सावता सागर प्रेमाचा आगर

सचिन परब

संत नामदेव म्हणतात तसे सावतो बाहो तेच समुद्रासारखे अफाट. त्या अफाटपणाच्या जोरावर त्यांनी देव अगदी सोपा करून टाकला. साध्या साध्या माणसाला खरा देव भेटवला.

सावता प्रेमाचा आगर. अफाट प्रेम करता येणं सोपं नाही. पण सावता ते सहज करू शकायचे. घरामाणसावर प्रेम, तितकंच शेतीमातीवरही. झाडापेरांवर प्रेम, तितकंच प्राणीपाखरांवरही. द्वेषाचा कणही त्यांच्या आसपास फिरकायचा नाही.

सावता भक्तीचा सागर. भक्ती म्हणजे जोडलं जाणं. सावतोबांचा तुटण्याशी संबंधच नव्हता. सार्‍या जगाशी त्यांचा सांधा आतून जोडलेला होता. ते अखंड जगत होते. त्यांच्यासाठी हे जग देवापेक्षा वेगळं नव्हतंच.

सावता कष्टाचा जागर. सावतोबांसाठी कष्टच प्रेम होतं. कष्टच भक्ती. कष्टातच त्यांचा आनंद होता, कष्टातच देव. राबणं त्यांच्यासाठी जगणं होतं. काम त्यांच्यासाठी राम. काळ्या आईची मशागत काळ्या विठुरायाची पूजा.

पण सावतोबांनी घेतलेल्या नव्या मळ्यात म्हसोबाची पूजा व्हायची. मळ्याच्या मधोमध बसकण मारलेल्या शेंदरी दगडाची गावाला आस्था होती आणि भीतीही. तिथं कुलकर्ण्याचं गावकारण चालायचं. मांत्रिकाचे चाळे चालायचे. अवसेला जत्रा भरायची. कोंबड्या बकर्‍या कापले जायचे. देवाच्या नावानं धुडगूस चालायचा. म्हसोबामुळं मळा उजाड होता.

सावतोबांनी अत्यंत प्रेमानं म्हसोबाचा नवा मळा कसायला घेतला. चारही बाजूंनी मशागत करत सावतोबा म्हसोबापर्यंत पोचले होतेच. त्यांचं ठरलेलं होतं. म्हसोबा उखडायलाच हवा. हातातली पहार जमीन खणू लागली. कुदळ जमिनीतले दगड काढू लागली. आता म्हसोबाची पाळी आली. बाकीच्या दगडांसारखाच हाही एक दगड. सगळेच दगड देवाचे. बघणारे हादरले. त्यांनी असं आक्रित आधी कधीच पाहिलं नव्हतं. ते सावतोबाला समजावत होते. देव कोपेल याची भीती घालत होते. पण त्यांनाही माहीत होतं, देव सावताला वश आहे.

सावतोबांच्या पहारीनं म्हसोबाच्या मुळावर घाव घातला. म्हसोबा डुचमळू लागला. सावतोबांच्या भक्कम हातांनी त्याला बाहेर ओढला. खांद्यावर घातलं आणि कोपर्‍यात भिरकावून दिला. सावतोबांच्या एका फटक्यानं म्हसोबाचं देवपण संपलं. देवाचा बाजार थांबला. त्यामुळं आतापर्यंत कोपलेला सावतोबांचा देव पावणार होता. उजाड मळा फुलणार होता. कांदा, मुळा, भाजीत विठाई बहरणार होती. लसूण, मिरची, कोथिंबिरीत हरी डोलणार होता.

ही किमान साडेसातशे वर्ष तरी जुनी गोष्ट आहे. विशीतिशीतला एखाद्या शेतकर्‍यांनं असं करणं आजही अवघड. पण सावतोबा ते सहज करून गेले. देव म्हणजे काय, याविषयी जबदरस्त क्लॅरिटी असल्याशिवाय ते निव्वळ अशक्य आहे. शिवाय आपल्या विचारांविषयी अद्भुत कन्विक्शन. भक्कम खात्री. आणि परिणाम भोगण्याची तयारी.

‘तू बी रुजवून, शेण-मुताचं खत टाकून वाढवलेल्या पानाफुलांत देव असेल. तर तो दगडातही असणार. मग कुणी त्याला देव म्हणून पूजत असेल, तर ते समजून का घ्यायचं नाही?’, असा प्रश्न कुणीतरी सावतोबांना विचारला असणारच. त्यांनी स्वतःला विचारला असणारच. देव दगडात असणारच. मूर्तीत असणारच. पण त्याचं दुकान कशाला माजवायचं? त्याला घाबरायचं कशाला?  देव मिळवण्याचा एक रस्ता सावतोबांना पक्का माहीत होता. ‘स्वकर्मात व्हावे रत. मोक्ष मिळे हातोहात.’आपण आपल्या कामात रमायचं. देव मिळणारच. कुठं फोकस ढळू नये, म्हणून देवाचं नाव घेत राहायचं.

