भक्तीच्या मळ्यात विद्रोहाचा सुखसोहळा

डॉ.श्यामसुंदर मिरजकर

भक्ती मंदिराभोवती, मूर्ती भोवती घुटमळत नाही, तर स्वतःच्या कामधंद्याला मंदिराचं पावित्र्य प्राप्त करून देते. हे तत्त्वज्ञान सावतोबांचं मराठी माणसाला अनमोल देणं आहे.

 

तेराव्या शतकाची महाराष्ट्राला मिळालेली अनमोल भेट म्हणजे वारकरी संतमंडळ! वेगवेगळ्या जातींमधून पुढे आलेले प्रज्ञावंत धुरीण स्वतःच्या अनुभवातून आणि विलक्षण तर्कशुद्ध मांडणीतून समाजाला वारकरी संप्रदाय हा नवा आचारधर्म देत होते. नामदेव या चळवळ्या संतकवीनं पंढरपुरातून विठ्ठलभक्तीची पताका हाती घेतली. ‘आम्हा सापडले वर्म। करू भागवतधर्म॥’ अशी घोषणा केली. अनेक जातीतील विशुद्ध भावनेच्या सवंगड्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र करून एक सतत फड जागविला. परंतु तत्कालीन धर्ममार्तंडांच्या दृष्टीनं नामदेव, ज्ञानदेव, जनाबाई, चोखा, सावता, गोरोबा यांनी चालवलेली ही भक्ती चळवळ म्हणजे पाखंड होतं. धर्मद्रोह होता. म्हणूनच या सर्व संतांना प्रचंड छळाला, अपमानाला सामोरं जावं लागलं.

असं का घडलं असावं बरं? या संतांनी तत्कालीन सतराशे साठ शेंदरी दैवतासारखीच विठोबाची पूजा केली असती आणि जत्रायात्रा करण्यात धन्यता मानली असती, तर ब्रह्मवृंदानं या संतांना छळलं नसतं. उलट डोक्यावर उचलून घेतलं असतं. पण असं न करता हे संतमंडळ साध्याभोळ्या अज्ञानी जनांना एकत्र करत होते. त्यांना देवाचं खरं स्वरूप सांगत होते. कर्मकांड नाकारत होते. धार्मिक विधी आणि ते करणारे भटजी-पुरोहित यांनाही नाकारत होते. शुद्ध आचरणाला महत्त्व देत होते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वतःचं वेगळं तत्त्वज्ञान ओवी-अभंगाच्या माध्यमातून लिहून त्याचा प्रचार, प्रसार करत होते. ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥’ अशी प्रतिज्ञा करत होते. म्हणजेच महाराष्ट्रभूमीत केवळ भक्तीची नव्हे, तर स्वतंत्र प्रज्ञा आणि अभिव्यक्तीची चळवळ साकारत होती. या चळवळीला साकारणारे मुख्य प्रवर्तक संतमंडळ होते. त्यामुळंच त्यांच्यावर अभिजनांचा राग होता.

पंढरपूरपासून सुमारे ३५ किमी अंतरावर असणार्‍या अरणगावचे सावता माळी हे या संतमंडळातले वयोज्येष्ठ संत. त्यांचा जन्म १२५०चा. निवृत्ती-नामदेव यांच्यापेक्षा सुमारे वीस वर्षांनी वडील. जातीनं माळी. व्यवसायानं बागायत शेतकरी. घरात पंढरीच्या वारीची परंपरा असणारे. शेतीच्या कामातून सवड काढून ते पंढरीस जात येत असावेत. तिथंच त्यांचा संत नामदेवांशी परिचय झाला. ते नामदेवांच्या भजन-कीर्तनात रंगून गेले आणि पुढं स्वतःच अभंग रचू लागले. गाऊ लागले.

