नामपाठ प्रेमे सावता का गाये?

देवदत्त परुळेकर

नामस्मरण ही बिनडोक लोकांची बिनकामाची गोष्ट, अशी टीका करतात. पण कामात देव पाहणारे सावतोबा ही नामस्मरणाचा आग्रह धरतात. कारण नामस्मरण हे एका मोठ्या क्रांतीचं हत्यार आहे.

नामपाठ प्रेमे सावता तो गाये ।
हृदयकमळी वाहे नारायण ॥
नामपाठ निका नामपाठ निका ।
खुर्पु लागे देखा देव त्यासी ॥

या अभंगात संत एकनाथांनी संत सावता महाराजांचं महात्म्य सांगितलंय. सावतोबांनी देवाला ऋणी बनवला तो नामस्मरण या साधनेच्या जोरावर, असं एकनाथांचं स्पष्ट प्रतिपादन आपल्याला या अभंगात दिसतं. स्वतः सावता महाराजांनी देखील आपण आयुष्यभर कोणती पारमार्थिक साधना केली, हे एका अभंगात सांगितलं आहे, तो अभंग असा,

नामाचिया बळें न भीऊं सर्वथा ।
कळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥

आपण नामस्मरण, नामसंकीर्तन भक्तीचं आचरण करून कळीकाळावर विजय मिळवला, हा नामस्मरण भक्तीचा मार्ग आपणही धरा, असा स्पष्ट उपदेश सावता महाराजांनी तुम्हा-आम्हाला केलाय. ज्या साधनाच्या साहाय्यानं सावतोबा संतपदावर आरुढ झाले, ते नामस्मरणाचं साधन नेमकं आहे तरी काय?

वारकरी संप्रदायाला निश्चित अशी तत्त्वज्ञानाची बैठक देऊन ज्ञानेश्वर माऊलींनी या संप्रदायाचा पाया रचला, असं तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई सांगतात. माऊलींपासून निळोबारायांपर्यंत सर्व वारकरी सांप्रदायिक संतांनी नामस्मरणाचा जोरदार पुरस्कार केलाय. माऊली, निवृत्तीनाथ, नामदेवराय, एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराज यांचे हरिपाठाचे अभंगही सुप्रसिद्ध आहेत. त्यात नामस्मरणाचा आग्रह आहेच. वारकरी आचारविचार प्रणालीत नामस्मरणाला इतकं महत्त्व का दिलं गेलं आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून पाहावं लागतं.

सावता महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि भावंडं, नामदेवराय, चोखोबा, गोरा कुंभार इत्यादी संतमंडळी ही समकालीन आहेत. वारकरी सांप्रदायाचा सुसंघटित पाया रचताना ज्ञानेश्वर माऊलींनी या सर्व संतांना एकत्र आणलं, असं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं आहे. ते म्हणतात, ‘मेळविली मांदी वैष्णवांची’. या सर्व संतांनी एकत्रितपणे नामस्मरणाचा उद्घोष, प्रचार, प्रसार केला याला तात्कालिक एक महत्त्वाचं ऐतिहासिक कारण घडलं.

ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म ब्राह्मण कुळात झाला तरी समाजानं त्यांना ब्राह्मण म्हणून कधीच मान्यता दिली नाही. त्यामुळं ज्ञानोबा, निवृत्तीनाथ आणि सोपानदेव या भावंडांची मुंज कधीही झाली नाही. त्यांना परंपरेनं द्विज म्हणून स्वीकारलं नाही. त्यांना ‘संन्याशाची पोरं’ म्हणून समाजानं वाळीत टाकलं. त्यांना अस्पृश्यांचं जगणं जगावं लागलं. त्यांना वारंवार अपमानित केलं गेलं. शिव्याशाप सहन करावे लागले.

