माझे आहे मन वेगळेंचि

कल्पना दुधाळ

आजच्या पिढीच्या आघाडीच्या कवयित्री साडेसातशे वर्षांपूर्वीचे कवी सावता महाराजांची मुलगी बनून त्यांना पत्रं लिहिते, हे अद्भूत आहे. या शतकांना भेदून जाणार्यार पत्रात लेकीच्या नजरेतून एका बापमाणसाची कथा उलगडलीय.

रोजच्यासारखं सकाळचं कोवळं ऊन पडलं होतं. माझे आबा विहिरीवर मोट हाकत होते. ‘कुईंगऽऽ कुईंगऽऽ…’ असा रहाट-नाड्याचा आवाज येत होता. ‘कर्रऽऽ कर्रऽऽ धो..’ करत मोटंतलं पाणी थारोळ्यात आदळत होतं. मग पाटातून वाफ्यात जात होतं. बैलांच्या गळ्यातली चंगाळी एका लयीत वाजत होती आणि नेहमीप्रमाणं आबांचे गोड अभंग त्यात मिसळत होते. शेजारपाजारचे लोक मोट हाकताना ओरडून ओरडून, बैलांना आसूडाचे फटकारे मारत काय गाणं म्हणतेत, ते मला कधीच कळत नव्हतं. पण आबांचे गोड अभंग ऐकत तिथंच रेंगाळावंसं वाटायचं. मी शेवंतीच्या पिवळ्याधम्मक फुलांची वेणी करत माझ्याच नादात बसले होते. अचानक मागून पाण्याचा लोट माझ्याखाली आला. मी म्हणाले,

‘काय हो आबा, मागं पाणी आलंय म्हणून तुम्ही मला सांगायचं तरी. का नाही सांगितलं? भिजले ना मी आणि चिखलपण लागला कपड्यांना. बघा बरं.’

तर आबा कशाचे ऐकतात? ते त्यांच्याच अभंगात तल्लीन झाले होते. आता हे काय नवीन होतं का मला? आबांचं माझ्याकडं लक्ष नाही म्हणून मी रुसले होते; पण माझ्या रुसण्याकडं लक्ष द्यायला वेळ कुणाला होता? आई पलीकडं केळीच्या बुडातलं गवत काढत होती आणि आबांचं तर सांगितलंच तुम्हाला. मग बाई मीच माझा रुसवा काढून आबांकडं गेले. काही करून मला आबांशी बोलायचं होतं. मी विचारलं,

‘का हो आबा, तुम्ही फक्त शेवंतीला, जाई-जुईला, भाजीपाल्याला, केळीला पाणी देता मग या कडंच्या लिंबाच्या, बाभळीच्या, हिवराच्या, खैराच्या, आंब्याच्या मोठ्या झाडांनी काय केलंय? त्यांना का नाही पाणी घालत?’

त्यावर आबा काय म्हणाले माहितीय, ‘अगं नागू लिंबा-बाभळीची, आंब्याची आणि या सगळ्याच मोठ्या झाडांची मुळं जमिनीत खोल गेलीत. तिथून ती पाणी खेचून घेतात म्हणून त्यांना पाणी घालावं लागत नाही. या छोट्या रोपांची छोटी मुळं पाण्यापर्यंत पोचत नाहीत म्हणून त्यांना पाणी द्यावं लागतं. पाणी मिळालं नाही, तर ती बिचारी वाळून जातील. ही छोटी रोपं म्हणजे आमची नागूच आहे. म्हणून आम्ही तुझ्यासारखी त्यांची काळजी घेतो. त्यांना मायेनं वाढवतो. हे बघ ही शेवंती म्हणजे तू, जाई-जुई म्हणजे तू.’

‘आबा, मग तुम्ही माझं नाव शेवंती, जाई-जुई का नाही ठेवलं?’

आमचं बोलणं आईनं ऐकलं. ती म्हणाली, ‘नागू बाळा, तुझ्या आजीचं म्हणजे माझ्या सासूबाईचं नाव नांगिता होतं. खूप मायाळू होत्या त्या. तुझ्या रूपानं त्याच आमच्या पोटी आल्या, असं वाटलं. त्यांची आठवण म्हणून आम्ही तुझं नाव नागू ठेवलं. आज तुझे आजी-आजोबा असते तर किती आनंद झाला असता त्यांना. पण नशीबाच्या पुढं कुणाचं काही चालतं का?’