वारकरी संप्रदायाच्या इतिहासात संत ज्ञानदेवांच्या आग्रहानं नामदेवांसोबत झालेल्या पहिल्या तीर्थयात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या तीर्थयात्रेपूर्वी ज्ञानेश्वरादी भावंडं नाथपंथी आहेत, तर नामदेव योगमार्ग नाकारणारे भक्तिमार्गी आहेत. खरंतर ज्ञानदेवांना नामदेवांशी एकांतात दीर्घ चर्चा करायची असते. त्यांचं मतपरिवर्तन करून त्यांना योगमार्गी करायचं असतं; परंतु तसं घडत नाही. योगमार्ग हा खडतर आणि एकावेळी एकाच व्यक्तीला अवलंबता येतो, तर भक्तिमार्ग सामूहिक असून सहज सोपा असल्यानं आचरणसुलभ असतो. समाजाला अशा भक्तिमार्गाचीच खरी गरज आहे, यावर या दोन संतांचं मतैक्य होतं. कार्याची दिशा स्पष्ट होते. या पहिल्या तीर्थयात्रेनंतरच्या उद्यापनात नरहरी सोनार, विसोबा खेचर, परसा भागवत, चोखामेळा, बंका, जाल्हण यांच्यासोबतच सावता माळी उपस्थित होते, अशी नोंद नामदेवांनी आपल्या अभंगात केलीय.

शेतीमध्ये बारकाईनं लक्ष देऊन तणमाजोरी होऊ न देता कांदा, मुळा, भाजी, लसूण, मिरची, कोथंबीर पिकवणारे सावतोबा नामदेवांच्या संतमंडळात दाखल झाले. तिथं सावतोबांच्या अनुभवाला नामदेवांची आर्त भक्ती आणि ज्ञानदेवांचं तत्त्वज्ञान यांचं कोंदण लाभलं. विठ्ठल मायबाप आहे. त्याच्याशी थेट नातं जोडता येतं, हे नामदेवांनी आपल्या रसाळ वाणीनं पटवून दिलं. तर हे विश्व म्हणजे त्या चिदाकार रूपाचा अविष्कार आहे, हे ज्ञानदेवांनी मांडलं. त्यामुळं भक्तीचा मळा माणसांपासून रानापर्यंत सर्वत्र फुलत गेला. म्हणूनच सावतोबांचा गौरव करताना नामदेव म्हणत होते,

सांवता सागर प्रेमाचा आगर ।
घेतला अवतार माळ्या घरी ॥

आपण कोण आहोत? समाजव्यवस्थेत आपलं स्थान कोणतं? विहित कर्म कोणतं? आपले अधिकार आणि कर्तव्य कोणती? याचं नेमकं भान असल्याशिवाय कोणत्याच प्रज्ञावंताला कार्यप्रवण होता येत नाही. वारकरी संत हे स्वतःपुरती भक्ती करणारे नव्हते, तर ‘बुडती हे जन, न देखवे डोळा’ या भावनेतून समाजाला नवी दिशा देणारे होते. म्हणूनच त्यांनी आपला भक्तीचा अनुभव शब्दरूप केला. हा अलौकिक आनंद घेण्याचं आवाहन सर्व स्तरातल्या स्त्री-पुरुषांना केलं.

संत सावतोबांचे ३७ अभंग डॉ. हे. वि. इनामदार यांनी संकलित केले आहेत. त्यामधल्या दोन अभंगांमधून सावतोबांनी स्वतः हीन याती असल्याचा उल्लेख केला आहे. एका अभंगात ते पांडुरंगाला म्हणतात, ‘माझी जात हीन हलकी आहे आणि तुम्ही उदार आहात. मला ऐहिक उपभोग किंवा मुक्ती नको. माझी एकच विनंती आहे की आपल्यातील द्वैत संपू दे.’ देवाशी एकरूप होण्याची तीव्र इच्छा इथं व्यक्त होते. त्यामध्ये हीन याती असणं आड येणार नाही, असा विश्वासही दिसतो.

