सावतोबांचं सत्व मराठी कवींनी राखलं?

डॉ. रणधीर शिंदे

संत सावता माळी यांनी ‘कांदा, मुळा, भाजी’ म्हणत मराठी काव्यात शेतीमातीची घट्ट नातं जोडलं. शेतीच्या परंपरेतून उभं राहिलेलं सत्व आजच्या मराठी कवितेत दिसतं का?

संतसाहित्य हा मराठी वाङ्मयीन संस्कृतीचा सर्वात महत्त्वाचा ठेवा आहे. भारतीय भक्ती साहित्यानं सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या अमूल्य अशी कामगिरी केली आहे. त्यात वारकरी पंथाचं स्थान अनन्यसाधारण असं आहे. धर्म, भक्ती, समाज, संस्कृती, जात, भू-परिसर आणि व्यक्तिमनाच्या आविष्काराची खूण म्हणून या वाङ्मयाकडे पाहावं लागतं. त्यात कष्टाला केंद्रबिंदू मानून भक्ती आराधना करणारी कविता संत सावता माळी यांनी लिहिली.

ज्या काळात कर्मकांड वा भक्तीचं आतोनात स्तोम माजवलं जात होतं. त्या काळात केवळ आणि केवळ कष्टाला प्राधान्य देऊन आपल्या जीवनातील आधिभौतिक जाणिवेचं आणि जीवनशैलीचं सामान्यीकरण करणारी कविता सावता माळींनी लिहिली. त्यामुळं सावता माळींची कविता हा पाहणी बिंदू मानून पुढच्या टप्पावरील शेतीनिष्ठ कवितेसंबंधी निरीक्षणं नोंदवणं आवश्यक आहे. या कवितारूपी टेहळणी बुरजावरून पुढील कवितेचं विहंगमावलोकन करता येऊ शकतं.

सावता माळी यांच्या नावावर सकलसंतगाथेत १२ अभंग आहेत, तर पारंपरिक ३७ अभंग त्यांच्या नावावर आहेत. सावता यांच्या अभंगात विठ्ठलाशी आणि भोवतालाशी संवाद आहे. आत्मपरता, नामभक्ती, वैराग्यभाव, शेती अनुभव आणि इतर जाणीवसूत्रे प्रकटली आहेत. ‘आशा, मोह, माया लागलीसे पाठी असे’ आणि ‘काळ क्रूर दृष्टी पाहतसे’ असे या विपरीत काळाचं वर्णनदेखील सावतोबांनी केलं आहे. त्यातल्या लोकजीवनातील, नित्य व्यवहारातील आणि शेती मळ्याच्या शब्दांचं वेगळेपणदेखील महत्त्वाचं आहे.

मराठी कवितेत शेतीनिष्ठ जाणिवेचा पहिला उद्गार सावतोबांच्या अभंगात पाहायला मिळतो. ज्या अभंगाचा पुन्हा पुन्हा उल्लेख केला जातो ते ‘कांदा, मुळा, भाजी’ या मराठीतील शेतीनिष्ठ जाणिवेचा संवेदनांचा हा पहिला आविष्कार होय. दररोजच्या नित्य शेतीकामात शेतीचं रूपक वापरून ईश्वर संवादाच्या एकमेळीचं तत्त्व सांगितलं. शेतीतलं एकेक तत्त्व सांगून ‘अवघी विठाबाई माझी, अवघा झाला माझा हरी, अवघी व्यापली पंढरी’ आणि ‘विठ्ठल पायी गोविला गळा’ असा परमउत्कर्ष साधला आहे. कांदा, मुळा, भाजी, लसूण, मिरची, कोंथबिरी, मोट, नाडा, विहीर, दोरी असं बृहत मळ्याचं रूपक योजून कष्टाच्या व्यापलेपणाची भावना व्यक्त केली आहे. यात तत्त्वज्ञान, जीवनदृष्टीचा महत्तम आविष्कार आहे. शेतीवरील एवढी अपार गुंतवणूक, जखडलेपण वाङ्मयात अपवादानेच पाहायला मिळतं.

भक्तीचं माजवलेलं अवडंबर सावता माळी काढून टाकतात आणि त्याचा संबंध दैनंदिन कामाशी जोडतात. जात आणि व्यवसायाचा अभिमानदेखील त्यात आहे. कष्टातील उन्नत आनंदभाव एकरूपता आहे. श्रमाविषयीचा एवढा अभिमान क्वचितच पाहायला मिळतो.

