लऊळमधलं देऊळ भक्तीमधल्या एकतेचं

प्रशांत जाधव

संत सावता माळींच्या गोष्टीत संत कूर्मदास येतात. सावतोबा कामात देव पाहणारे. तर कूर्मदासांना ना हात ना पाय. तरीही या दोन भक्ताच्या भेटीसाठी पांडुरंग धावत आला, हा दोघांच्याही कथेचा लसावि. सावतोबा@लऊळ.

संत कूर्मदास हे आपल्याला पाठ्यपुस्तकात संताच्या मांदियाळीत सापडत नाही. पण शेकडो वर्षसंतांच्या कथा जनमानसात रुजवणार्‍या महिपतीबुवांच्या श्री भक्तविजय ग्रंथाच्या सोळाव्या अध्यायात कूर्मदास येतात. विशेष म्हणजे कूर्मदासांची गोष्ट सांगता सांगता संत सावता माळी येतात. म्हणून सावतोबा शोधायचे तर पंढरपूर, अरणबरोबरच लऊळलाही जावं लागतं. कूर्मदासांचं लऊळ.

पण कूर्मदास मूळ लऊळचे नाहीत, तर पैठणजवळच्या मुंगीचे. मुंगी हे गाव खूप जुनं. द्वैताद्वैत तत्त्वज्ञान मांडणार्‍या आचार्य निंबार्काचार्य यांचं जन्मगाव. मुंगी ते लऊळ हे अंतर आता गुगल मॅपवर टाकलं तर हे अंतर मिळतं, बायरोड २४९ किलोमीटर. हात नाहीत आणि पायही. तरीही रस्त्यावर खुरडत खुरडत पांडुरंगाच्या भेटीसाठी धावत येणार्‍या या जिगरबाज संतांची ही गोष्ट ऐकावीच लागते. लऊळचे ज्येष्ठ वारकरी सुधाकर लोकरे परंपरेने चालत आलेली गोष्ट सांगितली. ती अशी,

संत कूर्मदासांनी पैठणमधे एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकलं, त्यात पांडुरंग, पंढरी आणि वारीची महती ऐकली. मनुष्यानं आपला जन्म सफल करण्यासाठी एकदा तरी पंढरीची वारी करावी, असं त्यात सांगितलं. कूर्मदासांनी पंढरीची वारी करण्याचं ठरवलं. तू हातापायानं अधू आणि पंढरीची वारी करणार, असं म्हणत गावातल्या लोकांनी त्यांना हिणवलं. पण पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याचा कूर्मदासांचा निर्धार पक्का होता.

हात नाही, पाय नाही, खुरडत चालायचे तेव्हा कासवासारखे दिसायचे. म्हणून त्यांना कूर्मदास नाव मिळालं होतं. त्यांनी हाता पायांना चिंध्या गुंडाळल्या आणि ते पंढरीच्या दिशेनं निघाले. जवळपास २५० किलोमीटरचं अंतर. त्यावेळी वाहतुकीची साधनं नव्हती, तरी कूर्मदासांनी आपली वाटचाल सुरू केली. गावापासून काही अंतर पार केल्यावर थकलेल्या कूर्मदासाला तहान भूक लागली. त्यानं विठ्ठलाला हाक मारली. सामान्य माणसाच्या रूपात विठ्ठल धावून आला. त्यानं पांडुरंग खिस्त्याचं रूप धारण केलं. आणि कूर्मदासाला भेटले. म्हणाले, मी पंढरपूरचा कपडा व्यापारी आहे. मी वसुली करत जात आहे. आपण प्रवास सोबत करू. दिवसभर कूर्मदास खुरडत खुरडत काही अंतर पार करत होता. संध्याकाळी पांडुरंग खिस्ती येऊन त्यांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था करत होता. हा प्रवास लऊळपर्यंत सुमारे चार महिने चालला.

कूर्मदास लऊळला आल्यावर त्यांच्यात पुढं जाण्याचं त्राण उरलं नाही. कार्तिकी एकादशी एका दिवसावर होती, एका दिवसात लऊळ ते पंढरपूर अंतर पार करणं शक्य नव्हतं. हे अंतर साधारण सध्या बाय रोड ४६ किलोमीटर इतकं आहे. त्यावेळी कार्तिकी वारीला चाललेल्या वारकर्‍यांना कूर्मदासांनी विठ्ठलाकडे निरोप दिला की, तुझा एक भक्त तुझ्या भेटीसाठी आलाय, पण त्याला हात पाय नसल्यानं तो पंढरपूरला येऊ शकत नाही. त्यामुळं तुलाच भेटायला बोलावलंय. कार्तिकी एकादशीला महाद्वारावर नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू होतं. वारकर्‍यांनी नामदेवांना निरोप दिला. नामदेवांकडून निरोप ऐकल्यावर विठ्ठल काकुळतीला आला. त्यानं नामदेव आणि ज्ञानेश्वरांना घेऊन लऊळची वाट धरली.