दुसर्‍या अभंगात ते म्हणतात, ‘भली केली हीन याती, नाही वाढली महंती’. त्यांच्या बोलण्याचा भावार्थ असा की, ‘बरे झाले मला हीन याती केलं. नाही तर विनाकारण मोठेपणा अंगी भिनला असता. ब्राह्मण झालो असतो, तर अंगी तसे गुण आणि त्यानुसार कर्म लागले असते. स्नान-संध्या याती कूळ यामधे गुरफटलोअसतो. हे श्रीपती, मी हीन याती आहे. माझ्यावर कृपा कर.’

समाजव्यवस्थेत आपलं स्थान खालचं ठरवण्यात आलं आहे, असा याती हीनत्वाचा स्पष्ट उल्लेख सावतोबा करतात; परंतु हीन याती असल्याबाबतचं दुःख, खंत यांचा लवलेशही त्यांच्याजवळ नाही. हीनत्वामुळं येणारा न्यूनगंड, आत्मविश्वासाचा अभाव तिथं आढळत नाही. उलट बागायती शेती करणं हे माळी समाजाचं काम ते मनःपूर्वक करतात. इतकंच नव्हे तर शेतमळ्यात फुलणार्‍या भाजीपाल्यात ते परमेश्वराचं दर्शन घेतात. त्यांच्या लेखी मोट, नाडा, विहीर, दोरी यांना पंढरपूर या तीर्थक्षेत्राचं मोल आहे आणि त्यांचं मळा करणं, हे विठ्ठलपायी गळा गोवण्यासारखंच आहे.

इथं हे स्पष्टपणे दिसतं की संसाराची कर्तव्य जबाबदारीनं पूर्ण करणं, याला सावतोबा महत्त्व देतात. सगळ्या वारकरी संतांनी प्रपंच नेटका केला, मग परमार्थ साधण्याचा प्रयत्न केला. संन्यास घेणं किंवा घरदार सोडून रानावनात भटकणं त्यांना मान्य नाही. हे विश्व हा परमेश्वराचा विलास आहे, या चराचरात परमेश्वर भरला आहे, या भावनेनं संत वागतात. त्यामुळंच त्यांच्याबाबत काही दंतकथाही प्रचलित होतात. ‘जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत’, म्हणणारे ज्ञानदेव, ‘देव खाते, देव पिते, देवावरी मी निजते’, असं म्हणणारी जनाबाई आणि ‘कांदा, मुळा, भाजी,अवघी विठाबाई माझी’म्हणणारे सावतोबा हे एकाच विचार परंपरेतले असतात. इथं अजून एक विचार व्यक्त केला आहे, तो असा की, मी हीन याती असलो तरी देवाशी नातं जोडता येतं. उलट ब्राह्मण हे मोठेपणाच्या, महंतेच्या कल्पनेत अडकून पडलेले असतात. ही अहंताच ईश्वरप्राप्तीच्या मार्गात आड येते.

आपण काय स्वीकारतो आणि काय नाकारतो, यावरून आपली भूमिका ठरत असते. संत सावतोबांनी पूर्व परंपरेतल्या अनेक गोष्टी नाकारल्या. विशेषतः सनातनी वैदिक परंपरेनं अवडंबर माजवलं ते वेद, यज्ञ, तसंच योगमार्ग, व्रत-उद्यापन आणि दान दक्षिणेचा मार्गही नाकारला. ‘नेणो योग याग तपे, वाचे जपे विठ्ठल ॥’ अशा स्पष्ट शब्दात काय नाकारतो व काय स्वीकारतो ते स्पष्ट केले. ‘तीर्थ व्रत दान अष्टांग । यांचा पांग आम्हां नको ॥’,असं आग्रहपूर्वक सांगितलं. इतकंच नव्हे तर ‘साधनांची आटाआटी । कासया पाठी लाविता ॥’,असा रोखठोक प्रश्नही सनातनी परंपरेला विचारला. ‘एक तुझे (विठ्ठलाचे) नामचि पुरें । हेचि धुरे साधन॥’,असं आत्मविश्वासपूर्वक सांगितलं. ‘वेद श्रुति शास्त्रें पुराणें श्रमली । परी तया विठ्ठली गम्य नाही॥’,असा परंपरेचा दंभस्फोट केला.