आजी-आजोबांच्या आठवणी आई-आबा सांगत होते. आजोबांचं नाव परसू होतं. तेही विठ्ठलाचे भक्त होते. आजोबांच्या वडलांचं मूळ गाव औसे होतं. मात्र काही कारणांमुळं ते औसे सोडून अरण या गावी आले. तिथं इतरांच्या शेतात काबाडकष्ट करून राहू लागले. मग कालांतरानं स्वतःचं शेत खरेदी करून शेती करू लागले. आजोबापण फार कष्टाळू होते. आजोबांनी कष्टाचे आणि भक्तीचे संस्कार आबांवर केले होते. आबांना लहानपणापासून ईश्वरभेटीची आस होती. माझी आई, जनाई कष्टाला कधीच मागं सरली नाही. आबांनी मोट धरावी, आईनं खुरपावं. एखादं झाड सुकलं तर आबांना दाखवावं, मग आबांनी त्या झाडाचं कमीजास्त बघावं. आबांनी सांगावं आणि आईनं ऐकावं. आईनं भाकरी कराव्यात, आबांनी गोठ्यातलं वैरणपाणी करावं. आई काबाडकष्टात आबांच्या खांद्याला खांदा लावून असायची, तशी पांडुरंग भक्तीतसुद्धा ती कमी पडत नव्हती. आबा म्हणायचे,

‘सावतां म्हणे कांते, जपे नामावळी, हृदय कमळी, पांडुरंग’

दोघंही कामं करता करता पांडुरंगाचं नामस्मरण करायचे. आमचा मळा फळाफुलांनी नेहमीच बहरलेला असायचा. ज्वारी, बाजरी अशा पिकांबरोबरच भाजीपाला, फळझाडं, फूलझाडं, औषधी वनस्पती मळ्यात असायच्या. कडंच्या जवसाच्या ओळी फुलल्यावर तर आभाळ मळ्यात उतरल्यासारखं वाटायचं. आजूबाजूचे लोक आमचा मळा बघून हरखून जायचे. आबा म्हणायचे,

आमुची माळीयाची जात, शेत लावू बागायत।
आम्हा हाती मोट नाडा, पाणी जाते फुलझाडा।
शा़ती शेवंती फुलली, प्रेम जाईजुई व्याली।
सावतांने केला मळा, विठ्ठल देखियला डोळा।

पण खरं सांगू, आमचा असा बहरलेला मळा काही लोकांच्या डोळ्यात खुपत होता. काही लोक तर आबांना पाण्यात पाहत होते. त्यात आघाडीवर होते, ते ओंकारस्वामी महंत आणि कामाजी माळी. सावतोबा पांडुरंगाची भक्ती करतो म्हणतो; पण पंढरपूरची वारी करत नाही. तो भक्तीचं ढोंग करतो. वारी न करता कीर्तन करतो. म्हणजे भोंदूपणा करतो, असं ते म्हणायचे. ते आबांवर आरोप करण्याची संधीच शोधत असायचे. आता याच्या डोक्यावर कशाचं खापर फोडू, असं व्हायचं त्यांना; पण माझे आबा म्हणजे, आपण भलं नि आपलं काम भलं. कुणाच्या अध्यात ना मध्यात. ते आपण होऊन कधी कुणाला काहीही म्हणत नसत. एकदा शेत नांगरताना मधे आडवा आलेला दगड त्यांनी बांधावर ढकलत नेला. त्या दगडाला म्हणे शेंदूर लागला होता. तर ते बघून महंत आणि कामाजीनं गहजब माजवला. गावकर्‍यांना भडकवलं. म्हणाले, ‘सावत्यानं शेंदराचा दगड हलवला म्हणून गावावर देव कोपला, पटकीची साथ आली.’

आबांनी विनवण्या केल्या की, ‘ही साथ घाणीनं आली आहे. देव कशाला गावावर कोपेल?’ पण भडकलेले गावकरी कशाचं ऐकतात? दोन-तीन दिवसांनी ते आमच्या मळ्यात घुसले आणि सगळ्या मळ्याची नासधूस केली. आडवं येणार्‍याला न जुमानता ते त्यांचं काम करत होते. मळ्याचं सोडा त्यांनी आबांनाही आडवं पडेपर्यंत मारहाण केली. आई आणि मी किती रडलो, ओरडलो; पण कुणीही आम्हाला मदत केली नाही. किती वाईट वाटत होतं तेव्हा. आम्ही पांडुरंगाचा धावा करत होतो. काही वेळानं आबा शुद्धीवर आले तेव्हा गावकर्‍यांनी आमची बकरी कापल्याचं आबांना वाईट वाटत होतं. गावकरी माणसापेक्षा दगडाधोंड्यास देव मानू लागल्याचं दुःख आबांना वाटत होतं.