याच रस्त्यानं जाऊन सावतोबांना देव भेटला होता. कडकडून भेटला होता. त्यांना लख्ख कळलं होतं, देव सोपा आहे. भक्ती सोपी आहे. धर्म सोपा आहे. देवासाठी काम सोडून जपाची तपाची गरज नाही. कर्मकांडाची तर नाहीच नाही. ही सगळी धर्माची साधनं ‘वाऊगें बंधन उपाधीचे’ आहे. ही ‘आटाआटी’ आहे. देवाधर्माच्या दुकानदारांनी केलेल्या फसव्या मार्केटिंगला आपण बळी पडतो आहोत. सगळ्या पिळवणुकीच्या, अन्यायाच्या मुळाशी हे आध्यात्मिक षडयंत्र आहे. त्यांची पोटं भरावीत म्हणून आमच्या पिंडात लाचारी भिनवली जाते. म्हणून या धर्माच्या भामट्यांना उखडायलाच हवं. म्हसोबासारखं.

सिनेमात शोभावी अशी ही गोष्ट. ती शोधायची तर तिचा सर्वात जुना संदर्भ सिनेमातच सापडतो. व्ही. शांतारामांचा सुपरहिट सिनेमा ‘भक्तीचा मळा’. १९४४ सालचा. नवविचारांचं वादळ उसळलेला तो काळ. गांधीबाबाने सांगितलेल्या देवाच्या, धर्माच्या कल्पनेनं भारलेले कलाकार सिनेमाच्या धंद्यात होते. ते सारं कळत नकळत सावतोबांच्या कहाणीत पोचलंय. सगळा सिनेमा म्हसोबाच्या अवतीभवती फिरलाय.

ही गोष्ट सिनेमाच्या नंतर वर्षभरातच प्रकाशित झालेल्या भिकू भुजबळांच्या ‘श्री सावता महाराज महात्म्य’या चरित्र पोथीतही आलीय. खरंतर भिकू गुरुजी अगदीच वेगळ्या प्रभावातले. शिक्षक म्हणून आळंदीत असताना विनायक साखरे महाराजांचे भक्त बनले. साखरे महाराजांचा प्रवाह कर्मठ परंपरावादी. पण तो प्रभावही भिकू गुरुजींना म्हसोबाचा प्रसंग रंगवून सांगण्यास रोखू शकला नाही. त्याचं एक कारण सिनेमा असावा. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं कारण असणारा जित्ताजागता पुरावा साडेसातशे वर्ष टिकून आहे. म्हसोबाचा दगड आजही सावतोबांच्या गावी अरणमधे समाधी मंदिराच्या जवळ एका कोपर्‍यात पडून आहे.

भिकू गुरुजींच्या पोथीमुळं म्हसोबाचा प्रसंग पुढं सगळ्याच सावता चरित्रांचा अविभाज्य भाग बनला. पण बोथट करून. त्यात सावतोबांना म्हसोबावर फुलं वाहायला लावलीत. वारकरी संतांना मेंगळट ठरवण्यासाठी काही पिढ्यांच्या प्रतिभा खर्ची पडल्यात. त्यामुळं तसं चित्रण स्वाभाविक आहे. म्हणून सावतोबांच्या अभंगांतला लाव्हा लपून राहणारा नाही. अरणमध्ये हा लाव्हा आहे अजून. फक्त त्याच्यावरची राख झटकायला लागते. सावतोबांचे वंशज असणारे समाधी मंदिराचे पुजारी म्हसोबाच्या शेजारी असणार्‍या एका अनामिकाच्या समाधीची पूजा करतात. पण म्हसोबाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. आता पातळ झालेल्या जगात असं घडत असेल, तर तेव्हा सावतोबांनी तो म्हसोबा किती जोरात ठोकरला असेल! विचार करून तर बघुया.

आश्चर्य म्हणजे सावतोबांच्या पहिल्या सविस्तर चरित्रात मात्र म्हसोबा सापडत नाही. वर्‍हाडातल्या वरुड या छोट्याशा शहरात राहणार्‍या गोविंद राऊत यांनी १९३० साली ते लिहिलंय. त्यात म्हसोबा नसला तरी सावतोबांचं जन्मवर्ष मिळतं. वंशावळ लिहून ठेवणार्‍या माळगणांकडून मिळणार्‍या पारंपरिक माहितीतून हे वर्ष त्यांना मिळालंय. सावतोबांचा जन्म अरणचा, हे संत नामदेवांनीच लिहून ठेवल्यामुळं त्याविषयीही वाद नाहीत. पण त्यांच्या मूळ गावाविषयी गोंधळ आहे. सावतोबांचे आजोबा दैवू औस्ये नावाच्या गावाहून अरणला स्थायिक झाले होते.

