक्तीमधल्या एकतेचं