इथं या गोष्टीत संत सावता माळी यांची एण्ट्री होते. पंढरपूरहून लऊळला जाताना वाटेत अरण लागतं. कूर्मदास पंढरपूरला जाऊ शकत नव्हते. सावतोबांना पंढरपूरला जाण्याची गरज वाटत नव्हती. कारण त्यांची विठाई कांदा मुळा भाजीतच होती. त्यामुळं लऊळला जाता जाता पांडुरंग सावतोबांच्या मळ्यात आले. तिथं देवांनी दोन्ही संतांना खर्‍या भक्तीचं दर्शन सावतोबांच्या रूपानं दाखवलं. चौघांनी एकामेकांना मिठी मारली आणि ते लऊळच्या दिशेनं निघाले.

लऊळला विठ्ठल, नामदेव, ज्ञानेश्वर आणि सावता माळी आल्यावर विठ्ठलानं आपल्या मांडीवर कूर्मदासांना घेतलं. त्यांनी कूर्मदासाला विचारलं, ‘तुला काय हवं? तुला हात पाय देऊ का?’ त्यावर कूर्मदास म्हटले, ‘मला तुमचं दर्शन झालं यापेक्षा काही नको. पण मला पंढरीचं दर्शन घ्यायचं आहे आणि चंद्रभागेत स्नान करायचं आहे.’ त्यावर विठ्ठलानं कूर्मदासांना लऊळमध्ये पंढरीचं दर्शन दिलं. त्यामुळं लऊळला ‘धाकली पंढरी’ म्हणतात.

त्यानंतर चंद्रभागेत स्थान करण्यासाठी त्या ठिकाणी एक विहीर खोदली त्यात चंद्रभागेचं पाणी आणलं. आजही मानलं जातं की, आषाढी एकादशीला पंढरपुरात चंद्रभागेला पाणी सोडलं जातं, तेव्हा या ठिकाणच्या विहिरीलाही पाणी येतं. विठ्ठलाचं दर्शन घेऊन कूर्मदासांनी आपला देह इथंच ठेवला. आज तिथं कूर्मदासांची समाधी बांधण्यात आलीय.

आज आपल्याकडे कूर्मदासांचं म्हणून दाखवण्यासाठी ही समाधी आणि सांगण्यासाठी गोष्ट इतकंच आहे. ही समाधी लऊळ गावात नाही. ती लऊळपासून जवळपास तीन किलोमीटर लांब आहे. या समाधीचं एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे, या समाधीचा मराठा, ब्राह्मण आणि मुस्लीम मिळून त्याचा सांभाळ करतात.

त्याविषयी सकाळचे स्थानिक पत्रकार वसंत कांबळे यांनी माहिती दिली, ‘सरकारी दफ्तरात १२६०पासूनचं रेकॉर्ड आहेत. त्यानुसार या ठिकाणी दोन हिंदू आणि एक मुस्लीम कुटुंब या ठिकाणी सेवा देत आहेत. मराठा समाजाचे हाजगुडे, मुस्लीम समाजाचे मुजावर हे कुटुंब पहिल्यापासून आहे. ब्राह्मण समाजाच्या कुटुंबात बदल झाले आहेत. ब्राह्मणापैकी ठाकूर हे सर्वात प्रथम सेवा करायचे, त्यानंतर संत हे आले, आता पाठक यांच्याकडे हा मान आला आहे.’

लऊळमध्ये कूर्मदासांच्या समाधी मंदिराचा परिसर हा फार विलक्षण आहे. ती उजाड माळरानावर आहे. दूरदूरपर्यंत एकही घर किंवा वस्ती नाही. मंदिराच्या परिसराच्या आसपास एक दोन झाडं हिरवीगार आहेत, तितकीच. मंदिराचा परिसर हा एखाद्या वाड्याप्रमाणं आहे. वाड्याच्या मध्यभागी आता नव्यानं मंदिराची बांधणी सुरू आहे. आता फक्त कळस बसवणं बाकी आहे.