औस्ये हे गाव मिरज संस्थानात असल्याचं वारंवार लिहिलं गेलंय. ते राऊतांनी औस्ये सोलापूर जिल्ह्यात असल्याचं नोंदवल्यामुळं. पण त्यांनी त्याच पुस्तकात पुरवणी जोडून ते गाव निजामाच्या राज्यातला औसा असल्याची सुधारणा सांगितलंय. तिकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलंय. माळगणाचे पुरावेही औसा मराठवाड्यातलाच असल्याचं सांगतात. मिरज संस्थानाचे अभ्यासक मानसिंग कुमठेकर यांनी सगळं दफ्तर तपासून ‘रिंगण’पाशी निर्वाळा दिलाय की असं कोणतंही गाव मिरज संस्थानात नव्हतंच कधी. शिवाय मिरज संस्थान जन्माला आलंय १७६२ला. सावतोबांनंतर पाचशे वर्षांनी. आणि औस्याचा इतिहास त्यापेक्षा कितीतरी जुना. मग तो औसेकरांचा असो की ओवेसींचा.

औसा ओसाड तर भीमा खोर्‍यातलं अरण हिरवंगार. रणधीर शिंदे सांगतात तसं इथल्या गावांची नावंच सांगतात हा भाग झाडीमंडळीचा होता. अरण, मोहोळ, शेटफळ, मोडनिंब, अरण, लऊळ, रोपळे, बाभळगाव, टेंभूर्णी, निरा, आलेगाव, अरण, भेंड, चिंचोली, दारफळ, जामगाव, खैरेवाडी, निमगाव, पिंपळखुटे, रुई, शेवरे, तुळशी, वडाचीवाडी, वडशिंगे, कुर्डूवाडी. दैवूने अरण्यात बागा फुलवायला सुरुवात केली. तोच वारसा त्याच्या मुलगा परसू आणि नातू सावतानं चालवला.

परसूबाप आणि नांगितामाय मळ्यात राबायचे. त्यांनीच सावताकडे सेवाधर्म सोपवला. कष्टाची दीक्षा दिली. कुळात पूर्वापार चाललेला पंढरीचा नेम दिला. भानवसांची जनी सावताची पाठराखीण बनली. त्यांना दोन मुलं झाली. धाकटा विठ्ठल लहानपणीच गेला. मोठ्या लेकीनं नागूनं कुळाच्या विठ्ठलधर्माचा वारसा पुढं चालवला. तिघांचं परफेक्ट कुटुंब. वारकरी कुटुंबाचा एक आदर्शच.

मराठी मातीला संन्यासाचं वेड नाहीच. ‘प्रपंची राहून परमार्थ करावा’, ही इथली रीत. ती संतांनी चालवली. नियमांत, कर्मकांडांत अडकून घ्यायची सावतोबांची मानसिकता नव्हतीच. त्यांनी घराला क्वॉलिटी आणि क्वाँटिटी टाईम दिला असणारच. घरात आणि मळ्यात एकत्र राहायचं. एकत्रच कामं करायची. विठ्ठलाने दाखवलेला जगण्याचा रस्त्यावर चालत राहायचं. त्याविषयी एकमेकांशी बोलत राहायचं. त्या बोलण्याचे तर काही अभंगही झाले. त्यांचे शेकडो अभंग असणारच. कारण ते लिहिण्यासाठी काशिबा गुरव हे लेखनिक लागत होते. पण आता त्यातले फक्त ३७ उपलब्ध आहेत.

शेतीत जितकं शिकता येतं, तितकं कुठंच नाही. कारण खरी निर्मिती तिथंच होत असते. मळा सावतोबांचा गुरू होता. मळ्यात राबता राबता, माणसं जोडता जोडता, सावता आपलं शहाणपण स्वतः मिळवत होते. वारकरी विचार घरातच होते. कामात कैलास आहे, असं सांगणार्‍या बसवण्णांनी केलेल्या क्रांतीचे पडसाद अजून शांत झाले नव्हते. चक्रधरांच्या लीलांनी मराठी मुलूख हादरवला होता. सावतोबांची त्यांची भेट होऊ शकली असती. त्या सगळ्यापासून शिकत सावतोबा जगण्यावर प्रयोग करत होते. साक्षात विठ्ठलालाच कमावत होते.

