उजळमाथ्यानं कुणबीपण मिरवणारी भक्तिपरंपरा

श्रीकांत देशमुख

सावतोबा हे मराठी संतपरंपरेतले शेतीशी सर्वाधिक जोडलेले संत. त्यांनी ताकदीनं व्यक्त केलेलं कुणबीपणाचं वैश्विक भान हे सगळ्याच संतपरंपरेनं ताकदीनं तोललं आणि मिरवलंही. तेच तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं.

मराठी माती आणि मनाचा शोध घ्यायचा असेल तर सर्वात आधी वळावं लागतं ते संतसाहित्याकडे. वारकरी संप्रदाय हा मराठी धर्मजीवनाचाच नुसता आधार आहे, असं मानता येणार नाही, तर महाराष्ट्राच्या समाज आणि संस्कृतीचा देखील तो मूलाधार आहे. वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय यांना वगळून महाराष्ट्र धर्माचा विचार कोणालाही करता येणार नाही. ‘शिवकालीन राजकीय आंदोलनाची वैचारिक आणि भावनात्मक पार्श्वभूमी संतमंडळाच्या कार्यातून तयार झाली,’ असा निष्कर्ष न्या. ‘रानडे राइज ऑफ मराठा पॉवर’ या महत्त्वपूर्ण संशोधन ग्रंथात काढतात. या निष्कर्षाला पोषक अशी मीमांसा गं. बा. सरदार संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती’ या ग्रंथातून करताना दिसतात. ‘तुका म्हणे तोची संत । सोशी जगाचे आघात ।’ हा समंजसपणा संतपरंपरा मांडते तसंच नाठाळाच्या माथ्यावर काठी हाणण्याचं बळही ती दाखवते.

महात्मा चक्रधर, ज्ञानेश्वर आणि समकालीन सर्व संत, एकनाथ, तुकोबा ही वारकरी संत परंपरा मराठी संत मंडळाचं महाराष्ट्र संस्कृतीशी असणारं सहज-स्वाभाविक, ओलाव्यानं भरलेलं बहुस्तरीय नातं परोपरीनं दाखवते. त्याचवेळी, तुकारामानंतर बहुजन समाजातून पहिल्या प्रतीचा एकही श्रेष्ठ साहित्यिक या संप्रदायात निर्माण झाला नाही, या सरदारांनी नोंदवलेल्या मताचाही गंभीरपणे विचार करावा लागतो.

वारकरी परंपरेचं ऊर्जा आणि आस्थाकेंद्र विठ्ठल या प्रतिमानाचं सार्वकालीन आणि नित्यनूतन वाटावं असं श्रेष्ठत्व आहे, किंबहुना या थोर अशा मराठी संतपरंपरेनं विठ्ठलाला हे नित्यनूतनत्व आणि कायम समकालीनत्व मिळवून दिलंय. या परंपरेचं थोरपण हे केवळ तिच्या आध्यात्मिक अस्तित्त्वात नाही, तर मराठी मनाच्या संवेदनेचा गाभा होण्यात आहे. कुठल्याही अराजकाला थेटपणे शह देण्याचं सामर्थ्य या परंपरेनं कायम दाखवलं. यातच तिचं अजोडत्त्व आहे. भालचंद्र नेमाडे ‘पुनरूज्जीवनवादाला पराभूत करण्याचं सामर्थ्य वारकरी चळवळीत आहे,’ असं म्हणतात तेव्हा संत साहित्य आणि वर्तमान यांचा कार्यकारणभाव प्रामुख्यानं लक्षात घ्यावा लागतो.

एका विश्वव्यापी मानवतावादी जाणिवेला कवेत घेण्याचं सामर्थ्य या चळवळीत आहे. तथापि त्याचं उपाययोजन नीटपणे होत नाही, हेही मान्य करावं लागतं. मराठी संतपरंपरा, शेती, शेतकरी आणि गावगाडा ही खर्‍या अर्थानं संत साहित्याची चौकट आहे. या सगळ्यांना जोडणारे आणि तोलून धरणारं विठ्ठल हे एक सांस्कृतिक प्रतिमान आहे. मराठी संतपरंपरा म्हणत असताना जो मध्यकाळ आपल्या समोर येतो, तो ब्रिटिश सत्तेच्या आगमन आणि स्थिरीकरणापूर्वीचा होता. त्याही काळात परकीय आक्रमणे झाली ती गावगाड्याच्या स्वायत्ततेला धक्का न लावता. या काळातही मराठी मन आणि मातीचं स्वत्त्व राखण्याचं काम संतसाहित्यानं केलं, हे कोणालाही नाकारता येणार नाही.

