काळाचं अंतर भेदणारे दोन संत

ज्ञानेश्वर बंडगर

सावतोबांचा पूर्व सूर कोणता होता, त्यांच्या विचारांवर कोणाचे संस्कार झाले होते, हे नेमकेपणानं उलगडून दाखवता येत नाही. पण तुकोबांवर मात्र सावतोबांच्या विचारांचे संस्कार झाले होते, असं पक्केपणानं सांगता येतं.

सावता महाराज हे वारकरी परंपरेतले अधिकारी संत होते. संत ज्ञानदेव आणि संत नामदेव त्यांच्या भेटीला गेले, ही त्यांची महती. सतराव्या शतकात वारकरी परंपरेचं नेतृत्व करणा-या तुकोबारायांनी सावता महाराजांकडे आपले पूर्वसुरी म्हणून पाहणं स्वाभाविक आहे. तुकोबारायांनी आपल्या अभंगात सावता महाराजांचा आदरानं उल्लेख केला आहे. ‘आमचा पांडुरंग हा उच्चनीच असा भेदभाव न करता भावशुद्ध जीवनाला प्राधान्य देतो आणि सगळ्या जाती-जमातीतील संतांची कामं करतो,’ या मताच्या स्पष्टीकरणासाठी तुकाराम महाराजांनी इतर संतांच्या बरोबर सावता महाराजांचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात,

सजन कसाया विकू लागे मांस ।
माळ्या सावतास खुरपू लागे॥

आणखी एका अभंगातही त्यांनी सावतोबांचा उल्लेख केलाय, ‘परिसा भागवत सूरदास सावता, गाईन नेणता सकळिकांसी’ यावरून सावता महाराज आणि तुकाराम महाराज यांचं नातं किती जैविक होतं, याची कल्पना येईल.

तुकोबारायांनी आपल्या मिरासदारकीचा त्याग केला. कर्जखतं पाण्यात बुडवली. विषमता आणि कर्मकांडप्रधान विचारसरणीच्या विरोधात समता आणि बंधुता या मानवतावादी मूल्यांचा त्यांनी आग्रह धरला. अशा रीतीनं ऐन तारुण्यात तुकोबारायांच्या विचारांची बैठक पक्की झाली. ती त्यांच्या घरी चालत आलेल्या विश्वंभरबाबांपासूनच्या वारकरी परंपरेमुळं. व्यापार, सावकारकी आणि महाजनकी या तीनही लौकिक समृद्धीला तुच्छ मानून तुकोबांनी आपलं नातं जोडलं ते थेट ज्ञानदेव, नामदेव आणि चोखोबा यांसारख्या बहिष्कृत स्त्रीशूद्र संतांशी. तुकोबाराय सुरुवातीस इतरांच्या कीर्तनात धृपद धरायचे. धृपद धरण्यासाठी पूर्वकालीन वारकरी संतांचे अभंग पाठ करणं गरजेचं होतं. त्यासाठी त्यांनी विविध वारकरी संतांचे अभंग आदरपूर्वक आणि विश्वासपूर्वक भावनेनं पाठ केले. तुकोबा म्हणतात,
काही पाठ केली संतांची उत्तरे ।
विश्वासे आदरे करोनिया ॥

गाती त्यांचे पुढे धरावे धृपद ।
व्हावे चित्त शुद्ध करोनिया ॥

यावरून तुकोबांनी सर्व वारकरी संतांचे अभंग वाचले होते, हे स्पष्ट होतं. यातच त्यांनी सावता महाराजांचे अभंग पाठ केले होते, असं मानायला भरपूर जागा आहे. यामुळंच तुकोबांच्या आणि सावता महाराजांच्या विचारात कमालीचं साम्य आहे. इतरांच्या कीर्तनात धृपद धरण्याच्या निमित्तानं तुकोबांची सावता महाराजांशी वैचारिक भेट झाली. या वारकरी संतांच्या अभंगातूनच तुकोबांना कवित्वाची स्फूर्ती मिळाली होती.

यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती ।
पाय धरिले चित्ती विठोबाचे ॥

असं स्वतः तुकोबांनीच लिहून ठेवलं आहे. साहजिकच तुकोबांच्या अभंगात सगळ्याच संतांचे विचार साररूपानं आणि नेमकेपणानं प्रकटतात. त्याचप्रमाणं सावता महाराजांचे अनेक विचार तुकोबांच्या विचारांशी अधिक सुसंगत वाटतात.

