क-हेच्या काठावरून निरेच्या काठावर

नीलेश बने

सुमारे ८५ वर्षांपूर्वी शेतक-यांची पोरं साखर कारखाना उभा करतात, हे मोठं आश्चर्य आहे. त्याची सुरुवात झाली तो दिवस होता, संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीचा. त्या प्रेरणेनं एक इतिहास घडवला. एक शहर उभं राहिलं. सावता@माळीनगर.

पंढरपूरला जाणारी वारीही एका मुक्कामावरून दुस-या मुक्कामाकडे निघते, तेव्हा एकआख्खं शहर एका ठिकाणाहून दुसरीकडं स्थलांतरित होतअसतं. माणसाच्या इतिहासाचं याहून सुंदर दुसरं कोणतं रूपक नसेल. कारण माणसाचा इतिहास हास्थलांतराचाच इतिहास आहे. जगाच्या पाठीवर सर्वत्रच माणसांच्या टोळ्याआजवर सतत एकीकडून दुसरीकडं स्थलांतरित होत आल्यात. कधी इजिप्तमधल्या नाइलच्या काठावरून, तर कधी चीनमधल्या यांगत्झेच्या काठावरून, कधी सरस्वतीच्याखो-यातून, तर कधी गंगेच्या पठारावरून.

माणसांचे समूह आजवरअखंडपणे नदीकाठावरून पाण्याच्या शोधात स्थलांतर करतआलेत. त्यातून माणसाची संस्कृती तयार झालीय. असंच एक छोटं स्थलांतर गेल्या शतकात महाराष्ट्रातल्या क-हेच्या काठावरून निरेच्या काठावर झालं. या स्थलांतरानं महाराष्ट्राच्या इतिहासात स्वतःची छाप उमटवली. संत सावता माळी महाराजांच्या प्रेरणेनं, त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्थिरावलेल्या या स्थलांतराची ही कथा! सोलापूर मधल्या माळशिरस तालुक्यातल्या माळीनगरची ही यशोगाथा!

मुंबई-पुणे आणि पुणे-सोलापूर या महाराष्ट्रातील दोन हायवेंवरून प्रवास सुरू होता. सतत जाणवत होतं, या रस्त्यांकडेची गावं बदललीत. त्यांची शहरं होत आहेत. वाटेत इंदापूरनंतर उजनीचं महाकाय धरण दिसलं. याच पाण्यावरून आज राजकारण पेटलंय. त्याला ही गावांची शहरं होण्याचा संदर्भ आहेच. पश्चिम महाराष्ट्रातले राजकारणी शड्डू ठोकून पाण्यासाठीआटापिटा करताहेत. या सा-या पार्श्वभूमीवर आम्ही या पाण्यासाठीच वसलेल्या माळीनगर नावाच्या शहराची गोष्ट जास्तच महत्त्वाची ठरत चाललीय.

टेंभुर्णी ते अकलूज एसटीनं माळीनगर ला पोचेपर्यंत रस्त्याच्या कडेला सावता माळी, महात्माफुले, सावित्रीबाई फुले यांची नावं असलेल्या संस्था, इमारती दिसू लागल्या होत्या. माळी समाजाचं प्राबल्यत्यातून दिसत होतं. आजमाळीनगर हे दहा-पंधरा हजार वस्ती असलेलं छोटं शहर आहे. एका शहरासाठी लागणा-या सा-या गोष्टी म्हणजे शाळा, कॉलेज, बँक, बाजार, रेस्टॉरंट, बागा, सगळं आहे इथं. पण १९३० पर्यंत इथं काहीही नव्हतं. कारण तिथं माळीनगरचा साखर कारखाना नव्हता. एक कारखाना काय करू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. स्थलांतर आणि शहरीकरण या माणसाच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी माळीनगर हे आजच्या काळातला एक परिपूर्ण ‘केसस्टडी’आहे.

या ‘केसस्टडी’ची सुरुवात होते, ती एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून. १८८५च्या सुमारास क-हा नदीच्या काठावर वसलेल्या सासवड गावातल्या माळी समाजापुढं मोठं प्रश्न चिन्ह उभं राहिलं होतं. सिंचनाच्या अपु-या सोयी आणि निसर्गाची प्रतिकूलता यामुळं शेतीवर परिणाम होत होता. त्यासमोर हार मानणं या कष्टाळू समाजाचा स्वभाव धर्म नव्हता. त्यांनी जिद्दीनं गाव सोडलं आणि बारामती परिसरात जमिनी खंडानं घेऊन उसाची लागवड केली. ऊस हे पीक त्यावेळी ऐन भरात होतं. शेट फळ तलावातल्या पाण्यावर सुरू असलेल्या या शेतीला यश मिळू लागलं. उसाचं शिवार डोलू लागलं आणि दुसरीकडं गुळाचं गु-हाळ रटरटू लागलं.