ज्ञानदेवांनी स्वानुभवातून आजूबाजूच्या दीन दुबळ्या बहुजन समाजाकडे अपार करुणेच्या नजरेनं पाहिलं तेव्हा त्यांना काय दिसलं? हा सारा बहुजन समाज अत्यंत रंजलेला, गांजलेला, सत्त्वहीन बनलेला आहे. या समाजाचं आत्मभान जागृत करणं हे ज्ञानदेवादी संतांनी आपलं जीवनकार्य मानलं. हा समाज असा सत्त्वहीन का बनला? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या सा-या संतांनी केला. त्यावेळी त्यांना काय आढळलं? या सर्व गोष्टींच्या पाठीमागे एक षडयंत्र आहे, एक वैचारिक समजुतीचा चक्रव्यूह आहे आणि या व्यूहात हा सामान्य बहुजन फसलेला आहे, हे त्यांच्या ध्यानात आलं.

प्रत्येक मनुष्याला सुख हवं असतं. माणसाची प्रत्येक कृती सुख मिळवण्यासाठी असते. पण त्याच्या वाट्याला बहुतेक वेळा दुःखाचाच अनुभव येतो. माझ्या वाट्याला हे दुःख का? मी तर नेहमी सन्मार्गानंच जगतो, तरीही माझ्या वाट्याला हे दुःख का? माझ्या वाट्याला हे अपयश का? दारिद्र्य का? मी दरिद्री कुटुंबातच का जन्माला आलो? मी समाजानं अस्पृश्य ठरवलेल्या समाजातच जन्माला का आलो? यात माझा काय दोष? मला हे दुःख का भोगावं लागतं?

या प्रश्नाचं परंपरेनं दिलेलं उत्तर हेच होतं की, तुझ्या पूर्वीच्या जन्मीच्या पाप कर्माचं ते फळ आहे. हे उत्तर बरोबर की चूक, असा प्रश्न आपल्या समाजात सर्वसामान्यांना पडला नाही. आपला समाज रूढीग्रस्त, सनातनी परंपरेवर विश्वास ठेवणारा होता. या उत्तराची चिकित्सा तो करत बसला नाही. इतकी चिकित्सा करत बसायला लागणारा वेळ, श्रम आणि संपत्तीचं बळही त्याच्यापाशी नव्हतं. या समाजानं ते उत्तर तसेच स्वीकारलं आणि लगेचच पुढचा प्रश्न विचारला, ‘मला या दुःखातून मुक्ती हवी आहे. माझ्या सुखाच्या आड जर माझे पूर्वीचे पापकर्म येत असेल तर या पापाला नाहीसं करण्याचा काही मार्ग आहे काय?’

सनातनी पुरोहितशाहीला हेच हवं होतं. या निमित्तानं बहुजनांना लुबाडण्याचा त्यांचा धंदा जोरात चालणार होता. त्यांनी प्रायश्चित्त कर्मकांडाचा मार्ग सांगितला, ‘तुझं पाप मोठं भयंकर आहे. त्यामुळंच तू हे दुःख भोगतो आहेस.’, अशी भीती घालून पुढं सांगितलं, ‘तुझं पाप जायचं असेल तर हा यज्ञ कर, ही पूजा कर, या तीर्थयात्रा कर, हे व्रत कर आणि दक्षिणा मात्र आम्हाला दे. नारायण नागबळी कर, आम्हाला सोन्याचा नाग दे. आम्हाला दक्षिणा दिल्याखेरीज काहीच फलद्रूप होणार नाही.’
दक्षिणा लाटण्याचे असे अनेक उपाय सांगण्यात आले. आधीच दारिद्य्रात पिचलेल्या सर्वसामान्यांना हे पापनाशाचे मार्ग अवलंबिणं शक्यच नव्हतं. त्यामुळं हे समाजमन आणखी खंगलं, पिचलं, दुःखी, अगतिक झालं. मनोमन आणखी भीतीग्रस्त झालं. अशावेळी संत या दीन, दुबळ्या समाजाला आधार देण्यासाठी धावून आले. धर्माचा अर्थ सांगण्याचा धर्मदंड संतांनी बंड पुकारून पुरोहितांच्या हातातून हिसकावून स्वतःच्या हाती घेतला.

