सावतोबा घरोघरी पोचवणारा कार्यकर्ता

धनंजय झोंबाडे

मा. गो. डोमाळे यांचं नाव ऐकलं तरी पाठोपाठ सावता माळी आठवतात. इतकं त्यांचं कार्य सावतोबांच्या विचाराशी एकरूप झालेलं आहे. सावतोबांच्या विचारांचा प्रसार याच ध्यासानं ते अखंड कार्यरत राहिले.

अभंग गाथेच्या ३००० प्रती, संत सावता दर्शन या पुस्तकाच्या ६००० प्रती, संत सावता माळी यांच्या १४ अध्याय पोथीच्या ५००० प्रती विनामूल्य वाटल्या. संत सावता माळी यांचा विचार महाराष्ट्रापुरता राहू नये, तो राष्ट्रीय पातळीवर गेला पाहिजे, हीच त्यांची धडपड होती. त्यातूनच त्यांनी पुण्यातल्या म. गो. जगताप यांच्याकडून सावता माळी यांचं हिंदी चरित्र लिहून घेतलं आणि त्याचं भव्य प्रकाशनही केलं.

संत सावता माळी यांच्या विचारांचा जागर चिरकाल होत राहिला पाहिजे, तो जातिधर्माच्या भिंती तोडून होत राहिला पाहिजे, असा विचार डोमाळे हे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्यासह अनेक विद्वान, अभ्यासक, विचारवंत, संपादक आणि सहकारी यांच्याजवळ व्यक्त करत राहायचे. त्यातूनच महाराष्ट्र साहित्य परिषदेत १९८५पासून ‘संत शिरोमणी सावता माळी व्याख्यानमाले’चा जन्म झाला. तसंच ‘संत सावता माळी पुण्यतिथी कार्यक्रम, संत सावता माळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आदी उपक्रमही त्यांनी सुरू केले. हे सर्व उपक्रम कायमस्वरूपी सुरू राहावेत यासाठी त्यांनी निधी गोळा केला. त्यासाठी कायम ठेव बँकेत ठेवून त्याच्या व्याजावर हे सर्व उपक्रम आजही सुरू आहेत. पुण्यात व्याख्यानमाला आणि पुण्यतिथी कार्यक्रम होतो, तर अरण इथं वक्तृत्व स्पर्धा होते. इतकंच नाही तर आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महात्मा फुले मंडळातर्फे शैक्षणिक साहित्याचं मोफत वाटप केलं जातं. या कार्यक्रमासाठीही डोमाळे यांनी ठराविक रक्कम बँकेत ठेवली आहे. दूरदृष्टी ठेवून असं सगळं काम डोमाळे यांनी उभं केलं आहे. ही सगळी माहिती बाळकृष्ण डोमाळे यांच्या बोलण्यातून मिळाली.

सावता माळी यांचा विचार घराघरात आणि त्याचवेळी जगभरात पोचवण्यासाठी डोमाळे यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या तळमळीमुळं सावतोबांची महती सातासमुद्रापलीकडे जाऊन पोचली. जर्मनचे संशोधक आणि अभ्यासक अचिल रेनेल्ट आणि डॉ. हेन्स त्यांचं घर शोधत शोधत आले, हे त्यांच्याच कामाचं फलित म्हणावं लागेल. बाळकृष्ण डोमाळे यांच्याशी चर्चा करताना मा. गो. डोमाळे यांच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडत गेले. डोमाळे प्रत्येक पुस्तकाच्या मागे देणगीदाराचं नाव प्रसिद्ध करत होते. तसंच खर्चाचा तपशीलही प्रसिद्ध करायचे. कुठं बांधकाम केलं तरीही देणगीदाराचं नाव हवंच असा त्यांचा आग्रह असे. या पारदर्शी व्यवहारामुळं त्यांनी देणगीदारांची मनं जिंकली. देणगीदारांचा डोमाळेंवर इतका विश्वास होता की अनेकजण त्यांच्या हाती कोरे चेक द्यायचे आणि रक्कम तुम्ही भरा असं सांगायचे. साधी राहणी, सामाजिक सेवेची जाण, संघटनकौशल्य, निःस्वार्थीपणा, जिद्द, मेहनत, परिश्रम आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती या गुणांमुळंच त्यांना कामाचा वटवृक्ष उभारता आला.