मराठी संतांचं ‘कुणबीपण’ हे या अर्थानं विशेष महत्त्वाचं आहे. कुणबीपण ही विश्वव्यापी संवेदना आहे, असं मला वाटतं. ज्याचा संबंध थेटपणे राबण्याशी, आपण आपले आपल्या पोटापुरतं पिकवण्याशी, ऊन-वारा-पाऊस-थंडी-अग्नी-पृथ्वी अशा महाभूतांशी, वृक्षवल्ली-नदीनाले या भूतत्त्वाशी, अपार करुणा आणि मानवता या मूल्यांशी आणि एकूणच नैतिकतेशी येतो, ते खरं कुणबीपण. इथं जात, धर्म, भाषा, प्रदेश या बाबी मिथ्या आहेत. कुणबीपण ही एक वेदना आहे, त्याचबरोबर एक श्रेष्ठ दर्जाचं सर्जनदेखील. या वेदना आणि सर्जनाचा पाया हा मूलत: नवनिर्मिती आहे. जोतीराव ज्या ईश्वराला ‘निर्मिक’ ही उपाधी देतात, हे निर्मिकपण मला कुणबीपणात दिसतं, परोपरीनं जाणवतं.

या कुणबीपणाचा शोध घ्यायचा झाला तर एक प्रकारची समग्र अशी निर्मिकावस्था समोर येते. हे निर्मिकपण सगुण साकार आहेच, पण निर्गुण निराकारही आहे. द्वैत आणि अद्वैताचा संघर्ष या ठिकाणी नाही तर एका व्यापक सहजीवनाची अनुभूती या ठिकाणी आहे. कुणबीपण ही एक अवस्था आहे. पण जी कोणी निर्माण केलेली नाही तर ती, झाड उगवतं तशी निर्माण झालेली आहे. म्हणूनच जगाच्या इतिहासात जे जे नैसर्गिक आहे ते ते शोषणाच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे. कुणबीपणही त्याला अपवाद नाही.

‘तुकाराम नावाचा साधू शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाला’, असं जोतिराव म्हणतात तेव्हा तुकोबांबरोबरच संत परंपरेचं शेतकरीपण अधोरेखित होतं. जोतिरावांची ज्ञानेश्वरादी संतांबाबतची भूमिका नाराजीची असली तरी ती नीटपणानं समजून घेतली तर संतपरंपरेला आणि संत जाणिवेला त्यांनी सरसकट नकार दिलेला नाही, हेही प्रामुख्यानं दिसतं. जोतिरावांच्या ‘अखंड’ रचनेवरील शैली आणि जाणिवा या अंगानं विचार करता अभंग साहित्याचा किती खोलवर परिणाम झाला होता हेच दिसतं.

शेतीचा शोध ही मानवी इतिहासातली क्रांतिकारी घटना होती. एक प्रकारच्या गरजेतून तिचा उदय झाला असला तरी निरागसता हाही तिचा स्वभाव होता. निसर्गाचं शोषण करण्यापेक्षा निसर्गाच्या सर्जन प्रक्रियेत सहभागी होण्याचीच ही एक प्रक्रिया होती. आपल्या पोटापुरतं पिकवा, ही त्यामागची धारणा होती. या शेतीच्या उगमाकडे आपण पाहतो तेव्हा त्या आदिम काळातील हरेक माणूस, जो मातीला भिडलेला, झाडांना बिलगलेला, आभाळाशी बोलणारा, चहूदिशांनी चालणारा आपल्याला एखाद्या आद्य संतासारखा वाटू लागतो. त्याचं हे संतपण त्याच्या निसर्गतत्त्वाशी भिडलेलं आहे. त्याची कृषिनिष्ठता ही शोषणावर आधारीत नाही; पण परस्पर पोषणावर आधारीत आहे. कोणाकडले दान घेण्यावर नाही तर अधिकाधिक देण्यावर आहे. सतत देत जाणे, तेही कुठल्याही उद्गाराशिवाय यात आपले शेतकरीपण आहे, असं तो मानतो.

या अर्थानं कुणबीपण ही एक संतवृत्ती मानली तर सगळ्या संतांचा पूर्वज हा आद्य शेतकरी मानता येईल आणि संत जसा विशुद्ध विचार करतात, त्याचं प्रसरण करतात, तसाच विचार खरे शेतकरी करतात असं मानलं तर शेतकर्‍यांचा पूर्वज हा संतच आहे, असं मानता येईल. मराठी संत हे मला यासाठीच उजळमाथ्यानं कुणबीपण मिरवणारे आद्यतत्त्व वाटते. त्यांच्या शोधातून आपल्याही वाटा उजळल्यासारख्या होतात. अनेक भ्रम दूर होतात आणि विचारांना एक नवी दिशा गवसते.