तुकोबारायांना सावतोबा अनेक कारणांनी जवळचे वाटले. दोघांचाही शेतीशी जवळचा संबंध होता. तुकोबा कुणबी तर सावतोबा माळी होते. वेदादी धर्मग्रंथांचा धर्माच्या उपदेशाचा आणि धार्मिक कर्मकांडाचा अधिकार दोघांनाही नव्हता. इथल्या व्यवस्थेनं दोघांनाही शूद्र मानलं होतं. यज्ञीय कर्मकांड आणि गूढ यौगिक साधनांऐवजी नामस्मरणाचा भक्तीचा मार्ग दोघांनीही निवडला होता. मोक्ष अथवा मुक्तीची दोघांनाही गरज वाटत नव्हती. ऐहिक जीवनातच वैकुंठ आणण्याचा दोघांचा निर्धार होता. श्रमिक, शूद्र जातीतला जन्म दोघांनाही स्वत:चा गौरव वाटत होता. त्यांच्या वैचारिक अनुबंधाचा उलगडा म्हणूनच महत्त्वाचा ठरतो.

तेराव्या शतकात संत नामदेवांनी सामूहिक वारकरी कीर्तन परंपरेचा प्रघात पाडला. सगळ्या जातीधर्मातले स्त्रीपुरुष नामदेवांच्या कीर्तनात ‘जगी ज्ञानदीप लावण्या’चा निर्धार करत नाचत होते. पांडुरंगाच्या मंदिराच्या महाद्वारातला हा माणुसकीचा जागर अनेकांच्या डोळ्यात खुपला. त्यांनी नामदेवादी संतांवर पाखंडी असण्याचा आरोप केला. आमच्या जनाबाई माऊलींनी ते नोंदवून ठेवलंय. या धार्मिक पातळीवरच्या जातिअंताला त्यांनी पाखंडीपणाच्या सदरात टाकलं तेव्हा व्यथित झालेले नामदेव म्हणतात,

नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी ।
उपमा जातीची देऊ नये ॥

यासाठी त्यांनी दिलेलं उदाहरण पाहा,

कुश्चळ भूमीवरी उगवली तुळसा ।
अपवित्र तियेस म्हणू नये ॥

यातून नामदेवांना जात अपवित्र असली, तरी अपवित्र जातीतल्या माणसांना भावशुद्ध जीवन जगता येतं, असं सुचवायचं आहे. कुश्चळ भूमीवर उगवलेल्या तुळशीला अपवित्र म्हणता येत नाही, त्याचप्रमाणं भावशुद्ध माणसांना त्यांच्या अपवित्र जातीची उपमा देता येत नाही, या नामदेवांच्या विचारात समन्वय आणि शांततेचा सूर आहे; पण सावतोबांचा एक अभंग नामदेवरायांचेच विचार अधिक परखड भाषेत मांडणारा आहे.

अपवित्र जातीतही चांगला माणूस असतो, असं सांगण्याऐवजी अपवित्र, हीन जातीतलाच माणूस चांगला असतो, गुणवान असतो. तर वरिष्ठ वर्गातला माणूस अहंकारी असतो. त्याला ज्ञानाचा उन्माद चढलेला असतो, त्यांच्यात दांभिकता असते, असं सावतोबांनी आपल्या अभंगात सांगितलंय. सावता महाराजांच्या याच अभंगाचा तुकोबांवर विशेष प्रभाव आहे.

बरे झाले देवा कुणबी केले ।
नसता असतो दंभेचि मेलो ॥

किंवा

शूद्रवंशी जन्मलो । म्हणोनि दंभे मोकलिलो ॥

या दोन्ही अभंगवचनांचा सार स्वयंस्पष्ट आहे. कुणब्यासारख्या शूद्र कुळात जन्माला आलो नसतो, तर दंभानी उन्मत्त होऊन मेलो असतो, असं तुकोबाराय सांगतात. म्हणूनच परंपरेनं ज्यांना वेदाचा अधिकार दिला ते पंडित वेदाच्या गोण्या वाहणारे हमाल असून त्याचा खरा अर्थ अहंकारमुक्त असलेल्या आम्हा शूद्रांनाच माहीत आहे, हा तुकोबांचा सांगावा आहे. वर्णाभिमान्यांच्या दांभिक उन्मादावर तुकोबांनी शब्दांची शस्त्र करून सहस्त्रावधी हल्ले केले.