देवळाच्या मुख्य द्वारातून आत गेल्यावर लोखंडी पत्र्याचा सभामंडप आहे. तिथं गेल्यावर एक वेगळंच दृश्य दिसतं. तिथं मुस्लिमांच्या मजारीसारखी एक कबर आहे. या कबरीवर पांढर्‍या रंगाची एक चादर टाकलीय. त्याला हिरव्या रंगाची झालर आहे. त्या पांढर्‍या चादरीवर एक चांदताराही आहे. त्याच्या पुढं एक समाधी आहे. ही कूर्मदासांची समाधी असल्याचं सांगितलं जातं. यावर पांढर्‍या रंगाची फुलं वाहिलेली होती.

त्यानंतर पाच ते दहा फुटांवर विठ्ठल रुक्मिणी कमरेवर हात ठेवून उभे आहेत. पण या विठ्ठल आणि रुक्मिणीला ज्या पांढर्‍या चादरीनं कबरीला झाकलं आहे, त्याचं झबलं शिवलंय. कबरीच्या झालरीसाठी वापरलेल्या हिरव्या रंगाच्या कपड्याचा पदर रुक्मिणीच्या डोक्यावर आहे. विठ्ठलाला पांढर्‍या रंगाच्या सुती कापडाचं पागोटं घातलंय. दोघांचीही पांढर्‍या रंगांच्या फुलांनी पूजा केलेली होती. आपल्या मनात विठ्ठल रुक्मिणीचं रूप फिक्स असतं. पण इथं गेल्यावर वेगळे विठ्ठल-रुक्मिणी अनुभवायला मिळतात. चांद-तार्‍याच्या चादरीशी जोडले गेलेले विठो-रखुमाय!

हे देऊळ गावाच्या इतकं बाहेर का, याचीही एक गोष्ट आहे. देवळाची देखभाल करणारे जालिंदर बाबुराव कदम यांनी ती सांगितली. कूर्मदासांच्या भेटीला विठ्ठल आला, त्यावेळी ते तीन गावांच्या वेशीजवळ विठ्ठलाचा धावा करत पडले होते. हे ठिकाण भेंड, पडसाळी आणि लऊळ गावाची वेस होती. पण कूर्मदास हे ब्रह्मचारी होते. त्यांनी विठ्ठलाला मागणी केली, की, मला दृष्टांत हा लऊळ गावी द्यावा. पडसाळी आणि भेंड या दोन गावांची नावं स्त्री लिंगी आहेत. त्यामुळं लऊळ या पुल्लिंगी गावी मला दृष्टांत द्यावा. त्यामुळं देवानं त्यांना लऊळ गावाच्या वेशीवर साक्षात्कार दिला.

आता अशा गोष्टींवर किती विश्वास ठेवायचा ते आपण आपापलं ठरवायचं. स्त्री-पुरुष भेदाभेदाच्या पलीकडे समानतेचा वारसा सांगणार्‍या वारकरी विचारांचा एक संत मृत्युसमयी असा विचार आणेल, हे शक्य वाटत नाही. आख्यायिका या प्रामुख्यानं कीर्तनकार, प्रवचनकार श्रोत्यांवर प्रभाव टाकण्यासाठी संतांच्या मृत्युनंतर शेकडो वर्षांनी घडवत असतात. त्यामुळं कीर्तनकारांच्या डोक्यातला कचरा नंतर संतांच्या व्यक्तिमत्त्वाला चिटकत जातो. विशेषतः एकही अभंग उपलब्ध नसणार्‍या कूर्मदासांसारख्या संतांच्या बाबतीत हे सहजशक्य आहे. त्यामुळं कूर्मदास समाधी शेजारच्या कबरीची गोष्टही याचा विचार करूनच स्वीकारावी लागते.