‘गावगाडा’ हा जगभरातल्या व्यवस्थेचा प्राचीन, मध्ययुगीन घटक आहे. प्रदेशपरत्वे त्याचं स्वरूप वेगवेगळं होतं इतकंच; पण ही व्यवस्था एकप्रकारची स्थिर आणि गतिहीन व्यवस्था होती, हे मान्यच करावं लागतं. भारतीय समाजव्यवस्थेचा विचार करता जातिव्यवस्था आणि तिच्या आधारानं येणारी बलुतेदारी व्यवस्था ही गावगाड्याची अभिन्न लक्षणं होती. या अर्थानं भारतातल्या सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरीचं पोषण या गावगाडा नावाच्या व्यवस्थेनं केलं हे नाकारण्यात अर्थ नाही.

महाराष्ट्रातल्या भक्तिसंप्रदायातले संत याच गावगाड्यात जन्माला आले होते. वेगवेगळ्या कष्टकरी जातीजमातीत त्यांचा जन्म झाला. या जाती बलुतेदारी व्यवस्थेतल्या जाती होत्या. शेती व्यवस्था हा या बलुतेदारी व्यवस्थेचा कणा होता. शेती, शेतकरी आणि त्याभोवती असणारे अलुते-बलुते ही गावगाड्याची चौकट होती. मराठी संतदेखील याच चौकटीत जन्माला आले असले तरी या व्यवस्थेतल्या अनुदारतेचा त्यांनी कधीही पुरस्कार केला नाही. मानवनिर्मित असमानता त्यांनी कधी प्रमाण मानली नाही. इथंही महत्त्वाचं ठरत आले आहे, ते संतांमधलं शेतकरीपण.

बलुतेदारी व्यवस्थेचा कणा असणारा कुणबी कोणालाही मरू देत नव्हता, तसंच असं करताना तो उपकाराची भाषाही वापरत नव्हता. हे त्याचं कुणबीपण संतपणाचा आब राखणारं वाटतं. जाचक अमानवी प्रथापरंपराचा निषेध करत असताना या गोष्टी समजून घेणं अगत्याचं ठरावं. भारतीय स्तरावर प्रबोधन युगातून निर्माण झालेली नव्या विचारांची परंपरादेखील या संत जाणीव आणि नेणिवेला सरसकटपणे नाकारत नाही, हे विशेष महत्त्वाचं आहे. दिलीप पुरूषोत्तम चित्रे ‘पुन्हा तुकाराम’ या आपल्या संपादनात सांगतात की, महाराष्ट्रात समतावादी चळवळीला पोषक भूमी निर्माण करून देण्याचं मोठे कार्य वारकरी चळवळ आणि भक्तिसंप्रदायानं केलं आहे. चित्र्यांची ही भूमिका नीटपणानं आजही समजून घेण्याची गरज आहे.

मराठी संतपरंपरेचा विचार करता निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, नामदेव, गोरोबा कुंभार, सेना न्हावी, सावतामाळी, चोखामेळा, जनाबाई, मुक्ताबाई, सोयराबाई, सोपानदेव, नरहरी सोनार, विसोबा खेचर, परिसा भागवत, जगन्मित्र नागा अशी संतांची मोठी मांदियाळी दिसते. थोड्या पुढल्या टप्प्यावर कान्होपात्रा, कर्ममेळा, भानुदास, चोंभा असे काही संत दिसतात आणि नंतर ठळकपणे दिसतात ते समन्वयकार संत एकनाथ. डॉ. शं. दा. पेंडसे ‘महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास’ या ग्रंथात नाथांचं श्रेष्ठत्त्व मांडत असताना म्हणतात, ‘अस्पृश्योद्धाराचे महाराष्ट्रातले पहिले पुरस्कर्ते एकनाथ होते. जे विशेष महत्त्वाचे आहेत. याचं कारण ग्रामसंस्था, ग्रामव्यवहाराची समग्र जाण असणारा हा संत समकाळाच्या किती पुढं होता, हे यातून दिसतं. नाथांची भारूडं ही नुसती जानपदंच नाही, तर कृषिग्रामव्यवस्थेशी थेट नातं असणारे जातिवंत संवेदन आहे.’