आम्हा हाती मोट, नाडा । पाणी जाते फूलझाडा ॥
शांति शेवंती फुलली । प्रेम जाई-जुई व्याली ॥

श्रमानंदातील निर्मितीचा साफल्यानंद यातून व्यक्त झाला आहे. इथं सावता माळी फुलांसाठी विशेषणांचा कल्पक वापर करतात, हे ध्यानात घ्यावं. शेवंतीसाठी ‘शांती’ तर ‘जाई-जुई’ साठी प्रेम तर ‘फुलली’ आणि व्याली’ यात निर्मितीतील आनंद आहे. तसेच ‘स्वकर्मात व्हावे रत । मोक्ष मिळे हातोहात’ अशी सावतोबांची मोक्षकल्पना.

सावता माळी यांच्या कवितास्वरूपाचे काही विशेष या ठिकाणी नमूद करायला हवेत. प्राचीन कवितेत थेट शेतीसंस्कृतीचं इतकं अस्सल चित्रण सावता माळींच्या कवितारूपात पाहायला मिळतं. या ठिकाणी एक फरक असाही सांगता येणं शक्य आहे की, ज्ञानेश्वरादी संतांच्या कवितेतलं शेती जीवनाचे संदर्भ हे अलंकरण वा रूपत्त्वाच्या स्पष्टीकरणासाठी आलं होतं, ते रूपकांच्या वा प्रतिमास्वरूपात. त्यामुळं सावता माळी यांच्या अभंगात या शेतीजीवनाचं खास अस्सल जीवनानुभवाचं सावता माळीकृत दृष्टिबिंदूचं चित्रण आहे. सावता माळींच्या कवितेत जाणीवविश्वाची एक सुसंगत, सुस्पष्ट अशी रेषा आहे. आत्मपरतेपासून विठ्ठलभक्ती, अद्वैती तत्त्व, जगण्याचे अटीतटीचे प्रसंग, परमार्थाचा जनाला उपदेश अशा जाणिवांचं प्रकटीकरण आहे. याबरोबरच शब्दकळा, भाषारूपाच्या दृष्टीनंदेखील ही कविता महत्त्वाची आहे.

सावतोबांच्या दृष्टीत भेदाला, दुहीला फारसं महत्त्व नव्हतं. याची थेट प्रतिक्रिया सावता माळी यांनी व्यक्त केलीय.

प्रपंचीं असूनि परमार्थ साधावा ।
वाचें आठवावा पांडुरंग ॥
उंच-नीच काही न पाहे सर्वथा ।
पुराणींच्या कथा पुराणींच ॥
घटका आणि पळ साधी उतावीळ ।
वाउगा तो काळ जाऊं नेदी ॥

या प्रकारच्या दृष्टीचं नातं. तसंच ‘जपतप क्रिया, धर्म, साधन वाउगे बंधन उपाधीचे’ असा नियंत्रण विरोधातला स्वर सावताच्या कवितेत आहे. सर्वसामान्यांच्या जगण्यातल्या एकमेळ दृष्टीचा हा आविष्कार आहे. तत्त्वचिंतन दृष्टीनंदेखील सावता माळी यांच्या कवितेतली रूपं महत्त्वाची आहेत.

तसंच सावता माळींच्या अभंगात विठ्ठलाशी एक निरंतर संवाद आहे. तो जिव्हाळ्याचा संज्ञापनबंध आहे. त्यांच्या या विनवणी बंधानं या कवितेला एक वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं आहे. तसंच विरक्तीचा भाव आहे. मोहपाशात गुतंल्यामुळंच देवा करीशी निःसंतान’ असं मागणं आहे. माळीपणाचा म्हणजे आणि कामाचा सर्वश्रेष्ठ अभिमान आहे. मळा हे बृहत रूपक कल्पून श्रमसंस्कृतीचा सार्थ असा गौरव करणारी ही कविता आहे. ‘विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती ध्यानी, मनी वनी असता सर्व काळ ।’ या अखंड ध्यासाचा हा आविष्कार आहे. ‘वेद, श्रुती, शास्त्रे, पुराणे, श्रमली । परी तया विठ्ठली गम्य नाही ।’ असा परंपराविरोध त्यात आहे. एका अर्थानं प्रस्थापित परंपरेला विरोध आणि सामान्यांचे उन्नयनीकरण करणार्‍या जीवनदृष्टीचा हा आविष्कार आहे.

