सावतोबांचा पहिला चरित्रकार

डॉ. आशिष लोहे

अमरावती जिल्ह्यातल्या वरुड गावी एका माळी समाजातल्या शिक्षकानं संत सावता माळी यांचं पहिलं सविस्तर चरित्र लिहिलं, तेही १९३० वर्ष हे आजही आश्चर्य वाटणारं आहे. सावतोबांच्या प्रेरणेची मुळं अशी सर्वदूर पसरलीत.

वरुड हे शहर अमरावती जिल्ह्यात आहे, पण ते अमरावती शहरापासून जवळपास ९० किलोमीटर अंतरावर आहे. तसं ते मध्य प्रदेशालाच जवळचं. गावाला साहित्यिक परंपरा आहे. तरीही आजपासून ९० वर्षांपूर्वी संत सावता महाराजांचं पहिलं सविस्तर चरित्र इथं लिहिलं गेलं आणि प्रकाशितही झालं, यावर विश्वास बसत नाही.

वरुडला आजही असं चरित्र कुणी लिहिलं तर त्याचं कौतुक होईल. पण १९३० साली असं करून दाखवणा-या गोविंद विठ्ठल राऊत यांच्याविषयी आज वरूडकरांना फारशी माहिती नाही. वरुडच्या ‘देशबंधु वाचनालया’त हे पुस्तक मिळालं. आणि ते चाळताच गोविंदराव राऊतांविषयी प्रचंड आदर निर्माण झाला.

राऊत यांनी ‘संत शिरोमणी श्री सावता चरित्र’ हे शंभर पानांचं चरित्र दोन वर्ष मेहनत आणि संशोधन करून लिहिलं. या ग्रंथाला त्या काळचे गाढे अभ्यासक ज. र. आजगावकर यांनी प्रस्तावना लिहिलीय. या ग्रंथाचं वाचन करण्याचा बहुमान भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे या संस्थेनं आपल्या अठराव्या वार्षिक संमेलनाच्या वेळी दिला. तसंच या मंडळाचं सभादत्वही दिलं. त्या काळात वरुडच्या एका बहुजन समाजाच्या माणसाला असा सन्मान मिळाला असेल, यावर विश्वास बसत नाही.

वरुड ही संत्र्याची मोठी बाजारपेठ. त्यामुळं तिथं माळी समाजाची चांगलीच वस्ती आहे. त्यातले गो. वि. राऊत हे त्याकाळी मॅट्रिकपर्यंत शिकले होते. ते पेशानं शिक्षक होते. त्यांना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता. ते भविष्यही सांगत. त्यांना तीन मुली होत्या. मुलगा नव्हता. त्या तीनही मुली आज हयात नाहीत. नातवंडं आहेत; पण त्यांना काही विशेष माहिती नाही. खारकर, मालपे, गणोरकर अशी काही त्यांची नातेवाईक मंडळी आजही वरूड या ठिकाणी वास्तव्याला आहेत.

राऊत यांच्या पुढाकारानं वरुड इथं असलेल्या सावता मंदिरात वाचनालय सुरू करण्यात आलं होतं. तेच सावता साहित्य कार्यालय असावं. हे वाचनालय १५-२० वर्षांपूर्वी बंद झालं. वरुडला सावता मंदिर आहे. दोन बाजूला विठ्ठल, रुक्मिणी आणि मधे सावता महाराजांची मूर्ती आहे. १९३४मध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झाल्याची नोंद सापडते. या मंदिराच्या निर्माणात त्यांचा पुढाकार असावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते या मंदिरातल्या मूर्तींची स्थापना केली गेलीय.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये ज. र. आजगावकर असं म्हणतात, प्रस्तुत चरित्राचे लेखक राऊत हे व-हाडातले राहणारे असून, त्यांच्या गावापासून सावतोबांची अरण-भेंडी ही गावं कितीतरी दूर आहेत. असं असतानाही मुद्दाम त्या ठिकाणी जाऊन आणि शक्य तितकी माहिती गोळा करून हे १०० पृष्ठांचं ‘श्री सावतामाळी चरित्र’ त्यांनी सादर केलं आहे. त्यांची ही संतसेवा महाराष्ट्र शारदेच्या दरबारात रुजू झाल्याशिवाय राहणार नाही, अशी मला खात्री वाटते.’

यावरून हे पुस्तक लिहिताना राऊत यांनी केलेल्या परिश्रमाची आपल्याला जाणीव होते. पुढं आजगावकर म्हणतात की, ‘संत सावता माळी यांचं एकही विस्तृत चरित्र मराठी भाषेत आजपर्यंत उपलब्ध नव्हतं. ते राऊत यांच्या परिश्रमानं आता उपलब्ध झालं आहे. यावरून हे पहिले दीर्घ चरित्र मानण्यास हरकत नसावी.’

या पुस्तकात एकूण अकरा प्रकरणं आहेत. यात सावता महाराजांचं बालपण, गृहस्थाश्रम, तीर्थयात्रा, सत्वपरीक्षा, आयुष्याच्या गोष्टी, सावतोबा आणि देव, सावतोबा, त्यांची अपत्यं याबद्दल माहिती असून, सर्वात शेवटी सावता महाराजांचं वाङ्मय दिलं आहे. तळटीपा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. त्यात संदर्भ आणि पुरावे दिलेले आहेत. पुस्तक वाचताना त्यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रभाव असावा, असं वाटतं.

पृष्ठ क्र. ७१च्या तळटिपेमधे राऊत म्हणतात, ‘काही कथा या भाकडकथा आहेत. असं वाचकांनी खुशाल समजावं.’ पृष्ठ ७३ला ते म्हणतात, ‘सुज्ञ वाचक विचारतात की तुम्ही भाकडकथा का दिल्या?’ त्याचं उत्तर एवढंच आहे की ‘भाविक लोकांच्या मते हा ग्रंथ अपुरा राहतो म्हणून.’ यावरून राऊत यांनी लोक भावनांचा आदर केला हे दिसून येतं. पृष्ठ क्र. ७९ला सावता महाराजांच्या शेवटच्या दिव्य संदेशामधे ते म्हणतात, ‘दया हे धर्माचं मूळ आहे.’

या पुस्तकाला काळाच्या मर्यादा असल्या काही चमत्कारिक गोष्टी असल्या तरी त्या काळामध्ये एखादा बहुसंख्येने अशिक्षित असणा-या बहुजन समाजातला एक साधा शिक्षक एवढी मोठी कामगिरी करतो, याची दखल आपण घेतली पाहिजे.

0 Shares
सावतोबा-जोतिबा विचारांचे वारसदार सावतोबा घरोघरी पोचवणारा कार्यकर्ता