हा सगळा कालखंड अत्यंत धकाधकीचा, धार्मिक आक्रमणं आणि अत्याचारांचा होता. यादवकाळ ते निजामशाही, आदिलशाही, मोगल, कुतूबशाही असा तिचा पसारा. याच काळात आपल्या स्वत्वाचा शोध घेणारा थोर राजा शिवाजी उदयास आला. शिवाजी राजांचे समकालीन म्हणजे तुकोबा. तुकाराम बोल्होबा अंबिले हा वाण्याचा, सावकारीचा व्यवसाय करणारा कुणबी संत. संत जाणिवेला थेट आभाळापेक्षाही मोठं, उदात्त करण्याचं सामर्थ्य तुकोबांच्या शब्द आणि वाणीत होतं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या रक्तात वाहणारे कुणबीपणाचं सत्त्व आणि त्याची त्यांनी परोपरीनं केलेली जपणूक.

समकालीन गावगाड्यात नांदणारे हे सर्व मराठी संत यासाठीच अनेक पातळ्यांवर मराठी मनाचे सर्वोच्च प्रमाण वाटतात. त्यातही अधिक खुलून दिसते ते त्यांचं शेतकरी, कष्टकरी असणं आणि त्यातून जगाच्या कल्याणाची आस बाळगणं. आपापल्या कामधंद्यात बुडालेले हे संत रात्रंदिवस विठ्ठलाला ध्यानीमनी रूजवून आयुष्य साजरं करत होते. सगळ्याच संतांचा शेतकामाशी थेट संबंध होता असंही नाही. तरी त्यांच्या भोवतालचा सामाजिक अवकाश हा संपूर्ण शेतीप्रधान होता. या आपल्या वर्तमानाचा ध्वनी संत साहित्यात उमटत असताना आपल्याला दिसतो, तोही अतिशय वास्तववादी पद्धतीनं.

एकोणिसाव्या, विसाव्या शतकातील कृषिग्रामजाणिवेच्या साहित्यावर म्हणजेच एका अर्थानं ग्रामीण साहित्यावर स्मरणरंजनाचा ठपका ठेवला जातो. शेती, शेतकरी, खेडं या विषयीचे बरंचसं कृतक लेखन या काळात निर्माण झालं. एक प्रकारचं रोमँटिक खेडं आणि खेडूत या काळातील कवी, कथाकार, कादंबरीकारांनी उभं केलं. याचा विचार करता संत साहित्याच्या यासंदर्भात केल्यास काय दिसतं?

आधुनिक काळातला मराठी कवी, लेखक हे शिक्षित, उच्चशिक्षित आणि प्रबोधन युगातले होते. पाश्चात्य जाणिवांनी त्यांचं भरणपोषण झालेलं होतं. तरीही कृषिकेंद्री साहित्य लिहीत असताना अपवाद वगळता बहुतेक कवी, लेखक हे कृतक सौंदर्यवादी भूमिकेनं पछाडलेले दिसतात. संत साहित्याचा कालखंड सर्वार्थानं मध्ययुगीन, स्थिर, गतानुगतिक असला, तरी मराठी संत साहित्यातून ज्या जाणिवांचा अविष्कार होत होता त्या अतिशय प्रगल्भ, वास्तववादी अशा स्वरूपाच्या होत्या. शेती आणि खेड्याविषयी ज्ञानदेवांपासून ते तुकोबांपर्यंत जे प्रकटन झालं, ते अपूर्व अशा स्वरूपाचं आहे. सर्व संतांना विठू चिकटला आहेच; पण शेती, शेतीतली माती आणि त्याचा भवतालही!

मराठी संतांचं गावगाड्याशी आणि शेतीमातीशी अभिन्न असं नातं होतं. गावगाड्यातल्या जाणिवांचे हुंकार अध्यात्माला जोडून संत साहित्यात आपल्याला उमटताना दिसतात. लीळाचरित्रातून शेती जीवनातील दैनंदिन जगण्याचे असंख्य संदर्भ आहेत. धांदूल मोक्ष कथनाची लीळा, या अर्थानं अतिशय प्रातिनिधिक, शेती व्यवस्थेचं विकल रूप मांडणारीच आहे.

रात्री दिवसा वाहतसे चिंता । केशवा धडौता । होईन मी ॥
खिरजट घोंगडे । फाटके ते कैसे । वेचले तैसे। भोगिजे ॥
वित्त नाही गाठी । जिवीत्त्वा आटी । उघडी पाठी । हीव वाजे ॥

सातशे वर्षांपूर्वीच्या शेतकर्‍यांचं आणि शेतीव्यवस्थेचं ज्ञानेश्वरांनी काढून ठेवलेलं हे एक तैलचित्रच मानावं लागेल. संतांचे निरूपणाचे विषय आध्यात्मिक असले तरी दृष्टी सभोवार आहे. त्यातून येणारी रूपकं, प्रतिमा, प्रतिकं ही सारी शेतीव्यवस्थेशी निगडित आहेत.