माळी या शूद्र वर्णातल्या जातीत जन्मलेले सावतोबा वैदिक ब्राह्मणांची शेकडो वर्षांची परंपरा नाकारतात. हे एक अभूतपूर्व धाडसच म्हणावं लागेल. एका यत्किंचित माणसानं ‘वेदशास्त्रपुराणं यांना खरा देव कळला नाही’, असं म्हणावं ही केवढी बंडखोरी! योग, यज्ञ, धर्म, तीर्थ, दान, अष्टांग, समाधी या सगळ्याला कुचकामी ठरवावं, नाकारावं. ‘ही साधनांची आटाआटी कशासाठी पाठी लावता’, असं म्हणावं म्हणजे केवढा विद्रोह! संत सावतोबांनी तो केला. कारण विठ्ठल नामाचंसोपं वर्म त्यांना सापडलं होतं.

सावतोबांनी पूर्वपरंपरा नाकारली, कारण ती व्यर्थ होती. कष्टप्रद होती. संसार प्रपंच नाकारणारी होती. तिथं फसवणूक होती आणि भटजी पुरोहितांकडून शोषणही होते. वर्ण जातीचा खोटा अहंकार होता. अनेक नियम आणि मर्यादा होत्या. त्यांनी हे परंपरा नाकारण्याचं धाडस दाखवलं, कारण त्यांच्या सोबत इतरही संत होते. त्यांच्या मते संत हेच खरे भक्त होते. परिपूर्ण भक्त होते. म्हणूनच ‘पूर्ण भक्त आम्हां भक्ती दाविती, घडावी संगती तयाशीच ॥’ अशी त्यांची मागणी होती आणि एकदा का ही संतसंगती घडली की ‘देव तोचि जाणा, असे मग’ असा विश्वास, अशी अनुभूती होत होती. ज्या काळात ब्राह्मण हे भूदेव म्हणून प्रतिष्ठित होते, त्याकाळात सावतोबा संतांना साक्षात देव म्हणतात. सनातनी परंपरा ज्यांचा छळ मांडते, त्यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ स्थान देतात. यातच वारकरी परंपरेचं वेगळेपण दडलेलं आहे. म्हणूनच सावतोबांची विठ्ठलाला विनवणी होती,

दुजे आणिक नको काही । ठाव द्यावा संतापायी ॥

इथं एक गोष्ट स्पष्ट होते की सावतोबा वयानं ज्येष्ठ आहेत; परंतु समकालीन संतांची संगत त्यांना महत्त्वाची वाटते. कारण हे संत ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या वृत्तीचे आहेत. नामदेव आणि ज्ञानदेव स्वतःहून फुलून येतातच; परंतु इतरांची प्रज्ञाही फुलवतात. त्यातूनच भागवत धर्माची पायाभरणी होते. ‘वंदू संत चरण रज । तेणें काज आमुचे॥’ असं सावतोबांनी म्हणण्याचं कारण हेच आहे.

संतसंगतीत भक्तिमार्गाची दिशा स्पष्ट होते. आत्मविश्वास दुणावतो. हा भक्तिमार्ग सहज सोपा आहे. सर्वांसाठी खुला आहे, याची ललकारी संत देत राहतात. ‘नलगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट, वैकुंठाची’, असं सांगतात. इतर उपासना मार्गातले कष्ट आणि संकटं इथं नाहीत. ही वाट सुगम सोपी आहे, असं हे सांगणं आहे. माझा विठ्ठल हा निराकार आणि सम्यक आहे. शिव-ब्रह्मा-विष्णू या तिन्ही देवांचं इथं महाऐक्य झालं आहे. या विठ्ठलनामाचा महिमा अगाध आहे, असं त्यांचं सांगणं आहे.

पंढरी महात्म्य सांगताना ते म्हणतात, ‘दर्शनं वादविवाद करताना दमली आहेत. त्यांना हवा असणारा ईश्वर भीमातीरी पुंडलिक पेठेत राहतो. आषाढी-कार्तिकीलाइथं मोठा बाजार भरतो. वैष्णव भक्त हे नामसंकीर्तनाची गर्जना करतात.’ म्हणून ‘जगी तारक एक नाम । उत्तम धाम पंढरी॥’ असा त्यांचा उपदेश आहे.