विद्या अल्प तरी ‘गर्वशिरोमणी’ असणा-या पंडितांचा दंभस्फोट करणा-या तुकोबांच्या जातकुळीचा ठरावा, असा एक अर्थपूर्ण अभंग सावता महाराजांनी सातशे वर्षांपूर्वी लिहिला आहे,

भली केली हिन याती । नाही वाढली महंती ॥
जरी असता ब्राह्मणजन्म । अंगी लागते सहजकर्म ।।

स्नान नाही संध्या नाही । यातीकुळ संबंध नाही ॥
सावता म्हणे हिन याती । कृपा करावी श्रीपती ॥

तुकोबांच्या समग्र वैचारिक बंडखोरीचा पाया या एकाच अभंगानं घातला आहे. सावता महाराजांच्या मते, शूद्र जातीतला माणूस हा अहंकारापासून मुक्त असतो. म्हणूनच देवानं हीन यातीत जन्माला घालून भलं केलं, असं सावता महाराजांचं मत आहे. तुकोबांनाही हे माहीत होतं, यासाठीच थोड्याशा विद्येनं उन्माद कसा चढतो, हे सांगताना त्यांनी म्हटलं आहे,

अक्षरे आणती अंगासी जाणीव ।
इच्छा ते गौरव पूज्य व्हावे ॥
अक्षरं शिकल्यामुळं अहंकार येतो. ती अक्षरं शिकण्याचा अधिकार सावतोबा आणि तुकोबा या दोघांनाही नव्हता. तुकोबाराय म्हणतात, ‘घोकाया अक्षर । मज नाही अधिकार ॥’ अभिमानमूलक अक्षर घोकण्याचा अधिकारच नसल्यामुळं हीन यातीतला जन्म दोघांनाही भला वाटला. अर्थात सावता महाराजांचा ‘वरिष्ठ वर्णातील लोक अहंकारी असतात’, हा नियम संत एकनाथांच्या अपवादामुळं सिद्ध झाला.

सावता महाराजांनी स्नान-संध्यादी कर्मकांडाची मला आवश्यकता नाही, असं म्हटलं आहे. स्नान नाही संध्या नाही । यातीकुळ संबंध नाही ॥, तुकोबांनीही स्नान-संध्या नाकारली आहे. बाहेरून केवळ कातडं धुवून काय उपयोग? अंत:करणातील मलीनता या स्नानानं धुतली जाणार नाही, हे तुकोबा स्पष्ट करतात. स्नान केल्यानं अंत:करणातील शुद्धता होत असती, तर सुसरी आणि कावळेही स्नान करतात, असा युक्तिवाद तुकोबांनी केला आहे. ते म्हणतात,
तुका म्हणे सुसर जळी । कावळी का न न्हाती॥

शारीरिक स्वच्छतेसाठी स्नानाच्या आवश्यकतेचं भान तुकोबा आणि सावता महाराजांनाही होतं. पण त्या आंघोळीला धार्मिक पावित्र्य बहाल करणं दोघांनाही पसंत नव्हतं. दिवसातून अनेकवेळा स्नान करून इतरांपेक्षा आपण अधिक पवित्र आहे, असं दाखवणा-या लोकांची मनं मात्र विकारांनी भरलेली असतात. अशा लोकांचं स्नान-संध्या हे पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्याचं साधन बनलं होतं. नीतीयुक्त मार्गानं पैसा आणि प्रतिष्ठा मिळवणं तुकोबांना मान्य होतं. मात्र स्नानसंध्यादी कर्मकांड करून पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्याला त्यांचा विरोध होता. तुकोबा म्हणतात,
‘स्वार्थासाठी विकी स्नान संध्या जप ।’

दुस-या बाजूला स्त्री-शूद्रांना मात्र कोणतेही मंत्र न म्हणताच आंघोळ करता येत होती. त्यांना समंत्र स्नानसंध्येचा अधिकारही नव्हता आणि रोजच्या कष्टातून वेळही नव्हता, अशा पार्श्वभूमीवर सावतोबा आणि तुकोबांनी स्नानसंध्यादी कर्मकांडाचं महात्म्य नाकारलं.