ज्ञानेश्वर आणि त्यांचा संतमेळा हे एकाच काळाचं, व्यवस्थेचं आणि जाणिवेचं अपत्य होतं. आध्यात्मिक लोकशाहीचं अतिशय भावस्पर्शी रूप या काळात आपल्याला पाहावयास मिळतं. महाराष्ट्रभरातून गोळा झालेले हे एका वाटेचे वारकरी. विठ्ठलाचं पिसे लागलेले. या पिसेपणातही त्यांनी आपल्या वर्तमानाचं बोट सोडलं नाही, हे विशेष महत्त्वाचं आहे. ‘आम्ही कीर्तन कुळवाडी । आणिक नाही उदीम जोडी ।’, हे सांगणारे नामदेव मराठवाड्यातल्या नरसीचे. एका बारीकशा गावचे. कीर्तनाचे रंगी नाचून, ज्ञानाचे दीप लावताना आपल्या कुळवाडीपणाला विसरत नाही. ‘कैवल्याच्या राशी’ अशी प्रतिमा नामदेव सहजपणे वापरताना दिसतात.

मराठी संतांचं मराठीपण अलौकिक स्वरूपाचं होतं. मराठी भाषेचं वैभव अभंगवाणीतून सतत ओजस्वीपणानं प्रकट होतंच, पण समकाल आणि समाजसंस्कृतीचं भानही तेवढ्याच ताकदीनं येताना दिसतं. सावता माळी हे इतर सर्व संतांप्रमाणंच अभावात जन्मलेले वाढलेले. सतत रानात राबणारा हा संत ‘राबता संत’ होता. सावता माळी हे कर्मयोगी संत होते. आपल्या शेतीच्या कामातच त्यांना विठोबाचं दर्शन होत असे. सावता माळी हे पंढरीची वारी करत नसत, असंही सांगितलं जातं. पंढरीच्या वारीकडे नकारात्मकपणे पाहणार्‍यांना सावता यांनी फार पूर्वीच आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे.

कर्मकांड, आध्यात्मिक सोपस्कार न पाळणारा हा संत, ज्याच्या मनाचा गाभारा विठ्ठलानं भरून गेला होता. ‘कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥’ असं मानणारे सावता आपल्या आध्यात्मातून श्रमसंस्कृतीचं महात्म्य गाताना दिसतात. ‘स्वकर्मात व्हावे रत । मोक्ष मिळे हातोहात ।’ अशी भूमिका मांडणारे सावता माळी थेट आपल्या समकालीन कृषीसंस्कृतीचे यासाठीच भाष्यकार वाटतात. जो संदेश विसाव्या शतकात गाडगेबाबा देत होते तोच सावता माळ्यानं मध्ययुगात रूजवला होता. सावता माळ्यांची कृषिनिष्ठा ही शेतीलाही विठ्ठलाच्या पातळीवर नेणारी होती.

महार जातीत जन्मलेले चोखोबा एकाच वेळी गावकुसाचं, गावशिवाराचं प्रतिनिधित्व करताना दिसतात. जातिव्यवस्थेची टोचणी लागलेला हा संत अतिशय व्याकुळपणे विठ्ठलाला आळवताना दिसतो. ‘धाव घाली विठू आता । चालू नको मंद । बडवे मज मारीती । ऐका काही तरी अपराध ॥’ अशी आळवणी करणारा चोखामेळा अध्यात्मातील जातीय वर्चस्ववादाबद्दल संयतपणे बोलताना दिसतो.

शेती, गावगाडा, बलुतेदारी, जातिव्यवस्था या सर्व व्यवस्था मध्ययुगात परस्पर संलग्न होत्या. महार याच ग्रामशेती व्यवस्थेतला एक बलुतेदार. चोखामेळा या जातीचे मध्ययुगातले बोलके प्रतिनिधी. शिवारात तेव्हा विद्रोह पेटला नव्हता, नकारानं स्थान मिळवलं नव्हतं, पण परिवर्तनाच्या त्रिसूत्रीपैकी वेदना मात्र चोखोबांकडे होती. एक प्रकारचं विशुद्ध जाणतेपण ते ‘उस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भूललाशी वरलीया रंगा ॥’ यासारख्या ओळीतून मांडताना दिसतात. चंदन, बोरी-बाभळी, टाकळी असे संदर्भ तसंच दुष्काळाविषयीचं त्यांचं बोलणं हे चोखोबांचं कृषिसंस्कृतीशी असणारं नातं दर्शवणारे आहे.

