मुंबईनंही जपलीय सावतोबांची प्रेरणा

प्रवीण दाभोलकर

मुंबईसारख्या शहरात संत सावता माळी यांच्या नावानं जवळपास जवळपास नव्वद वर्ष जुना ट्रस्ट काम करतोय. त्याचा इतिहास फारच मोठा आहे. सावता @ मुंबई.

भायखळ्यात राणीच्या बागेकडून बोरीबंदरच्या दिशेनं थोडं पुढं गेलं की डाव्या बाजूला श्री सावतामाळी भुवन ट्रस्टची ऐतिहासिक वास्तू आहे. समोरच भायखळ्याचं भाजी मार्केट आहे. या सर्वांचा एकमेकांशी जवळचा संबंध असून तो स्वातंत्र्याच्या आधीपासून सुरू असलेल्या मुंबईतल्या सामाजिक राजकीय चळवळींशी जोडला गेलाय.

रस्त्याची सुरू असलेली कामं, दुकानांची झपाट्यानं वाढलेली संख्या या सर्वात आता सावतामाळी ट्रस्टची जागा लपत चालली आहे. अगदी दोन-चार दुकानं पुढं-मागं जाऊन ‘सावतामाळी ट्रस्ट कुठंय?’ असं विचारलं तरी दुकानदार थोडा वेळ विचार करतात आणि ‘आहे इथंच कुठंतरी’, असं सांगतात. कारण ही जागा सबाजी सावळाराम मेहेर हॉल म्हणून देखील ओळखली जाते. हा हॉल सावतामाळी ट्रस्टच्या अंतर्गत चालवण्यात येतो आणि या लहानश्या हॉलमधे छोटेमोठे समारंभ, लग्न सोहळे होत असतात.

इमारतीच्या मुख्य द्वारावर फार जुनी अशी दगडाची गोलाकार कमान आहे. त्यावर दोन स्वस्तिकांच्यामधे ‘सावतामाळी भुवन’ असं लिहिलं असून शके १८५४आणि सन १९३२ याची नोंद आहे. दोन्ही बाजूंच्या रंगबेरंगी दुकानांच्या पाट्यांमुळं ही क्वचितच नजरेस पडते. या मुख्य दरवाजापासून काही दुकानं सोडून मेहेर हॉलचा दरवाजा आहे.

इथं आपल्याला हेमंत पांडुरंग मंडलिक भेटतात. या ट्रस्टचे सेक्रेटरी. भायखळ्याचा एस ब्रीज ज्या पांडुरंग मंडलिक नावानं ओळखला जातो त्यांचे पुत्र. ६१ वर्ष केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या सावतामाळी भुवन ट्रस्टची जागा २००३साली समाजाला परत मिळाली. त्यासाठी स्थापन केलेल्या कृती समितीचे हेमंत मंडलिक हे निमंत्रक होते. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे माजी अध्यक्ष ना. स. फरांदे, माजी आमदार मधु चव्हाण यांनी या कामात हातभार लावला.

भुजबळ, फरांदे अशी मोठी नावं सावतामाळी ट्रस्टशी जोडली गेली जाण्यामागची छोटी कहाणी हेमंत मंडलिक सांगतात, ‘संत सावता माळी ट्रस्टतर्फे माळी समाजातल्या होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. भुजबळ, फरांदे तसंच माजी केंद्रीय मंत्री रजनी सातव या देखील सावतामाळी ट्रस्ट शिष्यवृत्तीचे लाभार्थी ठरलेल्या राज्यभरातल्या हजारो विद्यार्थ्यांपैकी एक आहेत. सावतामाळी ट्रस्टच्या अशा अनेक कार्यामुळं राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील दिग्गज संस्थेशी जोडले आहेत.’

विसाव्या शतकाच्या आधीपासूनच माळी समाज दक्षिण मुंबई परिसरात मोठ्या संख्येनं येऊ लागला होता. लालबाग, परळ, भायखळा या ठिकाणी यांच्या भाजीपाल्याच्या व्यवसायानं चांगलाच जोर धरला. त्यांच्या केंद्रस्थानी होतं भायखळा भाजीमार्केट. १८५८ सालापासून हे मार्केट आकार घेत होतं. पुढे १८७३-७४ साली हे मार्केट बांधलं गेलं. १८८२ला लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर डोंगरीच्या तुरुंगात असताना महात्मा फुलेंनी त्यांना जामीन देऊन सोडवलं. डोंगरीवरून मिरवणूक काढून त्यांचा जंगी सत्कार याच मार्केटमधे केला. १९०७मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं लग्नही याच मार्केटमधे लागलं. अनेक स्वातंत्र्यसैनिक इथंच भूमिगत राहत. १९४२च्या लढ्यात ऐतिहासिक मुंबई काँग्रेसचं दप्तर इथंच लपवलं होतं. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही मार्केटनं सक्रिय सहभाग नोंदवला.