अस्पृश्याचं प्रत्यक्ष जीवन भोगण्याची पाळी ज्ञानदेवादी भावंडांवर आली होती. पण माऊलींचा समाजावर राग नव्हता. उलट अपार करुणेनं त्यांचं हृदय पाझरत होतं. त्यांनी समहृदयी संतांची मोट बांधली आणि पंढरीच्या वाळवंटात गर्जना केली, ‘नामसंकीर्तनानं सर्व पापं नष्ट होतात. म्हणून प्रभूच्या नामाचा गजर करा.’ संतांनी पाप नाशाचं रामबाण औषध समाजाला दिलं, नामस्मरण! याचा परिणाम काय झाला? ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात,

तरी कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ।
जें नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें ॥
यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरूनि उठविलीं ।
यमलोकींची खुंटिली । राहाटी आघवी ॥
यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें ।
तीर्थें म्हणतीं काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥
ऐसें माझेनि नामघोषें । नाहींचि करिती विश्वाचीं दुःखें ।
अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥

संतांनी नामसंकीर्तन करण्यास सुरुवात केली. या नामस्मरणाचं असं सामर्थ्य आहे की, त्यांचा सर्व मल तर क्षालन होऊन जातोच; पण जगाचं पापही धुतलं जातं आणि पापक्षालनाच्या प्रायश्चित्तास काही कामच उरत नाही. पापच घडत नाही तर प्रायश्चित्त कशाचं घ्यावयाचं?

सर्वसामान्य समाजानं नामस्मरणाचा मार्ग अनुसरायला सुरुवात केल्यानं पुरोहितशाहीचा प्रायश्चित्त देण्याचा व्यवसायच बुडाला. या नामस्मरणाच्या प्रभावावं यमदमांना अवकळा आणली. तीर्थे जाग्यावरून उठली. यमलोकातील येरझार संपली. पाप नाशासाठी नामस्मरणाचं सामर्थ्य वर्णन करताना सगळ्या संतांनी आपली प्रतिभा पणाला लावलीय. नामस्मरणानं पापं नष्ट होतात, हे एकमुखानं सांगताना संतांनी पुराणातील अजामेळा, गणिका, वाल्या कोळी इत्यादी चरित्र कथांचे दाखले दिले. त्यामुळं संतांचं म्हणणं पटून सामान्यांनी नामस्मरणाचा मार्ग अनुसरला.

संतांनी नामबळानं सामान्य दुबळ्या जनांच्या मनात नवीच शक्ती जागृत केली. त्यांच्या हातात नामाचं शस्त्र देऊन त्यांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान जागृत केला. हे ऐतिहासिक सत्य कशावरून? शेकडो वर्ष ज्याला ज्ञानाची कवाडं बंद होती, दुःखानं जो पिचून जाऊन मौन होऊन पडला होता, त्या बहुजन समाजातील चोखोबा आणि त्यांचं सारं कुटुंब, सावता माळी, नामदेव शिंपी, गोरा कुंभार, सेना न्हावी, दासी जनी, वारांगना कान्होपात्रा, नरहरी सोनार हे सर्व अठरापगड जातीतील स्त्री-पुरुष एकदम बोलू लागले, व्यक्त होऊ लागले, आपलं सुखदुःख कवितेतून मांडू लागले हा चमत्कार या आत्मजागृतीची साक्ष देत नाही काय?