उस्मानाबाद जवळच्या तेरचे गोरोबाकाका. त्यांच्या समकालीनामधे सर्वात जेष्ठ संत मानले जातात. नामदेवांच्या अभंगातून त्यांचे संदर्भ येतात. अनुभवाचे फार जुने थापटणे गोराबांपाशी आहे, असा सर्वांचा समज होता. गाडगी, मडकी घडवून उदरनिर्वाह करणारे गोरोबा, ‘देवा तुझा मी कुंभार’ म्हणत विठ्ठल साधना करत. गोरोबांचे फारच मोजके अभंग उपलब्ध आहेत. त्यांच्या अभंगातून देशधडी, झनकुट, खादली, चाखाया, आधाराया, झडपणी, धरणीधर अशा ग्रामसंस्कृतीशी निगडित शब्दांची पेरणी नेमकेपणानं केलेली आढळते.

ज्ञानेश्वर, सावता, गोरोबा, चोखा यांचे सर्व समकालीन संत कवी आणि कवयित्री यांच्या अभंगातून भाषा, रूपकं, प्रतिमा यांच्या रूपातून शेती, खेडीपाडी आणि तिथलं जगणं यांचे संदर्भ येतात. मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, सोयराबाई, निर्मळा या संत कवयित्रीचं एक स्वतंत्र जग जे स्त्री-जाणिवा आणि देश-जाणिवा यांच्याशी जोडणारं आहे. ‘मुंगी उडाली आकाशी । तिने गिळले सूर्याशी ॥ थोर नवलाव जाहला । वांझे पुत्र प्रसवला ॥’ मुक्ताबाई अशा अभंगातून एक अनवट जग समोर ठेवते. ‘डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारी जाईन मी ॥,’ हे जनाबाईंच्या विद्रोहाचं अनोखं रूप आहे. यातला थेटपणा हा खर्‍या अर्थानं जानपद आणि शेती संस्कृतीतला मानावा लागेल.

महाराष्ट्राचे खरे नाथ, म्हणून रानड्यांनी एकनाथांचा सार्थ शब्दात गौरव केला आहे. १५२८ साली जन्मलेले नाथ पैठणचे. वाढत्या इस्लामी आक्रमणांचा हा बिकट काळ. या काळात मराठी माती आणि मनाला बळ देण्याचं अभूतपूर्व कार्य नाथांनी केलं. बहुजनवादी दृष्टीचा हा थोर संत खास आपल्या देशी भाषेत साध्या समजेल अशा रचना करताना दिसतो. त्यामागची प्रबोधनाची प्रेरणा सांगण्याची गरज भासू नये इतकी स्पष्ट आणि ओघवती आहे. नाथांनी खूप मोठ्या प्रमाणात रचना केली. तथापि पदं, गौळणी आणि भारूडं यातून कृषिग्रामसंस्कृतीतले नाथ ठळकपणे दिसतात. ‘फणस जंबीर कर्दळी दाटा । हाती घेवून नारंगी फाटा । वारियाने कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले ॥,’ अशी रचना असो की, ‘असा कसा देवांचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा गं बाई ॥’, अशी रचना नाथांचं समाजजीवनाशी असणारं थेट नातं लक्षात येतं. अशा रचना लिहिताना नाथांसमोर खर्‍या अर्थानं इथला कृषक समाज होता. भारूडं, गवळणी ही तर नाथांची महाराष्ट्रातल्या कष्टकरी, बहुजन शेतकरी समाजाला दिलेली अपूर्व देण आहे. मनोरंजनातून प्रबोधन आणि परमार्थ शिकवणारे नाथ ‘लोकसाहित्यकार एकनाथ’ मानले जातात, ते यासाठीच.

तुकोबा हे मराठी कवितेतलं, संस्कृतीतलं आणि जगण्यातलं स्वतंत्र आभाळ आहे. तुका आकाशाएवढा, हेही मला मान्य नाही. तुका कित्येक आकाश व्यापूनही आकाशापेक्षाही जास्त उरलेला आहे. तुकोबा हा मराठी माती, वेदना, जगणे आणि संस्कृतीचा मानदंड आहे. संपूर्ण संतमंडळाचं कार्य हे अपूर्व अशा स्वरूपाचं आहेच. पण तुकोबा हा त्याचा कळस झाला आहे, हे बहिणाईचं विधान लाख मोलाचं आहे.

मराठी मन, भाषा, संस्कार, संस्कृती, शेती, गावगाडा आणि तुकोबा यांचं नातं मांडणं म्हणजे एखादं आभाळ पेलण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. जोतिरावांनी शेतकर्‍यांमधला संत, अशा शब्दात तुकोबांचा उचित गौरव केलाय. ज्या कुणबीपणाचा संदर्भ यापूर्वी आलाय, त्या अर्थानं तुकोबा हे मराठी संत परंपरेतले ‘उजळमाथ्यानं कुणबीपण’ मिरवणारे पहिले संत मानावे लागतील. संत कवितेतलं सर्वोच्च शिखर आणि सर्वात खोल डोह म्हणून तुकोबांच्या अभंग-कवितेचा विचार करावा लागेल. चाळीस बेचाळीस वर्षांच्या आयुष्याचा छोटासा पसारा जगून तथाकथित वैकुंठाला गेलेला हा महान संत अनेकार्थानं मला जगातल्या शेतकरी, कष्टकर्‍यांचा प्रतिनिधी वाटतो.