पुढं काही वर्षातच पुन्हा एकदा निसर्गाचा कोप झाला आणि दुष्काळ पडला. पाण्यासाठी परत एकदा शोध यात्रा सुरू झाली. त्यातून पुढं नीरा नदी काठावरच्या कोपरगाव, बेलापूर, बारामती, बावडा, अकलूज, माळीनगर परिसरात हा समाज स्थिरावला. आता फक्त शेतीवरअवलंबून राहून चालणार नाही, हे या समाजाला पटलं होतं. आता शेतीबरोबर व्यवसायही हवा. म्हणूनच समाजातल्या धुरिणांनी एकत्र येऊन १९३१ साली सावता माळी पुण्यतिथीला आशियातील शेतक-यांनी उभा केलेला पहिला साखर कारखाना सुरू केला. त्याचं नाव ठरलं, ‘दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि. माळीनगर’.

माळीनगर साखर कारखान्याच्या भल्या मोठ्या कमानीतून आत शिरताना, कमानीच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करणारा भला मोठा बॅनर दिसला. कारखान्याकडून दिलेल्या शुभेच्छा पंतप्रधानापर्यंत पोचल्या असतील की नाही ते माहीत नाही, पण सत्ता आणि उद्योग हे एकमेकांपासून फार दूर राहू शकत नाहीत, हे मात्र मेंदूपर्यंत नक्की पोचलं.

आत शिरल्या नंतर आणखी एका गोष्टीनं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे साखर कारखान्याचं बोधचिन्ह. ते मात्र सत्तेपासून लांब जाण्याचा रस्ता दाखवणारं. भागवत धर्माची पताका झळकावणा-या मंदिराचं मातकट रंगाचं चित्र हे या साखर कारखान्याचं बोधचिन्ह आहे. ‘लसूण, मिरची,कोंथिबिरी, अवघा झाला माझा हरी’म्हणणा-या संत सावता महाराजांची मातीशी जोडलेली परंपरा या बोधचिन्हातून कारखान्याच्या परिसरात जागो जागी जाणवत राहते.

कारखान्याची स्थापना करणा-या संस्थापकांचे फोटो पाहिले, तरी डोक्याला मुंडासे बांधलेले, काळी टोपी घाललेलीही आजोबा-पणजोबा मंडळी काय विचारांनी भारलेली असतील, याची कल्पना येते. १९३०-३१ चा काळ म्हणजे देशभरात स्वातंत्र्याची चळवळ जोमात सुरू होती. टिळकपर्व संपून गांधीपर्व स्थिरावलं होतं. गांधीजी मिठाचा सत्याग्रह, असहकारआंदोलनाद्वारे देशात लोकजागर उभा करत होते. त्यावेळी इकडं माळीनगरमधे स्वदेशी उद्योगाची पाया भरणी घातली जात होती. अद्याप नव्या भारताचं चित्र स्पष्ट व्हायचं होतं; पण या नव्या भारतासाठी हव्या असलेल्या नव्या उद्योगाची सुरुवात इथं माळीनगर मध्ये होत होती.

या कारखान्याची गोष्ट सांगताना माळीनगरच्या शाळेत शिक्षक असलेले रितेश पांढरे यांचा ऊर भरून आला होता. ते म्हणाले, ‘शेतक-यांच्या पोरांनी कारखाना उभारणं ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यांना असंख्य अडचणी आल्या. असं सांगतात, एक वेळ अशी आली की, भांडवल उभं करण्यासाठी बायकांनी आपले दागिने गहाण ठेवले होते. हा कारखाना उभारण्या आधी हरिभाऊ गिरमे, नानासाहेब पांढरे, गणपतराव रासकर, रावबहाद्दूर बोरावके, भगवंतराव गिरमे, बापुराव बोरावके आदीमंडळींनी उत्तरप्रदेश, बिहारचा अभ्यास दौरा केला. मराठी माणूस असा उद्योगाच्या अभ्यासासाठी बाहेर पडल्याचं त्या काळातलं हे दुर्मिळ उदाहरण असेल.’

