सुदाम सावरकरांचे आद्यसंत

सुनील यावलीकर

‘आद्यसंत श्री सावता महाराज’ या नावाचं चरित्र ज्येष्ठ अभ्यासक सुदाम सावरकरांनी लिहिलं आहे. या पुस्तकात सावतोबांना संतचळवळीतलं आद्यस्थान सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय.

संत साहित्याचे संशोधनात्मक आणि चरित्रात्मक लेखन करणारे सुदाम सावरकर वाङ्मयीन क्षेत्रात सर्वश्रुत आहेत. सुदाम सावरकरांचं ऐतिहासिक मोलाचं कार्य म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ‘ग्रामगीता’ त्यांनी संपादित केली आहे. तुकडोजी महाराजांसमवेत त्यांनी गुरूदेव सेवा मंडळाचं कार्य शेवटच्या श्वासापर्यंत निष्ठेनं पार पाडलं.

सुदाम सावरकरांचा महाराष्ट्रभर गाजलेला संशोधनपर ग्रंथ म्हणजे ‘संतश्रेष्ठ तुकाराम : वैकुंठगमन की खून?’ या ग्रंथावर महाराष्ट्रभर चर्चा आणि वाद झाले. संत तुकारामांचा अभ्यास करताना हा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो. यासोबतच त्यांनी विविध संतांची चरित्रं, संशोधन ग्रंथाचं लेखन, संपादन केलं आहे.

सावता महाराजांवर त्यांनी ‘महाराष्ट्रीय संत संतचळवळीचे आद्य प्रणेते’ अर्थात ‘आद्यसंत श्री सावता महाराज’ हा संशोधनात्मक चरित्रग्रंथ लिहिला आहे. ‘सुदाम सावरकरांनी लिहिलेल्या या ग्रंथापूर्वी सावतोबांच्या चरित्राची सुसंगत माहिती देणारं पुस्तक नव्हतं. यापूर्वी संत सावतोबांचं चरित्र वरुड इथले गो. वि. राऊत यांनी १९३०मध्ये गद्यामध्ये आणि कामशेतचे भि. सा. भुजबळ गुरुजी यांनी १९४५मध्ये पद्य चरित्र प्रसिद्ध केली होती. पण ती दुर्मिळ आहेत. या चरित्रांमध्ये काही बाबतीत एकवाक्यता नव्हती. ती साधून सुदामजींनी या पुस्तकाच्या रूपानं भक्तांची आणि अभ्यासकांची अडचणीतून सुटका केली.’ असाअभिप्राय या चरित्रग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. भाऊ मांडवकरांनी आपला नोंदवला आहे.

संत चळवळीचं कार्य हे समाजाला आत्मभान देणारं होतं. ही भूमिका सुदामजींनी या चरित्रग्रंथात प्रामुख्यानं मांडलीय. या चरित्रग्रंथात वारकरी चळवळीचा पाया संत सावतोबांनी रचला, हे ते सोदाहरण दाखवायचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते काळाचा उल्लेख करतात. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्यापेक्षा सावतोबा वयानं ज्येष्ठ होते, हे सांगतात. श्रेयाबाबत सावतोबांवर अन्याय झाला, हा त्यांच्या संशोधनाचा सूर दिसतो.

मुळात संतचळवळीची व्याप्ती ही आभाळाला कवेत घेण्याइतकी मोठी आहे. वर्णभेदाच्या पलीकडे जाऊन मानवतेला कुशीत घेणारी आहे. सामूहिक नेतृत्वावर उभी ती आहे. त्यामुळं पायाभरणी कुणी केली, ही बाब संशोधनासाठी प्रस्तुत असेलही परंतु ‘एकमेका लागती पायी रे’ या जाणिवेनं जगणार्‍यांसाठी हा मुद्दा दुय्यम ठरतो.

सुदाम सावरकरांनी सावतोबांचं चरित्र तेव्हा उपलब्ध असलेल्या साधनांविषयी वेगळा विचार करून संशोधनाचा उपयोग करून लिहिलंय. त्यातून नवं संशोधन आणि मांडणी समोर आलीय. त्यामुळं त्याच्या काही मर्यादा लक्षात घेऊनही संतचळवळीच्या अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

0 Shares
सावतोबा घरोघरी पोचवणारा कार्यकर्ता सावतोबांची पोथी लिहिणाऱ्यांची गोष्ट