याबरोबर रूपतत्त्वाच्या दृष्टीनंदेखील सावता माळी यांची कविता लक्षणीय आहे. प्रतिमा, रूपकं, शब्दकळा आणि लोकतत्त्वाचा अतिशय सरस असा आविष्कार सावताच्या कवितेतून झाला आहे. देशी शब्दकळा, ठाशीव शब्दरूपं आणि अर्थसंवादाला थेट भिडणारी शब्दकळा सावताची आहे. शेतीशी निगडित एवढी शब्दसंपदा आणि त्याचा अन्वर्थक वापर पाहिला की थक्क व्हायला होतं. ‘हृदयकमळी पांडुरंग’ असा वेधक शब्द सावता योजतात. पांडुरंग आणि कमळ यातही काही एक नातं दर्शवलं आहे. बुद्ध तत्त्वाशी निगडित असणारे हे शब्द आहेत. तेराव्या शतकातील लोकमानस विचारप्रवाह दर्शवणारी ही शब्दकळा आहे. ‘ऐसा तो उमज नाही या मानवा । उगाच वणवा लागे देही ।’ यातला शब्दवापरही वेधक असा आहे.

‘समयासी सादर व्हावे’, असा एक सावतोबांचा वैशिष्ट्यपूर्ण अभंग आहे. मानवी जीवनातील सुखदुःखाचा, हेलकाव्याचा, वळणाचा फार चांगला वेध या अभंगात आहे. प्रत्येक चरणारंभी ‘कोणे दिवशी’ या शब्दप्रयोगांचा ध्रुवपदासारखा वापर करत मानवी जगण्यातील सहजता व्यक्त केलीय.

‘कोणे दिवशी यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ।
कोणे दिवशी स्मशानी जाऊन । एकटे रहावे ॥’

या भावपरतेचा वैराग्यभावाचा, सदगुरूकृपेचा अतिशय सरस आविष्कार झालाय. तसंच सावता माळींच्या कवितेतील एक वाट लोकपरंपरेनं जोजावलेली आहे. विठ्ठलाच्या श्रीमुखकमलासाठी त्यांनी म्हटलं आहे. ‘दृष्टी लागे झणी उतरा निंबलोण । तनुमनाची कुरवंडी ओवाळा ।’ या प्रकारची शब्दकळा पाहिल्यानंतर लोकपरंपरेतील लोकतत्त्वाचा किती वैशिष्ट्यपूर्ण वापर करता येतो ते लक्षात येतं. ‘निंबलोण उतरणे’ आणि तसंच ‘तनुमनाची कुरवंडी ओवाळणे’ यात आई आणि मुलाच्या वात्सल्यबंधांचा, सुरक्षिततेचा आणि तिच्या कृतीचा ऐवज साठवलेला आहे.

ज्या तर्‍हेनं ग्रामीण कवितेत शेती जीवनाचे संदर्भ केवळ वर्णनपर वा वास्तवाचं नेपथ्य म्हणून येतात. तसं सावता माळी यांच्या अभंगरूपाच्या बाबतीत घडत नाही. ते त्यास नवी इयत्ता प्राप्त करून देतात. तत्कालीन भक्ती चळवळीच्या पार्श्वभूमीवर ते ईश्वरीभक्तीचं स्वरूप प्रत्यक्ष आपल्या कामात पाहतात. ध्यानात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे अरण हे पंढरपूरपासून केवळ पस्तीसेक किमी अंतरावर आहे. एवढी पंढरपूरशी जवळीक असूनही स्वतःचं प्रत्यक्ष काम हेच भक्तीचं स्वरूप आहे. शेतीकामाला अगक्रम आणि त्यातच पांडुरंगाची प्राप्ती पाहणं, असा भाग त्यात आहे.

सावता माळी यांच्या कविता बुरूजावरून मराठी कविता परंपरेची तुलना पाहणी केल्यास मराठी ग्रामीण कवितेसंदर्भातील इथं काही निरीक्षणं नोंदवली आहेत. महात्मा फुले यांच्या कवितेतही शेतीजीवनाचं विस्तृत चित्र आहे. सावता माळी यांच्यापुढं मध्ययुगीन भक्तीची जाणीव आणि श्रद्धाभाव केंद्रबिंदू होता. पांडुरंगाच्या रूपानं आपली जीवनशैली त्यांनी रेखांकित केली, तर महात्मा फुले यांच्या दृष्टिकोनात आधुनिक प्रबोधनाचा प्रकल्प होता. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या विचारांचा दृष्टिबिंदू होता. शेतकर्‍यांच्या स्थितीचं चित्रण त्यांनी शेटजी आणि भटजी या द्वंद्वंसमासातून घेतलं.

