सावतोबा-जोतिबा विचारांचे वारसदार

श्रीनाथ वानखेडे

संत सावता माळी यांच्यावरचं पहिलं पुस्तक छापण्याचा मान मोतीराम वानखडे यांनाच द्यायला हवा. सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्ते असणार्याा मोतीरामजींनी सावतोबा आणि जोतिबा यांचा वारसा एकत्र पुढं नेला.

संत सावता माळी यांनी कर्तव्य आणि कामालाच ईश्वरसेवा मानलं. त्यांच्या याच शिकवणीचे वारसदार आपल्याला एकोणविसाव्या आणि विसाव्या शतकातसुद्धा बघायला मिळतात. त्यात सर्वात महत्त्वाचं नाव जोतिराव फुले यांचं आहेच. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात वर्‍हाड प्रांतात आपल्या लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून समाजातल्या अनिष्ट रुढी परंपरांवर वज्रप्रहार करणारे मोतीराम तुकाराम वानखडे यांचा उल्लेखही आवर्जून करावा लागेल. त्यांनी महात्मा फुले यांच्यानंतर महाराष्ट्रभर सत्यशोधक समाजाची मशाल सतत धगधगती ठेवली. विशेष म्हणजे सावतोबा आणि जोतिबा यांचा वैचारिक वारसा एकाचवेळेस मोठ्या ताकदीनं पुढं नेण्याचं काम केलं.

वर्‍हाड प्रांतात अमरावतीपासून ६० किमी अंतरावर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या करजगाव इथं मोतीराम तुकाराम वानखडे यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. समाजापर्यंत विचार पोचवण्यासाठी त्यांनी उदरनिर्वाहाचं साधन असलेली शेती विकून विकून १९२५ मध्ये‘सत्योदय’ नावाचा छापखाना सुरू केला. त्यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी मालतीबाई सुद्धा समाजकार्यासाठी खांद्याला खांदा लावून झटल्या.

शेतकीची शाळा घाला ॥ धृ ॥
बोर्डिंगची करा व्यवस्था । दर तालुक्याला ॥ 1 ॥
शेतकर्‍यांसच तेथे शिकवा । इतरांना टाळा ॥ 2 ॥
शिष्यवृत्तीही त्यास द्या हो । भरपूर या काळा ॥ 3 ॥
मोफत आणि सक्तीने द्या । शिक्षण कृषिकाला ॥ 4 ॥

मोतीरामजींनी ‘संगीत शेतकर्‍यांची गोफण’मधल्या या ओळींमधून मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या पलीकडे जाऊन शेतकीशिक्षणाचा आग्रह धरलाय. आज २००९ साली आपण शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा करतो. पण त्याविषयीचं लिखाण वानखडेंनी तेव्हा करून ठेवलंय. ‘सत्योदय’ या मुद्रणालयाच्या माध्यमातून असं असंख्य विषयांवरील लिखाण मो. तु. वानखडे यांनी प्रकाशित केलं.

१६ सप्टेंबर १९२१ रोजी सावता महाराजांवर वानखडे यांनी ‘महर्षी श्री संत सावता माळी यांचं चरित्र’ प्रकाशित केलं होतं. आज फक्त त्याची दोन पानं उपलब्ध आहेत. अभ्यासक सतीश जामोदकर यांच्यामुळे ती आम्हाला उपलब्ध होऊ शकली. त्यात एका पानावर वाचकांसाठी सूचना आहेत. त्यानुसार वानखडे काढत असलेल्या ‘माळी पुढारी’ या मासिकाच्या दुसर्‍या वर्षाच्या सहाव्या अंकात हे चरित्र छापण्यात आलं होतं. त्यात बदल करून ते पुस्तकरूपानं आणलं. सावतोबांच्या पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये ज्ञातीबांधवांनी हे चरित्र वाचून दाखवावं, असा आग्रह त्यांनी केलाय.

त्याआधी २५ सप्टेंबर १९१९मध्ये त्यांनी ‘संतशिरोमणी श्री सावता माळी यांचे काही अभंग’ या नावाची पुस्तिका प्रकाशित केली होती. जामोदकर यांनीच या पुस्तकाची प्रतही उपलब्ध करून दिली. त्यात सावतोबांचे तेव्हा उपलब्ध असलेले ११ अभंग, तसंच संत नामदेवांनी सावतांविषयी लिहिलेला एक अभंग असे एकूण १२ अभंग छापलेत. त्यांनी वाचकांना सावतोबांचे इतर अभंग असतील तर त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं आवाहन केलंय. ही छोटीशीच पुस्तिका असली तरी तिचं महत्त्व खूप आहे. कारण हे संत सावता महाराजांवर प्रसिद्ध झालेलं पहिलंच पुस्तक आहे. त्याआधी सावतोबांवर स्वतंत्रपणे कोणतंही पुस्तक लिहिलं किंवा प्रकाशित झाल्याचा उल्लेख सापडत नाही.