बिहार मधला बक्सरचा १०० टनी कारखाना, तसंच उत्तर प्रदेशातला पचुरकी, लखनौ इथले कारखाने पाहिल्यावर त्यांना साखर धंद्याची व्याप्ती लक्षात आली. भागभांडवल, एकूण खर्च, उसाची गरज आदी बाबींची आकडेमोड करूनही मंडळी पुन्हामाळीनगर मध्येआली ती कारखाना उभारण्याचा निश्चय करूनच! आर्थिक अडचणी तर होत्याच; पण त्यासोबत अनुभवाचीही कमतरता होती. फारसं कोणी शिकलेलंही नव्हतं. पैसा, कायदा, घटना, नियम, जमिनी, यंत्रं हे सगळे मातीत काम करणा-यांना सुरुवातीला अवघड गेलं. पडत-अडखळत १९३१ मध्ये आषाढ वद्य चतुर्दशीला सावता महाराजांच्या तसबिरी पुढं नारळ फोडून नियामक मंडळ स्थापन झालं. पुढे ४०० रुपयांचा एक शेअर असे प्रत्येकी २५ ते १०० शेअर्स देण्याचं ठरलं. या शेअर्सना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता.

सुरुवातीला हा साखर कारखाना उभारताना सहकाराचं तत्त्व आचरणात आणायचं ठरवलं होतं; परंतु त्याकाळी कायद्यात तरतूद नसल्यानं हा विचार सोडून द्यावा लागला. दुसरीकडे हरिभाऊ गिरमे, नारायण बोरावके, नानासाहेब पांढरे ही मंडळी कारखाना उभा करण्यासाठी पैसा उभा करत होती. काही मंडळींनी आपला बागायतीचा भाग विकला. गुरं-ढोरं, घोडागाडी, दागिने विकूनही बँकेच्या खात्यावर ५८ हजार, ४६३ रुपये आणि १३आणेच जमा झाले होते. मशिनरीची ऑर्डर देण्यासाठी ४ लाख रुपयांची गरज होती. शेवटी लिवरपूल कंपनीकडे कारखान्याची सर्व जमीन गहाण ठेवली. २ फेब्रुवारी १९३४ मध्ये गहाण खत करार झाला. त्यानंतर फॉसेटप्रेस्टन कंपनीनं इंग्लंडवरून जहाजानं भारतात यंत्रं पाठविली. आधी जहाज प्रवास आणि मग रेल्वे प्रवास करूनही यंत्रं कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर आली.

रेल्वे स्टेशनवरआलेली ही यंत्रं कारखान्याच्या जागेवर आणणं म्हणजे आणखी मोठं दिव्य होतं. कारण त्यावेळी नीरा आणि भीमा नदीवर पूल नव्हते. रस्तेही चांगले नव्हते. वाहनं पुरेशी नव्हती आणि माणसंही. मग मिळेल त्या मार्गानं यंत्रं कारखान्याच्या जागेवर आली. कारखाना उभा राहू लागला. १९३४-३५ या गळीत हंगामामध्ये कारखान्यानं साखर उत्पादन सुरू केलं. विजयादशमीच्या दिवशी शेतक-यांनी बैलगाडीवरून आणलेल्या उसाची मोळी गव्हाणीत टाकून साखर निर्मिती सुरू झाली. पहिल्याच हंगामात कारखान्यानं बनवलेल्या साखरेला पुण्यातल्या प्रदर्शनात सुवर्णपदक मिळालं.

१९३४ ला कारखाना सुरू झाला, तेव्हा त्या भागात उसाचं एकरी उत्पादन ३४ ते ३५ टनांपर्यंत होतं. शेतक-यांनी त्यात नवं संशोधन आणून ते ७०-८० टनांपर्यंत नेलं. पुढच्या दोन वर्षातच कंपनीचं क्षेत्र तीन हजार एकरांवर गेलं. सुमारे ११०० एकरांवर कंपनीनं उसाचे मळे फुलवले. साखर कारखान्यात उत्पादित झालेल्या साखरेला जे नाव देण्यात आलं, तेही पुन्हा सावता माळ्याच्या विठोबाशी नातं सांगणारं, ‘पंढरपुरी पवित्र साखर’.