शेतकरी शोषण आणि त्याबद्दलचा प्रतिकार हा त्यांच्या वाङ्मयाच्या केंद्रस्थानी येणं अटळ होतं. तसंच पारंपरिक भक्तीला अव्हेरून आधुनिक मानवीयतेचं स्वरूप ते मांडतात. मात्र आविष्काराच्या बाबतीत मात्र काही एक साम्य दोघांत जाणवतं. महात्मा फुले आणि संतपरंपरेच्या अनुबंधांचा मार्मिक असा विचार डॉ. सदानंद मोरे यांनी काही ठिकाणी केलेला आहे. सावता माळी यांच्या अभंगातील कष्टालाच ईश्वरी स्वरूप मानणं आणि फुले कवितेतील शेतकरी कष्ट एकभाव यात काही साम्य जाणवतं. महात्मा फुले म्हणतात,

जगाच्या कल्याणा देह कष्टवावा ।
कारणी लावावा । सत्यासाठी ॥
जितेंद्रिय ज्याची मानवा भूषण तोलीतो ।
सर्वांशी वर्ततो । एकभावे ॥
पर सुख दुःख स्वतःशी सज्जन ।
जोतीबा चुंबन । घेई त्याचे ॥

शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात त्यांनी जे महाराष्ट्र भूमीचं वर्णन केलं आहे त्यात आणि सावता माळ्याच्या कवितेतील भू-परिसराच्या वर्णनात दृष्टीत साम्य आढळतं. फुले लिहितात,

दरी खोरी वाहे नीर खळखळे निरंतर ।
झाडा फुले झाला भार सुगंधी वाहे लहर ।
पक्षी गाती सोळा स्वर ।
मंजूळ वाणी, मनोहर भूमी अती काळसर ।
क्षेम देई पीका फार ॥

फुल्यांची ही शब्दकळा पाहिली तर ते ज्या तन्मयतेनं भूमी आणि निसर्गाचं वर्णन करतात. तशीच तादाम्य वृत्ती सावता माळींमध्येही पाहावयास मिळते. ‘ब्राह्मणाचे कसब’ या ग्रंथाच्या पहिल्या पानावर फुले यांनी लिहिले आहे.

तू सागर करुणेचा देवा तुजलाचि दुःख सांगावे ।
तुजवाचून इतराते दिनमुख पसरोनि काय मागावे ॥

या मागण्यातील आवाहनदेखील दोघात साम्य दर्शवतं. सावता माळींच्या कवितेतील पांडुरंगाला सततची आर्त अशा विनवणीचं स्वरूपदेखील या प्रकारचं आहे. ईश्वराशी मन मोकळं करण्याचं हे संभाषित समान प्रकारचं वाटतं. हा ग्रंथ फुले यांनी ‘कुणीबी, माळी, मांग, महार यास परमप्रीतीनं’ अर्पण केला आहे. महात्मा फुले यांच्या ‘शेतकर्‍यांच्या असूड’मध्ये शेतकर्‍यांच्या दयनीय अवस्थेचं आणि स्थितीचं फार तपशीलवार दृश्य स्वरूपाचं वर्णन केलंय.

सभोवतालच्या जीवनातील अनुभवाचं कथन करण्याच्या शैलीत दोघात साम्य आहे. महात्मा फुले यांची ‘कुळंबिणी’ ही दीर्घकविता मराठीतील एक श्रेष्ठ कविता आहे. या कवितेत कुणबी शेतकरी स्त्रीचा दिनक्रम कथन केलाय. कोंबडा आरवल्यापासून सर्वासंगे शेतात काम करणार्‍या स्त्रीचं हे दिनचित्र आहे.

वेणीफणी नाही सर्वदा घामट ।
नखर्‍याचा वीट । तिला वाटे ।
कासोटा घालून शेण तुडवीती ।
गोवर्‍या थापीती । उन्हामधे ।

अशी स्त्रीची शब्दचित्रं मराठी कविततेत फारशी पाहायला मिळत नाहीत. महात्मा फुले यांच्या कवितेतील पती-पत्नी नात्यांतील सहभावाचा, कष्टाचा आविष्कार आहे. तो देखील मराठी कवितेत अपवादभूत आहे. किंबहुना अशा प्रकारची सहभावाची प्रागतिक दृष्टी मराठी कवितेत फारशी आढळत देखील नाही. महात्मा फुले यांचे शब्द पाहा.

पाभरीचे मागे मोघीता तुरीस ।
मदत पतीस पेरीतांना ।
वार्‍याचा सोसाटा भर पाऊसांत ।
करी ती मदत ॥ पतीराया ।
दोरी धरताना साह्यकारी होती ।
रोपास लावीती ।
अशा उद्योगीस म्हणे कुळंबीण ।

या प्रकारचा दृष्टिकोन पाहिल्यावर एका बाजूला पुरुषांच्या हेतूरचित दृष्टीतून हद्दपार झालेली बाई आणि स्त्रीवादी कथनातील पुरुषरहित एकेरी संभाषितांच्या ध्रुवावरील फुले यांच्या या दृष्टीचं महत्त्व लक्षात येतं.