तुकोबा हे शिवरायांचे समकालीन. आपल्या अभंगातून त्यांनी जगण्यातलं तत्त्वज्ञान मातीला भिडून मांडलं. त्याचा राजकीय उद्गार म्हणून शिवाजी राजांच्या कार्याकडे पाहावं लागतं. मला नेहमीच वाटत आलं आहे की, राजाच्या वेषात रात्रंदिवस बेचैन होऊन दु:खाचा शोध घेणारा शिवाजी म्हणजे तुकोबा आहे आणि संत होऊन अंतरीच्या कळवळ्यानं लोकांशी बोलणारा, विठ्ठलाशी भांडणारा तुकोबा म्हणजे शिवाजी आहे. जोतिराव म्हणतात, ‘शेतकर्‍यांमधला पहिला संत म्हणजे तुकोबा आणि शेतकर्‍यांमधला राजा म्हणजे शिवाजी, हे अनाठाई नाही.’

तुकोबांच्या काळातला समाज हा शेतकीसमाज होता. अस्मानी आणि सुलतानी एकाच वेळेला याठिकाणी नांदत होती. ही सगळी संकटं पचवून इथला शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. १६३०च्या दरम्यान महाराष्ट्रात भीषण अशा स्वरूपाचा दुष्काळ पडला. या काळानं तुकारामांची जगण्याकडे बघण्याची दृष्टीच पालटली. ‘मढे झाकुनीया करिती पेरणी’, असं सांगणारा तुकोबा पेरणीचंच नाही तर एकूण जगण्याचं महत्त्व आपल्या अभंगातून टोकदारपणे मांडत गेला. तुकोबाचं जगणं आणि तुकोबांची कविता थेट भुईला, गावाला आणि त्यावरल्या आभाळाला भिडलेली आहे. ‘बीज तो अंकुर, अच्छादिला पोटी’, किंवा ‘बीज नेले तेथे येईल अंकुर, जतन ते सार करा याची’ वृक्षवल्ली आणि चराचराचा जातिवंत सोयरा वाटणारा तुकोबा म्हणूनच आभाळापेक्षाही मोठा वाटतो.

‘मेघवृष्टी येथे होते आनिवार । जिव्हाळ्या उखर लाभ नाड ॥ तुका म्हणे जिणे बहू थोडे आहे । आपुलिया पाहे पुढे बरे ॥’ उखर झालेल्या जगण्याला परोपरीनं ठिगळं लावण्याचा प्रयत्न करणारा तुकोबा आपल्या चहुबाजूंनी धावून येणार्‍या अराजकाला आपल्या वाणी आणि अभंगातून तोंड देताना दिसतो.

‘बरा देवा कुणबी केलो । नाही तरी दंभेची असतो मेलो ।’ हे तर तुकोबांचे शेतकरी समाजाविषयीचं प्राक्तनच मानावं लागेल. तुकोबांच्या अभंगातून ठायी ठायी शेतीविषयीचे असंख्य संदर्भ दिसतात. जे नुसते संदर्भच असत नाहीत तर जगण्याबद्दलचं विधान असतं. ज्या विधानातून तुकोबा आपल्या समकालाचा संपूर्ण तोल सावरताना दिसतात. ‘बीज न पेरावे खडकी । ओल नाही ज्याचे बुडकी ।’ असं सांगणारा तुकोबा, ‘शुद्ध बिजापोटी । फळे रसाळ गोमटी ।’ असंही निखालसपणे सांगून जातो. लिंबाच्या झाडाला साखरेचं आळं केलं तरीसुद्धा लिंबाचं झाड आपला कडूपणा सोडत नाही, असं सांगणारे तुकोबा, भंडारा डोंगरावर पृथ्वी आणि आकाश यात सामावून गेलेले दिसतात. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षी ही सुस्वरे आळविती ॥ तुका म्हणे होय मनाशी संवाद । आपलाची वाद आपणाशी ॥’ या अभंगातून तुकोबा थेट आभाळाला भिडल्यासारखे वाटतात. झाडाझुडपांशी, प्राणिमात्रांशी संवाद करणारे तुकोबा, ‘शेत आले सुगी । सांभाळावे चारी कोन ॥’ असं म्हणतात त्यांच्यातला शेतकरी किती जागृत असतो, हे दिसतं.