या कारखान्यानं राज्याला एक आशेचा किरण दाखवला. १९५९मध्ये कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यासाठी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. या कार्यक्रमावेळी यशवंतरावांनी कारखान्याचं आणि त्यामुळं झालेल्या कायापालटाचं तोंड भरून कौतुक केलं. हा राज्यातील मानाचा पहिला सहकारी साखर कारखाना आहे, गौरवोद्गारही त्यावेळी त्यांनी काढले.

रौप्यमहोत्सवानंतर सुवर्णमहोत्सव, अमृतमहोत्सव हे टप्पे यशस्वीपणे पार करून कारखान्यानं आज ८७ वर्ष पूर्ण केलीत. या ८७ वर्षात कारखान्यानं अनेक चढउतार पाहिले. माळीनगरच्या आजूबाजूला आणि उर्वरित महाराष्ट्रातही साखर कारखान्यांचं पीक आलं. साखर कारखाना आणि राजकारणयांची सांगड इतरांना जमली तशी ती माळीनगरला जमली नाही. दुसरीकडे ऊस आणि दुष्काळयांचं गणित कळू लागल्यानंतर एकंदरीतच पाण्याच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. तरीहीअद्याप हा साखर कारखाना सुरू आहे. नवनवे प्रयोग करतो आहे. आजवर अनेक संकटांना पुरून उरलो, तसंच यापुढंही उरू, असा आत्मविश्वास इथले कामगारही व्यक्त करत आहेत.

कारखान्याच्या गेटवर मारुतीचं मंदिर आहे. शनिवार होता म्हणून मारुतीच्या दर्शनाला जाणा-यांची वर्दळ होती. तिथं एक मध्यम वयाचे काका भेटले. त्यांना कारखान्याबद्दल विचारलं तर ते म्हणाले, ‘आता पूर्वीसारखी मजा राहिली नाही. पूर्वी कारखान्यात कामाला आहे म्हटलं की कॉलर ताठ व्हायची. आता कम्प्युटर चालवता आला पाहिजे. तुमचं काय ते प्रोग्रामिंग वगैरे आलं पाहिजे. कामगाराला या जगात किंमत नाही राहिली. लोकांना आमच्या साखरेपेक्षा फॉरेनची साखर आवडते. त्याला आता आम्ही तरी काय करणार? पण बघू. आमच्या कारखान्याला शंकर महाराज आणि गहिनीनाथांचा आशीर्वाद आहे. त्यामुळं आमचं भलंच होईल.’

माळीनगर परिसरातील अनेकांच्या श्रद्धा कारखान्यात असलेल्या शंकर महाराज आणि गहिनीनाथांच्या देवळांशी जोडलेल्या आहेत. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन असे सर्वधर्मीय भक्त असलेले शंकर महाराज १९४० च्या सुमारास माळीनगरला आले होते. महाराजांनी कारखान्याच्या परिसरात गहिनीनाथ महाराजांच्या पादुका असल्याचं सांगितलं. महाराजांच्या आदेशानं त्या पादुका शोधण्यात आल्या आणि नंतर तिथं मंदिर बांधण्यात आलं. पुढं शंकर महाराजांचंही मंदिरत्याच्या शेजारी उभारण्यात आलं.
तसंच, १९५६ मध्ये कारखान्याच्या कार्यालयासमोर संतसावता माळी यांचा संगमरवरी पुतळा उभारण्यात आला. गावात संत सावता माळी यांच्या नावानं आणखी दोन संस्था आहेत. एक आहे ती म्हणजे सावता माळी प्रिंटिंग प्रेस. साखर कारखान्यासाठी लागणा-या स्टेशनरीची निर्मिती इथं होते. याच प्रेसमधे भिकू भुजबळयांनी लिहिलेल्या सावता महात्म्यही पोथी छापण्यात आली होती. दुसरी म्हणजे सावता माळी भाजी मंडई. या मंडईत शेतकरी थेट येऊन आपली भाजी लोकांना विकू शकतात.

माळीनगरातील या कामगरांसाठी हा कारखाना म्हणजे काम करण्याची जागा नाही. त्यांच्यासाठी ते घर आहे. कारखान्याच्या परिसरातच या कामगारांची घरं आहेत. कारखान्यानंच उभारलेल्या शाळेमधे त्यांची मुलं शिक्षण घेतात. तिथंच त्यांचं कॉलेजचं शिक्षणही होतं. वैद्यकीय उपचाराचीही व्यवस्था कारखाना परिसरात आहे. पण लोक जगराहटीप्रमाणं खासगी डॉक्टरांकडं जाणं पसंत करतात. महिला मंडळ, क्रीडांगण, ज्येष्ठ नागरिक मंडळ अशा अनेक उपक्रमांमुळं कारखाना हा माळी नगरातील अनेकांचा आधारवड ठरलाय.