आपल्या दुःखाला आपली पूर्वजन्मीची पापं आहेत, ही पारंपरिक समजूत चुकीची आहे, असं बहुजन समाजाला समजावण्याचा प्रयत्न संतांनी का केला नाही? असा प्रश्न आधुनिक चिकित्सक मन विचारू शकतं. पहिली गोष्ट अशी की संतांच्या कार्याचं मूल्यमापन करताना त्या काळाच्या चौकटीत ते करायला हवं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की संतांनी पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, मोक्ष या सर्वच धार्मिक संकल्पनांची केवळ चिकित्साच केलेली नाही तर त्यांना वेगळा अर्थ देण्याचाही प्रयत्न केला. तरीही संतांनी कोणतीही चिकित्सा पुढं न मांडता सर्वप्रथम तातडीनं नामस्मरण हा पाप नाशाचा सर्वात सोपा आणि बिनखर्चाचा मार्ग आहे, तो आचरा आणि कायमचं भयमुक्त व्हा, असा आग्रहाचा उपदेश सर्वांना केला त्याला कारण कोणतं?

त्याला कारण हेच की संत हे तत्कालीन उत्तम मनोचिकित्सक होते. या संदर्भात आपण महात्मा गांधींच्या जीवनातील एक प्रसंग समजून घेऊ. महात्मा गांधी हे आधुनिक युगातील रामनामाचे खंदे समर्थक मानावे लागतील. त्यांनी स्वतःच आपल्या ‘सत्याचे प्रयोग’ या सुप्रसिद्ध आत्मचरित्रात हा प्रसंग लिहिला आहे,

‘रंभा ही दाई आमच्या कुटुंबाची जुनी नोकर होती. तिच्या प्रेमाचं मला आजही स्मरण होतं. बालपणी मला भूतप्रेतादींचं भय वाटे. रामनाम हे त्यावर औषध आहे, हे रंभेनं मला समजावून सांगितलं. माझी तरी रामनामापेक्षा रंभेवरच विशेष श्रद्धा होती. म्हणून मी बालवयामध्ये भूतप्रेतादिकांच्या भीतीपासून मुक्त होण्यासाठी रामनामाचा जप सुरू केला. तो फार दिवस चालला नाही; परंतु बालपणामध्ये पेरलेलं बी जळून गेलं नाही. आज रामनाम ही माझ्या बाबतीत अमोघ शक्ती आहे.’

प्रबोधनाच्या कार्यात क्रोधापेक्षा करुणेची आणि उपेक्षेपेक्षा आपुलकीची जास्त जरूरी असते. भीतीग्रस्त मनाला आधाराची, दिलाशाची आवश्यकता असते. त्यावेळी तत्त्वज्ञानाच्या लंब्याचौड्या भाषणाचा काहीही उपयोग होत नसतो. हे सारं मानसशास्त्र संतांना बरोबर उमगलं होतं. जी गोष्ट भीतीग्रस्त व्यक्तीच्या मनाची, तीच गोष्ट समाजमनाच्या बाबतीतही या ठिकाणी लागू होतं. समाजमन घाबरलेलं होतं, आत्मविश्वास गमावून बसलेलं होतं, निराश झालं होतं. हे सारं जाणून संतांनी नामस्मरणाचा उपाय सुचवला आणि त्यानं योग्य तो परिणाम साधला. सावता महाराजही काय म्हणतात पाहा, ‘नामाचिया बळें न भीऊं सर्वथा ।’ आपल्याला आता पूर्वजन्मीच्या पापाचीच काय कळीकाळाचीही भीती वाटत नाही, ती कशाच्या जोरावर? नामस्मरणाच्या जोरावर!

भली केली हीन याति हा अभंग पाहिला तर कळतं, आपला जन्म उच्च समजल्या गेलेल्या जातीत झाला नाही, याबद्दल सावतोबांना कोणतीही खंत वाटत नाही. उलट ते म्हणतात की, बरे झाले देवा, मला हीन जातीत जन्माला घातलेस, नाहीतर उगीचच मोठेपणा, अहंकार वाढला असता. जर ब्राह्मण जातीत जन्माला आलो असतो तर नसत्या कर्मकांडाची कटकट पाठी लागली असती. आम्हाला स्नान, संध्या यांचं बंधन नाही. नामप्रधान भक्तीमार्गात कर्मकांडाला अजिबात महत्त्व नाही. याच्यामागे नामस्मरणानं दिलेली ताकद आहे.

