वारकरी कर्म योगाचा पहिला आदर्श

अभय जगताप

कर्मत्याग, कर्म फळाचा त्याग यापेक्षा कर्म हीच भक्ती आहे असं म्हणत वारकरी संतांनी कर्म सर्वश्रेष्ठ ठरवलं. वारकरी कर्म योगाचा पहिला आदर्श म्हणून सावतोबांचं नाव घेता येईल.

भारतीय आध्यात्मिक परंपरेत कर्म हा शब्द वेगवेगळ्या अर्थानं येतो. कर्मकांड, कर्मत्याग आणि कर्मयोग. कर्मकांड म्हणजे एखाद्या विशिष्ट हेतूनं एखादी क्रिया करणं. अशा क्रियेमध्ये भाव, भावनेला महत्त्व नसतं. बटन दाबल्यावर लाइट अथवा हवं ते यंत्र सुरू होतं. तसा कर्मकांड हा असा प्रकार आहे. यज्ञ किंवा इतर व्रतांमधे क्रिया तंतोतंत होण्यास महत्त्व असतं. तो कर्मकांडांचा भाग असतो.

याशिवाय कर्मत्याग हाही अध्यात्मामधे चर्चिला जाणारा एक विषय. काही पंथांनी कर्मत्यागाचा पुरस्कार करून त्याला गौरवलंय. कर्मत्यागाच्या गौरवाची परिणीती काही ठिकाणी संन्यासाच्या गौरवामध्ये झाली आहे. भगवद्गीतेमध्येसुद्धा कर्मत्यागाच्या मार्गाबद्दल सांगितलंय. पण पुढं कर्मत्यागापेक्षा कर्मफळाचा त्याग हा अधिक श्रेष्ठ मानलाय. अर्थात फळाचा त्याग करण्यासाठी आधी कर्म केलं पाहिजे, हे ओघानं आलंच. गीतेमधलं हे तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपानं मराठीमध्ये आलं आहे. ज्ञानेश्वरीनंसुद्धा कर्मत्यागापेक्षा कर्म करून केलेल्या फळत्यागाचा गौरव केलाय.

कर्मत्याग आणि कर्म करून कर्माच्या फळाचा त्याग यांची तुलना करताना दिसतं की कर्मत्याग ही खूप अवघड किंवा अशक्य अशीच गोष्ट आहे. व्यवहारात आणि प्रत्यक्षात तसं आचरण होणं शक्य नाही, असं प्रतिपादन माऊलींनी ज्ञानेश्वरीमधे केलंय. यासंदर्भात कीर्तनामध्ये अनेकदा संन्याशाच्या लंगोटीची गोष्ट सांगतात. संन्याशाची लंगोटी उंदराने कुरतडली म्हणून तो मांजर पाळतो. मग तिच्यासाठी दूध, दुधासाठी गाय, गायीची देखभाल, देखभालीसाठी बायको, बायकोसाठी लग्न अशी साखळी आलीच.

दुस-या अध्यायामध्ये कर्मत्यागाविषयी सांगितल्यावर अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतो की, कर्मत्याग करणं उचित आहे, तर मग मी हे युद्धाचं कर्म का करू? तेव्हा माऊलींनी भगवंताच्या मुखातून सांगितलेलं उत्तर आहे, आत्म्याचा शरीराशी संबंध आहे, तोपर्यंत कानानं ऐकणं, नाकानं वास घेणं, डोळ्यांनी बघणं या क्रिया चालू राहणार. तहानभूक लागत राहणार. बुद्धी विचार करत राहणार, श्वास हे सुद्धा एक कर्मच आहे आणि ते चालू राहणार. त्यामुळं –

म्हणऊनि संगु जव प्रकृतीचा ।
तंव त्यागु न घडे कर्माचा ।
ऐसियाही करू म्हणती तयांचा ।
आग्रहोची उरे ॥

शरीराचा संबंध आहे, तोपर्यंत कर्माचा त्याग करणं शक्य नाही, असं असून सुद्धा असा आग्रह कोणी धरला तर तो फक्त हट्ट असेल. प्रत्यक्षात तसं होणं शक्य नाही. जे लोक आपलं कर्म टाकून, कर्मेंद्रिय प्रवृत्तीनं (वर सांगितलेली इंद्रियांची कर्म करण्याची प्रवृत्ती लक्षात न घेता) कर्मातीत होऊ पाहतात, त्यांना कर्मत्याग घडतच नाही.

