संत सावता अभंगगाथा

Ringan

डॉ. हे. वि. इनामदार यांच्या ‘संत सांवता दर्शन’ या ग्रंथातले सावतोबांचे हे ३७ अभंग. सर्वात शेवटी त्यातल्या कठीण शब्दांचे अर्थ.

कां गा रुसलासी कृपाळू बा हरी ।
तुजविण दुसरी भक्ति नेणें ॥
दीन, रंक, पापी, दीन माझी मती ।
सांभाळा श्रीपती, अनाथनाथा ॥
आशा, मोह, माया लागलीसे पाठीं ।
काळ क्रोध-दृष्टीं पाहतसे ॥
सांवता म्हणे देवा, म्हणे नका ठेवुं येथे ।
उचलोनी अनंते, नेई वेगीं ॥१॥

माझी हीन याति । तुम्ही उदार श्रीपती ॥
नका देऊं भुक्तिमुक्ति । माझी परिसावी विनंती ॥
सांवता म्हणे पांडुरंगा । दुजेपण न्यावें भंगा ॥२॥

भली केली हीन याति । नाही वाढली महंती ॥
जरी असतां ब्राह्मण जन्म । तरी हें अंगी लागतें कर्म ॥
स्नान नाहीं, संध्या नाही । याति कुळ संबंध नाहीं ॥
सांवता म्हणे हीन याति । कृपा करावी श्रीपती ॥3॥

कांदा, मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी ॥
लसूण, मिरची, कोथंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥
मोट, नाडा, विहीर, दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥
सांवता म्हणे केला मळा । विठ्ठल पायीं गोविला गळा ॥४॥

आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत ॥
आम्हां हाती मोट, नाडा । पाणी जातें फुलझाडा ॥
शांति-शेवंती फुलली । प्रेम जाई- जुई व्याली ॥
सांवतानें केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥
स्वकर्मांत व्हावें रत । मोक्ष मिळे हातोहात ॥५॥

नको तुझें ज्ञान, नको तुझा मान ।
माझें आहे मन वेगळेची ॥
नको तुझी भुक्ति, नको तुझी मुक्ति।
मज आहे विश्रांति वेगळीच ॥
चरणीं ठेवुनि माथा, विनवितसे सांवता ।
ऐका पंढरीनाथा, विज्ञापना ॥६॥

मागणें तें आम्हां नाही हो कोणासी ।
आठवावें संतांसी हेंचि खरें ॥
पूर्ण भक्त आम्हां ते भक्ति दाविती ।
घडावी संगति तयाशींच ॥
सांवता म्हणे कृपा करी नारायणा ।
देव तोचि जाणा असे मग ॥७॥

ऐकावें हे विठ्ठल घुरे । विनंती माझी ही सत्वरें ॥
करी संसाराची बोहरी । इतुकें मागतों श्रीहरी ॥
कष्ट करितां जन्म गेला । तुझा विसर पडला ॥
माळी सांवता मागे संतान । देवा करी गा नि:संतान ॥८॥

विकासिले नयन स्फुरण आलें बाहीं ।
दाटले हृदयी करुणा-भरितें ॥
जातां मार्गी भक्त सांवता तो माळी ।
आला तया जवळी पांडुरंग ॥
नामा, ज्ञानदेव राहिले बाहेरी ।
मळिया भीतरी गेला देव ॥
माथा ठेओनि हात, केला सावधान ।
दिलें आलिंगन चहूं भुजीं ॥
चरणीं ठेवोनि माथा, विनवितो सांवता ।
बैसा पंढरीनाथा, करीन पूजा ॥९॥

पूर्वापार कुळीं पंढरीचा नेम ।
मुखीं सदा नाम विठ्ठलाचें ॥
तारी अथवा मारी देवा, तूचि एक ।
न घ्यावी भाक पांडुरंगा ॥
वडिलांचा सेवा-धर्म अजुनि चालवि ।
व्यर्थ न भुलवी मायापाश ॥
सांवता म्हणे देवा, अखंड घ्यावी सेवा ।
आठव असूं द्यावां, माझा बाप ॥१०॥