मोक्ष हा चार पुरुषार्थांपैकी एक मानला जातो. मोक्ष हेच मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे, अशी विविध सांप्रदायिकांची धारणा असते. अनेक प्रकारच्या साधना करून मोक्ष मिळवण्याचा बहुसंख्य लोक प्रयत्न करतात. जन्ममरणाच्या फे-यातून स्वत:ची सुटका करून घेणं, हे मोक्षाचं लक्षण आहे. सावता महाराजांनी मात्र त्यांना मुक्तीची गरज नाही, असं स्पष्ट केलं आहे. सावता महाराज म्हणतात,
नको तुझी भुक्ती, नको तुझी मुक्ती ।
मज आहे विश्रांति वेगळीची ॥

तुकोबांनीही मुक्तीची फिकीर बाळगली नाही. जन्ममरणाच्या फे-यातून सुटका करून घेण्याची त्यांची इच्छा तर नाहीच. उलट खुशाल गर्भवास होऊ दे, अशी मागणीच त्यांनी पांडुरंगाला केली आहे. विठ्ठलाच्या भक्तीत मिळणा-या सुखासमोर मोक्षाचं सुख तुकोबांना तुच्छ वाटत होतं.
पावोत आत्मस्थिती । कोणी म्हणोत उत्तम मुक्ती ॥
तुका म्हणे छंद । आम्हा हरिच्या दासा निंद्य ॥

संतानी देवाभोवती जाणीवपूर्वक तयार केलेलं गूढतेचं वलय नष्ट केलं. देव आपल्यासोबत असणारा सखा आहे, अशी संतांची धारणा आहे. सावता महाराजांनीही वैकुंठाचा देव कीर्तनात आणण्याची भाषा केली आहे.

स्त्री-शूद्रांना वेदमंत्र गायनाचा अधिकार नव्हता. त्यामुळं स्त्री-शूद्रांनी स्वरचित काव्यं तयार केली होती. पण ही वेदमंत्राशिवायची काव्यं मलीन मानली गेली होती. त्यांना धार्मिक पावित्र्य नव्हतं. अशा रीतीनं स्त्रीशूद्रांच्या काव्याला आणि गायनाला धार्मिक पावित्र्य किंवा धार्मिक अधिष्ठान नव्हतं. सावतोबांनी ‘वैकुंठीचा देव कीर्तनात आणू’ असा निर्धार करण्याच्या कल्पनेतून स्वरचित अभंग गायनातून ईश्वराचं अधिष्ठान मिळवून दिलं. सर्वांना अधिकार असलेल्या कीर्तन या जीवननिष्ठेला धार्मिक पावित्र्य मिळून स्त्रीशूद्रांची कोंडी फुटली.

दुस-या बाजूला त्यांनी केवळ वैकुंठात हजर असलेला देव श्रमिक स्त्री-शूद्रांच्या कीर्तनात आणला. तुकोबांनीही वैकुंठातला देव कीर्तनात आणला. संतांचा सहवास हाच स्वर्गवास आहे, असं अनेकदा तुकोबांनी म्हटलं आहे. ‘तुका म्हणे घरी आणले वैकुंठ’ असाही तुकोबांचाही निर्धार आहे.

नामस्मरण हे भयमुक्तीचं माध्यम आहे, असं सावता महाराजांना वाटत होतं. वेदमंत्र हे भीतीचं माध्यम आहे, तर नाममंत्र हे भयमुक्तीचं माध्यम आहे. ज्ञानदेव म्हणतात,
अशौचाचिये जपो नये । आणिकात ऐको नये ।
ऐशिया मंत्राते जग भिये ॥

अशा प्रकारे वेदमंत्र हा इतरांनी ऐकू नये, जपू नये, असे नियम असल्यानं ते भीतीयुक्त होते; मात्र नाममंत्र भीतीमुक्त होता. सावतोबा म्हणतात,
नामाचिये बळे न भिऊ सर्वथा ।
कळीकाळाच्या माथा सोटे मारु ॥

कलीच्या प्रभावानं कलुषित झालेले आणि काळाचे कवळ बनणारे मानवी जीवन नामस्मरणाच्या आधारे अधिक चांगलं बनवण्याची सावतोबांची इच्छाशक्ती आहे. तुकोबाही हाच विचार मांडतात. कळीकाळाला नामस्मरणाच्या बळावर जिंकण्याची भाषा तुकोबांनी अनेकदा वापरली आहे. ‘पिटू भक्तीचा डोंगर । कळीकाळासी दरारा ॥’ या अभंगचरणातून तुकोबांनी भक्तीचा डांगोरा पिटून कळीकाळावर दरारा निर्माण केला आहे.