जे उचित कर्म सांडिती ।
मग नैष्कर्म्य होऊ पाहती ।
परी कर्मेंद्रियप्रवृत्ती निरोधुनी ॥
तया कर्मत्यागु न घडे ।

कर्मत्याग शक्य नाही, हे माऊलींनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळं उचित असं कर्म, फळाची अपेक्षा न ठेवता हेतूरहित करावं, असं माऊली पुढं सांगतात. भगवंताच्या उपासनेसाठी व्रत करण्याची, शरीराला पीडा होईल, असे नियम करण्याची, तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता नाही. योग वगैरे साधने करण्याची आवश्यकता नाही. मंत्र, यंत्र, विविध देव-देवतांची उपासना हेही करण्याची आवश्यकता नाही. स्वधर्मरूपी यज्ञ करणं पुरेसं आहे. या स्वधर्मरूपी यज्ञानंच देवाची उपासना अनायासे घडते.

तुम्ही व्रते नियमु न करावे । शरीरातें न पीडावे ।
दुरी केही न वचावे । तीर्थासी गा ॥
योगादिक साधने । साकांक्ष आराधने ।
मंत्र यंत्र विधाने । झणी करावे ॥
देवतांतरा न भजावे । हे सर्वथा काही न करावे ।
तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे । अनायासे ॥

कर्माचा मार्ग कर्मत्याग शक्य नसलेल्या सामान्यांसाठीच आहे. संत महात्म्यांना त्याची आवश्यकता नाही, असा एखाद्याचा समज होऊ शकेल. त्यांच्याकडे कर्मत्यागाचं सामर्थ्य असतं अथवा कर्मत्यागाचं सामर्थ्य असणं महत्त्वाचं आहे, असं वाटू शकतं. याचाही खुलासा माऊलींनी पुढं केला आहे. संतांसाठी तर कर्म आचरणं अधिक आवश्यक आहे. संत कर्म आचरतात, ते इतरांसाठी आदर्शवत होतं. त्यामुळं त्यांनी आदर्श कर्म करून दाखवावं. हाच भाव ‘संत तुकोबांनी अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी’ या अभंगामध्ये व्यक्त केलाय.

कर्म करून त्या फळाचा त्याग केल्यास हा मार्ग, ज्ञान आणि ध्यान या मार्गापेक्षा श्रेष्ठ मार्ग आहे, असं प्रतिपादन बाराव्या अध्यायातसुद्धा आलं आहे. कर्मयोगाचं सार म्हणता येईल, अशी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातली ओवी प्रसिद्धच आहे. आपल्या कर्मरूपी फुलांनी केलेल्या पूजेनं सर्वात्मक ईश्वर प्रसन्न होतो. इथं पूजा व्यापक अर्थानं आहे आणि ईश्वरही सर्वात्मक आहे.

तया सर्वात्मका ईश्वरा ।
स्वकर्मकुसुमांची वीरा ।
पूजा केली होय अपारा ।
तोषालागीं ॥

एकदा कर्म हे भगवंताच्या उपासनेचं साधन ठरलं की ते स्वच्छ, शुद्ध, पवित्र असलं पाहिजे, हे ओघानं आलंच. त्यामुळं सर्व कर्म, सर्व व्यवहार चोख ठेवणं वारकरी असण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. चोख कर्म कसं असावं, याबाबत संत एकनाथांच्या चरित्रातील एक कथा महत्त्वाची आहे. नाथ किशोरावस्थेत असताना काही काळ देवगिरी किल्ल्यावर त्यांचे गुरू जनार्दन स्वामी यांच्याकडे राहिले होते. या काळात त्यांच्याकडे हिशेबाची जबाबदारी होती. हिशेब करताना एक पैचा हिशेब लागत नव्हता. तेव्हा हिशेबात चूक शोधत एकनाथ रात्रभर हिशेब तपासत जागे राहिले. शेवटी त्यांना ती चूक सापडलीच.

कर्म आणि स्वधर्म हे शब्द अनेकदा समानार्थी म्हणून वापरले आहेत. धर्म या शब्दाचा अर्थ इथं कर्तव्य असा आहे. पुत्र धर्म, राजधर्म त्याप्रमाणं स्वधर्म. स्वधर्माचरणाचं महत्त्व वाचताना, आपापल्या कर्मफळाची अपेक्षा न करता करण्यामधे वर्णव्यवस्थेचं अथवा जातिव्यवस्थेचं समर्थन येतं की, काय अशीही शंका अनेकदा उपस्थित केली जाते. ज्ञानेश्वरीमध्ये आणि इतर संत साहित्यामधे क्वचित काही ठिकाणी उदाहरणं देताना वर्णव्यवस्थेनं आलेलं कर्म आचरण्यासंदर्भातले उल्लेख आहेत. या उल्लेखांशिवाय स्वतंत्र विचार केला तरी त्या काळामध्ये किंबहुना शे-दीडशे वर्षांपूर्वीपर्यंत लोक आपापल्या जातीनुसार वाट्याला आलेलं कर्म करत होते.