आज माळीनगर फक्त साख रकारखान्याचं गाव उरलेलं नाही. साखर कारखाना मध्यवर्ती ठेवून सभोवती वसलेली अर्थव्यवस्था आज मोठी होऊ लागलीय. शाळा, कॉलेज, आयटीआय या सगळ्यांमध्ये शिकवणारे शिक्षक-विद्यार्थी, पोलीस, होमगार्ड, जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, रेस्टॉरंट, मंगल कार्यालय या सा-यांमुळं साखर उद्योगासोबतच निमशहरी अर्थव्यवस्था स्थिरावलीय. माळीनगरच्या मुख्य रस्त्यावर कॉलेजांची मोठमोठी होर्डिंग लागलीत. ही होर्डिंग गावातल्या तरुणाईला अकलूज, बारामती या मोठ्या शहरांकडं आकर्षित करताहेत. ती पाहताना गावातील नव्या पिढीच्या भविष्यातील स्थलांतरांची चाहूल लागते.

गावात चौकशी केली असता कळलं, अनेक जणआपल्या मुलांना शिक्षणासाठी म्हणूनअकलूज, बारामती, इंदापूरला पाठवतात. काहीजण तर पुणे-सोलापुरातही जातात. आज गावात नोकरी धंद्यासाठी फार काही सुविधा नाहीत. त्यामुळं इंजिनिअर झालेला पोरगा गावात काय करणार? त्यामुळं हळूहळू तो पुण्याकडं घर शोधू लागतो. आज पुणे-सोलापूर हायवेमुळं थेट उरळी कांचनपर्यंत पुणे वाढलंय. या महानगरांच्या वेशीवर, ज्याला शहरी भाषेत उपनगरीय भागांमध्ये उभ्या राहणा-या नव्या वस्त्या या गावाकडल्या मुलांसाठीची नवी घरं ठरताहेत. मग फक्त शनिवार-रविवारी गावात आणि उरलेले दिवसया शहरात असं विचित्र शहरीकरण आज महाराष्ट्राच्या अनेक भागात होताना दिसतं. माळीनगर ही त्याला अपवाद नाही.

१९७२ नंतर पडत राहिलेले दुष्काळ आणि १९९० नंतर आलेले जागतिकीकरण यांनी स्वातंत्र्योत्तर काळातली सारी रचनाच बदलून टाकली. उसाचा भाव पडला, साखर कारखान्यांना ही ऊस विकत घेणं परवडेनासं झालं, पाण्याचा प्रश्न पेटू लागला, साखरेचा बाजार रोडावू लागला या आणि अशा अनेक कारणांनी एकंदरीतच साखर उद्योग अडचणीत आला. माळीनगरमध्येही साख रकारखान्याला या संकटाचे झटके बसू लागले. फक्त साखरेवरअवलंबून राहण्याचा काळ संपला. म्हणूनच माळीनगर कारखान्यानं नवी मांडणी केली आणि साखरेसोबतच मॉलेसिस बेस्ड डिस्टलरी, कंपोस्ट खतप्रकल्प, इथेनॉल निर्मिती, ग्रेन बेस्ड डिस्टलरी, बायोगॅस प्रकल्पआणि सहवीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आले. या दूरदृष्टीमुळं आजही हा कारखाना अडखळत का होईना, पण स्पर्धेत टिकाव धरून आहे.

आज कारखाना सुरू असला तरी भविष्यातली आव्हानं काही फार दूर नाहीत. या आव्हानांना कसं तोंड देणार? हे जाणून घेण्यासाठी आम्ही माळीनगर साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे यांना भेटलो. कोकणातल्या घराची आठवण व्हावी असं त्यांचं घ रमाळीनगर-अकलूज रस्त्यावर आहे. राजेंद्र गिरमे यांना गावात सगळे रंजन भाऊ म्हणून ओळखतात. आम्ही पोचलो तेव्हा गावातले एक काका घरातल्या वर्षश्राद्धाचं बोलावणं घेऊन रंजन भाऊंना भेटायला आले होते. गावातल्या कारखान्याचा व्यवस्थापकीय संचालक शेतक-यासाठी किती जवळचा असतो त्याची साक्ष आम्हाला त्यांच्यातील संवादावरून कळत होती.

