सावता तो धन्य!

ओमश्रीश दत्तोपासक

संत नामदेवांच्या गाथेत संत सावता माळी यांच्याबद्दलचं वर्णन अभावानंच आढळतं. असं असलं तरी ‘विठ्ठल-नामदेव-सावता’ यांच्या संदर्भानं सावता यांचा कर्मयोग ठळक करणारी एक कथा सांगितली जाते. संत एकनाथांनी लिहिलेल्या सावता यांच्या अभंग रूपचरित्रातही कथा येते. काय आहे ही कथा?

सावता माळी हे नामदेव समकालीन संतकवी. पंढरपूरजवळील अरण गावचे रहिवासी. ते वृत्तीनं विरक्त असून ईश्वर भजनात सदैव निमग्न असत. सकलसंतगाथेत त्यांचे सुमारे बारा अभंग समाविष्ट आहेत. विठ्ठलाच्या परमभक्तीनं सावतोबांनी गायलेल्या कवितेत भक्तीभावाचा मळा फुलवला आहे. माळ्याच्या जातीबद्दल आणि प्राप्त कर्तव्याबद्दल त्यांना समाधानच वाटते. ‘आमुची माळियाची जात । शेत लावू बागाईत’ या कामाचा त्यांना अभिमान वाटतो. त्यांच्या अभंगातील काही उपमा, रूपके ही त्यांच्या नित्य व्यवसायाच्या संदर्भातून येतात. ‘कांदा, मुळा, भाजी । अवघी विठाई माझी ॥’ हा अभंग यामुळंच लोकप्रिय झालेला आहे.

संत तुकारामकृत उल्लेख
संत जनाबाई यांच्या ‘विठू माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा ॥’ या सुप्रसिद्ध अभंगात सावता माळी यांना स्थान नाही. संत नामदेव गाथेतही सावता माळी यांचं दर्शन अभावानंच घडतं. उत्तरकालीन संत तुकाराम यांनी मात्र आपल्या अभंगातून सावता यांच्या कार्याचं स्मरण केलेलं आहे.

१) उंच नीच काही नेणे भगवंत । तिष्ठे भाव भक्त देखोनिया ॥’ या सुप्रसिद्ध अभंगात ते म्हणतात,
‘मळा / माळ्या सांवत्यास खुरपू लागे ॥’

२) ‘पंढरीचे माझे माहेर साजणी । ओविया कांडणी गाऊ गीती ॥’ या प्रसिद्ध अभंगातलं आठवं चरण असं आहे,
‘परिसा भागवत सूरदास सांवता । गाईन नेणता सकळीकांसी ॥’

संत एकनाथ चरित्र
संत एकनाथांचे पुढील दोन अभंग महत्त्वाचे असून, त्यातून सावता माळी यांचे उल्लेख येतात.
१) ‘स्मरतां निवृत्ती पावलों विश्रांती । संसाराची शांती झाली माझ्या ॥

या अभंगातील पुढील चरण पहा.
‘परिसा भागवत जीवा आवडता । ज्ञान सोपान वटेश्वर’ या अभंगात अलंकारमंडित विठ्ठलाचं शब्दचित्र संत एकनाथांनी रेखाटलं आहे. हे अलंकार सोन्याचे नसून संतांचे आहेत. चौथ्या चरणात ते म्हणतात.
‘बहु शोभे बाहुवट । गोरा सांवता दिकपाट ॥’

या शिवाय गीता प्रेस, गोरखपूर यांनी प्रकाशित केलेल्या ‘श्रीसकलसंतगाथा’ या गाथेत संत एकनाथ यांचे अभंग दिलेले आहेत. त्यात ‘सावता माळी चरित्र’ या शीर्षकाचे सुमारे तेरा अभंग आहेत. (अभंग क्रमांक ३६६४ ते ३६७६)यात त्यांनी पुढीलप्रमाणे कथा शब्दबद्ध केलेली आहे.