नामाचिया बळें न भिऊं सर्वथा ।
कळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥
वैकुंठींचा देव आणूं या कीर्तनीं ।
विठ्ठल गाऊनी नाचों रंगी ॥
सुखाचा सोहळा करूनी दिवाळी ।
प्रेमे वनमाळी चित्तीं धरूं ॥
सांवता म्हणे ऐसा भक्ति-मार्ग धरा ।
तेणें मुक्ति द्वारां वोळंगती ॥११॥

मंगल, मंगल नाम विठोबाचें ।
उच्चारिता जन्म खंडे ॥
सुलभ, दुर्लभ ब्रह्मादिका वंद्य ।
वेदादिक शुद्ध गाती जया ॥
सांवता म्हणे सर्व सुखाचे आगर ।
रुक्मादेवी – वर विटेवरी ॥१२॥

एक नाम हरी, द्वैत नाम दुरी ।
तोचि कल्पवरी चिरंजीव ॥
ऐसा ज्या भार, नावाचे नारायण ।
नाहीं त्या बंधन कळिकाळाचें ॥
न लगे सायास, न पडे संकट
नामें सोपी वाट, वैकुंठाची ॥
सांवता म्हणे नर, तो प्रत्यक्ष पावन ।
गाई रामकृष्ण सर्व काळ ॥१३॥

ज्या नामें तरले दोषी जे अपार ।
तोचि हा श्रीधर, कर कटीं ॥
मौनेंचि उभा, मौनेंचि उभा विटेवरी ।
सांवता म्हणे ते जन्मा ये अंबरीं ॥१४॥

दुजेपणाचा भाव । नको काही आन ठाव ॥
सदा वाचें नामावळी । गर्जो नित्य वेळोवेळीं ॥
सांवता म्हणे दयाघना । आठव मना असूं द्यावा ॥ १५ ॥

विवाद करितां भागलीं दरुशनें ।
तेंचि आलें केणें भीमा तीरीं ॥
पुंडलिक-पेठ रहिवासु केला ।
शब्द हा मिरविला विठ्ठलनामें ॥
आषाढी- कार्तिकी दोन्हीच पैं हाट ।
वैष्णव भाट गर्जताती ॥ १६ ॥

पुंडलिका भुलोनि आला । उभाचि ठेला अद्यापिही ॥
येती जे जे दुराचारी । दरुशनें उद्धरी नरनारी ॥
सांवता म्हणे वेदश्रुति । अखंड जयासि ते गाति ॥१७॥

शिव, ब्रह्मा, विष्णु तिन्ही एक देव ।
जे निराकार सम्यक, विठ्ठल माझा ॥
विठ्ठलनामाचा महिमा अगाध ।
होणें पूर्ण बोध ऐसा परी ॥
अद्वैत वासना संतांची संगती ।
रायांची उपाधी बोलू नये ॥
हरी, मुकुंद, मुरारी ।
हा मंत्र उच्चारीं, सांवता म्हणें ॥१८॥

विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती ।
अखंड श्रीपती हेंचि द्यावें ॥
ध्यानीं, मनीं, वनीं असती सर्वकाळ।
साधी काळ वेळ याची परी ॥
नाम हे तारक साचार जिवांचे ।
सांवता म्हणे वाचे सदा घेई ॥१९॥

मागें बहुतांचा लाग । तोडिला पांग, तुम्ही देवा ॥
म्हणोनि येतो काकुळती । पुढती पुढती कीव भाकी ॥
सांवता म्हणे विश्वंभरा । तुम्ही उदारा त्रिभुवनी ॥२०॥

उचित जें तुम्हा गोडी । आवडे जगजेठी करतों ॥
वास देई चरणापाशी । हेंचि तुम्हांसि मागतों ॥
कन्या – पुत्र यांचा भाग । तोडा तोडा हा लिगाड ॥
माळी सांवता लागे चरणीं । करी विनवणी विठ्ठल ॥२१॥