माऊलींनी या सगळ्याच्या पुढं जाऊन सांगितलंय, ‘तत्त्वमस्यादि महावाक्य उपदेश । नामाचा अर्धांश नाही तेथे ॥’ नामस्मरण हे साधन सर्वात सोपं आहे. त्यासाठी पुरोहितासारख्या कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही. नाम कुणीही घेऊ शकतो, कुठंही, केव्हाही घेऊ शकतो, यासाठी दमडीही खर्च होत नाही, असं सर्व संतांनी वारंवार सांगितलंय. अर्थात नामस्मरण करताना मूळ विवेक, विचार सोडून नामस्मरण केलं तर ते योग्य होणार नाही. नामस्मरण करताना कोणतं पथ्य सांभाळावं? नामदेवराय सांगतात,

परदारा परधन परनिंदा परपीडण ।
सांडोनिया भजन हरिचे करा ॥

परस्त्री मातेसमान मानावी. परधनाचा विटाळ मानावा, परनिंदा ऐकू नये. परपीडण करू नये. कुणालाही पीडा, त्रास देऊ नये. हे सर्व पाळून हरीचं भजन करा. नामस्मरण करताना वेळेचा अपव्यय होणार नाही काय? कोणत्याही संतांनी आपलं कामकाज सोडून नामस्मरण करा, असं सांगितलेलं नाही. किंबहुना सर्व संतांनी आपला पोटपाण्याचा व्यवसाय सांभाळतच असतानाच नामस्मरण करून परमार्थही साधला. काम करता करता नामस्मरण करत राहिल्यानं आपला भगवंतही आपल्या बरोबर सदैव आहे, एवढंच नव्हे, तर तो आपल्या कामात आपल्याला मदत करतो आहे, अशी भावना निर्माण होऊन त्यांचं कामाचे कष्ट, वेदना कमी झाल्या.

देवाशी नामस्मरणातून नातं जोडल्यानं आपला देव आपल्या संकट समयी धावून येतो, आपल्याला मार्गदर्शन करतो, आपलं रक्षण करतो या भावना दृढ झाल्या. आधुनिक मानसशास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर नामानं मनाला आधार दिला, शॉक ऑब्झॉर्बरसारखं काम केलं. तसंच समुपदेशक, काउन्सेलरचंही काम केलं. मनाचे ताण दूर केले, उत्साह वाढवला आणि मानसिक शांती मिळवून दिली. नामसाधनेनं मुक्ती म्हणजेच मोक्षही प्राप्त होतो का? वारकरी संतांनी दिलेलं उत्तर, ‘होय! नामस्मरणानं मोक्षही प्राप्त होतो!’, असं आहे. तो कसा? त्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी ही व्याख्याच बदलली.

स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे ।
पापात्मकें पापें नरका जाइजे ।

स्वर्गाला जाण्यासाठी तुम्ही जे विधी, यज्ञ, याग, काम्यकर्म करता ते पुण्य नव्हेच ते तर पाप आहे. फक्त पुण्यात्मक पाप एवढंच. पाकीटमारी करणारा काय आणि घरफोडी करणारा काय, दोघंही चोरच. आपण पुण्य समजत होतो ते पुण्य नसून पापच आहे, तर खरं पुण्य कोणतं? माऊली याचं उत्तर त्याच ओवीत पुढं देतात, ‘मग मातें जेणें पाविजे । तें शुद्ध पुण्य ॥’ माझं स्वरूप ज्यानं जाणता येतं, प्राप्त होतं ते खरं शुद्ध पुण्य! हे शुद्ध पुण्य कोणतं? त्याच्यासाठी ज्ञानेश्वरीतच किमान दोन यज्ञांचा उल्लेख आहे. एक, निष्काम स्वधर्म कर्मयज्ञ आणि दुसरा नामस्मरण रूपी जपयज्ञ.