प्रपंची असुनी परमार्थ साधावा । वाचें आठवावा पांडुरंग ॥
उंच नीच कांही न पाहे सर्वथा । पुराणींच्या कथा पुराणींच ॥

असं सावतोबा म्हणतात. याचा अर्थ असा की प्रपंच ही परमार्थातली अडचण नाही. प्रपंच करता करता परमार्थ साधता येतो. त्यासाठी नामसंकीर्तनात मन गुंतलं गेलं पाहिजे. या भक्तिमार्गात उच्चनीचतेला थारा नाही.

आपल्या भक्तिमार्गाचं निर्विवाद श्रेष्ठत्व सावतोबांनी जाणलं होते. सनातन्यांचा विरोध असला, तरी न घाबरता या भक्तिमार्गाचा प्रसार करण्याचं त्यांनी ठरवलं. ते अभंगात रंगू लागले. कीर्तनात नाचू गाऊ लागले. उपदेश करू लागले.

नामाचिया बळें न भिऊ सर्वथा ।
कळीकाळाच्या माथा सोटे मारूं ॥
वैकुंठींचा देव आणूं या कीर्तनीं ।
विठ्ठल गाऊनी नाचो रंगी ॥

अर्थातच हा मार्ग सर्वांसाठी खुला आणि सोपा असला तरी भक्तीमध्ये‘सदा जडो नामी चित्त’ हे गरजेचं होतं. दया, क्षमा या उचित गोष्टी आहेत, असं सावतोबांनी मानलं होतं. तसंच शांतीरूप शेवंती आणि प्रेमरूप जाई-जुई फुलवण्याची गरज सांगितली होती. तात्पर्य, सद्गुणांशिवाय भक्ती शक्य नाही, असा सावतोबांचा संदेश होता.

एकंदर, पंढरपूरपासून ३५ किमी असलेल्या अरण गावात राहणार्‍या सावतोबांनी स्वतःची बागायती शेती निष्ठेनं केली; परंतु त्यासोबतच भक्तीचा मळाही फुलविला.

नाम विक्रय न करावा । दान प्रतिग्रहो न घ्यावा ॥
कष्टे करुनी मेळवावा। तोचि ग्रास आपुला ॥

असं म्हणणार्‍या संत नामदेवांची सोबत सावतोबांचा उत्साह वाढवत होती. कदाचित ‘कायक वे कैलासू’ या बसवेश्वरांच्या वचनाचाही प्रभाव असावा. कारण माळी समाज हा मोठ्या प्रमाणात लिंगायत संप्रदाय अनुसरणारा होता. ते पंढरपुरात येत जात राहिले; परंतु मंदिरात गुंतले नाहीत. कारण त्यांच्या दृष्टीनं विठोबा निराकार आणि सम्यक आहे. तो शेतमळ्यात आणि अवघ्या चराचरात व्यापून उरला आहे. हा भक्तीचा सुखसोहळा साजरा करताना योगयागविधी नाकारण्याचा बंडखोरपणा ते करत होते. ४५ वर्षांच्या अल्प आयुष्यात प्रपंच आणि परमार्थ यांचा समतोल साधणारा असा दुसरा संत झालेला नाही. श्रमाचं महत्त्व अबाधित राखून भक्तीची नवी पायवाट लोकांसमोर ठेवणं, याचा आदर्श त्यांनी घालून दिला. त्यांची भक्ती मंदिराभोवती, मूर्ती भोवती घुटमळत नाही, तर संसाराला आणि स्वतःच्या कामधंद्याला मंदिराचं पावित्र्य प्राप्त करून देते. हे सावतोबांचं मराठी माणसाला अनमोल देणं आहे.

0 Shares
वारकरी कर्म योगाचा पहिला आदर्श नामपाठ प्रेमे सावता का गाये?