मराठी कवितेत ग्रामीणत्वाच्या खुणा आधुनिक काळात कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. एकोणिसाव्या शतकात महात्मा फुले यांच्या कवितेत ग्रामीण जीवनाच्या शेती जीवनाच्या विपुल खुणा पाहायला मिळतात. केशवसुतांच्या कवितेतील ‘म्हैस’, ‘वाट’ हे शब्द ग. त्र्यं. माडखोलकरांना खटकले होते. ‘गोष्टी घराकडील वदता’, ‘नैऋत्येकडील वारा’, ‘दिवाळी’ या कवितांत केशवसुतांनी भूतकाळातील हवंहवंसं ग्रामखुणांचं चित्र अभिव्यक्त केलं होतं. विसाव्या शतकात नागरी सांस्कृतिक विश्वाचा हवापालट म्हणून ग्रामजीवनाची रोमँटिक चित्रं विपुल प्रमाणात रेखाटली गेली. रविकिरण मंडळानं त्यास हातभार लावला. जानपद गीतांच्या रूपानं तो स्थिरावला. गांधीच्या ‘खेड्याकडे चला’ आदर्श स्वप्नाळू ध्येयवादाचादेखील त्यात भाग होता. ‘भलरी’ सारखी गीतं लिहिली गेली. खेडूत शेतकरी पती-पत्नीची, प्रियकर-प्रेयसीची रूपं त्या काळातील दाबातून लिहिली गेली.

या मध्यावर एक महत्त्वाची कविता लिहिली गेली ती बहिणाबाई चौधरी या कवयित्रीच्या रूपानं. संत सावता माळी, महात्मा फुले आणि बहिणाबाई हे थांबे मराठी काव्यपरंपरेत अस्सल शेतीचित्रणाच्या चित्रणाच्या दृष्टीनं आपल्याला पाहायला मिळतात.

शेतकरी जगण्याशी संबंधित कष्टाशी निगडित जीवनव्यवहार बहिणाबाईंच्या गाण्यात आहे. प्रत्यक्ष शेतीतल्या पिकांचं आणि कामाचे तपशील देत जीवनरहाटी प्रकटली आहे. श्रमातील एकात्म अनुभवाची आणि शेतीची अनेक रूपकं त्यांच्या कवितेत आहेत. व्यक्तिसमूहमनातील श्रद्धाभावाचा, जीवनशैलीचा सरस असा आविष्कार करणारी ही कविता आहे. शेतीच्या नित्यकर्मातल्या जाणिवेचा खोलवरचा आविष्कार त्यांच्या कवितेत आहे. शेतकरी जगणं, ऋतुकाळ, सणसभारंभ, नातेबंध, निसर्गाची खोलवरची जाण बहिणाबाईंनी प्रकट केली.

‘अरे संसार संसार जसा तव्हा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके, मग मियते भाकर’

असं कष्टपद जीवन सांगितलं. ‘धरित्रीच्या कुशीमधी बी बियानं निजली’ पासून ते ‘वार्‍यांने डोलणारे रान’, आणि गाडीभर दाणे आल्याची साफल्यभावना त्यामधे आहे. बहिणाबाईंच्या कवितेत समग्रतेचं भान होतं. ग्रामीण जीवनरहाटी, स्त्रीमनातील सूक्ष्मता, आणि भू-संस्कृतीचे परिमाण प्रभावीरीत्या त्यांच्या कवितेतून प्रकट झालेलं आहे. ‘रंग भरले डोयात, माझ्यासाठी शिरिरंग रंग खेळे आभायात ॥’ अशा भावाबरोबरच रानशिवाराशी निगडित रानपरिसर जिवंतपणे व्यक्त झाला आहे.

येरे येरे माझ्या जीवा, काम पडल अमाप
काम करता करता, देख देवाजीचं रुप
असं जगणं तोलाचं, धरितीच्या रे मोलाचं

या प्रकारच्या दृष्टीचं नातं थेट सावता माळींच्या कवितेशी सांगता येतं.