धर्माचं आचरण करणं म्हणजे पूजापाठ करणं, प्रार्थना करणं, वेगवेगळी व्रतं करणं, उपास करणं, तीर्थयात्रा करणं अशीच सर्वसामान्य समजूत असते. पूर्वीच्या यज्ञयागांची जागा आता संतोषी माता, पांढरे गुरुवार अशा नवनवीन व्रतांनी घेतली आहे. नवीन नवीन देवतांची आणि उत्सवांचीही यात भर पडते आहे. पण या कशाचीही गरजच नाही, अशी वारकरी संप्रदायाची ठाम धारणा आहे. मग वारकरी संतांनी आपल्याला धर्माचं आचरण कोणतं करावं, याबाबत काय मार्गदर्शन केलं आहे? माऊली म्हणतात, ‘तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें । अनायासें ॥’

अनायासे तुमच्या स्वभावानुसार तुम्हाला मिळालेला स्वधर्म, कर्तव्य कर्म त्याचं आचरण करावं. अशा स्वधर्मरूपी यज्ञाचं यजन जो करतो त्याला कोणतीही व्रतं, नियम करून शरीराला पीडा देण्याची जरूरी नाही. निरुपयोगी कर्मकांड, काम्यव्रते, शरीराला पीडा देणारे आचार विधी हा खरा धर्माचार नव्हे. त्यापासून दूर राहा, स्वधर्म, कर्तव्य कर्म आचरा, असा वारकरी सांप्रदायिक संतांचा आचार आहे. म्हणूनच पुंडलिकराय आई-वडिलांची सेवा करतात, तर सावतोबा मळा पिकवतात, गोरोबा मडकी घडवतात, चोखोबा गुरं ओढतात, सेना न्हावी केस कापतात, नरहरी सोनार दागिने घडवतात, जनी दळण, कांडण करते.

पण तरीही स्वधर्म यज्ञाला नामजप यज्ञाची जोड हवी. कारण कर्म करताना श्रमामुळं होणारी दमछाक नामानं दूर होते, नाम ही विश्रांती देतं. ईश्वराशी नामानं अनुसंधान बांधल्यानं सर्व अडीअडचणी दूर होतात, आधार मिळतो. याखेरीज कर्माला यज्ञरूप येण्यासाठी ते कर्म निष्काम व्हायला हवं. म्हणजेच कर्म करण्याचा अभिमान असता कामा नये आणि कर्मफळाची आसक्ती असता कामा नये. नामामुळं होणा-या मोक्षाविषयी ज्ञानेश्वर माऊली एका अभंगात म्हणतात,

मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल ।
ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख ॥

वारकरी संतांचा मेल्यानंतर मिळणा-या मोक्षावर विश्वासच नाही. अशा मोक्षाची त्यांना आवश्यकता नाही, उलट त्याचा त्यांनी वारंवार निषेध केला असून मुक्ती नको, भक्तीसाठी देह दे असंच म्हटलं आहे. याचदेही, याचडोळा मोक्ष मिळवायचा तो कसा? तुकाराम महाराज म्हणतात,

नारायण नामें होऊ जीवनमुक्त ।
कीर्तनी अनंत गाऊ गितीं ॥

जे सजीव आहे आणि जे निर्जीव समजलं आहे ते सर्व ईश्वरानंच व्यापलेलं असल्यानं मृत्यू नावाची गोष्टच अस्तित्वात राहात नाही, हाच कळीकाळावर विजय! सावता महाराजही हाच अनुभव सांगतात, नामाचिया बळें न भीऊं सर्वथा । कळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥ सर्वव्यापक परमात्म्याचा जीवनमोक्षरूपी साक्षात्कार आपल्याला कसा झाला, हे सावता महाराजांनी आपल्या सुप्रसिद्ध अभंगात सांगितलंय, ते असं,

कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥
लसूण मिरची कोथिंबिरी ।अवघा झाला माझा हरी ॥

0 Shares
भक्तीच्या मळ्यात विद्रोहाचा सुखसोहळा सावतोबांचं सत्व मराठी कवींनी राखलं?