पण आबा मोठे धीराचे होते. या प्रसंगातून ते स्वतः सावरले आणि आम्हालाही नेटानं उभं केलं. त्यांनी कुणावरही राग धरला नाही. झालं गेलं विसरून पुन्हा मळा उभारणीला लागले. जसजसा मळा फुलू लागला तसतसे आबा पुन्हा भजन-कीर्तनात रमू लागले. फुलांचे ताटवे बहरले. पाखरांचा किलबिलाट वाढला. आबांच्या अभंगांबरोबर पुन्हा मळा डोलू लागला.

कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी ।
लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी ।
मोट नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी ।
सावतां म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा ।

आबा असं अभंगात तल्लीन होऊ लागलेले बघून आमचे निंदक पुन्हा कुढायला लागले. ते काहीही कुरापती काढून गावकर्‍यांना आबांविरूद्ध फितवायचे. एके रात्री आबांचा घात करायला लोक आले. नशीब त्या दिवशी आबा घरी नव्हते. मग त्या चवताळलेल्या लोकांनी आमचा उसाचा फड पेटवून दिला. केळीची उभी बाग आडवी केली. विहीर बुजवली.

दुसर्‍या दिवशी आबा घरी परतले, तर ही नासधूस बघून खिन्न झाले; पण कोणाला शिव्याशाप देणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं. ते हातपाय गाळणारे नव्हते. ते शांतपणे पुन्हा कामाला लागले. आई बरोबर होतीच; पण यावेळी गावातील काही चांगली माणसं, सोयरेधायरे आमच्या मदतीला धावून आले. म्हणतात ना, देव कुणाच्या ना कुणाच्या रूपानं भक्ताला मदत करतो. तसं बघता बघता मळा पुन्हा बहरला. भलीमोठी विहीर खोदली. काही दिवसांतच मळा पहिल्यासारखा डोलू लागला. आबा म्हणायचे, ‘हे वड, पिंपळ, औदुंबर म्हणजे पक्ष्यांची घरं. या झाडांना फळं माणसांसाठी नाही तर पक्ष्यांसाठी येतात. औदुंबराखाली लाल पाऊस पडला की पक्ष्यांची दिवाळी असते.’

हिरवेगार वैरणीचे वाफे, गायीगुरांनी भरलेले गोकुळ म्हणजे आमचा मळा होता. मळ्यात आलं की एखाद्या तीर्थस्थळावर आल्यासारखं मन प्रसन्न व्हायचं. आबा आपल्या कर्मात ईश्वर पाहणारे भक्त होते. असा भक्त कोणाला आवडणार नाही? तो ईश्वराला प्रिय होणारच ना!

आबांची जशी पांडुरंगावर नितांत श्रद्धा होती तशी माझीपण होती. मी आबांकडं हट्ट करायचे, ‘आबा आपण पंढरपूरला जाऊया ना. पंढरपूर कसं आहे ते मी अजून पाहिलंदेखील नाही. पांडुरंगसुद्धा पाहिला नाही. आपण पांडुरंगाला भेटू. चला ना आबा, आपण जाऊ या ना’

पण आबा म्हणायचे, ‘नागू आता मळ्यात इतकी कामं आहेत. आपण नंतर जाऊ.’

मग मी नाइलाजानं आबांचं म्हणणं ऐकत असे. दरवेळी ते काही ना काही कारण सांगायचे; पण पंढरपूरला नेत नसत. वारकरी एकदा दिंडी घेऊन पंढरपूरला निघाले होते. मला पण त्यांच्या बरोबर जावंसं वाटत होतं. पण आबा म्हणाले होते, ‘नंतर जाऊ.’ मग मी आमच्या मळ्यातला रानमेवा गोळा करून एका फडक्यात बांधला आणि वाटंला जाऊन थांबले. आपण जाणार नाही मग हा रानमेवा तरी पांडुरंगापर्यंत पोचवावा म्हणून मी वारकर्‍यांना काकुळतीला येऊन विनवत होते. काही वारकर्‍यांनी तर माझ्याकडं लक्षच दिलं नाही; पण एकजण मात्र तो रानमेवा माझ्या हातातून हिसकावून वाटंवर फेकून देत म्हणाला, ‘ये पोरी तुझ्या बापाला तर वारीला येणं जमत नाही. वर भजन-कीर्तनाचं ढोंग करतो. तुझा वानवळा पांडुरंग कसा घेईल बरं. दे तिकडं फेकून.’