एकोणिसाव्या शतकामधे इंग्रजी राज्य आल्यावर आपल्या इथं बदल होऊ लागले. त्यामुळं जातिव्यवस्था बदलण्यास हातभार लागला. जातिव्यवस्थेमध्ये ठरावीक जातीत ठरावीकच काम करावं लागतं. हे काम अर्थार्जनाचं साधन होतं. एखाद्या जातीनं आपले सोडून दुसरं काम करायचं ठरवल्यास ज्या जातीचं काम करायचं त्या जातीच्या लोकांना हे रुचणं अवघड होतं. आपल्या हक्काच्या अर्थार्जनाच्या साधनांमध्ये अधिक स्पर्धक निर्माण होणं अनेकांना आवडत नाही. इंग्रजी राज्यव्यवस्थेनं अशा नवीन अर्थार्जनाच्या अनेक शक्यता निर्माण केल्या. त्यामुळं आपलं परंपरागत काम सोडून नवीन काम करायचं ठरवल्यास लोकांपुढं नवे पर्याय निर्माण झाले. या सर्व गोष्टी इंग्रज काळानंतर शक्य झाल्या. त्यापूर्वी असा बदल होणं शक्य नव्हतं. आणि तो बदल झालाही नाही.

वारकरी संतांची भूमिका बोटचेपी अथवा फक्त अध्यात्मात समता आणण्याची होती, अशी टीका अनेकदा केली जाते. काही सनातनी मंडळीसुद्धा असं प्रतिपादन करत असतात. पण तत्कालीन परिस्थिती लक्षात घेतली म्हणजे हे आरोप निराधार आहेत, हे लक्षात येऊ शकेल. इंग्रजी राज्य येण्यापूर्वी इथली बहुतेक सर्व राज्यव्यवस्था धर्मव्यवस्थेला अनुकूल आणि धर्मव्यवस्थेच्या पाठीराख्या होत्या. ज्ञानदेवांच्या वडिलांनी त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनंच गृहस्थाश्रमात परत प्रवेश केला, तर त्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. त्यांच्या मुलांना – ज्ञानदेवादी भावंडांनासुद्धा वाळीत टाकण्यात आलं. संत एकनाथांचा काळ हा परकीय सत्तेचा काळ होता. अशा काळातसुद्धा नाथांची तक्रार काशीच्या धर्मपीठापुढं झाली. त्यासाठी नाथांना तिथं उपस्थित राहून आपली बाजू मांडावी लागली. तुकोबांनी आपल्या अभंगातून सांगितलेल्या विचारांमध्ये वेदांत तत्त्वज्ञान असून, ते मराठीत सांगितल्यानं वेदांताचा अपमान मानून त्यांच्यावरसुद्धा धर्मसभेपुढं जाण्याचा प्रसंग आला होता. या ज्ञानदेव ते तुकाराम काळातल्या घटना लक्षात घेतल्या म्हणजे धर्मसंस्थेचा पगडा कसा होता आणि जातिव्यवस्था मोडणं किती अवघड होतं, याची कल्पना येईल.

आज फुले, शाहू, आंबेडकरांसारखे महापुरुष होऊन गेल्यावरसुद्धा, इंग्रजी राज्य आणि नंतर भारतीयांचं स्वतःची लोकशाही व्यवस्था असलेलं सरकार येऊन ६० वर्ष झाल्यावरसुद्धा जातिव्यवस्था पूर्णपणे संपुष्टात आली आहे, असं म्हणता येत नाही. असा बदल करू पाहणा-या महानुभाव संप्रदायावर अनेक वर्ष अज्ञातवासात जाण्याची वेळ आली होती, तर जातिव्यवस्थेपासून फारकत घेऊन स्वतः नवीन जातिभेदरहित समाज निर्माण करू पाहणा-या लिंगायतांना इतर समाजानं वाळीत टाकल्यानं त्यांच्या अंतर्गत सर्व व्यवसाय करण्याची गरज निर्माण झाली. त्यातून लिंगायतांमध्येसुद्धा जाती निर्माण झाल्या. इतकंच काय; पण इस्लाम आणि ख्रिश्चन यांसारख्या परदेशातून इथं येऊन रुजलेल्या धर्मावरसुद्धा इथल्या समाजव्यवस्थेचा परिणाम होऊन त्यांच्यातही जाती निर्माण झाल्या. अशा काळात अनेकदा कर्म, स्वधर्म हा जातिव्यवस्थेशी संबंधित असणं अन्यायी असले तरी त्याकाळी याला पर्याय नव्हता. जातिव्यवस्थेत कामांची अदलाबदल शक्य नव्हती, तेव्हा सर्वच कामांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम या कर्मप्रतिष्ठेनं केलं आहे.