या पार्श्वभूमीवर मराठी ग्रामीण कवितापरंपरेकडे पाहिलं असता त्यात फार मोठी विविधता आढळते, असं दिसत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही मध्यमवर्गीय लेखनाभिरूचीचा परिणाम कवितेवर दीर्घकाळ दिसतो. वाङ्मयीन संकेतशरणतेचा मोठा प्रभाव अनुगामी साहित्यावर दिसतो. स्वातंत्र्यापूर्वी ग्रामीण म्हणवल्या जाणार्‍या कवितास्वरूपावर रोमँटिक दृष्टीचा मोठा प्रभाव दिसतो. तो नंतरही दीर्घकाळ पाहायला मिळतो. रविकिरण मंडळातील कवींनी ग्रामीण जानपद स्वरूपाची कविता लिहिली गेली. ग. ल. ठोकळ (सुगी), यशवंत आणि इतर कवींनी अशा कविता लिहिल्या. अगदी भलरी, मालन, अशी खेडुतांची रूपं प्रकटली, ती रोमँटिक नजरेतून. शहरपालट आणि प्राकृतिक जीवनाच्या ओढीतून अशी चित्रणं मराठी कवितेतून आली.

सावता माळी, महात्मा फुले आणि बहिणाबाई चौधरी यांच्या श्रमकवितेची साखळी ही खंडित झाली. ती एकदम दुसर्‍या ध्रुवाकडे ढळली. १९६० नंतरही आधुनिकतेचा तसंच ग्रामीणत्वाचा विस्तार होऊनही ही कविता प्रियकर-प्रियतमाच्या रूपात व्यक्त झाली. समग्रता आणि जीवनानुभवाऐवजी ती एका मर्यादित अनुभवाकडे शिफ्ट झाली. शेती संस्कृतीतल्या केवळ स्त्री-पुरुषांतील प्रीतभावनेत रूपांतरित झाली. ना. धों. महानोर, विठ्ठल वाघ, आनंद यादव यांच्या कवितारूपात ती पाहायला मिळते. अर्थात इथं त्या त्या कवीचा संवेदनस्वभावही ध्यानात घ्यावा लागतो.

आनंद यादव यांच्या ग्रामीण म्हणवल्या जाणार्‍या कवितेत दीर्घ केवळ प्रियतमेचा रूप संवाद आहे. तेही सारे सभोवतालचे, शेतीचे संदर्भ नाकारून. त्यातील काही ओळी पाहा.

नगं येऊस उनाच्या रखात,
लुगड्याचं खोचाण सोड खाली
केवड्याच्या पानागत गोर्‍या पोटर्‍या,
करपून हुतील काळ्या बाभळी

किंवा

लावत जा रोज कुक्कू आणून कसंबी
न्हाईतर लावीन खुरपं मारून

ही दृष्टी पाहिली आणि फुलेदृष्टी यात किती अंतर पाहायला मिळते. पारंपरिक पुरुषी मानसिकतेच्या दृष्टीचं हे चित्र आहे. किंवा ‘ये जळणाचं निमित काढून, ह्यो घे पानाचा इडा, कर जरा तोंड लाल, उना तानात फिरून, तांबडं भडकं झाल्यात गाल’ या प्रकारच्या दृष्टीला काय म्हणावं? ‘असलं हाय हे हिरवं जग, मैतरा, तुझ्या समाधानापायी, हे लांबनंच बघ’ अशी जीवनदृष्टी आनंद यादव यांच्या कवितेतून साकारली आहे.

१९९० नंतरच्या ग्रामीण संवेदशीलतेच्या कवितेत मोठ्या प्रमाणात परंपरा ओढीचं आकर्षण निर्माण झालं. तेही दुहेरी स्वरूपानं एक समृद्ध संचित म्हणून तसंच संशयात्म स्वरूपाचं देखील. यादृष्टीनं अनेक कवींमधे विठ्ठल महात्म्य मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. श्रीकांत देशमुख यांच्या कवितेत तर बहुजन संस्कृतीतील विठ्ठल महिमा आणि पंढरपूर ओढीची जाण अधिक प्रमाणात पाहायला मिळतं. त्यामुळं तुकाराम हा ग्रामीण कवितेच्या केंद्रस्थानी देखील आलेला दिसतो.

या बरोबर भोवतालच्या बदलामुळं शेती ही परिघावर फेकली गेली. शेती आणि शेतकरी यातलं नातं दुःखात परावर्तित झालं. हा शोकात्म संघर्ष अनेक कवींमध्ये चित्रित झालेला आहे. शेती हा शाप आहे. त्यामुळं पितृप्रतिमेची बृहद् प्रतिमा ‘बळी’ रूपात रेखाटली गेलीय. ‘सावत्याचा मळा, पाण्याविना वाळे, डोळ्यातले तळे आटलेले’ (लक्ष्मण महाडीक) या भावनेत रूपांतरीत झाला.