वाटंवर पसरलेला रानमेवा बघून आणि आबांविषयीचं ते बोलणं ऐकून मला रडू कोसळलं. मी रडतेय हे बघून ते लोक अजूनच हसायला लागले. मी रागाच्या भरात बोलून गेले, ‘जा, पंढरपूरला.. जा तुम्ही. माझा वानवळा असा वाटंवर फेकला ना. तुम्हाला पांडुरंग रागवेल. तो तुम्हाला भेटणारच नाही. जा तुम्ही जा, जाऊन तर बघा. पांडुरंग तिथं नाहीच.’

आणि तुम्हाला सांगते, काय आश्चर्य पंढरपुरात पोचलेल्या वारकर्‍यांना विटेवर पांडुरंग दिसेचना. कुठं गेला विठोबा, कुठं गेला पांडुरंग, विठूराया दिसेना! सगळीकडं हाहाकार माजला. देव कुठं गायब झाला, कुणाला काही कळेना. हळूहळू कुजबुज झाली. माझा वानवळा फेकल्याची आणि ‘पंढरपुरात तुम्हाला पांडुरंग भेटणार नाही’, असं मी रागानं बोलल्याची चर्चा पसरली. बघता बघता ती चर्चा संतमंडळीच्या कानावर गेली. मग संत नामदेव महाराजांनी मनोमन ताडलं. ते वारकर्‍यांना घेऊन थेट अरणला आमच्या मळ्याकडं निघाले. इकडं पांडुरंगाला समोर बघून माझा जीव आभाळाएवढा झाला होता. प्रत्यक्ष पांडुरंग बघून काय करू नि काय नको, असं झालं बाई मला. मी पाय धरते काय, ते रूप डोळ्यात साठवते काय, पांडुरंगाला कुठं ठेवू नि कुठं नको असं झालं मला. मळ्यातलं हे आणू की ते आणू. आबांना काय सांगू नि आईला काय सांगू, अशी माझी धांदल बघून पांडुरंग मात्र गालात हसत उभा. तोपर्यंत पंढरपूरहून वारकर्‍यांचा लोंढा आमच्या मळ्यात पोचला. मळ्यात स्वर्गच अवतरला होता म्हणा ना! मग वारकर्‍यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. संतमंडळी, वारकरीमंडळी अरणला येऊन आबांच्या श्रेष्ठत्वाची अशी प्रचिती घेऊन गेले. पुढं पुढं आबांचे भक्त वाढू लागले, विरोधक कमी झाले. आबांना समाजात आदर मिळू लागला. काशिबा गुरव यांना आबांच्या अभंगांचं मोल कळालं. मग त्यांनी आबांचे काही अभंग लिहून ठेवले.

अजून एक प्रसंग सांगते. असंच एकदा संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज आणि पांडुरंग माऊली पैठणला भक्त कुर्मदासाला भेटायला चालले होते. चालता चालता पांडुरंगाला वाटलं, ‘जवळून चाललोय तर सावतोबांना भेटून जावं.’ पण नेहमीच्या रूपात भक्तापुढं जाईल तो पांडुरंग कसला? बालपांडुरंगाच्या रूपात ते थेट आबांसमोर उभे राहिले आणि म्हणाले, ‘दोन-चोर माझ्या मागं लागले आहेत. मला वाचव, मला अशा जागी लपवून ठेव की मी कुणालाही दिसणार नाही.’ आबांनी बालपांडुरंगाला पोटाशी धरलं आणि उपरण्याखाली लपवलं. नंतर पांडुरंगाला शोधत दोन्ही संत मळ्यात पोचले. पांडुरंग दिसेना. मग त्यांना आबांच्या हृदयात असलेला पांडुरंग दिसला. असे पांडुरंगाला हृदयात लपवणारे माझे आबा!

आजी-आजोबा, आई, आम्ही भावंडं म्हणजे विठ्ठल आणि मी. अशा चांगल्या कुटुंबाबद्दल आबा ईश्वराचे सतत आभार मानत. विठ्ठल भक्तीत कधी कधी आबा इतके तल्लीन होत की त्यांना खाण्या-पिण्याचं, कामाधंद्याचं भान रहात नसायचं. मग आई वैतागायची, म्हणायची, देवभक्तीच्या नादानं संसाराची वाताहात करणार आहात का तुम्ही? बास करा तुमची भक्ती बिक्ती. पण आईचं रागवणं तात्पुरतं असायचं. पुन्हा आम्ही सगळे गोळ्या-मेळ्यानं रहायचो. भक्ती आणि कर्म यावर आमचा विश्वास होता. जे काही आपल्या वाट्याला आलं आहे, त्याला आबा ईश्वराची इच्छा मानायचे. त्यामुळं कोणावरही त्यांचा राग नसायचा. सूडबुद्धी तर त्यांच्या जवळपासही फिरकत नसायची. उत्कट भक्तीनं आबांची कीर्ती सर्वदूर पसरली होती.