आध्यात्मिक प्रगतीसाठी, भक्तीसाठी कर्म सोडावं लागत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा तर ठळकपणे मांडला आहेच. याशिवाय कर्म सोडावं लागत नाही. ते केवळ अटळ आहे म्हणून, टाळता येत नाही म्हणूनच करायचं, असा नकारात्मक भाव नाही. तर कर्म हीच भक्ती होऊ शकते. ही पूजा देवाला अधिक प्रिय आहे, हेही सांगितलं आहे.

आता हे कर्माचं महत्त्व लक्षात घेऊन वारक-यांची उपासना पद्धत विकसित झाली आहे. वारक-यांचं मुख्य उपासना साधन म्हणजे नामस्मरण. कीर्तन, प्रवचन करणं अथवा श्रवण, टाळमृदुंगासह केलेलं भजन हे रोज घडलंच पाहिजे, असं बंधन नाही. मात्र हरिपाठ हा वारक-यांनी रोज केला पाहिजे, असं बंधन आहे. हरिपाठाचं बंधन सांगताना काहींनी याला संध्येची उपमा दिली आहे. ब्राह्मणाला संध्या आवश्यक त्याप्रमाणं वारक-यास हरिपाठ आवश्यक आहे. हरिपाठामधे नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं आहे. ‘हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी’, असं हरिपाठाचं ध्रुवपदच आहे. नामस्मरण साधनेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणतंही साधन लागत नाही. त्यासाठी आपल्या नित्यकर्माची अडचण होत नाही. आपली नित्य कर्म करता करताच आपण नामस्मरण करू शकतो. त्यामुळं नामस्मरण करण्यासाठी कर्म त्यागण्याची आवश्यकता राहत नाही.

ज्ञानदेवादी भावंडांचा अपवाद वगळता सर्व वारकरी संतांची चरित्रं पाहिल्यास कोणीही आपल्या व्यवसायाचा त्याग केला नाही. ज्ञानदेवादी भावंडांवरसुद्धा हा प्रसंग समाजानं त्यांना वाळीत टाकल्यामुळं आला. उलट ते काम करताना केलेल्या नामस्मरणामुळं त्यांची कामंच भगवद्प्रसाद स्वरूप ठरली, अशा आख्यायिका सर्व संतांनी अन्य संतांच्या चरित्र वर्णनाच्या निमित्तानं सांगितल्या आहेत.

संत जनाबाई या नामदेवांच्या घरच्या दासी होत्या. संत नामदेवांच्या घरच्यांनीच त्यांना आश्रय दिला होता. झाडलोट करणं, पाणी भरणं, दळण दळणं, धुणं धुणं, शेणी वेचणं वगैरे कामं त्यांना करावी लागत असत. या कामांचा उल्लेख अभंगामध्ये आला आहे. नामदेव परिवारासारख्या सहृदय कुटुंबात काम केल्यामुळं जनाबाईंचा काही त्रास इतरांच्या तुलनेत नक्कीच कमी झाला असणार. त्यांच्या चिंतनात, भक्तीत अडसर आला नाही. नामदेवांसारख्या संतांच्या सहवासामुळं त्या स्वतः संतपदाला पोचल्या. संतपदी पोचल्या म्हणून त्यांचं काम सुटलं नाही अथवा त्यांनी सोडलं नाही. या कामाचाच एक भाग म्हणजे शेणी वेचून आणणं. जनाबाई शेणी वेचायला जात तेव्हा त्या शेणीमधूनसुद्धा ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज निघत असे, अशी आख्यायिका सांगितली जाते. यातील चमत्काराच्या भागानं बिचकून जाण्याऐवजी संतपदी पोचलेली व्यक्तीसुद्धा आपलं नित्यकर्म करत राहते, हा आजच्या काळासाठी तर मोठा चमत्कार मानला पाहिजे.