धर्माच्या दुकानदारांनी सांगितलेला देव त्यांनी नाकारला होता. धर्मही नाकारला होता. ‘नको तुझे ज्ञान. नको तुझा मान. माझे आहे मन वेगळेची.’ असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. कुणी म्हणतं म्हणून कुणाची जात मोठी, हे कसं मानायचं. ब्राह्मण बनलो असतो तर वायफळ कर्मकांडात अडकलो असतो. त्यामुळे बरं झाल शूद्र बनलोय, असं सावतोबा सांगत होते. जातीच्या अभिमानाला सुरुंग लावत होते. धर्माच्या दलालांनी घालून दिलेल्या मापदंडात अडकून बसणं म्हणजे कोळ्यात जाळ्यात अडकणं. जातीच्या अभिमानाचं विष वरून खालपर्यंत सगळीकडे झिरपत जातं आणि सगळा समाज गुलाम बनतो. म्हणून सावतोबांनी तो व्यूहच उधळून लावला. हीन म्हणवल्या जाणार्‍या माळ्याच्या जातीला मस्तीत मिरवलं.

निगुर्‍या नामदेवांवर गुरू लादण्यासाठी कित्येक कहाण्या लिहिल्या गेल्यात. त्यात भक्तकथामृत लिहिणार्‍या नरहरी मालूचा दाखला देऊन सावतोबा असलेलीही गोष्ट सांगितली जाते. त्यात मलंगाच्या वेषातला विठ्ठल आणि सावतोबा मिळून नामदेवांची परीक्षा घेतात आणि गर्वहरण करतात. त्या कथेला ना शेंडा ना बुडखा. मुळात सावतोबांना तरी कुठं गुरू होता?  ना त्यांना त्याची गरज होती.

अशा गोष्टीत सावतोबा इतर संताना उपदेश करण्यासाठी वापरणंही स्वाभाविकच आहे. कारण ते नामदेवांपेक्षा २० वर्षांनी आणि ज्ञानदेवांपेक्षा २५ वर्षांनी मोठे होते. त्या दोघांनी मिळून चंद्रभागेच्या किनार्‍यावर क्रांतीची सुरवात केली. तेव्हा सावतोबा सोबत होतेच. खुद्द पांडुरंगच या दोघांना घेऊन अरणला आला होता. देवाबद्दलची क्लॅरिटी हवीय, तर सावतोबांना पर्याय नाहीच. देव सावतोबांच्या कष्टाच्या मळ्यात शिरला आणि हरवलाच. नामाच्या आणि ज्ञानाच्या मार्गापलीकडेही साधासुधा कष्टाचा मार्ग आहे, यातलं नेमकं मर्म त्यांनाही सावतोबांच्या हृदयातला विठ्ठल बघून उमगलं.

म्हणूनच संतमेळा पंढरपूरहून तीर्थयात्रेला निघाला, त्याचा पहिला ठेपा अरणच होता. सावतोबाही त्यांच्यासोबत तीर्थयात्रेला गेले. देवळांना भेटी देण्यासाठी ही तीर्थयात्रा नव्हतीच मुळात. ते फील्डवर्क होतं. ब्रेन स्टॉर्मिंग डिक्सशन्स होती. अफलातून टीम वर्क होतं. क्रांतीची ब्ल्यू प्रिंट पक्की झाल्याची पार्टी म्हणजे तीर्थयात्रेचं मावंद हेडक्वार्टरला पोचल्यावर झाली. त्यात सावतोबा होतेच.

आता सावतोबा कसे काय तीर्थयात्रेला गेले? कारण देव देवळात नाही, तो मळ्यात आहे. हे त्यांच्या शिकवणुकीचं सार. तरी त्यांना पंढरपुराचा विटाळ नव्हता. पंढरीचं कौतुक अभंगात आहेच. पंढरपूरला चलण्याचा आग्रह आहे. ते पंढरपूरला जातच नव्हते, असं आपल्या डोक्यात अधोरेखित करणारी पंढरपूर ते अरण पालखी १८४३ला सुरू झालीय. त्यानंतरही परंपरागत सावतोबांची पालखी अरणहून पंढरपूरला सुरूच होती, अशी नोंद न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी एकोणिसाव्या शतकातच करून ठेवलीय.

सावतोबांना फारच छोटं आयुष्य लाभलं. वयाच्या ४५व्या वर्षी म्हणजे १२९५ साली त्यांनी देह सोडल्याचं एका अभंगात नोंदवलंय. तो निवृत्तीनाथांच्या गाथेतला अभंग आहे. त्यामुळं त्याचं मोल मोठं आहे. त्यात सावतोबांचं निधन नवज्वर या तापानं झाल्याचा उल्लेख आहे. बाकी त्यांच्या समाधीची वगैरे वर्णनंही आहेत. पण ती शंभर वर्षांपेक्षा जुनी नक्कीच नाहीत. सावतोबा सर्वसामान्य माणसासारखे जगले आणि सर्वसामान्यासारखेच मेले. हेच त्यांचं मोठेपण आहे, हे मात्र त्यांच्या संजीवन समाधीचे देव्हारे मिरवणार्‍यांच्या लक्षात येत नाही.

0 Shares
संपादकीय भक्तीच्या हायवेवरचं टाईममशीन