अगोदरच कमी बोलणारे आबा शेवटच्या दिवसांत अजूनच कमी बोलत असत. आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानं आबांचं शरीर थकू लागलं होतं; पण मन मात्र समाधानी, तृप्त होतं. आबा इच्छामरणी होते. योग्य वेळी आपण या जगाचा निरोप घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. आषाढ वद्य चतुर्दशीचा दिवस होता तो. आबा वेगळ्याच तंद्रीत दिसत होते. आबांनी अन्नपाणी घेतलं नाही की कुणाशी काही बोलले नाहीत; पण थकलेल्या मुखातून ईश्वरनाम चालूच होतं. जणू ईश्वराची हाक आबांना ऐकू येत होती. आबांचा आवाज हळूहळू खोल खोल होत गेला. क्षीण आवाज विठ्ठल नाम घेऊन थांबला. कुडी सोडून त्यांचा आत्मा कायमचा निघाला. आबांनी एक मोठा श्वास सोडला, डोळे मिटले आणि आबा अनंताच्या प्रवासाला निघून गेले. आम्ही जीवाच्या आकांतानं हंबरडा फोडला.

‘आबा! आबा! आबा!’

पण हु नाही की चू नाही. आबा आता कुठंच नव्हते. ना मळ्यात, ना गोकुळात. भराभरा गाव गोळा झालं. पंचक्रोशीतली माणसं गोळा झाली. ‘सावता महाराज की जय’ म्हणत आबांच्या दर्शनाला माणसांचे लोंढेच्या लोंढे अरणमध्ये आले; पण साधे सात्विक, निर्मळ मनाचे माझे आबा कुठंच नव्हते. आई सैरावैरा झाली होती. आया-बाया समजावत होत्या. आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. कांदा, मुळा, भाजीतली विठाई माऊली पोरकी झाली होती. सदैव मळ्यात रमलेले आबा, माझ्या लग्नात हळवे झालेले आबा, आईच्या दुखण्यात तिची सेवा करणारे आबा, आमच्या विठ्ठलच्या अकाली जाण्यानं गळून गेलेले आबा, गावकर्‍यांच्या दुखण्यावर आनंदानं औषध देणारे आबा आज सगळं सोडून शेवटच्या प्रवासाला निघून गेले होते.

माझे आबा म्हणजे विठ्ठलाचे साधेभोळे भक्त. आबांचं साधं बोलणंसुद्धा अभंगासारखं मधाळ असायचं. एकांतात रमणारे माझे आबा म्हणायचे,

नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, माझे आहे मन वेगळेंचि ।
नको तुझी भक्ती, नको तुझी मुक्ती, मज आहे विश्रांती वेगळीच ।

अशी वेगळी विश्रांती घेण्यास आबा कायमचे निघून गेले. आबांशिवाय घर, मळा खिन्न झाले. गुण्या-गोविंदानं नांदणारं कुटुंब आपल्याला भगवंतामुळंच लाभलं, अशी आबांची श्रद्धा होती. ते अनेकदा तसं बोलून दाखवत. तोच धागा धरून मलासुद्धा भगवंताचे आभार मानावेसे वाटतात. इतके मायाळू, भक्तीचा मळा फुलवणारे मायबाप मला लाभले ही त्याचीच पुण्याई!

धन्य ते अरण, रत्नांचीच खाण ।
जन्माला निधान, सांवता तो ।
सांवता सागर, प्रेमाचा आगर ।
घेतला अवतार, माळ्याघरी ।

संत नामदेव महाराजांनी असं आबांचं गुणगान गायलं, तर एकनाथ महाराज म्हणाले,

माळियाचे वंशी सांवता जन्मला । पावन तो केला वंश त्याचा । आबांसारख्याच थोर संतांच्या तोंडून आबांचं असं कौतुक ऐकून माझं मन भरून येतं. ‘माझे आहे मन वेगळेंचि।’ असं म्हणणार्‍या या संताच्या पोटी जन्म मिळाला, हे माझं भाग्यच!

0 Shares
सावतोबांचं सत्व मराठी कवींनी राखलं? काळाचं अंतर भेदणारे दोन संत