या परंपरेचं जादुई आकर्षण मात्र आधुनिक मराठी कविता परंपरेला आहे. भूतकाळातलं सारं वैभव नाहीसं झालं असलं तरी सांस्कृतिक-नेणिवेत काहीतरी रूतून बसलं आहे. त्यामुळं अरुण कोलटकरांसारखा कवी ‘ज्ञानेश्वर समाधिवर्णन’ कवितेत ‘गुंतली फासळी निर्माल्यात’ असं म्हणतो. तर भालचंद्र नेमाडे यांच्या कवितेतील निवेदकही वडलांच्या मृत्युनंतर अस्थिविसर्जनासाठी पंढरपूरला जातो. त्यावेळी ‘पाहिले काळमुख संशयाने’ या भावनेनं तो तटस्थपणे पाहतो. मात्र शेवटी ‘हरि हरि । बिचारा बापुला । विठू चिकटला पारंबीला ॥’ या वाहतेपणात पर्यवसित झाला आहे.

इंद्रजित भालेराव यांच्या कवितेत सावता संवेदनशीलतेच्या विपुल खुणा पाहायला मिळतात. शेती संस्कृतीचा आणि त्यांच्याशी निगडित मोठा पट भालेराव यांच्या कवितेत आहे. भालेराव यांच्या कवितेतील अनेक अनुभवसूत्राची कुळी सावताच्या कवितेशी निगडित होताना दिसतं. अर्थात भालेराव यांच्या कवितेवर संत परंपरेच्या सावलीचा मोठा ठसा आहे. इंद्रजित भालेरावांच्या ‘पीकपाणी’ या पहिल्याच संग्रहातील पहिल्याच कवितेत आपल्या कवितानिर्मितीचे स्रोत सांगितले आहेत. ‘माझ्या कवितेला यावा शेना-मातीचा दर्वळ’ किंवा ‘खारी-आंबट-तुरट माझ्या माझ्या कवितेची चव’ अशा शब्दांत आपल्या कवितेचं वर्णन केलं आहे. किंवा ‘शेतच इमान । शेतच माझा मळा । शपथेचा गळा । शेत माझे ।’ (दूर राहिला गाव) या भावसंबंधाचा आविष्कार त्यांच्या कवितेत आहे. मराठी भाषेतला पहिला शेतकरी कवी संत सावता माळी यांच्या कर्मयोगास ‘भूमीचे मार्दव’ (२०११) हा कवितासंग्रह त्यांनी अर्पण केला आहे.

योगायोगाची गोष्ट म्हणजे सावता माळीच्या गावापासूनच दहा-एक किमी असणार्‍या गावातच कल्पना दुधाळ या कवयित्रीची घडण झाली. दुधाळ यांच्या कवितेत बाहिणाबाई चौधरी आणि सावता माळी यांच्या शेतीनिष्ठ अनुभवजगास जोडून घेण्याची प्रभावी जाण व्यक्त झाली आहे. ‘माझी नाळच होती, जोडलेली माताशी, तिनंच सोडला पान्हा तोंडात, कटवटाळून छातीशी मातीची ओल होऊन, मी वावरले कितीदा,’ किंवा ‘खुरपता खुरपता खालीवर झाली माती आणि बाईचं काळीज भेटलं सये गं’ असा मातीशी सखीभाव दुधाळ यांच्या कवितेतून व्यक्त झाला आहे. ‘रोज मातीत, मी गं नांदते बाई नांदते’ अशी बाईची शेतीची नांदवणूक प्रकट झाली आहे.

आधुनिक यांत्रिकीकरणानं शेतीवर मारलेल्या झडप आक्रमणाची नोंद कल्पना दुधाळ यांच्या कवितेत आहे. त्यामुळं ‘सिझर कर म्हणतेय माती’ अशा उपरोधानं अंगानं ही जाण व्यक्त झाली. तसंच शेती संस्कृतीतली बाई ही दुःखान्त आहे, ती शोषणबळी आहे या शोकान्त जाणिवेचा पदर कल्पना दुधाळ यांच्या कवितेत आहे. शेती संस्कृतीतील कष्ट, त्यातला श्रमानंद आणि भोवतालच्या पडझडीची रूपं कल्पना दुधाळ यांच्या कवितेत आहेत. त्यामुळं सावता, फुले, बहिणाबाईच्या कवितेला जोडून घेणारी कविता कल्पना दुधाळ यांनी लिहिली.