कूर्मदास समाधीचं देऊळ हे खरंतर धार्मिक एकात्मतेचं प्रतीक आहे. पण त्याची कथा त्याला छेद देणारी आहे. कूर्मदास संस्थानाच्या ट्रस्टींमधल्या मुस्लीम घराण्यातले ५२ वर्षीय इलाही रज्जाक मुजावर गोष्ट सांगतात, ती अशी,

औरंगजेब महाराष्ट्रात आला. त्यावेळी तो तुळजापूरपासून पंढरपूरपर्यंत मंदिर उद्ध्वस्त करत येत होता. रस्त्यात लऊळ इथं त्याची छावणी पडली. लऊळच्या कूर्मदास समाधीला बाटवण्याचा प्रयत्न त्याच्या सैनिकांनी केला. औरंगजेबाचं सैन्य कूर्मदासांच्या समाधीजवळ गोमांस घेऊन जायचं. तेव्हा गोमांसाचं रूपांतर तुळशीमाळ, फुलं आणि बुक्का यात व्हायचं. सैनिकांनी बादशहाला हकीकत सांगितली, बादशहानं चमत्काराला नमस्कार केला आणि या ठिकाणी संरक्षण देण्याचं ठरवलं. त्यानुसार कूर्मदासाच्या समाधीचा सांभाळ करण्यासाठी सुमारे १४० एकर जमीन जहागीर दिली. या जमिनीची आणि समाधी देखभाल करण्यासाठी मुजावर, हाजगुडे आणि ठाकूर यांना सेवेकरी म्हणून नेमलं. समाधीभोवती इस्लामिक पद्धतीचा घुमट बांधला. आपण या ठिकाणी आलो आहोत, यासाठी त्यानं एक कबर बांधली. आजही हे कबर कूर्मदास समाधीजवळ आहे.

तसंच एक मंदिर आहे. ते पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं. त्या ठिकाणी पाच पांडव आणि द्रौपदीच्या मूर्ती आहेत. शिवाय तिथंही एक समाधी आणि कबर आहे. पण ही कबरदेखील औरंगजेबानं त्याच्या आठवणीसाठी बांधलं असल्याचं हाजगुडे कुटुंबांच्या दहाव्या पिढीचे प्रतिनिधी आणि कूर्मदास देवस्थानाचे ट्रस्टी सुनील हाजगुडे यांनी सांगितलं.

कूर्मदासांच्या समाधी स्थळावर सेवेचा मान असणारे इलाही रज्जाक मुजावर सांगतात, ‘हा चमत्कार आम्ही देखील मानतो. त्यामुळं मधली चार वर्ष मी माळकरी झालो होतो. पण आता मुलांनी दबाव टाकला. आमच्या समाजाची लोकं नावं ठेवायला लागली. म्हणून मी माळ घालत नाही. पण आजही मांसाहार करत नाही.’

मुजावर सर्वात प्रभावित झालेत ते विहिरीच्या चमत्कारानं. ते सांगतात, ‘माझं वय ५२ वर्ष आहे. मी पाहतो तेव्हापासून आषाढी एकादशीला पंढरपुरात चंद्रभागेला पाणी आलं, तेव्हा कूर्मदासच्या समाधी मागच्या विहिरीला पाणी येतंच येतं. जिल्ह्यात दुष्काळ असेल किंवा काहीही असेल, पण या ठिकाणी आषाढीला पाणी येणार म्हणजे येणार, यात खंड पडलेला  नाही.’

समाधी आणि कबर एकत्र कशा काय? हिंदू-मुस्लिम एकत्र मिळून पूजा कसे करतात? या प्रश्नांची उत्तरं कळत नाहीत. तेव्हा औरंगजेबानं हल्ला केला होता, असं काहीतरी इतिहास म्हणून सांगणं सोपं असतंच. कारण औरंगजेब महाराष्ट्रासाठी व्हिलन आहे. त्यानं कूर्मदासाचं देऊळ बाटवलं असं सांगितलं की, सगळे डोळे झाकून विश्वास ठेवतात. पण औरंगजेबानं फक्त लऊळच नाही तर इतरही अनेक देवस्थानांना जहागिरी, जमिनी दिल्यात, हे इतिहास सांगतोय. शिवाय आठवण म्हणून कुणी कबर बांधत नाही. ती कुणातरी सत्पुरुषाची समाधी असते.

लऊळ परिसराला वारकरी, सुफी, लिंगायत अशा समन्वयवादी संप्रदायांचा वारसा आहे. त्यामुळं तिथं हिंदू-मुस्लिमांची श्रद्धास्थानं शेजारी शेजारी असणं अशक्य नाही. आपण इतिहास तपासायला हवा. पण त्यासाठी वेळ आहे कुणाकडे? त्यापेक्षा दोन धर्मांमध्ये तेढ उभ्या करणार्‍या गोष्टी सांगणं, फारच सोपं आहे.

0 Shares
भक्ताच्या भेटीला परब्रह्म आले गा इथं भाडं आकारलं जात नाही