तुकोबांचे अभंग म्हणजे जगातल्या कृषिवलांचा उद्गार मानावा लागेल. ‘एका बीजे केला नास । मग भोगिले कणीस ॥’ असं सांगणारा तुकोबा शेतीशास्त्रातून जगातील नवनिर्माणाचंच महाकाव्य समोर ठेवताना दिसतो. ‘मिरासीचे म्हणू शेत । नाही देत पिक उगे ॥’ हे सांगणारा तुकोबा परोपरीनं श्रमसंस्कृतीचंच तत्त्वज्ञान मांडताना दिसतो. ‘खोल ओल पडे ते पीक उत्तम । उथळाचा श्रम वाया जाय ॥ लटिक्याचे आम्ही नव्हे साटेकरी । थीते घाली भरी पदरीचे ॥’ अशा कितीएक अभंगातून तुकोबांनी शेतकर्‍याच्या जगण्याचं वास्तव तर मांडलंच, पण त्याची जोड एकूण जगण्याच्या वास्तवाला दिली.

‘मढे झाकुनिया करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहे ॥’, अशा कितीतरी ओळी शेती जीवनातल्या महावाक्यासारख्या वाटतात आणि या एकेका वाक्यात स्वतंत्रपणे एकेक महाकाव्य वाटतं. तुकोबांच्या अभंगवाणीचा विचार करताना समकालीन महाराष्ट्रामध्ये कृषिग्राम वास्तव सातत्यानं समोर येत राहतं. ‘पिकविले तया खाणे किती?’ असा प्रश्न विचारणारा तुकोबा आजच्या काळालाही प्रश्न विचारताना दिसतो तेव्हा सार्वकालीन वाटतो. तुकोबांचं हे सार्वकालीनत्व अवघ्या विश्वाला व्यापून उरणारं आहे. म्हणूनच तुकोबा जगद्गुरू वाटतात.

भक्तिसंप्रदायाचं साहित्य आणि शेती यांचं नातं आंतरिक अशा स्वरूपाचं आहे. या नात्यात वास्तवाचे पदर आहेत तसंच ओलेपणही आहे. जगण्याला अभिमुख राहून विठोबाला सर्वार्थानं शरण गेलेले भक्तिसंप्रदायातले संत हे अनेक स्तरांवर शेतकरीच वाटतात. त्यांनी फक्त अध्यात्माची शेती फुलवली नाही, तर शेतीत राबणार्‍यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात बळ दिलं. देशभरात गेल्या कित्येक दशकांपासून लाखोंच्या संख्येनं शेतकर्‍यांच्या आत्महत्या होताना दिसतात. मराठी मातीतल्या शेतकर्‍यांना मात्र जगण्याचं बळ इथल्या अभंग, ओव्या, गौळणी, भारूडे, लोकगीतं यांनी दिलं आहे.

महाराष्ट्रात भक्तिसंप्रदायाची परंपरा नसती तर आज ज्या संख्येनं शेतकरी आत्महत्या होतात त्याचं प्रमाण कितीतरी मोठ्या प्रमाणात वाढलं असतं, हेही नाकारता येणार नाही. वारकरी साहित्य परिषदेच्या संमेलनात एका वारकरी प्रतिनिधीनं असं विधान केलं की, ‘आत्महत्येनंतर मिळणार्‍या पैशाच्या लालसेपोटी शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत,’ हे विधान ऐकून चक्रावल्यासारखं होतं. भक्तिसंप्रदायाचे आपण वारकरी आहोत, असं नातं सांगणार्‍या लोकांकडूनही अशा प्रकारची मीमांसा होत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा आपली भक्तिपरंपरा नीटपणानं समजून घेण्याची गरज आहे.

आपल्यासमोर जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था आणि वाढत्या अराजकाचा काळ आहे. आपण आपलं सत्वसंपन्न जगणं हरवून बसतो की, काय अशी भीती निर्माण होताना दिसतेय. पुनरूज्जीवनवादी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात डोकं वर काढताना दिसतात. भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे विधान या काळात एक प्रकारे विनोदी विधान वाटू लागलं आहे. त्या काळात संतांनी दिलेला शेती-भाती, कष्टकर्‍यांविषयीचा संदेश या काळाला वळण लावू शकेल, असं वाटतं. तथापि त्याकडे पुन्हा एकदा डोळसपणे पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे, हा खरा प्रश्न आहे.

0 Shares
जोतिबाबा, तू मला ज्ञानेश्वर भेटलास वारकरी कर्म योगाचा पहिला आदर्श