वानखडे यांची प्रेरणा महात्मा जोतिराव फुले हेच होते. ‘सर्वसाक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्ती’ हे जोतिरावांच्या सत्यशोधक समाजाचं घोषवाक्य होतं. ती प्रेरणा थेट अनेक शतकं जुन्या सावतोबांशी जोडण्याचं काम मोतीराम वानखडे यांनी आणि त्यांच्या या पुस्तकांनी केलं. सावता माळी यांनी कांदा, मुळा, भाजीत देव पाहिला. त्यांनी कर्मकांड, पुरोहितशाही नाकारली. तेच सत्यशोधक समाजानं आधुनिक संदर्भात अधिक आग्रहानं मांडलं.

वानखडे यांनी करजगाव इथं सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शिवाय ते अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे जनरल सेक्रेटरीही होते. याशिवाय ब्राह्मणेतर काँग्रेस, ब्राह्मणेतर प्रांतिक परिषदा, ब्राह्मणेतर वाङ्मय प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम आणि चळवळींशी त्यांचा निकटचा संबध आला आहे. ‘क्षत्रिय माळी पुढारी’ या मासिकाचे ते संपादक होते. मोतीराम वानखडे यांनी सुमारे २१ पुस्तकं लिहिली. तसंच काही ग्रंथांचं संपादनही केलं.

डॉ. अशोक चोपडे यांनी विदर्भातल्या ‘सत्यशोधक चळवळीचे साहित्य’ या पुस्तकात त्यांच्या पुस्तकांची यादीच दिलीय, ती अशी

१. संगीत शेतकर्‍याची गोफण (१९०३), २. सत्यशोधक चाबूक (१९०८), ३. सत्याचा शोध (१९०९), ४. स्वयंपुरोहित अथवा पूजापद्धती (१९०९), ५. संगीत भटांचे थोतांड खंडन (चौथी आवृत्ती १९२५),६. ब्राम्हण आणि बहिष्कार (१९१३), ७. ब्राम्हणांचा हक्क नाही (१९१०), ८. पवित्र कोण? ब्राम्हण की न्हावी (पाचवी आवृत्ती १९२३), ९. सत्यशोधकी ठराव (१९११), १०. वानखडे यांचे खानदेशातील भाषण (१९२१), ११. संत सावता माळ्यांचे अभंग (१९१९), १२. सावता माळी यांचे अल्पचरित्र (१९२१), १३. गायत्रीमंत्र (१९१२), १४. वेदाचार,१५. इशारा,१६. पेशवाईतील जुलमाचा पोवाडा,१७. सत्यशोधकांचा शंकराचार्याशी सामना.

यातली शेवटची पाच पुस्तकं उपलब्ध नसल्याची नोंद त्यांनी केलीय.

विशेष म्हणजे मोतीराम वानखडे यांचा त्यांच्या समकालीन सत्यशोधक पुढार्‍यांसारखा देव आणि धर्म यांचा विरोध नव्हता. ते हिंदू धर्माचे तसे समर्थकच होते. उत्तरआयुष्यात ते अमरावती शहर हिंदू महासभेचे उपाध्यक्षही बनले होते. मात्र पुरोहितशाहीला, धर्माच्या मध्यस्थांवर त्यांच्या गोफणीचा मारा कायमच तिखट होता. आपण ब्रह्म जाणणार्‍या खर्‍या  ब्राह्मणांचे विरोधक नसून फक्त लबाड भटभिक्षुकांचे विरोधक असल्याची त्यांची भूमिका होती. त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये संतसाहित्यच नाही तर वैदिक वाङ्मयाचेही संदर्भ असत. समाजप्रबोधनासाठी त्यांनी विविध मार्ग अवलंबले. त्यात कीर्तन आणि प्रवचनांचाही समावेश होता. त्यांनी स्वतंत्रपणे अभंगही रचलेत. धर्मचिकित्सा हा त्यांच्या एकूण प्रबोधनाचा पाया होता.

सत्यशोधक समाजाच्या तत्त्वानुसार ईश्वर आणि भक्त यांच्या दरम्यान मध्यस्थ ही कल्पना मान्य नसल्यानं त्यांनी १९०९मध्ये‘स्वयंपुरोहित अथवा पूजापद्धती’ हे पुस्तक प्रसिद्ध केलं. हे त्यांचं सर्वात गाजलेलं पुस्तक. आपले विधी आपण स्वतः करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शन करतं. तसंच यातले सर्व विधी सगळ्यांना कळतील अशा मराठीत आहेत. या पुस्तकाची मागणी एवढी प्रचंड होती की, १९५३मध्ये त्यांच्या मृत्युपर्यंत एकूण १२ आवृत्यांच्या २४ हजार प्रती हातोहात खपल्या. आता २००३मध्ये करजगावच्या माळी साहाय्यक मंडळानं हा ग्रंथ पुन्हा छापलाय. एकेकाळी या ग्रंथामुळं धार्मिक दलालांची मक्तेदारी धोक्यात आणली होती. पण पुढं भटांनी याच पुस्तकातल्या माहितीची चोरी करून सोपे विधी करायला सुरुवात केली.

0 Shares
श्रीगुरू नामदेव अण्णा सावतोबांचा पहिला चरित्रकार