कृपाळू तू हरी । दीन दासातें उद्धरी ॥
नको काही दुजा हेत । सदा जडो नामी चित्त ॥
दुजे आणिक नको काही । ठाव द्यावा संतापायीं ॥
माळी सांवता विनवितो । परिसा, परिसा तुम्ही हरी ॥२२॥

भंगो नेदी माझे प्रेम । चालवावा हाचि नेम ॥
ऐक दयाघना देवा । कोण भाग्य तुझी सेवा ॥
तुझे सेवेवांचूनी कांही । पाहता सुख कोठें नाही ॥
अगा रुक्मिणी-रमणा । सांवता विनवितो चरणा ॥२३॥

विश्रांतीचा ठाव । पंढरीराव विटेवरी ॥
धावोनिया जाईन गांवा । अवघा हेवा चुकवील ॥
दरुशनें होय लाभ । नभानभ दाटणी ॥
सांवता म्हणे जन्म व्याधी । तुटे उपाधी कर्माची ॥२४॥

वेद, श्रुती, शास्त्रें, पुराणें श्रमलीं ।
परि तया विठ्ठल गम्य नाही ॥
ते या पुंडलिका सुलभ पै जाहलें ।
उद्धरावया आलें भीमातटी ॥
सांवता म्हणे विठ्ठल दयाळ ।
लागो नेंदी मळ भाविकांसी ॥२५॥

विश्रांति सुखासि सुख पै जाहलें ।
तें उभें असे ठेलें विटेवरी ॥
डोळियांचे धनी पाहतां न पुरें ।
गोळी तें साजिरें खेळविती ॥
आगमा न कळे, निगमा वेगळें ।
गोकुळी लोणावळें चोरितसे ॥
सांवता म्हणे ज्याचा न कळेचि पार ।
तो हरी साचार चारी गाई ॥२६॥

पैल पहा हो परब्रह्म भुललें ।
जगदीश का हो परतंत्र झाले ॥
काय सुख केलें नेणिजे ।
कोण भाग्य गौळीयाचें वार्णिजे ॥
आदि अंतू नाहीं जया व्यापका ।
माया उखळीं बांधिला देखा ॥
सर्व सुखाचें सुख निर्मळ ।
कैसे दिसताहे श्रीमुखकमळ ॥
योगिया हृदय कमळीचें हें निधान ।
दृष्ट लागे झणीं उतरा निंबलोण ॥
सांवता स्वामी परब्रह्म पुतळा ।
तनुमनाची कुरवंडी ओवाळा ॥२७॥

योग, याग, तप, धर्म । सोपें वर्म नाम घेतां ॥
तीर्थ, व्रत, दान, अष्टांग । याचा पांग आम्हां नको ॥
समाधी आणि समाधान । तुमचे चरण पाहतां ॥
सांवता म्हणे दया क्षमा । हेचि तुम्हां उचित ॥२८॥

साधनांची आटाआटी । कासया पाठीं लावितां ॥
एक तुमचें नामचि पुरें । हेंचि धुरें साधन ॥
भाळी-भोळी करीन सेवा । माना देवा, तुम्ही धन्य ॥
सांवता म्हणे रुक्मिणीवरा । अहो अवधारा वचन माझें ॥२९॥

नेणो योग-याग-तपें । वाचे जपें विठ्ठल ॥
हेंचि आमुचें निजधन । सुखसंपन्न विठ्ठल ॥
न लगे संपत्ति मान । धन आम्हां परिपूर्ण विठ्ठल ॥
सांवता माळी म्हणे देवा । मज निरवा संतांपायी ॥३०॥

जपतप, क्रिया, धर्म-साधन ।
वाउगें बंधन उपाधीचें ॥
येणें काय घडे समाधान सर्वथा ।
वाउगाची शीण व्यथा होत आहे ॥
सांवता म्हणे सार, कांहीं धरा नाम
नको दुजा नेम वाउगाची ॥३१॥

