संपादकीय

सचिन परब

प्रिय पप्पा,

एप्रिल महिन्याची पेन्शन आली की तुम्ही दोन हजार रुपये आणून देणार, हे आता सवयीचं झालं होतं. ‘हे आमच्या दोघांचे एकेक हजार, तुझ्या रिंगणसाठी.’ आणि रिंगणच्या कामाला सुरुवात व्हायची. तुम्ही रिंगणचे पहिले अभंगदूत असायचात. यावर्षीही असंच होईल, असं वाटत राहिलं. पण झालं नाही. होणार नव्हतं. तुम्ही हे जग सोडून गेला होतात. तुमच्याशिवायचं हे पहिलं रिंगण तुम्हालाच अर्पण.

रिंगणचं तुम्हाला कौतुक होतं. त्याच्या प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट असायचा. अंक नाकाला लावून वाचून काढायचात. रिंगणचं कुठं कौतुक झालं की तुमच्या अंगावर मास चढायचं. घरात कुणी आलं की त्याला अभिमानानं रिंगण दाखवायचात, द्यायचात. त्या कौतुकाची अनेकदा कटकट वाटायची. पण मला तेव्हा माहीत नव्हतं. आता कळतंय, तुम्ही माझी प्रेरणा होतात.

रिंगणच्या दुसर्‍या चोखोबांच्या अंकाची गोष्ट कशी विसरू. नामदेवरायांचा अंक निघाल्यानंतर एक वर्ष अंक निघालाच नाही. पैसे नव्हते. नोकरी नवी होती. पुढं वर्षभर तुम्ही रिंगणची आठवण करून द्यायचात. आषाढी जवळ आली तशी तुम्ही पंचवीस हजार रुपये काढून दिले. आजारपणासाठी पोटच्या पोरालाही ओझं होऊ नये म्हणून जमा करून ठेवलेले. त्यानंतर रिंगणला कधीच काहीच कमी पडलं नाही. ते तुमचे आशीर्वाद आहेत अजूनही. कायम राहतील.

मला आठवतंय. मी शाळेत होतो तेव्हा. एका वर्षी तुम्ही कार्तिकी वारीहून घरी आलात ते गळ्यात तुळशीची माळ घालूनच. आजी हरखून गेली होती. त्या चंद्रभागेमुळंच पंढरपूर आपल्या घरात आलं होतं. माशेमटण चापूनचोपून खाणारे तुम्ही आजीसाठी माळकरी झालात. मी तुमची माळ पुढं चालवीन की नाही, माहीत नाही. पण रोज सकाळी तुमच्यासारखाच हरिपाठ मात्र म्हणायचाय. टाहो फोडून. माझी सकाळ कधी होईल, नेहमीसारखंच माहीत नाही.

पप्पा, आज मी तुम्हाला पत्र लिहितोय. पण खरंतर दरवर्षीसारखं देवाधर्माच्या दुकानदारांवर सडकून लिहिण्यासाठी बसलो होतो. दरवर्षी ते खूप जणांना आवडतं. खूप जणांचे फोन येतात. मी हे जे लिहितो. अंक वगैरे काढतो. तुम्हाला नसेल माहीत. मलाही माहीत नव्हतं. पण पण यात खूप काही तुमचं आहे. तुम्ही मस्त जगलात. मस्तीत जगलात. तसाच जमिनीवर राहून जगण्याचा साधेपणा मिळो. तुम्हाला दुःख होईल, असं काही माझ्या हातून घडू नये. दरवर्षी रिंगण काढण्याचं बळ मिळो. बस इतकंच आपल्या पांडुरंगाला सांगाल आठवणीनं. मला माहितीय, तुमचं ऐकतो तो.

तुमचा,

सचिन शंकर परब, रिंगणचा संपादक

0 Shares
संत गोरा कुंभार अभंगगाथा सावता सागर प्रेमाचा आगर