इथं संत सावता माळी आणि महात्मा फुले यांची जयंती पुण्यतिथी मोठ्या उत्साहानं साजरी होत आलीयं. त्यात जवाहरलाल नेहरूंपासून हमीद दलवाईंपर्यंत मोठमोठी माणसं सहभागी झालीत. वारकरी संप्रदायातलेही अनेक दिग्गज या मार्केटमधे आलेत. त्यात गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, बंकटस्वामी, दादामहाराज सातारकर, विष्णुपंत जोग महाराज, सोनोपंत दांडेकर, भजनसम्राट फुलाजीबुवा, मुदुंगाचार्य नारायण कोळी, स्नेहल भाटकर, बाळासाहेब भारदे प्रमुख होते.

मार्केट आकार घेत असताना माळी समाज म्हणून मार्केटमधली मंडळी एकत्र आली. त्यात पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकमधून आलेली मंडळी होती. त्याला अर्थात महात्मा फुलेंची प्रेरणा होती. भायखळा मार्केटचे मालक सबाजी मेहेर यांनी संत सावता माळी नावानं फंड काढला. १९३० साली ट्रस्टसाठी जागा घेण्यात आली. पुढं जाऊन ५ मे १९३५ला सावतामाळी भुवन ट्रस्टची स्थापना झाली. हॉल, वाचनालय आणि व्यायामशाळेसोबत सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाही सुरुवात झाली ती आजही सुरूच आहे.

१९३५ साली सावतामाळी ट्रस्ट उभारली गेली तरी माळी समाज बांधवांना इथलं वास्तुसुख फारवेळ उपभोगता आलं नाही. १९४३मध्ये दुसर्‍या महायुद्धाच्या काळात आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं केंद्र सरकारनं संस्थेच्या हॉलमधे रेशनिंग कार्यालय उघडण्याची मागणी ट्रस्टकडे केली. साधारण ११ वर्षांनी इथलं रेशनिंग कार्यालय बंद झाल्यानंतर जागा संस्थेला पुन्हा मिळणं अपेक्षित होतं. पण त्यानंतर ३० एप्रिल १९५४रोजी ही जागा राज्य विमा महामंडळाला दिली. त्यानंतर ६४ वर्ष सावता माळी ट्रस्टच्या हॉलच्या या जागेत विमा महामंडळ सुरू राहिलं. त्यानंतर २००३साली छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक कृती समिती नेमण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान यांच्याशी पत्रव्यवहार झाला आणि संस्थेला आपली जागा परत मिळाली.

संस्थेतर्फे सुरुवातीपासूनच महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त ‘ज्योती’ व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येत असतं. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, दादासाहेब कन्नमवार, शंकरराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा दिग्गजांचं व्याख्यान इथं झालं आहे. तसंच संस्थेतर्फे सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त कीर्तन महोत्सव, वैद्यकीय शिबिर होत असतं.

भायखळा भाजीमार्केटच्या बाजूला मुंबई महापालिकेनं दुसरं भाजीमार्केट बांधलं होतं. त्याला संत सावता माळी यांचं नाव होतं. पण मुंबईतल्या इतर मंड्यांप्रमाणंच हे देखील नव्यानं बांधलं जातंय. त्याचं बांधकाम रखडलंय. त्यामुळं तिथं निळ्या पत्र्यांशिवाय काहीच नाही. जवळच हेरिटेज हॉटेलकडून रे रोडच्या दिशेनं जाणारा एक रस्ता संत सावता मार्ग म्हणून ओळखला जातो. पण आता मुंबईचं होलसेल भाजीमार्केट नवी मुंबईत शिफ्ट झालंय. त्यामुळं या परिसराला पूर्वीसारखं वैभव नाही. तिथं सावता माळी यांच्या नावानं काही संस्था उभ्या राहिल्यात. त्यात ऐरोली इथलं संत सावता माळी मंडळ प्रमुख आहे. १९९२ला स्थापन झालेल्या या संस्थेची मोठी वास्तू उभी राहिलीय. तसंच पनवेल इथंही संत सावता माळी सभागृह ही भव्य इमारत उभी आहे.

0 Shares
इथं भाडं आकारलं जात नाही क-हेच्या काठावरून निरेच्या काठावर