एकदा नामदेवांना आपल्या भक्तपणाचा अभिमान झाला. त्यांचे गर्वहरण करण्यासाठी विठ्ठलानं एक युक्ती मनात योजून ठेवली. देव नामदेवांना म्हणाले, ‘नामदेवा, मी पळून जातो. तू मला शोधून काढ’ असं म्हणून देव पुढं गेले. कधी गुप्त, कधी प्रगट अशा स्थितीत विठ्ठल पुढं जात होते. दूर गेल्यावर देवांनी खूण म्हणून आपल्या माळा, फुलं रस्त्यावर टाकली. त्याचा माग काढत नामदेव त्यांच्या मागोमाग आले. संसारी असोन, जीवन्मुक्त असलेले सावता माळी यांच्याकडे देव आले. ते समाधीसुखात तल्लीन झालेले होते. डोळे अर्धोन्मीलित होते. वाचेनं ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा जप चालला होता. त्यांच्या डोक्यावर हात ठेवून विठ्ठलानं त्यांना सावध केलं. देव त्याला सांगू लागले, ‘तुझ्या भेटीसाठी मी निघालो होतो. एक चोर माझ्यामागं लागला आहे. मला लवकर लपव.’ ज्याची त्रिभुवनावर सत्ता आहे. तो चोराला भिण्याचं लीलानाट्य करतो आहे. या निमित्तानं विठ्ठलाला ‘सावत्याचे(भक्ती)वैभव’ प्रकट करावयाचं आहे. अशा कठीण प्रसंगी विचार करायला वेळ नव्हता. सावत्यानं आपलं पोट खुरप्यानं फाडलं आणि त्यात देवाला लपवलं. ‘भक्ताचे उदरी बैसे नारायण । कृपेचे सिंहासन घालूनिया ॥’ देव कुठंही दिसत नाही, हे पाहून नामदेव रडू लागले. विठ्ठलाच्या पावलांचा माग इथपर्यंत दिसतो आहे. पुढं दिसत नाही. त्याअर्थी विठ्ठल इथंच कुठंतरी असावा, असा त्यांनी तर्क केला. रडत असलेल्या नामदेवांना पाहून सावता नामदेवांजवळ आले. ते त्यांना म्हणाले, ‘नामदेवा, तुम्ही का रडत आहात?’ नामदेव म्हणतात, ‘देव पळून आले. मी त्यांच्या मागे मागे आलो. परंतु ते इथंच कुठंतरी गुप्त झाले असावेत.’ असं म्हणत नामदेव विलाप करू लागले. म्हणू लागले, ‘मजविण क्षण तयासी कंठेना । एका जनार्दनी मना कठिण केले ॥’ सावता नामदेवांची समजूत घालू लागले. म्हणाले, ‘आत्माराम हा हृदयातच आहे. ज्यांना अभिमान झाला आहे. प्रपंचात ज्यांना खूप कष्ट सोसावे लागले आहेत. अशा लोकांचा उद्धार विठ्ठलानं केला आहे.’

नामदेवा तुज नव नाही अभिमान । मग कळली खूण अंतरात ॥
एका जनार्दनी सद्गद होऊनी । मिठी घाली चरणी सावत्याच्या ॥

संत नामदेव अनन्यभावानं सावता माळी यांना शरण जातात.

सर्वभावे तुज मालो मी शरण । भेटवी निधान वैकुंठीचे ॥
तयावीण प्राण कासावीस होती । भेटवी श्रीपती मजलागी ॥
तुम्ही संत उदार सोईरे निजाचे । दरूशन तयाचे मज करवा ॥
एका जनार्दनी ऐशी भावी कींव । अभिमान सर्व दुरी गेला ॥

अहंकाररहित झालेल्या नामदेवांना, सावता यांनी पोटाजवळ घेतलं.

सावत्याचे अंतरी झळके पीतांबर । नाग्याने सत्वर बोलखिले ॥
दरुनिया दशी काढिला बाहेर । जाहला जयजयकार तया वेळीं ॥
एका जनार्दनी पाडूनिया देव । मिठी घाली नामदेव चरणासी ॥

देवाच्या चरणी मिठी घालून नामदेव स्फुंदून स्फुंदुन रडत आहेत. विठ्ठलाला म्हणतात, ‘देवा, तूच मला तुझी सवय लावली आणि आता तूच अशी कृती केली. का बरे?’
नामयासी देवे करे उचलिले । प्रीतीने अलिंगिले तये वेळी ॥

हे सर्व चरित्र आपण का कथन केलं? याचं स्पष्टीकरण संत एकनाथ देतात,
एका जनार्दनी सज्जनांचा दास । म्हणोनी चरित्रास कथियेले ॥

हा सर्व कथाभाग सांगून झाल्यावर एकनाथ एका अभंगातून सावता माळी यांचं चरित्र सांगून त्यांचं वारकरी संप्रदायातलं स्थान, योगदान स्पष्ट करतात. एकश्लोकी रामायण, एकश्लोकी भागवत याप्रमाणंच या अभंगाचं महत्त्व आहे. सावता माळी यांची संपूर्ण व्यक्तिरेखा या अभंगातून आपल्यासमोर उभी राहते. इतका हा अभंग चित्रदर्शी आहे.

माळियांचे वंशी सावता जन्मला । पावला तो केला वंश त्याचा ॥
त्यासवे हरी खुरपूं लागे अंगे । धाऊनी त्यांच्या मागे काम करी ॥
पीतांबर कास खोवोनी माघारी । सर्व काम करी निजसंगे ॥
एका जनार्दनी सावता तो धन्य । तयाचे महिमान न कळे काही ॥

महीपतीकृत ‘भक्तविजय’ ग्रंथाच्या सोळाव्या अध्यायात हीच कथा थोड्याफार फरकानं आलेली आहे. या गोष्टीचं तात्पर्य एवढंच की, तत्कालीन संत मांदियाळीत त्यांना मानाचं स्थान होतं. कर्मयोगाचा उत्तम आदर्श म्हणून सावता माळी यांच्याकडे पाहायला हवं.

—————————–

संत सावता माळी यांचे ध्वनिमुद्रित अभंग
अभंग । गायक – कलाकार । अल्बम (या क्रमाने)

१) नेणे योग याग । अजित कडकडे । अमृतवाणी
२) आमुची माळियाची जात । चंद्रकांत काळे / स्नेहल भाटकर । अमृतगाथा-2
३) कां गा रुसलासी । दशरथ पुजारी
४) कांदा मुळा भाजी । श्रीकांत पारगावकर / मिलिंद इंगळे / स्नेहल भाटकर । पंढरीची वारी (चित्रपट) / संत नामदेव (चित्रपट)

0 Shares
काळाचं अंतर भेदणारे दोन संत नवज्वर काय आहे?