आधुनिक काळातील ग्रामीण संवेदनशीलतेच्या कवितेचा विचार करत असता एक बाब लक्षात घेणंही आवश्यक आहे. की तेरावं ते एकविसावं शतक या कालांतरणाचे खूप अंतराय आहे. समाज, संस्कृती, बदलानं मानवी विचारदृष्टीत मोठं अंतर पडलेले आहे. ज्या अर्थानं सावतोबांच्या कवितेत श्रमकेंद्री विठ्ठलकेंद्री आहे. ते एका अर्थानं विसाव्याचं, सुरक्षिततेचं जग आहे. त्यामुळं आपलं नित्यकर्म आणि ईश्वरी भक्तीतला संवाद अशा नात्यात तो विसावलेला आहे. मात्र विसाव्या शतकातील शेतकरी, कष्टकरी हा शेतीतून उस्कटलेला आहे. तो विरूप झालेला आहे. त्यामुळं शेती इमाननिष्ठा हे केंद्र ढळून भगभगीत वैराण आणि असाहाय्य स्वरूपाचा विरोधभावाच्या नात्याची रूपं कवितेतून व्यक्त झाली आहेत. त्यामुळं गेल्या पाव शतकातील मराठी कवितेतील शेतकरी बापाच्या प्रतिमेची रूपं पाहावीत. ती दुःखद आणि विरोध नात्याची आहेत.

या ठिकाणी भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीत एक मार्मिक प्रसंग आहे तो सांगण्याचा मोह होतो. कादंबरीतील नायकाचा मेव्हणा पाटबंधारे खात्यात इंजिनिअर आहे. तो खूप भ्रष्टाचारी आहे. त्याचं विडंबन रूपातलं चित्र कादंबरीत आहे. त्याचं वर्णन कादंबरीत असं आहे, ‘पाटबंधारेसाहेब कविताही करायचे आणि त्यांच्या नामानिराळा ह्या दीर्घ ग्रामीण कवितेला प्रथम क्रमांकाचं बक्षीस सामाजिक जबाबदारी मानणारे तळागाळातील ग्रामीण साहित्याचे भावी आधारस्तंभ अशा सर्टिफिकिटासह पहिल्या अखिल भारतीय ग्रामीण साहित्य संमेलनात मिळालेलं त्यांनी फ्रेमही करून बैठकीत टांगलेले आहे.’ असं त्या मेव्हण्याचं वर्णन कादंबरीत आहे.

ते एका अर्थानं पुढील काळातील ग्रामीण कवींची यथार्थ अशी समीक्षा आहे. ‘साले पाटबंधारेसाहेब, समाजाच्या पायात राहून तोच पोखरत चैनीत राहता येतं पुन्हा स्वतः नामानिराळं’ या प्रकारचा दुरान्वय मराठी ग्रामीण कवितेत पाहायला मिळतो. अशी ग्रामीण कवितेची ‘नामानिराळी’ दीर्घ परंपरा चालू आहे. शेती, काम आणि निष्ठा याकडे उपरेपणानं पाहण्याची वृत्ती मोठ्या प्रमाणात आहे. तसंच निसटलेल्या भूतकाळाचं भांडवल करण्याची वृत्तीदेखील ग्रामीण जीवनानुभवाच्या कवितेत आहे.

एकंदरित सावता माळी यांच्या कवितेतील ‘शेतनिष्ठ अनुभव’ या वाटेवरून आधुनिक कवितेची पाहणी केली असता फार तुरळक कवींच्या कवितेत या शेतीनिष्ठेची सखोल रूपं व्यक्त होताना दिसतात. अर्थातच संतकवी तुकारामांचा त्याला अपवाद आहेच. आधुनिक कवितेतल्या या शेती संस्कृतीच्या जाणिवा प्रकटीकरणात काळ, समाज, स्थिती आणि वाङ्मयीन केद्रांचा प्रभाव परिणाम झालेला आहे. त्यावर मध्यमवर्गीय रोमँटिक भावकेंद्राचा प्रभाव आहे. १९६०-७० नंतरच्या बहुजन केंद्राच्या विस्तारिततेमुळं त्यामध्ये चिकित्सेच्या रूपानं काही जाणीव केंद्रं आली. परंपराप्रेम आणि भूतकाळ पाहणी झाली. तसंच या अनुभव केंद्राकडे बाहेरून पाहिल्यामुळं त्यास प्रतिक्रियात्म आणि भाष्यात्म स्वरूप प्राप्त झालेलं दिसतं. त्यामुळं सावता माळी, तुकाराम, महात्मा फुले, बहिणाबाई चौधरी, इंद्रजित भालेराव आणि कल्पना दुधाळ अशी शेतीकवितेची सकस कवितापरंपरेची रेषा अधिक गडद होऊ शकली नाही, हे खेदानं म्हणावं लागतं.

0 Shares
नामपाठ प्रेमे सावता का गाये? माझे आहे मन वेगळेंचि