सावतोबांनी वेळ, श्रम आणि पैसा वाया घालवणारं सर्व प्रकारचं कर्मकांड नाकारलंय. या निष्क्रीय कर्मकांडाला चोथा मानून नाम हेच सार मानलंय. सावतोबा म्हणतात,
योग याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता ॥

तीर्थ, व्रत, दान, अष्टांग । वाचा पांग आम्हा नको ॥
समाधी आणि समाधान । तुमचे चरण पाहता ॥
सावता म्हणे क्षमा दया । हेचि तुम्हा उचित ॥

या अभंगातून त्यांनी योग, याग, तप तीर्थ, व्रत, दान, समाधी या परंपरागत कर्मकांडांचं स्वरूप नाकारून त्याजागी नाम, क्षमा आणि दया या मानवीमूल्यांची स्थापना केली.

तुकोबारायांनीही सर्व कर्मकांड त्याज्य मानलंय. योग करणं, ही आमची परंपरा नाही. तापाचे डोंगर कशाला करावेत? पंढरीची वारी माझ्या घरी असल्यानं मला आणखी तीर्थव्रतांची गरज नाही, हे तुकोबांनी अनेकदा सांगितलंय. क्षमा आणि दया ज्याच्याकडे आहे, तोच देव आहे, असंही तुकोबांनी म्हटलं आहे. तुकोबा म्हणतात, ‘दया क्षमा शांती । तेथे देवाची वस्ती ॥’

तुकोबा आणि सावतोबा या दोघांनीही आपल्या साहित्यात स्वानुभावाला अधिक स्थान दिलं आहे. ‘कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥’, असं म्हणत त्यांनी साधी भाजी थेट विठ्ठलाशी जोडली. ‘अलौकिक नोहावे । लोकाप्रती ॥’ या ज्ञानदेवांच्या उक्तीप्रमाणं दररोजच्या जगण्यातल्या लौकिक गोष्टींना त्यांनी देवासारख्या अलौकिक कल्पनांशी जोडलं. बागाईत शेतीत फूलझाड लावणं, हे माळ्याचं काम. सावतोबा या परंपरागत कामालाच सामाजिक आशय देतात. शेवंती आणि जाईजुईची झाडं लावत असतानाच शांती आणि प्रेम लावण्याचाही निर्धार करतात. शांती आणि प्रेम ही अलौकिक मूल्यं शेवंती आणि जाईजुई या लौकिक गोष्टीशी जोडण्याचं काम सावता महाराजांनी केलं आहे.

तुकोबांच्या भाषेतही शेतीचा उल्लेख अनेकदा येतो. शेतीतला अनुभव प्रत्ययकारी शब्दात तुकोबांनी आपल्या अभंगात मांडला आहे. ते म्हणतात,
शेत करा रे फुकाचे । नाम विठोबारायाचे ।
नाही वेठी जेवा सारा । जाहाती नाही म्हणियारा ॥

अशा असंख्य अभंगात तुकोबांनी शेतीविषयक अनुभवांना अभंगरूप देऊन आपला विषय पटवून दिला आहे. सावतोबा आणि तुकोबा या दोघांनीही आपल्या साहित्याला अनुभवाचं अधिष्ठान दिलंय.

या सगळ्याचा अर्थ इतकाच आहे की, तुकोबांच्या अभंगांवर सावता महाराजांची छाप स्पष्ट आहे. शूद्र जातीत जन्म मिळाल्यामुळं तुकोबारायांनी देवाचे आभार मानले. सर्व कर्मकांडांचं परंपरागत स्वरूप नाकारून त्यांना मानवी मूल्यांशी जोडलं. लोकांना पारखा झालेला देव त्यांनी लोकसखा बनवला. या सर्व अभंगाची प्रेरणा त्यांनी त्यांच्या पूर्वकालीन वारकरी संतांकडून घेतली. यात सावता महाराजांचं अनन्य योगदान आहे.

0 Shares
माझे आहे मन वेगळेंचि सावता तो धन्य!