लागलासे कपाळीं ।
कोण तुटी करी त्यासी ॥
ऐका ऐका पंढरीनाथा ।
निवारा भयापासूनी ॥
नको, नको या उपाधी
जोडा संधि काळचक्र ॥
सांवता म्हणे करुणाकरा ।
अहो श्रीधरा दयाळा ॥३२॥

अकराच्या माथा नकार बैसला ।
लकार भारला मिथ्या पाही ॥
ऐसा तो उमज नाही या मानवा ।
उगाच वणवा लागे देहीं ॥
विषयीं गुंतला, नाहीं केलें ध्यान ।
पातकीं दुर्जन अविचारी ॥
सांवता म्हणे भजन करावें देवाचें ।
योगयाग तयांचे कष्ट बहु ॥३३॥
प्रपंचीं असूनि परमार्थ साधावा ।
वाचें आठवावा पांडुरंग ॥
उंच-नीच काही न पाहे सर्वथा ।
पुराणींच्या कथा पुराणींच ॥
घटका आणि पळ साधी उतावीळ ।
वाउगा तो काळ जाऊं नेदी ॥
सांवता म्हणे कांते, जपे नामावळी ।
हृदयकमळीं पांडुरंग ॥ ३४ ॥

प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी ।
वासनेची बेडी पडली पायां ॥
सोडवण करा आलेनि संसारा ।
शरण जा उदारा देवराया ॥
प्रबळ मोहपाश विषयासी गोंवी ।
अखंड भोगवी क्लेश नाना ॥
सांवता म्हणे तुम्ही विचारावे मनीं ।
सोईरा निर्वाणीं हरि एक ॥ ३५ ॥

जगीं तारक एक नाम । उत्तम धाम पंढरी ।
चला जाऊं तया गावा । पाहूं देवा विठ्ठला ॥
वंदू संत चरण-रज । तेणें काज आमुचें ॥
सांवता म्हणे विटेवरी । उभा सम चरणीं हरी ॥३६॥

समयासी सादर व्हावें ।
देवें ठेविले तैसे राहावें ॥ धृ.॥
कोणे दिवशीं बसून हत्तीवर ।
कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
कोणे दिवशीं पायाचा चाकर
चालून जावें ॥
कोणे दिवशीं बसून याची मन ।
कोणे दिवशीं घरात नाही धान्य ।
कोणे दिवशी द्रव्याची सांठवण ।
कोठें साठवावे ॥
कोणे दिवशी यम येती चालून ।
कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ॥
कोणे दिवशी स्मशानीं जाऊन
एकटें रहावें ॥
कोणे दिवशी होईल सदगुरुची कृपा ।
कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा ॥
कोणे दिवशी सांवत्याच्या बापा
दर्शन द्यावें ॥ ३७ ॥

कठीण शब्दांचे अर्थ

अकार-लकार – अणिमा, लघिमा इत्यादी आठ सिद्धी
अवधारणे – ऐकणे
उपाधी – व्याप
कल्प – संख्याविशेष (चार अब्ज) युग
कुरवंडी – दुष्ट काढण्यासाठी ओवाळणं
दाटणी – दाटी, गर्दी
धनी – धनी किंवा घनी म्हणजे इच्छा, अकल्पित लाभ
धुरें – अग्रगण्य
नभानभ – संपूर्ण आकाश
निरवणे – सोपवणे
नेणिजे – कळत नाही
पैं – पण, परंतु
पैल – पलीकडील
बोहरी – नाश, चुराडा, हद्दपारी
लाग – बाधा
लिगाड – लचांड
लोणावळे – लोण्याचे गोळे
विचारावे – विचार करावा
वोळगणे – जवळ येणं
व्याली – प्रसूत झाली
साचार – खरा

0 Shares
सावतोबांच्या संदर्भखुणा