संतसाहित्य आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक अभय टिळक म्हणतात त्याप्रमाणं देव धाव घेतो, भक्ताच्या घरी येतो आणि त्याच्यासोबत कामाला भिडतो ते भक्ताला प्रपंचातून सोडवण्यासाठी नव्हे, ही बाब या ठिकाणी मुद्दाम अधोरेखित करून ठेवली पाहिजे. मुळात, ऐहिक प्रपंच हा ‘भ्रामक’ अथवा ‘लटका’ नसल्यामुळं त्यातून सुटण्याची बात संतविचारात नाही. त्यामुळं वाट्याला आलेला प्रपंच त्यातील सुख-दु:खांसकट प्रत्येकाला करावाच लागतो. त्यामुळं देवाची आराधना केल्यानंतर, संतांच्या शिकवणुकीनुसार, ‘तो धावून येतो ते त्याचा धावा करणा-या भक्तांची सांसारिक कामांपासून मुक्तता करण्यासाठी नव्हे, हा पहिला धडा इथं शिकायचा. देव धावतो आणि भक्ताबरोबर कामाला भिडतो, तो त्याच्या उपासकाला त्या कामांचा शीण वाटू नये म्हणून. इथं मुक्ती आहे; पण ती कर्मापासून नव्हे, तर कर्माच्या शिणवट्यापासून.’

संत सावता महाराजांचं आयुष्य तर ‘कर्मे ईशु भजावा’ याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. सावतोबा माळी होते. शेती हेच त्यांचं कर्म. आपल्या या शेतीकर्माचं वर्णन त्यांनी अभंगातून केलं आहे. शेतात राबून मेहनत करून आलेलं पीक त्यांना विठ्ठल दर्शनाचा आनंद देत होतं. ‘कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी’ हा त्यांचा अभंग प्रसिद्धच आहे. सावतोबांनी आपल्या मळ्यातच पांडुरंग पाहिला. त्यामुळं ते कधीच पंढरपूरला गेले नाहीत, असंही सांगितलं जातं. सावतोबांच्या मळ्यात स्वतःची विहीर होती. सावतोबांचं समाधी मंदिरही या विहिरी शेजारीच आहे. त्यामुळं तिथं उन्हाळी पिकंसुद्धा असतील. एका आख्यायिकेनुसार देवच त्यांना भेटायला त्यांच्या मळ्यात आले. नेमाने वारी न करणारे सावतोबा विठ्ठल भक्त कसे?

दुस-या मतानुसार शेतीच्या कामातून थोडाही वेळ मिळतच नाही, असं होत नाही. शिवाय सावतोबांचं अरण हे गाव पंढरपूरपासून साधारण ४० किमी अंतरावर आहे. त्यामुळं सावतोबा अजिबातच पंढरपूरला गेले नसतील, असं संभवत नाही; पण नेमानं वारी घडली नाही, नेमका एकादशीचाच दिवस त्यांना साधला असेल असं नाही, हे मात्र निश्चित असावं. सावतोबांविषयीच्या आख्यायिकेला तर याचा संदर्भ आहेच शिवाय आजही आषाढी वारीला सावतोबांची पालखी येत नाही, तर पांडुरंगाचाच पालखी सोहळा सावतोबांच्या पुण्यतिथीला अरण इथं येतो. वर ज्या ओवीचा उल्लेख आला आहे, त्या ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात आलेल्या ओवीमध्ये स्वकर्मास फुलांची उपमा देताना ज्ञानेश्वरांसमोर सावता महाराजांसारख्या कर्मयोग्याचं आणि त्यांच्या फुललेल्या मळ्याचं उदाहरण असावं, असं मत डॉ. सदानंद मोरे यांनी मांडलंय.

वारी करणं हा वारकरी संप्रदायाचा एक मुख्य आचार आहे. वारकरी या शब्दाचा सरळ सरळ अर्थ ‘वारी करणारा’ असा आहे. अनेक संतांनी, काही प्रसंगी कष्टानं वारी पार पाडली, याच्याही कथा कीर्तनामधून सांगितल्या जातात. यासोबतच सावता महाराजांची ही कथा सुद्धा महत्त्वाची आहे. आजच्या काळात तर खूपच.