रंजन भाऊंना थेट साखरकारखान्याच्या भविष्याबद्दल विचारलं. त्यावरते म्हणाले, ‘आज शेतक-यांचं आयुष्य सर्वात बिकट झालं आहे. शेतकरी खचला तर ऊस उत्पादन कमी होणार, ऊस कोलमडला की, साखर कारखाने कोसळणार. आज पाण्याच्या राजकारणामुळं आणि एकंदरीतच उद्योगांबद्दल असलेल्या धोरणांमुळं साखर उद्योग उताराला लागला आहे. फक्त साखरे वर नफा कमवता येईल, हा आता भूतकाळ झालाय. साखरेसोबत जी बायप्रॉडक्ट काढता येतील, ती सर्व आम्ही काढून पाहिली. हे सगळं प्रभावीपणे करायचं असेल, तर सर्वात आधी ऊस जगला पाहिजे; पण आज सर्वत्र उसाच्या विरोधातली हवा आहे. साखरेबद्दल ही जगभरामध्ये नकारात्मक प्रचार होतोय. हे सारं पाहता मुंबई-सोलापूरच्या कापड गिरण्या जशा बंद पडल्या, तसंच भविष्यात साखर कारखानेही बंद पडतील.’

भविष्यातलं चित्र चिंताजनक असलं तरी आमचा धीर खचलेला नाही. कोणत्याही अडचणीवर मात करण्याची आमची परंपराआहे. सासवडपासून आजपर्यंत आम्ही अनेक संकटांना तोंड देऊनच इथवर आलोय. साखरेच्या उत्पादनाबरोबर जे करता येईल, ते सर्व करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. शेती आणि शेतीवर आधारित उद्योग करण्यासाठी आम्ही विविध पद्धतीनं अभ्यास करतो आहोत. आज पाण्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. त्यासाठी जास्तीतजास्त पाण्याचे साठे उभे करण्यासाठी आम्ही शेततळी उभारतो आहोत. या शेततळ्यामधे मत्स्यपालन करता येईल का, याचा विचार करतो आहोत. डाळिंबासारख्या पिकाच्या आधारे नवे उद्योग उभे करता येतील का, याची चाचपणी करतो आहोत. आज जगभरात ऑरगॅनिक वस्तूंची मागणी वाढते आहे. शेतीतून हे नवं ऑरगॅनिक मार्केट कसं गाठता येईल, त्याच्या शक्यता आजमावतो आहोत. अर्थातच हे सगळं करण्याआधी कारखाना आणि त्याभोवतीची अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’

रंजन भाऊंच्या बोलण्यामध्ये भविष्याची चिंता आणि त्यावर मात करण्याचं नियोजन या दोघांचा मिलाफ दिसत होता. येणा-या परिस्थितीवर न डगमगता मात करण्याचं स्पिरिट या समाजाच्या रक्तातच भिनलेलं आहे, हेच त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. रंजनभाऊंच्या घराबाहेर पडताना माळीनगरचा इतिहास आठवत होता. सतत नवे बदल स्वीकारत जगणारा हा समाज नव्या लढाईला सज्ज असलेला दिसला.

हे सारं सुरू असताना माळीनगरचं रिंगण डोक्यात फेर धरून धावत होतं. देहूहून पंढरपूरला जाणा-या तुकोबारायांच्या पालखीचं उभं रिंगण दरवर्षी माळीनगर कारखान्यानं बांधलेल्या शाळेच्या मैदानावर होतं. प्रचंड उत्साहात आणि श्रद्धेनं या सोहळ्याचं आयोजन माळीनगरकर करतात. पण या माळीनगरमध्येआज विठोबाचं एकही मंदिर नाही किंवा पंढरपूर ला जाण्याचा फारसा उत्साह नाही. जसं सावता महाराज पंढरपुराजवळ राहूनही कधीच पंढरपूरला गेले नाहीत. त्यांनी आपल्या कामा मध्येच परमेश्वर शोधला. कदाचित माळीनगरच्या या शेतकरी आणि कामगारांनाही विठोबाला भेटण्यासाठी पंढरीला जावं लागत नसेल. त्यांना साखर कारखान्याच्या भोंग्यातच आरतीचे सूर ऐकू येत असतील.

0 Shares
मुंबईनंही जपलीय सावतोबांची प्रेरणा रंग भरल्या जगण्यातलं समयाचं सुभाषित