बोलता बोलता बाळकृष्ण डोमाळे यांनी आपल्या वडिलांची जुनी पेटी उघडून आमच्या पुढ्यात ठेवली. त्यात त्यांना मिळालेले पुरस्कार, भरलेली पावतीपुस्तकं, छापून आलेले वर्तमानपत्रातले लेख असं बरंच काही होतं. ते आम्ही पाहत असताना बाळकृष्ण म्हणाले, ‘कार्यक्रमाचं नियोजन, देणगी मिळवणं, पत्रकं वाटणं, पुस्तकं वाटणं, पावती देणं, लोकांना भेटणं अशा कामांसाठी खांद्याला शबनम पिशवी अडकवून फिरणारे मा. गो. डोमाळे आजही हजारो लोकांच्या स्मरणात आहेत. त्यांची पिशवी सतत पत्रकं, देणगी पुस्तकं आणि विविध कार्यक्रमांच्या नियोजनांच्या कागदांनी भरलेली असे.’

बाळकृष्ण बोलत राहिले, ‘दादांनी आम्हाला तसं मुद्दाम काही शिकवलं किंवा सांगितलं नाही. पण त्यांचं वागणं, बोलणं आणि आत-बाहेर एक असणं यातूनच आमच्यावर संस्कार होत गेले. आपल्याला पटलेला विचार इतरांना पटवून देण्याचा सातत्यानं प्रयत्न करायला हवा, असं त्यांना वाटे. माणसांच्या सद्गुणांवर आणि माणुसकीवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. त्यामुळंच ते कधी निराश झाले नाहीत. शेवटपर्यंत उत्साही राहिले. कित्येक लोक आजही भेटतात आणि दादांबद्दल सांगतात. तेव्हा आम्हालाही माहीत नसलेला दादांचा संघर्ष नव्यानं ऐकायला मिळतो.’

आपल्या वडलांबद्दल बोलताना बाळकृष्ण डोमाळे हळवे झाले होते.

पटलेला विचार पेरण्यासाठीची धडपड करणारे मा. गो. डोमाळे यांच्याबद्दलचं भारलेपण मनात साठलं होतं. आम्ही निघणार तितक्यात बाळकृष्ण डोमाळे आम्हाला त्यांच्या ९० वर्षांच्या आईकडे घेऊन गेले. सध्या त्या अंथरुणाला खिळून आहेत. ‘आई, हे आपल्या दादांची माहिती घ्यायला आलेत’, इतकंच वाक्य ते आईला म्हणाले. दादा हा शब्द पुसटसा त्यांच्या कानावर पडला आणि त्यांच्या डोळ्यावर नवं तेज उमटलं. बाहेर आल्यावर बाळकृष्ण म्हणाले, ‘आईला नीट ऐकू येत नाही आता. पण दादा हा शब्द तिला बरोबर ऐकायला आला आणि ती उठून बसली बघा.’

दादा असं नाव ऐकताच ९० वर्षांची माऊली आजारी असतानाही उठून बसली. डोमाळे यांचं नावच उत्साहानं भरलं आहे. त्यांचं कार्य जाणून घेतल्यानंतर त्यांच्या उत्साहानं आम्हीही भारावलो. त्यांच्यातला उत्साह आमच्यात साठवत त्यांच्या घराचा आम्ही निरोप घेतला.

0 Shares
सावतोबांचा पहिला चरित्रकार सुदाम सावरकरांचे आद्यसंत