वै. मामासाहेब दांडेकर यांच्यासंदर्भातल्या दोन आठवणी यासंदर्भात महत्त्वाच्या आहेत. मामासाहेब स. प. महाविद्यालयात प्राध्यापक आणि काही काळ प्राचार्यसुद्धा होते. अशावेळेस वारीवेळी पूर्णवेळ रजा शक्य नव्हती, तेव्हा मामासाहेब फलटणपासून पालखी सोहळ्यात सहभागी होत. म्हणजेच आपलं कर्म सांभाळून वारी करत. एकवर्ष व्यवस्थापनानं मामासाहेबांची अडवणूक करण्यासाठी त्यांना अजिबातच रजा दिली नाही. तेव्हा त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली. अर्थात त्यांना रजा मिळाली आणि वारी चुकली नाही.

ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेण्यापूर्वी तीर्थयात्रा केली आणि नामदेवरायांनासुद्धा आग्रहानं स्वतःबरोबर घेऊन गेले. याकाळात महिन्याची वारी घडणं शक्य नव्हतंच. पण एखादी आषाढी, कार्तिकी एकादशीसुद्धा कदाचित तीर्थयात्रेदरम्यान उत्तरेतच घडली असावी. पुढं माऊलींनी समाधी घेतल्यावर नामदेव पुन्हा उत्तरेत गेले आणि अनेक वर्ष पंजाबात राहिले. याकाळात ते प्रतिवर्षी आषाढीला पंढरपूरला येत होते का, यासंदर्भात काही तपशील उपलब्ध नाहीत. पंजाब ते पंढरपूर अंतर, तत्कालीन दळणवळणाची साधनं आणि उत्तरेत चालू असलेल्या राजकीय घडामोडी बघता दरवर्षी वारी घडली नसावी.

याशिवाय मीराबाई आणि कबीर यांनाही दूर असल्यामुळं वारी घडली नाही. मीराबाई बहुदा कधी पंढरपूरला आल्याच नाहीत. कबीर पंढरपूरला आले असावेत. कोणते संत स्वीकारायचे, या बाबतीत वारकरी संप्रदाय काटेकोर आहे. या स्वीकृत संतांचा उल्लेख ‘ज्ञानोबा ते निळोबा’ असा केला जातो. असं असताना यामध्ये संत कबीर आणि संत मीराबाई असे दोन उत्तर भारतीय वारकरी स्वीकृत संत आहेत, हे विशेष!

इथं वारी चुकते, ती कर्मरत असल्यानं. एरवी वारीमध्ये समविचारी लोकांचा सहवास मिळतो. भजनाचाही आनंद मिळतो. भजनाचा आनंद महत्त्वाचाच आहे, त्याबद्दल कुणाचं दुमत नाही; पण वारीप्रमाणं वर्षातून समविचारी लोकांनी एकत्रित येऊन काही काळ घालवणं, ही आजच्या काळातसुद्धा अनेक संघटनांची गरज आहे. ज्यांचा मुख्य विचार गाड्यातून सांगितला जातो, अशा संघटनेच्या संमेलनातसुद्धा समूह गीतांना, स्फूर्तिदायक गीतांना महत्त्व आहेच. संतसंगती, कीर्तन, नामस्मरणाचा महिमा सावतोबांच्या अभंगातसुद्धा आहेच.

प्रपंचाविषयी न्यूनगंड नसणं, परमार्थ साधण्यास प्रपंच अडचणीचा न वाटणं, नामस्मरण या एकाच साधनाच्या जोरावर हृदयामधे पांडुरंगाचा वास होण्याची किमया घडणं या सर्व गोष्टी सावता महाराजांनी एका अभंगात सांगितल्या आहेत. शेवटच्या चरणावरून हा अभंग म्हणजे सावता महाराजांनी आपल्या पत्नीस केलेला उपदेश आहे. अर्थात वारकरी कर्मयोगाचं सार सांगणारा हा अभंगरूपी उपदेश सर्वांसाठीच आहे.

प्रपंची असूनी परमार्थ साधावा। वाचें आठवावा पांडुरंग ॥
उच-नीच काही न पाहे सर्वथा। पुराणींच्या कथा पुराणीच ॥
घटका आणि पळ साधी उतावीळ्। वाउगा तो काळ जाऊ नेदी ॥
सावता म्हणे कांते, जपे नामावळी। हृदयकमळी पांडुरंग ॥

0 Shares
उजळमाथ्यानं कुणबीपण मिरवणारी भक्तिपरंपरा भक्तीच्या मळ्यात विद्रोहाचा सुखसोहळा